प्रिय संजुभाऊ
आज २० सप्टेंबर . आठ वर्षापूर्वी याचं दिवशी सायंकाळी तुम्ही अचानक जग सोडून निघून गेलात . आमच्यासारख्या तुमच्या हजारो मित्रमंडळीसाठी, जिवलगांसाठी तो प्रसंग सुन्न करणारा , बधीर करणारा होता .जग सोडून जाण्याइतकं वादळ तुमच्या डोक्यात घोंगावत असताना त्याची भनकही आम्हाला लागू नये . तुम्हालाही काही शेअर करावसं वाटू नये , हा आमच्या सर्वांचा पराभव होता . आयुष्यभर हा पराभव सलत राहील . बोचत राहील.
एका मोठ्या बँकेचा अध्यक्ष , व्यवसायाने अध्यापक …असे असतानाही तुमचं कमालीचं साधं जीवन , पराकोटीची तत्व , मूल्यनिष्ठा , पारदर्शकतेचा आग्रह , कायम कार्यकर्ता म्हणूनच जगण्याची धडपड हा विषय आजच्या पिढीसोबत आम्हालाही विस्मयचकित करणारच होता .आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्हाला होणारा त्रास पाहता तुम्ही किती संवेदनशील आहात हेही कळत होतं . दुसऱ्यांच्या चुकांसाठी स्वतःला त्रास करून घेण्याची तुमची पद्धत अनेकदा संतापही आणायची . पण तुमची जगण्याची स्वतःची एक पद्धत होती .सर्वांशी अधिकाधिक उत्तमच वागायचं हे तुम्ही आपल्यापुरत ठरवून घेतलं होतं . याचा अर्थ जगातील ताणेबाणे , व्यवहारी जगातील डावपेच , कारस्थान या विषयांशी तुम्ही अपरिचित होता वा अगदीच भाबडे होता अशातला भाग नाही . तुमच्या इतकी माणसं आणि पुस्तकं क्वचितच काही लोक वाचत असतील . वर्तमानातील आणि भूतकाळातीलही माणसांच्या वर्तनाचा तुम्हाला उत्तम अभ्यास होता . मानवी उत्पत्तीच्या कहाणीपासून , , इतिहास, मानसशास्त्र , समाजशास्त्र , भूगोल या सर्व विषयांचा तुमचा सखोल अभ्यास होता आणि आकलनही अतिशय उत्तम होतं.
असे असतानाही तुम्ही चटका लावणारी एक्झिट घेतली .तुम्ही गेल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे माणूस कितीही जवळचा असो त्याच्या मनाचा तळ कळत नाही हेच खरे . मनाच्या तळाशी काय खदखदत असत त्याचं त्यालाच माहीत असतं. पण भाऊ कमालीचा अंतर्मुख स्वभाव ही तुमची जशी ताकत होती तशीच कमजोरीही .कोणाहीजवळ तुम्ही मोकळे व्हायचे नाहीत . आतल्या आत घुसमटत राहायचे . या घुसमटीनेच तुम्ही गेलात . २०१५ च्या डॉ. पंजाबराव बँकेच्या निवडणूक प्रचार काळात तुमचा जीवघेणा अपघात झाला . एक महिना झोपून राहावं लागलं. तेव्हा आम्ही मित्रमंडळी तुम्हाला सांगायचो , आपलं अस्तित्व पणाला लावावं एवढं महत्त्वाचा काहीही नसते . पुढे तुमच्या अभिनंदन सभेत भाषण करताना मी म्हणालो होतो , महाराष्ट्रातील शे -पाचशे बँकांपैकी एक बँक म्हणजे तुमची बँक . ती उत्तम चालावी , तिची भरभराट व्हावी वगैरे ठीक . पण त्यासाठी स्वतःला वेठीस धरावं एवढं ते महत्वाचं नाही . पण तुम्ही ऐकणारे नव्हते . तुम्हाला बँक ७०० कोटीवर न्यायची होती . भरपूर काही करून दाखवायचं होतं .
खरं तर तुम्हाला काही सिद्ध करून दाखविण्याची गरजच नव्हती . जी बँक गर्तेत गेली होती तिला तुम्ही बऱ्यापैकी जागेवर आणलं होतं . ठेवी आणि विश्वास दोन्ही वाढत होता . त्या बँकेची सूत्रे तुमच्याकडे आहे म्हटल्यावर कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवेल एवढी विश्वासाहर्ता तुम्ही कमाविली होती . तुमचा विरोधकही तुमचा प्रामाणिकपणा आणि कमिटमेंटवर प्रश्न उपस्थित करू शकला नसता एवढा विश्वास तुमच्याबाबत अमरावतीकरांमध्ये होता . असे असताना जग काय म्हणेल याची चिंता करायची गरजच नव्हती . पण तुमच्या एका शाखेने करून ठेवलेल्या गोंधळाला आपण जबाबदार आहोत हे तुम्ही नाहकपणे मानला लावून घेतलं . खरं तर कुठल्याही सार्वजनिक संस्थेत काम करताना केवळ मेहनत व पारदर्शकता एवढ्या आधारावर यश नाही मिळत . तिथे अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात . हे तुम्हाला कळत नव्हतं अशातला भाग नाही . पण तुम्ही जिद्दीने भिडून होते .
खरं तर तुमचं विश्वच वेगळ होतं संजूभाऊ , पुस्तकात आणि माणसात रमणारे तुम्ही . शेवटच्या काही दिवस तर तुम्ही वारंवार बोलायचे . नोकरी सोडून गावाकडे जातो . तिथे शेतात एक छोट घर बांधून वाचन , फिरणे आणि ग्रामविकासाचे काही प्रयोग करायचे तुमच्या डोक्यात होतं . पण खेड्यात आता काही पडलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला खो घालत होतो . आता असे वाटते तुम्हाला जावू द्यायला हवं होतं . गेल्या काही वर्षात तुम्ही आयुष्य जरा जगायला लागले होते . आपल्या जवळच्या मित्रमंडळीचा ग्रुप .आठ -आठ दिवस आपण जंगलात जावून बसायचो . मेळघाट , पेंच , नवेगाव , ताडोबा कुठे, कुठे आपण नाही गेलो . पुस्तक आणि जंगल , पुस्तके आणि निसर्ग हेच विश्व झालं होतं . त्यात सगळ्यांनाच निखळ आनंद मिळत होता . खाण्यापासून झोपण्यापर्यंत साऱ्याच गोष्टीत बेफिकीर असेलेले तुम्ही आपल्या भटकंतीत सगळं व्यवस्थित करायचेत.
गेल्या काही वर्षात ‘आम्ही सारे’ साठी वेगवेगळे कार्यक्रम , शिबीर , सहली याची धूम आपण केली होती . महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील सारे नामवंत आपण झाडून अमरावतीत आणले होते . अमरावतीच्या सांस्कृतिक विश्वात आज ‘आम्ही सारे’ चे स्थान होते, त्यात तुमचा सिंहाचा वाटा . घरोघरी जावून पत्रिका वाटप करण्यापासून स्टेजवर खुर्च्या लावण्यापर्यंत तुमचाच पुढाकार असायचा . स्टेजवर बसायचा आग्रह केला की मात्र तुम्ही पसार व्हायचेत . खरं तर खूप काही सांगण्याजोगं तुमच्याजवळ असायचं . पण कायम पडद्याआड राहायचं , हे तुमचं तुम्ही ठरवून टाकलं होतं . तुम्ही आता छान रमायला लागला आहात हा तुमच्या तीनही बहिणाबाईंसाठी किती आनंदाचा विषय असायचा . त्या भेटल्या की बोलून दाखवायच्या , ‘संजू तुमच्यात असला की आनंदात राहतो .’
तुमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या बहिणाबाईंचा तरी विचार करायला हवा होता संजुभाऊ तुम्ही. आयुष्यभर इतरांसाठी झटत गेला.कायम दुसऱ्याचा विचार करत गेले . पण जाताना कोणाचाच विचार केला नाही. खूप संताप आणि उद्वेग होतो, तुमचं अकाली जाणे आठवलं की . आयुष्य किती सुंदर असतं हे कळायला लागलं असतानाच तुम्ही निघून गेला. खूप चुकीचं वागला तुम्ही . किती मोठा परिवार होता तुमचा . जिथे जाल तिथे माणस तुम्हाला बिलगायचे , प्रेम करायचे , भरभरून तुमच्याशी बोलायचे . त्या साऱ्यांवर अन्याय केला भाऊ तुम्ही . राहून राहून वाटतं थोडं जरी मनातलं बोलला असता तर या माणसाला वाचवता आलं असतं . पण तसं व्हायचं नव्हतं. खूप चटका लावून गेलेत भाऊ तुम्ही . या वर्षभरातील एकही प्रसंग , कार्यक्रम असा नाही जिथे तुमची उणिव भासली नाही . तुमची आठवण निघाली नाही .
बाकी तुमच्या बँकेपासून सारे जग पूर्वीसारखेच चालत आहे . जगाच्या जगरहाटीत तसाही बदल होत नसतोच . नाही आहात ते फक्त तुम्ही . तुमचं हे नसणे हे आमच्या सर्वांसाठीच खूप वेदनादायी आहे . तुमच्याशी कधी अवमानकारक वागण्याचा कधी प्रसंगचं उद्भवला नाही.पण एक सांगतो ,तुम्ही जर आता भेटले तर कुठलाही विचार न करता आधी तुम्हाला दोन लावून देईल . तुम्हाला हे असे जाण्याचा अधिकारच नव्हता भाऊ . बहोत गलत कर गये आप …
(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत )
8888744796
संजूभाऊ बद्यल संवेदना लिहिल्यात…मन गलबलून आलं.
संजूभाऊ ……तुम्ही आम्हाला हवे होते. तुम्हाला विनम्रपणे अभिवादन।
सर, संजूभाऊंशी कधीच बोलणं झालं नाही. पण त्रास होतोय हे सांगूनही कोणाला दुखावायचं नाही असं त्यांनी का ठरवलं असेल याचा विचारच त्रासवून टाकतो. मी त्यांना इतक्यांदा पाहिलं पण कधीच बोलले नाही त्याचं राहून त्याचं वाईट वाटतंय. अगदी रस्त्यात उभ्या असलेल्या माणसाला बाजूला व्हा असं बोलावं इतकंही नाही.
संयमी,दुरदर्शी व अभ्यासु व्यक्तीमत्व . समोरच्या माणसाला पाहताच त्यास समजणारा व आपलेसे करुन घेणारा मी प्रत्यक्ष अनुभवलेला व बँकेच्या हिताकरीता झटणारा तत्कालीन
अध्यक्ष