लघुग्रहाची पृथ्वीशी होणारी टक्कर टाळण्यासाठी-DART Mission

-अमित जोशी

पृथ्वीवर संचार करणारे डायनासोर हे सहा कोटी वर्षांपूर्वी एका लघुग्रहाच्या धडकेमुळे नष्ट झाले असा एक जगमान्य सिद्धांत आहे. अशा विविध आकारांच्या लघुग्रहांची पृथ्वीशी टक्कर अनेकदा झाली असून अशा काही घटना गेल्या काही वर्षांमध्येही घडल्याची नोंद आहे. तेव्हा असाच एक मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर? अशा धडकेची टांगती तलवार  खगोल अभ्यासक आणि अवकाश विषयात रुची असणाऱ्यांचा मनावर कायम आहे. एखादा लघुग्रह किती विध्वंस करु शकतो हे गेल्या काही वर्षात विविध चित्रपटांच्या माध्यमातून, माहिती पटांतून समोर आले आहे.

तेव्हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता किती, पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहाचा माग काढणे शक्य आहे का, अशी टक्कर टाळता येणे शक्य आहे याचे उत्तर नासाच्या ‘DART Mission’ मधून मिळणार आहे.

‘DART’ मोहिम नक्की काय आहे?

DART म्हणजे Double Asteroid Redirection Test (DART). दोन लघुग्रहांच्या बाबतीत आखलेली मोहिम असंही म्हणता येईल. पृथ्वीपासून काही कोटी किलोमीटर अंतरावरुन जास्तीत जास्त ८०० मीटर व्यास असलेला ओबडधोबड आकाराचा Didymos नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेशी काहीसा समांतर पण लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरत आहे. या Didymos भोवती चक्क १६० मीटर व्यासाचा Dimorphos नावाचा लघुग्रह हा एखाद्या चंद्राप्रमाणे फिरत आहे. मात्र सूर्याभोवती परिक्रमा करतांना हे दोन्ही लघुग्रह फुगडी घातल्यासारखे एकमेकांभोवती फिरत असतात. तर या लहानग्या Dimorphos वर नासाचे DART नावाचा उपग्रह  प्रचंड वेगाने आदळणार आहे. या टकरीतून लहानग्या Dimorphos ची दिशा आणि वेग किती बदलला जातो, फरक पडतो याचा अभ्यास केला जाणार आहे.

मोहिमेचा नक्की फायदा काय?

पृथ्वीच्या दिशेने भविष्यात एखादा लघुग्रह किंवा चक्क धुमकेतू भविष्यात येणार असेल तर त्याला रोखणे, नष्ट करणे किवा किमान त्याची दिशा बदलणे शक्य आहे का याचा चाचपणी ही DART Mission च्या माध्यमातून केली जाणार आहे. भविष्यातील पृथ्वीवर येणारे संभाव्य संकट टाळण्याचा एक भाग म्हणून DART Mission कडे बघितले जात आहे. अर्थात मोठा लघुग्रह असेल तर आणखी काय पर्याय असू शकतात याचाही विचार या मोहिमेच्या निमित्ताने केली जाणार आहे.

लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता किती आहे?

सर्वसामान्यांना एक गोष्ट नक्की माहित असेल की मंगळ आणि गुरु ग्रहाच्यामध्ये विविध आकाराचे लघुग्रह आहेत. असं असलं तरी पृथ्वीच्या कक्षेशी समांतर पण पृथ्वीपासून काही लाख किलोमीटर अंतरावरुन लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणारे असंख्य लघुग्रह आहेत. त्यांना Near-Earth object या नावाने ओळखले जाते. अशा लघुग्रहांचा आकार काही मीटरपासून एक किलोमीटरपेक्षा जास्त आहे. तर Near-Earth object मधील लघुग्रहांची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेत आली तर हे लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता जास्त आहे. याचीच चिता शास्त्रज्ञ-अभ्यासकांना आहे. एवढंच नाही तर सूर्यमालेत किंवा बाहेरून आलेला एखादा धुमकेतू, मोठा लघुग्रह हाही पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं असलं तरी असंख्य लघुग्रह हे दररोज पृथ्वीवर आदळत असतात. मात्र यांचा आकार लहान असल्याने ते पृथ्वीच्या वातावरणाच जळून नष्ट होतात. रात्री आकाशात काही वेळेला तारे पडतांना दिसतात ते हेच लघुग्रह.

अशा विविध लघुग्रहांचा माग किंवा त्यावर लक्ष ठेवण्याचे काम नासासह जगभरातील काही संस्था करत आहेत. त्यामुळे कोणता लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे, कोणता नवीन आढळला हे वेळोवेळी जाहीर केले जाते. पुढील काही वर्ष तरी ज्ञात लघुग्रहाकडून पृथ्वीला धोका नाहीये.

२४ नोव्हेंबर २०२१ ला ‘नासा’ने DART नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला. येत्या २६ सप्टेंबराला पृथ्वीपासून सुमारे एक कोटी १० लाख किलोमीटर अंतरावर असतांना हा उपग्रह Dimorphos वर आदळणार आहे. ही टक्कर होण्यापूर्वी DART उपग्रह काही छोटे उपग्रह याच भागात सोडणार आहे, हे उपग्रह टक्करीची ताजी छायाचित्रे पृथ्वीकडे-नियंत्रण कक्षाकडे पाठवणार आहे. यामुळे टक्कर झाल्यावर लहानगा लघुग्रह Dimorphos चा वेग आणि दिशा यात किती बदल झाला आहे याची नोंद केली जाणार आहे. तेव्हा ही टक्कर कशी होते, याचे परिणाम होतात याची उत्सुकता खगोलप्रेमींमध्ये आहे.

(लेखक ‘झी २४ तास’ वृत्त वाहिनीत कार्यरत आहेत)

9833224281
Previous articleभावनांवर चालणारी बाजारपेठ!
Next articleमहात्मा गांधी यांची मुलाखत – फॉक्स टीव्ही
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here