चिंतन आत्मरुदन ठरु नये…

प्रवीण बर्दापूरकर

उशिरा सुचलेलं शहाणपण अशा शब्दात काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या  चिंतन शिबिराचं वर्णन करायला हवं . देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्षाची नौका डळमळायला सुरुवात झाली ती २०११पासून . झाले न झालेले अनेक आर्थिक घोटाळे , अण्णा हजारे यांचं दिल्लीतलं आंदोलन ही त्या डळमळण्याची सुरुवात  होती . २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पक्षाकडून स्वीकृती मिळाल्यावर नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा जो झंझावात निर्माण केला त्यात तर काँग्रेसची नौका देशाच्या मुख्य प्रवाहातून केवळ भरकटलीच नाही तर जायबंदीही झाली . तेव्हाच जर असं चिंतन  शिबीर घेऊन डागडुजी केली असती तर पुढे झालेल्या निवडणुकांत हा पक्ष पराभवाच्या गर्तेत सापडला नसता . पक्ष व्यक्ती केंद्रीत आणि नेते सुस्त अशी काँग्रेसची अवस्था झालेली आहे . त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष बदलांसाठी सज्ज झालेला आहे , हे  संकेत या चिंतन  शिबिरानं दिले आहेत .  इतकी धूळदान होऊनही देशात किमान २१-२२ टक्के मताधार असतांना हा पक्ष गेले दशकभर एखाद्या सुस्त अजगरासारखा झालेला होता . उदयपूरच्या चिंतन शिबिरात सोडलेल्या नवसंकल्पांमुळे पक्षांतला हा अजगरी सुस्तपणा दूर होण्यास मदत होईल , अशी अपेक्षा काँग्रेसचे मतदार , कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी बाळगायला हरकत नसावी .

चिंतन  शिबिर तर झालं  पण , काँग्रेस पक्षासमोर असलेल्या सर्व समस्या सुटल्या आहेत असं नाही . मात्र जे कांही नवसंकल्प सोडलेले आहेत ते जर प्रमाणबद्ध कार्यक्रम आखून अंमलात आणले तर  येत्या कांही वर्षात काँग्रेस पक्ष पूर्ववैभव प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल हे नक्की . देशात एकपक्षीय धर्मांध राजवटीचा धोका दिसत असतांना तर काँग्रेस पक्ष बळकट होणं ही या देशातल्या लोकशाहीसाठी  प्रधान्य आहे . इतकी धूळदान होऊनही २२ ते २३ टक्के मताधार असलेला काँग्रेस हा देशातील अजूनही दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे . निवडणुकांतील कांही सलग पराभवांमुळे तो संपणारही नाही ; गरज आहे ती पक्ष तळागाळापासून पुन्हा एकदा बांधला जाण्याची आणि कार्यकर्त्यांत विश्वास निर्माण करण्याची ; थोडक्यात , नवसंकल्प नवनिर्माण ठरण्याची गरज आहे .

काँग्रेसकडे एकेकाळी कार्यकर्त्यांची फौज होती आणि ते या पक्षाचं फार मोठं भांडवल होतं . ( ते भांडवल आता भारतीय जनता पक्षाकडे गेलं आहे . ) एखादा राजकीय पक्ष सळसळत राहतो तो त्यात सतत दाखल होणारे नवीन कार्यकर्ते आणि त्यांना मिळणाऱ्या महत्त्वाच्या  जबाबदाऱ्यांमुळेही . काँग्रेस पक्षात नेमकी हीच प्रक्रिया थांबलेली होती ; आमदारकी असो वा खासदारकी वा सत्तेतील पद , या सर्व ठिकाणी घराणेशाही निर्माण झालेली आहे . तालुका पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत तेच ते लोक दिसतात आणि कार्यकर्ते सतरंज्या उचलण्याच्या कामात आयुष्यभर राहतात . त्यामुळे पक्षाचा आत्मा हरवला . कार्यकर्ते कमी , नेतेच जास्त ; असं या पक्षाचं स्वरुप झालेलं आहे . आता एक व्यक्ती एक पद ,  एका कुटुंबातील केवळ एकालाच निवडणुकीत उमेदवारी आणि निम्मे पदाधिकारी पन्नासपेक्षा कमी वयाचे असतील , हे नवसंकल्प काँग्रेसला उभारी तर प्राप्त करुन देतीलच पण , त्याशिवाय पक्ष आणि सत्तेत आता नव्या लोकांना संधी मिळेल . सत्तेत आता एक टर्म  पांच वर्षांची आणि नंतर तीन वर्षे सक्तीची विश्रांतीहा उतारा चांगला आहे .  तो काटेकोरपणे अंमलात आला तर पक्ष संघटनेची वीण घट्ट होईल . गांधी घराण्यालाही हाच निकष लागू होणार का आणि तसं झालं तर मैदानात श्रीमती सोनिया गांधी राहणार की राहुल गांधी की प्रियंका गांधी-वढेरा हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे .

नेते वाढले , सत्तालोलुप झाले ; त्यांचा आणि पर्यायानं पक्षाची दलित , आदिवासी , अल्पसंख्यांकांशी असणारी नाळ तुटत गेली ; या घटकांनाही देशाच्या विविध भागात समाजवादी  पार्टी , बहुजन समाज पार्टी , तृणमूल काँग्रेस , आप , रिपब्लिकन पक्षाचे विविध गट , असे अन्य पर्याय नेमके याच काळात उपलब्ध झाले . दलित , आदिवासी , अल्पसंख्यांक हे घटक सोबत होते त्यामुळेच काँग्रेस पक्षाला केंद्र आणि अनेक राज्यात अनेक वर्ष सत्ता राखता आली . मात्र हे घटक हळूहळू दुरावत गेले आणि काँग्रेसच्या मतांच्या  टक्केवारीत घट होत गेली . हे घटक दुरावण्याची अन्यही अनेक कारणे आहेत हे खरं आहे पण , चिंतन शिबिराच्या निमित्तानं  हे घटक पुन्हा  आपल्यासोबत जोडून घेण्याचं भान काँग्रेस पक्षाला अखेर आलं आहे , हे महत्वाचं आहे .

मात्र , एका चिंतन  शिबिरामुळे काँग्रेस पक्ष एका रात्रीत पूर्वीसारखा उभा राहिल  अशा समजात काँग्रेसजनानं राहणं हा भाबडेपणा ठरेल . नवीन घर उभारण्यापेक्षा मोडलेलं घर दुरुस्त करण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि तेच  राजकीय पक्षालाही लागू आहे . शिवाय पक्ष पुन्हा बांधणीचं कोणतंही मॉडेल आज तरी काँग्रेस पक्षाकडे नाही . प्रतिस्पर्धी एकटा एखादा राजकीय पक्ष नाही नाही तर तो एक संपूर्ण ( आणि तोही शिस्तबद्ध ) ‘परिवार’ आहे हेही भान काँग्रेसला बाळगावं लागणार आहे .  २ खासदार ते लोकसभेत बहुमत , अशी मजल या परिवारानं मारताना कोणतं मॉडेल अंमलात आणलं आणि आपल्याला त्यापासून काय बोध घेता येईल , यांचा मूलभूत विचार सर्वात आधी काँग्रेसला करावा लागणार आहे आणि मग एक पक्ष बांधणीचं एक मॉडेल तयार करावं लागणार आहे . त्या मॉडेलला यशाची फळं मिळण्यासाठीही  वाट पहावी लागणार आहे . यशाच्या फळांसाठी प्रदीर्घ श्रम करावे लागतील तसंच संयमही बाळगावा लागेल .  एकेकाळी काँग्रेस नावाच्या वृक्षाला  सेवादल  , महिला आघाडी , युवक कॉँग्रेस , विद्यार्थी , कामगार , अल्पसंख्याक अशा वेगवेगळ्या आणि विस्तार झालेल्या  शाखा  होत्या . पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत या आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेतलं जात असे . पक्षांतल्या अनेक महत्त्वाच्या   नेत्यांच्या पक्ष कार्याची सुरुवात अशा आघाड्यातून झालेली आहे . या सर्व आघाड्यातून कार्यकर्त्यांची मोठी रसद काँग्रेसला मिळत असे . पक्षाच्या या सर्व उपशाखांचं पुरुज्जीवन करावं लागणार आहे .

काँग्रेसची पुनर्बांधणी हे कुणा एका घराण्याचं आणि  त्यासोबत आणखी कांही मोजक्या नेत्यांचं काम आहे , अशा गोड गैरसमजात न वावरण्याची दक्षता प्रत्येक नेता व कार्यकर्त्याला घ्यावी…च लागणार आहे . राहुल गांधी देशव्यापी यात्रा काढतील , सोनिया गांधी यांची एखादी सभा मतदारसंघात झाली की आपली सीट निघेल , याही मानसिकतेतून बाहेर येणं गरजेचं आहे . काँग्रेसचं पुनरुज्जीवन ही एक लोक चळवळ करावी लागेल . त्यासाठी मोठा फौजफाटा आणि निधीही लागेल . काँग्रेससोबत राहून या देशात अनेकांनी भरपूर कमाई केलेली आहे , संस्था किंवा उद्योगांचा पसारा  निर्माण केलेला आहे . ही ‘मजबूत’ कमाई करता आली यांची कृतज्ञता म्हणून या सर्वांनी  पक्षाला प्रत्येकी २/५ कोटी निधी म्हणून द्यायला हवेत . प्रत्येकी पाच आणि दोन कोटी देणारे पांच-सात  हजार मानसबदार निघाले तरी मोठ्ठा निधी उभा राहू शकण्यात कांहीच अडचण नाही . पक्षातील जी-२३ गटातील सर्वांनाच ही जबाबदारी स्वीकारावी लागेल ; काठावर उभं राहून जर हे नेते सामूहिक नेतृत्व तसंच पक्षाच्या भवितव्याची चिंता आणि तीही केवळ पत्र पाठवून करणार असतील तर उदयपूरचं चिंतन आत्मरुदनच ठरेल…

काँग्रेस पक्षाचा लोकांशी असलेला थेट संवाद तुटलेला आहे आणि त्यासाठी राहुल गांधी काश्मीर ते कन्याकुमारी यात्रा काढणार आहेत ही अतिशय चांगली बाब आहे . पण , ही जबाबदारी  एकट्या राहुल गांधी यांची नाही . अशा संवाद यात्रा प्रत्येक नेत्याने त्याच्या जिल्हा आणि राज्यात काढायला हव्यात . समाज माध्यमांमुळे काँग्रेसचे बहुसंख्य नेते लोकांपासून फार दूर गेलेले आहेत . एसी खोलीत किंवा कारमधे बसून एखादं ट्विट केलं ( खरं तर करवून घेतलं ! ) किंवा एखादी पोस्ट टाकली की जनतेशी संवाद साधला  गेला , असं समजणं चूक आहे . हा प्रकार इतका वाढला आहे की , जवळच्या कार्यकर्त्याच्या आनंद किंवा दु:खाच्या प्रसंगातही थेट भेटी ऐवजी समाज माध्यमावर पोस्ट टाकण्यात नेते समाधान मानतात . आपल्या आनंद किंवा दु:खात नेता सहभागी होतो ही भावना त्यामुळे कार्यकर्त्यांत निर्माणच होत नाही . ( याबाबतीत भाजपच्या नेत्यांचा आदर्श समोर ठेवायला हवा ; लोक संपर्कासाठी भाजपचे बहुसंख्य नेते समाज माध्यमं आणि थेट संवाद अशी दुहेरी पद्धत वापरतात . ) पूर्वी काँग्रेस नेते आठवडा-पंधरवाड्यातून एकदा तरी लोकांसाठी उपलब्ध असत . वसंतदादा ते विलासराव मार्गे शंकरराव चव्हाण , शरद पवार असा संवादाचा हा व्यापक पट आहे ; यांच्याकडून पाठीवर थाप पडल्याचे असे आलेले अनुभव अजूनही अनेकांच्या स्मरणात आहेत . ती मोडीत निघालेली परंपरा पुन्हा सुरु करायला हवी .  

शेवटी – श्रीमती सोनिया गांधी पक्ष नेतृत्वाचा म्हणजे अध्यक्षपदाचा प्रश्न अजूनही सोडवलाच नाही . त्यांनी पक्षाध्यक्षपद सोडून सूत्रं अन्य कुणाहीकडे सुपूर्द करत  या नवसंकल्पांची सुरुवात स्वत:पासूनच केली असती , तर तो पक्षासाठी एक चैतन्यदायी संदेश  ठरला असता आणि पक्षांतर्गत विरोधकांना जोरदार धक्का बसला असता .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleभारतीय नद्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Next articleसमाजवादी चळवळीचे उद्बोधक चिंतन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here