गिरीजाबाईंची  चटका लावणारी कहाणी

MW002170

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२१

समीर गायकवाड

पूर्वी कामाठीपुर्यात एक मुजरा गल्ली होती. इथं गाणं बजावणं चालायचं. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची ही गल्ली होती. लखनौ, मुरादाबादपासून लाहोरपर्यंतचे अनेक शायर इथं रातोरात हजेरी लावून जायचे. अनेक नामचीन शायर त्यात सामील होते. इतिहासाने कधी दखल घेतलेले काही प्रतिभावंत फनकारदेखील इथं यायचे. या सर्व लोकांनी मद्य आणि मदिराक्षीचा मनसोक्त आनंद घेत आपल्या सुखदुःखाच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपलं काळीज तिथं ते कागदावर उतरवत गेले. या गल्लीतील जवळपास प्रत्येक मुजरेवालीकडं शायरांनी त्या धुंद नशेत लिहिलेलं अलौकिक बाड होतं. त्याला काही बायकादफ्तरम्हणत, तर काहीजणीकलमम्हणत, तर काही चक्कदर्दे मौसिकीम्हणत. आता ती गल्लीही नाही आणि त्या बायकाही नाहीत. यातलीच एक सत्तरीतली बाई आताच्या कामाठीपुर्यात मला भेटली होती, तेव्हा ती फाटक्या, कळकटलेल्या चादरीवर बसून जर्मनच्या वाडग्यात भीक मागत होती. पार मळकटलेल्या अवस्थेत होती ती! मात्र, तिचा गळा अजूनही शाबूत होता आणि पायातही थोडीफार जादू बाकी होती. गिरीजा तिचं नाव. त्या गिरीजाबाईची ही चित्रकथा.

000000000000000000000000000

            कामाठीपुर्‍याच्या या मुजरा गल्लीत गल्लीत अरुंद बोळ आणि खेटून उभ्या असलेल्या कळकटलेल्या इमारतींच्या भाऊगर्दीत अजूनही उभी आहे ‘आशियाना’ ही आता पडायला झालेली इमारत. या इमारतीच्या आठवणी हिराबाईशी अन तिच्या मुलीशी ताजेश्वरीशी निगडित आहेत. त्यांच्यासोबत इथेच गिरीजाबाईही राहायची. आजही ‘आशियाना’ गिरीजा आणि हिराबाईच्या मधुर आवाजाला आसुसलेला असेल, असं वाटते. ‘बच्चुची वाडी’ पासून उजव्या हाताला वळून पुढे आले की, गल्लीतली सर्वात जुनी इमारत म्हणजे ‘आशियाना’. जागोजागी भितींच्या गिलाव्याचे पोपडे निघालेले, आतल्या विटांचे लाल-काळे आतडे बाहेर डोकावणारे अवशेष पहिल्या नजरेत तिरस्करणीय वाटतात. इथल्या लाकडी खिडक्यांनी केव्हाच माना टाकलेल्या, तर दरवाज्यांची फळकुटे नावाला आहेत, इमारतीच्या दर्शनी भागातल्या खोल्यांचे सज्जे पार वाकून गेलेले अन् त्यांचे कठडे कलून गेलेले, त्या कठड्यावर आतल्या बायकापोरींनी नाही नाही ते सर्व धुवून वाळत घातलेले! अगदी बेडशीटपासून ते ब्लाऊजपर्यंत, सगळं तिथं बाहेर लटकत राहाते. ‘आशियाना’ एक चौकोनी इमारत आहे. चार विंगा असाव्यात तशी हिची रचना. मधोमध मोकळी जागा, जणू काही मेघांनीही तिथं आत वाकून बघावं अन् आपल्या इच्छा-वासना शमवून घ्याव्यात, अशी तिची बांधणी. दिवसभरात उन्हे या चारही भागातून मनसोक्त फिरतात, इमारतीच्या दाटीवाटीमुळे वारा मात्र इथं फारसा नाही. इमारतीच्या दर्शनी भागातील तळमजल्यावर दुकानांची रांग अन् त्यांच्या मधोमध दरवाजा नसलेली एक भलीमोठी लाकडी चौकट आहे. कधीकाळी इथे दरवाजा असणार, कारण कडी अडकवण्याच्या खाणाखुणा तिथं खाली जमिनीत अन् वर छतात दिसतात. खाली सगळीकडे शहाबादी फरशा अंथरलेल्या, मात्र प्रत्येक फरशीचे तुकडे उडालेले अन् त्या तुकड्यातून डोकावणारी मातकट जमीन. यावरून माणसे ये-जा करत राहतात, लोक खाली बघत आत येत नाहीत, तर त्यांच्या नजरा इतस्ततः खिळलेल्या असतात. त्यामुळे खाली गटारगंगा वाहत असली, तरी ते त्यातून खुशाल पुढे चालतच राहतात. इतरत्र आढळतात, तसे जागोजागी पान खाऊन थुंकलेले जिने, रंग उडालेला बाह्य भाग अन् दाटीवाटीने लावलेली वाहने, पाण्याचे गळके फुटके नळ, मोर्‍यात पडलेली शाम्पूची, गुटख्याची अन् नको त्या गोष्टींची वेष्टने, अशा कबाडखानी अंगणाच्या या इमारतीची खासियत तिथल्या उजव्या दिशेतील चाळवजा भागात होती. अख्ख्या कामाठीपुर्‍यात आता फक्त बच्चूच्या वाडीत नाचगाणं चालतं. पूर्वी या मुजरा गल्लीत आशियान्याच्या चारपैकी या भागातील इमारतीसह अन्य काही घरातही नाचगाणे चालत असे, ते पण असे असायचे की, तिथे अंगाला हात लावून घेतला जात नसे.

            गिरीजाला तिच्या मावशीने, सरोजने इथे आणलेलं. सरोज अगदी गोड गळ्याची बाई होती. दिसायला बर्‍यापैकी देखणी आणि अस्सल लखनवी बाजाचं राहणीमान असणारी. साध्या कपड्यात देखील ती उठून दिसायची. अडल्या नडल्यास मदत करायचा सरोजचा स्वभाव होता. सदान्कदा खाण्याची भ्रांत असणार्‍या आपल्या धाकट्या बहिणीचं, कमलाचं तिला फार शल्य वाटे. त्यामुळे तिने ठरवले की, बहिणीला दैन्यावस्थेतून बाहेर काढण्यासाठी आपणच काहीतरी हातपाय मारले पाहिजेत. मनाचा हिय्या करून तिनं कमलाला सांगितलं की, ‘तुझ्या एखाद्या मुलीला माझ्यासोबत दे, तुला खूप आधार होईल. इथं पैसा बर्‍यापैकी मिळतो, त्यावर तुझं अख्खं घर निभावून जाईल.’ कमलाबाईला आठ मुली आणि दोन मुलं होती. खाण्यापिण्याची आबाळ आणि घरात अठराविश्वे दारिद्य्र असे. नवरा मोलमजुरी करायचा. रोज उठून दारू प्यायचा, तिच्यावर हात उचलायचा. जास्ती पिऊन आला की, मुलाबाळांना देखील हाणायचा. गिरीजा, तिची थोरली मुलगी होती. पोरीबाळी मोठ्या व्हायला लागल्या होत्या. त्यांचं अंग भरून येऊ लागलं होतं. काहींना शाळेत घातलं होतं, तर काहींना संगे घेऊन ती थोरामोठ्यांच्या घरी कामावर जाई. हेतू हा की, तिथलं काही उरलं सुरलं शिळेपाके खायला मिळेल आणि त्यांचा उपवास टळेल. पण, असं किती दिवस चालणार, याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. काही तरी मार्ग काढणे आवश्यक होते. शेवटी तिने काळजावर दगड ठेवला आणि चौदा वर्षाच्या गिरीजाला आपल्या बहिणीच्या हवाली केलं. गिरीजा गेली त्या रात्रीपासून तिचं मन तिला खात राहिलं, अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ती स्वतःला माफ करू शकली नाही.

            तारुण्यात पाऊल टाकणार्‍या गिरीजाला मावशीच्या नटण्या-मुरडण्याचं अप्रूप होतं. आपल्याला आता मावशीच्या गावाला जाता येणार, याचा तिला आनंदही झाला होता आणि मायबापापासून, भावंडांपासून दूर जावं लागणार, याचं दुःखही झालं होतं. आपल्याला मावशीकडे गेल्यावर तिच्यासारखे जरतारी कपडे मिळणार, सुगंधी अत्तर अंगावर शिंपडता येणार, सजता-सवरता येणार, या कल्पनेच्या मोरपिसाने तिच्या विरहवेदना हलक्या होत. एका पावसाळ्यात सरोजने गिरीजाला आपल्या कोठ्यावर आणलं. इथलं वातावरण बघून गिरीजाला आधी भारी वाटलं. मावशी गाते, बायकापोरी नाचतात, समोरचे लोक पैसे उधळतात, हे सगळं तिला स्वप्नवत वाटले. सरोजने गिरीजासाठी नाचगाणं शिकवणार्‍या उस्तादची सोय केली. गिरीजा दिसायला जशी कमालीची आकर्षक होती, तसंच तिचं गायनही अफलातून होतं. अगदी सुरेल आवाजात ती गायची. ऐकणारा तल्लीन व्हावा, अशी जादू त्यात होती. शिवाय, तारुण्याने मुसमुसलेल्या पायात जादूही होती. विजेच्या चपळाईने ते थिरकत. तिचं दिसणं, गाणं आणि नाचणं सारंच अप्रतिम होतं. बघता बघता सहा महिन्यात तिची तालीम संपली आणि तिची पहिली मैफल घ्यायचं पक्कं झालं. तिच्यासाठी साडीवाल्याला बोलावणं धाडलं गेलं. नामी कंपनीच्या साड्या, रेशमी तलम कपडे बघून गिरीजाचा जीव हरखून गेला. त्यातल्याच तब्बल अर्धा डझन साड्या तिच्याकरिता खरेदी केल्या गेल्या. तिच्या मापाचे सलवार कमीज शिवण्यात आले. गिलिटाचे सोन्याचे मुलामा दिलेले दागिने घेतले गेले. पहिल्या मैफलीत तिला अप्सरेसारखं सजवलं गेलं. तिची नजर उतरवून मग पायात घुंगरू बांधले गेले. तिने मैफल अशी गाजवली की, अल्पावधीतच तिचं नाव कर्णोपकर्णी झालं. तिला भक्कम पैसा मिळू लागला. गिरीजाला मिळणार्‍या बिदागीचे पैसे सरोज इमानेइतबारे कमलाच्या घरी पोहोच करायची.

            बघता बघता एक वर्ष उलटून गेलं. गिरीजाला आता घरची आठवण येत होती. तिनं सरोजकडे हट्ट धरला आणि काही दिवसाच्या सुट्टीवर घराकडे जायचं नक्की केलं. भावंडांना कपडेलत्ते घ्यावेत, लंकेची पार्वती असणार्‍या आईला एखादा दागिना घ्यावा, यासाठी तिने टुमणे लावले. गिरीजाला बाहेर नेणं सरोजला टाळायचे होते, पण टाळणार तरी किती दिवस ! शेवटी एका सोमवारी दुपारी त्या बाहेर पडल्या. कामाठीपुर्‍यात आल्यापासून गिरीजा पहिल्यांदाच बाहेर पडली होती. ती बंदिस्त नव्हती, पण तिने बाहेरचे ‘ते’ जग इतक्यात पाहू नये, अशी सरोजची इच्छा होती. कोंबडी झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचा थोडीच राहणार होता! सरोजमौसीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर गिरीजाने अजस्र कामाठीपुर्‍याचं जे बिभत्स, गलिच्छ, ओंगळवाणे स्वरूप पाहिले, त्याने तिला गुदमरायला झालं. तिची विस्फारलेली नजर पाहून सरोजने तिला जवळ घेतले, आपल्या अश्रूंना वाट करून दिली. इथं वासनेचा बाजार कसा भरतो, मुली कशा आणल्या जातात आणि त्यांचा शेवट काय होतो, ही सर्व कर्मकहाणी तिला थोडक्यात सांगितली. तेवढ्यानेच तिला भोवळ यायची वेळ आली होती.

            संध्याकाळ होईपर्यंत त्या दोघी खरेदी करून परत आल्या. घरातून निघताना जो आनंद गिरीजाच्या चेहर्‍यावर झळकत होता, तो आता साफ मावळला होता. दोनेक दिवसांनी त्या बनारसला रवाना झाल्या आणि तिथून सरोजने आधी गिरीजाला तिच्या घरी सोडलं. एक रात्र मुक्काम करून ती पुढे आपल्या घरी रवाना झाली. आपल्या मुलीचं देखणं रूपडं पाहून, तिच्यात झालेला कायापालट अनुभवून ती माय माऊली हरखून गेली होती. तिच्या भावंडांना देखील खूप आनंद झाला होता. माहेरी आलेल्या पोरीचे लाड करावेत, तसं कमला करत होती. तिला न्हाऊ माखू घालण्यापासून ते रात्री ती झोपी गेल्यानंतर गुपचूप तिचे पाय चेपून देण्यापर्यंत सगळं करे. आपली मुलगी एकटी असली की उदास असते, हे तिने ताडले होते. तिने खूप खोदून-खोदून विचारले, पण गिरीजानं काही केल्या तोंड उघडलं नाही. मुंबईत परतायचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला, तसतशी तिची अस्वस्थता वाढत गेली. अन्न गोड लागेनासे झाले, डोळ्यावरची झोप उडून गेली. तिचं मन तिला खाऊ लागलं. खरंतर, तिला परत जाऊ वाटत नव्हतं, पण आपण गेलो नाही, तर आपल्यामागे इथं सगळ्यांची उपासमार ठरलेली आहे, हे तिला उमगले होते. तिची तगमग आईच्या काळजाने हेरली. एका रात्री कमलाने तिला शपथ घातली तेव्हा गिरीजाने तिला फक्त जोराने मिठी मारली. तरी देखील मनातलं सगळं मळभ ती रितं करू शकली नाही. आपल्या दुःखाने आपल्या आईचं जगणं हराम होऊन जाईल, हे तिला माहिती होतं. त्यामुळे काळजाचा सल तसाच टोचता ठेवून ती परत आली. येताना भावंडांच्या गळ्यात पडून रडली. आपली बहीण इतकी का रडत्येय, हे त्या लहानग्यांना समजण्यापलीकडचे होते. गिरीजाच्या हळव्या निरोपामुळे कमलाच्या गावातले लोक देखील बुचकळ्यात पडले होते. नाही म्हणायला, सरोजच्या बदनामीचे काही शिंतोडे आता गिरीजाच्या वाट्याला यायला सुरुवात झाली होती.

            या खेपेला मुंबईत कामाठीपुर्‍यात आल्यानंतर तिनं काळजावर धोंडा ठेवला आणि इथला सगळा व्यवहार हळूहळू समजून घेण्याकडे तिने कल ठेवला. बघता बघता वर्षे गेली. तिचं घराकडे जाणं कमी झालं. तिच्या बहिणींची लग्ने होऊन गेली. भावंडांना चरितार्थाचा आधार झाला होता. थकून गेलेली आई तिला परत बोलवत होती, पण आपल्यामुळे गावात आईची बदनामी व्हावी, हे तिला पटत नव्हते. एका वर्षी तिचा बाप मेल्याचे पत्र आले, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहिले नाहीत; त्याचवेळी मात्र आईकरिता खूप वाईट वाटलं. अखेरीस सर्वात धाकट्या भावाच्या लग्नाच्या वेळेस मात्र ती गावाकडे जाऊन आली. खरे तर, त्या निमित्ताने आईला डोळे भरून पाहणे, हेच भेटीचे खरे उद्दिष्ट होते. त्यानंतर ती पुन्हा मुंबईत आली. काही महिन्यांनी एका पावसाळ्यात आई गेल्याचं पत्र आलं. त्या दिवशी मात्र ती खचून गेली. पण, ती गावाकडे गेली नाही, कारण तिथं तिची अंतःकरणापासून वाट बघणारं कुणी उरलं नव्हतं. त्या रात्री तिला झोप कसली म्हणून आली नाही. नंतरही कितीतरी दिवस तिला आईचे भास होत होते. तिच्या जगण्यातला जणू रस हरवला होता.

            बघता बघता काळ पुढे सरकत गेला. तिची उमर ढळत गेली. लोकांची आवडही बदलत गेली. गल्लीतलं गाणं- बजावणं कमी होत गेलं. तिच्यामागून आलेल्या लोकांची उपासमार होऊ लागली, तर तिचा काय पाड लागावा! तिचे हलाखीचे दिवस सुरू झाले. तशीच आणखी काही वर्षे निघून गेली…

            हिराबाईच्या केसची माहिती घेण्यासाठी तिथं गेल्यावर गल्लीच्या कोपर्‍यावर चहाच्या टपरीपाशी फाटक्या, कळकटलेल्या चादरीवर बसून जर्मनच्या वाडग्यात भीक मागणारी, जर्जर अवस्थेकडे झुकलेली गिरीजा दिसली होती. डोक्यावरच्या केसांची चांदी झालेली. समोरचे काही दात पडलेले. एकेकाळचे लालबुंद पाकोळीसारखे नाजूक ओठ सुकून गेले होते, त्यांना चिरा पडल्या होत्या. कधी काळी देखण्या सौंदर्याची चकाकती झळाळी असणारा चेहरा आता धुळीने भरलेला होता. खोल गेलेल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे जमा झाली होती. कानाच्या मुलायम पाळ्या रित्या लोंबत होत्या. गाल ओघळून गेले होते. कपाळावर सुरकुत्यांच्या रेषांचा आकृतिबंध साकारला होता. भांगेत कुमकुम लावून लाल झालेली रेष फिकट झाली होती. गळ्यात कसल्याशा काळ्या मण्यांची माळ होती. हातात कचकड्याच्या बांगड्या होत्या. मान थरथरत होती. तरीही, तिच्यात एक चुंबकीय आकर्षण होतं, जे मला इतकं तीव्रतेने जाणवलं की, तिच्याकडे खेचला गेलो. शेजारच्या हॉटेलमधून तिला खायला आणून दिलं. तिने आधी माझ्या चेहर्‍याकडे निरखून पाहिलं. तिला काय वाटले कोणास ठाऊक, पण पुढच्याच क्षणाला अक्षरशः अधाशासारखी ती तुटून पडली. तिची भूक पाहून तिला पुड्यात आणखी खायला आणलं, त्यावर पुन्हा एकदा तिने मला निरखलं. आताचा पुडा तिने मांडीखाली दडवून ठेवला. पोटभर पाणी पिऊन झाल्यावर मी खिशाकडे हात नेताच तिने हात जोडले. ‘नहीं नहीं’ असं म्हणत ती केविलवाण्या नजरेने पाहू लागली. तशा अवस्थेतील तिचे ते दोनच शब्द कानाला विलक्षण गोड वाटून गेले.

            तिचा अंदाज घेण्यासाठी म्हणून सहजच फासा फेकून बघितला. ‘मुफ्त कुछ नहीं दे रहा हुं, कुछ सुनाओगी तो दूंगा!’

            माझं वाक्य ऐकताच, तिच्या तेजहीन डोळ्यात विलक्षण चकाकी आली. म्लान चेहर्‍यावर एक आगळीच चमक येऊन गेली. ‘क्या कहा तुमने? एक बार फिरसे दोहराओ,’ अत्यंत आतुरतेने तिने विचारले.

            ‘यही की तुम कुछ गाओगी, कुछ चीज सुनाओगी, तो मैं कुछ देनेवाला…वरना मैं चला!’

            हे ऐकण्यासाठी बहुधा तिचे प्राण कानी आले असावेत. झटकन पुढे होत तिने माझ्या हातांचे चुंबन घेतले. त्याने माझ्या अंगअंगात विजेच्या लहरी पसरल्या.

            मी आता तिथेच बसकण मारली. तिने एक क्षण मातीला हात लावला आणि एक मोठा श्वास घेऊन सुरेल तान घेत गायला सुरुवात केली.

            तिला फक्त पोटभर जेवण दिल्यानंतर तिनं ‘हमरी अटरिया पे आवो संवरिया…’ गाऊन दाखवलं होतं. गाताना ती हसतमुख दिसत होती आणि तो अलौकिक स्वर ऐकून माझे डोळे वाहायचे थांबत नव्हते. येणारे-जाणारे बाजारबुणगे लोक हैराण होऊन आमच्याकडे पाहात होते. एक-दोघांनी तर मलाही भिकारी समजून पैसे दिले होते. गाणं कधी संपलं, काही कळलंच नाही. चेहर्‍यावर खजील भाव आणत लोकांनी टाकलेले पैसे तिने गोळा केले. तिला खायला दिलेला सब्जीरोटीचा पुडा आणि जमा झालेले ते पैसे ती पदरात बांधून घेऊ लागली. ती आता उठण्याच्या बेतात आहे, हे माझ्या लक्षात आले.

            तिची काही वास्तपुस्त लावता यावी, यासाठी तिचं काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्यासाठी मी पुढचा फासा टाकला. एनजीओद्वारे एखाद्या अनाथाश्रमात भरती करून देतो, म्हणाल्यावर तळहाताचा मुका घेत म्हणाली, ‘मुझे यहीं मरना है, खुले अस्मान तले. मेरी जान जायेगी, तो शायद दुनिया जान जायेगी की, बूढी कोठेवालीका हाल क्या होता है! वरना लोग समझेंगे के कोठेवाले भी अय्याशी में चैन की मौत मरते है!’ तिच्या त्या उत्तराने अंगावर वीज कोसळावी तसं झालं. तिला नाव विचारलं. कसनुसं हसत ती बोलली, ‘नाम जानकर क्या करोगे? वैसे गिरीजा नाम हैं मेरा!’ बघताबघता फाटक्या साडीच्या पदराने डोळे पुसत ती उठून गेली. मी दिङ्मूढ होऊन तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे थिजल्यागत पाहात होतो. तिच्या गोर्‍यापान पावलांना पडलेल्या लालकाळ्या भेगा काळजाला भेदून गेल्या आणि मग मी भानावर आलो.

            तिच्याबद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा होती. आसपासच्या नव्या पिढीतल्या कुणाकडे तिची सविस्तर माहिती असणं शक्य नव्हतं. तिथं गाणं-बजावणं करायला येणार्‍या उस्ताद लोकांपैकी दोन नाव लगेच डोळ्यापुढे तरळून गेली. त्यातलेच एक होते सत्तरी पार केलेले जुम्मनमियां, ज्यांनी हिराबाईलाही गाण्याची तालीम दिली होती. त्यांच्या पुढ्यात जाऊन बसलो आणि गिरीजाबाईबद्दल काहीतरी सांगा म्हटल्यावर आधी त्यांनी नकार दिला. फार हट्ट केल्यावर तिची सगळी हकीकत सांगितली.

            वय वाढून उपासमार सुरू झाल्यावर म्हातार्‍या झालेल्या सरोजचा असाच एका भयाण रात्री उपेक्षित मृत्यू झाला होता. पण, मरताना तिने एक सत्य गिरीजाला सांगितलं होतं. सरोजची एक अनौरस मुलगी होती, जी इथंच जन्मली होती आणि इथल्याच गाळात रुतली होती. आपल्या आईची तिला फार घृणा वाटत असे. धंदा करता करता तिच्या पोटातही कुणा एकाने विश्वासाने बीज रोवले. ती गाफील राहिली. तिचं गर्भारपण होईपर्यंत त्यानं साथ दिली, पण दैवाने तिच्यावर आघात केला होता. तिला मुलगी झाली, पण ती जन्मतः विकलांग होती. मीरा तिचं नाव. तिला चालता येत नव्हते. पाठीवर कुबडही होतं. तिच्या पोटी जन्माला आलेली तशी मुलगी पाहून त्या पोरीचा बाप म्हणवून घेणारा पुन्हा कधी तिकडे फिरकलाच नाही. ती बिचारी त्याची प्रतीक्षा करत या हाडामांसाच्या गोळ्याला प्राणाहून अधिक जपत कशीबशी जगू लागली. आपल्या आईमुळे आपण या गटारात रुतलो, याचे तिला फार वैषम्य वाटे. त्यामुळे तिने आईशी सगळे संबंध तोडून टाकले. चारेक वर्षे अशीच गेली आणि एका गिर्‍हाईकासोबत ती बाहेर गेलेली असताना अपघातात मृत्युमुखी पडली. ती गेली आणि मीरा उघड्यावर पडली. जयवंतीने मीराचा जमेल तसा सांभाळ केला. इथल्या बायांना जग लुटत असले, तरी त्या एकमेकीसाठी प्रसंगी जीवही देतात, हे जयवंतीने दाखवून दिले. जयवंतीने आपलं आयुष्य पणाला लावून मीराचा सांभाळ केला. इकडे सरोजच्या जीवाची अक्षरशः घालमेल होऊ लागली. त्यातच तिचा करुण मृत्यू झाला. पण, मरण्याआधी तिने गिरीजाकडून आपल्या अपंग मीराच्या पालनपोषणाचा शब्द घेतला. त्या दिवसापासून मीराच्या जगण्याची ती उमेद होऊन गेली. ज्या मावशीमुळे आपलं कुटुंब सुखाचे चार घास खाऊ शकलं, तिला दिलेला शब्द निभावणं हे गिरीजाला पुण्याचे काम वाटत होते. आपल्या घासातला घास ती मीराला देई. तिच्यासाठी जगणं, हेच तिचं ध्येय झालं होतं. आधी घरादारासाठी झिजलेली गिरीजा आता मीरासाठी झिजत होती. दिवस अगदी वाईट आल्यावर भीक मागून दोघींचं पोट भरत होती.

            त्या दिवशी दिलेला अन्नाचा घास आणि जमा झालेले पैसे घेऊन ती मीराकडेच गेली असावी, याचा अंदाज आला. जुम्मनमियांशी बोलून झाल्यावर मी तडक पुन्हा मीराला ज्या इमारतीच्या जिन्याखाली ठेवलं होतं, तिथे आलो. वर्णन करता येणार नाही इतका काळीज हेलावून टाकणारा तो प्रसंग होता. त्या अंधारकोठडीत, जाळ्या जळमटात ते थकलेले जीव एकमेकाला बिलगून झोपले होते. जर्जर झालेल्या गिरीजाच्या कुशीत मीरा होती. ती जणू काही तिच्या पोटी जन्माला आली असावी, अशी वाटत होती. गिरीजाच्या चेहर्‍यावर समाधानाची हलकी रेष झळकत होती. त्यांना जागं करणं योग्य वाटलं नाही. तिथून निघून आल्यावर काही दिवसांनी त्या विस्मरणात गेल्या. काही दिवसांनी तिथं पुन्हा गेल्यावर मात्र जिन्याखालचा तो परिसर भकास दिसला. तिथे कोणीच नव्हतं. फाटक्या तुटक्या चिंध्या आणि एक जर्मनचे चेमटून गेलेले वाडगे तिथे होते. गिरीजाच्या हातात त्या दिवशी पाहिलेले भांडे तेच होते. काळजात चर्र झाले. तिथंच इकडं तिकडं वाकून पाहिलं, पण सगळीकडे नुसती अस्वच्छता आणि धूळ भरून राहिली होती. त्या दोघींचे काय झाले, हे कुणाला विचारायची हिंमत माझ्यात नव्हती. जड पावलाने परत फिरलो आणि गल्लीच्या त्या कोपर्‍यापाशी आल्यावर का कुणास ठाऊक ‘हमरी अटरिया पे आवो संवरिया…’चे तेच आर्त स्वर कानी आल्याचा भास झाला. गिरीजा आणि मीराचे ओघळते चेहरे गर्दीतल्या माणसात विरघळत जाताना दिसले आणि डोळ्यांतून अश्रू कधी ओघळले, कळले देखील नाही…

—————————————

लेखक नामवंत स्तंभ लेखक ब्लॉगर आहेत.

8380973977

…………………………………….

समीर गायकवाड यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –समीर गायकवाड– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleजगभरातील मैत्रिणींच्या भन्नाट कथा
Next articleबहिरमचं झगमग स्वप्न
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.