– आशुतोष शेवाळकर
लहानपणापासून जे अन्न आपण जेवणात घेत असतो, तसं अन्न सलग दोन-तीन दिवस जरी नाही मिळालं तर आपल्या शरीराच्या व्यवस्थेची तारांबळ उडते, भुकेनी तळमळ होते. आधीच्या काळात परदेशाच्या प्रवासात भारतीय भोजनाची सोय अगदीच कुठे नसायची. देशांच्या राजधानीच्या शहरात देखील एखाद-दुसरं ‘इंडियन रेस्टॉरन्ट’ असायचं. परदेशात फिरतांना पाव आणि आणि टॉयलेट मधला ‘पेपर’ हे दोन ‘पी’ वैताग आणायचे. काही वर्षांपूर्वी मेक्सिकन फूडचा जगभरात बराच प्रसार झाला. ते अन्न आपल्या भारतीय जेवणाशी मसाले किंवा पोळीसारखा रोल या बाबतीत थोडं मिळतंजुळतं असल्यानी त्यावर जेवणाची क्षुधा भागवता यायची. आज-काल आता इटालियन फूडचा जगभरात फार प्रसार झाल्यामुळे पिझ्झा आणि पास्ता खाल्ला तर पोटभर अन्न मिळाल्याचं थोडसं समाधान होतं.
आधीच्या काळात परदेशात तीन-चार दिवसांच्या वर वास्तव्य झाल्यावर कधी एकदा भारतीय जेवण मिळू शकतं यासाठी जीव पराकोटीचा कासाविस व्हायचा. एकदा थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉक मधे मी आणि मनीषा तिसऱ्या-चवथ्या दिवशी भारतीय जेवणासाठी अगदीच कासाविस झालोत. आता रात्री भारतीय जेवण नाही मिळालं तर पुढचा दिवस आपण काढू शकणार नाही असं वाटायला लागलं. तेव्हा मोबाईल फोन, गुगल वगैरे प्रकारही नव्हते. त्यामुळे ‘बँकॉक मधे इंडियन रेस्टॉरंट’ किंवा किमान भारतीय जेवणाच्या काही ‘डिशेस’ देणारं ‘रेस्टॉरंट’ शोधणं हीसुद्धा एक मोठी सर्कस होती. ट्रॅव्हल डिरेक्टरी, हॉटेलचा ट्रॅव्हल डेस्क, हॉटेलचे लहानापासून मोठया कर्मचार्यांशी त्यांना समजत असलेल्या जेमतेम इंग्लिश मधून संवाद साधल्यावर अख्ख्या बँकॉक शहरात एकच ‘इंडियन रेस्टॉरंट’ असल्याचं कळलं. पण तेही आम्ही थांबलो होतो त्या हॉटेल पासून अगदीच दूर शहराच्या दुसऱ्या टोकाला होतं. तिथे जाऊन जेवायला आम्हाला 1000 बाह्त व येण्याजाण्याच्या टॅक्सीला 2000 बाह्त लागले होतं. तेव्हा शंभर डॉलरला 4000 बाह्त मिळायचे. ते खरं म्हणजे स्वस्ताईचे दिवस होते. १०० डॉलर मधे न्यूयॉर्क पासून थेट लॉस ऐनजेलीस पर्यंत म्हणजे अमेरिकेच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत असा पाव पृथ्वीचा प्रवास करता यायचा. ते ‘इंडियन रेस्टॉरंट’ही नावालाच ‘इंडियन’ होतं. तिथे एकही भारतीय कर्मचारी नव्हता. जेवणाला कशी बशी भारतीय जेवणाची चव आणण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. आणि आम्ही हाताने जेवत होतो तेव्हा त्या रेस्टॉरंटचे चपट्या नाकाचे कर्मचारी दुरून आम्हाला कुतूहलाने न्याहाळत होते. आपापसात हसत होते. याचा अर्थ तिथे येणारी इतर चपट्या नाकाची मंडळी आपलं भारतीय जेवणही बारीक काड्यांनीच खात असतील हे आम्हाला लक्षात आलं. सिंगापूर इत्यादी ‘साऊथ ईस्ट एशियात’ फिरताना ‘चायनीज’ जेवण मिळू शकत असे. पण त्यात वापरलेल्या अती ‘व्हीनेगर सॉस’ मुळे ते आपण खाऊ शकणं तर सोडाच, पण त्याच्या उग्र वासामुळे ‘मॉल्स’मध्ये फिरतांना काही वेळानी डोकं दुखायला लागायचं.
शरीराचा एखादा ‘स्पेअर पार्ट’ बिघडत नाही तोपर्यंत शरीराचं महत्त्व आपल्याला कळत नाही. तसंच ग्रहण आणि उत्सर्जन यांचे शरीराचे आवेग सहजपणे पूर्ण होत असतील तोपर्यंत आपल्याला त्यांच्या गरजेचं महत्त्व कळत नाही. लहानपणी एकदा एका मारवाडी कुटुंबाच्या लग्नाच्या वरातीत वणीवरून औरंगाबादला जात असतांना वरातीतल्या एका माणसाला जोराची शौचाची भावना झाली. पण त्याच्या इतर मित्रांनी त्याची गंमत करत यवतमाळ येईपर्यंत गाडी थांबूच दिली नाही. यवतमाळला आमच्या जेवणाची व्यवस्था एका ठिकाणी केल्या गेलेली होती. तिथे गाडी थांबल्याबरोबर तो माणूस आधी हातात पाण्याचा लोटा घेऊन दूरवर जाऊन शौचास करून आला. परत आल्यावर तो म्हणाला “समय पर संडास को जाने मिले इससे बढकर कोई सुख इस दुनिया मे नही है!” मी त्यावेळेस अगदीच लहान होतो. पण मला त्याचं हे वाक्य व त्या वेळेसचा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद व ‘रिलीफ’ अजूनही लक्षात आहे.
मेजर हरजीत म्हणून माझा एक मलेशियाचा मित्र आहे. तो कौललंपुरला राहतो. त्याचे वडील दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या फौजेत होते. जपानकडे अग्रेसर होणाऱ्या फौजेत आघाडीवर त्यांचं पोस्टिंग होतं. पुढे ब्रिटिश फौजेतुन निवृत्ती घेऊन ते तिथेच स्थायिक झालेत. हरजितचा जन्म तिथेच झाला. भारतात तो काही फारसा आला नाही पण त्याच्या घरी सगळे हिंदीतच बोलत असल्यानी त्याला हिंदी उत्तम बोलता येते. भारतात कुठल्यातरी हिलस्टेशन वर जागा घ्यायची म्हणून तो एकदा भारतात आला. त्या भेटीत तो नागपूरलाही आला. भारत बघून इथले अनुभव घेऊन तो भारताला खूप शिव्या देत होता. माझी पचमढीची जागा पहायला मी त्याला माझ्या एका माणसाबरोबर पचमढीला पाठवलं. जातांना रस्त्याच्या काठावर शौचासाठी बसलेले लोक पाहून अतिशय वैतागानी तो ‘डर्टी इंडियन्स’ म्हणून आपल्या देशाला शिव्या घालत होता. पचमढीत दोन दिवस राहील्यांवर, इथलं पाणी व मसाल्याचं चमचमीत जेवून त्याचं पोट बिघडलं. परतीच्या प्रवासात तो डाकबंगला किंवा ढाबा अशी जिथली कुठली शौचालय असेलेली जागा असेल तिथे गाडी थांबवायला लावून शौचाला जाऊन यायचा. पुढे तो अगदीच अगतिक होऊन रस्त्यावरच गाडी थांबायला लावून बाटली घेऊन बाजूला झाडामागे जाऊन बसायचा. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात तर त्याला शौचाच्या आवेगाची कळ अगदीच सहन होत नसे व गाडीच्या खाली उतरून तो गाडीच्या बाजूला तिथेच रस्त्यावरच बसायचा. माझा माणूस मग त्याला मिश्किलपणे म्हणाला “हमारे लोग तो भी रस्तेके नीचे जाके, झाडके पीछे बैठके ये करते है, आप तो रस्तेपरही बैठ रहे हो.”
पॅरिसमध्ये आम्ही मित्र मित्र एकदा फिरायला गेलो असतांना असाच तिसऱ्या-चौथ्या दिवशी आम्हा सगळ्यांचाच जीव भारतीय जेवणासाठी तगमगला. इंडियन रेस्टॉरंटचा काही पत्ता मिळेना. शेवटी पॅरिसच्या डाउन-टाउन मधे एका रेस्टॉरंटमधे काही ‘इंडियन डिशेस’ मिळतात एवढीच माहिती कळली. आमच्या ग्रुप मधले त्यातल्या त्यात जास्त बुभुक्षित झालेले आम्ही तीन मित्र अंडर ग्राउंड रेल्वेने स्टेशनं बदलवत, प्रवास करत खूप वेळाने त्या भागात पोचलो. कसंबसं ते रेस्टॉरंट शोधलं. काऊंटरवरच्या माणसांनी ‘इंडियन डिशेस’ आहेत म्हटल्यावर आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटलं. टेबलवर जाऊन बसल्यावर माझ्या एका ‘बिल्डर’ मित्रानी ‘मेनूकार्ड’ उघडलं. त्याचे डोळे विस्फारलेत व त्यानी मेनू कार्ड पुन्हा मिटून ठेवून दिलं. तिथे फक्त ‘दाल फ्राय व नान’ एवढ्याच ‘इंडियन डिशेस’ मिळत होत्या. आणि ‘डाल फ्राय’ ची किंमत आपल्याकडे फाइव्ह स्टार हॉटेलमधे तेव्हा असायची त्याच्या दहा पट होती. ‘काय झालं’ असं विचारल्यावर त्या बिल्डर मित्रानी हाताशपणे तिथल्या ‘दाल फ्राय’ ची किंमत मला सांगून मान निराशेनी हालवली. तेव्हा त्वेषाने त्याच्या चेहऱ्यापुढे एक बोट नाचवत मी म्हणालो होतो. “मोहन्या.. एक ‘प्रॉपर्टी’ विकावी लागली तरी चालेल. पण आज आपण ‘इंडियन’ जेवण जेवायचेच”. माझा तो आवेश पाहून त्यानी मुकाटयानी आम्हा तिघांसाठी एक ‘दाल फ्राय’ व तीन नान मागवलेत. ते संपल्यावर त्याच्याकडे रागारागाने पाहत मी स्वतःच मग आणखीन एक दाल फ्राय व तीन नानची ऑर्डर दिली.
बेल्जियमला एकदा ‘लियेज’ नावाच्या शहरात असतांना तीन-चार दिवसांनी मी असाच भारतीय जेवणासाठी कासाविस झालो होतो. ‘इंडियन रेस्टॉरन्ट’ वा फूड तिथे तेव्हा कुठेच मिळत नसे. भुकेनी मी अगदी अगतिक झालो होतो. शेवटी दहा वाजलेत सगळी दुकानं, शहर बंद झालं. आडवाटेच्या रस्त्यावर तर पूर्ण शुकशुकाट झाला. मुख्य रस्त्यांवरही रस्त्याकाठचे गोमास ग्रीलवर गोल गोल फिरणारे उग्र वासाचे ‘स्टॉल्स’ व त्यांच्या आजूबाजूला पिलेले आफ्रिकन लोकं फक्त दिसायला लागलेत. अशा वेळेस रस्त्यावर फिरणं सुद्धा धोक्याचं होतं. एका रस्त्यावर एक ‘सेक्स शॉप’ फक्त मला उघडं दिसलं. तिथे मोठमोठ्या केळ्यांचे घड ठेवलेली एक टोपली मला बाहेरून दिसली. या दुकानात फळं मिळणं शक्यच नाही ती प्लास्टिकची केळी असावीत असं मला वाटलं. अशा आडवेळी ‘सेक्स शॉप’ मधे जाणं पण फारसं प्रशस्त नव्हतं. पण पोटाची भूक माणसाला काहीही करायला लावू शकते. मी आत जाऊन “आर दीज रियल”? म्हणून त्या दुकानदाराला विचारलं. त्यानी “याह.. ऑफकोर्स!!” म्हटल्यावर मी केळ्यांना हात लावून पाहिला. अतिशय लांब व जाडजूड अशी ती केळी होती. मी अर्धा डझन केळी विकत घेतली. उपाशीपोटी केळी खाल्ल्यावर पोट खूप दुःखेल या मनातल्या विचाराला दाबून त्या दुकानाच्या बाहेर रस्त्यावरच उभं राहून चार केळी एका पाठोपाठ मी तेव्हा अधाशासारखे खाऊन टाकलीत.
परदेश प्रवासात असंच ‘अन्नासाठी दहाही दिशा’ फिरतांना पुढे तीन विलक्षण अनुभव मला आलेत. ते आता पुढील सदरात आपल्यासोबत शेअर करतो.
[क्रमशः]
(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)
9822466401
विदेशात मज्जाच मजा असते असं वाटायचं, सोसावं पण लागत, हे माहिती झालं, बाकी छान 👌