बापमाणूस: प्रभाकरराव वैद्य

-अविनाश दुधे

“प्रभाकररावांना नशीब, दैव, पंचांग या गोष्टी मंजूर नाहीत. • आमच्या बाजूला देवीचं मंदिर आहे. मी तिथे कधी जात नाही. पण देवीची खरी कृपा आमच्यावरच आहे. जे काम करतात, त्यांच्यावरच परमेश्वराची कृपादृष्टी असते. काम हेच आमचं दैवत आहे. आमची जागा पुण्यवान आहे. नेताजी बोस, भगतसिंग, राजगुरू अशा पुण्यात्म्यांचे पाय येथे लागले आहेत. आणि शेवटी काय, ‘है तेरी हैसियत, कुवत तो मिल जाएगा…’- प्रभाकरराव त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान उलगडून सांगतात. स्वतःचा बुद्धिवाद स्वतःपुरता ठेवण्याचे तारतम्य मात्र त्यांच्याजवळ आहे. कोणाच्या धार्मिक भावना मुद्दामहून दुखवायच्या नाहीत, याकडे त्यांचा कटाक्ष असतो.”

…………..

प्रभाकरराव वैद्य या माणसाला बोलतं करणं महाकठीण काम आहे. स्वतःबद्दल, स्वतःच्या यशाबद्दल स्वतःच बोलणे हा प्रभाकररावांचा स्वभाव नाही. आपण फारच रेटलं तर सांगतात, ‘जुन्या लोकांनी, वाडवडिलांनी जी दिशा दाखविली. त्या दिशेनं विनास्वार्थाने जिद्दीनं चालत गेलो. कोणालाही शिव्या न देता, कोणालाही जिंदाबाद न म्हणता काम करत गेलो. सर्वांच्या अथक मेहनतीतून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ जगभर पोहोचलं. याचा आनंद आहे, समाधान आहे. ‘

स्वतःबाबत हातचं राखून बोलणारे प्रभाकरराव हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या यशात वाटा कोणाचा, असा प्रश्न केला की मात्र भरभरून बोलायला लागतात. ‘किती नावं सांगू? बाबा अंबादासपंत, काका अनंत कृष्णाजी वैद्य, हरिहरराव देशपांडे, त्र्यंबक देशमुख, शिवाजीराव पटवर्धन, अण्णासाहेब असनारे, यवतमाळचे डॉ. मधुसूदन काणे, व्यंकटराव दुबे, बाबुराव पिंपळकर, भीमराव लोहार, कॅप्टन धानोरकर… ही सगळी मंडळी मला कायम समोर दिसतात. खऱ्या अर्थाने ही मोठी माणसं होती. आता अशी माणसं होणे नाही. लहान असताना यांच्याच गोतावळ्यात होतो.. त्यांच्यापासून जे संस्कार, शिस्त मिळाली, त्यामुळे हा प्रभाकर वैद्य थोडंफार करू शकला. स्वतःच्या हितापेक्षा समाजाचे दुःख, गाऱ्हाणी महत्त्वाची, हे या लोकांनी लहान असतानाच माझ्या मनावर बिंबविलं होतं. त्यामुळे कुठेही काही समस्या निर्माण झाली की, मी अस्वस्थ होतो, आपल्या परीने काही करण्याचा प्रयत्न करतो.’

प्रभाकरराव हे अस्सल अमरावतीकर. १९५७ ते ६० या काळात आधी बीपीईसाठी ग्वाल्हेर व त्यानंतर १९६५-६६ मध्ये एम.पी.एड.साठी पातियाळात काढलेली चारेक वर्षे सोडली, तर बालपण, तारुण्य व ‘अभी तो मैं जवाँ हूँ’ म्हणत वयाच्या पंच्याहत्तरीतही अनेक संकल्प सोडणारं म्हातारपण असे जीवनाचे सारे ऋतू, प्रत्येक ऋतूतील मोहोर त्यांनी अमरावतीतच अनुभवले आहेत.

प्रभाकररावांचं प्राथमिक शिक्षण नगरपरिषदेच्या नंबर दोनच्या शाळेत झालं. नंतर न्यू हायस्कूलमध्ये. शाळा त्यांनी कधी गंभीरतेने घेतली नाही. शाळेच्या गमती-जमती त्यांच्याच तोंडून ऐकण्याजोग्या आहेत. आपला दोस्त सदाशिव पवार व मी, आम्हाला शाळेपेक्षा आखाडाच प्यारा होता. शाळेला आम्ही चाटा मारायचा. आखाड्यातील विहिरीत उशिरापर्यंत पडून राहायचो. झाडगावकर नावाचे माझे शिक्षक होते. ते नेहमी म्हणायचे, ‘प्रभ्या, मी लिहून देतो, तू कधी मॅट्रिक होणार नाहीस.’ मॅट्रिक- बिट्रीकचं कौतुक होतं कोणाला? आमचा आपल्या कुस्त्यांवर जोर. उरलेल्या वेळेत गावात भटकून जांब (पेरू), बोरं तोडत आम्ही चरत राहायचो.’

 प्रभाकररावांना मॅट्रिकचं कौतुक नसलं तरी यथावकाश ते मॅट्रिक झाले. त्यानंतर काही वर्षांतच वडील, काका व ह.रा. देशपांडेंनी त्यांची रवानगी ग्वाल्हेरला करण्याचं ठरविलं. तेथे लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये बीपीईसाठी अॅडमिशन घेण्यात आली. ग्वाल्हेरला तीन वर्षे काढल्यानंतर १९६६ मध्ये पतियाळातील शासकीय शिक्षण महाविद्यालयातून एम.एड. ची पदवी त्यांनी घेतली. ग्वाल्हेर – पतियाळातील दिवस हे प्रभाकररावांच्या आयुष्याला कलाटणी देणारे होते. ही दोन्ही शहरं संस्थानिकांची. तेथील सारंच काही भव्य-दिव्य. तेथून जी दृष्टी मिळाली त्याचा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विकासासाठी मोठा फायदा झाला. प्रभाकररावांनी पतियाळाहून परत आल्यानंतर आखाड्याचं जे काही प्लॅनिंग केलं, ते पुढील ५० वर्षांचा विचार करून केलं. आखाडा हा केवळ शारीरिक शिक्षणाची पदवी देण्यापुरता मर्यादित राहू नये, तर आधुनिक जगात टिकण्यासाठी आवश्यक सर्व तंत्रज्ञान, ज्ञान, शिक्षण येथे उपलब्ध असलं पाहिजे, हा ध्यास त्यांनी घेतला. आखाड्यात इंजिनिअरिंग कॉलेज उघडण्यात आलं. तेव्हा आखाड्यात इंजिनिअरिंग कॉलेज कशाला, हा प्रश्न करण्यात आला होता. आज त्याचं उत्तर आपसूक मिळालं आहे.. आमच्या वेगवेगळ्या वर्कशॉपमुळे आखाड्याच्या गरजा येथेच पूर्ण होतात. सर्व क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान काही मिनिटांत उपलब्ध होतं. सारं जग टेबलवर आलं आहे’, प्रभाकरराव कौतुकाने सांगत असतात.

आखाडा म्हणजे प्रभाकररावांचा जीव की प्राण. कुठेही गेलं तरी त्यांचं मन आखाड्यातच गुंतून असतं. काही वर्षापूर्वी राज्यपाल – पंतप्रधानांना भेटायला ते मुंबई-दिल्लीला गेले; पण भेट झाल्या झाल्या लगेच पंख लावून आखाड्यात परतले, आखाड्यात ते जेवढे स्वस्थ असतात, तेवढे कुठेच नसतात. आखाडा त्यांचा ‘गुरूर’ आहे. आखाड्याची महती, यशोगाथा सर्वांनाच माहिती आहे. पण हे यश मिळविताना कुठे तडजोड करावी लागली का? वाकावे लागले?’ या प्रश्नाने प्रभाकरराव काहीसे व्यथित होतात. ‘महाराष्ट्र शासनाने जेवढा त्रास दिला तेवढा कोणीच दिला नाही. नोकरशाहीचा अनुभव अतिशय वाईट आहे. यामुळे दुःख होते, नाराजीही येते. पण आपण कधी चुकीची तडजोड केली नाही. प्रसंगी काही पावलं मागे जाण्याची आपली तयारी असते. मागे जाऊन पुन्हा उंच उडी घेण्यावर आपला विश्वास आहे. त्यामुळे मी कधी निराश होत नाही, अस्वस्थ होत नाही.’ आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी मात्र ते अस्वस्थ होतात, ढवळून निघतात. ‘कधी काळी सोन्याची कुन्हाड मानला जाणारा वऱ्हाड प्रदेश आज भकास झाला आहे. शेतकरी किड्या-मुंग्यासारखे मरताहेत. असे असतानाही विदर्भाचा पैसा पळविण्याचे प्रकार सुरूच आहेत. अनुशेष वाढतो आहे. यामुळे निराशा येते. आज तरुण मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. राज्यातील २० लाख मुले शारीरिक शिक्षणापासून वंचित आहेत. पोरांची रग चुकीच्या मार्गान जात आहे.’ परंतु पांढरपेशासारखं केवळ चिंता व चर्चा करणं प्रभाकररावांना मंजूर नाही. ते मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच दीपाली कुळकर्णी हत्याकांड असो, इतवारा येथील जळितकांड शेतकऱ्यांच्या आत्महत्या, समाजमन कुंठित झालं असताना त्यांनी कृतीतून मार्ग शोधला.

बहुतेक मोठी माणसं आपल्या यशाचं श्रेय नशिबाच्या पारड्यात टाकतात. प्रभाकररावांना मात्र नशीब, दैव, पंचांग या गोष्टी मंजूर नाहीत. ‘आमच्या बाजूला देवीचं मंदिर आहे. मी तिथे कधी जात नाही. पण देवीची खरी कृपा आमच्यावरच आहे. जे काम करतात, त्यांच्यावरच परमेश्वराची कृपादृष्टी असते. काम हेच आमचं दैवत आहे. आमची जागा पुण्यवान आहे. नेताजी बोस, भगतसिंग, राजगुरू अशा पुण्यात्म्यांचे पाय येथे लागले आहेत. आणि शेवटी काय, ‘है तेरी हैसियत, कुवत तो मिल जाएगा’- प्रभाकरराव त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान उलगडून सांगतात. स्वतःचा बुद्धिवाद स्वतःपुरता ठेवण्याचं तारतम्य मात्र त्यांच्याजवळ आहे. कोणाच्या धार्मिक भावना मुद्दामहून दुखवायच्या नाहीत, याकडे त्यांचा कटाक्ष असतो.

कोणत्याही ठरावीक विचारांच्या चौकटीत त्यांनी स्वतःला अडकवून न घेतल्यानं त्यांच्या आखाड्याची दारं सर्वांसाठी खुली आहेत. शहरातील कोणताही राजकीय पक्ष, संस्था- संघटनेचा मोठा कार्यक्रम आखाड्यातच होणार हे ठरलेलं. या आखाड्यानं अमरावती शहरात अनेक ‘दादा’ जन्माला घातले. हे दादा आपआपल्या क्षेत्रात ‘शेर’ आहेत; पण हे सारे शेर प्रभाकररावांसमोर वचकून असतात. त्यांच्या स्वभावाचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही. खुद्द प्रभाकररावांना त्यांचा स्वभाव कसा आहे, असं विचारल्यावर ते एका वाक्यात उत्तर देतात.-  ‘सज्जनांशी सज्जन… नाठाळांशी नाठाळ.’ प्रभाकररावांच्या दमदार व्यक्तिमत्त्वामुळेच की काय, त्यांच्याशी सलगी करायला लोक घाबरतात.  रा.सू. गवई, निर्मलाताई देशपांडे व कृष्णराव देशपांडे हे तिघे सोडले, तर त्यांना ‘प्रभाकर’ असं एकेरी नावानं संबोधण्याची कोणाची हिंमत नव्हती. बाकी प्रभाकररावांचे विश्वासपात्र सोबती बरेच आहेत. सुरेशराव देशपांडे, हरणे, खुबसिंग, महाले, पुसतकर, प्रकाश संगेकर, नाना दलाल हे त्यांचे जिव्हाळ्याचे साथीदार आहेत.

आखाड्याच्या व्यापात स्वाभाविकच त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. घरच्यांना वेळ देता येत नाही. सकाळी सहाला दिवस सुरू झाला की. वर्तमानपत्राचे वाचन, ९ वाजता दंड-बैठकांचा दोन तास व्यायाम, त्यानंतर ११ ते सायंकाळी ७-८ पर्यंत संस्थेची कामे, रात्री पोहणे फिरणे असा त्यांचा दिनक्रम. आज या वयातही तरुणांना लाजवेल अशी तडफ त्यांच्यात आहे. चैन, हौस या प्रकाराशी प्रभाकरराव अनभिज्ञ आहेत. गेली कित्येक वर्षे त्यांनी सिनेमा पाहिला नाही. आखाड्याच्या पोरांनी एखाद्या वेळी थिएटरमध्ये गडबड केल्यास त्यांना बाहेर काढायला तेवढे ते स्वतः जातीने जातात. त्यांचा दराराही असा आहे की, प्रभाकरराव येत आहे म्हटले की सारे चिडीचूप होतात. आखाड्याच्या २०० एकर परिसरात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा धाक, त्यांनी घालून दिलेली शिस्त पदोपदी जाणवते. एवढ्या वर्षांच्या सामाजिक कार्यात संत ज्ञानेश्वर नाट्यमंदिराची उभारणी, हरिभाऊ कलोती स्मारक, स्काऊट भवन, माताखिडकी, इतवारा बाजारातील आगीनंतर उभे केलेले संसार, अलीकडच्या काळात हेल्पलाईनचे काम हे प्रभाकररावांच्या अभिमानाचे विषय आहेत. आतापर्यंत आखाड्यातून सहा लाख विद्यार्थी तयार होऊन भारताच्या कानाकोपऱ्यात आपले योगदान देत आहेत. या गोष्टीचेही त्यांना अमाप समाधान आहे. आज ते कृतार्थ आहेत. त्यांच्यानंतर आखाड्याचं काय, या प्रश्नावर ते विचलित होत नाहीत. आतापर्यंतचं यश एकट्याचं नाही. सर्वांचा वाटा आहे. आखाडा अमरावतीकरांचा आहे. वाडवडिलांच्या पुण्याईहून तो मोठा झाला आहे. त्यामुळे मला अजिबात चिंता नाही’, प्रभाकरराव ठाम विश्वासानं सांगत असतात.

( दैनिक ‘लोकमत’ च्या ‘प्रोफाईल’ या स्तंभात २००६ मध्ये हा मजकूर प्रसिद्ध झाला होता)

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत )

8888744796

अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleकायद्याचा परिचय: एक टिपण- भाग २
Next articleम्हशीनं मारली काँग्रेसला ढुशी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.