भय इथं पुन्हा दाटून आलंय… 

प्रवीण बर्दापूरकर  

साधारण १९८६-८७ ते १९९६-९७ या सुमारे दहा वर्षांतलं देशातलं वातावरण आठवतं का ? पंजाब , काश्मीर , आसाम , नागालँड , पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यात अस्वस्थता होती ; हिंसक कारवायांना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या . त्यातच ‘हम मंदिर वहीं बनाऐंगे’ , ‘जय श्रीराम’ अशा घोषणांचा महापूर आलेला , ‘गर्व से कहो हम हिंदू है’ , असं आणि असं बरंच कांही लिहिलेल्या टोप्या घातलेल्या लोकांनी तो महापूर देशभर आणलेला , रामाच्या नावानं यात्रा , रथयात्रा , शीळा पूजन , आरत्या , महाआरत्या असं ते वातावरण होतं . ते तापवत ठेवून देशात हिंस्त्र धार्मिक द्वेषाची दरी निर्माण करण्यात आली . समाज ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ , असा विभागला गेला . बाबरी मशीद पाडल्यावर तर ‘अयोध्या तो सिर्फ झाँकी है , काशी मथुरा बाकी हैं’ असा उन्माद देशात माजवला आणि पसरवलाही गेला . पुढे देशभरात बॉम्बस्फोटाच्या असंख्य घटना घडल्या . दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईला पोहोचले , अशा किती घटना सांगायच्या ? देशात त्या काळात  भयाचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं होतं…त्याची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागली आहे .

त्या सुमारे दहा वर्षांच्या काळात मी नागपूरला होतो ; ‘लोकसत्ता’चा मुख्य वार्ताहर होतो . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असल्यामुळे हे शहर तर हे भयाचं वातावरण निर्माण करणाऱ्या परिवाराच्या हालचालींचं मुख्य केंद्र बनलेलं होतं . पत्रकारांना अविश्रांत काम करावं लागण्याचे ते दिवस होते .‘महाराष्ट्र टाइम्स’चा धनंजय गोडबोले आणि मी वेगवेगळ्या ‘बिटविन द लाईन’ बातम्या , दुवे , धागेदोरे शोधण्यासाठी सतत धावपळीत असायचो . नुकतेच निर्वतलेले आणि तरुण भारत या दैनिकाचे सेवानिवृत्त मुख्य संपादक दि. भा. उपाख्य मामासाहेब भुमरे तेव्हा भेट झाली की सांगत , काही तरी फार मोठं आणि महाभयंकर घडणार आहे . पोलीस , गुप्तवार्ता विभागाचे अधिकारीही काय घडणार आहे याच्या शोधात होते . त्यांच्याशीही अनेकदा होणाऱ्या गप्पांतून बरीच माहिती मिळत असे . पुढे धनंजय गोडबोलेनं त्या कटाची सविस्तर माहिती देणारी बातमीच प्रकाशित केली होती . एक भयसूचक अस्वस्थता देशात पसरलेली होती . ( ‘ भगवी माया ’ अशी एक प्रतिमा कवीश्रेष्ठ ग्रेस यांच्या ‘ भय इथले संपत नाही ’  या कवितेत आहे , किती सूचक आहे ती प्रतिमा , नाही का ? ) त्यातूनच पुढे जे काही घडलं ते आता आठवलं जरी तरी अंगावर शहारे येतात . तसंच म्हणजे , कविश्रेष्ठ ग्रेस यांचे शब्द बदलून सांगायचं  झालं तर ‘भय इथं पुन्हा दाटून आलंय…’ असं वातावरण आता पुन्हा एकदा जाणवतं  आहे . राष्ट्रवादाला लोकशाहीच्या नव्हे तर धर्मांध चौकटीत बंदिस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत .

■ ■
काय घडलंय मध्यप्रदेशात , दिल्ली , कर्नाटक , तेलंगणा , पश्चिम बंगालातही कोणत्या ना कोणत्या देवाच्या जयंतीच्या काळातच नेमका हिंसाचार उफाळून आलेला ( आणलेला ! ) आहे . मध्यप्रदेश आणि दिल्लीतल्या जहांगीरपुरीत तर सत्ताधाऱ्यांनी निरापराध्यांवर चक्क पुन्हा-पुन्हा बुलडोझर घातले आणि तेही न्यायालयाचा आदेश झुगारुन . श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना देशावर लादल्या गेलेल्या आणीबाणीच्या काळात दिल्लीत ज्या पद्धतीने वस्त्या-वस्त्यांवर अमानुषपणे बुलडोझर चालवले गेले , त्याची आठवण करुन देणाऱ्या या घटना आहेत . कर्नाटकात हिजाबवरुन वाद उफाळतो आणि तो पाहता पाहता राज्यव्यापी उद्रेकात परावर्तित होतो , हे काही एका रात्रीत घडू शकत नाही .

इकडे तलवारी सापडल्या-तिकडे सापडल्या , अशा बातम्या दररोज वाचनात येताहेत , विशिष्ट धर्मीय व्यापाऱ्याकडूनच खरेदी करावी किंवा वसाहती-वसाहतीत कोणाकडे कोणत्या जाती-धर्माचा गडी-बाई काम करत आहे याची माहिती मिळवण्याच्या अतिशय शांतपणे सुरु असलेल्या हालचाली वाटतात तितक्या साध्या नाही तर , तेही एक भयसूचनच आहे . त्यासाठी दीर्घ नियोजन लागतं आणि हे नियोजनकर्ते कोण-कोणत्या धर्मांध गटांचे आहेत , हे काही या देशाला ठाऊक नाहीत असं नाही . दोन्ही बाजूंच्या धर्मांध गटांना उन्मादित होऊन हैदोस घालण्यासाठी नेमकी ज्या पद्धतीनं अनुकूलता निर्माण करायची असते अगदी तश्शीच ही परिस्थिती आहे ; हे इथे थांबणार नाही तर हा वणवा आणखी पेटत जाईल . ‘त्या’ दहा वर्षांतील घटनांचे आधार घेतले तर तशी भीती आता वाटू लागली आहे  . समाजात फूट पाडून त्याआधारे वर्चस्व निर्माण करण्याची चटकच दोन्ही गटातील धर्मांधांना  लागलेली आहे .
■ ■
महाराष्ट्रही या भयसूचनाला अपवाद नाही आणि ते सूचन चिरडून टाकण्यात राज्य सरकारला अपयश येत आहे किंवा सत्ताधारी पक्षच त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा जास्त प्रयत्न करत आहेत हे चिंतनीय आहे . कोण खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार  पती रवी राणा ? हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवणारे ‘जाणते’ हनुमान चालिसा प्रकरण घडलं तेव्हा आपण नाही त्या गावचे , या आविर्भावात होते . राणा दांपत्त्याला अटकच करायची होती तर , प्रकाश वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून दोन दिवस वातावरण तापत ठेवण्याची आणि शिवसैनिकांना घामाच्या धारा झेलत भर उन्हात बसवून ठेवण्याची गरजच काय होती , या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलं नाही , ते उत्तर देणारही नाहीत आणि कुणी पत्रकारांनीही त्यांना तसा प्रश्न विचारला नाही . राणा दांपत्त्याच्या हनुमान चालिसाच्या प्रकरणात उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यासारखे नाही तर पक्ष प्रमुखासारखे वागले . राणा दांपत्त्याला अमरावतीच्या घरातून बाहेरच पडू दिलं नसतं आणि तिथेच अटक केली असती तर चालिसातील हनुमानाच्या तणावाची शेपटी अमरावती ते मुंबई अशी पसरली नसती . मुख्यमंत्री काय किंवा गृहमंत्री काय किंवा राज्याचे पोलीस प्रमुख काय , राणा दांपत्त्याच्या घराभोवती पोलिसांचा नाही तर शिवसैनिकांचा पहारा बसवतात , याइतकी पोलीसी  दिवाळखोरी या राज्यात यापूर्वी कधीच अनुभवायला मिळाली नव्हती . हे सरकार सोबतच पोलिसांचं अपयश आहे व ते मुळीच समर्थनीय नाही आणि राणा दांपत्त्य मुंबईत पोहोचतं , हे पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग कुंभकर्णी झोपेत आहे याचंच लक्षण आहे .

‘बाबरी मशीद पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर  त्यांचा मला अभिमान आहे’ असं म्हणणारा पक्ष आज राणा दांपत्त्याला हनुमान चालिसा आणि राज ठाकरे यांच्या मशिदीवरील ध्वनी क्षेपकाला ( लाऊड स्पीकर – भोंगा या यंत्रणेचा एक भाग आहे ) बंदीला विरोध करतो हे तर आपले राजकीय पक्ष सत्तेसाठी भूमिका बदलण्यात किती निगरगट्ट झालेले आहेत याचं लक्षण समाजायला हवं .  उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत आणि मवाळ प्रतिमेचे धनी आहेत ( असं मीही एकेकळी म्हणत असे ) . एकाच प्रार्थना स्थळावरचा नाही तर शांतता भंग करणाऱ्या , लोकांना आवाजाचा त्रास होणाऱ्या , राज्यातल्या प्रत्येक प्रार्थना स्थळावरच्या लाऊडस्पीकरचा आवाज नियंत्रणात आणला जाईल अशी सर्वसमावेश भूमिका घेण्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील पूर्ण अपयशी ठरले आहेत . त्यांनी जर राज्यातील सर्व प्रकारच्या ध्वनी क्षेपकाचा आवाज नियंत्रणात आणण्यासाठी निर्णायक पावलं उचलली असती तर , महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचा पाठिंबा राज ठाकरे यांना नव्हे तर उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांना  मिळाला असता . पण , तसं झालं नाही आणि हा प्रश्न अधिकच चिघळत चालला आहे . त्याचा लाभ उठवणाऱ्या विरोधी पक्षांना दोष देता येणारच नाही ; राज्यकर्त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा म्हणा की गैरफायदा उचलणं हेच विरोधी पक्षाचं काम असतं . सत्ताधारी नेतृत्वाच्या कणखर नसण्याच्या वृत्तीमुळे ध्वनी क्षेपक ( भोंगा ) प्रकरणात  राज ठाकरे नेते म्हणून आणि त्यांचा पक्ष ‘लार्जर दॅन लाईफ’ झाले असून प्रसिद्धीचा सगळा झोत त्यांच्याकडे वळला आहे .

आणखी एक स्पष्टपणे सांगितलंच पाहिजे – राणा दांपत्त्यावर दाखल झालेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्याचं समर्थन करता येणार नाही . राजकारणातील कार्यकर्त्यांवर असे गुन्हे दाखल करणं ही दडपशाही आहे , ते हुकूमशाहीचं निदर्शन आहे . देशातील एक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्याबाबत सूचकपणे नाराजी व्यक्त केली आहे , हे लक्षात घेण्यासारखं आहे .
■ ■
मी अधार्मिक आहे , देव मानत नाही हे माहिती असूनही एक  चिवट हिंदू रक्षक भेटायला आले . त्यांना मंदिरावर लावायच्या ध्वनी क्षेपकासाठी वर्गणी हवी होती . त्यांना म्हटलं , ‘सर्वच प्रार्थना स्थळांवरचे ध्वनी क्षेपक बंद करणारी चळवळ  उभारणार असाल तर तुम्ही मागाल त्याच्या दुप्पट वर्गणी देतो .’
‘हिंदूंच्याच भोंग्यांना तुमचं विरोध आहे का ?’ असा प्रश्न त्यांनी चिवटपणा न सोडता  विचारला .

हा मिळालेला फुलटॉसच होता .  मी उत्तर दिलं , ‘सर्वच प्रकारच्या मोठ्ठ्या आवाजाचा  मला त्रास होतो .  त्यातही दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घेताना हिंदी चित्रपटांच्या गाण्याच्या चालीवर बेसूर भजनं म्हणणाऱ्या ध्वनी क्षेपकावरुन येणाऱ्या आवाजाचा  तर खूपच त्रास होतो म्हणून तर ध्वनी क्षेपकांना आणि कर्ण कर्कश्श हॉर्न वाजवणाऱ्या सर्व वाहनांना माझा  सरसकट विरोध आहे !’
‘अहो , हिंदू खतरें मे आहेत हे तुम्हाला समजत कसं नाही ?’ त्यांनी त्रागायुक्त  स्वरात विचारलं .

‘या देशात बहुसंख्य असणारे खतरें मे येतील की अल्पसंख्य ? ‘ असा  प्रतिप्रश्न मी त्यांना विचारला .
त्यांनी खवचटपणे विचारलं , ‘तुम्ही नक्की हिंदूच आहात नं ?’

 मी उत्तरलो , ‘नक्की , मी हिंदूच  आहे आणि माझ्या धर्म किंवा जातीची मला लाज नाही आणि माज तर मुळीच नाही .
ते करवदले , ‘विचित्रय ब्व्वा तुमचं हिंदूत्व .’

 मी म्हणालो , ;त्यात विचित्र-बिचित्र कांहीच  नाही . माझं हिंदूत्व समतावादी आहे , लोकशाहीवादी आहे , अन्य धर्माचा आदर करणारं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणताही धार्मिक किंवा जातीय रंग नसणारं निर्भेसळ मानवतावादी आहे .’
‘तुमच्या सारख्यांशी वाद घालणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे’ , अशी बडबड करत आणि मला दगडाची उपमा बहाल करत त्या हिंदूत्ववाद्यांनी काढता पाय घेतला .
‘अशा’ हिंदूत्ववाद्यांचं पीक  सध्या फोफावलं आहे . त्यामुळे वातावरण भयाचं झालेलं आहे  . म्हणून १९८५-८६ ते ९५-९६ चे दिवस आठवले आणि जीवाचा थरकाप उडाला…

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleचालिसाचे राणा, नकली धिंगाणा
Next articleउत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज : १
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.