आगे आगे चले हम, पीछे पीछे प्रीत मितवा !

-शेखर पाटील

पंडित शिवकुमार शर्मा गेले आणि काळजात कळ उठली. संतूर म्हणजेच शिवकुमार अशी अभिन्न ओळख असणारा हा महान कलावंत आपल्या बहुतेकांच्या आयुष्यात आला तो हिंदी चित्रपटांमधून. खरं तर सिनेमा संगीताच्या पलीकडे हा किती मोठा माणूस आहे याची जाणीव फार उशीरा झाली. मात्र बहुतेक रसिकांसाठी शिव-हरी ही जोडी चित्रपट संगीतातील अजरामर जोडी. खय्याम यांनी जशी संगीताशी कधी प्रतारणा केली नाही, अगदी त्याच प्रकारे शिव-हरी यांनी चित्रपट संगीत देतांना कधीही कॉंप्रमाईज केले नाही. यामुळे संधी असूनही बाजारू संगीताच्या बजबजपुरीत बक्कळ पैसा कमावणे सोडून या दोन्ही महान व्यक्तीमत्वांनी आपल्या कलेची आब राखली. अगदी बोटावर मोजण्या इतके चित्रपट आणि त्यातील मोजक्या पण अवीट सुरावटींची गाणी ही शिव-हरी यांना अढळपद प्राप्त करून देणारी ठरली. या जोडीतील एक दुवा निखळल्याने शोकमग्न झालेल्या अवस्थेत आज पुन्हा एकदा शिव-हरी अनुभवता आले.

………………………………………………………….

शिवकुमार शर्मा हे जम्मूवासी. आपल्या काश्मिरीयतविषयी आत्यंतीक अभिमान असणार्या या कलावंताने काश्मिरच्याच संतूर या वाद्याला जगभर ख्याती मिळवून दिली. त्यांचे वडील उमादत्त शर्मा हे ख्यातनाम संगीतकार होते. बालपणापासूनच शिवकुमार यांच्यावर तबला वादन आणि गायनाचे संस्कार झाले. कठोर साधना सुरू झाली. मात्र एके दिवशी वडलांनी शिवकुमार यांच्या हाती संतूर देऊन गाणे आणि तबला बंद करण्याचे फर्मान सोडले तेव्हा ते गांगरून गेले. मात्र उमादत्त शर्मा यांचा तो कठोर निर्णय भारतीय संगीत क्षेत्रासाठी किती महत्वाचा ठरला हे नव्याने सांगण्याची गरज नाही. खिशात पाचशे रूपये आणि मोठ्या बॅगमध्ये संतूर घेऊन शिवकुमार हे मुंबईच्या मायानगरीत संघर्ष करून स्थिरावले. याच वाटचालीत अनेक मान्यवरांसह त्यांची मैत्री झाली तरी हरीप्रसाद चौरसिया या दिग्गज बासरी वादकाशी ! या जोडीच्या ‘कॉल ऑफ व्हॅली’ या रेकॉर्डने इतिहास रचला.

यानंतर शास्त्रीय संगीतात शिव-हरी जोडी झपाट्याने यशाच्या पायर्या चढत गेली. खरं तर या दोघांनी काही प्रमाणात चित्रपटात वादन केले असले तरी थेट संगीतकार म्हणून त्यांनी कधी प्रयत्न केले नाही. यातच, यश चोप्रा यांच्यासारख्या चोखंदळ निर्माता व दिग्दर्शकाने सिलसिला या चित्रपटासाठी त्यांनी संगीत द्यावे अशी गळ घातली. यानंतर काय झाला तो इतिहास उगाळण्याची गरज नाही. सिलसिलाची गाणी अजरामर झाली. यानंतर फासले, विजय, चांदनी, लम्हे, परंपरा, साहिबान आणि डर अशा फक्त आठ चित्रपटांना या जोडीने संगीत दिले. यातील बहुतांश चित्रपटांची गाणी ही एकापेक्षा एक सरस होती.

शिव-हरी जोडीच्या पहिल्याच सिलसिला या चित्रपटाने इतिहास रचला. खरं तर तेव्हा यशजींनी एकमेकांच्या निस्सीम प्रेमात असणार्या अमिताभ आणि रेखाच्या ‘रिअल’ आणि ‘रील’ लाईफला कुशलतेने एका विलक्षण काव्यमय पध्दतीत गुंफून हा चित्रपट सादर केला. यात एकापेक्षा एक दिग्गज कलावंत असले तरी सिलसिला म्हटलं की शिव-हरी यांचीच पहिल्यांदा आठवण होते ही त्यांची महत्ता. सत्तरच्या दशकातील अनेक लिजंडरी चित्रपटांची पटकथा आणि खटकेबाज डायलॉग लिहणार्या सलीम-जावेद या जोडीतील जावेद अख्तर यांनी गीतकार म्हणून सिलसिलातूनच सुरूवात झाली हे देखील विशेष. यश चोप्रांच्या चित्रपटातील सौंदर्यबोध आणि संगीतप्रधानता ही सिलसिलातही होती. याच्या जोडीला अतिशय अप्रतीम अशा चित्रीकरणाने हा सिनेमा गाजला. मात्र त्याहूनही गाजली यातील गाणी !

देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये’, निला आसमान सो गया, ये कहा आ गये हम अशी एकाहून एक सरस अशी भावपूर्ण गाणी असंख्य रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली. यात ‘फुल भी हो दरमिया तो फासले हुवे’ सारखी तरलता तर ‘मजबूर ये हालत इधर भी है उधर भी !’ अशी तगमगही विलक्षण प्रत्ययकारी रूपात साकार करण्यात शिव-हरी यशस्वी ठरले. एकीकडे आत्यंतीक हळुवारपणा दाखवितांनाच त्यांनी ‘रंग बरसे’ सारखे उडत्या चालीचे रचलेले गाणे हे होळीच्या रंगोत्सवाचा अविभाज्य घटक बनले. यानंतर नव्वदच्या दशकाच्या प्रारंभीच्या ‘डर’ या सिनेमापर्यंत शिव-हरी जोडीने संगीत दिले. अनेक श्रवणीय व अविट सुरावटी, गुणगुणायला लावणार्या चालींना त्यांचा परिसस्पर्श लाभला. ही सर्व गाणी नक्कीच अजर-अमर आहेत. मात्र, मला वैयक्तीकरित्या चांदनी या चित्रपटातील ‘तेरे मेरे ओठो पे हे’ गाणे या सर्वांपेक्षा जास्त सरस वाटते, मनाला भावते.

खरं तर, सिलसिलातील अमिताभ-रेखा या जोडीइतकी चांदनीतल्या ऋषी कपूर व श्रीदेवीची पडद्यावरील केमिस्ट्री सुसंगत नसली तरी या गाण्यात त्यांनी केलेला अभिनय लाजवाब. अर्थात, मला हे गाणे आवडते ते शिव-हरी या जोडीच्या अत्युच्च कोटीच्या प्रतिभेमुळे ! खरं तर हे गाणे एक अतिशय विलोभनीय असा ड्रीम सिक्वेन्स होय. यातील चित्रीकरणाची प्रत्येक फ्रेम, संगीताचा प्रत्येक तुकडा आणि अर्थातच एकूण एक शब्द निव्वळ अफलातून.. . .रूपेरी पडद्यावरील जादू अनुभवण्यासाठी अजून काही लागते का ?

या गाण्याच्या प्रारंभी संतूर आणि बासरीच्या जोडीला गुढरम्य असा कोरसचा स्वर काळजाचा ठाव घेतो, काही वेळात हरीप्रसाद चौरसीया यांच्या बासरीचे स्वर्गीय सूर आपल्याला अक्षरश: रोमांचीत करतात, आपल्या तन-मनाचा ताबा घेतात. या गाण्यात जसा विलक्षण गोडवा तसाच एक अतिशय मनमोहक असा र्हिदम देखील आहे. पुन्हा तुलना करायची नाही म्हटली तरी ‘देखा एक ख्वाब’ मधील आठवण होणारी अनेक स्थळे यात आहेत. प्रगाढ प्रेमातील अमिताभ आणि रेखा यांचीच जणू प्रतिकृती ऋषी कपूर व श्रीदेवीच्या देहबोलीतून जाणवते. सिलसिलातील गाण्यांमधील ट्युलिप गार्डन ऐवजी येथे आल्पस पर्वतातील विहंगम निसर्ग रिप्लेस करण्यात आलाय इतकेच ! आणि हो, गाण्याच्या शेवटच्या टप्प्यात थेट संतूरवरील ‘देखा एक ख्वाब’ या गाण्याच्या काही सेकंदाची सुरावट ही आपल्याला पुन्हा थेट सिलसिलापर्यंत घेऊन जाते. सिलसिलातील गाण्याला लता दिदी आणि किशोरदा यांनी दिलेल्या स्वराबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाहीच. तर ‘तेरे मेरे ओठो पे’ या गाण्यातील लतादिदींचा स्वर हा अधिक मधाळ, लडीवाळ आणि प्रणयाची परिपूर्ण अनुभूती व्यक्त करणारा वाटतो. बाबूल मेहता यांनी त्यांना केलेला सपोर्ट हा व्यवस्थित असाच असल्याने हे गाणे परिपूर्ण पध्दतीत जमून आलेय.

मी तसा गीत-संगीतात नेहमीच आकंठ बुडालेला असतो. लोकगीतांपासून ते पाश्चात्य सिंफनी आणि पॉप पर्यंतचे कोणतेही प्रकार मला वर्ज्य नाहीच. मात्र, जी गाणी आपल्याला अतिशय भावविभोर करतात, काही क्षण गहन मौनात घेऊन जातात, नादब्रह्माची अनुभूती देतात, त्यांच्यात ‘तेरे मेरे ओठो पे’ हे गाणे देखील आहेच. कधीही, केव्हाही, कसेही आणि कितीही ऐकले तरी एक प्रकारची काही तरी हरवल्याची वा खरं तर अपूर्णतेची जाणीव करून देणारे हे गीत नक्कीच अनेकांच्या भावजीवनाचा अविभाज्य घटक असेल. याचमुळे या गाण्याचे सृजन करणार्या शिव-हरी जोडीतील शिवकुमार शर्मा यांचे आपल्या जीवनातील स्थान देखील तितकेच महत्वाचे आहे हे सांगणे नकोच ! चित्रपटांच्या पलीकडचे शिवकुमार शर्मा हे अजून किती तरी मोठे होते. अगदी एखाद्या राजकुमारासारखा दिसणारा, तशीच गरीमा असणार्या या दिग्गज कलावंताचे संतूर वादन हे आपल्या हृदयाच्या तारा झंकृत करल्याशिवाय राहत नाहीत.

शिव-हरी, जावेद अख्तर, लता-किशोर, आनंद बक्षी, यश चोप्रा, अमिताभ-रेखा, श्रीदेवी-ऋषी यांच्यासह अनेकांनी आपले भावजीवन समृध्द केलेय. हळूहळू ही महनीय व्यक्तीमत्वे काळाच्या पडद्याआड जात असल्याची हुरहूर नक्कीच असली तरी त्यांनी जे काही निर्माण करून ठेवलेय तो अनमोल ठेवा हा आपल्यालाच नव्हे तर येणार्या अनेक पिढ्यांना पुरून उरणारा, मोहवणारा, त्यांच्या हृदयाला स्पर्श करणारा ठरल्याची कृतार्थ जाणीव देखील आपण बाळगणे आवश्यक आहे. शिवकुमार शर्मा यांच्या जाण्यातील शोकातला ग्रेसफुलनेस हाच !

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लोगर आहेत)

9226217770

तेरे मेरे ओठो पे….क्लिक करा

Previous articleहिंदुत्ववाद्यांचे तीन प्रवाह
Next articleदम्माम : सिद्दींची वैशिष्ट्यपूर्ण लोककला
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.