बस्तरची वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृती

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२१

डॉ.ऐश्वर्या रेवडकर

छत्तीसगडमध्ये मी नव्याने आले तेव्हा येथील जंगल आणि आदिवासी लोक पाहून भारावून गेले. येथील जंगल अतिशय घनदाट आहे, नद्यांची पात्रे प्रचंड मोठी आहेत येथे अप्रतिम भव्य धबधबे पहायला मिळतात. छत्तीसगडचा दक्षिण भाग बस्तर या नावाने ओळखला जातो. कारण या भागाची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थिती आणि तितकीच वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृती. येथे विविध आदिवासी जमाती, उदाहरणार्थ गोंड, दंडामी माडिया, मुरीया, अबुज माडिया, हलबा, डोरला, भद्रा या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसह गुण्यागोविंदाने नांदतात. निसर्गाचे वरदान लाभलेला हा भूभाग एकीकडे नक्षलग्रस्त समस्या तर दुसरीकडे खनिजे लुटण्यासाठी टपलेल्या कॉर्पोरेट कंपन्या यांच्या कचाट्यात सापडला आहे.

000000000000000000000

प्रत्येक राज्याची, तेथील लोकजीवनाची वेगवेगळी खासियत असते. तेथील भाषा, संस्कृती, आचार-विचार, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, राजकीय वातावरण, शिक्षण व आरोग्य सुविधा अशा अनेक घटकांचा तेथील लोकजीवनावर एक ठसा उमटलेला असतो. जेव्हा आपण काही कारणाने त्या भागात जातो, तेव्हा तेथील लोकजीवनाची ठळक वैशिष्ट्ये आपल्या नजरेस आल्याशिवाय राहात नाही. मी पुण्यामध्ये बी.जे.मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय येथे एम.बी.बी.एस. करत असताना, काही विद्यार्थी गट बनवून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मेळघाटात जायचे. पुण्यातील ‘मैत्री’ नावाची सामाजिक संस्था मेळघाटात 10-10 दिवसांसाठी वेगवेगळे गट पाठवून पावसाळ्याच्या कालावधीत धडक मोहीम चालवायचे, ज्यामध्ये कुपोषित मुलांचा आहार आणि उपचार, तसेच बाकी रुग्णांना प्राथमिक उपचार पुरवणे असे स्वरूप असायचे. मी सलग 2 वर्षे या मोहिमेत सहभागी झाले होते. या 10 दिवसांच्या अवधीमध्ये मेळघाटातील कोरकू आदिवासी जीवनाचे व त्यांच्या भिन्न संस्कृतीचे जवळून दर्शन व्हायचे. त्याहीपेक्षा जास्त तेथील आरोग्याची गंभीर समस्या पाहून डोळ्यात अंजन घातल्यासारखा अनुभव यायचा. अजूनही हजारो लोकांना किती मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागतेय, हे लक्षात यायचे. मेंदूला विचारांची चालना मिळायची. मी मूळची बार्शी या तालुक्याच्या गावची. त्यामुळे लहानपणापासून ग्रामीण भाग आणि तेथील स्त्रियांच्या आरोग्यसमस्या जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे डिग्रीनंतर जाणीवपूर्वक स्त्रीरोगतज्ज्ञ होण्याचा निर्णय मी घेतला. डोक्यात कुठेतरी ग्रामीण आणि आदिवासी स्त्रिया यांच्यासाठी काम करायचे, हे पक्के रुजले होते. पुण्याच्या पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात डी.जी.ओ चे प्रशिक्षण घेत असताना पुण्यातील ग्रामीण भागातील स्त्रियांचे आणखी जवळून दर्शन झाले. पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर पुण्यामध्येच राहायचे की काय, असा विचार चालू होता. तेव्हा, सकाळच्या ‘सप्तरंग’ पुरवणीमध्ये संदीप वासेलकर यांचे खूप सुंदर लेख यायचे, मी ते नियमित वाचायचे. त्यावेळी असाच एक लेख वाचनात आला की, ‘तरुणांनी आयुष्यातील काही वर्षे देशासाठी दिली पाहिजेत, सामाजिक भान ठेवून काम केले पाहिजे.’ तो लेख वाचून माझे मन ढवळले गेले, जुने सामाजिक कामाचे विचार पुन्हा वर आले. शाळेत असताना मी डॉ. अभय बंग या यांचे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ हे पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकाने मनावर मोठा परिणाम केला होता. त्यामुळे मी ठरवले कि एक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्यात डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या ‘सर्च’ या सामाजिक संस्थेच्या रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायचे. तिथे काम करत असताना आदिवासी जीवनाचे जवळून दर्शन घडले. आदिवासी राहणीमान, संस्कृती, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा हे सर्व पाहायला मिळाले. ‘सर्च’मध्ये एक शिकवण मिळाली की, आदिवासींना त्यांच्या संस्कृतीवरून नाकारू नका, त्यांच्या श्रद्धांना चुकीच्या म्हणून बाद करून नका. त्यांना समजून घ्या. त्यांच्या आचार – विचारांशी सुसंगत असे उपचार, आरोग्यविषयक  सल्ला त्यांना द्या. त्यांच्याकडून शिकण्यासारखे पुष्कळ आहे. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्यामुळे मनावर अनेक सामाजिक संस्कार झाले. ती शिदोरी घेऊनच मी सर्चमधून बाहेर पडले.

त्यानंतर मी छत्तीसगडमध्ये आले, तेव्हा येथील जंगल आणि आणि येथील आदिवासी लोक पाहून भारावून गेले. येथील जंगल अजूनही घनदाट आहे, नद्यांची पात्रे प्रचंड मोठी आहेत व येथे अप्रतिम व भव्य धबधबे पाहायला मिळतात. छत्तीसगडचा दक्षिण भाग बस्तर या नावाने ओळखला जातो. कारण, या भागाची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थिती आणि तितकीच वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृती. येथे विविध आदिवासी जमाती, उदाहरणार्थ गोंड, दंडामी माडिया, मुरीया, अबुज माडिया, हलबा, डोरला, भद्रा या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसह गुण्यागोविंदाने नांदतात. निसर्गाचे वरदान लाभलेला हा भूभाग एकीकडे नक्षलग्रस्त समस्या, तर दुसरीकडे खनिजे लुटण्यासाठी टपलेल्या कॉर्पोरेट कंपन्या, यांच्या कचाट्यात सापडला आहे. ब्रिटिशांच्या काळापासून चालू असलेल्या शोषणाने येथील आदिवासी नाडला गेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाले तरीही, बस्तर आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रोजगार या मूलभूत सुविधांपासून अजूनही मोठ्या प्रमाणात वंचित आहे. मी बस्तर भागातील बिजापूर जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा हळूहळू आदिवासी विश्व माझ्यासमोर उलगडत गेले. रुग्णालयाच्या ए.सी. खोलीत बसून रुग्णाला औषध लिहून देऊन माझे काम संपत नव्हते. तर, माझ्यासमोर येणारी गर्भवती स्त्री कोणकोणत्या अडचणी पार करत माझ्यापर्यंत पोहोचते, हे मला समजून घेणे महत्त्वाचे वाटायचे. आरोग्य हे फक्त औषधे आणि रुग्णालय यापुरते मर्यादित नसते, तर सामाजिक स्थिती, भौगोलिक घटक, राजकीय धोरणे, आर्थिक स्थिती इत्यादी सर्व घटकांचा व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. बस्तरमधील सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर हे जिल्हे सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहेत. येथील दूरच्या गावांमध्ये सतत काहीना काही घडामोडी होत असतात. काही गावे पूर्णपणे नक्षलींच्या ताब्यात असतात, त्यांच्या परवानगीशिवाय तिथे ये-जा करायला प्रतिबंध असतो. अनेक गावे अशी आहेत की, जिथे दिवसा आपण जाऊ शकतो, परंतु रात्री नाही. अशा गावांमध्ये आरोग्य विभागाच्या टीमला लसीकरणासाठी जायचे असते, तेव्हा आधी गावकर्‍यामार्फत नक्षली लोकांना निरोप पाठवून त्यांची परवानगी घ्यावी लागते, मगच जाता येते. येथील लोकांची रेशनकार्ड, आधारकार्ड त्यांनी जाळून टाकले असल्याने, लोकांना रेशनचे धान्य विकत घ्यावे लागते. त्यांना अनेक सरकारी सुविधांपासून वंचित राहावे लागते. अनेकदा एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा गर्भवतीला प्रसूती कळा सुरू झाल्या, तरी गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी जायला लवकर परवानगी दिली जात नाही. कारण, नक्षली लोकांना नेहमी भीती असते की, गावातील लोक त्यांची खबर पोलिसांना देतील.

बहुतांश आदिवासी लोक जंगलात छोट्या छोट्या, दूरवर वसलेल्या गावात राहातात. जी आतली गावे आहेत, तिथे अजूनही रस्ते नाहीत. त्यामुळे दवाखान्यात येण्यासाठी गर्भवती स्त्री कित्येक किलोमीटर चालून, जंगल पार करून मुख्य रस्त्यापर्यंत येते, तेथून मग तिला वाहन मिळते. कित्येक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत किंवा प्रसूती वेदना सुरू झालेल्या स्त्रीला रुग्णालयात पोहचविण्यासाठी खाट उलटी करून तिची डोली बनवली जाते आणि त्यातून रुग्णाला खांद्यावर वाहून नेले जाते. पावसाळ्यामध्ये आणखी समस्या निर्माण होते. कारण, अनेक नद्या-नाले असलेल्या या प्रदेशात जास्त पाऊस होतो, तेव्हा रस्ते बंद होऊन जातात आणि गाव इतर गावांपासून तुटते. अनेकदा अशा परिस्थितीत रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकत नाही आणि उशीर झाल्याने रूग्णाची स्थिती गंभीर होते. रुग्णवाहिका चालवणारे लोक अनेकदा धाडस करून नदी नाल्यांना पूर असतांना पाण्यातून गाडी चालवतात आणि रुग्णाला घेऊन येतात. एखादी अडलेली प्रसूती असेल, तर बर्‍याचदा ती गर्भवती स्त्री रुग्णालयात पोहोचेपर्यंत खूप वेळ लागल्याने तिचे गर्भाशय फुटते व तिच्या जिवाला धोका निर्माण होतो. पावसाळ्यात अशा केसेस नेहमीच येतात. अशावेळी डोके शांत ठेवून आणि सर्व कसब पणाला लावून, शस्त्रक्रिया करून, अशा स्त्रियांचा जीव आमची जिल्हा रुग्णालयाची टीम वाचवते. प्रत्येक स्त्रीची वेगळी समस्या आणि वेगळीच कहाणी. या सर्व स्त्रिया रुग्णालयात येतात, तेव्हा माझ्या लेकीच बनून जातात आणि त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवायची वेळ येते, तेव्हा मला जणूकाही त्यांना सासरी पाठवते आहे, अशी भावना मनात येते.

दर रविवारी मी बिजापूर जिल्हा रुग्णालयापासून 35 किलोमीटरवर असणार्‍या कुटरु या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणीसाठी जायला सुरुवात केली. भीतीमुळे या भागातून खूप कमी रुग्ण जिल्हा रुग्णालयात यायचे. परंतु मी तेथे जायला लागल्यापासून हळूहळू रुग्णांचा डॉक्टरांप्रति विश्वास वाढू लागला. मला शोधत शोधत गर्भवती स्त्रिया बिजापूरला येऊ लागल्या. कुटरुपासून 20 कि.मी.वर असणारे बेदरे गाव पावसाळ्यात जगापासून पूर्ण तुटून जायचे. पावसाळ्यानंतर मग तेथील स्त्रिया मला कुटरुमध्ये भेटून कोणा-कोणाची प्रसूती झाली, मुलगा झाला की मुलगी, हा वृत्तांत द्यायच्या. आदिवासी लोकांत मुलगा पाहिजेच, असा हट्ट नसतो. इथे नवजात शिशु आणि बालक मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. तसेच संतती प्रतिबंध उपायांबाबत फारशी जागरूकता नाही. त्यामुळे एकेका स्त्रीला  5-10 पर्यंत मुले झालेली पहायला मिळतात. कुटरुला गर्भवती स्त्रियांची तपासणी करत असताना, मी त्यांना कुटुंब नियोजनाच्या साधनांबद्दल माहिती द्यायचे. नसबंदी शस्त्रक्रियेबद्दलही सांगायचे. तेव्हा त्यांना विश्वास वाटायचा आणि मग त्या बिजापूर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी यायच्या. असेच एके दिवशी मी बिजापूरला ओपीडीमध्ये रुग्ण तपासत असताना, कुटरुच्या 4 स्त्रिया मला शोधत आल्या. चारही जणींनी स्थानिक मद्य महुआ हे पिले होते आणि त्यांनी मला विनंती केली की, लगेच त्यांना मी भरती करून त्यांची शस्त्रक्रिया करावी आणि संध्याकाळी त्यांना घरी पाठवून द्यावे. शस्त्रक्रिया करताना वेदना होऊ नये म्हणून त्यांनी मद्य पिले होते. मग मला त्यांना समजवावे लागले की, आधी त्यांची रक्त तपासणी होईल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी, उपाशी पोटी, त्यांना बेशुद्ध करून, वेदनारहितपणे त्यांच्यावर शस्त्रक्रिया होईल. मग कसेतरी त्यांना पकडून मी नर्सच्या ताब्यात दिले.

अशा या आदिवासी स्त्रिया निसर्गकन्या असल्याने एक वेगळेच सौंदर्य त्यांच्या चेहर्‍यावर दिसते. मेहनत करणारी, अत्यंत सहनशील असलेली आदिवासी स्त्री म्हणजे एक अद्भुत रसायन असते. अशा स्त्रीवर उपचार करताना तिच्या सहनशीलतेने मी आश्चर्यचकित होते. या स्त्रिया आजार अनेक दिवस अंगावर काढतात. या भागात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. शरीराच्या एखाद्या भागात दुखत असेल, तर गरम वस्तूने डागण्या दिल्या जातात. अगदी नवजात बाळालाही असे डागलेले पहायला मिळते. स्त्रीला पाळीचा त्रास असेल, अंगावरून जास्त रक्त जात असेल तर कदाचित कोणीतरी काळी जादू केली आहे, असा त्यांचा समज होतो. अनेक दिवस त्रास कमी झाला नाही, तरच रुग्णालयात आणले जाते. प्रसूतीसुद्धा घरीच केली जाते, काही समस्या आली, तरच रुग्णालयात आणले जाते. कुटुंब नियोजनासाठी किंवा गर्भपातासाठी जंगली जडीबुटी वापरली जाते, त्याचा फारसा उपयोग होत नाही. कुपोषण आणि रक्तक्षय तर येथे खूपच जास्त प्रमाणात आढळतो. हिमोग्लोबिन 2 ग्राम इतके कमी असलेल्या गर्भवती स्त्रियाही नित्याची बाब आहे. त्यात मलेरियामध्ये आणखी रक्त कमी होते. या भागात मलेरिया, डेंगू, सिकलसेल, अ‍ॅनिमिया हे आजार जास्त प्रमाणात आढळतात. गर्भवती स्त्रीच्या नियमित तपासणीबद्दलही जागरूकता नसल्याने अनेकदा समस्या निर्माण झालेली गर्भवती स्त्री प्रसूती व उपचारांसाठी रुग्णालयात येते, तेव्हा तिच्याकडे कुठल्याच तपासणीचे रिपोर्ट्स नसतात. एकदाही सोनोग्राफी झालेली नसते. त्यामुळे या भागात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करणे खूप आव्हानात्मक आहे. अपुर्‍या संसाधनांमध्ये, सर्व निर्णय तुम्ही एकट्यानेच घेऊन, सर्व मेडिकल ज्ञान आठवून उपचार करावे लागतात. जे आजार मी पूर्वी पुस्तकातच वाचले होते व जे महाराष्ट्रात कधीच दिसून येत नाहीत, असे आजार येथे पाहायला मिळाले व उपचारही करावे लागले. त्यामुळे माझ्या कौशल्यांमध्ये पुष्कळ भर पडली.

माझे एम.बी.बी.एस. चे सीनियर डॉ. अय्याज तांबोळी सर आय.ए.एस.झाल्यानंतर छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात 2016 मध्ये जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. स्वतः डॉक्टर असल्याने अय्याज सरांनी जिल्हा रुग्णालय सुसज्ज बनवले, सर्व सुविधा सुरू केल्या आणि अनेक नवीन डॉक्टरांची भरती केली. मीही अय्याज सरांमुळेच छत्तीसगडला आले. अय्याज सरांनी आरोग्य सुविधांसोबतच शिक्षणक्षेत्र, रोजगार, रस्ते निर्माण या क्षेत्रातही लक्षणीय प्रगती घडवून आणली आणि बिजापूर जिल्ह्याचा खर्‍या अर्थाने विकास झाला. काम करताना कोणत्याही डॉक्टरला कधीही काही समस्या आली, तर अय्याज सरांशी चर्चा होऊन ती सोडवली जायची. मला कधीही घराची आठवण येऊन एकटे वाटले, तर सरांशी गप्पा मारून ताण कमी व्हायचा. अय्याज सरांनी बिजापूरला स्पोर्ट्स अकादमीही सुरू केली, जिथे 8 वी ते 12 पर्यंत मुला-मुलींना धनुर्विद्या, मार्शल आर्ट्स, बेसबॉल, बॅडमिंटन अशा वेगवेगळ्या 9-10 खेळांच्या प्रशिक्षणासोबत वसतिगृहाचीही सोय झाली. या अकादमीमुळे अनेक मुले-मुली विविध खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली, काहीजण आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकले. बिजापूरमधील अनुभव आणि अय्याज सरांशी झालेल्या गप्पांमधून मी साप्ताहिक ‘साधना’मध्ये नियमित लेख लिहायला सुरुवात केली आणि त्यातून माझे ‘बिजापूर डायरी’ हे पुस्तक आकारास आले.

रुग्णालयातील काम संपवून मी विविध गावांतील ‘हाट बाजार’ पहायला जायचे. इथे जिल्ह्याच्या आजूबाजूची जी गावे आहेत, तिथे आठवड्यातील एक दिवस बाजार भरतो, त्याला हाट बाजार म्हणतात. या बाजारात दैनंदिन जीवनात आवश्यक सर्व वस्तू भेटतात. म्हणजे किराणा, फळे, भाज्या, चप्पल, कपड्यांपासून शेतीत लागणारी खते, बियाणे, मातीची व धातूंची भांडी, खोटे दागिने, मासे पकडायचे जाळे इत्यादी सर्व. शिवाय, काही ठिकाणी शिवणकाम करणारा टेलरही त्याची शिलाई मशीन घेऊन बसलेला असतो. अशा बाजारात मी रमून जाते. जंगलातील विविध कंदमुळे येथे पाहायला मिळतात. तसेच, नदीत मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासेही पाहायला मिळतात. इथे ‘सुक्शी’ नावाचा प्रकार लोकांचा खूप आवडता आहे. सुक्शी म्हणजे ऊन्हामध्ये सुकवलेले मासे. रोजच्या भाजीमध्ये किंवा वरणात ही सुक्शी चव येण्यासाठी वापरली जाते. बाजाराचे एक वैशिष्ट्य म्हणजे, इथे अजूनही वस्तूविनिमय चालतो. म्हणजे आदिवासी लोक आपल्याकडचा काही माल, उदाहरणार्थ गोळा केलेली चिंच, महुआ देऊन, त्या बदल्यात दुसरा माल घेतात, बर्‍याचदा त्यांना बदल्यात मीठ दिले जाते. बाजाराचे आणखी एक आकर्षण म्हणजे, स्थानिक मद्ये. बस्तरमधील विविध मद्ये खूप लोकप्रिय व प्रसिद्ध आहेत. महुआच्या फुलांपासून बनवलेले महुआ हे मद्य, सल्फीच्या खोडातून ताज्या रसासारखी मिळणारी ‘सल्फी’, खजुराच्या झाडाचा ‘छिंदरस’, तांदळापासून बनवला जाणारा ‘लांदा’, ‘ताडी’. बाजाराच्या एका बाजूला अनेक बाया मोठ्या हंड्यांमध्ये, काही बाटल्यांमध्ये ही मद्ये घेऊन बसलेल्या दिसतात. झाडाच्या पानाच्या द्रोणामध्ये मद्य दिले जाते. आदिवासी भागात मद्यपान हे संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. लहान मुलांपासून म्हातार्‍या लोकांपर्यंत सर्व कुटुंबीय एकत्र बसून मद्याचा आस्वाद घेतात. प्रत्येक सणाला किंवा लग्न वा इतर घरगुती कार्यक्रमात घरीच ही ताजी मद्य बनवली जातात आणि दिवसभर पाहुण्यांना दिली जातात. तुम्ही जर गावात कोणाच्या घरी जेवायला गेलात, तर सुरुवातीला पाहुणचार म्हणून ‘महुआ’ किंवा ‘सल्फी’ किंवा ‘लांदा’ दिला जातो. ते न पिणे म्हणजे, त्यांना अपमान वाटतो.

येथील खानपानामध्ये आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट पहायला मिळते, ते म्हणजे ‘चापडा’ चटणी. ही लाल मुंग्यांची चटणी असते. मुले जंगलात फिरताना झाडावर चढून लाल मुंग्या शोधून भांड्यात गोळा करतात.  बाजारात सुद्धा मोठ्या पानावर असलेल्या लाल मुंग्या आणि त्यांची अंडी विकत मिळतात. लाल मुंग्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, मलेरिया बरा होतो, असा इथे समज आहे. जंगलातील प्रत्येक प्राणी, पक्षी आदिवासी भागात खाल्ला जातो. अनेकदा रस्त्याने जाताना गलोर किंवा कधी धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी निघालेले आदिवासी तरुण पहायला मिळतात. मध्ये दंतेवाडामध्ये प्रशासनाने एक आवाहन केले की, गलोर सोडून द्या आणि पक्ष्यांची, छोट्या प्राण्यांची शिकार थांबवा. इथे उंदीरसुद्धा आगीत भाजून खूप आवडीने खाल्ले जातात. एकदा माझ्या मित्राच्या शाळेच्या बाजूला एक उंदीर निघाला, तर 15-20 लोक त्याला पकडण्यासाठी काही तास प्रयत्न करत राहिले. बारसुरजवळ अबुजमाड नावाचा मोठा डोंगराळ भाग आहे. अबुज नावाचा अर्थ अनाकलनीय. हा भाग म्हणजे नक्षली लोकांचा बालेकिल्ला समजला जातो. येथे अजूनही प्रशासन पोहोचू शकले नाही. इथे जाणे धोकादायक असून, नक्षली लोकांच्या परवानगीशिवाय कोणी आत जाऊ शकत नाही की, तेथून बाहेर येऊ शकत नाही. वर्षातून महाशिवरात्रीच्या 1-2 दिवशी मात्र येथे प्रवेश करायला पूर्ण परवानगी असते. येथे आतमध्ये, बारसुरपासून 25 किमी आत घनदाट जंगलात ‘तुलार गुफा’ आहे, जेथे स्वयंभू शिवलिंग आहे. त्यामुळे हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 2019 साली मी येथील डॉक्टरांच्या टीमसोबत तेथे गेले होते. आम्ही 15-20 लोक बाईकवरून गेलो होतो, रस्त्यात जवळजवळ 15-16 नदी नाले पार करावे लागले. काहींच्या बाईक रस्त्यात खराब होऊन बंद पडत होत्या. रस्ता अगदी निबिड. अनेक आदिवासी चालत येतात. दूरवर गूढ संगीत घुमत होते. गुहेसमोर आदिवासी पारंपरिक वेशभूषेमध्ये संगीताच्या तालावर नृत्य करत होते. या गुहेला भेट देणे म्हणजे, एकदम अश्मयुगाची आठवण करणारा थरारक अनुभव होता. हा भाग पाहिल्यावर लक्षात येते की, याचे ‘अबुजमाड’ हे नाव अगदी सार्थ आहे.

आपल्यापेक्षा भिन्न असलेले, अजूनही जुन्या चालीरीती सांभाळणारे हे आदिवासी विविध अन्यायाने, शोषणाने दबून गेले आहेत. येथील जंगलात खनिजांचे मोठाले साठे आहेत. त्यासाठी मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या यांच्या जमिनी बळकावतात आणि आदिवासींची घरे असलेली जंगले उद्ध्वस्त केली जातात. जो आदिवासी जंगलाचा राजा असतो, तो खाणीमध्ये मात्र कमी पैशावर राबणारा मजूर बनून उरतो. खाणीमध्ये काम केल्याने फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होऊन त्याचे आयुष्य कमी होते. या कंपन्यांच्या विरोधात आदिवासींचा आवाज सरकारकडून दाबला जातो. यामुळेही अनेक तरुण-तरुणी नक्षली चळवळीकडे खेचले जातात. काश्मीरनंतर सर्वात जास्त लष्कर छत्तीसगडमध्ये आहे. लष्कराने व्यापलेल्या भागात नागरिकांचे विविध प्रकारे शोषण होते, जसे की, नक्षल असल्याच्या संशयावरून अनेक निष्पाप आदिवासींना तुरुंगात डांबले जाते. केस लढवायला, वकील द्यायला यांच्याकडे पैसे नसतात. कित्येक वर्षे, कुठल्याही पुराव्याशिवाय आदिवासी केवळ संशयावरून तुरुंगात खितपत पडतात. खोटी चकमक दाखवून अनेक निर्दोष आदिवासींना मारले जाते आणि नंतर त्यांना नक्षल म्हणून घोषित केले जाते. 2012 साली जून महिन्यामध्ये बिजापूर जिल्ह्यातील सारकेगुडा या गावात आदिवासींचा सण  बीजपंडुम साजरा होत होता. रात्रीच्या वेळी गावकरी एकत्र जमून लोकल दारूचा स्वाद घेत नृत्य-गाणे चालू होते. कोणाकडेही कसलेही शस्त्र नव्हते. पोलिसांनी अचानक येऊन या निशस्त्र जमावावर अंदाधुंद गोळीबार केला. यात एकूण 17 आदिवासी, ज्यात 7 अल्पवयीन मुलेही  होती. यात दहावीमध्ये शिकणारा, शाळेत प्रथम आलेला व शासनाने पाठ थोपटलेला गुणवंत आदिवासी विद्यार्थी होता. दुसर्‍या दिवशी सर्व वृत्तपत्रात मोठ्या बातम्या आल्या की, पोलिसांनी कुख्यात नक्षलवाद्यांना मारले. आदिवासी लोकांनी पोलिसांच्या या कृत्याविरोधात न्यायालयीन लढाई चालवली. त्यात अनेक मानवी अधिकारवाल्यांनी त्यांना मदत केली. आशुतोष भारद्वाज या ‘इंडियन एक्स्प्रेसच्या’ पत्रकाराने मृत आदिवासींच्या पोस्टमार्टेमचे पुरावे गोळा केले. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की, मारले गेलेले हे आदिवासीच होते, नक्षलवादी नव्हते. अशा खोट्या एनकाऊंटरच्या घटना इथे नेहमी घडत असतात. स्त्रियांवर, शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार होतात. अत्याचार करून कधी त्या मुलीला वा स्त्रीला मारून टाकले जाते व नंतर नक्षलवादी म्हणून घोषित केले जाते. या आदिवासींच्या बाजूने जे कोणी उभे राहील, त्या व्यक्तीला सतत पोलिसांची भीती राहते. तरीही, काही मानवाधिकार कार्यकर्ते इथे जिद्दीने आदिवासींसाठी काम करतात, ज्यात व्यवसायाने वकील असलेल्या बेला भाटिया या आदिवासींच्या केसेस लढतात.

इतक्या सार्‍या समस्यांनी ग्रस्त अशी आदिवासी स्त्री माझ्या पुढ्यात येते, तेव्हा अगदी आतून कळवळा येतो. यांच्यासाठी कितीही काम केले, तरी कमीच आहे. त्यामुळे येथे सेवा देण्यात एक वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते, जे आयुष्याला अर्थपूर्ण बनवते. आदिवासींची गोंडी ही भाषा समजायला खूप अवघड आहे. त्याचप्रमाणे तेलगू, हलबी या भाषाही बोलल्या जातात. यातील हलबी भाषा मराठीशी भरपूर मिळती जुळती असल्याने लगेच समजते व बोलताही येते. गोंडी आदिवासींशी संवाद करायला मात्र ‘मितानीन’ ची मदत घ्यावी लागते. ‘मितानीन’ या गोंडी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे मैत्रीण. आपल्याकडे जशा आशा वर्कर्स असतात, तशा छत्तीसगडमध्ये गावातून काही चाणाक्ष, कामसू महिलांना निवडून आरोग्यप्रशिक्षण दिले जाते, त्यांना ‘मितानीन’ म्हटले जाते. गावातील गरोदर महिलांची माहिती गोळा करणे, मलेरिया तपासणे, छोट्या आजारांवर प्राथमिक उपचार देणे, गंभीर आजारी रुग्णाला दवाखान्यात घेऊन येणे अशी कामे या मितानीन पार पाडतात. एकटीने दवाखान्यात यायला घाबरणारी आदिवासी गरोदर स्त्री मितानीनसोबत तपासणीसाठी व प्रसूतीसाठी विश्वासाने येते. मितानीन सोबत असली की, आम्हाला रुग्णांशी संवाद करणे सहज सोपे होऊन जाते आणि चांगल्या संवादामुळे स्त्रियांना आमच्याबद्दल विश्वास वाटतो. मितानीन या छत्तीसगडच्या यशस्वी प्रयोगासारखा आणखी एक प्रयोग म्हणजे हाट बाजार क्लिनिक. बर्‍यापैकी मोठ्या असणार्‍या गावात आठवडी बाजार लागतो, तेव्हा आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावांत, जंगलात राहणारी कुटुंबे या बाजारात वस्तूंची खरेदी करायला, स्वतःकडील भाज्या, फळे, धान्य विकायला येतात. आठवड्याचा हा बाजार सर्व आदिवासींसाठी छोटेखानी सणावारासारखा असतो, सर्वजण यानिमित्ताने एकमेकांना भेटतात. सरकारच्या लक्षात ही बाब आली. मग नर्सचे एक पथक बनवून या बाजारात छोटे क्लिनिक लावले जाते, ज्यात गर्भवती स्त्रियांची नोंदणी, लसीकरण, छोट्या आजारांचे उपचार या सुविधा उपलब्ध करवल्या जातात. हा प्रयोग पूर्ण छत्तीसगडमध्ये यशस्वीरीत्या अजूनही चालू आहे. याद्वारे लसीकरणामध्ये चांगलीच वाढ झाली.

इथे काम करणे ही फक्त सेवाच नाही, तर शिकणेसुद्धा आहे. आपण आदिवासींना फक्त देत नसतो, तर त्यांच्याकडूनही भरपूर काही घेत असतो. म्हणून मी नेहमी म्हणते की, हे एकतर्फी नाहीये, ही टू वे चालणारी प्रक्रिया आहे. इथे काम करून माझ्यामध्ये मोठा बदल घडून आला. आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलत गेली. येथे मला अनेक तरुण-तरुणी भेटले, जे आदिवासींसाठी विविध क्षेत्रात काम करत आहेत. मूळचा आंध्र प्रदेशचा असलेला प्रणित सिन्हा हा तरुण 8 वर्षांपूर्वी येथे शिक्षणक्षेत्रात काम करण्यासाठी आला आणि येथेच रमला. ‘बचपन बनाओ’ या नावाने सामाजिक संस्था सुरू करून तो दंतेवाडा जिल्ह्यात आदिवासी मुलांसाठी शिक्षण कसे चांगल्या प्रकारे देता येईल, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम पाहतो आणि एका आदिवासी गावात ‘सपनो की शाला’ या नावाने शाळाही चालवतो. महाराष्ट्रातील नाशिकचा असलेला आकाश बडवे हा चांगल्या पगाराची नोकरी सोडून दंतेवाडामध्ये आला आणि त्याने येथील आदिवासी गावांतील शेतकर्‍यांची जैविक शेती करणारी, ‘भूमगादी’ या नावाची संस्था सुरू केली. सामाजिक क्षेत्रात काम करणारी माझी मैत्रीण ऋतुगंधा व मित्र सागर हे दोघे काही महिन्यांपूर्वी आकाशच्या कामात सामील झाले आहेत. जीतसिंग आर्य हा तरुण बस्तरमध्ये पर्यटन व्यवसायाचे काम करतो. बस्तर हा भाग नक्षली कारवायांमुळे कुख्यात आहे. परंतु, या भागाला निसर्गाचे वरदानही लाभले आहे. भव्य नद्या आणि त्यावरचे भव्य धबधबे हे येथील मुख्य आकर्षण आहे. येथील आदिवासी तरुण-तरुणींना गाईड बनण्याचे प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती करणे, यावर जीत काम करतो. या सर्व मित्र -मैत्रिणीचे मिळून आमचा इथे चांगला ग्रुप बनला आहे. विचारांची देवाणघेवाण, एकमेकांचे काम पाहून प्रेरणा घेणे, एकमेकांना मानसिक बळ पुरवणे यासाठी या ग्रुपची खूप मदत होते.

———————————————-

(लेखिका छत्तीसगढमध्ये अनेक वर्षापासून  आदिवासी व नक्षल भागात वैद्यकीय सेवा करतात.)

9399967725

Previous articleआदिवासी संस्कृती आणि लोकसंस्कृती यातील आंतरसंबंध
Next articleजगभरातील मैत्रिणींच्या भन्नाट कथा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.