RRR, KGF-2, पुष्पा- १000 कोटीच्या विक्रमी यशामागचे गुपित काय ?

-जितेंद्र घाटगे

भारतीय सिनेमाच्या १०० वर्षांच्या इतिहासात एखादा प्रादेशिक चित्रपट सर्व भौगोलिक, सांस्कृतिक मर्यादा ओलांडून सर्व स्तरातील प्रेक्षकांना अपील होण्याची घटना बाहुबलीच्या निमित्ताने पहिल्यांदाच घडली होती. कोरोनोत्तर काळात तीच पुनरावृत्ती KGF २, RRR यांनी केली. हिंदी सिनेमा १००-२०० करोडच्या उत्पन्नाचे आकडे मिरवत असताना, केवळ KGF २, RRR या चित्रपटांनी प्रत्येकी १००० कोटीहून अधिक कमी केली आहे. फक्त भारतातच नव्हे, तर RRR च्या लोकप्रियतेने अमेरिकेच्या जनमानसात अढळ स्थान मिळवले आहे. नेटफ्लिक्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, RRR ही एकमेव फिल्म आहे, जी नेटफ्लिक्सवर सलग १४ आठवडे सगळ्यात जास्त बघितली गेली आहे.

……………………………………………………..

साल १९८८. तेलुगु अभिनेता चिरंजीवीच्या ‘रुद्रवीणा’ सिनेमाला बेस्ट फिल्म ऑन नॅशनल इंटिग्रेशनचा (राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट) नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला होता. हा अवॉर्ड घेण्यासाठी चिरंजीवी आणि फिल्मचे निर्माते नागेंद्रबाबू दिल्लीला जातात. राष्ट्रीय पुरस्कार सोहळा सुरू होण्यापूर्वी चहापानासाठी एका मोठ्या हॉलमध्ये सगळे एकत्र येतात. भारतीय सिनेमाचे वैभव म्हणून भिंतीवर महत्त्वाच्या कलाकारांचे फोटो आणि त्याखाली त्यांची सुंदर शब्दात वैशिष्ट्ये सांगणाऱ्या संक्षिप्त नोट्स होत्या. त्यात पृथ्वीराज कपूर, राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, धर्मेंद्र आणि आणखी काही प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शक यांचे फोटो आणि त्याखाली कौतुकाचे शब्द होते. चिरंजीवींना वाटले की, दाक्षिणात्य सिनेमाबद्दल सुद्धा इतक्याच तपशिलात असं कौतुक केलेलं असेल. परंतु, शेवटाकडे एमजीआर आणि जयललिता यांच्या नृत्याचा फोटो होता. त्याचे वर्णन फक्त साऊथ इंडियन सिनेमा एवढेच केले होते. अजून एक फोटो अभिनेता प्रेम नझीर यांचा लावलेला होता. भारतीय सिनेमाच्या इतिहासात सर्वाधिक चित्रपटांमध्ये मुख्य नायकाची भूमिका करण्याचा बहुमान प्रेम नाझीर यांच्या नावावर आहे. मात्र, त्या फोटोखाली एक ओळ सुद्धा लिहिलेली नव्हती. हे दोन फोटो.  बस्स! कन्नड अभिनेता राजकुमार आणि विष्णुवर्धन, तेलुगु अभिनेते नंदमुरी रामाराव, अक्किनेनी नागेश्वरा राव, तमीळ अभिनेता शिवाजी गणेशन यांचे साधे फोटो सुद्धा तिथे नव्हते. आपण ज्यांना देवासमान समजतो अशा अभिनेत्यांचा इथे उल्लेख देखील नाही, हे बघून चिरंजीवी यांना अपमानित झाल्यासारखे वाटते. ज्येष्ठ अभिनेत्यांचे योगदान मान्य करण्याची तसदी देखील घेतली गेली नव्हती. तिथे फक्त हिंदी सिनेमालाच भारतीय सिनेमा म्हणून सादर केल्याचा भेदभाव उघड उघड होता. चेन्नईत परत आल्यावर त्यांनी ही बाब काही माध्यमांशी बोलून वर्तमानपत्रात छापून आणली. मात्र, त्यावर कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

हा लेख पुढे वाचणाऱ्या सगळ्यांना एक छोटासा प्रश्न आहे. तुमच्यापैकी असे किती जण आहात, ज्यांनी हिंदी, मराठी, इंग्लिश सोडून इतर प्रादेशिक अथवा जागतिक भाषेतील एकही सिनेमा किंवा सिरीज बघितलेली नाही? उत्तर अर्थातच Big No असेल. परंतु, आपल्याच देशात दुसऱ्या प्रांतातील व्यक्ती कुठला सिनेमा पाहाते याचा कल्चरल शॉक बसण्यापासून – ते – डेटा कंझ्युम करण्यासाठी आपल्याकडे अमर्याद पर्याय समोर असण्याच्या जमान्यात, तुम्ही रिजनल सिनेमा पाहता का, असा प्रश्न विचारलाच कसा जाऊ शकतो, याचेही आश्चर्य वाटण्याचा प्रवास फार गुंतागुंतीचा आहे. गेल्या काही महिन्यात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा KGF2 हा कन्नड, तर RRR, पुष्पा हे तेलगू सिनेमे. स्वतःला क्लासी समजणाऱ्या प्रेक्षकांनी उचलून धरलेला ‘विक्रम’ हा तमीळ, तर हिंदीतील बलाढ्य ‘लाल सिंग चढ्ढा’सोबत रिलीज होऊन सुद्धा त्याला टक्कर देणारा ‘कार्तिकेय 2’ हा स्मॉल बजेट तेलुगु सिनेमा. हिंदी सिनेसृष्टी, फिल्ममेकर्स गेल्या 120 वर्षात जेवढ्या बदलाला सामोरे गेलेय तितके अधिक प्रगत होत गेले आहे. मात्र, बॉलिवूडसाठी कोरोनोत्तर 2022 सालची नोंद आंधळ्या व्यक्तीने गाळात रुतलेला हत्ती चाचपडण्याचे वर्ष म्हणून केले जाईल. हमखास हिटची गॅरंटी देणाऱ्या मोठ्या स्टार्सपासून बिगबॅनर स्टुडियोज सगळेच सध्या भांबावलेले आहे. प्रेक्षक कुठल्या फिल्मला उचलून धरतील आणि कुठल्या फिल्मला प्रदर्शित होण्याच्या पहिल्याच दिवशी तोंडघशी पाडतील, याचा काही एक नियम राहिलेला नाहीये. सिनेमा हमखास यशस्वी करण्याचा असा नियम तर आधीही अस्तित्वात नव्हता. पण, ज्या प्रेक्षकवर्गाला समोर ठेवून सिनेमे तयार केले जायचे, तो समूह दिवसेंदिवस विभाजित होतोय, त्याच्या आवडीनिवडी सुद्धा झपाट्याने बदलत आहेत. रूढार्थाने सिनेमासाक्षर नसलेला प्रेक्षक सिनेमासंस्कृतीच्या देवाणघेवाणीला सरावला आहे. आपल्या सिनेमात काय ठेवावे आणि काय फेकावे, याचा निकाल लागत नसल्याने जडत्व झुगारून या बदलाकडे अधिकाधिक सजगपणे पाहण्याची गरज कधी नव्हे ते बॉलिवूडच्या ऐरणीवर आलीये.

२० वर्षांपूर्वीची गोष्ट. इंटरनेट आणि OTT  जनमानसात रुळलेले नसल्याने प्रादेशिक सिनेमाची देवाणघेवाण आजच्या इतकी सहज नव्हती. तेव्हा नाशिकच्या एका सिंगल स्क्रीन सिनेमा हॉलमध्ये दुपारपासूनचे शो नवीन प्रदर्शित होणाऱ्या हिंदी सिनेमाचे असायचे, तर मॉर्निंग शो हा एखाद्या नेपाळी, भोजपुरी किंवा दक्षिणात्य सिनेमाचा असायचा. त्या सिनेमाचे बाहेर जे छोटेसे पोस्टर लावलेले असायचे, ते बी ग्रेड 90s च्या पिक्चर सारखे, एकदम सुमार दर्जाचे. आम्ही १२ वाजेचा शो सुरू होण्याआधी थिएटरबाहेर रांगेत उभे असायचो, त्या वेळी सकाळचा शो पाहून सहकुटुंब बाहेर येणाऱ्यांना पाहून हिंदी सिनेमाला जाणारे प्रेक्षक हसायचे. एवढे भारी नवीन हिंदी सिनेमे सोडून कुठले भिकार चित्रपट हे पाहतात, असा एकंदरीत सगळ्यांचा सूर असायचा. पुढे कॉलेजला असताना दुसऱ्या राज्यातील अनेक मुलांसोबत मैत्री झाली. एकमेकांमध्ये चांगल्या प्रादेशिक सिनेमाची देवाणघेवाण झाली. प्रत्येक प्रांताचे स्वतंत्र सिनेमे त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यासह आवडायला लागले. पण, एकंदरीत सगळ्याच मित्रांमध्ये आपला सिनेमा तोच भारी, असा लपलेला सूर असायचा. राष्ट्रभाषेतील नावाजलेल्या नायकांची/सिनेमांची दक्षिणात्य मित्रांना नाव देखील माहीत असू नये, धक्कादायक होते. ‘शोले’ न पाहिलेला माणूस कुणी असू शकेल, यावर माझा विश्वास नव्हता. पण, आयुष्यात एकाही हिंदी सिनेमाच्या वाट्याला न गेलेले अनेक चित्रपटप्रेमी त्या दरम्यान पाहायला मिळाले. हेच कारण असावे की, आज बाहुबली, RRR, KGF 2 ने कमावलेले शेकडो कोटींचे आकडे समोर येत आहे, त्याकडे केवळ बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणून बघता येत नाही. प्रादेशिक अभिमान सोडून भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रेक्षकांनी साजरा केलेला तो एक सोहळा आहे.

how it all started?

‘न्यूटन’ सिनेमामध्ये छत्तीसगडच्या जंगलात राहणारी एका आदिवासी स्त्रीचा शहरातून आलेल्या नायकासोबत संवाद आहे. लाल मुंग्यांना हाताने चिरडत ती म्हणते, ‘यांची चटणी फार छान लागते.’ नायकाला त्याचं आश्चर्य वाटतं. तेव्हा ती म्हणते, ‘इंट्रेस्टिंग तो ये है कि आप यहाँ से कुछ ही घंटे दूर रहते है, लेकिन आपको यहाँ के बारे में कुछ भी नहीं पता.’

————————————

एखाद्या देशातील समाजवर्गाबद्दल आणि त्याच्या निवडीबद्दल जाणून घ्यायचे असल्यास, बॅलेट बॉक्स आणि बॉक्स ऑफिसने ढोबळ अंदाज येऊ शकतो. तुम्ही कुठले लोकप्रतिनिधी निवडता अन्‌ कुठल्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर पसंती देता, याचा लिनियर आलेख बरच काही सांगू शकतो. भारतासारख्या खंडप्राय आणि बहुभाषिक देशात व्यक्तिपरत्वे अभिरुचीत वैविध्य असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे इथले स्टॅटिस्टिक्स नेहमीच नॉन लिनियर आणि चक्रावून टाकणारे असतील. ‘Life imitates art… Art imitates life…’ पूर्वापार चालत आलेली ही तुलना आणि हे चक्र कधीही न संपणारं आहे. तरी मला वाटतं कि Life imitates art हे त्या ठिकाणच्या सामाजिक, प्रादेशिक, राजकीय घटकांवर अवलंबून आहे. Pie for one poop for one हे सगळ्याच क्षेत्रात असू शकते. आपल्या अत्यंत नावडत्या किंवा आपण ज्यांना सुमार समजतो त्या सिनेमावर पोसणारा वर्ग भारतभर पसरला आहे. जनगणनेनुसार भारतात 453 जिवंत भाषा आहेत. त्यापैकी आपल्या १०० रुपयांच्या नोटेवर १७ भाषा अधोरेखित आहेत. प्रत्यक्षात भारतीय सिनेमा म्हणजे फक्त हिंदी सिनेमा, असं जे चित्र उभं केलं गेलं, त्याची पाळंमुळं खिळखिळी होताना बघणं बरं की वाईट, हे ज्याचं त्यानं ठरवावं. लता मंगेशकर, मोहम्मद रफी माहीत नसणारे रसिक श्रोते भारतात असू शकतात, तसं एस.जानकी, येसूदास माहीत नसणारे देखील. इथे प्रत्येकाचं जग वेगळं, प्रत्येकाचे देव्हारे वेगळे. भारताच्या जातिव्यवस्थेमध्ये आणि सांस्कृतिक, भाषिक वैविध्यामुळे विभागले गेलेल्या भारतीय सिनेसृष्टीत एक एनोलॉजी आहे. सिनेमाची भाषा ही युनिवर्सल मानली जात असेल, तरी दुसऱ्या जातिधर्माबद्दल मनात आकस ठेवणारे जसे असतात, तसे दुसऱ्या भाषेतील सिनेमाबद्दल तुच्छतेने पाहणारे सर्वच समाजात कमी अधिक प्रमाणात असतात. सगळ्या समाजात पोटजाती जशा आपली मुळे घट्ट धरून आहेत, त्याप्रमाणे सिनेमात सुद्धा क्लासेसचा, मासेसचा, पिटातल्या प्रेक्षकांचा, श्रमिकांचा, रिक्षावाल्यांचा सिनेमा, असे वर्गीकरण नकळत झाले आहे. स्वतःला उच्च अभिरुचीचा भोक्ता समजणारे प्रेक्षक दुसऱ्या प्रकारच्या सिनेमाकडे हेटाळणीपूर्वक पाहातो. मसाला पिक्चरचा प्रेक्षक मनोरंजनाची व्याख्या न बदलण्याच्या हट्टापायी वेगळे प्रयोग करणाऱ्या सिनेमाच्या वाटेला चुकूनही जात नाही. अशा परिस्थितीत एक प्रादेशिक दिग्दर्शक स्थानिक कलाकारांना घेऊन एक सिनेमा काढतो आणि जुने प्रांतवाद मोडीत काढत त्यांच्या कलाकृतीकडे तेलुगु/तमीळ/कन्नड/मल्याळम/डब सिनेमा म्हणून न पाहता भारतीय सिनेमा म्हणून पाहायला भाग पाडतो, ही अभिमानास्पद बाब आहे. भारतीय सिनेमाच्या १०० वर्षांच्या इतिहासात एखादा प्रादेशिक चित्रपट सर्व भौगोगिक, सांस्कृतिक मर्यादा ओलांडून सर्व स्तरातील प्रेक्षकांना अपील होण्याची घटना बाहुबलीच्या निमित्ताने पहिल्यांदाच घडली होती. कोरोनोत्तर काळात तीच पुनरावृत्ती KGF २, RRR यांनी केली. हिंदी सिनेमा १००-२०० करोडच्या उत्पन्नाचे आकडे मिरवत असताना केवळ KGF २, RRR या चित्रपटांनी प्रत्येकी १००० कोटीहून अधिक कमी केली आहे. फक्त भारतातच नव्हे, तर RRR च्या लोकप्रियतेने अमेरिकेच्या जनमानसात अढळ स्थान मिळवले आहे. नेटफ्लिक्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, RRR ही एकमेव फिल्म आहे, जी नेटफ्लिक्सवर सलग १४ आठवडे सगळ्यात जास्त बघितली गेली आहे. खरं तर, चित्रपटाने मिळवलेले असे व्यावसायिक यश हे त्याच्या गुणवत्तेचे निकष असू शकत नाही. परंतु, भारतीय उपखंडाच्या सीमा पार करून तिथला प्रेक्षक आपल्या सिनेमाची जादू ओळखतो अन्‌ खुल्या दिलाने साजरी करतो, तेव्हा आपल्याच देशातील पूर्वग्रहदूषित समज, सामाजिक-सांस्कृतिक साम्यस्थळे आणि विविधता तपासून पाहण्याची गरज वाटते.

Homogenisation of cinema 

दाक्षिणात्य सिनेमाने बॉलिवूडचा शाश्वत वर्चस्ववाद नाकारण्याचा प्रवास हा काही अलीकडे सुरू झालेला नाही. एकेकाळी संपूर्ण भारतात अखंडित वीज सेवा स्वप्नवत होती, तेव्हा फक्त मुंबई आणि कलकत्ता या दोनच शहरात २४ तास वीज असायची. त्यामुळे फिल्ममेकिंग आणि सिनेमागृह यासाठी हीच दोन शहरं सगळ्यात आधी भरभराटीला आली. कालानुरूप सिनेमा उद्योगाचे विकेंद्रीकरण होत गेले. पण, तोवर बऱ्याच गोष्टी रचनाबद्ध झाल्या होत्या. सिनेमासाठी पैसे लावणारे अनेक निर्माते बॉम्बे स्टेटमधले असायचे. ज्या निर्मात्यांचे फिल्ममेकिंगसाठी पाठबळ असायचे, ते बहुभाषिकांना आवडतील अशाच, म्हणजे हिंदी सिनेमासाठी पैसे पुरवायचे. फिल्ममध्ये असणारे कलाकार गोरेगोमटे आणि जास्तीत जास्त मोठ्या शहरात घडणाऱ्या गोष्टी, यांचं एक टेम्प्लेट तयार होत गेलं. हळूहळू स्टुडिओ कल्चर आकारास आले. अगदी अजूनही आपल्याकडे हेच स्टुडिओज, प्रॉडक्शन हाऊस ठरवतात की, फिल्म कशी असायला हवी अन्‌ कशी असू नये. फिल्मसाठी लागणारे तंत्रज्ञ सुद्धा ठरावीक शहरातून पुढे आलेले. हिंदी भाषा न येणारे निर्माते हिंदी फिल्म्स बनवत आहेत. त्यामुळे गोष्ट सांगण्यात सुद्धा विविधतेचा अभाव दिवसेंदिवस वाढत गेला. जागतिकीकरणाआधी जेव्हा सिनेमाला उद्योगाचा दर्जा नव्हता, तेव्हा प्रेक्षकाभिमुख असलेला व्यावसायिक सिनेमा बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या आजच्यापेक्षा अधिक होती, हे कटू सत्य आहे. हल्ली एखादा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला, तरी त्याने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कमाईत ७०% वाटा हा फक्त शहरी भागाच्या मल्टिप्लेक्स चेनमधून आलेला असतो. मल्टिप्लेक्स संस्कृतीला समोर ठेवून सिनेमा निर्मिती केली जाते, ज्यात सिनेमा बघण्यासाठी वाढीव पैसे देण्यास असमर्थ असणाऱ्यांच्या आवडीनिवडीचा विचार केला जात नाही. त्यांना समोर ठेवून फिल्म लिहिल्या जात नाहीत. मल्टिप्लेक्सच्या आगमनाअगोदर टॉकीजमध्ये स्टॉल, बाल्कनीच्या जोडीला सगळ्यात स्वस्त तिकीट दर असलेला गांधी क्लास असायचा. हल्ली 500 ते 1000 रुपये तिकीट असलेला गोल्ड क्लास असतो. ‘वर्कींग क्लास’ पडद्यावर आणि प्रेक्षागृहात सुद्धा कमी होत गेला. हे का घडलं असावं याची कारणमीमांसा करताना मुळं थेट मल्टिप्लेक्स संस्कृतीच्या आगमनात सापडतात.

मल्टिप्लेक्समुळे ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातील भेद अधिकाधिक ठळक होत गेला. सिनेमागृहातील फूटफॉल्स, म्हणजे एकूण किती प्रेक्षकांनी ठरावीक फिल्म थेटरमध्ये जाऊन बघितली याची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होत आहे. आमीरखानच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘दंगल’ आणि ‘PK’ पेक्षा ‘राजा हिंदुस्थानी’ जास्त लोकांनी थेटरमध्ये जाऊन बघितला आहे. टीव्ही चॅनल्स, इंटरनेट बूम, OTT रिव्होल्यूशन यांचा परिणाम तर संपूर्ण जगभर होत आहे. मात्र, आपल्याकडे हा परिणाम भारत विरुद्ध इंडिया असा विभागला गेला आहे. गेल्या २० वर्षातील ब्लॉकबस्टर किंवा सुपरहिट सिनेमांची यादी बघितल्यास लक्षात येईल की, यातील सर्वाधिक सिनेमे हे सुपरस्टार्सच्या नावावर चालले आहेत. कुठल्याही बिग बजेट बॉलिवूड सिनेमात इतर तांत्रिक बाबींपेक्षा सर्वाधिक खर्च स्टार्सवर केला जातो. वेळप्रसंगी सिनेमाची पटकथा सुद्धा दुय्यम असते; आणि हाच खर्च वसूल करण्यासाठी मोठी शहरं – मल्टिप्लेक्स – जास्त तिकीट दर यांचा आधार घेतला जातो. सिनेमाला जर समाजाचा आरसा म्हणत असाल, तर ‘या प्रतिबिंबात आम्ही कुठे?’ हा प्रश्न ‘नाही रे’ वर्गाला पडल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे स्वतःला क्लासी समजणारा प्रेक्षक OTT च्या माध्यमातून कधीच जागतिक सिनेमाकडे वळला आहे. हिंदी सिनेमाने आपल्यावर नकळत काही विचार फोर्ज केले आहे. ज्यामध्ये ‘दुसरी’ संस्कृती, सभ्यता, आपल्याहून अगदी उलट असलेलं जग यांना वर्षानुवर्षे दूर ठेवलं. कलानिर्मितीची प्रेरणा, तिचा उगम समाजजीवनाशी निगडित असतो. भारतीय प्रेक्षकाला पडद्यावरच्या पात्रांमध्ये स्वतःला पाहण्याची सवय आहे. आपल्या सिनेमाचं वेगळेपण आणि प्रेक्षकांशी नाळ जोडणारा महत्त्वाचा घटक म्हणजे सिनेमातल्या पात्रांमध्ये आपण पाहिलेल्या स्वतःच्याच प्रतिमा. गेल्या २० वर्षात पडद्यावरून हा कॉमन मॅन हरवून गेल्याने आपला सिनेमा सर्वसमावेशक राहिलेला नाही असे खेदाने म्हणावे लागते.

कोरोनोत्तर काळात प्रेक्षकांच्या सिनेमाविषयक जाणिवा कमालीच्या बदलल्या आहेत. OTT वर अमर्याद पर्याय समोर असले, तरी आपण किती डेटा पचवू शकतो, याला वैयक्तिक मर्यादा येतात. त्यामुळे एखादी अशी फिल्म, जी मोठ्या पडद्यावर बघण्याऐवजी घरी बघितली तरी फारसा फरक पडणार नाही, असे साधारण वाटणारे सिनेमे टाळणारा मोठा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. व्यक्तिपूजा हा प्रेक्षकांचा स्थायीभाव असल्याने भारतीय फिल्म इंडस्ट्री वर्षानुवर्षे स्टार ड्रीव्हन राहिली आहे. एखाद्या मोठ्या स्टारच्या साधारण चित्रपटाला सुद्धा तुफान प्रतिसाद आणि तुलनेने अर्थपूर्ण असून देखील छोट्या स्केलच्या चित्रपटाकडे दुर्लक्ष, हे बॉलिवूडमधील नेहमी दिसणारं चित्र होतं. या यंत्रणेला सुरुंग लावू शकणारे OTT हे क्रांतिकारी माध्यम कोरोनोत्तर काळात अजून पुढे आले. प्रत्येकाला माहीत असतं की, 2-3 आठवड्यात ही फिल्म OTT वर येणार आहे, त्यामुळे फक्त बिग स्क्रीन एक्स्पिरीयन्सला पसंती देणारा वर्ग उरला आहे. मोठ्या पडद्यावर नाही बघितला, तर विलक्षण अनुभवाला मुकले जाण्याची शक्यता आहे, असा सिनेमा असेल तरच त्याकडे प्रेक्षकांचा ओढा दिसून येतोय. पुष्पा, KGF २, RRR या तिन्ही सिनेमात असा भव्य अनुभव देण्याची अचूक हातोटी होती!

Crossing Paths

 

इंटरनेट बूम होण्याच्या आधी, साधारणतः १२-१५ वर्षांपूर्वी, म्हणजे मोबाईल एसएमएसच्या जमान्यात दाक्षिणात्य सिनेमा, त्यातली ओव्हर दि टॉप ॲक्शन यांची प्रचंड खिल्ली उडवली जायची. आपण सगळेच रजनीकांतबद्दल फॉरवर्ड झालेल्या जोक्सवर खळखळून हसलो असू. मात्र, सलग फ्लॉप देणाऱ्या सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ने त्याला त्याचे सुपरस्टारपद पुन्हा मिळवून दिले. अक्षयचा ‘राऊडी राठोड’, आमीरखानचा ‘गजनी’, अजय देवगणचा ‘सिंघम’ हे सगळे यशस्वी झाल्यांनतर बॉलिवूडला हमखास यशाचा फॉर्म्युला सापडल्यासारखे झाले आणि रिमेक सिनेमांचा अक्षरशः पूर आला. दाक्षिणात्य सिनेमाच्या पोतडीत केवळ मनोरंजनावर भर देणारे मसालापट नसून, प्रायोगिक आणि सर्वसमावेशक चित्रपट असलेली अलिबाबाची गुहा आहे; ही सजगता प्रेक्षकांमध्ये निर्माण करण्यात OTT चा अमूल्य वाटा आहे. तेलगू, तमीळ, कन्नड आणि मल्याळम या चारही इंडस्ट्रीज वेगळ्या असून प्रत्येकाची स्वतंत्र वैशिष्ट्ये असल्याचं लवकरच सगळ्यांच्या लक्षात आले. अफाट टॅलेंट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या गर्भातच पडून राहिल्याने त्याला चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊ शकले नव्हते. OTT मुळे भाषेचे बंधन झुगारले गेले. विचार आणि भावना गरजेची की भाषा? याचा शोध प्रत्येक प्रेक्षक जाणीवपूर्वक घेऊ लागला. केवळ डब केलेले मसाला चित्रपटच नाही तर ‘कर्णन’, ‘जय भीम’, ‘सूरराई पोटरु’,’ द ग्रेट इंडियन किचन’, ‘कुंबलांगी नाईट्स’ सारख्या चित्रपटांना हिंदीभाषिक प्रेक्षकांनी अमाप प्रेम दिले. खरं तर, ही फक्त काही प्रातिनिधिक उदाहरणे. यांची यादी एवढी मोठी आहे की, त्यात अक्षरशः शेकडो सिनेमे घेता येतील. अलीकडे बॉलिवूड दाक्षिणात्य गोष्ट आपल्या स्टार्सच्या माध्यमातून दाखवायला बघतोय आणि सलग रिमेक सिनेमे फ्लॉप होतायत. OTT च्या माध्यमातून मूळ गोष्ट आपण आधीच बघितलेली असताना त्याचा रिमेक का बघावा, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. शिवाय, असा रिमेक करताना मूळ सिनेमातील संवेदनशीलता स्टार्सच्या ओझ्यापायी हल्ली बाजूला सारली जातेय. उत्तम तमीळ फिल्म जिगरठंडाचा सुमार हिंदी रिमेक ‘बच्चन पांडे’ हे याचे चटकन आठवणारे उदाहरण. त्यांच्या कथा आणि त्यामागील भावना, ही नेहमीच युनिव्हर्सल राहिली आहे; तुलनेने बॉलीवूड निर्मात्यांनी आशयाला मूठमाती देऊन स्टार्सना जास्त महत्त्व देण्यास सुरुवात केली.

RRR, बाहुबली, KGF या तिन्ही सिनेमाच्या बजेटमध्ये स्टार कलाकारांच्या फी पेक्षा आशय आणि तंत्रज्ञ यावर केलेला खर्च अधिक होता. बॉलिवूडमध्ये परिस्थिती अगदी उलट आहे. त्यामुळे ३०० कोटीत तयार झालेला ‘सम्राट पृथ्वीराज’ हा दाक्षिणात्य रोबोट, बाहुबली, KGF समोर पुरता कचकड्याचा अन नकली वाटतो. ‘कार्तिकेय २’ हा १५ कोटीत तयार झालेला सिनेमा त्यातील VFX पेक्षा गोष्ट सांगण्याच्या विलक्षण पद्धतीमुळे सुपरहिट होतो. स्टार्सचे महत्त्व आणि व्यक्तिपूजा दाक्षिणात्य सिनेमात सुद्धा आहेच, पण त्यासाठी ते सिनेमाच्या आशयाला किंवा ज्या प्रेक्षकांना समोर ठेवून सिनेमा करत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. हिंदी सिनेमा स्टार्स विकतो, तर दाक्षिणात्य सिनेमे आपली गोष्ट विकतात. ‘सत्यमेव जयते ३’ मध्ये जॉन अब्राहम बाईक उचलून फेकतो तेव्हा आपण स्टार विकत असतो, ज्याला प्रेक्षक नाकारतात. तर, RRR मध्ये नायक जेव्हा बाईक उचलून गरागरा फिरवतो, तेव्हा दिग्दर्शक त्यांची गोष्ट conviction सह समोर मांडतो, ज्याला जगभर सेलिब्रेट केलं जातं.

दाक्षिणात्य सिनेमा व्यावसायिक असला, तरी तो केवळ मल्टिप्लेक्स व्यवसायावर किंवा ‘आहे रे’ वर्गावर अवलंबून राहात नाही. एखादा सुपरहिट हिंदी सिनेमा संपूर्ण भारतभरात जेवढी कमाई करतो, त्याहून अधिक कमाई फक्त तेलुगु सिनेमा दोनच राज्यात कसे काय करू शकतो, हे अभ्यासण्यासारखे आहे. अलीकडच्या काळात सिंगल स्क्रीनमधून मिळणारी कमाई मल्टिप्लेक्सच्या तुलनेत कमी असल्याने बॉलिवूड सामान्य लोकांसाठी गोष्ट लिहायला विसरला की काय, असे वाटते. या उलट दाक्षिणात्य सिनेमात कमाईचे हेच प्रमाण अर्धे-अर्धे आहे. भारतात असलेल्या एकूण सिंगल स्क्रीन थेटरपैकी तब्बल 65% स्क्रीन्स आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या ५ राज्यात आहेत. एकट्या तामिळनाडूमध्ये 1200 पेक्षा जास्त स्क्रीन्स आहेत. हिंदी पट्ट्यात असणाऱ्या सिनेमा हॉलपेक्षा तिथली आसनक्षमता ३ ते ५ पट अधिक आहे. तरीही, मध्यरात्री १२, २ ते पहाटे 4, 6 चे शो हाऊसफुल असतात. काही दिवसांपूर्वी भारतभर सिनेमा डे साजरा करण्याच्या निमित्ताने मल्टिप्लेक्सचे तिकीट दर सरसकट १०० रुपये ठेवण्यात आले. त्याचा परिणाम असा झाला की, जवळपास सगळे छोटे मोठे सिनेमे रेकॉर्डब्रेक हाऊसफुल झाले. बॉलिवूडसाठी हि डोळे उघडणारी घटना असावी. कारण, दक्षिण भारतात मल्टिप्लेक्समधले तिकीट दर सुद्धा उत्तर भारतापेक्षा अर्ध्याहून कमी असतात. तिकडे राज्य सरकारचे तिकीट दर आणि टॅक्सवर नियंत्रण असल्याने ॲव्हरेज तिकीट दर हा १०० रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे सिनेमाकडे केवळ चैनीची गोष्ट नव्हे, तर जीवनावश्यक मनोरंजन म्हणून बघण्याची तिथल्या प्रेक्षकांची तयारी आहे!

Revival of mythology

हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शकांनी आणि प्रेक्षकांनी प्रादेशिक सिनेमांना डावलण्याचा इतिहास जुना आहे. भव्य पौराणिक, ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा हिंदीपेक्षा तेलुगु सिनेमात जास्त ठळकपणे दिसून येते. मात्र, श्रेष्ठ भारतीय चित्रपट म्हणून ‘मुघल ए आझम’ (1960)चे नाव जितक्या सहजपणे घेतले जाते, तेवढे तेलुगु क्लासिक ‘मायाबाजार’ (1957) चे घेतले जात नाही. पौराणिक सिनेमातल्या भव्य पोशाखपटाला, चमत्कारिक दृश्यांना फाटा देऊन मायाबाजारने भारतातल्या जनमानसात रुजलेल्या श्रीकृष्णाच्या एका उपकथेतला आशय समोर आणला होता. ‘बाहुबली’ आणि ‘RRR’चे लेखक के.व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांच्यावर मायाबाजारचा मोठा प्रभाव असल्याचे ते सांगतात. बाहुबलीतल्या व्यक्तीरेखांवर महाभारतातल्या पात्रांचा प्रभाव उघड आहे. तर, RRR च्या पात्रांवर रामायण, महाभारत आणि भारतीय क्रांतिकारकांचा प्रभाव आहे. बाहुबलीच्या दोन्ही भागांवर लहान मुलांचे मासिक असलेल्या ‘चांदोबा’, ‘अमर चित्र कथा’ आणि त्यातल्या पौराणिक पात्रांचा पगडा दिसतो. एकेकाळी संपूर्ण भारतात १२ हून अधिक भाषेमध्ये प्रकाशित होत असलेल्या ‘चांदोबा’ची स्थापना मूळ तेलुगु असलेल्या ‘अम्बुलीमामाह्या’ आवृत्तीने १९४७ साली झाली होती. पौराणिक कथेविषयी असणारी लोभस अपील सगळ्या संस्कृतीमध्ये आणि समाजामध्ये सारखीच असल्याने, चांदोबाच्या आवृत्त्या इतर भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जाऊ लागल्या. २०१३ मध्ये आर्थिक अडचणीत आणल्याने चांदोबा बंद झाले. एकेकाळी गुजराती, मराठी, बंगाली, ओरिया, आसामी, संस्कृत, सिंहली, तमीळ भाषेत आपला गाजावाजा करणाऱ्या चांदोबाचा शेवट धक्कादायक झाला. ‘RRR’ आणि ‘बाहुबली’ने मिळवलेले यश म्हणजे – एस. एस. राजमौलीने – मायाबाजार आणि चांदोबाचे भारतीय सिनेमा आणि बालसाहित्यातले योगदान अधोरेखित करण्यासारखे आहे. मूळ तेलुगु स्वरूपात असलेले चांदोबा सगळ्या राज्यांमध्ये वाचले गेले, तसे बाहुबलीने संपूर्ण भारतभरात आणि RRR ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चांदोबा जितक्या भाषेत भाषांतरित करून वाचले गेले, त्याहून जास्त भाषेत बाहुबली डब करून दाखवला गेला!

Evolution of voiceover industry

2020 मध्ये कोरियन फिल्म पॅरासाईटसाठी ऑस्कर पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक Bong Joon-ho जगभरातील प्रेक्षकांना उद्देशून म्हणाले की, Once you overcome the one inch tall barrier of subtitles, you will be introduced to so many more amazing films लॉकडाऊनमध्ये उत्तमोत्तम परभाषिक कलाकृतींचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली. इंग्लिश वाचता येणारा प्रत्येकजण सबटायटल्ससह सिनेमा बघतो, तेव्हा असंख्य शक्यता असणारं जादूचं प्रवेशद्वार उघडलं जातं. मात्र, सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये परभाषिक चित्रपट लोकप्रिय होण्यामागे हिंदीत डब करणाऱ्या कलाकारांचा, व्हॉइसओव्हर इंडस्ट्रीचा मोठा वाटा आहे. हिंदी भाषिक प्रेक्षकांच्या अभिरुची आणि संवेदनक्षमतेसोबत जुळवून घेण्यासाठी डब करताना मूळ आवृत्तीचा आत्मा हरवून जातो, हा अनेकांचा आक्षेप असतो. तो आक्षेप मान्य करूनही हे नाकारता येत नाही की, दाक्षिणात्य सिनेमे डब झाले नसते, तर तिकीटखिडकीवर जाऊन सिनेमा हिट करणारा सर्वसामान्य प्रेक्षक त्या सिनेमाच्या वाट्याला गेलाही नसता. इंग्लिश अथवा तत्सम मूळ आवृत्तीच्या भाषेचे अज्ञान हेही कारण आहेच. डबिंग आर्टिस्ट अशा वेळी मूळ भाषा न समजणाऱ्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा दुवा असतो.

भारतात परभाषिक चित्रपट हिंदीत डब करण्याची सुरुवात ‘रोजा’ आणि ‘जुरासिक पार्क’ या चित्रपटापांसून झाली. ‘इंद्रा दि टायगर’, ‘मास’, ‘डॉन नंबर १’ ह्या सिनेमांना हिंदी बेल्टमध्ये एका वर्गात कल्ट स्टेटस मिळालं आहे. त्याचं श्रेय मूळ अभिनेत्याइतकेच त्यांच्या भावना हिंदी प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील अशा रीतीने समोर ठेवणाऱ्या व्हॉइसओव्हर आर्टिस्टला. RRR, बाहुबली, पुष्पा KGF यात मूळ कलाकारांनी ज्या उत्स्फूर्तपणे सिनेमात संवाद म्हटले आहे, त्याच संवेदनशीलपणे डबिंग आर्टिस्टने कमाल केली आहे. बाहुबलीसाठी हिंदीमध्ये शरद केळकर, तर पुष्पासाठी हिंदीत श्रेयस तळपदेने आवाज दिलाय. या डबिंग आर्टिस्टची कमाल की, भौगोलिक मर्यादा ओलांडून हे हिंदीभाषिक पट्ट्यातील प्रेक्षकांना आपल्या मातीतील पात्रं वाटतात. सुपरस्टार रजनीकांतला हिंदीतल्या प्रेक्षकांना आपलेसे वाटण्यामागे मयूर व्यासचा मोठा वाटा आहे. त्याचा आवाज अन्‌ टोनिंग मूळ रजनीकांतसारखीच असल्याने रजनीकांत स्वतःच हिंदीत डब करतात यावर अनेकांचा दृढ विश्वास आहे. अल्लु अर्जुनच्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी हिंदी डबिंग करणारा संकेत म्हात्रेचा आवाज प्रत्येकाने ऐकला असेल. हिंदी भाषिकांना पडद्यावरचा अल्लु अर्जुन म्हटल्यावर त्याचा अफलातून डान्स, ॲक्शन आणि संवादफेक आठवते. मात्र, पडद्यामागे काम करणारा संकेत म्हात्रे हा सिनेमातील मूळ ॲक्टरच्या देहबोलीत नसलेल्या भावना सुद्धा फक्त आवाजातून दाखवू शकतो. गोल्डमाईन या युट्युब चॅनलने दाक्षिणात्य सिनेमाला सर्वदूर पोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचे सर्व श्रेय त्या चॅनलचे डिरेक्टर मनीष शहा यांचे! त्यांनी सामान्य किंवा मूळ भाषेत सुद्धा फ्लॉप झालेल्या दाक्षिणात्य सिनेमांचे हक्क कमी किंमतीत विकत घेऊन त्यांना री-एडिट, डब करून हिंदी चॅनल्सवर हिट करून दाखवले. फक्त हिंदी सिनेमाला वाहिलेले जवळपास प्रत्येक चॅनल गेल्या काही वर्षात हेच दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत दाखवतात, ज्यांचा TRP हा नवीन हिंदी ब्लॉकबस्टरपेक्षा अधिक असतो.

Epilogue

भर वस्तीत गर्दीच्या रस्त्यावर एक कृष्णवर्णीय बाई आणि तिच्या कडेवर बाळ. गर्दीत कुणाच्यातरी तरी धक्क्याने त्या बाईच्या हातातली पिशवी खाली पडते आणि त्यातील पाव सुद्धा. गाड्यांपासून सांभाळत ती रस्त्यावर पडलेला पाव उचलायचा प्रयत्न करते, पण गर्दी जमू देत नाही. नायक. दाढी वाढलेली, शर्टचे वरचे 3 बटन उघडे, दिसायला आडदांड. त्या बाईची ती धडपड पाहतो आणि सरळ ती उभी असते त्याच्या बाजूला गाडी नेतो. त्याच्या मागे कारची आणि हॉर्न वाजवून आरडाओरडा करणाऱ्यांची रांग. हिरो गाडीतून हात बाहेर काढून फक्त बंदूक दरवाजावर आदळतो. मागे सगळी बडबड बंद. हा गाडीतून उतरून धुळीत माखलेला तो पाव उचलतो अन्‌ साफ करायला लागतो. ‘आठ जूतें पॉलिश करने पर मुझे एक 1 पाव मिलता था. थाली से ज्यादा नीचे गिराकर खानेवालों के बीच, मिट्टी में गिरे पाव के लिए इतना तड़प रही हो – तो तुम्हारी मजबूरी मैं समझता हूँ. स्वार्थ के पीछे भागने वाली ये दुनिया किसी के लिए भी नहीं रुकती. हमे खुद रोकना पड़ता है.’ तिच्या हातात तो पाव देतो तेव्हा ती बाई आजूबाजूला कचरून बघते. त्यावर हिरो म्हणतो – ‘इन लोगों के बारे में मत सोचो. कोई तुमसे ज्यादा ताक़तवर नहीं. इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है.’

थेटरमध्ये टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट ! पडद्यावर चालू फिल्म KGF. मूळ कन्नड असणारी फिल्म हिंदीमध्ये डब केलेली. त्याला प्रेक्षकांचा असा प्रतिसाद मिळतोय तो साऊथ मुंबईतील हाय एन्ड मल्टिप्लेक्सपासून ते परभणीसारख्या निमशहरी भागापर्यंत! मराठी नसलेल्या प्रादेशिक सिनेमाचा सांधा आपल्यासोबत अभूतपूर्व जोडला जातो, तेव्हा लक्षात येते की, सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मानसिकतेत मूलभूत बदल होत आहेत. आज भारतीय चित्रपट म्हणजे फक्त बॉलिवूड किंवा हिंदी चित्रपट हा समज मोडीत निघाला आहे. Divided by caste, class, color, creed, language… United by universal language of cinema… Proudly celebrating diversity!

(साभार : ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२२)

(लेखक नामवंत ब्लॉगर व स्तंभलेखक आहेत)

9689940118

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here