चालिसाचे राणा, नकली धिंगाणा

ज्ञानेश महाराव

      (संपादक, साप्ताहिक ‘चित्रलेखा’)

———————————————-

   *पंचतंत्रात एक गोष्ट आहे.* एक वृषभ (बैल) खूप माजला होता. त्याचे भले मोठे पुष्ट अंड खाली लोंबत होते. ते तांबूस वर्णाचे भले मोठे अंड; त्याच्याच वजनाने केव्हा ना केव्हा गळून खाली पडेल; या आशेने वेडे झालेले कोल्हे-कुत्रे मोठ्या आशेने भुंकत-कुंथत त्या वृषभामागे महिनोन् महिने फिरत होते. त्यांच्यात वृषभावर झडप घालून, त्याला ठार मारून जे हवे ते खाण्याची कुवत नव्हती. तशीच वृषभाचे अंड किती वाढले, खाली लोंबले तरी ते गळून पडणार नाही; हे कळण्याची अक्कलही त्या वृषभामागे फिरणाऱ्या कोल्ह्या -कुत्र्यांना नव्हती. राजकारणात असे बिनकुवतीचे आणि बिनअकलेचे कोल्हे- कुत्रे वाढलेत. ते सत्तालाभासाठी झपाटल्याने विवेक सोडून किती खालच्या थराला जाऊ शकतात; ह्याचा ताजा अनुभव महाराष्ट्राला आमदार – खासदार असलेल्या ‘राणा जोडी’ने दिला.

      रवी राणा हे बडनेरा-अमरावतीचे आमदार आहेत. त्यांच्या ’सिनेस्टार’ असलेल्या पत्नी नवनीत राणा ह्या अमरावतीच्या खासदार आहेत. रवी राणा हे उद्योगी आहेत. त्यांनी रामदेव बाबाला स्टेडियममध्ये योगाच्या कसरतीची शिबिरं भरवून पैसा कमावला आहे. तूर्तास एवढेच. ते वयाच्या तिशीत असताना २००९ मध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघातून ‘अपक्ष’ आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही ते ‘आमदार’ झाले. ’फडणवीस सरकार’च्या काळात ते देवेंद्रजींच्या अतिनिकटच्या वर्तुळात होते. तरीही सप्टेंबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला ‘काँग्रेस’ने पाठिंबा दिला. त्याआधी- सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने त्यांच्या पत्नीच्या- नवनीत राणा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. ही तेव्हा ‘भाजप’ बरोबर असलेल्या ’शिवसेना’च्या उमेदवाराला पाडण्याची खेळी होती. ह्या खेळात १९९६ पासून बुलडाणा व अमरावती लोकसभा मतदारसंघातून सहा वेळा खासदार झालेले ‘शिवसेना’चे आनंद अडसूळ पराभूत झाले.

      राणा दाम्पत्याने मदतीला जागून ’काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी’ बरोबर राहायला पाहिजे होते. तसे ते राहिलेही. परंतु, ‘महाविकास आघाडी’चे सरकार आपली ताकद दाखवू लागले, तसे सुरुवातीला ‘मोदी सरकार’वर टीका करणाऱ्या खासदार नवनीत राणा ह्या ‘ठाकरे सरकार’वर टीका करू लागल्या. त्याला कारण देवेंद्र फडणवीस यांना ठाऊक असलेल्या राणांच्या आर्थिक उलाढाली हे जसे आहे ; तसेच नवनीत राणांचे जातीच्या खोट्या दाखल्याचे प्रकरणही आहे. ह्या दोन्हींतून वाचण्यासाठी दोघांना ‘भाजप’ प्रवेश पुरेसा होता. परंतु, ही दोन्ही प्रकरणं राज्य शासनाशी संबंधित असल्याने ‘ईडी’चे हत्यार वापरणारा ‘भाजप’ आपल्या पाठीशी आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी ‘ठाकरे सरकार’ विरोधात थयथयाट सुरू केला. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नारायण राणे अँड सन्स, चित्रा वाघ आदिंनी ‘भाजप’मध्ये प्रवेश घेतल्यावर ’बाटग्याची बांग मोठी’ ही म्हण खरी ठरवली. त्याचीच ‘री’  राणा दाम्पत्याने ओढली.

      ‘कोरोना उपाययोजना’ संबंधाने प्रधानमंत्र्यांनी ‘ठाकरे सरकार’ची प्रशंसा केली असतानाही नवनीत राणा यांनी लोकसभेत त्या विरोधात गळा काढला. त्याच्या पुढचा टप्पा हा उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ’मातोश्री’ निवासस्थानात घुसून ‘हनुमान चालिसा’ म्हणण्याचा हट्ट होता. अशा प्रकारे ‘चालिसा’च काय, घरमालकाला चहाही बनवून देण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना नाही. त्यांच्या ह्या अतिरेकीपणाला शिवसैनिकांनी ’जशास तसे’ उत्तर दिले आहे. त्यासाठी जो राडा झाला, त्याचे समर्थन करता येणार नाही. पण जे घडले, त्याला जबाबदार राणा दाम्पत्यच आहे. अमरावतीच्या मतदारांनी ह्या दोघांना मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन ’चालिसा’ पठण करण्यासाठी निवडून दिलेले नाही. अमरावती जिल्ह्यातील शहरात सार्वजनिक शौचालयांची बोंब आहे. म्हणून मतदारांनी राणांच्या निवासस्थानी ’टमरेल’ मोर्चा काढल्यास, तो एक वेळ  ’लोकप्रतिनिधी’च्या जबाबदारीची आठवण देणारा असल्याने संयुक्तिक ठरेल. तथापि, तशाच प्रकारे कुणाच्या घरातच नव्हे, तर सार्वजनिकरीत्याही कुणाच्या श्रद्धा तपासता येणार नाही. तो गुन्हाच आहे.

      परंतु, गेल्या आठ वर्षांत देशात असे गुन्हे वारंवार होत आहेत. ‘वंदे मातरम्’ वा ‘भारत माता की जय’ घोषणा द्यायला लावणे. ‘जय श्रीराम’ वदवून घेणे. गोमांस असल्याच्या संशयाखाली झुंड जमवून खून पाडणे. दलित तरुणांना गुराढोरासारखे सोलून काढणे. रामनवमीला मांसाहार केला म्हणून कॉलेजच्या हॉस्टेलचे ‘मेस’ बंद पाडणे असे प्रकार देशात सुरू आहेत. हा धर्मांध अतिरेकीपणा राणा दाम्पत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत ‘हनुमान चालिसा’चा हट्ट करीत पोहोचवला. हा ’भाजप’ला देशव्यापी बनवणार्‍या ‘शिवसेना’च्या ३० वर्षांच्या युतीचा परिपाक आहे. हे युती सडकी ठरल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर करूनही नकली हिंदुत्वासाठी वळवळणारे नेते आणि  शिवसैनिक ‘शिवसेने’त आहेत. ते राणा दाम्पत्याला शिवसैनिकांनी दाखवलेल्या गदाधारी हिंदुत्वाने शांत झाले असतील, अशा भ्रमात ‘शिवसेना’ नेतृत्वाने राहू नये.

      देवधर्माची नशा भक्त मंडळीत खच्चून भरलीय. ज्येष्ठ गजलकार व कवी *गजानन तुपे* म्हणतात तसा आता –

*नव्या जुन्या भक्तांचा, आजार वाढला आहे -*

*सत्तेसाठी देवांचा, बाजार मांडला आहे !*

*ईश्वर-अल्ला-जीझस- बुद्ध, काल म्हणाले मजला -*

*धर्माने माणुसकीचा शेजार, सोडला आहे !* -१ 

*ऐकून घेतल्या थापा, भोंग्याच्या ’चालिसा’ बाता -*

*सत्य-अहिंसा-शांतीचा, विचार चांगला आहे !*

*जुलमाचे इमले बांधा, प्रेतांच्या राशी पाडा -*

*सत्ता सुंदरी मिळवा, हा विचार रंगला आहे !* – २

    ‘ठाकरे सरकार’ला बदनाम करण्यासाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील हे पती – पत्नी गेले वर्षभर झटत होते. त्यासाठी त्यांनी हातात घेतलेले विषय योग्य होते. पण ते मांडताना जो थयथयाट करीत होते तो आक्षेपार्ह होता; तरीही त्यांना ‘मीडिया’ जे ’फुटेज’ देत होता; त्यावरून त्यांचा बोलविता-खेळविता धनी कोण आहे, ते स्पष्ट झाले. शरद पवार याच्या ’सिल्व्हर ओक’ निवासस्थानावरील हल्ल्यानंतर सदावर्तेंचा जेलचा पाहुणचार व महाराष्ट्र ‘कोर्ट’ दर्शनाचा कार्यक्रम सुरू  झाला. (१५ दिवसांनी ते जामिनावर सुटले.) परंतु, त्यांची उणीव ‘मीडिया’ला भासू नये, ह्या हट्टाच्या  थाटात राणा दाम्पत्याने ’हनुमान चालिसा’चा पट मांडला.

    सदावर्ते दाम्पत्याचा खेळ सहा महिने सुरू होता. राणा दाम्पत्याचा खेळ मात्र दोन दिवसांत ‘खल्लास’ झाला. ह्या दोघांच्या अतिरेकीपणाला अटकाव करण्यासाठी हजारो पोलीस झटत होते. तेवढेच पत्रकार त्यात अडकले होते. त्यांचा त्रास वाढवण्याचं काम किरीट सोमयांच्या ‘एन्ट्री’ने केले. ही ’एन्ट्री’च चुकीची असल्याने त्यांना मिळालेला ‘प्रसाद’ खोटा ठरविणे सोपे झाले आहे. किरीट सोमय्यांनी आपल्यावरील हल्ल्यामागच्या सूत्रधारांना शिक्षा व्हावी, यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवाकडे धाव घेतलीय. ”मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे मुख्यमंत्र्यांच्या इशार्‍यावरून आपल्यावरील हल्ल्याचे पुरावे नष्ट करीत आहेत,” असे त्यांचे म्हणणे आहे. तर ”हनुमान चालिसा’ म्हणणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाची कलमं लावणे, हा सत्तेचा दुरुपयोग आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे.

       ‘पुन्हा परत येईन’ हा हट्ट खरा करण्यासाठी ‘ठाकरे सरकार’ विरोधात आदळआपट करणाऱ्या देवेंद्र फडणवीस ह्यांची अवस्था भटजीबुवांसारखी झालीय. कुठल्याही धार्मिक कार्यात एखादी गोष्ट कमी असेल, तर ती उणीव भटजीबुबा अक्षतांच्या सहाय्याने भरून काढतात. म्हणजे देवाला वाहाण्यासाठी विशिष्ट फूल नसेल, तर त्या फुलाची जागा अक्षता भरून काढते. पंचामृत नसले तरी अक्षता आणि कापसाचे वस्त्र नसले तरीही अक्षता ! ‘अक्षता समर्पयामि’ म्हटलं की, त्यात सगळं आलं. महाराष्ट्राच्या राजकारणात अशाप्रकारे फडणवीस हे ‘ठाकरे सरकार’ विरोधात आरोपांच्या अक्षता घेऊन बसले आहेत. आता त्यांनी ‘सरकारने संवाद थांबल्याने संघर्ष सुरू’ झाल्याचे जाहीर केलेय. संघर्ष व संकटकाळी ‘आम्हाला नको ते करण्याच्या फंदात पाडू नका’ अशी ‘अॅडजेस्टमेंट’ धूर्त राजकारणी नेहमीच करतात. कारण राजकारणात सर्वचजण काचेच्या घरात राहतात. आरोपाच्या ‘अक्षता समर्पयामि’ म्हणणारेही धुतल्या तांदळासारखे कुठे आहेत? यावरही *गजानन तुपे* यांचा मर्मभेदी ’शेर’ आहे.

आव्हान देत आहेस, तर लढना खुलेपणाने-

धाडीच टाकतोस तू, ताकद तुझ्यात नाही !

9322222145

 

Previous articleबहिणाबाईंच्या गाण्यातून भेटणारा अखजीचा सण कसा साजरा करतात? 
Next articleभय इथं पुन्हा दाटून आलंय… 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.