समाजवादी चळवळीचे उद्बोधक चिंतन

  -प्रवीण सप्तर्षी

समाजवादी चळवळीच्या सद्यस्थितीवर नेमका प्रकाश टाकतानाच या स्थितीमागील कारणांचा वेध घेत परखडपणे विश्लेषण करणारे ‘समाजवाद आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’ (मीडिया वॉच पब्लिकेशन) हे सुरेश द्वादशीवार यांचे पुस्तक म्हणजे एक उद्बोधक चिंतन आहे. मुख्यत्वे हे पुस्तक पू. साने गुरुजींना अर्पण केले आहे. यातून लेखकाची वचितांच्या संघर्षाबद्दलची बांधिलकी आणि आशावाद अधोरेखित होतो. सध्याच्या समाजवादी चळवळीतल्या कार्यकत्यांनी या चिंतनाचे स्वागत केले पाहिजे. समाजवाद्याच्या डोळ्यात अंजन घालणारे हे पुस्तक आहे. भांडवलशाहीच्या समर्थकांना गुदगुल्या होऊ शकतात. परंतु हे चिंतन पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना आत्मपरिक्षणासाठी आणि भविष्यातील दिशा ठरविण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
………………………..

समाजवादी चळवळीची दशा केवळ भारतातच नव्हे; तर जगभर कशी झाली? नव्या जोमाने वाढणाºया भांडवलशाहीशी आणि तिच्या बदलत्या स्वरूपांशी कसा सामना करायचा? भांडवलशाहीच्या हातात हात घालून वाढणाच्या हुकूमशाहीला कशा प्रकारे तोंड द्यायचे? धर्म-जात-वर्ण यानी विभागलेल्या वचितांसाठी लढणे कसे आवश्यक आहे आणि ते लढे कसे उभे करायचे? अशा समकालीन भेडसावणाºया प्रश्नांना गवसणी घालून केलेले एक उद्बोधक चिंतन म्हणजे सुरेश द्वादशीवार यांचे ‘समाजवाद आजची मरगळ, उद्याचे उत्थान ?’ हे पुस्तक! या पुस्तकाच्या नावातच प्रश्नचिन्ह आहे. त्याचे महत्त्व हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते. मुख्य म्हणजे हे पुस्तक पू. साने गुरुजींना अर्पण केले आहे. यातून लेखकाची वंचितांच्या संघर्षाबद्दलची बांधिलकी आणि आशावाद अधोरेखित होतो. सध्याच्या समाजवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी म्हणूनच या चिंतनाचे स्वागत केले पाहिजे. समाजवाद्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे पुस्तक आहे. म्हणून भांडवलशाहीच्या समर्थकांना गुदगुल्या होऊ शकतात. परंतु हे चिंतन पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना आत्मपरिक्षणासाठी आणि भविष्यातील दिशा ठरविण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.

एकूण ११५ पानांची ही मांडणी १५ विभागात सोप्या भाषेत केलेली असल्याने हे पुस्तक वाचनीय तर आहेच. शिवाय अंतर्मुख व्हायला लावणारे आहे. पुस्तकाचे लेखक सुरेश द्वादशीवार हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असल्याने पुस्तकात अनेक संदर्भ रोचक पद्धतीने मांडलेले आहेत. शिवाय लेखक अनुभवी पत्रकार व संपादक असल्याचे राजकीय परिस्थितीचे विश्लेषणही अनेक घटनांचे संदर्भ देऊन केले आहे. मुख्य म्हणजे सिद्धहस्त लेखक असल्याने सदर पुस्तकातील भाषा साधी, सोपी आणि ओघवती आहे. पुस्तकातील पहिल्याच विभागात परिस्थितीनुरूप, समाजवादाचा विविध अंगांनी कसा विकास झाला. हे स्पष्ट करताना १९ व्या शतकात मार्क्स व एंजल्स यानी मांडलेले शोषणाविरुद्धचे तत्त्वज्ञान व त्यापूर्वीही असे प्रयत्न कसे करण्यात आले. याचीही माहिती देण्यात आली आहे. शिवाय त्यावेळच्या भारतीय समाजाला शिस्त लावण्यासाठी मनुस्मृती व शरियत यांची निर्मिती कशी झाली आणि त्यातून निर्माण झालेली चौकट कशी घातक ठरली, हे स्पष्ट केले आहे राजसत्ता ही नेहमीच अर्थसत्ता आणि धर्मसत्तेला जुळवून घेणारी असल्याचा इतिहासही लेखकांनी रोचकपणे उलगडून दाखविलेला आहे.

लेखक- सुरेश द्वादशीवार

मार्क्सवादाची आणि समाजवादाची मांडणी यातील मूलभूत फरक सांगताना समाजवादाचा विचार ठिकठिकाणच्या त्याच्या इच्छेप्रमाणे कसा बदलला, हेही लेखकाने सांगितले आहे. समाजवादाचे स्वरूप समाजाच्या गरजेनुसार असायला हवे, हा विचार समाजाच्या व्यापक पायावर उभा राहणे आवश्यक. पण अशा आधाराला सुरूंग लावणाºया गोष्टी कोणत्या? गरिबी दूर करण्याच्या प्रश्नावर लोक संघटित होऊ शकले नाहीत. कारण त्यांना आकर्षित करणारे विषय धर्म, जात, पंथ आणि परंपरा हे आहेत. त्यात भर म्हणून इतिहासाने दिलेले खोटे अभिमान आहेत. मुख्य म्हणजे हे अभिमान व अहंता जागविणाºया यंत्रणा समाजात आहेत. लेखकाने या विदारक वास्तवाची जाणीव करून दिली आहे.

    ‘समाजवादी पक्षाची समाप्ती’ या तिसऱ्या प्रकरणाची पार्श्वभूमी ‘भांडवलशाहीची फसवणूक’ या दुसºया प्रकरणात आहे. त्यात मानवतावादी संकल्पना उदा. ‘वसुधैव कुटुंबकम’ किंवा ‘दुरिताचे तिमिर जावो’ या घोषवाक्यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. उदारमतवादाचाही उहापोह केला आहे. हे दोन्ही वाद पांगळे करण्यासाठी ढोंगी भांडवलशाही कशी कार्यरत होती. विशेषत: औद्योगिक क्रांतीनंतर पोसलेली भांडवलशाही कशी आक्रमक झाली व पद्धतशीरपणे समाजाला कशा प्रकारे फसवू लागली हे छान समजावून दिले आहे. या संदर्भात उद्धृत केलेली उदाहरणे फारच बोलकी आहेत. ‘अमेरिकेतील स्वातंत्र्यलढ्याचे नेते गुलामाचा व्यापार करणारे होते’, ‘भारतात अतिशूद्रांच्या वस्त्या गावकुसाबाहेर होत्या आणि गावातली ओंगळ कामे करीत होत्या’ अशी उदाहरणे दिली आहेत. मध्ययुगातल्या राजेशाहीने कष्टकरी शेतकºयांची पिळवणूक कशी केली, हेही स्पष्ट केलेले आहे. याला शह दिला तो कार्ल मार्क्सने. परंतु या मार्क्सवादावर आधारीत झालेल्या क्रांतीमध्ये रशियात प्रचंड मानव संहार झाला.

थोडक्यात, रशिया असो  वा चीन, ही क्रांती म्हणजे जनतेचा उठाव नसून फौजेने वेळोवेळी केलेले सत्तांतर होते. या सत्तांतराला गरीबांचे सत्तांतर म्हणणे हाही एक ढोंगीपणा कसा, हे त्यांनी पटवून दिले आहे. हे पाहूनच भारतातील दोन नेते पं. नेहरू व जयप्रकाश नारायण यथावकाश साम्यवादाकडून समाजवादाकडे वळले. खरी मेख म्हणजे साम्यवादी आणि समाजवादी नेहमीच स्थितीवादी धर्माच्या विरूद्ध गेले. त्यामुळे जगातल्या धर्मसत्ता त्याच्याविरूद्ध उभ्या ठाकल्या. राष्ट्रवादाचा उदय होऊन समाजवादी चळवळी राष्ट्राच्या प्रदेशाच्या सीमांमध्येच अडकून पडल्या. समाजवादाच्या अस्ताबद्दल लेखकाने प्रस्तुत पुस्तकात प्रतिपादन केले आहे, की ‘जगात क्रांती करायला निघालेले साम्यवादी आणि समाजवादी मग आपापल्या देशाच्या, धर्माच्या, प्रदेशाच्या व भाषाच्याही मर्यांदामध्ये अडकले. याउलट उद्योगपतींचा व भांडवलदारांचा वर्ग अधिक अधिक चलाख, तल्लख आहे.’ कामगारांना खूश ठेवण्यासाठी बोनस, अधिकाºयांना भरपूर वेतन, विक्रेत्यांना नफ्यातील वाट्याचे आश्वासन, राजकीय पक्ष व धर्मसंस्थांना देणग्या असे नानाविध उपाय त्यांनी अवलंबिले.

या देणग्या-बोनस यांची रक्कम कामगारांच्या शोषणातून मिळणाºया  फ ायद्याच्या मानाने फुटकळ असते. पण त्यांचा उदो-उदो करणारे मात्र ‘मध्यमवर्गीय’ असतात. यातही चलाखी कृत्यातून शांतता प्रस्थापित होत असते. म्हणूनच आपल्या देशात हजारो शेतकºयांच्या आत्महत्या होऊनही उठाव होऊ न देणारी व्यवस्था निर्माण झाली. हे या पुस्तकात अतिशय तर्कसंगत व सोप्या भाषेत स्पष्ट केले आहे. थोडक्यात, समाजवादाची लोकप्रियता अजूनही टिकून असली तरी त्याचे संघटन व नेते यांच्यातली क्षमता मात्र लयाला गेलेली दिसते.

   पुस्तकातील चौथ्या प्रकरणात समाजवादाची शोकांतिका समजावून सांगताना गांधीजींच्या क्रांतीकारक विचारांनाही भांडवलशाहीने कशी बगल दिली, हे लेखकाने जाणवून दिले. सध्याच्या नॉन गव्हर्मेंटल आॅर्गनायझेशन्स (एनजीओ) कशा भांडवलदारांवर अवलंबून आहेत. हे सांगून त्यांचाही भांडवलदारांनी खेळण्यासारखा कसा वापर चालविलेला आहे, हे उदाहरणासह समजून दिले आहे. या परिस्थितीमुळे जगभरच्या समाजवाद्यावर काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी आहे. ते प्रश्न साधे व सोपे आहेत. उदाहरणार्थ, समाजवादी विचारसरणी जनतेच्या उन्नतीसाठी असूनही लोकशाही व्यवस्थेत समाजवादी पक्षांना निवडणुकीत अपयश का येते? जिथे सत्ता आली तिथेही त्यांना हुकुमशाही आणि लष्करशाहीचा आश्रय का घ्यावा लागला ? आम्ही तुमच्या कल्याणासाठी आहोत, हे गरीबांना ते पटवून का देऊ शकत नाहीत? शेवटी एका प्रश्न म्हणजे माणसे मुक्ततेच्या बाजुने अधिक असतात की समाजाच्या नियंत्रणाच्या ?’

        या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून, अनेक विचारवंतांचे दाखले देऊन चर्चा केली आहे. तत्त्व आणि प्रत्यक्ष घटना यांच्यातील तफावत स्पष्ट केली आहे. नेते कसे जनतेपासून दूर होत जातात आणि त्यामुळे त्यांची भाषा आपली वाटली तरी ते आपलेसे वाटत नाहीत, ही कारणमिमांसा पटणारी आहे. हे पटवून देताना लेखकाने रविंद्रनाथ टागोरांनी गांधीजींबाबत मांडलेले विचार अधोरेखित केले आहेत. गांधीजी कसे लोकांबरोबर होते म्हणून लोक मोठ्या संख्येने त्यांच्याबरोबर आले. दरिद्री जीवन हट्टाने स्वीकारणारा गांधी होणे ही सामान्य विचारांना जमणारी बाब नाही. भारतीय राजकारणातील समाजवाद्यांचे स्थान कसे कमकुवत होत गेले तेही सांगितले आहे. शेवटी कालानुरूप बदल आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून सर्वांना कवेत घेऊन पुढे नेणारी विचारसरणी फुलेल ही आशाही वर्तवली आहे.

     पुस्तकातील पुढच्या टप्प्यात म्हणजे सातव्या प्रकरणात ‘विचार मरत नाहीत’ असे विधान करून चर्चा केली आहे. स्कँडनेव्हियन देशांमध्ये लोकशाही कशी सक्षम आहे, त्यांचे पंतप्रधान कसे सामान्य माणसाप्रमाणे रेल्वेचा प्रवास करतात, याचे वर्णन केले आहे. अतिसंचय व अतिदारिद्रय या विरोधी संस्कार त्यांच्या प्रॉटेस्टंट पंथाने कसे दिलेले आहेत, हेही सांगितले आहे. यामुळे या देशांमध्ये खरा समाजवाद रूजलेला दिसतो. त्याचा परिणाम भांडवलदारांवरही झाला आहे. नोकिया कंपनीचे फिनलंडमधील जागतिक कार्यालय अगदी साधे आहे सुबत्ता आणि त्याबरोबर दिसून येणारी समता व समाधान या देशामध्ये दिसते. त्यांचे हे विकासाचे मॉडेल जगाला मार्गदर्शन करू शकणारे आहे. स्वित्झर्लंडमध्ये फिरताना लेखकाचा मंत्र्यांशी झालेला संवाद अंतर्मुख करणारा आहे. लेखकाने त्या मंत्र्याला विचारले, ‘‘तुमच्याकडे लोकशाही आहे. परंतु स्त्रियांना मताचा अधिकार मिळायला १९६८ सालापर्यंत का थांबावे लागले ?’’ यावर त्या मंत्र्याने उत्तर दिले, ‘‘तो त्यांनी मागितलाच नव्हता.’’ या अनुभवामुळे प्रस्तुत लेखकाला आश्चर्य वाटले. नेहरूंच्या काळापर्यंत स्कँडेनेव्हियन देशांमधील समृद्ध समाजवाद भारतात येऊ शकतो, ही आशा होती. परंतु पुढे खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर मात्र धर्मांध भांडवलशाही आली. हे वास्तव सांगताना लेखक उद्विग्नपणे म्हणतात, ‘दुदैव याचे, की या देशातील गरीब मतदारांनीच आत्ताची ही व्यवस्था सत्तेवर आणली’.

जगातील अनेक देशांमध्ये आर्थिक विकास व सुबत्ता कशी आली, याचे रोचक वर्णन पुस्तकातील आठव्या प्रकरणात करण्यात आले आहे. त्यात अमेरिकेसारख्या ३०० वर्षांपेक्षा जास्त काळ रूजलेल्या भांडवलशाहीचे फायदे-तोटे स्पष्ट केले आहेत. तिथे भांडवलशाही टिकविण्यासाठी कोणते प्रयत्न केलेले आहेत, हेही सांगण्यात आले. या तुलनेत दरिद्री देशांच्या विकासाखी कहाणी कशी वेगळी आहे. हेसुद्धा स्पष्ट आहे. भारतात केंद्रानुवर्ती व्यवस्था रूजली. ती गांधीजींच्या ग्रामस्वराज्यापेक्षा कशी वेगळी आहे आणि त्याचे दुष्परिणाम आज भोगावे लागत आहेत. ही मांडणी पूर्णपणे पटते. चीन किंवा रशिया या साम्यवादी राष्ट्रांमध्येही सुबत्ता आली, पण तेही विषमता रोखू शकले नाहीत. म्हणून आर्थिक विकासापेक्षा समाधान व सुख मिळवायचे असेल तर गांधीजींनी सांगितलेले प्रारूप उपयोगी पडते, असे प्रतिपादन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या देशांच्या विकासाच्या प्रारूपांचे विश्लेषण करून लेखक या प्रतिपादनापर्यंत पोहोचतात.
मानवी समाजात समतेचे मूल्य सर्वमान्य असूनही प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. या वास्तवाचे वाचकांना देताना लेखकाने ‘अ‍ॅनिलम फार्म’ चे उदाहरण दिले आहे. समता प्रस्थापित होण्यासाठी ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन्ही गटांचे प्रबोधन आवश्यक असते. हे करण्याची किमया महात्मा गांधींच्या नेतृत्वात होती. सध्याचा काळ मात्र त्यांच्या मारेकºयांच्या प्रभावाखाली असल्याने साम्यवाद व समाजवाद या विचारसरणी कशा नष्ट होत आहेत, याची चर्चा केली आहे. मुख्य म्हणजे समाजवाद्यांना हे  भान नाही. त्याचे कारण ते स्वत:ला जडलेल्या क्रांतीच्या नशेत आपलेच वाद कुरवाळत राहिले’. समाज ‘समजा’वर आणि ‘श्रद्धांवर’ चालतो म्हणूनच तो बुध्दीवादी होत नाही. तो तसाच रहावा म्हणून भांडवलशाही राजकारण व धर्मकारण यांच्या आधारे विषमता निर्मितीचे कार्य करीत आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या सरकारची धोरणे चुकीची ठरूनही ते सत्तेत येत आहेत. त्याची दृष्टी समाजावर नसून भाडवलदारांवर कशी आहे. याची अनेक उदाहरणे देऊन यात बदल घडविण्यास द्रष्टेपणाची आवश्यकता सांगितलीय. भांडवलदारनिष्ठ सरकार लोकनिष्ठ होणे आवश्यक आहे. तरच आर्थिक न्याय प्रस्थापित होऊ शकेल. १९ व्या शतकात साम्यवाद व समाजवाद जन्माला आला. सुमारे २०० वर्षांनंतरची आजची परिस्थिती खूपच वेगळी आहे. समाज अगदी आदिवासी वर्गसुद्धा व्यक्तीकेंद्रीत कसा आहे, याची उदाहरणे लेखकाने स्वानुभवाच्या आधारे स्पष्ट केली आहेत. माणसाला स्वत: आपले जीवनमान घडवावेसे वाटते. अशा विकासोन्मुख माणसांच्या मदतीला कसे जाता येईल, याचा विचार जाणत्या समाजकारणी व राजकारणी विचारवंतांनी करणे आवश्यक आहे. असे लेखकाच मते यथागोग्य वाटते.

पुस्तकातील पुढच्या प्रकरणांत भाजप आणि समाजवाद्यांच्या प्रवासाची तुलना केलेली आहे. भाजप कसा पुढे गेला आणि समाजवादी आह तिथेच का राहिले, याचे परखड विवेचन केले आहे. आपल्या विचारांना जास्त जवळ काँग्रेसला आणि नेहरूंच्या नेतृत्वाला विरोध करता करता समाजवादी  नकळत उजव्या शक्तींच्या जवळ गेले. काँग्रेस स्थितीवादी झाली आणि समाजवादी विस्कळीत होत गेले. जयप्रकाश नारायणांसारखे नेते राजकारण सोडून भूदान चळवळीत गेले. त्यामुळे समाजवादी चळवळीत पोकळी निर्माण झाली. सध्याच्या समाजवादी नेत्यांचे वर्णन करताना लेखकाने निष्ठेचा आणि संघर्षमय तेजाचा अभाव अधोरेखित केलेला आहे.

‘नवी स्थिती नवे प्रश्न’ या प्रकरणात समाजवादाची, समतेची, धर्मनिरपेक्षतेची गरज कशी आहे. हे पटवून दिले आहे. परंतु समाजवादालाही विशिष्ट व चांगल्या मनुष्य स्वभावाची गरज असते. तो म्हणजे गांधी, बुद्ध, ख्रिस्त यांनी सांगितलेला सद्गुणी स्वभाव. मानवी स्वभावाची दुसरी म्हणजे लबाडीची बाजूही हॉक्ज व कौटिल्याने सांगितली आहे. भांडवलशाही शोषण व्यवस्थेला पोषक असा हा स्वभाव आहे. सद्यस्थितीत समाजवाद संपत आलेला दिसतोय त्याचे पुनरूज्जीवन नजिकच्या भविष्यकाळात होईल, ही आशाही लोप पावली आहे. तरीसुद्धा समाजवादी विचारसरणी जनमानसात अस्तित्व राखून आहे. गांधीजींचा सत्य, अहिंसा व सदाचाराचा आग्रह लोकांच्या मनात अजूनही रूजलेला आहे. हे स्पष्ट करताना लेखकाने एक चांगला विचार सांगितला आहे. तो म्हणजे ‘जोवर जनतेत भ्रष्टाचाराची व असत्याची चीड आहे. तोवर संघटन नसले, तरी गांधी विचार प्रभावीच आहे’. समाजवादाचीही स्थिती अशीच आहे. पण तो विचार संघटित ताकदीने अधिक बलवान करण्याची गरज आहे. समाजवादी विचारसरणीच्या अज्ञात वाटणाºया, पण प्रत्यक्ष जाणविणाºया परिणामांची उदाहरणेही सांगितली आहेत. त्यामुळे भांडवलशाहीलाही काही तरी सामाजिक दायित्व दाखविण्याची गरज भासते, हेही समाजवादी विचारसरणीच्या प्रभावाचेच द्योतक आहे. थोडक्यात, समाजवादी विचारसरणीची गरज आधुनिक काळातही कशी आहे आणि हीच विचारसरणी मानवाला सुख- समाधानी बनवू शकते, असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय.

    मानवी विकासाच्या विविध टप्प्यांवर उदा. धर्मसत्ता, हुकूमशाही यांच्यापासून लोकसत्तेपर्यंतचा प्रवास कसा घडत गेला, याचा उहापोह करून लेखकाने लोकशाहीची गरज स्पष्ट केली आहे. लोकशाहीकडून समाजसत्तेकडे आणि समाजसत्तेकडून समाजवादाकडे प्रवास होऊ शकतो, असा आशावादही व्यक्त केला आहे. त्यासाठी धर्म, भाषा, जात, पंथ यानुसार होणारे भेदाभेद विसरणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य व समतेसारख्या मूल्यांसाठी लोकांना एकत्र आणणे गरजेचे आहे. याबाबतची सकारात्मक उदाहरणेही या पुस्तकात देण्यात आली आहे. त्यात १९८० च्या काळातील आसाममधील तरूणाचे आंदोलन, लोकनायक जयप्रकाशाचे आंदोलन, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी पुन्हा निवडून येणे आदी घटना-घडामोडींचा समावेश आहे. त्याच बरोबर या पुस्तकात आपसातील भेदाभेद विसरून सारा देश एक होण्याची उदाहरणेही सांगितलेली आहेत. या साºया उदाहरणांमधून लेखकाने अगदी सोप्या भाषेत सांगितलेले तत्त्व त्यांच्याच शब्दात-‘लोकशाहीवरचा विश्वास, हीच उद्याच्या गरीबांच्या रामप्रहराची साक्ष आहे’.

        अशी स्थिती आपोआप येणार नाही, असे बजावून चळवळीपुढील आव्हानांची जाणीव करून देणारे सदर पुस्तकातील पुढचे प्रकरण आहे. लेखक राज्यशास्त्राचे तज्ज्ञ असल्याने त्यांनी पुस्तकात राजकीय बदलांची व सत्तांतरांची अनेक उदाहरणे सोप्या भाषेत सांगितली आहेत. त्यातून लेखकाला जाणवलेले सत्य फार महत्त्वाचे आहे. ते म्हणजे श्रमजीवींनी कुठेही स्वबळावर सत्ता मिळविलेली नाही. म्हणूनच कामगारांची किंवा समाजवाद्यांची सत्ता येण्यासाठी लोकशाही असणे जरूरीचे आहे आणि त्यात जनमताचा पाठिंबा असणे आवश्यक असते. हा जनमताचा पाठिंबा मिळविण्यासाठी समाजवाद्यांनी कोणती पथ्ये पाळावीत, याचे सखोल मार्गदर्शनही या प्रकरणात करण्यात आले. पुस्तकात ‘पुनरूजीवनाच्या शक्यता’ मांडताना परिवर्तनवाद्यांनी आपली जुनी आयुधे व साधने बदलणे कसे आवश्यक आहे, हे सांगताना भांडवलशाहीने शोषणाचे तत्त्व कायम ठेवून आपली पद्धती कशी बदललेली आहे. हे स्पष्ट केले आहे. शिवाय वंचितांमधील भडक माथ्याच्या तरूणांनी हाती शस्त्र घेतलेली उदाहरणेही देण्यात आली आहेत. शेवटी त्यांच्या वाट्याला तुरूंगवास किंवा मृत्यू येतो. त्यांच्याविषयी पांढरपेशा वर्गात दिसून येणारी अनभिज्ञता आणि असंवेदना याची जाणीव करून दिलेली आहे. लेखकाचे हे प्रतिपादन प्रत्यक्ष नक्षलबारीला जाऊन, चारू मुजुमदार, कानू सन्याल व जंगल संथाल या तिन्ही संस्थापकांना भेटून आलेल्या अनुभवावर आधारित आहे. समाजवादी चळवळीला जागतिक आयाम आहे. त्यामुळे जगभराच्या पिडीतांच्या मनातील धगधग शोधणे, एकत्र करणे व त्याचा भडका उडू न देता त्यांना शांततामय परिवर्तनासाठी तयार करणे हे अवघड काम करण्याचे आवाहन या पुस्तकाद्वारे लेखकाने तरूणाईला केले आहे.

   पुस्तकातील भाषा ओघवती आहे. त्यामुळे लेखक वाचकांशी रंजकपणे संवाद साधू शकतात लेखक गाढे अभ्यासक व विचारवंत आहेत. आपल्या प्रदीर्घ, डोळस व संवेदनशील पत्रकारितेच्या अनुभवांचा ठेवा त्यांनी या पुस्तकामार्फत आपल्यापुढे ठेवला आहे. परिस्थितीचे वास्तव वाचन व विश्लेषण करून वंचितांच्या जीवनात सुखाची पहाट उगवायची असेल तर तो मार्ग कसा आहे. याच्या खाचाखोचा स्पष्ट करणारे हे प्रतिपादन आहे. म्हणूनच तरुण वर्गाने हे पुस्तक अवश्य वाचायला
हवे.

(लेखक पुणे विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले असून सध्या ‘इंडसर्च’ या कॉलेजमध्ये इमेरिट्स प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

( साभार : मासिक ‘सत्याग्रही विचारधारा’ मे २०२२) 

………………………………………………

‘समाजवाद आजची मरगळ, उद्याचे उत्थान?’

मीडिया वॉच पब्लिकेशन

किंमत- १५० रुपये

पुस्तकासाठी समोरील लिंकवर क्लिक कराhttps://amzn.to/3iuMNy7