‘भूमिपुत्र भाऊसाहेब’: डॉ. पंजाबराव देशमुख यांचं यथार्थ जीवनदर्शन

नंदुकुमार बुटे यांनी लिहिलेल्या व मीडिया वॉच पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘भूमिपुत्र भाऊसाहेब’ या पुस्तकाचे प्रकाशन आज डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीच्या दिवशी नामवंत इतिहास संशोधक प्रा .अशोक राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत व यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ येथे होत आहे . यानिमित्ताने पुस्तकाचा परिचय करून देणारा हा लेख –

……………………………………………….

-सुनील इंदुवामन ठाकरे

‘भूमिपुत्र भाऊसाहेब’ हे नंदुकुमार बुटे लिखित पुस्तक मैलाचा दगड करणार आहे. यापूर्वी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांवर अनेक पुस्तकं आलीत. हे पुस्तक मात्र अनेक वैशिष्ट्यांसह वेगळं आणि वाचनीय ठरणार आहे. अमरावती येथील मीडिया वॉच पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. अनेक प्रतिष्ठित वृत्तपत्रांचा दांडगा अनुभव असलेले अविनाश दुधे यांच्या संपादकीय संस्कारांनी या पुस्तकाचा दर्जा नक्कीच वाढला आहे . विदर्भातील प्रसिद्ध कलावंत गजानन घोंगडे यांनी अत्यंत सुरेख असं मुखपृष्ठ रेखाटलं आहे. या पुस्तकाचं शीर्षक ‘भूमिपुत्र भाऊसाहेब’ आहे. हे शीर्षकच अत्यंत बोलकं आहे. या शीर्षकातूनच अनेक गोष्टी स्पष्ट होतात. ‘भूमिपुत्र’ म्हणजे शेती करणारा, शेतात राबणारा या भूमीचा पुत्र. त्यामुळं शेतकरी म्हणून त्यांचं स्वतंत्र चित्र उभं राहतं. ही जीवनगाथा एका शेतकऱ्याची आहे, असं काही क्षण वाटू शकतं. तरीदेखील हे चरित्र भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना स्पर्श करतं.

   शीर्षकातील दुसरा शब्द ‘भाऊसाहेब’ असा आहे. शीर्षकात डॉक्टर पंजाबराव देशमुख असा उल्लेख नाही. त्यांच्या लहानपणी सगळेजण त्यांना ‘भाऊ’ म्हणायचे. त्यांच्या गुणवत्तेनं आणि कर्तृत्वाने ते पुढं भाऊसाहेब झालेत. ‘भाऊ’चा हा जिव्हाळा सगळ्यांना होता आणि आहे. त्यामुळे भाऊसाहेबांच्या समकालीनांना किंवा त्यांच्या उत्तरकालीनांना त्यांच्यापर्यंत थेट पोहोचता येतं. त्यांना समजून घेता येतं. भाऊसाहेब हयातीत असताना आपुलकीचा हा अनुभव अनेकांनी घेतला आहे. त्यामुळं हे चरित्र ‘आपल्या माणसाचं’ आहे, याची प्रचिती हे पुस्तक वाचताना येते. भूमिपुत्र ही भाऊसाहेबांची पहिली ओळख. तरीदेखील त्यांनी विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी ही अतुलनीय अशीच आहे. हे सगळं नेमकेपणाने मांडण्यात पुस्तकाचे लेखक नंदकुमार बुटे यशस्वी झालेत‌.

    एखाद्या महामानवावर लिहायचं म्हटलं तर प्रचंड मोठी जबाबदारी येते. ती लेखकानं समर्थपणे सांभाळली. भाऊसाहेबांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लेखन झाल्यानंतर पुन्हा नव्याने लिहिण्याची काय गरज? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते. ती म्हणजे लेखकाचे वडील स्वातंत्र्यसंग्राम सैनिक पुरुषोत्तम बुटे यांचा भाऊसाहेबांशी थेट संपर्क होता. लेखकाचे वडील अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव येथे शिक्षक होते. काही कारणास्तव त्यांची नोकरी गेली. या बिकटप्रसंगी भाऊसाहेबांनी यवतमाळ येथे त्यांच्या संस्थेत  पुरुषोत्तम बुटे यांना शिक्षक म्हणून काम दिलं. हे पुस्तक लिहिताना लेखकाला अनेक संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागला. त्यासोबतच जमेची एक मोठी बाजू आहे, ती म्हणजे भाऊसाहेबांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेली माणसं. ज्या माणसांना भाऊसाहेब प्रत्यक्ष भेटले त्यांचे अनुभव लेखकाने जाणून घेतलेत. हा त्यांचा ,’आखो देखा’ रिपोर्ट त्यांनी वाचकांपुढे ठेवला. याच कारणास्तव हे पुस्तक अधिक विश्वासार्ह ठरतं.

         भूमिपुत्र भाऊसाहेबांच्या चरित्रलेखनाच्या अनुषंगानं कृषिसंस्कृती स्वाभाविकता येतेच. भाऊसाहेबांचे पूर्वज भाऊसाहेबांची पिढी आणि नंतरच्या पिढीचेही संदर्भ या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत. शालेय जीवनापासूनच निसर्ग आणि शेतीशी त्यांची जुळलेली नाळ बरंच काही बोलते. भाऊसाहेबांचा शिक्षणसंघर्षदेखील अनेकांना प्रेरणादायी ठरावा असाच आहे. त्यांचे बालमित्र राजा, महादू, रामभाऊ, बाबुलाल यांच्यासोबतचा शेवटपर्यंत असलेला स्नेह भावनिक ओलावा देणारा आहे. भाऊसाहेबांच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घटना घडल्यात. ते लहान असताना त्यांच्या पालकांना दागिने गहाण ठेवावे लागले. मोठे झाल्यानंतर भाऊसाहेबांच्या पत्नी विमलाताईंचे दागिनेही गहाण ठेवावे लागले. हे नेमकं प्रकरण काय आहे, हे मूळ पुस्तकातच वाचणं योग्य राहील. अनेक महामानवांसारखीच यांचीदेखील शिक्षणाची वाटचाल खडतर होती. जन्मगाव पापळ ते पुणे आणि पुणे ते इंग्लंड हा त्यांचा शिक्षणाचा प्रवास चित्तथरारक असाच आहे. केवळ विद्यार्थीदशेतच नव्हे तर पुढंही त्यांचे परिश्रम, जिद्द, बुद्धिमत्ता, जिज्ञासा आणि धडपड या पुस्तकातून वारंवार दिसते. भाऊसाहेबांना असलेली सामाजिक ऋणाची जाणीव आणि त्याची परतफेड करण्याचे प्रयत्न अगदी शेवटपर्यंत दिसतात. इंग्लंडमधून त्यांनी बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केली. ते भारतात परतले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती तशी पाहता ठीक नव्हतीच. तरीदेखील खोऱ्याने पैसे ओढण्याकरिता वकिलीच्या व्यवसायात शिरावं असं त्यांच्या मनात कधीच आलं नाही. वकिलीचा उपयोग त्यांनी नेहमीच लोकहितासाठी केला. गरीब सर्वसामान्य यांना ते ‘आपले’ वाटले. अनेक प्रकरणांचा निपटारा त्यांनी कोर्टात न नेता जागेवरून आपसी तडजोडीतून केला. इंग्रज सरकारच्या विरोधातील किंवा अन्य सामाजिक केसेस प्रस्थापित वकील लढत नव्हते. या क्षेत्रात नवखे असूनदेखील भाऊसाहेबांनी अत्यंत आत्मविश्वासाने या केसेस घेतल्यात. अत्यंत प्रामाणिकपणे ते लढले आणि जिंकलेतदेखील.

   शिक्षणाविषयी ओढ आणि आस्था त्यांच्या रक्तातच होती. यातूनच शिवाजी शिक्षण संस्था उदयास आली. अनेकांनी त्यांच्या या उदात्त कार्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील भाऊसाहेब अविचल नि अढळ राहिलेत. आज शिवाजी शिक्षण संस्थेचं नाव आणि कार्य विश्वविख्यात आहे. तट्ट्याच्या टिनांच्या वर्गांपासून एअर कंडिशन्ड संशोधन केंद्रांपर्यंत संस्थेचा झालेला विकास बुटे यांनी अत्यंत ताकदीनिशी मांडला. जवळपास १०० वर्षांपूर्वी भाऊसाहेबांचं विमलाबाईंशी लग्न झालं. हे आंतरजातीय लग्न अर्थातच त्याकाळी खूप गाजलं. या लग्नाची पत्रिका ही खूप चर्चेत होती. त्याची कॉपी या पुस्तकात आहे. भाऊसाहेबांच्या कार्याला विमलाबाईंनी अत्यंत प्रामाणिक साथ दिली. भाऊसाहेबांच्या प्रेरणेतून त्यांनी लग्न झाल्यानंतर बीए, एलएलबी पदवी प्राप्त केली. विदर्भातल्या पहिल्या महिला लॉ ग्रज्युएट त्या ठरल्या. या दांपत्यापोटी अनंतकुमार जन्माला आलेत. आपल्या आपल्या प्रज्ञेनं त्यांनी सगळ्यांना अचंबित केलं. पुढे चालून भाऊसाहेबांचा राजकारणात प्रवेश झाला. पाणी, शिक्षण, शेती, आरोग्य, अस्पृश्यता निवारण आणि अठरापगड जाती जमातींसाठी त्यांनी केलेलं कार्य अविस्मरणीय आहे. इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना ते सुभाषचंद्र बोस यांच्या संपर्कात आलेत. स्नेहबंध जुळलेत. पुढे आझाद हिंद फौजेतील एका मेजर जनरलवर खटला चालवण्यात आला. भाऊसाहेबांनी एक वकील म्हणून व एक भारतीय म्हणून या खटल्याच्या संदर्भात प्रचंड मेहनत घेतली. अखेर ते खटला जिंकलेत. भारतीय संविधानाच्या जडणघडणीत भाऊसाहेबांचं खूप मोठं योगदान आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहेबांचं एक वेगळं नातं होतं. कर्मयोगी गाडगेबाबा आणि भाऊसाहेब यांचंही एकमेकांवर अत्यंत प्रेम होतं.

भूमिपुत्र भाऊसाहेबांचा शेती हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. शेतीची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड कशी घालता येईल, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. शेतकऱ्यांचं संघटन, त्यांना योग्य मार्गदर्शन हे त्यांना अत्यंत आवश्यक वाटत होतं. त्यातूनच ‘भारत कृषक समाजाची’ स्थापना झाली. पुढं चालून त्यांनी दिल्लीत  जागतिक कृषी प्रदर्शनी भरवली. किसान महिला अधिवेशन आणि अन्य शेतकरी अधिवेशनांचं अखिल भारतीय स्तरांपर्यंत आयोजन केलं. कृषी संबंधित अनेक संघटना उभारल्यात. नव्या पिढीला शेतीचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी कृषीविद्या शाखा, कृषी विद्यालय, कृषी महाविद्यालय त्यांनी स्थापन केलेत.

त्यांना सामान्यजनांचा कळवळा होता. एवढ्या उंचीवर गेल्यानंतरही त्यांनी जमिनीसोबत असलेली नाळ कधीच तोडली नाही. गाडगेबाबांचा खराटा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खंजिरी आणि पंजाबरावांचा खडू या तीन ‘ख’ शिवाय विदर्भाचा उल्लेख अशक्यच आहे. विषयाचा आवाका खूप मोठा आहे. शासकीय नोकरी, सामाजिक कार्य, कुटुंब हे सगळं सांभाळून नंदकुमार बुटे यांनी या पुस्तकाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला. वाचक या पुस्तकाचं नक्कीच स्वागत करतील.

(लेखक नामवंत सूत्रसंचालक आहेत)

8623053787

Previous articleएवढी होती माया, भूल पडली रामाला
Next articleRRR, KGF-2, पुष्पा- १000 कोटीच्या विक्रमी यशामागचे गुपित काय ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.