देवनूर महादेव . कन्नड साहित्यिक. त्यांचं RSS वरचं पुस्तक: ‘RSS:अळ मट्टू अगला‘, हे पुस्तक प्रचंड गाजत आहे . आतापर्यंत या पुस्तकाच्या सुमारे ४०,००० प्रती विकल्या गेल्या आहेत. देवनूर महादेव यांनी कॉपीराईट कुणा एकाला दिला नाही. त्यामुळे सहा प्रकाशकांनी या पुस्तकाच्या प्रतींची विक्रमी विक्री केली आहे. कर्नाटकात या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली आहे. आता हे पुस्तक आणखी पाच भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. त्यांच्या या पुस्तकाचा मराठीत मुग्धा कर्णिक यांनी अनुवाद केला आहे . त्यांच्या सौजन्याने या पुस्तकातील तिसरे प्रकरण ‘मीडिया वॉच’ च्या वाचकांसाठी देत आहोत – संपादक
…………………………………
आज, भाजप हे रास्वसंघाचे एक पिल्लू केंद्रात आणि इतर अनेक राज्यांत सत्तेवर आहे. महाराष्ट्रातही अनेक लांड्यालबाड्या करून, येनकेन प्रकारेण नुकताच भाजप सत्तेत पुन्हा शिरला आहे. १९७५मध्ये आणिबाणीच्या काळात रास्वसंघाच्या राजकीय पक्षाने म्हणजेच जनसंघाने जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींच्या हुकूमशाही कारभाराला विरोध करण्याच्या मोहीमेत शिरकाव करून घेतला. तेव्हापासून त्यांचा रागरंग पूर्णपणे बदलला. आजवर लोक जनसंघाला नाकारत आले होते ते त्यांना निदान दारात उभे करू लागले. रास्वसंघाच्या सदस्यांनी जयप्रकाश नारायणांच्या जनता पार्टीचे सदस्यत्व घेताना दुहेरी पक्षसदस्यत्वाचा आणि रास्वसंघाच्या सदस्यत्वाचा त्याग करण्याचे वचन दिले. असे वचन देणारे महत्त्वाचे नेते होते, अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि रास्वसंघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस. त्यांच्या सोज्वळ प्रतिमेला भुलून जयप्रकाश नारायणांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. जनता पार्टीत नांदत असताना त्यांनी कधीही त्यांचे संघाशी असलेले संबंध संपवले नाहीत आणि संघाचे सदस्यत्वही सोडले नाही. वचन मोडणे हातचा मळच होता. जयप्रकाशांचा विश्वासघात झाला होता. नंतरच्या वर्षात जेपी या विश्वासघाताबद्दल दुःख प्रकट करताना म्हणाले, “त्यांनी मला दगा दिला.”
(१९७५च्या आणिबाणीत जयप्रकाश नारायणांना चंडीगडच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते तेव्हा शासनाने जिल्ह्याचे कलेक्टर एम जी देवसहायम् यांना त्यांच्या नजरकैदेवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले. रोज भेटीगाठी होत असल्यामुळे ते जेपींचे निकटवर्ती मित्रच झाले. नजरकैदेतून सुटका झाल्यानंतरही त्यांची मैत्री टिकून राहिली. त्यांचे हे शब्द एमजी देवाशयम यांनी अजाज अश्रफ यांना दिलेल्या मुलाखतीत वाचायला मिळतात. ही मुलाखत ‘न्यूजक्लिक’ या ऑनलाईन मासिकाच्या २६ जून २०१९च्या अंकात वाचायला मिळेल.)
जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाल्यानंतर रास्वसंघ आणि भाजपचे फसवणुकीचे उद्योग देशभरात वेगाने पसरू लागले. यातून अखेर भारतीय जनता पक्ष सत्तेतही आला. देशभरात गोंधळ, संशय, द्वेषाचे वातावरण निर्माण करून, पाकिस्तानला सर्वात धोकादायक शत्रू ठरवून त्यांनी देशाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली. भारतात घडणाऱ्या बारीकसारीक दंगलींनाही पाकिस्तानच जबाबदार असल्याचे सांगितले गेले, लोकांना एकमेकांविरुद्ध भडकावण्याचे सत्र सुरू झाले. समाजात भयाचे वातावरण सातत्याने राहील अशी काळजी ते घेऊ लागले. कधीकधी स्वतःच दंगली करायच्या आणि दोष मुसलमानांवर ठेवायचा ही नेहमीची युक्ती होऊ लागली. आणि आता ज्या हिंदु धर्माच्या ज्या छत्राखाली शेकडो श्रद्धा, परंपरा आणि पंथ जपले जात होते ते छत्रच जयप्रकाश नारायणांसारखा शोक व्यक्त करताना दिसते आहे… दगा झाला आहे.
सत्तेवर येण्याआधी भाजपने किती वचने दिली होती? कसले कसले वेष त्यांनी पांघरले होते? एक की दोन की किती? त्यांनी दावा केला होता भारतीयांनी बेकायदेशीरपणे जो पैसा परदेशी बँकांच्या खात्यांत ठेवला होता तो परत आणला जाईल आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकले जातील. नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी स्वतःच्या तोंडाने हे सांगितले होते. कुणाला मिळाले ते? तो पैसा आला असेल तर कुठे गेला? मग मोदींनी कोट्यवधी नोकऱ्या निर्माण करण्याची घोषणा केली होती. पण त्यांनी निर्मिती केली ती अभूतपूर्व बेकारीची! कोण बोलणार आहे? हे प्रश्न कोण विचारणार आहे? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणाले होते ते. पण शेतकऱ्यांचे उत्पन्न जेवढे होते तेवढेही उत्पन्न त्यांना टिकवता आले नाही. त्यांनी आपल्याला धूळ चारली आहे. ते काहीही सोडत नाहीत. सार्वजनिक उद्योग खाजगी क्षेत्रात विकून त्यांची मौज चालली आहे. विदेशी कर्जाचा बोजा इतक्या प्रमाणात कधीच वाढला नव्हता. त्यांचे गोडगोड बोलणे, पोकळ आश्वासने, वाळूचे बंगले यांच्या घोळात घेत त्यांनी देशाचे दिवाळे काढले आहे. वाढती बेकारी आणि महागाई यामुळे ते जराही विचलित होताना दिसत नाहीत. दोन समाजांत द्वेष पेरणे, तो धुमसत ठेवणे आणि मग उतू जाऊ देणे… या सत्ताधाऱ्यांनी लोकांना द्वेष करण्यातच समाधान मानायला शिकवले आहे. ज्यांनी भाजपला मत दिले आणि सत्तासिंहासनावर बसवले त्यांनाही आता पश्चात्ताप होताना दिसतो आहे. परिणामी नागरिकांच्या मनातील सार्वभौम देशाची भावनाच उतरणीला लागली आहे. ज्या मतदारांनी यांना निवडून दिले त्या मतदारांच्या दैनंदिन संघर्षाशी यांचा जणू काहीही संबंध नाही.
आजच्या भारतातील राजकीय पक्षांची घडण कशी आहे यात या घसरणीचे उत्तर सापडू शकते. १- व्यक्तींनी नियंत्रित केलेले पक्षीय राजकारण २- कुटुंबांनी नियंत्रित केलेले पक्षीय राजकारण ३- असंवैधानिक संघटनांनी नियंत्रित केलेले पक्षीय राजकारण. या तीन प्रकारच्या पक्षांची सत्ता भारतात कुठे ना कुठे नांदत आहे. या तीनही प्रकारांमुळे लोकशाही धोक्यातच येते. आज देशाचे चालकत्व भाजपच्या हाती आहे- असंवैधानिक संघटनेने नियंत्रित केलेला पक्ष. व्यक्ती किंवा कुटुंबाने नियंत्रित केलेल्या पक्षात जसे मतदारांच्या हितापेक्षा पक्षप्रमुखांचे हितरक्षण करण्याकडे कल असतो तसेच, असंवैधानिक संघटनेने नियंत्रित केलेल्या पक्षात मातृसंघटनेचे हित जपले जाते. ही पक्षसंघटना तीनही पक्षप्रकारांतील सर्वाधिक धोकादायक म्हणावी लागेल. म्हणूनच आज आपल्याला दिसते की भाजपचे आमदार-खासदार, मंत्रीसंत्री, छोटेमोठे नेतेही रास्वसंघाच्या नजरेत भरण्यासाठी कशाही उड्या मारायला तयार असतात. असल्या देखाव्यात एकमेकांवर मात करण्याचे त्यांचे इप्सित असते.
असंवैधानिक संघटनांनी नियंत्रित केलेल्या पक्षांबाबत आणखी एक निरीक्षण आहे- उदाहरणासहित पाहू- बलाढ्य नेता म्हणून सर्वत्र प्रतिमा तयार केल्यानंतर मोदी हे बहुमत मिळालेल्या भाजपकडून पंतप्रधान झाले. पण तरीही ते केवळ दिसण्यापुरते प्रमुख उत्सवमूर्ती आहेत. खरे दैवत आहे रास्वसंघ- जे नागपूरच्या मंदिरात आरामात बसले आहे. उत्सवमूर्तीच्या वेषभूषेतील पात्र देशभर इकडून तिकडे फिरत असते, लोकांचा जयजयकार घेत असते. उत्सवमूर्ती होण्यासाठी मुख्यतः काय लागते? काही कौशल्ये लागतात- जनसमुदायापुढे प्रभावी अभिनय करावा लागतो, आपल्या शासनकालात काही भयंकर समस्या उद्भवल्या तर काहीतरी मुद्द्यावरून भावनिक उद्रेक घडवून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याची धूर्तता लागते, लोकांना येडे बनवण्याच्या युक्त्या गाठीशी असाव्या लागतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाभाऱ्यात बसलेल्या खऱ्या दैवताशी ‘शतप्रतिशत’ निष्ठा असावी लागते. बस्स, एवढेच लागते. आजघडीला हेच तर होते आहे ना?
आपल्या लोकशाहीवरचे आणखी एक महासंकट म्हणजे अशा असंवैधानिक संघटनेने चालवलेल्या पक्षाची नेतृत्वनिवडीची प्रक्रिया. जणू काही देवतांच्या अंगावरची फुले काही निवडक भक्तांना वाटली जातात तसे प्रसादासारखे नेतृत्व ठरते. सारे कसे कळसूत्री बाहुल्यांच्या खेळासारखे! नवा नवा बाहुला, रंगीबेरंगी कपडेवाला, राजकारण करण्याचे कौशल्य असो वा नसो- पण त्याला दिलेल्या तालाबरहुकूम विनातक्रार नाचता आले पाहिजे, प्रेक्षकांना त्याच्या नाचाने गुंगवून ठेवले पाहिजे… जर आधीचा बाहुला तितकासा आकर्षक राहिला नाही तर त्याची जागा दुसरा बाहुला घेतो… रंगमंचावर प्रवेशतो… नेता होतो. आधीचा बाहुला अडगळीत पडतो. निवडून आलेल्या प्रतिनिधींची ही अवस्था मातृसंस्था करत असेल तर त्यात मोठाच धोका आहे. बाकी सर्व गोष्टींपेक्षा आपल्या लोकशाहीला आज असलेला सर्वात मोठा धोका हाच आहे.
अशा साऱ्या गोष्टी एकत्र येऊन लोकांचे जगणे पार केविलवाणे झाले आहे. असंवैधानिक संघटनेच्या हातातले बाहुले असलेल्या भाजपने नियुक्त केलेल्या पंतप्रधानांकडे काही राज्यकर्त्यासाठी आवश्यक अशी कौशल्ये हवीत असे ठरले असते तर बेकारी निश्चितच रोखता आली असती. महागाईवर नियंत्रण मिळवता आले असते. सरकार सार्वजनिक संपत्तीची विक्री करून टाकण्यासाठी हातघाईवर आले नसते. विदेशी कर्जाचा बोजा वाढतच गेला नसता. भारतातील स्वायत्त संस्थांना निकामी, निष्फळ करण्यात आले नसते.
पंतप्रधान मोदींच्या या कौशल्यहीन चकचकीत जगात कोविड १९च्या हल्ल्यापूर्वी म्हणजे २०२० पूर्वी अंबानींची संपत्ती २.९८ लाख कोटी होती- ती आता ८.०३ लाख कोटी झाली आहे. अडानींची संपूर्ण संपत्ती कोविड-१९च्या हल्ल्याआधी म्हणजे २०२०च्या आधी ६९ हजार कोटी होती म्हणजे अंबानींच्या संपत्तीच्या एक चतुर्थांशही नव्हती- पण दरम्यानच्या काळात ती वाढून आता ७.८० लाख कोटी झाली आहे. केवळ २ वर्षांत ही मजल! (संदर्भ-फोर्ब्ज् मॅगेझिन- १० जून २०२२). एक दोन नव्हे तर अनेक प्रकारच्या विषमतांच्या दऱ्यांतून खेचत फरफटत निघालेला भारत कणी तुटलेल्या पतंगासारखा भरकटतो आहे. पण सरकार केवळ श्रीमंतांना सवलती आणि अर्थसाहाय्य देऊ करते आहे. करकपात करते आहे. हजारो कोटींचे कर्ज माफ करून टाकत आहे आणि पुन्हा कर्ज घ्यायची परवानगीही दिली जात आहे. हे सरकार कोणाचे आहे? देशातील सर्व लोकांनी बसून यावर शांतपणे मनोमन विचार केला पाहिजे.
पण काहीही होवो- लोक दैनंदिन आयुष्यात कितीही झगडत राहोत, काहीही घटना घडोत वा प्रसंगनिर्मिती होवो, देशाच्या चिंधड्या उडोत… असंवैधानिक मातृसंघटनेच्या नियंत्रणाखालील भारतीय जनता पक्ष देशभक्तीची गीते गुणगुणत अनावश्यक कायदेकानू आणि घटनादुरुस्त्यांचे प्रस्ताव आणत आहे. भाजपातून चातुर्वर्ण्य पद्धतीचा दुर्गंध मुरत चालला आहे, मनूचे कायदे घुसवत भारतीय संविधानाचा शक्तीपात करणे सुरू आहे, इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीबद्दल टोकाची असहिष्णुता, आर्यवंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना उचलून धरल्या जात आहेत. कोणतीही किंमत देऊन ही सामग्री तर जमवलीच पाहिजे. कुठेही शोधा ती सापडतेच. कर्नाटकातील ‘धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काचा कायदा’ हा वरवर पाहाता कायदा असल्यासारखा भासतो. पण नीट वाचून पाहिलात तर त्यात भारतीय संविधानाला उद्ध्वस्त केल्याचे आणि मनुच्या धर्मशास्त्रातील नियमांना घुसवल्याचे दिसते. आपण सारे आपल्या संवैधानिक स्वातंत्र्यांबद्दल बोलतो, पण रास्वसंघाने स्वातंत्र्याचा अर्थच संपूर्णपणे बदलून टाकला आहे.
देवनूर महादेव यांच्या पुस्तकातील पहिले प्रकरण -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: किती खोल, किती पसारा…- समोरील लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/3PZlOco
संघाचे गोळवलकर गुरुजी त्यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’मधे म्हणतात, “स्वातंत्र्य असणे याचा अर्थच आपल्या राष्ट्रीय मूल्यांचे म्हणजेच धर्म आणि संस्कृतीचे संवर्धन आणि प्रसार करणे आहे.” गोळवलकरांचे शब्द हे भाजपसाठी संविधानासारखेच आहेत कारण ते अखेर रास्वसंघाचे अपत्य आहे. गोळवलकर धर्म कशाला म्हणतात हे समजून घेऊ. त्यांच्या दृष्टीने चातुर्वर्ण्याला समर्थन देणाऱ्या मूठभर हिंदूंचा धर्म तोच धर्म आहे. अनेकविध परंपरा पाळणाऱ्या फार मोठ्या हिंदू समाजाशी त्यांना देणेघेणे नाही. अशा अगदी लहानशा हिंदू गटाकडे धर्माची मशाल सोपवण्यात येत असेल तर ते नैतिकदृष्ट्या कसे काय समर्थनीय ठरू शकते? यावर प्रश्न विचारले गेले पाहिजेत. आणि संपूर्ण धर्माची व्याख्या जर गोळवलकर काय म्हणतात याच एका आधारावर होणार असेल तर मग आपल्या संविधानाने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचे काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय, धार्मिक स्वातंत्र्याचे काय? चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये जो हिंदू समाज शूद्र वर्णात गणला गेला होता, त्यांना पुन्हा एकदा शूद्रत्वात ढकलले जाईल काय हा प्रश्नही विचारायला हवा. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांची हर प्रकारे सेवा करणे हेच त्यांचे आय़ुष्य असणार आहे का? हे प्रश्न समोरासमोर विचारले गेले पाहिजेत.
गोळवलकर आपल्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात भारताची संघराज्य पद्धती गाडायची भाषा बोलतात. एकाच झटक्यात भाजपने भारताची संघराज्य पद्धती खिळखिळी करून टाकली- गाडण्याच्या जवळपासच नेली. जीएसटी कराच्या निमित्ताने हे करण्यात आले. वरवर पाहाता जीएसटी हा आर्थिक सुधारणेचा निर्णय वाटतो. पण त्याचा परिणाम काय झाला आहे? भारतातील राज्यांनी हा कर मान्य करून आपली आर्थिक स्वायत्तता केंद्राच्या अधीन करून टाकली आहे. आता अशी परिस्थिती आहे, की राज्यांनी आपली संपत्ती केंद्राच्या पायापाशी नेऊन ओतली आहे आणि त्यातला हिस्सा मिळावा म्हणून आता त्यांना रडतभेकत भिका मागाव्या लागत आहेत. या बाबतीत राज्यांची स्वायत्तता संपवून भाजपने गोळवलकरांची इच्छा पूर्ण करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. संघराज्य पद्धतीचा आत्मा असलेला संविधानातील सर्वात महत्त्वाचा भाग त्यांनी मिटवून टाकला आहे! आता आपल्या समोर ठाकला आहे हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याच्या सक्तीचा प्रश्न- कारण त्यानंतर येणार आहे संस्कृत भाषा राष्ट्रभाषा बनवण्याचा प्रयत्न. यातून अखेर विविधता संपवण्याचा हेतू आहे. एक राष्ट्र, एक भाषा, एक वंश, एक चालक… वगैरे वगैरे.
शिक्षणाच्या बाबतीतही तीच कथा आहे. रास्वसंघ नेहमीच आपला पंजा शिक्षण आणि इतिहासावर ठेवून असतो. शालेय शिक्षण हे तर द्वेषप्रसाराचे प्रमुख साधन. याचे एक छोटेसे पण स्पष्ट उदाहरण पहा. सहावीच्या एका पाठ्यपुस्तकातून एक वाक्य गाळले गेले- “टिपू सुलतानाने ब्रिटिशांविरुद्ध अनेक लढाया केल्या. फ्रेंचांच्या साथीने त्याने ब्रिटिशांना देशातून हाकलून काढण्याचे प्रयत्न केले.” हे वाक्य धड्यातून काढून टाकले गेले. शिवाय टिपू सुलतानाने केलेले रेशीमशेतीचे प्रयोग, जमीन सुधारणा, शेतकऱ्यांना छोटी कर्जे पुरवण्याचे प्रयत्न, नाण्यांची टांकसाळ उभारणे हे सारे काढून टाकण्यात आले. शिवाय सहावीच्या पुस्तकातील ‘इतर धर्मांचा उदय’ हा धडाही संघवाल्यांना सहन झाला नाही. त्यात जैन, बौद्ध हे नवीन धर्म असल्याचे लिहिण्यात आले होते. त्यात बदल करून कर्नाटक सरकारने जैन आणि बौद्ध हे हिंदू धर्मातीलच दोन पंथ असल्याचे वाक्य टाकून तो धडा आठवीसाठी टाकला. जैन, बौद्ध, शीख, लिंगायत हे भारतातील खरे स्वतंत्र धर्म आहेत हे वास्तव चातुर्वर्ण्यवाद्यांच्या घशात अडकते खरे.
पाठ्यपुस्तकांमधे असे प्रतिगामी बदल करणे तसे नवीन नाही. १९९८मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेवर आले तेव्हा मानव संसाधन मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांना शालेय अभ्यासक्रमात ‘पौरोहित्य आणि कर्मकांडे’ हा विषय घातला होता. त्यांच्याच काळात विज्ञानाधिष्ठित खगोलशास्त्राऐवजी ज्योतिषविद्येच्या शिक्षणावर त्यांनी भर दिला. वैदिक कर्मकांडात वर्णन केलेल्या पुत्रजन्मासाठी करण्याच्या पुत्रकामेष्टी यज्ञाबद्दलचीही माहिती देण्यात येऊ लागली. एकंदरीत अविवेकी श्रद्धा आणि मूर्खपणाच्या गोष्टी लहान मुलांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न होऊ लागला. रास्वसंघाच्या कार्यात विश्लेषण किंवा विचार करण्याची गरज नसल्याचे गोळवलकरांनी सांगितले होते ते आठवा. सत्तेत आल्यानंतर त्यांनी बालशिक्षणात हीच तत्त्वे रुजवण्यास सुरुवात केली.
अलिकडेच सीबीएसईने आपल्या सिलॅबसमधून अनेक विषय हटवले. यामध्ये दहावीच्या अभ्यासक्रमातून लोकशाही आणि विविधता, जागतिकीकरणाचा शेतीवरील परिणाम, जन आंदोलने, जातीयवाद या विषयांना वगळण्यात आले. अशा प्रकारची शैक्षणिक क्षेत्रातील ढवळाढवळ शक्य व्हावी म्हणूनच रास्वसंघाने आणखी एक पिल्लू पाळले आहे- ते म्हणजे ‘शिक्षा संस्कृती उत्थान न्यास’. या द्वारे ते सातत्याने एनसीईआरटीवर अभ्यासक्रमातून ‘माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी १९८४च्या शीख शिरकाणाबद्दल माफी मागितली’ किंवा ‘२००२च्या गुजरातमधील दंग्यांमध्ये २००० मुस्लिमांच्या हत्या झाल्या’ असे अडचणीचे संदर्भ वगळण्यासाठी दबाव टाकत असतात. त्यांचा भ्याड धूर्तपणा तो हाच आहे. कोण जाणे सध्या डोळ्यासमोर घडत असलेल्या घटना लपवण्याची शिकस्त करणारे हे लोक कुणालाच माहीत नसलेला अर्वाचीन भूतकाळ आणखी कोणकोणत्या रंगात रंगवतील… की अदृश्यच करतील?
हेच सुरू राहिले तर एक वेळ अशी येईल की आपल्याला हेडगेवार आणि सावरकर यांनीच स्वातंत्र्य मिळवून दिले असेच पाठ्यपुस्तकात वाचायला लागेल. हेडगेवारांनी भारताचा स्वातंत्र्यलढाच नाकारला होता आणि वीर म्हणवले गेलेल्या सावरकरांनी ब्रिटिश वसाहतवाद्यांशी, साम्राज्यवाद्यांशी तडजोड करून माफीपत्रे दिली होती. असे लोक भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकार असल्याची कहाणी लवकरच रचली जाईल आणि प्रसृतही होईल. गांधीहत्या करणाऱ्या गोडसेचा धडा तो हिंदूधर्माचा संरक्षक हीरो होता अशा प्रकारे शाळेत शिकवला जाईल. येत्या काळात रास्वसंघ आणि त्यांची पिलावळ कायकाय दिवस दाखवतील ते लवकरच उलगडत जाणार आहे!
आणखी किती काळ हे सांगत राहावे लागणार आहे? आर्य वंश हा सर्वश्रेष्ठ आहे एवढेच मान्य करून भागणार आहे? मूळनिवासींसाठी संघाने आदिवासी ही संज्ञा बदलली आणि त्यांना वनवासी म्हणून संबोधायला सुरुवात केली. त्यांच्याकडून सारे काही हिसकावून घेणारे हेच लोक आता आदिवासींची नावेही बदलायचा प्रयत्न करत आहेत. याचे कारण सोपे आहे, जोवर आदिवासी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखतील तोवर बाकीच्यांना आपण या भूमीत परकेच असल्याची भावना येत राहील. हाच धागा धरून सांगितले पाहिजे, राखीगढी येथे सापडलेल्या अवशेषांत सापडलेल्या डीएनए अभ्यासावरून हेच स्पष्ट झाले होते की सिंधु संस्कृतीच्या लोकांचे आर्य किंवा वैदिक लोकांशी काहीही गुणसूत्रीय साम्य नव्हते.
देवनूर महादेव यांच्या पुस्तकातील दुसरे प्रकरण- रास्वसंघाचे दस्तावेज काय सांगतात? https://bit.ly/3cBsBus
रास्वसंघाला याचा धक्का बसला, आणि मग त्यांनी सिंधु संस्कृतीला सरस्वती संस्कृती म्हणायला सुरुवात केली. पण आपण आर्य लोक बाहेरून आले हे मान्य केले तर? भारतभूमी ही येथे जन्मलेल्या प्रत्येकाला पोटाशी धरते. शिवाय भारतात द्रविड, आर्य, इस्लामिक आणि ख्रिश्चन अशा सर्व लोकांचे संबंध एकमेकांत अतिशय घट्ट विणले गेले आहेत. असे असताना रास्वसंघ इतका अस्वस्थ का आहे? संघ वर्तमानकाळात का जगू शकत नाही? आर्य वंशाच्या थोरवीचा जीवघेणा पगडा त्यांच्यावर आहे असे दिसते.
आपण श्रीराम सेनै किंवा बजरंग दलसारख्या संघटनांमधील तरुणांचा विचार करू. हिजाब, हलाल, मुस्लिम विक्रेत्यांवर बहिष्कार, अजान वगैरे गोष्टींवरून ते वातावरण तापवायच्या प्रयत्नांत सतत असतात ते का? हे सारे तरुण तळागाळातील पददलित समाजातले नाहीत का? त्यांच्यासाठी आपल्या देशात योग्य ते काम, नोकऱ्या निर्माण होणे हे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही का? पण रास्वसंघाच्या पोटी जन्मलेल्या भाजपला या कशाशीच कर्तव्य नाही. रास्वसंघ आणि भाजप यांच्या दृष्टीने शूद्रांनी त्यांचे पायदळ म्हणूनच राबले पाहिजे, त्यांना कायम असुरक्षित वाटले पाहिजे आणि त्यांना चातुर्वर्ण्याच्या नियमांनुसार नेहमीच सेवेकरी भूमिकेतच राहिले पाहिजे. कंत्राटी मजूर आणि त्यांची स्थिती वेगळी नसते. आधी झालेल्या जमीन हक्क सुधारणा कायद्यांची विल्हेवाट लावली की मग हे भूमीहीन शूद्र पुन्हा एकदा उच्चवर्णीयांची चाकरी करण्यात गुंतवता येतील, नाही का? सरकारी प्रशासनातील रिकाम्या जागा न भरल्याने आणि विविध सार्वजनिक उपक्रम खाजगी क्षेत्राच्या घशात घातल्याने नोकऱ्यांतील आरक्षणाचा प्रश्न आपोआप निकाली निघतो. आरक्षण मिळत असलेल्या समाजाला बेरोजगार करण्याचा हा प्रयत्न नाही काय? सन्माननीय नोकऱ्या गेल्या की शूद्रांना अपमानास्पद अशा खाजगी चाकऱ्या केल्याशिवाय पर्यायच रहाणार नाही. शिवाय एकीकडे केंद्र सरकार कामगारांचे हक्क दडपण्याचे प्रयत्न जारीने करतेच आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संशोधन संस्थेच्या अहवालानुसार २०१७ ते २०२२ या काळात भारतीय श्रमिकांमधील २ कोटी स्त्रिया नाहीशा झाल्या आहेत. हे सहज घडले, योगायोगाने घडले की स्त्रियांनी चूलमूल सांभाळण्यासाठी घरात रहावे या रास्वसंघाच्या छुप्या अजेंड्यानुसार घडले? असा संशय येणं, शंका येणं अगदी स्वाभाविक आहे.
या सर्वासोबतच सध्या शिक्षणाचे खाजगीकरण जोरात सुरू करण्यात आले आहे, सरकारी शिक्षणसंस्थांना खिळखिळे केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत मुलींच्या शिक्षणावर थेट परिणाम झाला आहे. काही परिणाम आपल्याला स्पष्ट समजत आहेत, तर काही भयंकर परिणामांचा अंदाजही येत नाही.
काय करायला हवे? आणि कसे? आपल्याकडे स्पष्ट उत्तरे आहेत का?
समजा, गावात चोर शिरले तर आपण काय करतो? आपण आपले संरक्षण कसे करतो?
प्रथम, सारे जागे होतो. तरुण आळीपाळीने रात्रीचे पहारे बसवून मोहल्ल्यांवाड्यांतून देखरेख ठेवू लागतात. गावातल्या बाया मिरचीपूड घेऊन सज्ज रहातात.
आपल्याला अशाच प्रकारचा जागता पहारा ठेवणं आवश्यक आहे. कारण हे चोर वेगवेगळ्या वेषांत येतात. उदाहरणार्थ ते मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने येतात. खोट्या बातम्या पसरवतात. आरत्या किंवा स्तोत्रे म्हणण्याचा घाट घालतात. कुठलातरी भावनिक प्रश्न गळाला लावून संपूर्ण समाजाला जाळ्यात ओढतात. यातून सुटकेचा एकच मार्ग आहे. त्यांचे कारस्थान उघडे पाडायचे. या साठी सतत सावधगिरी बाळगावी लागेल. शिवाय, निदान आता तरी, शहाणपणाचे बोल ऐकवू शकणाऱ्या लोकांनी मागे न हटता बोलले पाहिजे.
प्रेम, सहिष्णुता, न्याय या शब्दांचा गजर समाजातून वाढला पाहिजे.