अखजीची मांडा, चिंचोणी खाताना…

– सीमा शेटे – रोठे, अकोला

    माठ-करा-केळी-मडकं… असे विविध प्रसंगोचित नावं सांगणारा संदेश व्हाट्सअप वर धडकला आणि लक्षात आलं की, येत्या काही दिवसात ‘आखजी’ आहे. पाठोपाठ श्वेताने संदेश पाठवून विचारणा केली, “विदर्भात चिंचोणी करतात त्यामागे काही खास कारण आहे का?”

  तिने प्रश्न विचारला न् विचार चक्र व शोध दोन्ही सुरू झालं. लोकसंस्कृतीच्या पुस्तकांमध्ये मुळातच खाद्यसंस्कृती विषयक फारसा मजकूर मला कधी आढळला नाही, पण अखजीचा सुद्धा ओघाने आलेलाच उल्लेख आढळला. त्यामागची परंपरा नमूद केलेली नाही.

 घ्या शिमग्याची गाठी

 अखोजी आली पाठी

किंवा

अखोजीचा पुजते करा

आला आखाडीचा फेरा 

     असे वर्षभरातील सणावारांच्या गाण्यांमध्ये ती कुठेतरी डोकावते. पण यावेळी माझा शोध अखजीच्या रिती परंपरेचा नव्हताच. कारण त्यावर मी यापूर्वीच स्वतंत्रपणे ‘मांडे मनातले’ मध्ये लिहिलेले आहे. यावेळी मला श्वेताच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे होते. विचार करता करता लख्खकन् एक गोष्ट लक्षात आली की, आपल्या कोणत्याही सणातील पदार्थ विशेषामागे धार्मिक कार्यकारण भावापेक्षा ऋतुमानानुसार आहार, परिपूर्ण आहार ही संकल्पना पूर्वजांनी अवलंबली आहे. ‘अमक्या सणाला तमका पदार्थ हवा’ हा प्रघात  घालून देण्याचा मूळ उद्देश तोच होता. कारण कोणतीही गोष्ट धार्मिक आवरणाखाली श्रद्धेने ऐकली जाते… असे त्यांना लक्षात आले असेल. अर्थात हे अस्संच असेल का? ते ठाम नाही सांगू शकत, पण माझा आपला हा अंदाज आहे. … तर काय सांगत होते? हं…..! एकदा हे विचार मनात आल्यावर लगेच वनस्पती शास्त्रज्ञ आणि आयुर्वेदाचे जाणकार असणाऱ्या नवऱ्याकडून म्हणजे डॉ. एस. पी. रोठे यांच्याकडून माहिती मिळविणे हे ओघानेच आले.

 

   ‘चिंचोणी’ हा खाद्यपदार्थ निश्चितपणे एखाद्या सुगरणीने शोधला असावा आणि ती चिंचोणी या काळातच केली जाते त्याला कारण आहे, चिंचेचे गुणधर्म! विदर्भातील कोणत्याही गावात शेताच्या बांधावर पूर्वी हमखास चिंचेची झाडं असायची. चिंच सहज उपलब्ध होणारी. “आंबट- गोड- थोडी तुरट चवीची चिंच पित्त कफ आणि वायूविकारक असते. ती मलसारक आहे. महत्त्वाचं म्हणजे चिंच पाण्यात  कुस्करून ते पाणी गाळून त्यात साखर अथवा गूळ घालून प्यायल्याने उष्माघातात आराम वाटतो”. आयुर्वेदातील या गुणधर्माला एखाद्या सुगरणीने चवीची जोड देत चिंचोणीला आकार दिला असावा.

डवणा कचोरी खोबर्‍याची वाटी 

सामान घे ना दादा चिंचोणीसाठी

  नवरा चिंचेचे गुणधर्म मला सांगत असताना काम करणाऱ्या कांताबाई गुणगुणल्या ‘डवला कचोरी चिंचोणी मोहनी!’ मी एकदम चमकले. काय? काय? म्हणून त्यांना पुन्हा सांगायला सांगितले. आता यातले ‘कचोरी’ काय असावे? माझ्या शहरी मनाला ‘शेगाव कचोरी’, ”गोटा कचोरी’ माहिती! पण या ओळींमध्ये ती असण्याची शक्यता नव्हती, हे नक्की! मग काय असावे? मात्र माझ्या या शंकेचे निरसन सुद्धा डॉ. रोठेंनी केले. “कचोरा ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे. जी त्रिदोषनाशक आहे तर दवणा हा सुगंधी पदार्थ सुद्धा गर्मी वर उतारा म्हणून वापरतात.”

  एकदा हे सगळं स्पष्ट झाल्यावर माझ्या लक्षात आलं की चिंचोणीतला एकूण एक घटक हा उष्णतारोधक आहे. जसं आदल्या रात्री चिंच, वाळ्याच्या मुळ्या भिजत घालून दुसऱ्या दिवशी ती कुस्करून गाळून त्यात विड्याचं पान, काथ, चुना, विलायची पूड, लवंग, शोप, भिजलेले तांदूळ, जायफळ, शेंगदाणे असं सगळं बारीक वाटून वाटण करतात. नंतर तो गोळा पाण्यात कालवला जातो. वरून खापराचा भाजलेला तुकडा त्यावर तूप जिर्‍याची फोडणी करून तो पाण्यात अलगद सोडला जातो. चर्ररsss  आवाज आला की झाली चिंचोणी तयार. जीवनसत्त्वयुक्त, पाचक अशीही तयार झालेली चिंचोणी थंड झाल्यावर पूर्वी मातीच्या मडक्यात काढून ठेवल्या जायची आणि किमान चार-पाच दिवस तरी तिचा आस्वाद घेतला जायचा.

अखजी, अक्षय तृतीया हा सण उन्हाळ्यातला… वैशाखाला नुकताच प्रारंभ झालेला असतो. अशावेळी बाहेर पेटलेल्या वैशाखवणव्याचा दाह काही अंशी का होईना पण कमी करण्यासाठी ही ‘चिंचोणी’ असावी. उन्हाच्या चटक्यांनी होरपळायला होतं म्हणून तर पूर्वी बायका मांडे, अगदी पहाटे पहाटे तयार करत असत. ओलोल्या गव्हाचा रवाळ दळलेल्या पिठाचा उंडा दुपारीच भिजवून ठेवल्या जातो. शेतातून धांडे आणले जातात. कुंभाराकडून ‘रांधणं’ (हा शब्द मला आमच्या शोभाने, जावेने सांगितला) आणून ठेवलेलं असतं. उत्तर रात्री थंड वातावरणात चुल पेटवल्या जाते. धांड्यांचा जाळ केल्या जातो. चुलीवर ‘रांधणं’ ठेवल्या जातं. कोपरातला कणकेचा गोळा आधी पोळपाटावर थोडा लाटला जातो. आणि मग सुगरणीच्या हातावर स्वार होऊन, लांबच लांब मांड्याचं रूप धारण करतो. तो अल्लादी रांधनावर पसरवून आणि धांड्याच्या आचेवर खरपूस भाजत घडी घालत नेणं हे ‘सुगरणीचं कसबच’ आहे. तयार झालेली मांड्यांची चळत, ओल्या कापडात गुंडाळून दवडीत ठेवायची आणि पितरांच्या पूजेच्या तयारीला लागायचं. तोवर पुरणाच्या पोळ्यांसहित इतर पदार्थ पण झालेले असतातच. (ते पदार्थ कोणते? त्यासाठी वाचा -बहिणाबाईंच्या गाण्यातून भेटणारा अखजीचा सण कसा साजरा करतात? )

  श्वेताच्या एका प्रश्नाने सुरू झालेला हा खाद्य शोध… माझ्या ज्ञानात भर करता झाला. नवे गाणे, नवे शब्द कळले. आजवर अर्ध मडकं उपडे ठेवून, मांडा भाजतात… असं म्हणणार्‍या मला नव्यानेच कळले की त्याला ‘रांधणं’ हा शब्द आहे. हे असं आहे तर…

म्हणतात की वाटल्याने ज्ञान वाढतं म्हणून हे तुमच्यापर्यंत पोचवलं. अखजीची मांडा चिंचोणी खाताना ही रुचकर माहिती तुमच्यासाठी! आणि जाता जाता या चार ओळी सुद्धा…

                                                अखजीची केली घाई

                                                 आली आवस भावयी

                                                 भावयीचा आमरस

                                               आली आखाडी एकादस

(भावयी म्हणजे काय? यासाठी कँलेन्डरचे पान पलटा. अर्थ समजेल)

……………………………………………………………

(लेखिका अकोला आकाशवाणीत प्रासंगिक उद्घोषिका आहेत)

9422938040

 

Previous articleअमेरिका…आहे मनोहर तरी
Next articleबहिणाबाईंच्या गाण्यातून भेटणारा अखजीचा सण कसा साजरा करतात? 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.