‘गुजराथी, राजस्थानी’ आणि मराठी…..

-मधुकर भावे

वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्त वाहिन्यांमध्ये सतत चर्चेमध्ये राहणे हे अनेक राजकारण्यांना नेहमी आवडते. इंग्रजीमध्ये राजकारण्यांबद्दल असे म्हटले जाते की, ‘Abuse us, Criticise us , But dont Neglect us… ’ राजकारणी नेत्यांना जे लागू आहे ते महाराष्ट्राच्या आजच्या राज्यपालांना तंतोतंत लागू आहे. एकापरिने ते राजकारणीच आहेत. राज्यपालपद सांभाळता- सांभाळता त्यांना पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी ज्या कामाकरिता महाराष्ट्रात पाठवले होते, ते काम चोखपणे करायचे. जे बोलायचे ते बोलायचेच… मग खुलासा करत बसायचे. दोन दिवस असे वाद चालायचेच. वृत्तपत्रांत नाव, फोटो येत रहायचेच… तेवढ्या दिवसांपुरते बाकी सर्व प्रश्न बाजूला पडायचे. रोज असे काही घडत राहिले की, मुख्य प्रश्न बाजूला पडले. हे असे अनेक वर्ष चालले आहे. शिवाय राज्यपालही मोठे गंमतशीर आहेत. त्यांना वाद निर्माण करण्याची आवड आहे. वेळ जाण्याकरिता असेल.. पण ते काही ना काही गंमती करत राहतात. आणि बोलताना हसत असतात. अनेक वादग्रस्त विधाने केल्यावरही ते महाराष्ट्रात चार वर्षे टिकून आहेत. म्हणजे त्यांना सांगितलेले काम ते बरोबर करत आहेत, असा त्याचा अर्थ.

यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलची त्यांची विधाने अशीच वादग्रस्त होती. महाराष्ट्रात ज्यांना दैवत मानले जाते, अशा दैवतांबद्दलही ते बिनधास्त बोलतात. कालच्या त्यांच्या बोलण्यात त्यांनी महाराष्ट्रात जातीय- प्रांतीय, भाषिक असा सगळ्या अर्थाची विधाने केलीत. चारही बाजूंनी त्यांच्यावर टीका झाली. खुद्द राज्यपालांना खुलासा करावा लागला… ज्यांनी कोणी त्यांना हा खुलासा लिहून दिला. तो बेटाही हुशार असला पाहिजे. ‘एखाद्या समाजाचे कौतुक करताना दुसऱ्या समाजाचा त्यात अपमान होतो, असे राज्यपालांना कधीच वाटले नाही’, असा हा खुलासा. राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर सगळेच तुटून पडले. पण, महाराष्ट्रातील त्यांचे कायमचे आधारस्तंभ देवेंद्र फडणवीस मात्र त्यांच्या मागे टेकू लावून उभे राहिले. ‘राज्यपालांचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नसेल’, हे फडणवीसांना समजले. त्यानंतरच खुलासा आला. राज्याचे मुख्यमंत्रीही विरोधात गेले. उद्धव ठाकेरही विरोधात गेले. राज ठाकरे विरोधात बोलले. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी झाली. आता दोन दिवस हा वाद चालेल.

हे राज्यपाल मोठे गंमतशीर आहेत. एक गंमत आधी सांगतो… महाराष्ट्रात नवीन राज्यपाल जेव्हा पदग्रहण करतात, त्यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी त्यांचे अिभनंदन करायला नेहमी राजभवनवर जात असते. कोश्यारीजी जेव्हा राज्यपाल म्हणून आले त्यानंतर पत्रकारसंघाची त्यावेळची कार्यकारिणी त्यांना भेटायला गेली… श्री. नरेंद्र वाबळे त्याहीवेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. सर्वांचे स्वागत करून राज्यपालांनी या कार्यकारिणीला पहिला प्रश्न विचारला… ‘या तुमच्या कार्यकारिणीत संघाचे किती लोकं आहेत.?’ श्री. वाबळे म्हणाले, ‘सगळेच संघाचे आहेत….’ वाबळे यांना म्हणायचे होते की, ‘पत्रकार संघाचे…’ राज्यपालांना विचारायचे होते, ‘रा. स्व. संघाचे किती?’ त्यातले जवळजवळ कोणीच नाही, असे सांगितल्यावर राज्यपालांचा मूडच बदलला. असे हे गंमतीचे राज्यपाल आहेत. खुलासा करताना त्यांनी महाराष्ट्राची तरफदारी केली.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारने पाठवलेली १२ आमदारांची यादी दीड वर्षे या राज्यपालांनी मांडीखाली दाबून ठेवली . मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत ‘राज्यपालांनी निर्णय करावा’, असे सांगितल्यावरही अजून यादी जाहीर झालेली नाही. त्यांना गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलेले आहे, ‘वाट्टेल ते झाले तरी आम्ही सांगितल्याशवाय यादी जाहीर करायची नाही.’ राज्यपाल काय करणार? ते हुकूमाचे ताबेदार… त्यामुळे ही यादी जाहीर होत नाही. अजूनही ती होणार नाही. ३ ऑगस्टचा निर्णय कसाही लागला तरी होणार नाही.

आता राज्यपालांच्या विधानाबद्दल. राज्यपाल म्हणतात… ‘मुंबई-ठाण्यातून गुजराथी आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही….’ राज्यपालांकडे अर्थकारणाचा बराच हिशोब असावा. पण, मुंबई-ठाण्यातून किंवा महाराष्ट्रातून गुजराथी किंवा राजस्थानी उद्योगपतींना महाराष्ट्राबाहेर काढण्याची भाषा कधी केली गेली? कोणी केली? याचा तपशील त्यांनी सांगितला नाही. ही भाषा कोणीही केलेली नाही. शिवाय या भाषिक उद्योगपतींना मुंबईच्या बाहेर जायचे आहे का ? असे त्यांनाच एकदा विचारा. एवढी मलई मुंबईच्या माहेर कुठे मिळणार आहे? राज्यपाल वादासाठी बोलले आहेत. मुद्दाम बोलले आहेत…

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यावेळचे मुंबई महापलिकेतील नगरसेवक नानू निछा पटेल यांनी आरोप केला होता की, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तर गुजराती स्त्रियांवर मराठी लोकं बलात्कार करतील….’ त्यांच्या या विधानाने गदारोळ झाला. आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’तून झोड उठवली. आणि याच नानू निछाने त्यांच्या घरातील मराठी मोलकरणीवर बलात्कार केल्याचे प्रकरण ‘मराठा’ने प्रसिद्ध केले. तेव्हापासून भाषिक वाद किंवा ‘मराठी-गुजराथी’ असा वाद उपस्थित झाला नव्हता. महाराष्ट्र उभारण्यात केवळ एका समाजाचा वाटा नाही. सर्वांचाच आहे. टाटा बिर्लांचा आहे. अनेक उद्योगपतींचा आहे…. त्या त्या व्यवसायातील सर्वभाषिक कामगारांचा आहे.कष्टकऱ्यांचा आहे. महाराष्ट्रात अशी जातीय विभागणी कधी कोणी केली नव्हती. कोणत्याही एका समाजाच्या मालकाच्या नावावर एखादी गिरणी असली तरी मालक गिरणी चालवू शकत नाही. त्यात काम करणाऱ्या कामगारांमुळेच ती गिरणी चालते. जे जे भाषिक लोक या महाराष्ट्रामुळे श्रीमंत झालेले आहेत, ते त्यांच्या एकट्यामुळे श्रीमंत झालेले नाहीत. सर्व भाषिकांचे श्रम त्याच्याकरिता कारणीभूत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या वैभवात जात-धर्म आणि भाषिक विभागणी करणे, अत्यंत चुकीचे आहे एवढेच नव्हे तर बुद्धीभेद करणारे आहे. राज्यपालांना ते समजत नसेल असे नाही. पण, त्यांना असे वाद करण्यात मजा वाटते आणि दिल्लीवाल्यांचीही या मागे भूमीका, असते. असे काहीतरी महाराष्ट्रात घडत रहावे. त्यामुळे राज्यपालांची भीड चेपलेली आहे. म्हणून ते बोलतात. दोन दिवस चर्चा होत राहते.

पण यानिमित्ताने एका वेगळ्या मुद्याची चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्रातील मराठी माणूस उद्योगात का मागे पडतो? मराठी माणूस उद्योगात उतरताना धोका पत्करायला तयार होताे का? मराठी मालक असलेले अनेक उद्योग का तोट्यात आले…. का बंद पडले? मुंबई-महाराष्ट्रातील उडीपी हॉटेल जोरात चालतात. पुण्यात शनिवार-रविवारी घरी कोणी जेवते की नाही, अशी शंका यावी, एवढी गर्दी रूपाली-दीपाली अशा हॉटेलमध्ये असते. मुंबईत मामा काणे यांचे हॉटेल बंद पडले. वीरकरांचे गिरगावातील हॉटेल बंद पडले. तांबे यांचे हॉटेल दुसऱ्याला चालवायला दिले. दादरचे प्रकाश हॉटेल कसेबसे सुरू आहे. शिवसेनेची निर्मिती झाली तेव्हा बाळासाहेबांची एक घोषणा होती…. ‘मुंबईतील उद्योगांत ८० टक्के नोकऱ्या मराठी माणसांना….’ त्याचसाठी स्थानिक लोकािधकार समिती निर्माण झाली. सुधीरभाऊ जोशी, गजाभाऊ किर्तीकर यांनी त्यात चांगले काम केले. मराठी माणसांना नोकऱ्या मिळाव्या, यासाठी माेर्चे निघाले. पण, ‘उद्योग मराठी माणसांच्या हातात राहिला पाहिजे’, यासाठी एकही मोर्चा निघाला नाही. जो गिरणगाव मुंबईच्या अभिमानाचा विषय होता त्या संपूर्ण गिरणगावात गगनचुंबी टॉवर उभे राहिले…. ते ओसवालांचे उभे राहिले…. त्यात एकही मालक मराठी माणूस नाही. गरवारे, चौगुले, किर्लेास्कर हे मराठी उद्योगपती आपले उद्योग सांभाळू शकले का? मोठे करू शकले का?

सिन्नरला एकेकाळी विडीव्यवसाय प्रचंड जोरात होता. सिन्नरची विडी देशभरात जात होती. तो सगळा व्यवसाय प्रामुख्याने बस्तीराम सारडा, देवकिसन सारडा, चंपालाल चोरडिया, भिकूसा यमासा क्षत्रिय, चांडक आदींच्या हातात होता. सुरुवात जरी बाळाजी गणपत वाजे या मराठी उद्योगपतींनी केली तरी औद्योगकीकरण झाल्यानंतर आणि तंत्रविज्ञाानानंतर वाजे सोडून सगळ्यांनी काळाला अनुरूप नवीन उद्योग सुरू केले. ते यशस्वी केले. आज सिन्नरचा सगळा विडी व्यवसाय तोट्यात आला. पण मराठी कारखानदार सोडून बाकी या उद्योगांतील अन्य भाषिक उद्योगी पुरुषांनी वेगळ्या व्यवसायात यश मिळवले. देवकिसन सारडा यांची एक बातमी त्यांनी ‘गावकरी’ दैनिकाच्या दादासाहेब पोतनीस यांच्याकडे पाठवली. ती त्यांनी छापली नाही. म्हणून सारडा यांनी ‘देशदूत’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले आणि ते यशस्वी केले. जवाहरलाल दर्डा यांनी बापूजी आणे यांचे ‘लोकमत’ साप्ताहिकाचे अधिकार त्यांच्याकडून घेवून एका साप्ताहिकाचे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय दैनिक केले. या यशाचे रहस्य काय? यशवंतराव चव्हाणांनी हा प्रश्न त्यांना विचारला होता. ते म्हणाले होते की, ‘आम्ही नागपूरात ‘महाराष्ट्र’ काढले, पुण्यात ‘विशाल सह्याद्री’ काढला… अनंतराव पाटील यांच्यासारखा संपादक आणला… तरी ते वृत्तपत्र चालले नाही. लोकमत कसे चालते’? या प्रश्नामध्येच कसं चालतं याचं उत्तर आहे….

मराठी माणूस यात का कमी पडतो? ‘अॅटोमोबाईल व्यवसाय आमच्याच हातात राहिला पाहिजे,’ यासाठी शीख समाज एकही मोर्चा काढत नाही. तो संपूर्ण व्यवसाय शीख बांधवांच्या हातात आहे. कित्येक पिढ्या त्यात प्रावीण्य झाल्या. मराठी माणसांच्या हातात राहिलेला असा एखादा उद्योग सांगा….

सहज आठवले म्हणून सांगतो… एकेकाळचे जहाज बांधणीतील प्रख्यात उद्योगपती शेठ लालचंद हिराचंद यांची ‘मराठा’मध्ये असताना एकदा मुलाखत घ्यायला गेलो…. बाळासाहेब ठाकरे यांची त्यावेळी ‘मराठी माणसांना नोकऱ्या द्या’…. ही चळवळ सुरू झाली होती.. मुलाखतीमध्ये त्यांनीच मला प्रश्न विचारला…. ‘मराठी माणूस उद्योगात मागे का पडतो? याबद्दल तुमचे निरिक्षण काय?…’ मी सहज बोलून गेलो… ‘उद्योगासाठी लागणारे साहस करायला मराठी तरुण सहसा तयार होत नाही.’ हे ४० वर्षांपूर्वीचे माझे निरिक्षण होते. त्यावर शेठ लालचंद हिराचंद म्हणाले, ‘मी माझे निरिक्षण सांगतो… मराठी माणूस व्यवसायात उतरल्यावर नफा कमावण्यात काहीतरी कमीपणा आहे, असे मानतो…. तुम्ही मराठी माणसांनीच ‘नफेखोर’ हा शब्द तयार केला… आणि हा शब्द अशा अर्थाने वापरता की, आम्ही नफा मिळवणारे जणू दरोडेखोर आहोत…. मराठी माणसांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. एक रुपयाचे भांडवल घातले तर त्यावर मला एक रुपया वीस पैसे मिळवायचे आहेत…. ही भावना ठेवली तरच उद्योग वाढेल… नफा मिळवण्यात पाप नाही. ’ त्यांनी खूप विस्ताराने चांगली मुलाखत दिली. त्यावेळी मी ती ‘मराठा’त छापली होती. त्यातले अनेक मुद्दे आज या चर्चेच्या निमित्ताने माझ्या डोळ्यासमोर आले.

‘नोकरी मिळाली,’ यातच मराठी माणसं खूष आहेत. लोकलमध्ये घुसायला मिळालं, याचीही खुशीने चर्चा करतात. बसायला मिळालं तर फारच खूष होतात.खिडकीजवळ जागा मिळाली तर ऑफिसमध्ये दहा वेळा सांगतील. आम्ही खूप आत्मसंतुष्ट आहोत. खूप कमी मराठी तरुण उद्योगात पडायला जातात आणि धाडस करून यश मिळवण्यात कमी पडतात. अख्या मुंबईत आज रिअल ईस्टेटचा उद्योग नेमका कोणाच्या हातात आहे? ६० वर्षांपूर्वी ज्या मुंबईत ‘जागा भाड्याने देणे आहे’ असे खडूने लिहिलेले फलक होते. आज याच ठिकाणी जे टॉवर उभे आहेत, त्याची किंमत काय? ती किती जणांना परवडणारी आहे? अशा टॉवरमध्ये राहणाऱ्यांपैकी बिगर मराठी माणसांची संख्या किती टक्के? मराठी माणसांची संख्या किती टक्के? रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये हीच टक्केवारी केली तर काय चित्र आहे….? कोणत्याही विषयात आपण का मागे पडतो, यावर चिंतन करून जिथपर्यंत आपण नोकऱ्यांच्या मागे धावतो आहोत, तिथपर्यंत मराठी माणूस उद्योजक होऊ शकणार नाही.

राज्यपालांनी ‘गुजराथी-राजस्थानी’ अशी भाषा वापरली… गाडगेबाबांचे कीर्तन आठवा…. शेवटचे कीर्तन भायखळ्याच्या पोलीस चाळीत झाले होते.. त्या कीर्तनात गाडगेबाबा सांगायचे.. ‘उद्योगांत कष्ट करून मारवाडी-गुजराथी समाजाचे लोक श्रीमंत होतात. सकाळी साजूक तुपातला शिरा खातात आणि तुम्ही वाईच कोरड्याची भाकर…. ’ बाबांचे ते कीर्तन ऐकले तर त्यांनी मराठी माणसांना उद्योगात शिरून यश मिळवण्यासाठी किती छान उदाहरणे दिली आहेत…

आज ही सगळी चर्चा यािनमित्ताने आठवली…. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होताना जे प्रचंड आंदोलन झाले…. १०६ जणांनी रक्त सांडले… ते हुतात्मा झाले… लाठीमारात कित्येक लोक अपंग झाले… ज्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी एवढं प्रचंड रणकंदन झाले… त्या लढाईत आघाडीवर होता तो कामगार… शेतकरी… लढले ते दोघे… बळी गेले त्यांचे… राज्य मिळाले त्यांच्या त्यागातून… बलिदानातून… ६० वर्षांनंतर तोच शेतकरी आत्महत्या करतोय… त्याला शेती परवडत नाही. त्याच कामगाराला याच गिरणगावात पूर्णपणे चिरडून तिथेच टॉवर उभे राहिले. गिरण्यांचे भोंगे बंद झाले… आम्ही मराठी माणसांच्या हिताची भाषणे करतोय… आणि चर्चा मात्र भलत्या भोंग्यांची करतोय… गिरणी कामगार चिरडले गेले, त्याचे कोणाला काय पडलेय…

राजकारणाकरिता मराठी माणूस वापरत राहिलो… सभा करत राहिलो… भाषणबाजी होत राहिली… ज्यांनी उद्योगात यश मिळवले ते सभा घेत बसले नाहीत. भाषणं करत बसले नाहीत. उद्योगात लक्ष घालून यश मिळवित राहिले. बजाज कंपनीचे राहुल बजाज मला एकदा सांगत होते, ‘व्याप एवढा वाढवून ठेवला आहे, पण प्रत्येक केंद्रावरून दिवसभराचे बॅलन्स शीट आल्याशिवाय मी झोपायला जात नाही….’ यश का मिळते, याची कारणे वेगळी आहेत. मराठी माणसांनी ती समजून घेतली पाहिजेत. धर्म-प्रांत- भाषा यावरून जगात वाद झालेत. पण, आम्हाला त्या वादात जास्त रस आहे. पुढे गेलेले समाज आणि त्यांचे नेते कोणत्या गुणांनी पुढे गेले…. आम्ही का मागे पडतोय, याची कारणं शोधायला आम्हाला वेळ नाही… त्यामुळेच मराठी माणूस आपल्या इतिहासावर जास्त खूष आहे. पूर्वजांच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगाताना आम्ही उद्या कोणते कर्तृत्व दाखवणार? महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक उभारणीत मराठी माणूस नेमका कितीआणि कुठे? याची एकदा चर्चा करा. आपल्या चुका समजावून घ्या… कोणी टीका केली म्हणून संतापून उत्तरे मिळणार नाहीत. एवढे समजून घेतले तरी वाद टाळून काम करता येईल.

(लेखक नामवंत पत्रकार व वक्ते आहेत)

9869239977

Previous articleपुरोगामी संघटनांनी फुगलेले अहंभाव टाकून द्यायला हवेत!
Next articleहा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.