एकनाथराव हिरुळकर: सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्यभर झटलेला कार्यकर्ता

अ‍ॅड.किशोर देशपांडे

एकनाथराव हिरुळकर हे अमरावती शहरातील बहुपरिचित व्यक्तित्व त्यांच्या शंभरीत पदार्पण केल्यानंतर नुकतेच अनंतात विलीन झाले. शनिवार दि.चार जानेवारीला रात्री त्यांचे निधन झाले. हिरुळकरांच्या कार्याची वृत्तपत्रांनी जशी कधीच दखल घेतली नाही, तशीच त्यांच्या मृत्यूचीही घेतली नाही. ते स्वातंत्र्य सैनिक होते, स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी सत्याग्रह करून तुरुंगवासही भोगला होता. आणिबाणीच्या काळात जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली, तेव्हाही त्यांनी सत्याग्रह करून तुरुंगवास भोगला.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या गांधीवादी कार्यकर्त्यांना सत्तेच्या राजकारणापासून दूर राहून सामाजिक परिवर्तनाचे व रचनात्मक काम करावयाची इच्छा होती, त्यांनी अखिल भारतीय स्तरावर सर्व सेवा संघ नावाची संघटना निर्माण केली. विनोबा भावे यांची त्या संघटनेच्या निर्मितीत प्रेरणा होती. सर्व सेवा संघाच्या सदस्यांना लोकसेवक असे नाव होते. एकनाथराव हिरुळकर सर्व सेवा संघाचे सदस्य होऊन लोकसेवक झाले. सत्तेच्या राजकारणाकडे त्यांनी कधी ढुंकूनही पाहिले नाही. सर्व सेवा संघ किंवा महाराष्ट्र सर्वोदय मंडळात देखील ते कधीही पदाधिकारी झाले नाहीत, परंतु विनोबांनी सुरू केलेल्या भूदान, ग्रामदान चळवळीत स्थानिक पातळीवर ते नेहमी अग्रेसर राहिले. अमरावतीतल्या सर्व पक्षीय नेत्यांकडे त्यांचा वावर असायचा.

हिरुळकरांच्या आणि माझ्या वयात सुमारे २५ वर्षांचे अंतर होते. तरीही माझ्या बालपणापासून मला ते माझे एक मित्रच वाटायचे. एकनाथरावांचे मी अगदी लहान असल्यापासून आमच्या घरी जाणे-येणे असायचे. माझे वडील स्व. हरिहरराव हे स्वातंत्र्यसैनिक होते.  १९६० च्या दशकात ते गांधी स्मारक निधीचे या भागातील समन्वयक देखील होते. माझे सर्वात मोठे भाऊ आणि एकनाथराव यांनी अगदी विद्यार्थी दशेत स्वातंत्र्यचळवळीत सोबत भाग घेतला होता. तेव्हापासून हिरुळकरांचे आमच्या घराशी नाते जुळले होते. पुढे त्यांनी माझ्या वडिलांसोबत गांधी स्मारक निधीचे अमरावतीचे कार्यालय व वाचनालय देखील सांभाळले. कृषी विद्यापिठाच्या मागणीसाठी साठच्या दशकात अमरावतीला झालेल्या मोठ्या आंदोलनात सुद्धा एकनाथरावांनी हिरीरीने भाग घेतला होता. काँग्रेस, समाजबादी, साम्यवादी पक्षांच्या नेत्यांना व शहरातील अन्य मान्यवर पुढाऱ्यांना त्यांच्याबद्दल नेहमी आपुलकीची भावना असायची.

परंतु हिरुळकरांचे हृदय हे साने गुरुजींसारखे होते. लहान मुलांमध्ये ते पटकन मिसळायचे. मोठ्यांच्या बैठकीत मात्र बरेचसे गप्प बसून पण एकाग्रतेने चर्चा ऐकत राहायचे. मी हायस्कुलमध्ये असताना कधी कधी एकनाथराव अगदी सकाळी येऊन उठवायचे आणि बडनेरा रोडवर भोंदूंच्या बगीच्यापर्यंत (आता तिथे मानसरोवर हॉटेल आहे) फिरायला घेऊन जायचे. आमच्या सोबत आणखी दोन-तीन मुले असायची. फिरता-फिरता एकनाथराव आमच्याशी गप्पा करायचे आणि स्वातंत्र्य चळवळ, गांधी, नेहरू, विनोबा, भुदान, ग्रामदान इ. विषयांची आम्हांला माहिती देत राहायचे. त्यांचे एक वाक्य मला अजूनही आठवतेः-
” आपल्या देशातले चार बॅरिस्टर चार दिशांना तोंड करून, म्हणजे एकमेकांकडे पाठ करून उभे राहिले; त्यामुळे देशाची प्रगती थांबली. ते चार बॅरिस्टर म्हणजे १. बॅ. गांधी, २. बॅ. जीना, ३. बॅ. आंबेडकर, ४. बॅ. सावरकर !” – हिरूळकरांच्या मते या चार महापुरुषांनी संगनमताने व एकदिलाने काम केले असते तर देश अखंड राहिला असता आणि त्याची प्रगती झपाट्याने झाली असती.

मॅट्रिक झाल्यानंतर मी कॉलेजच्या शिक्षणासाठी नागपूरला गेलो. पण उन्हाळी सुटीत अमरावतीलाच असायचो. अशाच एका सुटीत एकनाथराव घरी आले आणि मला म्हणाले, आपण आजूबाजूच्या गावांमध्ये पदयात्रा काढू. मला वाटलं पदयात्रा म्हणजे त्यात अनेक लोक असतील, पण प्रत्यक्षात आम्ही दोघेच निघालो. अमरावतीवरून माहुली, यावली, शिराळा, देवरा, देवरी अशा आजूबाजूच्या सात-आठ गावांमध्ये आम्ही दोघेच पायी फिरून आलो. सकाळी उठून निघायचे, गावात पोहोचलो की कोणाच्याही घरात (ओळखीच्या अथवा अनोळखी) मुक्काम करायचा. दिवसभर इकडे-तिकडे फिरून गाव शिवार बघायचे, लोकांशी गप्पा करायच्या आणि सायंकाळी एकतर जाहीर सभा किंवा गुरूदेव सेवा मंडळातील प्रार्थनेनंतर हिरूळकरांचे भाषण असा कार्यक्रम असायचा. त्याकाळात ग्रामीण भागात आतिथ्याची भावना खूप प्रबळ होती, हे मला तेव्हा ठळक जाणवले. हिरुळकरांचे बोलणे भराभर स्वरूपाचे असल्यामुळे सर्व लोकांना ते कितपत समजते याची मला शंकाही वाटायची.

पुढे १९७१ ते १९८० च्या दरम्यान विद्यार्थी संघटनांचे व सामाजिक काम करणाऱ्या आम्हा अनेक तरूण मित्रांना हिरुळकरांनी मोठ्या आपुलकीने त्यांचे कार्यालय केवळ बैठकांसाठीच नव्हे तर काहींच्या निवासासाठी देखील उपलब्ध करून दिले आणि ते स्वतः उत्साहाने आमच्या कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होत असत. १९७५ साली इंदिरा गांधींच्या सरकारने आणिबाणी जाहीर करून सर्व वृत्तपत्रांवर व रेडिओवर सेन्सॉरशिप लादली. त्याकाळी मोबाईल नव्हतेच आणि लॅन्डलाईन फोनचाही तुटवडा असायचा. झेरॉक्स मशीन नव्हते. संगणक नव्हते त्यामुळे सोशल मीडिया नावाचा प्रकारही नव्हता. अशावेळी सरकारने दाबलेल्या बातम्या देशभरात एकमेकांना पोहोचविण्यासाठी टाईपरायटर व सायक्लोस्टाईल मशीनचा वापर करावा लागायचा. एकनाथराव हिरुळकरांनी एक सायक्लोस्टाईल मशीन मला उपलब्ध करून दिली. व तिचा उपयोग करून मी माझ्यापर्यंत पोहोचलेल्या बातम्यांचे संकलन करून अन्यत्र वाटप करत असे.

मला लवकरच मिसा कायद्याखाली अटक झाली. पुढे एकनाथराव व महाराष्ट्रातील इतर काही कार्यकर्ते दिल्लीला गेले व तिथे त्यांनी सत्याग्रह केल्यामुळे स्वाभाविकच त्यांनाही अटक झाली व अनेक महिने तिहार जेलमध्ये डांबण्यात आले. परंतु तुरुंगवास त्यांना नवीन नव्हता. स्वातंत्र्यचळवळीत देखील त्यांनी तुरुंगवास भोगला होता. माझी त्यांची शेवटची भेट ही १२-१३ वर्षांपूर्वी श्री बच्चु कडू यांनी सोफिया प्रकल्पाविरूद्ध खेड्यापाड्यात चालविलेल्या चळवळीच्या वेळी झाली होती. ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या अनेक मुलींना हिरुळकरांनी मायेचा व हक्काचा आधार दिला. आणि ते अशा सर्व तिसऱ्या पिढीच्या मुलामुलींचे “नाना” झाले. मी व्यवसायात शिरल्यानंतर मात्र माझा एकनाथरावांशी संपर्क राहिला नाही.

कोणाच्याही स्पर्धेत नसणे, साधेपणा, प्रामाणिकता व समाजाविषयीची तळमळ हे त्यांचे गुणविशेष आमच्या विद्यार्थी दशेत माझ्या सारख्या अनेक मुलांना व तरुणांना प्रभावित करायचे. घराचा त्याग करून ते कायम अविवाहित राहिले. स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळणारे मानधन ते होतकरू व गरजू मुला-मुलींना सहाय्य म्हणून खर्च करायचे.

एकनाथराव हिरुळकर यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, ही प्रार्थना !

(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ व छात्र संघर्ष युवा वाहिनीचे माजी राज्य संयोजक आहेत )

9881574954

Previous articleबहिरमची अत्यंत देखणी मूर्ती
Next articleविजय कुबडे:-अनासक्त, निरहंकारी व प्रेमळ मित्र!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here