-प्रवीण बर्दापूरकर
‘बसोली’ म्हणजे ‘चंद्रकांत चन्ने’ आणि ‘चंद्रकांत चन्ने’ म्हणजे ‘बसोली’ हेच समीकरण नागपूरकर-विदर्भाच्याच नाही तर बसोलीचा कलावंत जगाच्या पाठीवर जिथं कुठं आहे त्यांच्या मनात आहे . हा मजकूर प्रकाशित होईल त्यादिवशी देशातील एकमेव एव्हढी मोठी बालकलावंताची ‘बसोली’ ही चळवळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे . राजकारणाच्या रणधुमाळीत कलावंतांच्या एखाद्या चळवळीचं काय ते कौतुक , असा विचार कांहीच्या मनात येऊ शकतो पण एक लक्षात घ्या , जो समाज सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असतो तोच समाज सुसंस्कृत , सभ्य आणि संयत असतो . गेल्या पन्नास वर्षात समाजात रंगभान निर्माण करण्याचं ‘बसोली’नं केलेलं काम नि:संशय अतुलनीय आहे . म्हणूनच अशा संपन्न चळवळीचं नेतृत्व कसं असतं/असावं त्याचा घेतलेला हा वेध-
अगदी काटेकोरपणे सांगायचे तर २८ जानेवारी १९८४ ला दुपारी साडेचार वाजता पंचशील चौकातल्या नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात नागपूर-विदर्भात रंगभान निर्माण करणार्या आणि चित्र जागृतीला चेतना देणार्या चंद्रकांत चन्नेंची ओळख झाली. प्रकाश देशपांडेनी ती करून दिली. दहा-पंधरा मिनिटातच आम्ही ‘अरे-तुरे…’ वर आलो. तिघांनीही समोरच्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन सिगारेटी फुंकत, दोन कॉफी तिघांत शेअर केली आणि एका दीर्घकाळ चालत राहणार्या मैत्रीचा उगम झाला. तेव्हापासून आजपर्यंत चंदू आणि मी यांच्या मैत्रीचा अव्याहत नाद सुरू आहे. अतिशय नियमित गाठीभेटी नाहीत, रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसल्याचे प्रसंगही खूप अपवादाने आलेले, एकमेकाला भेटवस्तू देणंघेणं नाही, परस्परांत कुठलाही व्यवहार नाही, एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यात आजवर दोघांपैकी कुणीही, कधीही, कुठेही, केव्हाही डोकावूनही पाहिलेलं नाही, तरीही हा नाद आहे, साथीला अशी कोणतीही संगत नसतानाचा… निर्व्याज्य मैत्रीचा. प्रकाश देशपांडे नावाची या मैत्रीतली कडी इतकी अनपेक्षित गळून पडली आणि तीही अशा विचित्र पद्धतीने की आजही त्याचा वास्तव म्हणून स्वीकार झालेला नाही.
