जगभरातील मैत्रिणींच्या भन्नाट कथा

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२१

सुलक्षणा वर्हाडकर

परदेशात राहात असल्याने बर्याचजणी एकमेकींना पकडून असतात. कारण, इंग्रजीसारखी सर्वांना जोडणारी भाषा फक्त सहा ते सात टक्के लोकसंख्येला बोलता येते. जपान, चीनमध्ये असतांना मला हे चित्र पाहायला मिळालं होतं. तर, रिओ दि जनेरो या शहरातील माझ्या गटात किंवाघेटो असणार्या मैत्रिणी रशियन, इटलियन, ज्यू, ग्रीक आहेत. समूहात पन्नासाहून अधिक देशातील मैत्रिणी आहेत, पण रात्री दोन वाजता फोन कराव्यात अशा आतल्या गटातील चार ते पाच! या लेखात मी माझ्या आयुष्यात भेटलेल्या जगभरातील मैत्रिणींबाबत सांगणार आहे.

000000000000000000000000000

            माझ्या काही मैत्रिणी ‘कॅफेझिनो’साठी घरी येतात तेव्हा कॉफीवर कॉफी असते. जपानी, चिनी आणि भारतीय चहा, ब्राझीलचा, उरुग्वेचा पारंपरिक चहा, फार उन्हाळा असेल, तर त्यानुसार फळांचे रस, चीजचे असंख्य प्रकार… कारण, कोणत्या देशातील मैत्रिणीला नेमकं कोणतं चीज आवडेल, हे माहीत नाही. माझ्या तीन मैत्रिणी शेफ आहेत. एक नामांकित इटालियन शेफ, एक हौशी रशियन शेफ आणि एक जपानी शेफ.

            परदेशात राहात असल्याने बर्‍याचजणी एकमेकींना पकडून असतात. कारण, इंग्रजीसारखी सर्वांना जोडणारी भाषा फक्त सहा ते सात टक्के लोकसंख्येला बोलता येते. जपान, चीनमध्ये असतांना मला हे चित्र पाहायला मिळालं होतं. तर, रिओ दि जनेरो या शहरातील माझ्या गटात किंवा ‘घेटो’त असणार्‍या मैत्रिणी रशियन, इटलियन, ज्यू, ग्रीक आहेत. समूहात पन्नासाहून अधिक देशातील मैत्रिणी आहेत, पण रात्री दोन वाजता फोन कराव्यात अशा आतल्या गटातील चार ते पाच! या लेखात मी माझ्या आयुष्यात भेटलेल्या जगभरातील मैत्रिणींबाबत सांगणार आहे.

            माझी सर्वात पहिली मैत्रीण होती फ्रान्सची कॅटीने ब्रिटेची. ती माझी शाळेतील पेनफ्रेंड होती. मग दुसरी एक मैत्रीण होती अंकाराची. याच दरम्यान ‘किशोर’ साप्ताहिकाच्या एका कथास्पर्धेत मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं होतं. त्याच अंकात किंवा मागेपुढे एका रशियन मुलीची माहिती आणि मुलाखतवजा स्फूट आले होते. आमच्या घरी अनुवादित रशियन पुस्तकं बरीच असायची. मॅक्झिम गॉर्की हे मी वाचलेलं अगदी सुरुवातीचं पुस्तक. रशियन लोकजीवनाबद्दल तेव्हा फार उत्सुकता होती. पेडर रोडवरच्या ‘हाऊस ऑफ सोव्हिएट कल्चर’ या संस्थेत तीन वर्षे रशियन शिकल्याने अ‍ॅनाशी पत्रव्यवहार चालू झाला. ती मुंबईत आली, तेव्हा माझ्याच घरी आठवडाभर राहिली. वयाच्या सोळाव्या- सतराव्या वर्षापर्यंत तीन-चार देशातील मैत्रिणींशी संवाद साधत होते; त्यातून त्यांचे जग पाहायला मिळत होतं. कॅटीने ही फ्रान्समधल्या लहानशा गावात राहात होती. राखाडी रंगाचं कौलारू घर आजही लक्षात आहे. आम्ही तीन वर्षे एकमेकींना पत्र पाठवलीत. यात आम्ही आमच्या जीवनशैलीबद्दल लिहीत असू. कोडॅकच्या कॅमेर्‍याने वडिलांना सांगून फोटो काढून घेऊन तिला पाठवले जात होते. तिच्या घरी सकाळ-संध्याकाळ दुपार लांबलचक ब्रेड आणि वाईनचे ग्लास पाहून मला नेहमी आश्‍चर्य वाटायचं. वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख तेव्हापासून सुरू झाली.

            रिओतल्या कॅफेझिनोत सहजपणे वावरताना त्यामुळे कधीही पाहुण्यासारखं, चोरल्यासारखं वाटलं नाही. भारतीय आहे, तर फक्त चिकन करी समोसे बनवून नेतेय, डायनिंग टेबल लावतेय, असंही कधी वाटलं नाही. एक व्यक्ती म्हणून, ग्लोबल सिटिजन म्हणून मला सगळ्या मैत्रिणींना समजून घेता आलं. हा लेख याच विषयावरचा. जगभरातल्या मैत्रिणींशी वागताना, बोलताना, गप्पा मारताना, शेअर करतानाचे विविध अनुभव या लेखात लिहितेय.

            या सर्व मैत्रिणींमुळे माझी सांस्कृतिक बुद्धिमत्ता वाढली. ‘कल्चरल इंटेलिजन्स’ अर्थात  C.Q/C.I म्हणून या विषयाकडे पाहिलं जातं. ज्याप्रमाणे  “I.Q.’ आणि  “E.Q.’  आहे, त्याचप्रमाणे “C.Q. ‘ हा एक विषय आहे. मी नेमकं काय शिकले, ते लेखाच्या शेवटी लिहिणार आहे. त्या आधी काही किस्से, उदाहरणं, घटना शेअर करतेय. दर महिन्याच्या कॅफेझिनो किंवा बुक क्‍लबमध्ये भेटल्यावर काय गप्पा होतात, हेही फार रोचक आहे. आमच्या गप्पांचे विषय तर अतिशय भन्नाट असतात. बसल्या-बसल्या माहितीचा ओघ… एका बैठकीत हजारो मैलांचा प्रवास, तर कधी वनवासाच्या कहाण्या! जगाच्या पाठीवर स्वतः घेतलेल्या निर्णयाला संपूर्णतः स्वीकारून सकारात्मक पद्धतीने आयुष्य जगणार्‍या सासूरवाशीण बायका! त्यांच्याशी बोलताना जाणवतं की, किती खपल्या धरल्या असतील! घरदार सोडून, परक्या देशात चहाच्या-कॉफीच्या एकेका घोटाबरोबर डोळ्यांनी बोलणार्‍या माझ्या केरिदा अमिगा या मैत्रिणी आणि आमचं मैत्र. माझ्या मानसशास्त्रातील पदवीमुळे अधिकृत लायसन नसतानाही अनेकजणी समुपदेशनासाठी मन मोकळं करतात. त्यातून अनेकींचे संसार वाचले गेलेत. पुरुष स्थलांतर करतो, तेव्हा पुरुषार्थ सिद्ध होतो. त्याची शिकार करण्याची क्षमता सिद्ध होते. परदेशात राहात असल्याने तेवढाच नातेवाईकांमध्ये मान! जोडीला बरंच काही. बायका स्थलांतर करतात, तेव्हा सर्वात आधी लवचीकता शिकतात त्यांचं परदेशातील आयुष्य म्हणजे एक न लिहिलेलं खंडकाव्य असतं. नवर्‍या पाठी-पाठी, नवर्‍याच्या नंतर, तो नसताना, असून नसणार्‍या नवर्‍यासाठी… कोणतेही कारण असो, एका बाईला इतिहास लिहायला मदत करतो.

            असं स्थलांतर सीतेनं केलं, द्रौपदीने केलं, शिळेत रुपांतर होताना अहल्येनं केले. होळकरांची असो की, झाशीची लक्ष्मीबाई असो, जिजाबाई या अशाच स्थलांतरित होऊन आल्यात आणि त्यांनी एक वैभवशाली इतिहास घडवला. ही मोठी नावं आहेत. मी ज्या बायकांबद्दल बोलतेय, त्या सर्वसाधारण आहेत. तुमच्या-माझ्यासारख्या… त्यांनी घडवलेला इतिहास कदाचित चारपाच जणांपेक्षा जास्त जणांना माहीत नसेल, तरीही तो तेवढाच अस्सल असणार आहे. माझ्या कॅफेझिनोमध्ये या महापुरातून वाचलेल्या लव्हाळ्यांच्या अनेक कथा-पटकथा आहेत. एका कॉफीच्या कपात अख्खं बाईपण ढवळून निघाल्याच्या कथा!

            कॅफेझिनो म्हटलं की, चिनी मातीची क्रॉकरी आलीच आणि क्रॉकरी आली, म्हणजे बाई आलीच. ‘किन्त्सुगी’ ही एक जपानी संकल्पना आहे. तडा गेलेल्या चिनी मातीच्या भांड्यांना सोन्याने भरायचं, सोन्याने जोडायचं. तडा गेलेले, चिरा गेलेले भरजरी कप आणि त्या उचलणार्‍या माझ्या देशविदेशातील मैत्रिणी, स्नेही, ओळखीच्या बायका!

            एक फ्रेंच बोलणारी युरोपियन मैत्रीण होती, म्हणजे आहे. आता ती परत गेली. तीन मुलांची आई. तिने मला एकदा एक प्रेझेंट दिलं होतं. एक शॅम्पूची बाटली. फ्रेंचमध्ये लिहिलं होतं. तिला इंग्रजी बोलता येत नव्हतं, पण थोडंसं पोर्तुगीज आणि इटालियन येत होतं. लेखक-संशोधक म्हणून माझा व्हिसा कायम होत असताना तिनेही व्हिसासाठी अर्ज केला होता. काही कारणाने तिचा अर्ज नामंजूर झाला. तिला इथेच राहायचं होतं. नवर्‍याची बदली युरोपात झाली. मुलांच्या शाळेमुळे ती इथेच राहिली. त्यांचा घटस्फोट होणार, असं ऐकलं होतं. घटस्फोटाबद्दल तिने विषय काढला नाही, म्हणून मीही काही जास्त विचारलं नाही. पुढे ती कॅन्सरमुळे खचून गेली. घटस्फोटही झाला. परत तिच्या देशात गेली. इन्स्टावर फार मोटिव्हेशनल व्हिडिओ टाकत असते, पण त्यात मुले दिसत नाहीत कधी. दुसरी अशीच एक दुःखी नायिका, दक्षिण आफ्रिकेतून आलेली. नवरा स्कँडेनेव्हियन, वडील भारतीय, आई फ्रेंच. तिच्याकडे भारतीय असल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. ती लहान असताना आईवडील वेगळे झाले आणि आता चार मुलांना घेऊन ती वेगळी झाली. कमावण्याचा काही मार्ग नाही. चित्रं काढायची, पण चित्र विकून संसार कसा चालवणार? मुलांचा खर्च नवरा देत होता, पण तो नोकरी बदलून गेला. म्हणाला, इथला खर्च देणार नाही. तिचाही व्हिसा रद्द झाला. परत गेली ती. फक्त लग्न या एकमेव निकषावर परदेशी आलेल्या या स्त्रिया परावलंबी होऊन गेल्यात. करिअर करणारं कुणी असेल, तर किमान स्ट्रगल तरी करता येतो. ‘बेनेफिट ऑफ डाऊट’ मिळून व्हिसा रद्द होत नाही. त्या दोघींचे व्हिसा रद्द झाले. त्या नाराजीने परत गेल्यात, सोशल मीडियावरून गायब झाल्या, दुखावल्या गेल्या.

            परदेशात राहाताना एका देशातून दुसर्‍या देशात स्थलांतर करताना अनेक रंगाचे अनुभव येतात. पुढचा किस्सा असाच एका रंगाचा. तुझी चप्पलची साईज 38 आहे का? खरे तर माझ्या पायाची साईज जपानमध्ये 27, भारतात 7 आणि ब्राझीलमध्ये 38.5/39 आहे. रोजाने माझ्या पायाकडे पाहून म्हटले. रोजा एक हेअर स्टायलिस्ट आहे. गेली सहा वर्षे तीच माझे केस कापते, रंगवते, ब्लो ड्राय करून देते. अ‍ॅपाईंटमेंट घेऊन गेले होते मी. तिला माहीत होतं, मी येणार आहे ते. ती माझ्याच वयाची. नवरा एक फिलिपिनो बाईबरोबर निघून गेला. तिचा मुलगा आहे एक, जो नोकरी करतो आणि हे हेअर स्टायलिस्ट आहे. मला ब्लो ड्राय केस आवडत नाहीत, पण ब्राझीलमध्ये सामाजिक पातळीवर सगळ्याच वर्गातील स्त्रिया नेहमी केस सेट करतात. तो शिष्टाचाराचा भाग आहे. त्यामुळे महिन्यातून एकदा मीही केस सेट करून घेतेच. रोजाला ‘मकारामे’ आर्ट करायला आवडतं. मी ते तिच्याकडून शिकतेय. आमची छान मैत्री आहे. तर, माझ्या पायाकडे पाहून ती म्हणाली, ‘तुझ्या पायाची साईज 38 आहे ना!’ स्वतःचं घर, चारचाकी गाडी असलेली आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेली रोजा फार वाचन करते. अनेक पोर्तुगीज कविता मी तिच्याकडून शिकलेय. तर, ही रोजा माझ्यासाठी लेदरची चप्पल घेऊन आली होती, माझ्या पन्नासाव्या वाढदिवसासाठी.

            होजा अँजेला ही व्यवसायाने डॉक्टर असलेली, साठीच्या जवळची मैत्रीण. एके दिवशी तिला वाटलं की, आपण प्राण्यांचे डॉक्टर म्हणून का काम करतोय? त्यापेक्षा आपलं मनाजोगतं काम करायला हवं. त्यानंतर ती मातीची आकर्षक भांडी बनवायला लागली. दर रविवारी रिओच्या एका मार्केटमध्ये ती आणि तिचा नवरा ही आकर्षक भांडी आणि दागिने विकतात. आपल्याला जे करायला आवडतं, ते करायला मिळणं – त्यातून व्यावसायिक बुद्धिमत्ता वापरून व्यवसायात रूपांतर करणं, आपली जीवनशैली तशी बनवणं आणि आत्मविश्‍वासाने जगणं, हे तर टिपिकल रिओमधील जगणं.‘डॉक्टर असताना मी हरवले होते, ती या मातीत सापडले’, असं तिचं म्हणणं होतं. होज अँजेलाला कुंभाराचं चाक फिरवताना पाहून मला नेहमी कार्यपूर्तीचं समाधान मिळतं.

            आपला पेहराव, पर्सनल हायजीन, शिक्षण, पेहराव, परंपरा, ककौटुंबीक पार्श्‍वभूमी या सगळ्याचा एकमेकांशी किती आणि कसा पूरक संबंध असतो? पेहरावाला घेऊन एक बुद्धिमत्ता आहे. त्याला ‘अपिअरन्स इंटेलिजन्स’ म्हणतात. यात कमी किंवा महाग कपडे येत नाहीत, तर तुम्ही कपड्यांमधून स्वतःला कसं व्यक्त करता, ते येतं. काहीही उचललं आणि घातलं, असं होत नाही. मोजके कपडे असले, तरी त्यात योग्य निवड असते.

            अंधेरी लिंक रोड किंवा जुहू विलेपार्ले इथल्या शाळेत, महाविद्यालयात शिकल्यावर ट्रेनी पत्रकार म्हणून काम करताना खुपसे सांस्कृतिक धक्के बसलेत. यात भाषेचे उच्चार, आणि पेहराव देखील होता. यात चांगलं-वाईट काही नाही, तर ‘एक्स्प्रेशन’चा भाग होता. मुंबईत तसेही सर्वजण ‘घेट्टो’त राहातात. सरसकट सगळे युनिफॉर्म आयुष्य जगत नाही. सुदैवाने अंधेरी-जुहू हा घेट्टो बहुसांस्कृतिक, बहुमिश्रित आहे. त्यामुळे एका झेंड्याखाली येत नाही.

            सिनेपत्रकारिता करताना, शूटिंग रिपोर्ट वगैरे कव्हर करताना इतर जण भेटत, तेव्हा हा फरक प्रकर्षाने जाणवत असे. तुमचा पगार किती?, तुम्ही बोलता किती? हे असले कपडे ट्रेनी पत्रकाराने घालून यायचे म्हणजे? तुमच्या पगारात पहिल्या वर्गाचा पास बसतो? माझ्या सुरुवातीच्या दिवसात झालेला हा संवाद आणि उडालेले खटके. ल्युसेमाला भेटते तेव्हा मला नेहमी वरचा संवाद आठवतो. ती आमच्या सोसायटीतील सफाई कामगार. लिफ्ट पुसणे, जमीन पुसणं, स्वच्छ करणं, ही तिची रोजची कामं. मला तिचा फॅशन सेन्स आवडतो. सफाई कामगार या व्यवसायात ती खूश आहे. तिचा व्यवसाय दजार्र् किंवा श्रेणी घेऊन येत नाही. तो फक्त व्यवसाय आहे. तिच्या कपड्यांचा सेन्स पाहून मला ती फॅशन डिझायनर वाटते. ती ब्लॉगर आहे, तिचे यू-ट्यूब चॅनेल आहे स्वतःचं. सफाई कामगार असल्याबद्दल ती उगीचंच अपोलोजेटिक नाही. खूश आहे आयुष्यात.

            ल्युसेमासाठी ग्लास अर्धा भरलेलाच आहे. हा आऊट ऑफ दि बॉक्स अनुभव मला माझ्या परदेशी मैत्रिणींच्या सहवासात अनेकदा आलाय. पावसाचं उदाहरण देते. माझा जन्म मृग नक्षत्राच्या आगमनाच्या एक दिवस आधीचा. पण, पावसात भिजायला मुळीच आवडत नाही. पावसाचा आवाज आवडतो. पावसाच्या धारांना कापत वाहून येणारी वार्‍याची झुळूक आवडते. सोयाबीनच्या उकडलेल्या शेंगा ‘इदामामे’ आवडतात. ‘सोयालात्ते’ कॉफी आवडते. इटालियन पिझ्झा आवडतो. मातीचा सुगंध आवडतो, पण फक्त तोच नाही, तर इतरही अनेक दरवळणारे सुगंध आवडतात. एकदा एका कॅफेझिनोमध्ये गप्पा मारताना सुगंधाच्या गप्पा चालू होत्या. हिवाळ्याच्या सुट्टीवरून सगळ्या जणी रिओत परतल्या होत्या. लहान-लहान ग्रुप्समधून भेटीगाठी सुरू झाल्या. कॅफेझिनोही चालू झालेत. याच कॅफेझिनोत कोणाला कोणत्या सुगंधाने माहेरची, मायदेशाची आठवण येते, याबद्दल आम्ही बोलत होतो. मेथी, कोथिंबीर, कांदा, समुद्राचा वास माझ्यासाठी माहेर आहे. माझी हक्काची जागा. चिनी, जपानी, कोरिअन मैत्रिणींसाठी ‘टोफू-सोयासॉस’ म्हणजे त्यांचा देश. फ्रेंच मैत्रीण म्हणते, ‘सफरचंद आणि दालचिनीच्या बेकिंगचा सुगंध, म्हणजे आजीची माया’. एकीला ब्लॅकबेरी आणि स्ट्रॉबेरी खुडताना घरची आठवण येते. एकजण निलगिरीच्या वासाने धुंद होते. तिचं लहानपण निलगिरीच्या जंगलाशेजारी गेलंय. दुसरी मैत्रीण वाळवंटातील पाऊस आठवून उदास होते. तिसरीच्या मते, मायनस तापमानात चेस्टनट भाजताना येणारा खरपूस सुगंध तिला आईच्या कुशीत घेऊन जातो. कोलंबियन मैत्रीण हिरव्या कच्च्या कॉफीच्या फळाचा सुगंध घेऊन भूतकाळात रमते. एक पूर्व युरोपमधील मैत्रीण उन्हात घराबाहेर दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांच्या वासाला आठवत असते.

            कुणासाठी बेकन मोझारेला चीज, पेपरमिंटच्या कुकीज, डोनट्स, कुणाला नुकत्याच कापलेल्या गवताचा सुगंध, तर कुणाला पहिल्यांदा पडणार्‍या भुरुभुरु बर्फाचा स्पर्श म्हणजे मायदेश. कुणाला आईच्या हातचा एप्रिकॉट जॅम आठवतो, तर कुणाला ‘थँक्स गिव्हिंग’च्या स्वयंपाकाची तयारी, आणखी कोणाला ख्रिसमसच्या पाईन-ट्रीच्या कोवळ्या पानांचा सुगंध, किंवा आपापल्या देशातील खास चीज. कॉफी ही तशीच. प्रत्येकीला वाटतं, आमची कॉफी ग्रेट! काही जणी तर कॉफीच्या वासावरून ओळखतात की, ती कॉफी कोणत्या देशातील आहे ते! जपानी मैत्रीण साकुरा, प्लम, चेरी, अ‍ॅप्रिकॉटच्या फुलांच्या बहराला घेऊन हळवी होते. त्या फुलांचा चहा काय किंवा ऑटममधल्या मेपलच्या पानांचा सुगंध काय, तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. याकीसोबा नूडल्सच्या तव्यावर तडतडणार्‍या सोयासॉसचा सुगंध,वसाबीची झिनझिनाट, कापलेल्या आल्याचा तेज सुगंध आणि किसलेल्या मुळ्यांचं पांढरशुभ्र रूप ‘याकीतोरी’ तयार होतानाचा घमघमाट, हे सगळं तिला जपानची आठवण करून देते. भल्या पहाटे गरमागरम सोया मिल्क पिणं, तांदळाच्या पिठापासून बनवलेले बावजं-जावजं खाणे किंवा हॉटपॉटमध्ये विविध प्रकारचे मश्रुम्स टाकून मोठ्या आचेवर परतलेले पदार्थ खाणे, म्हणजे चीनची आठवण.

            पहिल्या पावसाचा वासंच नाही, तर माझ्या मैत्रिणींमुळे ही सुगंधाची सफर मला नेहमी संपन्न करून जाते. माझी फिनिश मैत्रीण ढगांच्या आकाराबद्दल सांगते की, वारा किती वेगाने, कोणत्या बाजूने वाहणार आहे. डच मैत्रीण उत्तम व्यावसायिकतेचे उदाहरण देते, इटालियन मैत्रिणीकडून फॅशन शिकता येतेय, तर फ्रेंच मैत्रिणीकडून उच्च कलासक्तपणा. जपानी मैत्रीण संयम, शिष्टाचार, नम्रता शिकवतेय, चिनी मैत्रीण कामसूपणा, ब्रिटिश-जर्मन मैत्रिणी गायत्रीदेवीच्या कझिन्स असाव्यात, असं वाटतं. ब्राझिलियन मैत्रिणी रसरसून जगायला शिकवतात. आंतरराष्ट्रीय मैत्रिणी असल्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो, तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सांस्कृतिक बुद्धिमत्ता वाढते. आपल्या ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर जाऊन जजमेंटल न होता दुसरी, भिन्न संस्कृती अनुभवताना तुम्ही कसे व्यक्त होता, इथून सुरुवात होते. सतत ‘ओपिनिएटेड’ नसणं, हा सुद्धा व्यक्त होण्याचा एक शिष्टाचार आहे. तो मी या बायकांकडून शिकले.

            भाषिक एक्स्प्रेशन्स शिकतानाही फार मजा आली होती. मागे एकदा अशाच काही गप्पा चालू होत्या. तर, अचानक एक जर्मन मैत्रीण उठून गेली. दुसरी जर्मन मैत्रीण म्हणाली, तिचा ‘स्ट्रॉबेरी वीक’ चालू आहे. पिरियड्ससाठीचा तो शब्द होता. टोमॅटो ज्यूस, माशांचा वास, लालसेना आलीयपासून, रेड प्लेग आलाय पर्यंतच्या सगळ्या विशेषणांचा वापर होतो. अशा गप्पांमध्ये श्रवणशक्ती एकवटून शब्दगंगेत डुबकी मारायची मजा येते. एकप्रकारची भाषिक समृद्धी अनुभवायला मिळतेय. स्थानिक, भौगोलिक संदर्भ घेऊन त्या विशेषणं वापरतात. मग ब्राझिलियन म्हणेल ‘सेनेफिका’ खेळतेय (ही एक टीम आहे, तिचा झेंडा लाल आहे) ‘सॉकर टीम होम ग्राऊंड’वर आहे (लाल जर्सी घालतात ते होम ग्राऊंडवर), ‘बेसीन तुटलंय’ असंही म्हणतात. ‘शेतात पाऊस पडतोय,’ हेही ऐकायला येतं. अर्जेंटिनाची मैत्रीण म्हणते ‘स्टेक डिफ्रॉस्ट’ होतोय. ‘रेड ट्राफिक लाईट’ आहे. चिनी मैत्रिणींसाठी ‘जुनी मैत्रीण’ आलीय. फ्रेंच बाईसाठी ‘केचअप वीक’ आहे; ‘ब्रिटिश सैन्य आलंय’, ‘लाल नाक असलेला जोकर आलाय’, ‘तांत्रिक बिघाड आहे’, ‘ब्लॅक पुडिंग बनवतेय’, ‘स्ट्रॉबेरी सीझन’ आहे, ‘डॅनिश मैत्रिणीसाठी ‘रशियन्स आलेत’, ‘लाल कपड्यातील काकू आलीय’, ‘कम्युनिस्ट मजा करत आहेत’, ‘पेंटर पायर्‍यांवर येऊन बसलेत’; ‘रशियन सैन्य आलंय’ हे जर्मनी मैत्रीणही बोलते. फिनिश मैत्रिणीसाठी ‘जपानी सैन्य आलंय’, ‘मॅड काऊचा आजार सुरू झालाय’, ब्रिटिश बाईसाठी ‘शार्क वीक आहे’, ‘कोड रेड आहे’, ‘लेडी बिझनेस आहे’ आणि ‘रेड बॅच ऑफ करेज’ही आहे. आफ्रिकनसाठी ‘आज्जी लाल गाडीतून आलीय’, तुर्कीसाठी ‘काकू घरी आलीय’, ‘मायभूमीवर लाल जखमा झाल्यात’, ग्रीकसाठी ‘रशियन्स शहरात आलेत’, रोमानिअनसाठी ‘कोंबडा चावलाय’, चिलीच्या मैत्रिणीसाठी ‘तळाला गेलाय’, ‘महिन्याची पार्टी’ देखील आहे. आयरिशसाठी ‘हायवेमध्ये पेंटर आहेत’. खरं तर, एका रुटीन कॅफेझिनोत, म्हणजे किटी पार्टीत झालेल्या या गप्पा!

            मागे एका फ्रेंच मैत्रिणीचं लग्न होतं. रिओत ती तिच्या मित्राबरोबर राहात होती. त्यांची बदली दुबईला झाली. तिथल्या कायद्याप्रमाणे लग्न करण गरजेचे होते. त्यावर व्हिसा अवलंबून होता. फ्रान्सला जाऊन लग्ण करणं प्रॅक्टिकली जमण्यासारखं नव्हतं. हातात वेळ कमी होता. मग काय, या कॅफेझिनोच्या मैत्रिणी वर्‍हाडी-वाजंत्री झाल्यात. फ्रेंच वकिलातीत हे लग्न करायचं ठरलं. त्यांच्या नियमानुसार शांततेत लग्न पार पडलं, म्हणून मैत्रिणींचा उत्साह कमी नव्हता. लग्नाचा गाऊन शिवण्यापासून, ते तिला बॅचलर पार्टी देण्यापासून, ते पॅकिंगला मदत करण्यापर्यंत सगळ्याजणी हजर होतो. तब्बल चाळीसएक देशातील बायका! भारतीय  मी एकटीच. कुटुंब व्यवस्था किती महत्त्वाची, हे या मैत्रिणींना पाहून समजलं.

            मध्यंतरी पेरू या देशातली एक लहानशी मैत्रीण भेटली. तिचं बाळंतपण इथेच, रिओत झालं. तेव्हा अनेक मैत्रिणी तिच्या मदतीला आल्यात. एक रशियन मैत्रीण आहे, जिने ब्राझिलियन मुलाशी लग्न केलंय. गेले पाच वर्षे ती रशियात गेलेली नाही. तिच्या गरोदरपणाची बातमी आली आणि मैत्रिणींचा एकच कल्ला झाला. सगळ्याजणी तिला काय हवं-नको ते पाहात होत्या. असे अनेक किस्से आहेत, ज्यावरून कळतं की, ह्या सगळ्याजणी ‘फॅमिली व्हॅल्यू’ जपणार्‍या आहेत.

            मध्यंतरी एक डच मैत्रीण आली होती लंचसाठी. पंचावन्न वर्षांची ही मैत्रीण सांगत होती, तिला तिच्या सगळ्यात धाकट्या मुलाची काळजी आहे. मोठी मुलगी आणि दुसरा मुलगा स्पर्धेच्या जगात पुढे जातील, पण धाकटा मागे राहील. त्याला आर्थिक मदत केली, तर दोघांना राग येईल. उरलेल्या दोघांवर अन्याय होईल. कुणालाही न दुखविता मदत करायला हवी. एक अमेरिकन मैत्रीणसुद्धा तिच्या कविमनाच्या मुलाबद्दल काळजी करत होती. तिच्या 27 वर्षाच्या मुलाला लेखक म्हणून करिअर करायचंय. तिला कळत नाहीये की, तो त्यात यशस्वी होईल का?

            अशीच एक स्वीडनची मैत्रीण तिच्या लेकीच्या काळजीत. तिची सतरा वर्षांची मुलगी 19 वर्षांच्या इटालियन मुलाबरोबर रिलेशनमध्ये आहे. तिने तिच्या नवरा-मुलीसह नाताळमध्ये स्वीडनला जाण्याचा प्लॅन केलाय. तो इटालियन मुलगा देखील आहे. त्या दोघांना एकमेकांना समजून घेता यावं, म्हणून ते प्रयत्न करत आहेत. दोघांसाठी ‘स्टुडिओरूम’ बुक केली आहे. उद्या जर त्या मुलाला स्वीडनमध्ये सेटल व्हावं लागतं, तर त्याला उपरं वाटू नये. त्या मुलाच्या आई-बाबांशी बोलून हा प्लॅन केलाय त्यांनी. ही मैत्रीण नेहमी तिच्या मुलीला समजावत असते, ‘चांगल्या प्रकारची गर्भनिरोधके वापरत जा.’ कारण ब्राझीलमध्ये गर्भपात करता येत नाही. माझ्या भारतीय मनासाठी हे सांस्कृतिक धक्के आहेत, खरं तर याकडे जजमेंटल न होता मी पाहतेय.

            एक अर्जेंटिनाची मैत्रीण आहे. तिची 21 वर्षांची मुलगी सुट्टीनिमित्त रिओत आलीय. हे सगळे जण काही वर्षे मुंबईत राहिलेय. ही मुलगी चित्रकार आहे. आईचं म्हणणं आहे, 3 महिने सुट्टीत आलीय, तरी वेळ घालवू नये. मुलीच्या हाताला काम हवं आणि काही उद्योगसुद्धा. तिला भारतीय जेवण आवडतं. त्यामुळे ती माझ्याकडे काही पदार्थ शिकायला येतेय. दुसरी एक मैत्रीण चैन्नईत राहिलीय. नवरा अमेरिकन वकिलातीत काम करतो. तिची मुलगी सुद्धा आर्टिस्ट आहे. तिच्या 16 वर्षाच्या मुलाकडे अगदी साधासा फोन आहे. कारण, त्या वयात स्मार्टफोनची गरज नाही मुलांना, असं तिला वाटतंय. तिची मुलगी सुटीत अमेरिकन वकिलातीत काम करते. मुलांना श्रमाचे मोल कळावे, हा तिचा उद्देश आहे.

            इटालियन मैत्रीण मुलांना रोख पैसे देत नाही. ठरावीक पॉकेटमनी दिला जातो. घरात मोठे कुणी आले की, त्यांना हॅलो करणे, मिठी मारणे हे मॅनर्ससुद्धा आहेतच. एक अत्यंत काटेकोर अशी जर्मन मैत्रीण आहे, जी दोन जणांचाही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवते, जेव्हा तिला जकाही सांगायचे असते. आमच्या एका ग्रुपची अ‍ॅडमिन आहे ती. या ग्रुपवर कोणी, काय, कसं पोस्ट करावं, याबद्दल तिचे नियम आहेत. तिच्या 4 मजली मॅन्शनमध्ये सगळं काही इतकं व्यवस्थित असतं की, मला घड्याच्या तबकडीमधील यंत्रामध्ये फिरत असल्याचा भास होतो. एक बिट्रिश मैत्रीण आहे, तिचा नवरा फे्रंच आहे. ती सुद्धा काही काळ भारतात राहिलीय. मध्यंतरी फ्रान्सला जाऊन आली. घर आवरताना तिला भेट मिळालेल्या कांजीवरम साड्या दिसल्यात. अनेक वर्षे त्या तशाच पडून होत्या. तिने व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवलेत आणि येताना चारही साड्या आणि तीन सलवार सूट ऐन दिवाळीत मला भेट मिळालेत.

            दिल्लीत पत्रकार म्हणून काम केलेली एक ब्रिटिश मैत्रीण जेव्हा कॅफेझिनोसाठी घरी येते, तेव्हा थेट किचनमध्ये येऊन मदत करायला लागते. ती आणि एक डच मैत्रीण सगळी सूत्रं हातात घेतात. इटालियन मैत्रिणीकडे गेले की, मारवाडी लोकांच्या भल्या मोठ्या स्वयंपाकघराची आठवण येते. तिच्या घरी सतत पाचपन्नास जण असतात आणि कोणी उपाशी जात नाही. प्रत्येक मिलान भेटीनंतर तिची  बॅग भेटवस्तू आणि किराणा सामानाने भरलेली असते. माझ्या एका जपानी मैत्रिणीची मुलगी अगदी वाकून नमस्कार करायची. पायात स्टॉकिंग्ज घालून असायची, डोक्यावर हॅट असायची, गळ्यता स्कार्फ. शांघायमध्ये राहात असताना चिनी मैत्रिणीच्या घरी लंचसाठी गेलो, तर माशाचा मोठा तुकडा आम्हाला देण्यासाठी आग्रह करीत होती. काटेरी भाग स्वतःकडे ठेवला होता. आता गेले आठ वर्षे ब्राझीलमध्ये राहतेय. रिओ दि जनेरो शहरात जेमतेम दहा-बारा भारतीय कुटुंबे असतील. दिवाळीत आमंत्रण मिळेलच, याची खात्री नाही. दिलं तरी फॉरमॅलिटी म्हणून, पण नाताळसाठी आम्हाला किमान सात जणांनी डिनरसाठी बोलावलं होतं.

            नाताळच्या दिवशी कुटुंबासोबत जेवण करण्याची पद्धत आहे. यात जवळच्या मित्रांना बोलावण्यात येते. पारंपरिक पदार्थ बनवता येतात. बकप्याव हे माशाचे पदार्थ, शबानादे हा गोड पदार्थ असतो, टर्की असते. आई स्पॅनिश असलेल्या घरी ऑक्टोपसची मेन डिश असते. माझ्यासाठी खास शाकाहारी पदार्थ बनवले असतात.

            ब्राझीलमधील घटस्फोटाचा रेट फारच जास्त आहे. पण, मुलांना वाढवताना कडवटपणा दिसत नाही. खूपशी मुलं तीन दिवस आईकडे, तीन दिवस वडिलांकडे आणि रविवारी एकत्र घालवतात. आईवडिलांची दुसरी लग्नं झालीत, तरी नवीन पालकांबद्दल अनुद‍्गार काढत नाहीत. बोन्साय कुटुंबं अगदी आपुलकीने आदर व्यक्त करतात. लॉकडाऊनमध्येही मुलांच्या कस्टकडीकडे समजूतदारपणे पाहिलं गेलंय.

            व्हेरोनिका ही 84 वर्षांची आज्जी माझी पहिली ब्राझिलियन मैत्रीण. तिच्याकडे रिओ नावाचा कुत्रा होता. तो माझ्या ‘शित्झू’चा ‘प्लेडेट’ होता. ब्राझीलचे प्रेसिडेन्ट माझ्या बाजूच्या कॉलनीत राहतात. व्हेरोनिका तिथेच राहायची. माझं त्यांच्या घरी जाणं असायचं. ओईत्रेन्ता कवात्रो हा तिच्या बंगल्याचा नंबर. तिच्या डॉक्टर बहिणीचा बंगला होता तो, जिथे तीही राहायची. एकटी असावी बहुधा. माझी आणि तिची भेट पार्लरमध्ये झाली, जिथे मॅनिक्युअर आणि केस ब्लो ड्राय करण्यासाठी ती यायची.

            रिओ पंधरा वर्षांचा होता. वयानुसार तो गेला. आमचंही ओईत्तेन्ता कवात्रोमध्ये जाणं बंद झालं. व्हेरोनिका जेव्हा कधी कॉलनीत भेटायची, तेव्हा त्याच्या आठवणीत रडायची. एके दिवशी व्हेरोनिका देखील गेली. तिच्या कॉलनीतल्या वॉचमनने वाट अडवून मला निरोप दिला. मी तिची कुणीच नव्हती, पण तिला माझ्याबद्दल खूप आस्था होती. त्यांना तिने सांगितलं होतं, आजारपणात मी गेले, तर सुलाला माझ्या जाण्याचा निरोप द्या. तिचा असा निरोप ऐकून डोळे गच्च भरून आणणारं आणखी कुणी नव्हतं दुसरं.

        ब्राझीलचे राष्ट्रपती इथे राहात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने इथे आत जायला कुणाला परवानगी नाही. परंतु, वॉचमनने ‘दोन्ना सुला’ म्हणत मला आठवणीने हाक मारली आणि व्हेरोनिकाच्या जाण्याचा निरोप दिला. रिओत जेव्हा जेव्हा आभाळ भरून येतं, तेव्हा तेव्हा मला व्हेरोनिका आठवते. माझ्याबद्दल तिने डझनभर वॉचमनना सांगितलं होतं, त्यामुळे किमान सात जणांनी मला हा निरोप कळवला आणि सातही वेळा माझे डोळे भरून आले होते. हे लिहितानाही मला अस्वस्थत वाटत आहे.

            माझी एक कोरियन मैत्रीण होती. एकदा आमच्या अशाच सुखदुःखाच्या गप्पा चालू होत्या. बोलता-बोलता तिने विचारलं, ‘तुझ्याकडे ‘स्टार पॉकेट्स’ आहेत का?’ एकूणच कोरियन संस्कृतीत दिसणं हे महत्त्वाचं असतं. नोकरीसाठी बायोडेटामध्ये फोटो हवा. चेहरा, हनुवटी, दात, केस, वजन सगळंच नीट, आखीव-रेखीव हवं. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी वाढदिवसाचा सर्जरीसाठीचा खर्च भेट म्हणून दिला जातो. अत्यंत सरल (सूक्ष्म) सर्जरी केली जाते तिथे. असं सगळं असताना, सुंदर दिसणं, ते सौंदर्य अबाधित ठेवणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं, ओघाने आलंच. अगदी सुखदुःखाच्या गोष्टीतही सौंदर्य पाहिलं जातं. तर, ही मैत्रीण मला म्हणाली, ‘तुझ्याकडे आहेत का स्टार पॉकेट्स?’ कोरियन संस्कृतीतील स्टार पॉकेट्स म्हणजे, आयुष्यभर साठवून ठेवलेल्या मर्मबंधातल्या आठवणी. कधी परिस्थितीने, नियतीने, समाजाने, आपल्या माणसांनी घाव केलेच, तर ते भरण्यासाठी ‘स्टार पॉकेट्स’ हवेत. कधी रितेपणा जाणवला, मोडून पडल्यावर उभं व्हावंसं वाटलं की, या पॉकेट्समधले स्टार काढायचे आणि जखमा भरायच्यात. हे स्टार पदकांसारखे मिरवायचे. चांदण्यांचे लखलखते तेज अंगावर घ्यायचे. ‘जब वी मेट’ मधल्या गीतप्रमाणे, ‘मैं अपनी सबसे फेवरेट हूँ’ म्हणत आयुष्यातले निर्णय घ्यायचे, निर्णयांची जबाबदारी घ्यायची. तिच्या स्टार पॉकेट्सना मी ‘चांदण्यांचे कोष’ म्हणते.

            माझी आणखी एक मैत्रीण, हसतमुख अगदी. सेकंड हँड वस्तू विकते ती. पावसापाण्यात, उन्हातान्हात रिकाम्या रानी तिची मोडकळीला आलेली गाडी, तिचा कुत्रा चुईश आणि भंगार गोळा केलेल्या वस्तू घेऊन ती वेगवेगळ्या बाजारांमध्ये तिची मारुतीसारखी गाडी लावते. दुर्दैवाने तिला पार्किंग झोन मध्ये सर्वात मागची जागा मिळते, जिथे पार्किंग झोन आहे. गेले आठ वर्षे मी तिला भेटतेय. मला गरज नसतानाही एखादी तरी वस्तू मी तिच्याकडून विकत घेतेच घेते.

            मी एका अमेरिकन सपोर्ट ग्रुपमध्ये आहे. ज्यांच्या घरातील व्यक्ती अचानक मृत्यू पावतात किंवा निघून जातात, अपघातात अचानक जातात, ज्यांना दुर्धर आजार असतात अशा व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना दुःखातून- नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी हा ग्रुप आहे. मानवी मनाच्या अनाकलनीय उलाढाली तिथे दिसतात. इथे दहा लाखांहून अधिक सदस्य आहेत. यात सल्ले देण्यात बायका पुढे असतात. देशानुसार, वर्गानुसार दुःखाला सामोरे जाण्याची पद्धत मला येथे दिसली.

            बायका मन हलकं करतात. ही अंगठी कशी काढू? त्याचे कपडे कुठे ठेवू? त्याची आठवण रात्री बेचैन करते, त्याची फेवरेट डिश खाविशी वाटत नाही. जगावंसं वाटत नाही, त्याच्या ‘बोन्स’पासून लॉकेट तयार करते. ते गळ्यात घालते. ही न संपणारी यादी तिथे वाचायला मिळते. जुन्याजाणत्या बायका सर्वात आधी हुकमी सल्ला देतात. ‘नवर्‍याचं व्हॉट्सअप चेक कर’, ई-मेल्स, सीक्रेट फोल्डर्स, वॉर्डरोब, बँक ट्रान्झॅक्शन डिटेल्स इत्यादी’. युनिव्हर्सल सल्ला आहे हा! या सल्ल्यानंतर पोस्ट पुन्हा टाका असं सांगतात. गेलेल्या व्यक्तीबद्दल आदर वाढेल तरी, नाहीतर तुम्ही लगेच ‘मूव्ह ऑन’ व्हाल. या सल्ल्यानंतरच्या पोस्ट आणि कमेंट्स पाहण्यासारख्या असतात. ‘आफ्टरशॉक्स टेस्टिमोनिअल’ वाचण्यासारखे असतात.

——————————

[email protected]

Previous articleबस्तरची वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृती
Next articleगिरीजाबाईंची  चटका लावणारी कहाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.