दम्माम : सिद्दींची वैशिष्ट्यपूर्ण लोककला

 

उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज : 4-5

-प्रवीण खुंटे, प्रवीण राठोड, ज्योती भालेराव-बनकर, सूरज निर्मळे, चंदनसिंग

twitter sharing button

सातशे वर्षांपूर्वी आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेले हबशी किंवा सिद्दी समाजातील लोक भारताच्या पूर्व व पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील काही ठिकाणी उतरवले गेले. त्यातील काही लोक महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक या राज्यांच्या सीमावर्ती भागांत स्थायिक झाले. त्यांचा इतिहास, त्यांचे वर्तमान आणि त्यांची स्थिती-गती यांचा अभ्यास करण्याची इच्छा प्रवीण खुंटे, प्रवीण राठोड, ज्योती भालेराव-बनकर, सूरज निर्मळे, चंदनसिंग या पाच तरुणांनी व्यक्त केली. त्यासाठी साधना ट्रस्टने त्यांना फेलोशिप दिली. मग त्यांनी अभ्यास केला आणि प्रत्यक्ष त्या भागात दोन वेळा भेट देऊन तिथल्या लोकांशी संवाद साधला. त्यातून आकाराला आलेले लेख आणि व्हिडिओ असा हा दीर्घ रिपोर्ताज सादर करीत आहोत- संपादक , कर्तव्य साधना

……………………………………………………………

आफ्रिका खंडातून भारतात गुलाम म्हणून आणल्यापासूनचा शेकडो वर्षांचा काळ सिद्दींना हलाखीचे जीवन जगण्यातच घालवावा लागला. या देशात आम्ही कोण आहोत, आमची ओळख काय आहे, या भावनेतून अनेक दशके संघर्ष केल्यानंतर अखेर सन 2003 मध्ये सिद्दींचा अधिकृतपणे अनुसूचित जमाती (एस.टी.) मध्ये समावेश करण्यात आला. यानंतर सिद्दींच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात झाली. सिद्दींचा एस.टी.मध्ये समावेश करण्यात त्यांच्या संस्कृतीमधील ‘दम्माम’ या पारंपरिक लोककलेने महत्त्वाची भूमिका बजावली. सिद्दींच्या जीवनात ‘दम्माम’ला अनन्यसाधारण महत्त्व होतेच, मात्र आरक्षणामुळे ते आणखी वाढले. भारतीय सिद्दींच्या आफ्रिकन संस्कृतीचा अविभाज्य भाग असणारे दम्माम म्हणजे काय, त्याचे सिद्दींच्या जीवनातील स्थान व महत्त्व या सगळ्याविषयीचा हा 10 मिनिटांचा व्हिडिओ..

दम्माम : सिद्दींना आफ्रिकेशी जोडणारा एकमेव दुवा

उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाजाविषयीची लेखमाला : 5facebook sharing button

आफ्रिका खंडातून भारतात गुलाम म्हणून आणल्यापासूनचा शेकडो वर्षांचा काळ सिद्दींना हलाखीचे जीवन जगण्यातच घालवावा लागला. या देशात आम्ही कोण आहोत, आमची ओळख काय आहे, या भावनेतून अनेक दशके संघर्ष केल्यानंतर अखेर सन 2003 मध्ये सिद्दींचा अधिकृतपणे अनुसूचित जमाती (एस.टी.) मध्ये समावेश करण्यात आला. यानंतर सिद्दींच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात झाली. सिद्दींचा एस.टी.मध्ये समावेश करण्यात त्यांच्या संस्कृतीमधील ‘दम्माम’ या पारंपरिक लोककलेने महत्त्वाची भूमिका बजावली. सिद्दींच्या जीवनात ‘दम्माम’ला अनन्यसाधारण महत्त्व होतेच, मात्र आरक्षणामुळे ते आणखी वाढले. भारतीय सिद्दींच्या आफ्रिकन संस्कृतीचा अविभाज्य भाग असणारे दम्माम म्हणजे काय, त्याचे सिद्दींच्या जीवनातील स्थान व महत्त्व या सगळ्याचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.

प्रत्येक समाजाला त्याची म्हणून एक संस्कृती असते. संस्कृती हा विविध अर्थच्छटा असणारा शब्द आहे. माणूस आणि त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनत असतो. याच निसर्गात स्वतःच्या जगण्यासाठी अनुकूल बदल करत मनुष्यप्राणी आपले जीवन जगण्याच्या पद्धती ठरवत असतो. याविषयी ज्येष्ठ लेखिका ‘इरावती कर्वे’ यांनी नोंदविले आहे, ‘घरे, कपडे इ. स्थूल वस्तूंचा उपभोग व्यक्ती घेत असतात. हे संस्कृतीचे बाह्य रूप. संस्कृतीचे दुसरे रूप म्हणजे माणसाने सामाजिक जीवन जगण्यासाठी ठरवून घेतलेली रीत होय.’ (भारतीय संस्कृती कोश खंड नववा) जगण्याची आत्मसात केलेली ही रीत, त्यातील विशिष्ट पद्धती एकदा अंगवळणी पडल्या की, माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचाच प्रयत्न करतो. आपली मुळे, आपल्या समाजाच्या पाऊलखुणा जपून ठेवण्यासाठी मानवजात कायमच प्रयत्नशील राहत असते.

असाच एक वैशिष्ट्यपूर्ण समाज जो आपले मूळ आफ्रिकन वैशिष्ट्य, तर काही भारतीय वैशिष्ट्ये जपत आपली वाटचाल करत आला आहे. हा समाज आपल्या देशातील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांच्या काही भागांमध्ये आढळतो.

सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वी पोर्तुगीज, ब्रिटिश, अरब या व्यापारी लोकांनी आफ्रिकन खंडातील देशांमधील बंटू जमातीतील लोकांची भारतात गुलाम म्हणून विक्री केली. तेव्हापासून यांच्या पिढ्यान्‌पिढ्या आपल्या देशात गुलाम म्हणून राबल्या. हे लोक जेव्हा आणले गेले तेव्हापासून देश स्वतंत्र होईपर्यंत गुलाम म्हणूनच येथे राहिले. गुलामीचे कायदे रद्द झाल्यानंतर पुन्हा गुलामीत अडकू नये म्हणून, स्वरक्षणासाठी त्यांनी कारवार (पुर्वीचा उत्तर कन्नड) जिल्ह्यातील जंगलांमध्ये धाव घेतली. जंगलांमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतले. हे सगळे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ठीक होते. परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांचे अस्तित्व आणखीनच कणाहीन झाले. हळूहळू ते जंगलातून मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहेत. शेकडो वर्षांच्या सामाजिक स्थित्यंतरामध्ये त्यांचा मूळ धर्म, जात, भाषा, पेहेराव सर्व काही काळाच्या ओघात बदलले आणि त्यांनी पूर्णतः भारतीय भाषा, पेहेराव, धर्म, संस्कृती आत्मसात केली. आज सिद्दींमधील बहुसंख्य लोकांना त्यांच्या मूळ आफ्रिकन संस्कृती किंवा इतिहासाविषयी काहीच माहिती नाही. आता ते इतर भारतीयांप्रमाणेच देशाचे नागरिक आहेत.

हेही वाचा-उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज :https://bit.ly/3P2TgiD

या सर्व बदलांमध्ये त्यांच्यातील दोनच गोष्टी मूळ स्वरूपात टिकून राहिल्या. पहिली आफ्रिकन आनुवंशिकतेने त्यांना मिळालेली शारीरिक रचना. काळी तुकतुकीत त्वचा, राठ कुरळे केस आणि दुसरे आहे ‘दम्माम’ जो सिद्दींच्या वंशजांकडून भारतात आणला गेला. इतकी वर्षे हे लोक देशात गुलामी करत जगले; मात्र तरीही त्यांनी त्यांच्या संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण ठरणारा दम्माम हा नृत्यप्रकार टिकवणे खरोखर आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद म्हणता येईल. सुरुवातीला मनोरंजनाचे एकमेव साधन म्हणून त्यांच्या आयुष्याचा दम्माम हा अविभाज्य भाग होता. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिद्दी लोकांनाही माणूस म्हणून आपल्या हक्कांची जाणीव व्हायला लागली होती. ते हक्क मिळवताना, आरक्षण मिळवताना एक सांस्कृतिक वाद्य आणि नृत्यप्रकार सिद्दींसाठी वरदान ठरला.

दम्माम म्हणजे काय?

दम्माम म्हणजे ढोल. साधारण आपल्याकडील मृदंगाच्या आकाराचा. एका पोकळ ओंडक्याच्या एका बाजूला हरणाचे किंवा चितळ प्राण्याचे चामडे आणि दुसऱ्या बाजूला इतर प्राण्याचे चमडे लावले जाते. त्याला घट्ट बसवण्यासाठी भ्यारल माड नावाच्या झाडाच्या खोडांचा बारीक तुकड्यांचा खिळ्याप्रमाणे वापर करून त्याला घट्ट शिवून पारंपरिक पद्धतीने बनविलेले वाद्य. दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या प्राण्यांचे चामडे बसविण्याचे कारण म्हणजे दोन वेगवेगळे आवाज येतात. पूर्वी असे हे वाद्य तयार केले जायचे. परंतु काही वर्षांपासून जंगली प्राण्यांच्या शिकारीवर बंदी आल्यामुळे आणि वन कायद्यांमुळे पारंपरिक पद्धतीचे दम्माम बनवण्यात येत नाहीत. नवीन पद्धतीने दम्माम बनवले जाते. हे वाद्य वाजविण्याची एक विशिष्ट पद्धत असून ती आफ्रिकन पारंपरिक वाद्य संस्कृतीशी संबंधित आहे. दम्माम नृत्य म्हणजे या ढोलाच्या ठेक्यावर सिद्दींच्या दैनंदिन जीवनातील अनुभवांवर आधारित, स्वयंरचित गाण्यांवर नाचणे. गाण्यांचे सूर आणि दम्मामच्या ठेक्यावर नृत्य केले जाते, त्याला दम्माम नृत्य म्हटले जाते. नृत्य करण्याचीसुद्धा विशिष्ट पद्धत आहे आणि ही पद्धतसुद्धा आफ्रिकेतील पारंपरिक नृत्याशी मिळतीजुळती आहे. मराठी, कोंकणी आणि कन्नड अशा तिन्ही भाषामिश्रित गाण्यांची कडवी उदाहरणादाखल पुढे देण्यात आली आहेत.

दम्माम आणि त्याचे महत्त्व सांगताना सिद्दींमधील तरुण कार्यकर्ते मायकल सिद्दी सांगतात, “आम्हांला आफ्रिकन वंशाशी जोडणारं दम्माम हे एकमेव साधन राहिलं आहे. गुलाम म्हणून भारतात आणलेल्या आमच्या पूर्वजांनी ते जोपासलं आणि आमच्यापर्यंत आणलं. आमच्या आधीच्या पिढीपर्यंत दम्मामशिवाय मनोरंजनाचं आणि अभिव्यक्त होण्याचं दुसरं साधन त्यांच्याकडे नव्हतं. परंतु कालानुरूप आताची पिढी यापासून दूर चालली होती, काही प्रमाणात गेलीसुद्धा आहे. पूर्वी दम्मामशिवाय कुठलाही कार्यक्रम केला जात नव्हता. आताही दम्माम वाजवलं जातं. पण दम्मामवरून इतर समाजांतील लोक आमची हेटाळणी करतात. हे सिद्दी लोक नाचिंगे राहत्यात, ते ढोल वाजवून रात्र रात्रभर नाचत बसतात- असं बोलू लागले. त्यामुळं शाळेत जाणाऱ्या मुलांना हे थोडं कमीपणाचं वाटू लागलं. ते दम्मामपासून दूर जाऊ लागले. त्यात ‘डीजे’ संस्कृतीमुळे अधिक भर पडली. सगळ्यांकडे मोबाइल आल्यामुळे मनोरंजनाची साधनं वाढली. त्यामुळे दम्माम संस्कृती मागे पडत चालली.”

सिद्दींना आरक्षण मिळवून देण्यात दम्मामची प्रमुख भूमिका

सिद्दींचा ‘अनुसूचित जमाती’मध्ये (एस.टी.) समावेश करावा या मागणीसाठी चार दशकांपासून संघर्ष सुरू होता. या संघर्षाची दखल घेऊन सन 2000 मध्ये सरकारने अनुसूचित जमाती आयोगाकडे सिद्दींना एसटीमध्ये घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे सर्वेक्षण करण्याची शिफारस केली. त्याअनुसार आयोगाकडून एक समिती नेमण्यात आली. या समितीमधील सदस्यांनी उत्तर कर्नाटकात राहणाऱ्या सिद्दींची प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. एसटीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सिद्दींची संस्कृती आदिवासी संस्कृतीशी मिळतीजुळती आहे का याची पाहणी करण्यात आली. हे करत असताना, विविध धर्मांमध्ये विभागलेल्या सिद्दींमध्ये एक सामाईक बाब आयोगातील सदस्यांच्या नजरेस पडली. ती म्हणजे ‘दम्माम’. दम्माम हे वाद्य, त्याची वाजविण्याची पद्धती, नृत्य, गाणी आणि यांचा आफ्रिकेतील आदिवासी समाजाशी असलेला संबंध भारतातील सिद्दींना आदिवासी संस्कृतीशी जोडणारा होता. या मुख्य आधारावरच सिद्दींचा एस.टी.मध्ये समावेश करावा असा अहवाल आयोगाच्या सदस्यांकडून सरकारला देण्यात आला. त्यानंतर 2003 मध्ये सिद्दींचा अधिकृतपणे अनुसूचित जमाती या वर्गामध्ये समावेश करण्यात आला. याची अंमलबजावणी 2005 मध्ये पासून सुरू झाली.

यानंतर मात्र, काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या दम्माम या आपल्या पारंपरिक लोककलेचे महत्त्व सिद्दींमधील आजच्या पिढीलाही समजले. याचा प्रसार व्हावा, नवीन पिढीने ही कला आत्मसात करावी म्हणून, जुन्या जाणत्या लोकांनी प्रयत्न सुरू केले. तरुण पिढीला दम्मामचे प्रशिक्षण आणि महत्त्व पटवून सांगण्यास सुरुवात झाली. यातून ‘दम्माम’चे सादरीकरण करणारे 20 हून अधिक ग्रुप तयार करण्यात आले. गावागावांमध्ये पुन्हा दम्मामचा आवाज घुमू लागला. आरक्षण मिळाल्यानंतर दम्मामला सिद्दी लोक देवाचाच दर्जा देऊ लागले. पुढे जाऊन शासन-पातळीवरही सिद्दींच्या पारंपरिक कलेचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. कर्नाटक शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सिद्दींना ‘दम्माम’ चे सादरीकरण करण्यासाठीची व्यासपीठे उपलब्ध करून देण्यात आली. दम्मामचा विकास आणि संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले. दम्माम हीच आता सिद्दींची ओळख बनली आहे.

अभिव्यक्तीचे प्रमुख साधन ‘दम्माम’ 

सिद्दी व्यक्तीच्या आयुष्यातील सुख, दुःख, आनंद, उत्साह व्यक्त करण्याचे प्रमुख साधन म्हणजे दम्माम. थोडक्यात, दम्माम हे सिद्दींच्या अभिव्यक्तीचे प्रमुख साधन आहे. सिद्दी लोक दैनंदिन जीवनात काय खातात, कसे राहतात, काय काम करतात यातून येणाऱ्या चांगल्या-वाईट स्वानुभवावर आधारित स्वयंरचित गाण्यांची निर्मिती केली जाते. वाजविण्यासाठी विशिष्ट वेळेची किंवा मुहूर्ताची गरज नसते. यासाठी केवळ निमित्त लागते. उदा., एखाद्या व्यक्तींच्या आयुष्यात सुखाची किंवा दुःखाची घटना घडल्यास ती सांगण्यासाठी तो दम्माम वाजविण्यास सुरुवात करतो. ती घटना स्वयंरचित गाण्याच्या स्वरूपात इतरांना सांगतो. या सोबतच तिन्ही धर्मांतील लोक त्या-त्या धर्मांतील सण-समारंभ, धार्मिक कार्यक्रम, लग्न अशाप्रसंगी त्यांच्याकडे दम्माम वाजवतात. यामध्ये संपूर्ण गावातील लोक सहभागी होतात.

उदा.,

1) सिद्दी लोक जेव्हा तलावांमध्ये खेकडे, मासे पकडण्यासाठी जातात आणि त्यातील एखादा खेकडा चावतो.
2) मजुरीसाठी गेलेल्या सिद्दीला मालकाकडून मारहाण झाली, काही अन्याय झाला.
3) कुणाच्या घरात बाळ जन्माला आले. शेतात चांगले पीक आले.

इत्यादी प्रकारच्या शेकडो स्वानुभवांरून स्वयंरचित गाणी तयार केली जातात.

याविषयी सांगताना ज्यूलियाना फर्नांडिस म्हणतात, “कुठलीही एक व्यक्ती दम्माम वाजवायला सुरुवात करून आपली कथा सांगू लागते. दम्माम सुरू कधी होईल हे सांगू शकते. पण ते बंद कधी होईल हे सांगता येत नाही. अनेकदा संपूर्ण रात्रभर किंवा दुपारी सुरू केल्यास मध्यरात्रीपर्यंत सलग दम्माम सुरू राहते. जेव्हा दम्माम वाजवायला सुरुवात होते, त्यानंतर त्याचा ठेका लोकांना एका जागेवर शांत बसू देत नाही. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांचेच अंग आपोआप हलायला सुरुवात होते. आणि लोक त्यावर नाच सुरू करतात. लग्न-समारंभाच्या वेळी आमच्याकडे किती पाहुणे आले तरी आम्हांला फारसा फरक पडत नाही. लोकांनी कुठे बसायचे, रात्री कुठे झोपायचे असा प्रश्न निर्माण होत नाही. दम्माम सुरू झाल्यावर लोकांना ते रात्रभर झोपू देत नाही.”

दोन-दोन वाक्यांची वा छोट्या-छोट्या गाण्यांची कडवी दम्माम नृत्य सादर करणाऱ्या कलाकार मेरी सिद्दी यांनी ऐकविली. ती पुढीलप्रमाणे :

खय्या साके मोठे कुर्ले
धरात्या कात्या मोठे कुर्लेय…’

अर्थ –
कुर्ले म्हणजे खेकडा, तिथे एक, इथे एक मोठे खेकडे आहेत, मासे आहेत त्यांना पकडून, घरी जाऊन त्यांची चांगली भाजी बनवून सगळे जण खाणार.

मला धरु वाये रे शेषा, मला धरु वाये रे,
बंधू घेऊन ये रे शेषा, बंधू घेऊन ये रे….’

अर्थ –
मला एक शिकार सापडली माझ्या मदतीला ये. येताना आमच्या बंधूंनादेखील घेऊन ये.

आमची माय कोंकणी माय, आमची माय कोंकणी,
रित आमची कोंकणी, नीत आमची कोंकणी… आमची माय…  कोंकणी… माय…

अर्थ –
कोंकणी भाषा ही आमची आई आहे. त्यातील सर्व रीती-भातीसुद्धा आमच्या आहेत.

अशी शेकडो स्वयंरचित गाणी सिद्दी लोक दम्माम वाजविल्यानंतर गातात आणि त्याच्यावर मुक्तपणे नाचतात. मेरी सिद्दी सांगतात की, या गाण्यांची चाल, नाचण्याच्या स्टेप्स, दम्मामचा ठेका कोणालाही शिकवावा लागत नाही. जन्मजातच ही कला प्रत्येक सिद्दीमध्ये असते. स्वतःच्या आनंदासाठी दम्माम करताना विशेष कुठलीही वेशभूषा केली जात नाही. पण जेव्हा बाहेरच्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम करायचा असल्यास त्या वेळी मात्र, पूर्ण वेषभूषा बदलली जाते. सिद्दींचे संपूर्ण जीवनच निसर्गाशी एकरूप असल्यासारखे आहे. त्यामुळेच त्यांच्या पेहेरावामध्येही ते दिसून येते. हिरवा, पिवळा, लाल रंग असलेली साडी, गळ्यात फुलांचे हार, कंबरेला हिरवा पाला, महिल्यांच्या चेहऱ्यावर लाल आणि पांढऱ्या रंगाचे ठिपके, तर पुरुषाच्या चेहऱ्यावर केवळ पांढऱ्या रंगाचे ठिपके, डोळ्यांच्या खाली काळ्या रंगाचे गोल, पायात घुंगरू, गळ्यात मोत्यांच्या माळा. हा संपूर्ण पेहराव जंगल, प्राणी, निसर्ग आणि माणूस यांच्याशी संबंधित असतो.

दम्मामचा प्रसार आणि आर्थिक उत्पन्न 

ज्यूलियाना फर्नांडिस या स्वतः एक चांगल्या कलाकार आहेत. दम्माम नृत्य सादर करणाऱ्या एका ग्रुपच्या त्या प्रमुख आहेत. कर्नाटकासोबतच देशातील विविध भागांत जाऊन त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ही कला सादर केली आहे. ज्यूलियाना सांगतात, “पूर्वी ही कला बाहेर जाऊन सादर करण्याला सिद्दींचा विरोध होता. सिद्दी कोणालाही दाखविण्यासाठी किंवा ऐकविण्यासाठी दम्माम वाजवत नव्हते, गाणी, नृत्य करत नव्हते. हे सगळं स्वतःचा आनंद-दुःख व्यक्त करण्यासाठी केलं जायचं. परंतु लोकांची समजूत काढून आमच्या संस्कृतीची माहिती इतरांना व्हावी म्हणून आम्ही बाहेर जाऊन कार्यक्रम करायला लागलो. यातून कलाकारांचा आर्थिक फायदादेखील होऊ लागला. आता लोकांचा विरोध होत नाही. आज घडीला आमच्यासारखे किमान वीस ग्रुप तरी तयार झाले आहेत. साउथ झोनमध्ये होणाऱ्या ट्रायबल फेस्टिव्हलमध्ये आम्हांला बोलावले जाते. गिरिजन उत्सव, जनप्रवाह उत्सव, युवा सैरभा अशा कार्यक्रमांमध्ये आम्हांला बोलावलं जातं. शक्यतो हे सर्व सरकारीच कार्यक्रम असतात.”

आमची कला तुमच्या आनंदासाठी एका साच्यात बसवावी लागली 

दम्माममध्ये निश्चित असा नाचण्याचा प्रकार नाही. जसा आनंद वाटेल, दुःख होईल त्याप्रमाणेच लोक नाचत होते. पण त्यावर अनेक आक्षेप घेतले जाऊ लागले. ‘तुम्हांला कला नीट सादर करता येत नाही. त्याला एक स्ट्रक्चर नाही, असे बोलले जायचे. त्यामुळे सिद्दींना त्यांच्या मूळ कलेला एका चौकटीत बसविण्याची वेळ आली. या वेळी ज्यूलियाना म्हणाल्या, “चौकट म्हणजे, पूर्वी आम्ही आम्हांला जसा आनंद वाटेल, जसं दुःख होईल, तसा आम्ही डान्स करायचो. पण कर्नाटकाची कला-संस्कृती दाखवताना बाकीचे कसे नियोजनबद्ध नाचतात तसंच आम्हीपण नाचायचं; असं आम्हांला सांगितलं गेलं. लोकांच्या मागणीखातर आम्हांला आमच्या मूळ कलेमध्ये बदल करावा लागला. पूर्वी आम्ही प्रत्येक जण स्वतः गाणं म्हणून डान्स करायचो. पण आयोजकांचं म्हणणं होतं की, तुमची कला चांगली आहे. पण तुम्ही गाणं म्हणणारे आणि डान्स करणारे वेगवेगळे करा. डान्स करताना गाणं म्हणता तेव्हा ते लोकांना ऐकू जात नाही. लोकांना त्याचा आनंद घेता येत नाही, त्यांचं मनोरंजन होत नाही. त्यानंतर आम्ही यामध्ये बदल केला. यापूर्वी नाचत आम्ही गाणं सांगत होते. आता बसून दोन लोक गाणी म्हणणार, दोन लोक दम्माम वाजवणार आणि आठ महिला डान्स करणार. सुरुवातीला आम्हांला हे खूप अवघड गेलं. त्यात अनेक बदल करावे लागले. लोकांच्या आवडीनिवडीमुळं बदल करावा लागला. आमची संपूर्ण कला सहा मिनिटांत दाखवा असं सांगतात. पण किमान 20 मिनिटांचा वेळ तरी आम्हांला हवा असतो. रात्र-रात्रभर चालणारं दम्माम सहा मिनिटांत दाखवायचं हे एकदम अवघड काम आहे. पण आमची कला तुमच्या आनंदासाठी एका साच्यात बसवावी लागली. सहा मिनिटांत आमची संस्कृती दाखवावी लागते, कारण लोक पाहत नाहीत. आम्ही कितीही वेळ द्यायला तयार आहोत पण लोक घ्यायला तयार नाहीत.”

दम्माममधून आर्थिक फायदा होतो, या भावनेने दम्मामचे अनेक ग्रुप तयार झाले. सुरुवातीला हा फायदा झालादेखील. दम्माम हे कलाकारांच्या उदरनिर्वाहाचे पर्यायी साधन होऊ शकते असे वाटू लागले. कारण प्रत्येक कार्यक्रमामधून मानधन दिले जाते. परंतु ते एवढेही मिळत नाही, की त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल. त्यातील प्रमुख अडचण अशी की, सिद्दी लोक मुळातच खूप गरीब आहेत. कार्यक्रमाचे निमंत्रण जरी आले तरी, सुरुवातीला स्वखर्चाने कलाकारांना घेऊन जाणे, यासाठी वाहतूक, खाणे-पिणे व इतर खर्च करावा लागतो. एवढे पैसै त्यांच्याकडे नसतात. आयोजक कार्यक्रम झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी पैसे देतात. त्यामुळे आर्थिक गणिते बिघडतात. गाडीखर्चाला पैसै नसल्याने अनेक ग्रुप कार्यक्रमाला जाणे रद्द करत असल्याचे अनेक कलाकार सांगतात.

‘डीजे’ संस्कृतीमुळे दम्मामकडे दुर्लक्ष

या समाजातील वृद्धांच्या पिढीला दम्मामविषयी अधिक आपुलकी, प्रेम असल्याचे दिसून येते. तरुण पिढी मात्र यापासून थोडी दुरावत असल्याचे चित्र आहे. पूर्वी दम्मामशिवाय पर्याय नव्हता. पण आधुनिक काळातील डीजे संस्कृती जंगलात राहणाऱ्या सिद्दींच्या घरांपर्यंतदेखील जाऊन पोहोचली आहे. आता सर्वांकडे ॲन्ड्रोइड फोन आल्यामुळे मनोरंजनासाठी दम्मामवर अवलंबून राहण्याची गरज त्यांना राहिली नाही. हा बदल आता सिद्दींच्या विविध समारंभांमधून दिसून येतो. दम्मामऐवजी डीजेवर हिंदी, कन्नड गाणी लावली जातात. तरुण पिढीलाही त्यावरच नाचायला आवडते. असे असले तरी दम्माम होते म्हणून आम्ही आहोत, आम्ही आफ्रिकन असल्याची एकमेव ओळख म्हणजे दम्माम असल्याची भावना येथील जुनी पाती व्यक्त करतात. परंतु काळाच्या ओघात त्याचे महत्त्व असेच टिकून राहिल का हे मात्र निश्चित सांगता येणार नाही. तरीही शेकडो वर्षांपासून मौखिक आणि वाद्याच्या स्वरूपात जपलेली ही कला टिकली पाहिजे. यासाठी सिद्दींमधील सामाजिक कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत हीच यातील आश्वासक बाब आहे.

सिद्दी समाजाचा इतिहास आणि सिद्दींची चळवळ-https://bit.ly/3N6090G

खरे तर व्यवसाय, नोकरी आपल्या पोटापाण्याची सोय करून देतात. मात्र कुठलीही कला आपल्याला जगणे शिकवते. जीवनातील संघर्ष, संकट, सुख आणि दुःख या सगळ्यांचा सामना करताना माणसाला कायम साथ देते ती त्याने निर्माण केलेली कला. कलेच्या आधाराने माणूस आपले जगणे आनंदी करत असतो. सिद्दी समाजासाठी दम्माम ही त्यांची कला त्यांच्या जगण्याच्या विरंगुळ्यासह त्यांची ओळखही आहे. जर त्यांच्या या कलेचा योग्य प्रसार, प्रचार झाला तर ही कला त्यांच्या चरितार्थाचे साधनसुद्धा होऊ शकते. त्याची सुरुवात झालेली आहेच. आफ्रिकन वंशीय दम्मामची कला भारतीय सिद्दींमार्फत देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचावी; आपल्यासह आपल्या कलेलासुद्धा समाजात मानाचे स्थान मिळावे याच अपेक्षेने प्रतीक्षेत उभा आहे सिद्दी समाज.

 ज्योती भालेराव – बनकर
[email protected]



Previous articleआगे आगे चले हम, पीछे पीछे प्रीत मितवा !
Next articleताजमहाल नेमका कोणाचा?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here