बहिणाबाईंच्या गाण्यातून भेटणारा अखजीचा सण कसा साजरा करतात? 

– सीमा शेटे – रोठे, अकोला

    आपण भारतीय तसे उत्साही!  वर्षाचे बाराही महिने विविध सण उत्सव साजरे करतच असतो. प्रत्येक सणाचं आपलं असं महत्त्व असतं. जिथे कुठे असू तिथे आपण ते साजरे करतोच. मात्र काही  सण असे असतात की ज्यांची गोडी आपल्याला शहरापेक्षा गावाकडे ओढून नेतेच नेते. असाच एक सण आहे,  अक्षयतृतीया! … कृषी संस्कृतीशी नातं सांगणारा हा सण. गावात होतो तेव्हा महत्व न समजलेला आणि आता दूर आहोत तर आर्त करणारा…!

    अखजीचा हा सण बहिणाईच्या गाण्यातून भेटणारा…हा मोलाचा सण कसा साजरा करतात?  अखजीच्या आदल्या दिवशी गावाला ज्याच्या त्याच्या घरी धांड्यांची वाट पाहिली जाते. कारण त्या धांड्यांच्या आचेवरच तर शिजणार असतो अखजीचा मांडा! जसं मांडा न् अखजी तसंच अखजी आणि मातीचे मडके याचं नातं सुद्धा घट्ट असतं. घरात नवी घळ्ळी (घागर) किंवा ‘करवं’ यायचं ते अखजीच्याच मुहूर्तावर! गावाकडे आजही धान्याच्या बदल्यात कुंभाराकडून *घळ्ळी* आणून त्याची पूजा केली जाते.  -घडली- म्हणजे घरातील स्वर्गस्थ पुरूषाचं प्रतीक, तर लहान गाडगं म्हणजे ‘करवं’ किंवा ‘क-या’ बाईचं प्रतीक ! दोन्हीची पूजा करून त्यासमोर ‘पानाची मांडणी’ केली जाते. पानावर काय काय असतं? …वडा, भजा, कढीची भाजी, पुरणाची पोळी, खांडोळी किंवा पातोडी,पापड, कुरडई, सांडोयी, कानोले आणि महत्वाचा ‘चिंचोणी मांडा’. झालंच तर  मोसमातला पहिला आंब्याचा रससुद्धा अखजीलाच! अरेहो, अदरक-लिंबू राहिलंच की…! ते का असावं? अनेकांना विचारलं पण उत्तर कोणालाच माहीत नाही. अदरक आणि लिंबू असल्या शिवाय ‘अखजीचं पान’ पूर्ण होतच नाही, हे मात्र आवर्जून सांगतलं जातं.

   अखजीच्या आदल्या दिवशी मांड्याची तयारी केली जाते. ओलवल्या गव्हाचा रवा काढून ठेवतात, अखजीला पहाटे तो भिजवून गोळा तयार करायचा. त्या गोळ्याला हातावर वरचे वर झेलत लांबवायचा आणि ‘अल्लादी’ (अलगद) धांड्याच्या आचेवर उपडं ठेवलेल्या अर्ध्या मडक्यावर पसरवायचा. या मांड्यामध्ये करणारीचं कसब, प्रेमाचा ओलावा, आपुलकीचा गोडवा आणि जिव्हाळ्याचं खुसखुशीतपण मिसळल्यामुळं की काय, पण तो मांडा बघताक्षणी खाण्याची इच्छा होते. मांडा करणं आणि तो भाजणं, ही एक कला आहे. मांडा करतात ती वेळ असते अगदी पहाटेची. उजाडायच्या आत मांड्यांची चळत दवडीत दिसायची तेव्हा कळायचं,”अरे, आत्याबाईंनी (सासूबाईंनी) मांडे तयार केलेत सुद्धा! .

जसा अखजीचा मांडा, तशीच चिंचोणी! चिंच, तांदूळ, वाळ्याच्या मुळ्या, शेंगदाणे, वेलची, जायफळ, शोप, विड्याची पानं, काथ, चुना, गुळ…सगळ्याची मिळून बनते ‘चिंचोणी’. खापराचा भाजलेला तुकडा, त्यावर जिरं आणि तूप टाकून, तो तुकडा चिंचोणीत बुडवल्यावर येणारा चर्रर्ऽऽ आवाज सा-या घरादाराला सांगतो,”चिंचोणी तयार झाली बरं का…!”

आपल्या स्वर्गस्थ पितरांना तृप्त करण्यासाठी गवरीच्या विस्तवावर भात आणि तूप टाकत त्याचा धूर केला जातो. अखजीचं पान वाढून  झालं की त्या पानाची, उगाळलेलं चंदन लावून पूजा करतात. आणि नवीन लग्न झालेल्या मुलगी-जावयाला मेहूण म्हणून जेवायला बसवतात.

ह्या पद्धती-परंपरा का पाळायच्या? अशाच का? तशाच का? खरंच याला काही अर्थ आहे का?…हे आमचे सुशिक्षितांचे प्रश्न असतात पण, आजही गावाकडे मात्र या परंपरा मनोभावे केल्या जातात.

अखजीला हवेत म्हणून आठ दिवस आधीपासूनच कानोल्याचा घाट घातल्या जातो. कानोले करताना विहिणीची बांगडी, व्याह्याची चिठ्ठी, भावाची पाती, नणंदेची मुरड किती किती प्रकार…थट्टामस्करी, गप्पागोष्टी आणि गाॅसिपिंग…! सोबतच नव्या शेवया नि नव्या कुरड्या, सांडोळ्या जमलंच तर सरगुंडे, बटुये…बरंच काही केलं जातं.

  या सणांचा आनंद आजकाल शहरातून मिळत नाही. त्यासाठी गावजवळ करावं लागतं. तिथे अद्यापही ही संस्कृती टिकून आहे. आजही अखजीचे झुले झुलण्यासाठी पोरीबाळी माहेरी येतात. मुली येतात म्हणून आईला ही ‘अखजी मोलाची’ वाटत असते. तर सईसख्यांसह माहेरचा मनमुक्त झोका खेळणारी माहेरवाशिण बहिणाईचे शब्द मनात घोळवत म्हणत असते,

गेला झोका, गेला झोका

     चालला माहेराले जी

  आला झोका आला झोका

  पलट सासराले जी

खानदेशात अखजीचा झोका खेळायची पद्धत आहे, विदर्भात ही पद्धत नाही पण तरी सुद्धा अखजीची ओढ मनात असतेच.  ‘अखजी कहीची?’ हा प्रश्न आमच्या मनात उमटतो तो चिंचोणी मांड्यांमुळेच! मुक्ताईनं ज्ञानेशासाठी केलेले हे मांडे सामान्यांच्याही आवडीचे पण…

पण अस्सल खरे धांड्यांच्या आचेवर केलेले मांडे खाण्यासाठी जवळ करावं लागतं गाव…! शहरात मिळतात त्या गॅसवर केलेल्या पातळ रोट्या!

पद्धती हरवत जातात तेंव्हा नव्या प्रथा निर्माण व्हायला लागतात. नव्याचं आपलं महत्त्व असतं पण जुन्याचं आपल्या मनातील स्थान मात्र अबाधितच असतं, हो नं? बाकीच्यांचे माहित नाही आमच्या दृष्टीने मात्र आहे…. अखजीचा सन मोलाचा

(लेखिका अकोला आकाशवाणीत प्रासंगिक उद्घोषिका आहेत)

9422938040

खान्देशात दरवर्षी मोठया उत्साहात साजरा होतो आखाजी हा सण-क्लिक करा

 

 

 

 

 

 

Previous articleअखजीची मांडा, चिंचोणी खाताना…
Next articleचालिसाचे राणा, नकली धिंगाणा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here