गावाकडची जत्रा

-प्रणाली देशमुख, अमरावती

हुडहुडणाऱ्या  थंडीत  भरणारी  गावाकडची जत्रा , वर्षभर वाट पाहता पाहता दोन चार  दिवसांवर आलीरे आली की आठ दिवसांपैकी एखादा दिवस ठरवून बाबा जत्रा बघायला न्यायचे .

 रात्री ” झोपारे लवकर झाकटीत उठायचं आहे म्हणत ”  आई स्वयंपाक खोलीतून पुकारा करायची . तिचा आवाज आला तरिही व्हॉल्युम कमी करून दुलईच्या आत आमची कुजबुज  सुरूच असायची . हातपाय  इतके उलायचे की आई झोपायच्या आधी साय चोळून चोळून लावायची नाहीतर दुसऱ्या दिवशी तीळ बारीक वाटून लावल्यावर हातापायाची माती वातीसारखी घासून घासून काढायची , हल्लीच्या मुलांचे हातपाय उलत नाही बहुतेक .त्यांचे न उललेले गाल बघून वाटतं आपल्या काळात थंडी जरा जास्त पडत होती का ?

साडेतीन चारला पहाटे उठवल्यावर डोळे चोळत चोळतच बैलगाडीत बसायचो . घराच्या मागच्या बाजूला आमचे घरगडी काका बैलगाडीला बैल जुंपून , गाडीत कडबा कुटार त्यावर  तडव  , मग गाद्या टाकून  बसायला बिछायत  करून ठेवायचे .

आमच्या कडची  बैल जोडी उंच , सुदृढ , थोड्या कमानदार शिंगाची , पांढरी शुभ्र होती . कुणाचीही दृष्ट लागावी अशीच होती .

सोबत  शिधा आटा , पूजेचं सामान , प्रत्येकाचा एक एक एक्सट्रा ड्रेस बस इतकंच . पाण्याच्या बॉटल  , वॉटरबॅगचं वगैरे ओझं  नसायचं सोबत , एखादी विहीर दिसली  की पाणी ओढून प्यायचं आणि पुढच्या प्रवासाला लागायचं . कोंबड्याचं आरवण , पाखरांचा किलबिलाट ऐकून कधी इकडे कधी तिकडे सारखी मान वळवून कुतूहलाने  बगळे दिसले की लगेच ,  बगळ्या  बगळ्या दूध दे म्हंटल की नखावर पांढरा ठिपका यायचा .

जिथं जत्रा तिथं जागेची शोधाशोध करून एखाद्या डेरेदार चिंचेच्या  झाडाखाली आमची राहुटी असायची  .आई आम्हा तिघांनाही आंघोळीला न्यायची . एकतर कडाक्याची  थंडी आणि गार पाणी .आंघोळ करतांना शिरशिरी  भरायची . घरून पहाटेच निघाल्यामुळं पोटात  काव  काव ऐकू यायची . जत्रा म्हंटली की रोडगे , वांग्याची भाजी , वरण भात हा घाट ठरलेलाच होता .  बाबा एखाद्या दुकानातून  मुरमूरे फुटाणे ,शेवचिवडा आणायचे  .मोठ्या पेपरवर  तिखट मीठ लिंबू  पिळून  कच्चा चिवडा  करून आम्हाला वर्तमान पत्रावर वाढायचे चिवडा खायला.  त्याच पेपरची  घडी  करून समोरचा भाग खोल करून चमचा बनवून  द्यायचे . आमचं  झालं की बैलांना पाणी पाजून  आणलं की जगरं पेटवायचे . आई तोपर्यंत जाडसर  कणिक  मळून रोडग्याची तयारी करायची .आधी वरण, भाजी भात नंतर गोवऱ्याच्या निखाऱ्यात रोडगे भाजायला  ठेवायची  .आम्ही चिल्लर कंपनी चार पाच वेळा देवळात  चकरा मारत खेळण्याची दुकानं कुठे कुठे आहे, याचा शोध लावून यायचो . बहिरम चा बहिरमबाबा उंच पहाडावर देऊळ , ￰शेंदूर लावलेला  किंवा शेंदूर लावूनच एक भलामोठा  आकाराचा देव त्यावेळी फार वेगळा वाटायचा , कुठपासून कुठपर्यंत त्याचे नाक डोळे चेहरा शोधण्यासाठी त्याच्या भोवताल कित्येक प्रदक्षिणा घातल्यावर खाली  उतरतांना पायऱ्या मोजत मोजत किंवा बाजूच्या  आडवाटेने सरळ धावत खाली  येतांना खूप मजा यायची . उतार असल्यामुळे एकदा वरून पळत सुटलो की एखाद्या झाडाचा  आधार घेत फुललेला  श्वास जरा कमी झाला की दुसऱ्या टप्प्यात  आमची गाडी थेट खाली येऊन थांबायची .

दुसरं काम म्हणजे लटपट  लागलेल्या गाभुळलेल्या  चिंचा नेम धरत दगड मारून जमावायचो  . चिंच कुणाला आवडत नसेल . पण चिंची पेक्षा माझा जीव चिंचोक्यात असायचा भाजलेले  चिंचोके  खायला जितके छान लागतात  त्यापेक्षा खेळायला   आमची  जमवाजमव सुरु असायची . एकतर आपल्याकडे खुपसारे चिंचोके म्हणजे आपण खूप श्रीमंत, असलंच काहीतरी त्यावेळी वाटायचं . चिंचोक्याच्या  बदल्यात पेन्सिल खोडरबर  पेन असल्या मोठ्या मोठ्या डील, मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुरु व्हायच्या जास्तच आधी वर्गात बसून आपापसात व्हायच्या .

आईचा स्वयंपाक होईपर्यंत आमची चार पाच वेळा जत्रा धुंडाळून झाली की  बाबांना कोणत्या कोणत्या दुकानात न्यायचं , याचा प्लॅन पक्का असायचा. जेवण आटोपलं  की लिस्ट तयार असायची.  मागच्या वर्षी फॅन , कुकर घेतला यावर्षी बाहुला  बाहुलीचा जोडा , बास्केट  ,गॅस , सिलेंडर , मिक्सर घ्यायचंच मनात ठरवलेलं  असायचं . जत्रेच्या एका बाजूला आम्हाला जायची परवानगी नव्हती पण का ? स्पष्ट कुणी काही सांगत नव्हतं पण तिकडे तमासगीरांचा  फड आहे असं ऐकलं होतं . म्हणजे काय विचारल्यावर आता सांगायचा कंटाळा आलाय म्हणून खाली पडलेल्या चिंचा वेचायला लावायचे.   .

पळसाच्या पत्रावळीवर गरम गरम रोडगे भाजीचा यथेच्छ आस्वाद घेतल्यावर तृप्त झालेल्या बाबांना डुलकी यायची . बाबा अर्धवट झोपेत असताना आई आणि आम्ही ‘ओळीनं  प्रत्येक दुकान बघितल्याशिवाय  गावाला जाता येणार नाही’ अशी स्वतः च स्वतःशी बतावणी  करायचो .दरम्यान जत्रेतून चारही दिशेने  भोंग्यातून जोरजोरात येणारे  आवाज ऐकत होतो , आईए  आईए  ”  हमारा घासुराम  गधा आपका भविष्य  बतायेगा ”  “आधी मछली  आधी औरत  आपने  कभी नही  देखी होगी ” एक रुपये सिर्फ एक रुपये मे देखिये मॅजिकल शो “, ”यह लडकी गायब हो जायेगी ” मेहरबान कदरदान मौत  के कुये में देखिये लडकीके स्टंट” . आवाजााने कानाचे पडदे अक्षरशः व्हायब्रेट  व्हायचे .मग आकाश पाळण्यात बसायचो . खरं म्हणजे आम्ही त्याला अगस पाळणा म्हणत होतो . बरेचदा एखादा शब्द चार लोकांकडून फिरत फिरत जसा ऐकू येतो  त्याचा उच्चार तसाच आपण करतो .खरा शब्द माहिती झाल्यावरही पहिल्याची सवय सुटत नाही .

खेळभांडीसाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू  घेतल्यावर सहज मनात यायचं मला जेव्हा नोकरी  लागेल ना तेव्हा मी यापेक्षाही  मोठा किचन  सेट  घेईल , त्या वयात कळत नव्हतं वयानुसार इच्छा बदलतात  आणि अपेक्षा वाढतात . भावाला बॅट बॉल , गाड्या दिल्या की तो खुश , लहान बहीण फार लहान होती त्यामुळे तिची अशी वेगळी डिमांड  वगैरे नाही राहायची . सगळी दुकानं पालथी घातल्यावर घरी जायची घाई , सगळा पसारा बैलगाडीत ठेवल्यावर निवांत बसलेले बैल उठतांना आळस करायचे पण हिवाळ्याचा दिवस लहान.  दिवेलागणीची वेळ झाल्यावर अंधार  पडायचा म्हणून थोडं लवकर निघायची घाई , आणि आम्हाला घेतलेल्या वस्तू मित्रमैत्रिणीला कधी दाखवतो  असं व्हायचं  .

एकदा बंडीत बसलं  की थेट गावात उतरायचं . आमच्या मागे पुढे कितीतरी बैलगाड्या , दमन्या , रिंगी एका लायनीत चालायच्या असा ताफा असतांना रात्र झाली तरी कशाची भीती नव्हती .घुंगरांचा आवाज ,गळ्यात बांधलेल्या घंट्या , अधून मधून   वंगण कमी असलेल्या गाड्यांचा किर्र किर्रर्र आवाजात रातकिड्यांचा आवाज दाबायचा .

ओव्हरटेक करायचा प्रश्नच नव्हता चार गावच्या गाड्या एकाच दिशेला जात असल्या तरी पुढे जायची स्पर्धा किंवा घाई नसायची. निवांत सगळे सोबतच आहोत असं वाटायचं .मधे गाव लागला की काही गर्दी कमी व्हायची . जीवनाचा  प्रवासही  असाच असतो. सोबत चालत असतांना मधल्या वाटेत कुणाचा गाव येईल आणि सोडून जाईल याचा भरवसा नसतो .

घरी पोहचल्यावर  आई  हात पाय धुवायला चरवीभर पाणी गरम करायची  . बाबांना रात्री जेवायचं  नसल्यामुळे आई आम्हाला दूध पोहे द्यायची . आपण घेतलेली खेळणी , गाड्या , बाहुली कुठे आहे असं आईला विचारल्यावर सकाळी बघू रे म्हणत सगळं सामान मधल्या घरात ठेवून कडी लावायची. इतकी सगळी मालमत्ता आपल्याजवळ आहे याच आनंदात बिछान्यात  पडल्या  पडल्या डोळा लागायचा आणि मग स्वप्नातही जत्रा भरायची .

(जत्रा रेखाटन -जितेंद्र साळुंके)

हे सुद्धा वाचायला विसरू नका – बहिरमचं झगमग स्वप्न- https://mediawatch.info/unforgettable-jatra-of-bahiram-avinash-dudhe/

(लेखिका प्रतिभावंत कवयित्री आहेत)

9096016750

Previous articleRRR, KGF-2, पुष्पा- १000 कोटीच्या विक्रमी यशामागचे गुपित काय ?
Next articleहमदम हरदम!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here