‘बाबरी मशीद पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे’ असं म्हणणारा पक्ष आज राणा दांपत्त्याला हनुमान चालिसा आणि राज ठाकरे यांच्या मशिदीवरील ध्वनी क्षेपकाला ( लाऊड स्पीकर – भोंगा या यंत्रणेचा एक भाग आहे ) बंदीला विरोध करतो हे तर आपले राजकीय पक्ष सत्तेसाठी भूमिका बदलण्यात किती निगरगट्ट झालेले आहेत याचं लक्षण समाजायला हवं . उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत आणि मवाळ प्रतिमेचे धनी आहेत ( असं मीही एकेकळी म्हणत असे ) . एकाच प्रार्थना स्थळावरचा नाही तर शांतता भंग करणाऱ्या , लोकांना आवाजाचा त्रास होणाऱ्या , राज्यातल्या प्रत्येक प्रार्थना स्थळावरच्या लाऊडस्पीकरचा आवाज नियंत्रणात आणला जाईल अशी सर्वसमावेश भूमिका घेण्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील पूर्ण अपयशी ठरले आहेत . त्यांनी जर राज्यातील सर्व प्रकारच्या ध्वनी क्षेपकाचा आवाज नियंत्रणात आणण्यासाठी निर्णायक पावलं उचलली असती तर , महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचा पाठिंबा राज ठाकरे यांना नव्हे तर उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांना मिळाला असता . पण , तसं झालं नाही आणि हा प्रश्न अधिकच चिघळत चालला आहे . त्याचा लाभ उठवणाऱ्या विरोधी पक्षांना दोष देता येणारच नाही ; राज्यकर्त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा म्हणा की गैरफायदा उचलणं हेच विरोधी पक्षाचं काम असतं . सत्ताधारी नेतृत्वाच्या कणखर नसण्याच्या वृत्तीमुळे ध्वनी क्षेपक ( भोंगा ) प्रकरणात राज ठाकरे नेते म्हणून आणि त्यांचा पक्ष ‘लार्जर दॅन लाईफ’ झाले असून प्रसिद्धीचा सगळा झोत त्यांच्याकडे वळला आहे .