काँग्रेसकडे एकेकाळी कार्यकर्त्यांची फौज होती आणि ते या पक्षाचं फार मोठं भांडवल होतं . ( ते भांडवल आता भारतीय जनता पक्षाकडे गेलं आहे . ) एखादा राजकीय पक्ष सळसळत राहतो तो त्यात सतत दाखल होणारे नवीन कार्यकर्ते आणि त्यांना मिळणाऱ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमुळेही . काँग्रेस पक्षात नेमकी हीच प्रक्रिया थांबलेली होती ; आमदारकी असो वा खासदारकी वा सत्तेतील पद , या सर्व ठिकाणी घराणेशाही निर्माण झालेली आहे . तालुका पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत तेच ते लोक दिसतात आणि कार्यकर्ते सतरंज्या उचलण्याच्या कामात आयुष्यभर राहतात . त्यामुळे पक्षाचा आत्मा हरवला . कार्यकर्ते कमी , नेतेच जास्त ; असं या पक्षाचं स्वरुप झालेलं आहे . आता एक व्यक्ती एक पद , एका कुटुंबातील केवळ एकालाच निवडणुकीत उमेदवारी आणि निम्मे पदाधिकारी पन्नासपेक्षा कमी वयाचे असतील , हे नवसंकल्प काँग्रेसला उभारी तर प्राप्त करुन देतीलच पण , त्याशिवाय पक्ष आणि सत्तेत आता नव्या लोकांना संधी मिळेल . सत्तेत आता एक टर्म पांच वर्षांची आणि नंतर तीन वर्षे सक्तीची विश्रांती, हा उतारा चांगला आहे . तो काटेकोरपणे अंमलात आला तर पक्ष संघटनेची वीण घट्ट होईल . गांधी घराण्यालाही हाच निकष लागू होणार का आणि तसं झालं तर मैदानात श्रीमती सोनिया गांधी राहणार की राहुल गांधी की प्रियंका गांधी-वढेरा हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे .
काँग्रेसची पुनर्बांधणी हे कुणा एका घराण्याचं आणि त्यासोबत आणखी कांही मोजक्या नेत्यांचं काम आहे , अशा गोड गैरसमजात न वावरण्याची दक्षता प्रत्येक नेता व कार्यकर्त्याला घ्यावी…च लागणार आहे . राहुल गांधी देशव्यापी यात्रा काढतील , सोनिया गांधी यांची एखादी सभा मतदारसंघात झाली की आपली सीट निघेल , याही मानसिकतेतून बाहेर येणं गरजेचं आहे . काँग्रेसचं पुनरुज्जीवन ही एक लोक चळवळ करावी लागेल . त्यासाठी मोठा फौजफाटा आणि निधीही लागेल . काँग्रेससोबत राहून या देशात अनेकांनी भरपूर कमाई केलेली आहे , संस्था किंवा उद्योगांचा पसारा निर्माण केलेला आहे . ही ‘मजबूत’ कमाई करता आली यांची कृतज्ञता म्हणून या सर्वांनी पक्षाला प्रत्येकी २/५ कोटी निधी म्हणून द्यायला हवेत . प्रत्येकी पाच आणि दोन कोटी देणारे पांच-सात हजार मानसबदार निघाले तरी मोठ्ठा निधी उभा राहू शकण्यात कांहीच अडचण नाही . पक्षातील जी-२३ गटातील सर्वांनाच ही जबाबदारी स्वीकारावी लागेल ; काठावर उभं राहून जर हे नेते सामूहिक नेतृत्व तसंच पक्षाच्या भवितव्याची चिंता आणि तीही केवळ पत्र पाठवून करणार असतील तर उदयपूरचं चिंतन आत्मरुदनच ठरेल…