अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा त्याग केला आहे . भाजप शासित केंद्र सरकारकडून ‘पद्म’ सन्मान मिळाला आणि राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली तेव्हा निरोपादखल केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अश्रू गाळले , तेव्हापासून गुलाम नबी काँग्रेस सोडणार असल्याची आवाजात चर्चा होती ; ती आता खरी ठरली आहे . राजकारणात ठिणगी पडल्याशिवाय धूर कधीच निघत नाही असं जे म्हणतात , ते पुन्हा एकदा खरं ठरलं आहे . काँग्रेस पक्षात अलीकडच्या कांही वर्षात सुरु झालेली पानगळ अजूनही थांबलेली नाही असाही गुलाम नबी यांच्या पक्षत्यागाचा अर्थ काढता येईल ; खरं तर , ती पानगळ थांबवण्यात काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींना अजूनही यश येत नाहीये असंच म्हणता येईल .
गुलाम नबी आझाद हे व्यापक जनाधार नसलेले नेते होते , हे खरं असलं तरी काँग्रेसचा सेक्युलर आणि तोही राष्ट्रीय चेहेरा अशी त्यांची प्रतिमा होती हे मान्यच करायला हवं . त्यामुळे सुमारे पांच दशके काँग्रेसचा अविभाज्य भाग असलेल्या आणि वयाच्या पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या गुलाम नबी ( जन्म- ७ मार्च १९४९ ) यांनी पक्षत्याग केल्याचा थोडाफार तरी परिणाम काँग्रेसवर नक्कीच होईल . काश्मीरातील एका तालुका काँग्रेस समितीचा अध्यक्ष ते प्रदीर्घ काळ केंद्रीय मंत्री , काही काळ राज्यसभेतील विरोधी पक्षनेता , सुमारे अडीच वर्ष जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री , असा गुलाम नबी यांचा राजकीय प्रवास आहे . थोडक्यात पक्ष सेवेची किंमत त्यांना भरपूर मिळालेली आहे . ते मूळचे संजय गांधी यांचे समर्थक . नंतर इंदिरा गांधी , राजीव गांधी , सोनिया गांधी यांच्याही खास गोटातले नेते म्हणून गुलाम नबी प्रदीर्घ काळ वावरले . राहुल गांधी यांच्या हाती पक्षाची सूत्रे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गेली आणि पक्षातलं गुलाम नबी यांचं महत्व कमी होत गेलं ; इतकं कमी होत गेलं की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविरुद्ध पक्षात सुरु झालेल्या आणि ‘जी-२३’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या बंडखोर गटाचे ते अघोषित प्रवक्तेच झाले . गुलाम नबी यांनी काँग्रेसचा राष्ट्रीय चेहेरा होण्यात महाराष्ट्राचाही वाटा आहे . १९८० आणि १९८४ अशा दोन लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रातील वाशीम मतदार संघातून ते विजयी झालेले होते .
पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांना पक्षत्याग करतांना गुलाम नबी यांनी एक प्रदीर्घ पत्र लिहून त्यांच्या मनातील नाराजी म्हणा की खदखद स्पष्ट शब्दांत व्यक्त केलेली आहे आणि ती रास्त नाही , असं कोणीही म्हणणार नाही . मात्र ती खदखद व्यक्त करतांना पुरेसा प्रांजळपणा गुलाम नबी आझाद यांनी यांनी दाखवलेला नाही यांचा विसर पडू देता कामा नये . राजकीय पक्ष असो की एखादी संघटना की उद्योग किंवा व्यवसाय नेतृत्वात बदल अपरिहार्य असतो . तसा तो काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वातही झाला . २०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल यांच्या नेतृत्वावर जाहीरपणे मोहोर उमटवली गेली तेव्हा व्यासपीठावर गुलाम नबी यांच्यासह ( तेव्हा अस्तित्वात नसलेल्या ) ‘जी -२३’ गटातील अनेक नेते उपस्थित होते आणि राहुल यांच्या नेतृत्वाच्या त्या निर्णयाचं त्या सर्वांनी टाळ्यांच्या गजरात कसं स्वागत केलं होतं यांचा मीही एक पत्रकार म्हणून साक्षीदार आहे .
त्यावेळी बोलतांना राहुल गांधी यांनी बदलत्या काळात पक्षाचा चेहेरा मोहोरा बदलण्याचा मनोदय व्यक्त केलं होता . पक्षात तरुणांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याची गरज राहुल यांनी ओळखली होती . ( नेतृत्वात बदल झाल्यावर मनाप्रमाणे निर्णय घेण्याची मोकळीक देण्याची उमदेपणाची भूमिका जर काँग्रेसमधील बुझुर्ग नेत्यांनी घेतली असती अंतर्गत कलहापासून काँग्रेस पक्ष वाचला असता पण , असं राजकारणात क्वचितच घडतं . ) पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व म्हणून केवळ गांधी घराण्यालाच मान्यता आहे , हे काँग्रेसमधील हे ज्येष्ठ नेत्यांना चांगलं ठाऊक आहे . या गांधी नेतृत्वानं निवडणुका जिंकून द्याव्यात आणि नंतर आपण सत्ता भोगत राहावी , अशी मानसिकता या बूझुर्ग नेत्यांची झालेली होती ; त्यांचीही एक स्वतंत्र घराणेशाही आणि संस्थांनं निर्माण झालेली आहे . राहुल यांच्या म्हणण्याप्रमाणे जर नवीन तरुणांना संधी दिली गेली असती तर या ज्येष्ठ नेत्यांची घराणेशाही आणि मक्तेदारी संपुष्टात आली असती . काँग्रेसमधील बुझुर्ग प्रस्थापित धूर्त नेते आणि राहुल गांधी यांच्यातील संघर्षाची ती कळीची दुखरी ठिणगी होती .
तरुण चेहेरे पुढे आणण्याचा राहुल यांचा मनोदय हा आपल्याला मिळणारा शह आहे , हे या नेत्यांनी ओळखलं आणि काँग्रेसमधील सत्ता संघर्षाला सुरुवात झाली . २०१४ व २०१९च्या लोकसभा आणि याच दरम्यानच्या बहुसंख्य विधानसभा निवडणुकांत गांधी नावाचा करिष्मा असूनही राहुल गांधी विजय मिळवू शकले नाहीत . कारण ज्येष्ठ नेत्यांनी पुरेसं सक्रिय नसणं पराभूत मानसिकता तसंच संघटना म्हणून खिळखिळी झालेली काँग्रेस विरुद्ध संघटनाबद्ध भाजप ( शिवाय नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व ) असा तो विषम सामना होता . सलग पराभवांमुळे काँग्रेस पक्षात नैराश्यही आलं पण गांधी नेतृत्वाला पर्याय नसण्याच्या गर्तेत हा पक्ष सापडला .
बहुसंख्य निवडणुकांत पराभव पदरी पडला तरी २०१४नंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात आवाज उठवण्यात राहुल गांधी कुठेही कमी पडलेले नाहीतच किंबहुना राहुल एकटेच लढत आहेत असं चित्र होतं आणि आहे , हे विसरता येणार नाही . देशभर दौरे , सभा , आंदोलनं करण्यात राहुल गांधी यांनी कोणतीही कसूर ठेवलेली नाही . या काळात राहुल यांनी जेवढे दौरे देशभर केले तेवढा प्रवास ‘जी-२३’च्या सर्व नेत्यांनी मिळून तरी केलेला नाही ! संसद किंवा विधिमंडळातही काँग्रेसच्या या नेत्यांनी नरेंद्र मोदी आणि सरकारच्या विरोधात कधी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसलेलं नाही . सभागृहात आक्रमक भूमिका घेऊन सरकाराला अडचणीत न आणणं म्हणजे सरकारला झालेली मदतच असते आणि त्या मोबदल्यात जर निरोप समारंभाच्या भाषणात सरकारांचा प्रमुख अश्रू ढळत असेल तर त्यामागे काय इंगित असतं , हे लक्षात घ्यायला हवं. .
ज्योतिरादित्य शिंदे , आश्विनीकुमार , कपिल सिब्बल यांच्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल अनेक गंभीर आरोप केले आहेत . लोकशाहीवादी राजकारणात तसे आरोप करण्याचा , पक्ष नेतृत्वाच्या उणिवांवर बोट ठेवण्याचा अधिकार त्यांना आणि त्यांच्या गोटातील नेत्यांना नक्कीच आहे . मात्र काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी गांधी घराण्याबाहेरचं नेतृत्व उभं करण्यात या नेत्यांनी काय प्रयत्न केले , याचाही लेखा-जोखा सादर व्हायला हवा होता . संघटना म्हणून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आणि सरकारच्या विरोधात जनमत संघटित करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तर जाऊ द्यात पण , राज्य आणि त्यांच्या जिल्ह्यात तरी या नेत्यांनी काय प्रयत्न केले आहेत , किती आंदोलने सरकारच्या विरोधात केली , मोर्चे काढले , धरणे धरले , पदयात्रा काढल्या याचाही जाब जर गुलाम नबी यांनी दिला असता तर त्यांनी राहुल यांच्या विरोधात केलेल्या टीकेला प्रांजळपणाची बैठक आणि लोकांची सहानुभूती मिळाली असती .
गुलाम नबी आझाद यांनी केलेले सर्वच आरोप निराधार आहेत असं म्हणता येणार नाही . काँग्रेस हा पक्ष नाही तर तो एक १३७ वर्ष वयाचा विचार आहे , ती भारताची निर्माण झालेली प्रतीमा आहे . हा विचार कुणा एकाच्या जाण्यानं लगेच खुडून पडेल असं नाही पण , भविष्यात तो विचार कोमेजून पडू द्यायचा नसेल तर आणि वर्तन जर एकाधिकारशाहीचं असेल तर त्याबद्दल आत्मपरिक्षणाची भूमिका राहुल गांधी यांना घ्यावीच लागेल , तरच पक्ष म्हणून काँग्रेस पुन्हा बाळसं धरेल . त्यांना असं आत्मपरीक्षण करण्यास पक्षात राहूनच गुलाम नबी यांना साध्य करता आलेलं नाही , यात ते कुठे तरी कमी पडले आहेत .
गुलाम नबी आझाद भाजपत जातील असे वाटत नाही ; भाजपही त्यांना लगेच पक्षात घेईल असे नाहीच , कारण आता त्यांची उपयोगिता संपली आहे . काँग्रेस पक्षात कायमच गांधी घराण्याच्या करिष्म्याच्या छायेत गुलाम नबी आझाद वावरले . त्या करिष्म्यातून ‘आझाद’ होऊन आता ते म्हणे आता काश्मिरात नवा पक्ष काढणार आहेत . त्यांची ही ‘आझादी’ कचकड्याची न ठरो , याच शुभेच्छा!
(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९
प्रवीण बर्दापूरकर यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.