मंगळावर वस्ती करण्याचे स्वप्न जर पाहायचे तर….

 

आनंद घैसास

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनीया पृथ्वीवर मानवजातीला आता वास्तव्यासाठी फार काळ राहिलेला नाहीजेमतेम शंभर वर्षेत्यानंतर काय? याची तजवीज आताच करावी लागेल असे एक विधान केले होते. ते बरेच गाजलेही. त्यावर उलट सुलट चर्चाही झाल्या. पण मानवजातीला खरंचहे जग सोडून जाण्याची वेळ आली तरत्याबद्दल विचार करणे आता गरजेचे वाटू लागले आहे. चंद्रावर आपल्याला जाता आले, तसेच मंगळावरही जाता येईल काय असा विचार गेली काही दशके चालू होताच. त्यासाठी नासाने मानवसहित मंगळयानाची आखणीही केलेली आहे. या मोहिमेवर जाणारे काही अंतराळवीरही सध्या प्रशिक्षण घेत आहेत. पण त्यातच आता यावसाहतीच्या विचाराची भर पडली आहे. खरे तर ही फार मोठी झेप होईल, ती झेपेल की नाही, हाच एक मुद्दा प्रत्येक वेळी पुढे येत आहे.

000000000000000

        मंगळावर वस्ती शक्य आहे का… हो किंवा नाही, असे याचे उत्तर चटकन देणे शक्य नाही. कारण, जर हो म्हटले, तर ते कसे… आणि नाही म्हटले, तर ते का नाही… हे पाहावे लागेल. मंगळाच्या आजपर्यंत झालेल्या संशोधनांच्या दृष्टीतून हा विचार करावा लागणार आहे. मंगळाची पृथ्वीवरून झालेली निरीक्षणे, अवकाशीय हबल स्पेस टेलिस्कोपने केलेली निरीक्षणे आणि आजपर्यंत झालेल्या अनेक मंगळ-मोहिमा, मंगळावर प्रत्यक्ष उतरून शोधकार्य करणारी वाहने, त्यातल्या प्रयोगशाळा, मंगळाभोवती आजही फिरणारे आपले अनेक उपग्रह, या सार्‍यांनी आजवर आपल्याला बरीच माहिती पुरवलेली आहे. त्या आधारे मंगळावर वस्ती करणे आपल्याला शक्य आहे की नाही, हा विचार करावा लागेल. पण, मंगळावर वस्ती करण्याचा विचार आधी आलाच कोठून ?

     मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले, त्याला आज 51 वर्षे झाली. पण, चंद्रावर वस्तीयोग्य पर्यावरण नाही. त्या तुलनेत मंगळ ग्रह अधिक आशादायी ठरतो. एकतर तो आपल्याला जवळ असणारा ग्रह आहे. आपल्यापासून सर्वात जवळ असतानाचे त्याचे अंतर सुमारे 5 कोटी 46 लाख कि.मी. असते. शुक्र ग्रह जरी आपल्याला मंगळापेक्षा जवळ असला, (शुक्राचे आपल्यापासून सर्वात जवळचे अंतर फक्त 2 कोटी 61 लाख किमी भरते) तरी तो सूर्यालाही जवळ आहे. मंगळाची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर आहे, तर शुक्राची पृथ्वीकक्षेच्या आत. त्यामुळेच शुक्राला मिळणारी सौरऊर्जाही जास्त प्रमाणात असते. पृथ्वीच्या वातावरणापेक्षा शुक्राच्या वातावरणात कितीतरी पटीने अधिक दाट, जास्त घनता असणार्‍या अवस्थेत कार्बन डाय ऑक्साइड आणि सल्फर डाय ऑक्साइड आहे. शुक्रावर सल्फर डाय ऑक्साइड आणि सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा पाऊस पडत असतो. शुक्रावरील हे पर्यावरण आपल्याला, मानवालाच काय, तर इतरही कोणत्या सजीवसृष्टीस राहण्यास अगदीच अयोग्य ठरणारे आहे. शिवाय, या अशा वातावरणामुळे शुक्रावर हरितगृह परिणाम होतो आणि त्यामुळे सूर्याकडून मिळालेली उष्णता तिथल्या वातावरणात पकडून ठेवली जाते. त्यामुळे त्याच्या वातावरणाचे तापमान प्रचंड (सुमारे 460 अंश सेल्सियस) आहे. अर्थातच, शुक्राची जमीनही एवढी तप्त आहे, की ती शिलारसानेच, लाव्हानेच बनलेली आहे, असे म्हणायला हवे. अशा काही प्रमाणात प्रवाही असणार्‍या शिलारसामुळे आणि सतत होणार्‍या ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे तिथली जमीन – तिचा उंचसखलपणा – सतत बदलत असतो. त्यामुळे कायम एकसंध राहणारा भौगोलिक नकाशा तिथे राहात नाही. शुक्रावर उतरलेले आपले यान, जे तिथल्या जमिनीपर्यंत पोहोचले होते, ते जेमतेम काही मिनिटे सुखरूप होते, आपल्या संपर्कात होते. पण, तासाभराच्या आतच ते तिथल्या उष्णतेमुळे चक्क वितळून गेले. त्यामुळे शुक्र ग्रह हा भविष्यातील मानव वसाहतीच्या विचारातून एकदमच बाद ठरतो.

     या परिस्थितीत मंगळ ग्रह मात्र सूर्यापासून सरासरी सुमारे 22 कोटी किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. त्यामुळे सूर्यापासून वस्ती करण्यायोग्य एवढ्या अंतरावर मंगळ आहे. बुध किंवा शुक्रासारखा तो सूर्याच्या फार जवळ नाही किंवा गुरुसारखा फार दूरही नाही. अधिक दूर असणार्‍या ग्रहांकडे सूर्याचा प्रकाश आणि उष्णता पुरेशी न पोहोचल्यामुळे ते ग्रह बर्फाळ थंड आहेत. मंगळाला वातावरणही आहे. आपल्या चंद्रासारखा किंवा सूर्यापासून सर्वात जवळ असणार्‍या बुधासारखा तो वातावरणरहित नाही. अर्थात, मंगळाचे वातावरण पृथ्वीच्या तुलनेत बरेच विरळ आहे, हे ही खरे. मंगळाचा पृष्ठभाग पृथ्वीवरच्या जमिनीसारखाच आहे, त्यावर दगड, माती, डोंगर, दर्‍या आहेत आणि ही माती बर्‍याच प्रमाणात लोहयुक्त आहे, (मंगळाचा लालसर रंग हा या लोहाच्या क्षारांमुळेच, गंजामुळेच आलेला आहे) ही आणखी एक जमेची बाब आहे.

     मंगळावर वस्ती करणे ही कल्पना लोकांच्या प्रथम मनात आली, ती एकोणिसाव्या शतकात. या शतकात दुर्बिणींमधून केलेल्या निरीक्षणांमधून मंगळावर कालव्यांसारख्या दिसणार्‍या रचना दिसल्या. त्यावरून मंगळावर कोणीतरी परग्रहवासी राहत असावेत आणि त्यांनी त्यांच्या वसाहतींना पाणीपुरवठा करणारे हे प्रचंड आकाराचे कालवे मुद्दाम खणले असावेत. कदाचित आपल्याहून प्रगत प्राण्यांची तेथे वसाहत असावी, अशी कल्पना त्या काळात केली गेली. ही मूळ कल्पना पर्सिवल लॉवेल या एका मंगळनिरीक्षकाचीच होती. त्यात भर पडली ब्रिटिश लेखक एच.जी. वेल्स यांच्या ‘वॉर ऑफ द वर्ल्डस’ या 1898 च्या विज्ञान कादंबरीने. त्यात परग्रहवासी ‘मंगळ्ये’, जे अस्वलाच्या आकाराचे, करड्या काळ्या रंगाचे, तेलकट शरीराचे, दोन गडद मोठे डोळे असणारे, ओठ नसलेले, बाणाच्या टोकासारखी तिरपी फट म्हणजेच तोंड असणारे आणि तोंडाजवळून दोन गठ्ठ्यांमध्ये विचित्र पारंब्यांसारखे पाय बाहेर पडलेले हे परग्रहवासी, त्यांच्या त्रिपाद आक्रमक सैनिकांसारख्या प्राण्यांच्या साहाय्याने, उष्ण किरणांचा मारा करणार्‍या हत्यारांचा वापर करून लंडनवर आक्रमण करतात आणि तेथून हळूहळू सार्‍या पृथ्वीवर ताबा मिळवतात, अशी ती कथा होती. ही कथा त्याकाळच्या ब्रिटिश साम्राज्यवादावरच्या हल्ल्यासंबंधित असल्याने असावी कदाचित, पण फारच लोकप्रिय झाली. खरे तर, आजपर्यंत ती लोकप्रिय आहे. त्या कथेवरून अनेक कादंबर्‍या, चित्रपट, टी.व्ही. मालिका तयार झाल्या. त्यामुळे सगळ्यांचेच मंगळाबद्दलचे कुतूहल वाढले. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या अणुविध्वंसातून, समजा पृथ्वीवर काही संकट आले, तर मंगळावर जाऊन राहाता येईल काय? असा विचार बळावला. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या कालावधीत अवकाशमोहिमांची तर स्पर्धाच सुरू झाली होती. त्यातच मग मंगळावर सजीवसृष्टी आहे काय? असे संशोधन अवकाशयानांच्या मंगळ शोधसफरींमधून सुरू झाले.

     मंगळ ग्रह एकूणच पृथ्वीपेक्षा लहान आकाराचा आहे. मंगळाचा व्यास फक्त 6,800 किमी आहे, म्हणजे पृथ्वीच्या त्रिज्येएवढा. त्यामुळेच पृथ्वीच्या आकारमानाएवढ्या जागेत एकूण 6 मंगळ मावतील! मंगळाचे वस्तुमानही कमी आहे. पृथ्वी 5.9 ÷ 1024 किलोग्रॅम तर मंगळ 6.4 ÷ 1023 किलोग्रॅम. म्हणजे, मंगळ पृथ्वीच्या फक्त 10% च भरतो. मंगळाची जमीन, म्हणजे संपूर्ण पृष्ठफळ (गोलाकारावरील संपूर्ण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ) हे पृथ्वीच्या फक्त 28% भरते. पृथ्वीवरचे सारे महासागर वगळून फक्त खंडांची जमीन जेवढी आहे, तेवढा पूर्ण मंगळ आहे. शिवाय, मंगळाची घनताही पृथ्वीच्या तुलनेत फक्त 71 % आहे.

     काही भौतिक मापनांच्या परिणामांचाही विचार करावा लागेल. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मानाने मंगळाचे गुरुत्वीय त्वरण त्याच्या पृष्ठभागावरील वस्तूवर कमी असणार आहे. पृथ्वीवर उंचावरून खाली पडणारी वस्तू साधारणत: प्रत्येक सेकंदाला 9.8 मीटर (सुमारे 10 मीटर) या गुरुत्वीय त्वरणाने खाली पडत असते. तीच वस्तू मंगळावर मात्र बरीच सावकाश म्हणजे प्रत्येक सेकंदाला फक्त 4 मीटर एवढ्याच गुरुत्वीय त्वरणाने खाली पडेल. तसेच, या कमी गुरुत्वीय त्वरणामुळे, मंगळावर आपण मारलेली लांब उडी पृथ्वीच्या सुमारे दुप्पट किंवा अडीचपट लांबही जाईल! आपण धावताना टाकलेल्या ढांगा दुप्पट अंतरावर लांब जाऊन पडताहेत अशी जरा कल्पना करा…

     समजा, आपला विराट कोहली किंवा रोहित शर्मा मंगळावर 20-20 क्रिकेट खेळतायत. त्यांनी मारलेली सिक्सर तिथे दुपटीने उंच आणि त्यामुळेच सुमारे तिपटीने लांब जाऊन पडेल! गंमत म्हणजे तिथली धावपट्टी आणि बाऊंड्रीची रेषाही या सार्‍याचा विचार करूनच ठरवावी लागेल… पण, पृथ्वीवर जेवढा उंच जातो, त्यापेक्षा उंचावर जाणारा चेंडू, खाली येताना मात्र सावकाश खाली पडणार आहे! मग त्याचा कॅच घेणे सहज शक्य होईल का? आणि हे सर्व क्रिकेटचा गणवेश, हेल्मेट, पॅड्स नव्हे, तर अंतराळवीरांचा पोषाख घालून आणि ऑक्सिजनची नळकांडी पाठीवर वागवत खेळायला लागेल ते वेगळेच…!

     स्वप्नरंजन राहू दे, पण रोजच्या जीवनात याचा परिणाम काय असेल? कारण मंगळावर गुरुत्वीय त्वरण कमी असल्याने पृथ्वीवर ज्या माणसाचे वजन 80 किलो असेल, त्याचे वजन तिथे फक्त 28 किलोच भरेल. अशा वेळी त्याच्या एकूण हालचालींवर त्याचा काय परिणाम होईल? पृथ्वीच्या एक त्रितियांशच खेच सतत अनुभवास येत असल्याने तिथे स्नायूंच्या स्थितिस्थापक बलावर, तन्यतेवर, काय परिणाम होईल? जर मानवांची वस्ती तिथे होणार असेल, तर तिथे जन्माला येणार्‍या अर्भकावर, तो गर्भावस्थेत असताना काय परिणाम होतील? त्याची हाडे, स्नायू पृथ्वीवर जसे वाढतात, तसेच तयार होतील की, त्यांच्यात मुळातच काही, म्हणजे काही मूलभूत फरक असेल? कारण, सध्या अंतराळात सूक्ष्मगुरुत्व अवस्थेत (अंतराळ स्थानकात) तीन चार महिने राहून परत पृथ्वीवर आलेल्या अंतराळवीरांच्या हाडांना ठिसूळपणा येतो, स्नायूंना शिथिलता येते. ते पृथ्वीवर परत आल्यावर त्यांना पूर्ववत चालते बोलते होण्यासाठी महिनाभर व्यायाम घ्यावा लागतो. मंगळावर राहायला जाताना याचाही विचार करावा लागणार आहे.

     मंगळावर जर कायमस्वरूपी वस्ती करायची असेल, तर आपल्याला लागणारे अन्न तिथल्या पर्यावरणात तयार करता येणे गरजेचे आहे. अर्थात, त्यासाठी मंगळावरच वनस्पतींची वाढ होणे, शेती, तीही फक्त धान्यच नाही, तर पालेभाज्या, फळभाज्या, रसाळ आणि गरांची फळे, यांचीही वाढ होणे गरजेचे आहे. पाणी असेल, तरच ते शक्य होईल. शिवाय, जमीनही किती सुपीक असेल, तेही पाहावे लागणार आहे. मंगळाच्या जमिनीत मुळात सेंद्रिय पदार्थ आहेत की नाहीत, हे सुद्धा एक कोडे आहे. पण, सध्यातरी असे लक्षात आले आहे, की मंगळावरचे वातावरण काही वनस्पती वाढीसाठी पोषक नाही. पृथ्वीच्या वातावरणाच्या तुलनेत मंगळाचे वातावरण 100 पट विरळ आहे. त्यात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण सर्वात जास्त आहे. अगदी थोड्या प्रमाणात नायट्रोजन, अरगॉन आणि पाण्याची वाफ आहे. ऑक्सिजनचे प्रमाण तर या हवेत जवळजवळ नाहीच्याच बरोबर आहे. त्यामुळे आपल्या सामान्य श्वसनासाठी तर ते उपयोगीच नाही. मंगळावर समुद्र, महासागर, नद्या, सरोवरे असे काही नाही. मंगळावर जी मोठमोठी विवरे आहेत, त्याच्या तळाशी पाणी असण्याचा अंदाजही आता खोटा ठरला आहे. मंगळाच्या काही सखल भागातल्या जमिनीखाली बर्फाचा थर आहे, असे अनुमान आहे. पण, मंगळावर पाऊस पडतोय किंवा बर्फ पडतोय, असे होत नाही. मंगळाच्या दोन्ही ध्रुवांवर जेव्हा तिथे हिवाळा असतो, तेव्हा बर्‍याच मोठ्या प्रमाणात बर्फ जमून मंगळाने जणू एखादी पांढरी टोपी घातली आहे, असे पृथ्वीवरून दिसते. पण, तो बर्फही पाण्याचा नसून मुख्यत: कार्बन डाय ऑक्साइडचा बर्फ आहे. आईसक्रीम ठेवायच्या फ्रीजरमधल्या ‘ड्राय-आइस’ सारखा. पण, या बर्फाचा वनस्पतींच्या वाढीसाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठीही उपयोग नाही.

     मंगळावर उन्हाळा आणि हिवाळा असतो. म्हणजेच, तिथे ऋतू होतात. मंगळ सूर्यापासून पृथ्वीपेक्षा दूर आहे. त्यामुळे त्याला मिळणारी सौरऊर्जा पृथ्वीच्या तुलनेत फक्त 43 % मिळते. मंगळ स्वत:भोवती पृथ्वीसारखाच 24 तास 37 मिनिटात एक फेरी मारतो. म्हणजे, त्याचा दिवस तर जवळजवळ पृथ्वीएवढाच आहे. पण, सूर्याभोवती मात्र तो 687 पृथ्वीदिवसात एक फेरी मारतो. म्हणजे, मंगळाचे एक वर्ष पृथ्वीच्या दोन वर्षांएवढे होते. तसेच, मंगळाचा अक्षही (सूर्यसापेक्ष कक्षाप्रतलात) पृथ्वीपेक्षा थोडा जास्त म्हणजे 25.2 अंशाने तिरका आहे. (पृथ्वीचा तिरकेपणा 23.5 अंश आहे). त्यामुळे तिथे एका गोलार्धात होणारा उन्हाळा आपल्या एका वर्षभराचा तर हिवाळाही वर्षभराचा असतो, असे ढोबळपणे म्हणायला हरकत नाही. पण, याचा परिणाम म्हणजे तिथले उन्हाळ्यातले विषुववृत्ताशी सर्वाधिक नोंदलेले तापमान जरी 30 अंश सेल्शियस आणि हिवाळ्यातले ध्रुवप्रदेशातले सर्वात कमी तापमान उणे 140 अंश असले, तरी एकूण ग्रहावरचे सरासरी तापमान उणे 55 अंश सेल्शियस होते. आपल्याला माहीत आहेच की, शून्य अंशाला पाण्याचे बर्फ होते. पण, मंगळाच्या वातावरणाची घनताही गृहीत धरली तर असे लक्षात येईल की, तिथे पाणी हे द्रवरूपात राहणेच फार कठीण आहे. पाणी तिथे बर्फाच्या रूपात राहील किंवा त्याची या विरळ वातावरणात जराशा उष्णतेने लगेच वाफच तयार होईल. पण, मग मंगळावर शेती कशी शक्य होईल ?

     मंगळावरच्या जमिनीत वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा सेंद्रिय पदार्थ नगण्यच आहे. त्यामुळे मंगळाची जमीन म्हणजे ओसाड, लहानमोठे दगड विखुरलेले रेताड पठार आहे. हे सारे काही मंगळावर सध्यातरी वस्ती करणे शक्य नसल्याचे जरी सूचक ठरत असले, तरी आपण अजूनही आशावादी आहोत.

     प्रचंड आकाराच्या, हवेने भरलेल्या काचेच्या पारदर्शक घुमटाखाली वसलेली शहरे मंगळावर तयार करता येतील काय? किंवा मंगळाच्या जमिनीखालच्या गुहांमध्ये बर्फातून मिळवलेल्या पाण्यावर वनस्पती वाढवून, त्यातून अन्न मिळवता येईल का? श्वसनास आवश्यक तेवढा ऑक्सिजन त्या वनस्पतींपासून मिळवता येईल का? ध्रुवप्रदेशात असलेल्या बर्फातून पाणी मिळवता येईल का? सौरऊर्जेने पुरेशी वीजनिर्मिती करता येईल का? अशा संकल्पना पुढे येत आहेत. तसेच, मंगळावर जाण्यासाठी कोणत्या प्रकारची याने बनवावी लागतील? त्यावर संशोधन आणि त्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचा विकास, ही सध्या जगभरातील वैज्ञानिकांपुढील आव्हाने आहेत.

     सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनी ‘या पृथ्वीवर मानवजातीला आता वास्तव्यासाठी फार काळ राहिलेला नाही…जेमतेम शंभर वर्षे… त्यानंतर काय? याची तजवीज आताच करावी लागेल,’ असे एक विधान केले होते. ते बरेच गाजलेही. त्यावर उलट सुलट चर्चाही झाल्या. पण, मानवजातीला खरंच ‘हे जग सोडून जाण्याची’ वेळ आली तर… त्याबद्दल विचार करणे आता गरजेचे वाटू लागले आहे.

     चंद्रावर आपल्याला जाता आले, तसेच मंगळावरही जाता येईल काय, असा विचार गेली काही दशके चालू होताच. त्यासाठी नासाने मानवसहित मंगळयानाची आखणीही केलेली आहे. या मोहिमेवर जाणारे काही अंतराळवीरही सध्या प्रशिक्षण घेत आहेत. पण, त्यातच आता या ‘वसाहतीच्या’ विचाराची भर पडली आहे. खरे तर, ही फार मोठी झेप होईल, ती झेपेल की नाही, हाच एक मुद्दा प्रत्येक वेळी पुढे येत आहे.

     चंद्र आपल्यापासून बराच लांब, म्हणजे सरासरी तीन लाख शहाऐंशी हजार किलोमीटर अंतरावर आहे. शिवाय, हे अंतर काही सरळ रेषेत कापायचे नसते. यानाला पुरेसा वेग प्राप्त होण्यासाठी आधी पृथ्वीभोवती निदान चार फेर्‍या माराव्या लागतात. त्यामुळे कक्षेचे अंतर आणि वेग दोन्हीही वाढवता येते. या कक्षेत यान जेव्हा सर्वात लांबवर पोहोचते, तेव्हा ठराविक दिशेने रॉकेट डागून चंद्राकडे मार्गक्रमण केले जाते. चंद्राजवळ पोहोचल्यावर, तिथेही वेग कमी करत, चंद्राभोवती एक यान फिरत ठेवले जाते. तर, दुसर्‍या छोट्या यानाने खाली चंद्रावर उतरायचे असते आणि परत वर येताना फिरत ठेवलेल्या यानाला जोडून घ्यायचे. मग या जोडयानाची पृथ्वीकडे येण्याची परतीची मार्गक्रमणा सुरू करायची.

     चंद्रप्रवासात अंतराळवीरांना सारे काही एका खुर्चीत बसूनच करावे लागायचे. यात उठून फिरायला फारशी जागाच नव्हती. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात, आय.एस.एस. मध्ये मात्र थोडी हालचाल करायला जागा असते. पण, तरी एका माणसाला दोन्ही हात पसरून उभे राहता येईल एवढ्या परिघाच्या आणि सुमारे 136 फूट लांबीच्या बोगद्यासारख्या जागेत सहा माणसांनी, सहा महिने राहायचे असते. हे अवकाश स्थानक पृथ्वीभोवती 90 मिनिटात एक फेरी मारते. अर्थात, येथे दिवस-रात्रीचा संदर्भच उरत नाही. कारण दर 45 मिनिटांनी सूर्योदय-सूर्यास्त होत राहतात !

     पण, मंगळयानासाठी तसे नाही होणार. ते एकदा पृथ्वीच्या कक्षेतून सुटले की, स्वत:भोवती सावकाश गिरक्या मारत, फिरत, चक्क सूर्याच्या दिशेने आधी निघणार. पृथ्वीवरून सूर्याकडे जात (सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा उठवत) स्वत:चा वेग वाढवणार. या वाढलेल्या वेगाने सूर्याला जवळून वळसा घालून पुढे जाणार. हे असे करायला लागते कारण आपल्याला कमीतकमी इंधनात जास्तीत जास्त संवेग मिळवायचा असतो. पृथ्वीवरून मंगळाकडे, म्हणजे ग्रहमालेच्या मांडणीत सूर्याच्या विरुद्ध दिशेला, बाहेरच्या दिशेला जायचे झाले, तर आधी पृथ्वीच्या आणि नंतर सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जावे लागेल. त्यासाठी फारच जास्त आणि सतत सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात अग्निबाण प्रज्वलित ठेवावा लागेल. पण, फक्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटण्यासाठीच मुख्य अग्निबाण वापरायचे, नंतरचे अंतर मिळालेल्या संवेगाने कापायचे. अशा वेळी रॉकेट फक्त दिशा दुरुस्तीसाठी डागायचे. बाकी वेळी, वेळ पडल्यास शुक्रासारख्या ग्रहाचीही, त्याच्या गुरुत्वीय खेचीची मदत घेत, यानाचा वेग वाढवत न्यायचा. मग सूर्याकडे झेपावत त्या वाढत्या वेगानेच यानाला एखाद्या गोफणीतून दगड दूर भिरकवावा तसे, सूर्याभोवती वळसा घेत स्वत:ला भिरकावून घ्यायचे. या प्रकाराने प्राप्त झालेला संवेग यानाला सूर्यमालेतील बाह्यग्रहांपर्यंत जाण्यासाठी उपयुक्त ठरतो. या प्रकारे मंगळाकडे जायचे, तर या सार्‍या प्रवासाला सुमारे 300 दिवस लागणार. (आपल्या मंगळयानाला 1 महिना पृथ्वीप्रदक्षिणा, 298 दिवसांचा प्रत्यक्ष मंगळापर्यंतचा प्रवास आणि पुढे 15 दिवस यान मंगळाच्या कक्षेत स्थापन करण्यास लागले होते) पण मंगळाकडे मानवाला नेणारे यान काही या मंगळयानाच्या उपग्रहाएवढे छोटे असणार नाही. तसेच, ते आय.एस.एस. या अवकाश स्थानकाएवढे मोठेही नक्कीच ठेवता येणार नाही. किती माणसांना त्यात राहण्याची व्यवस्था करायची ते ठरवायला हवे. (आत्ता तरी पहिल्या मंगळ मोहिमेत फक्त दोन अंतराळवीर जे पती-पत्नी आहेत, ते असतील अशी योजना आहे) कारण मंगळाकडे जायला एक वर्ष, परत यायला एक वर्ष, पृथ्वी प्रदक्षिणेचे काही दिवस, मंगळप्रदक्षिणेचे काही दिवस…म्हणजे किमान सव्वादोन किंवा अडीच वर्षे तरी कमीतकमी लागतील असा अंदाज आहे…जर मानवासहित अशी पहिली मंगळ-सफर करायची असेल तर.

     सध्या मंगळावर जाण्यासाठी निवडलेल्या (सुमारे 20) अंतराळवीरांची नुसती शारीरिक नाही, तर मानसिकही तयारी करणे चालू आहे. कारण मंगळ-सफरीचा कालावधीच मोठा असणार आहे. यात एकमेकांशी कसे वागायचे, समजुतीने कसे राहायचे, समजा जगाशी संपर्क तुटला, तर काय करायचे, याचेही त्यात प्रशिक्षण होते. या प्रशिक्षणांचे नाव ‘हाय सीज प्रकल्प’ असे आहे. कारण, यात एक उंच डोंगरपठार आणि एक खोल समुद्र या दोहोंचा या प्रशिक्षणासाठी वापर केला जात आहे. ही प्रशिक्षणे हवाई बेटांवरील ‘मौना लोआ’ या ज्वालामुखी असलेल्या एका पर्वतावर, समुद्रसपाटीपासून 8,200 फूट उंच ठिकाणी चालू आहेत. या परिसराचे वातावरण मंगळाशी जुळणारे आहे. फक्त मंगळासारखा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम मात्र अर्थातच येथे नाही. पण, या उजाड वाळवंटासारख्या पर्यावरणीय स्थितीशी कसा मुकाबला करायचा, याचे इथे प्रशिक्षण चालते. तर दुसरी जागा आहे फ्लोरिडाच्या जवळ अटलांटिक महासागराच्या तळाशी, सुमारे 62 फूट खोलवर. येथे अंतराळवीरांचा पोषाख चढवून पाणबुड्यासारखे खाली गेल्याने अवकाशातल्या सूक्ष्मगुरुत्वासारखी परिस्थिती निर्माण होते. पाण्याचे उद्धरणाचे त्वरण यासाठी मदतीस येते. या स्थितीत अंतराळवीरांचा पोषाख अंगावर असताना, कामे कशी करायची याचा सराव येथे केला जातो. मग ते काम म्हणजे एखादा दगडाचा नमुना गोळा करून त्याचे विश्लेषण करणे असो किंवा एखादी तांत्रिक बिघाड झालेली वस्तू दुरुस्त करणे असो. शिवाय येथे असताना पृथ्वीवरील कुटुंबाशी कोणताही संपर्क राहणार नाही, हाही एक प्रशिक्षणाचाच भाग. यातल्या एका प्रशिक्षणात सलग 141 दिवस या अंतराळवीरांना पाण्याखाली एकांतात ठेवण्यात आले होते ! त्यात लक्षात आले की, अगदी थोडी तहान लागणे, भूक कमी होणे यापासून, झोप नीट न लागणे या बाबींचाही त्यांची मानसिकता बिघडण्यात फार मोठा वाटा आहे. या गोष्टी लहानसहान वाटतात, पण एका प्रशिक्षणार्थीची या कार्यक्रमादरम्यान आजी वारली, ते कळल्यावर त्याला रडू आवरले नाही. बापरे! अंतराळात राहाताना तर रडणे ही गोष्ट अजिबात चालत नाही. त्याचे कारणच वेगळे आहे. अंतराळात सूक्ष्मगुरुत्वामुळे वस्तूंना वजन नसते. त्यामुळे एखादी वस्तू खाली पडणे ही गोष्ट तिथे घडतच नाही. समजा तुम्ही ग्लासमधे हातात पाणी घेतले आहे. ग्लास उलटा केला तरी त्यातून पाणी कुठेही जाणार नाही. त्यामुळे डोळ्यात पाणी आले, तर ते अंगावर अंतराळवीरांचा पोषाख असल्याने पुसता येणार नाही, ही एक गोष्ट, शिवाय डोळ्यातले पाणी डोळ्यामधेच साचून राहील. ओघळणारच नाही ! या आपल्याच अश्रूंमुळे समोरचे काहीही दिसणेच बंद होईल ! त्यामुळे अशा भावना उद्दीपित करणार्‍या बातम्या अंतराळवीरांपर्यंत पोहचू द्यायच्या की नाही, असा मोठाच प्रश्न आता निर्माण झाला आहे.

     या अवकाश प्रवासात, कधीही तळपता सूर्य दिसणार नाही. कधीही तोंडावर वार्‍याची साधी झुळूक येणार नाही… यानात अनेक यंत्र, संगणक सतत चालू राहणार. त्यांचा कायम आवाज येत राहणार. शिवाय, त्या आवाजांकडे, लुकलुकणार्‍या दर्शक दिव्यांकडे, यंत्रांच्या मोजमापे दर्शविणार्‍या आकड्यांकडे सतत लक्ष देणेही आवश्यक आहे. नेहमीचे खाणे नाही, तर प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधे साठवलेले, पूर्ण कोरडे केलेले, थंड अन्नच, त्यात गरम पाणी घालून, पिशवीला असलेल्या नळीने चोखत खावे लागणार… शिवाय रोज आंघोळ नाही. छोट्याशा ओल्या टॉवेलने अंग पुसण्यावरच समाधान मानावे लागणार.

   सोबत नेलेले पाणी मर्यादित असल्याने वापरलेल्या पाण्याला (अगदी मलमूत्रातील पाण्यालाही) शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करणे अपरिहार्य. यातल्या एका प्रशिक्षणार्थी अंतराळवीराचे, जो आधी डॉक्टरच आहे, त्याचे म्हणणे पडले की, अशा मोहिमेत सामील होण्याअगोदर, अपेंडिक्सही शस्त्रक्रिया करून काढून टाकणे योग्य होईल. कारण त्याची व्याधी कधी उद्भवेल, हे सांगता येत नाही आणि त्यावर प्रवासात किंवा प्रत्यक्ष मंगळावर असताना शस्त्रक्रिया करणे, हे सद्यपरिस्थितीत तरी शक्य नाही. तसेच, सगळे दात निरोगी असलेच पाहिजेत, दाढदुखी ही सुद्धा मोठी पंचईत असेल… तसेच रोजच्या रोज दाढी मिशा, नखे वाढणे हा पण अवकाश जीवनात एक फार मोठा त्रासदायक भाग आहे ! कल्पना करा कापलेले केस सगळ्या यानभर तरंगत पसरले आहेत !

     ‘आय.एस.एस.’ अवकाश स्थानकात राहून आलेल्या अंतराळवीरांवर जे शारीरिक परिणाम झालेले पाहिले, तर त्यात पाच मुख्य गोष्टी दिसून आल्या.

  1. गुरुत्वाकर्षणाचे त्वरण नसल्याने, शरीराला, विशेषत: मानेवरील डोक्याला सतत टेकू आणि आधार देण्याची गरज अवकाशयानात उरत नाही. त्यामुळे मणक्यांवरील दाब नाहीसा होतो. प्रत्येक मणक्यालाही वजन नसते. म्हणून त्यांच्यामधल्या स्नायूबंधांना शिथिलता येते आणि त्यामुळे मणक्यातले अंतर वाढते. पाठीचा कणा सैल पडतो…!

  2. अवकाशात पोहोचल्यावर काही दिवसातच शरीराचा वरचा भाग, छाती, दंड, हात, मान आणि विशेषत: चेहरा सुजल्यासारखा होतो. पृथ्वीवर शरीरातील रक्त सतत पायाकडे खाली जात असते. ते सतत वर मेंदूकडे, शरीराच्या वरच्या भागात, पाठवण्याचे काम हृदय करत असते. आपल्या शरीराची रचनाच तशी असते. पण, अंतराळात सूक्ष्मगुरुत्वामधे रक्ताचे वितरण शरीरात आपोआपच समानतेने होत असल्याने, शरीररचनेनुसार हृदयाकडून शरिराच्या वरच्या भागात रक्त अधिक प्रमाणात पोहोचते. तर पायाकडे आपोआपच कमी प्रमाणात पोहोचते. त्यामुळे पायाचे स्नायू कणखरपणा आणि ताण हरवून बसतात. कमी रक्तपुरवठ्यामुळे स्नायू आपली नेहमीची सुदृढता गमावतात, सैल पडतात. त्यामुळे पाय हडकतात, तर चेहरा अवाजवी रक्तप्रवाह मिळाल्याने सुजतो.

  3. सूक्ष्मगुरुत्वात जराशी हालचालही संपूर्ण शरीरालाच त्या दिशेला वाहवत नेते. पृथ्वीवर वस्तू खाली पडते. पाणी, पदार्थ सांडतात, कलंडतात, त्यामुळे वस्तू खाली ठेवण्याची आपल्याला नकळत सवय झालेली असते. पण, अंतराळात वस्तूंना वजन नसते. त्या असतील तिथेच तरंगत राहतात. अवकाशात काही काळ राहिल्यावर याचीच मग तिथे सवय होते. पृथ्वीवर परत खाली आल्यावर मात्र अवकाशातल्याप्रमाणे नकळत हातातून वस्तू सोडून दिल्या जातात! पण मग त्या पडतात…

  4. संपूर्ण शरीराला तोलण्याचे कामच सूक्ष्मगुरुत्वात राहात नाही. तसेच, हाडांनाही तिथे वजन उरत नाही. परिणामी हाडे ठिसूळ होतात, त्यांची घनता दर महिन्याला सरासरी एक टक्क्याने कमी होते. हाडांच्या सच्च्छिद्रपणात वाढ होते. हा परिणाम दीर्घकाळ टिकणारा ठरू शकतो…

  5. अवकाशयानात वजनरहित अवस्था असल्याने, वर-खाली आडवे-उभे असे काहीच नसते. त्यामुळे अवकाशयानात गादीवर पडून झोपणे हे तर होत नाहीच, कारण शरीरालाही वजन नसते. त्यामुळे स्वत:ला झोपण्याच्या गादीच्या पिशवीत (ही यानाच्या कोणत्याही भिंतीशी असू शकते) पट्ट्यांनी बांधून घेऊन झोपावे लागते.

     या सार्‍या गोष्टी विचारात घेतल्या, तर एक मोठा मुद्दा समोर येतो की, जर आपल्याला अवकाशात किंवा दुसर्‍या ग्रहावर वंश वाढवायचा असेल तर? प्रजनन कसे होईल? वजनरहित अवस्थेत, बाळाची आईच्या पोटात कशी किती वाढ होईल, किंवा अवकाशात जन्माला आलेले बाळ पुढे कसे वाढेल, त्याच्या शरीररचनेतच मुळातच काही बदल असेल काय, सूक्ष्मगुरुत्वात बाळाच्या मेंदूची, हाडांची, स्नायूंची वाढ कशी होईल? आजतरी याचे उत्तर ‘माहीत नाही’ असेच आहे. पण, त्यादृष्टीने संशोधन करायलाच लागणार आहे. अवकाशातच जर एखाद्या स्त्रीला गरोदरपण आले, तर काय परिस्थिती होईल, याचाही मागोवा घेणे आवश्यक आहे. शिवाय, अवकाशात समागम शक्य आहे का आणि त्यातून प्रजनन संभव होऊ शकेल का, हा प्रश्नही अजून अनुत्तरित आहे…

     मंगळावर आपल्या वसाहतीचे स्वप्न पाहाणे, ही जेवढी सोपी कल्पनारम्य बाब आहे, तेवढीच त्याची प्रत्यक्षात पूर्तता होण्यासाठी चाललेले प्रयत्न ही मोठी मेहनत आणि कष्टप्रद बाब आहे, हेच यातून जाणून घ्यावे लागेल.

———————————

(लेखक हे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबईचे निवृत्त वैज्ञानिक अधिकारी आहेत.)

98672 19455