हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ

माणसं: साधी आणि फोडणीची.. भाग दोन
*******

-मिथिला सुभाष

*******

एका मराठी भाषक संस्थानातली ही कथा. आणि कथानायक म्हणजे नानासाहेब, त्या संस्थानिकाचे जवळचे मित्र. शिवाय स्टेट फोटोग्राफर. गावातल्या मोठ्या गर्दीच्या मुख्य रस्त्यावर त्यांचा राहता वाडा होता, नाही, तो आजही आहे. त्याच जागेत.. वर त्यांचा राहता वाडा.. खाली स्टुडीओ.. आता स्टुडीओ गेला, तिथे एक हॉटेल आलं. वाडा होता तिथे आहे.. आता खिन्न.. सगळीकडून एक्स्ट्रा खोल्यांचे फोड आल्यामुळे मूळ शोभा गमावलेला.. पडीक झालेला.. पण नानांच्या पुढच्या पिढ्या अंगाखांद्यावर खेळवणारा.. उजवीकडे याच कुटुंबाने नानांच्या काळात दान दिलेल्या जमिनीवर ‘ब्राह्मोसमाजा’ची इमारत उभी आहे.. डावीकडे, जिथे आता एका लॉजची इमारत आहे, तिथे तर या कुटुंबाचे स्वत:च्या मालकीचे प्राणीसंग्रहालय, गार्डन होते.. त्यात देश-परदेशातले अनेक प्राणी होते आणि गावातली माणसं संध्याकाळचा फेरफटका मारायला त्या गार्डनमधे यायची.. विनामूल्य बरं का! त्या प्राणीसंग्रहालय आणि बागेच्या देखरेखीचा सगळा खर्च नानांचे कुटुंब करत होतं. मोठं प्रस्थ होतं राव ते.. नानासाहेबांचे कपडे त्या काळात कराचीच्या लाँड्रीमधे जायचे धुवायला. वाड्यात पोरंबाळं, नातेवाईक.. दूरचे नातेवाईक.. दूर-दूरचे नातेवाईक यांचा एवढा राबता होता की जेवणाच्या वेळेला जेवणघरातून घंटी वाजवली जायची.. या आणि जेवा! याच मोठेपणापाई तर तो राहता वाडा आता खिन्न, पडीक झालाय.. मात्र आजही, ब्राह्मोसमाजाच्या पगड्यामुळे, त्या कुटुंबात सर्वधर्मीय, सगळ्या भाषा बोलणाऱ्या, सगळ्या जातीच्या सुना आहेत.. गेल्या चार पिढ्यांची ही परंपरा आजही सुरु आहे.

नानासाहेब बहुगुणी दबंग गृहस्थ. उत्तम दर्ज्याचे फोटोग्राफर. आजही त्या संस्थानातल्या अखेरच्या दोन राजांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे जे आणि जितके फोटोग्राफ आपण पाहतो ते नानासाहेबांनी काढलेले आहेत. ते राजांच्या आदरस्थानी होते. काय-काय आणि किती शिकले होते हे मला नक्की कळलेलं नाही.. पण उत्तम प्रतीचे जादुगार होते. विश्वप्रसिद्ध जादुगार गोगा पाशा देखील त्यांच्याकडे येऊन काही प्रयोग शिकून गेला होता. घरातल्या मुला-नातवंडांची करमणूक करायला जी थोडीबहुत हातचलाखी करायचे ती ऐकून पण बोबडी वळते आपली. त्या भल्या मोठ्या वाड्याचा जीना चढल्यावर डावीकडे फक्त एक प्रशस्त रूम आणि तिच्या पोटात एक छोटी रूम, ती डार्क रूम.. आणि उजवीकडे मोठ्ठाच्या मोठ्ठा वाडा.. आजही डावीकडची प्रशस्त रूम ‘नानांची खोली’ म्हणून ओळखली जाते आणि डार्क रूमचं झालंय किचन. या खोलीला समोरासमोर दोन-दोन अशा चार मोठ्या खिडक्या आहेत. त्या चार खिडक्यांवर चार बारकी पोरं बसवायची, त्यांच्या हातात पाटी-पेन्सिल द्यायची आणि स्वत: एका मोठ्या शिसवी टेबलाच्या मागे उंच शिसवी खुर्चीवर बसायचं. चारी पोरांना स्वत:कडे एकटक काही वेळ बघायला लावून, ‘तुम्हाला ज्या वस्तू जशा आठवतील तशा पाटीवर ओळीने लिहा,’ असं सांगून स्वत: नाना एका कोऱ्या कागदावर ओळीने काही चित्र रेखाटायचे. विशिष्ट वेळ झाल्यावर त्या चारी मुलांच्या पाटीवर लिहिलेल्या गोष्टी आणि नानांनी काढलेली चित्रे यांचा अनुक्रम तंतोतंत जुळायचा. म्हणजे नानांनी दौत, घड्याळ, फोटोफ्रेम, कॅलेंडर, चष्मा, बशी, पिशवी अशा अनुक्रमाने चित्रे काढलेली असली तर चारी पोरांनी याच क्रमाने त्या वस्तूंची नावे लिहिलेली असायची. या जादूत पोरं असली आणि त्यांना त्याची खूप मजा वाटत असली तरी तो पोरखेळ नक्कीच नाहीये. याच जादूने नानांना एक मोठा धक्का दिला आणि त्यानंतर त्यांनी जादूचे खेळ करणं बंद केलं. पूर्ण लक्ष व्यवसायाकडे लावलं.

काय झालं होतं की त्या वाड्यात वीस जण एकत्रित जेवायला बसू शकतील एवढं मोठं शिसवी लाकडाचं डायनिंग टेबल होतं. त्याच्या या टोकाला नाना बसायचे आणि त्या टोकाला नानी. मधे दोन्ही बाजूला कुटुंबातली माणसं, असतील तर पाहुणे वगैरे. ही घटना घडली तेव्हा नाना चाळीशीत असतील, म्हणजे नानी अठ्ठावीस-तीस. तीन मुलं होती आणि नानी चवथ्यांदा गरोदर होती. दोन-तीन महिनेच झालेले होते, त्यामुळे तिने अजून ते नानांना सांगितलेलं नव्हतं. पंगतीला कोणीतरी परदेशी पाहुणे होते. जादूचा विषय निघाला आणि अचानक नाना म्हणाले, ‘मेस्मराईज केलेलं माणूस काहीही करू शकतं, माझी बायको आता तुम्हाला हे शिसवी जड टेबल एका हातावर उचलून दाखवेल.’ हे ऐकून नानी भांबावली.. पाहुण्यांसमोर तिला सांगताही येईना की मी प्रेग्नंट आहे. ती नानांकडे बघतच राहिली.. त्यांनी तिला मेस्मराईज केलं. तिसऱ्या मिनटाला तिने ते टेबल एका हाताने वर उचललं, आपल्या डोक्याच्याही वर.. पाहुणे अवाक.. आणि..

आणि ऑन द स्पॉट नानीचा गर्भपात झाला. अति रक्तस्त्रावामुळे हॉस्पिटलला न्यायच्या आधी घरातच तिचा जीव गेला. त्यांना दोन मुलगे होते, एक मुलगी. मोठा मुलगा अविवाहित राहिला, बाकीच्या दोघांची मुलंबाळं आज त्याच गावात आणि इतरत्र सुखात आहेत. त्यांचे संसार बहरले आहेत. वेगवेगळ्या जातीच्या सुनांनी त्यात रंग भरलेयत. पण त्या दिवसानंतर आजोबांनी जादूचे खेळ करणं सोडून दिलं. एक विद्या आतल्या आत घुसमटून विसर्जित झाली.

तो राजकीय धामधुमीचा काळ होता. राजवाड्यावर ब्रिटीश अधिकाऱ्यांची ये-जा होती. इथले हे राजे ब्रिटीशांचे मांडलिक होते. गावाबाहेर इंग्रजांची सैनिक छावणी होती. जी-हुजुरी आणि खुशामदीला ऊत आलेला होता. त्यात नाना त्यांचा आब राखून होते. अशातच एक बातमी आली की मुंबईहून एक कुणीतरी बडे ब्रिटीश अधिकारी सैनिक छावणीची पाहणी करण्यासाठी येत आहेत. ते एक दिवस इथल्या राजांचा पाहुणचार घेतील, विश्रांती घेतील आणि मग मार्गस्थ होतील.. राजांसाठी ही पर्वणीच होती. ब्रिटीश अधिकारी आधी सैनिक छावणीची पाहणी करायला जाणार आणि मग पाहुणचार घ्यायला राजवाड्यावर येणार असं ठरलं. सैनिक छावणीपासून राजवाड्यापर्यंत त्यांना पारंपरिक पद्धतीने स्वागत करून वाजतगाजत आणायचं असं ठरलं. नानांच्या डोक्यातून एक टूम निघाली. ब्रिटीश अधिकाऱ्याच्या या प्रवासाचं चित्रीकरण करायचं असं त्यांनी राजांच्या कानात सांगितलं.. त्यांना ही योजना आवडली, या चित्रीकरणामुळे इंग्रज खुश होणार होते ना! राजांनी सगळी जबाबदारी नानासाहेबांच्या खांद्यावर सोपवली. चित्रीकरणासाठी लागणारे विशिष्ट कॅमेरे आणि इतर तांत्रिक वस्तू घेण्यासाठी नानांच्या मुंबईला फेऱ्या व्हायला लागल्या.. रस्त्यावर अंथरायला लाल गालिचे मागवले गेले. फुलांच्या पाकळ्यांच्या वर्षावाची सोय झाली. या सगळ्यासाठी गावातल्या श्रीमत धन्नाशेठने पैसा पुरवला. ब्रिटीश अधिकाऱ्याचे चित्रीकरण नीट झाले असते तर ब्रिटीश राज इथल्या राजांवर आणि इथले राजे नानासाहेबांवर खुश होणार होते. अहंकार सुखावणार होता, त्यासाठी त्या काळात लक्षावधी रुपये खर्च झाला.. आणि..

ब्रिटीश अधिकाऱ्याचा मूड बदलला. तो हवाईमार्गे दिल्लीला निघून गेला. इथे हे बसले बोंबलत! राजे आपल्या कामाला लागले. पण धन्नाशेठ नानासाहेबांच्या खनपटीला जाऊन बसला. नाना पण छोटी असामी नव्हती, पण हे कर्ज खूपच अव्वाच्या सव्वा होतं. ठरवल्याप्रमाणे काम झालं असतं तर राजांकडे पैसे मागण्याची गरज पडली नसली, त्यांनी खुश होऊन मालामाल करून टाकलं असतं. त्यातून धन्नासेठचे पैसे सहज देता आले असते. पण आता? ते शक्य नव्हतं.

धन्नाशेठ राजांकडे गेला. त्याने राजांना आपली क़ैफ़ियत सांगितली. राजे दोघांना ओळखत होते. त्यांनी शेठला आदेश दिला, “विसरून जायची ती रक्कम. नानांनी आमच्यासाठी घेतली होती ती.” नानांनाही सांगितलं, “तुम्ही तुमच्या व्यवसायाला लागा. याला पैसे द्यायची काही गराज नाही. याने कुठल्या मार्गाने कमावले आहेत ते आम्हाला माहित आहे. तुम्हाला ती रक्कम माफ!” नानांनी मान डोलावली, पण त्यांच्या तत्वात हे बसत नव्हतं. शिवाय ‘हम भी कुछ कम नहीं’ हा अहंकार होताच. त्यांनी त्या शेठला भेटून सांगितलं की राजे काहीही म्हणू दे, मी तुझी रक्कम चुकती करेन. नाना त्याला व्याज द्यायला लागले. व्याज देखील त्याने भरमसाट लावलं होतं. व्याजावर व्याज.. चक्रवाढ व्याज..

अनेक वर्ष हे चक्र सुरु होतं. नाना म्हातारे झाले. वाड्याच्या बाजूची जमीन, खालचा स्टुडीओ विकला गेला. धन्नाशेठ गब्बर होत गेला, पण कर्ज फिटत नव्हतं. घरात कुटुंबकबिला वाढत होता. कमाई शून्यावर आली. त्यांना त्यांची मुलं म्हणायची, नाना, किती वर्षं त्याला देत राहाल? आपण बुडायची वेळ आली.

सुखाच्या कहाण्या सगळ्यांच्या वेगळ्या असतात, दु:खाच्या कहाण्या सारख्याच असतात. नानांच्या वाड्याची रया गेली. घरातले दागिने देखील बाजारात गेले. ते गुपचूप विकायचे. नानांच्या घरचे आहेत असं कळता कामा नये, म्हणून मध्यस्थ मधे ठेवायचे. ते हजारोंच्या दागिन्यांचे शे-पाचशे हातावर टेकवायचे. तसेच्या तसे खोटे दागिने घडवून तिजोरीत ठेवायचे. कराचीच्या लौंड्रीत ज्यांचे कपडे धुवायला जायचे ते नाना धुवट पायजमा-सदरा घालून राहायला लागले. वाडा दिसायला मोठा होता, आतून खिळखिळा झाला! एक काळ असा आला की घरातले शिसवी फर्निचर तोडून चुलीत घालण्याची वेळ आली. ते विकायला काढलं असतं तर नानांची अब्रू गेली असती ना?? दर महिन्याच्या एक तारखेला धन्नाशेठ व्याज घ्यायला यायचा. त्याला त्याचं व्याज मिळत होतं. आणि नानांचा संसार खचत होता.

यावर लोकांच्या डोक्यात एक सहज प्रश्न येतो की नानांनी हे सारे राजांना का नाही सांगितले?
त्याचं मुख्य कारण नानांचा स्वाभिमान..!
छुपं कारण त्यांचा अहंकार..!!
आणि महत्त्वाचं कारण.. देशाची घडी बदलत होती.. इंग्रज निघून गेले होते.. जनतेचं राज्य आलं होतं.. राजे एका मोठ्या खटल्यात अडकले होते.. त्यामुळे इंग्रज जाण्याआधीच त्यांनी आपल्या युवराजला गादीवर बसवलं होतं.. त्यानंतर त्यांनी आणखी एक लग्न केलं, परदेशी बाईशी. या सगळ्या धामधुमीत त्यांना नानांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. त्यांचं जेवण अजूनही सोन्याच्या थाळ्यात वाढलं जायचं, ते अजूनही पन्न्यापासून बनवलेल्या ग्लासात दारू प्यायचे.. त्यांची वाढलेली थेरं बघून नानांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती.. आणि नशिबाने नानांकडे पाठ फिरवली होती. एक-एक करत वाड्यातल्या वस्तू बाजारात गेल्या.. फर्निचर चुलीत गेलं. पण मोठेपणाचा देखावा संपला नाही. नातवंडांची सद्दी येईपर्यंत तो संपणार नव्हता..!!

खंगत-खंगत नाना बिछान्यावर पडले. त्या एक तारखेला धन्नाशेठ आले. नानांच्या मुलाने सांगितलं, तुमची काही कर्जाची कागदपत्रं असतील ती घेऊन या, आपण हिशोब करू. शेठ निर्लज्जपणे म्हणाला, “कसली कागदपत्रं? विश्वासावर दिले होते मी, नानांनी विश्वासावर फेडले. असू दे आता.” त्याच्या तोंडून ‘असू दे’ ऐकून नानांनी जीव सोडला.

कागदपत्रं देखील नसलेलं कर्ज.. स्वत:साठी न घेतलेलं कर्ज.. नानांनी पंचवीस वर्षं फेडलं.. बेहिसाब पैसा दिला.. घर, दागिने, जमिनी विकून दिला.. पोराबाळांचे संसार पणाला लावून दिला. त्यासाठी स्वत: खंक झाले.. झिजत-झिजत संपले.. माणसाचा अहंकार आणि त्याची तत्वं एकत्र आली की त्याची सारासार बुद्धी लयाला जाते. तेच झालं त्यांचं..

आज त्यांच्या नातवंडांचे संसारही पैलथडीला पोचले.. त्यांना नातवंडे झाली.. एकजात सगळे नोकरदार.. पण नाना जिवंत होते तोपर्यंत त्यांनी कोणाला नोकरी करू दिली नाही. नशीब, सगळ्यांची शिक्षणं धड झाली.

नानांच्या अंत्ययात्रेला राजे आले. त्यानंतरही ते जिवंत होते तोपर्यंत त्या रस्त्याने जातांना गाडी थांबवून, खाली उतरून नानांच्या वाड्याला नमस्कार करायचे. त्याचं कारण वेगळं होतं. नानांच्या आईमुळे राजांना ‘राजकुटुंब’ मिळालं होतं. ती गोष्ट पुन्हा कधीतरी सांगेन. पण नाना संपले.. एका युगाची अखेर झाली.. त्याकाळातल्या सगळ्या वर्तमानपत्रात नानांवर भरभरून लेख छापून आले. पण ते तितपतच.. त्यांने जखमांवर औषध लागत नाही.. त्या जखमा कधी दु:खाने, कधी अभिमानाने वागवत नानांचे वारसदार जगत राहिले..

एका माणसाच्या जगण्याचा हा एवढा मोठा पट बघितला की रॉय किणीकरांच्या या ओळी आठवतात-

हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ
या विदूषकाला नाही रडाया वेळ

लावून मुखवटे नवा खेळ चल लावू
ठेवून सावल्या पडद्यामागे जाऊ

(फोटो सौजन्य -गूगल)

हे सुद्धा नक्की वाचा –माणसं: साधी आणि फोडणीची. (भाग एक)– समोरील लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/3Q23Cik

………………………………………………………..

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

(मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.)

Previous article‘गुजराथी, राजस्थानी’ आणि मराठी…..
Next articleव्हाय पुरुष ओन्ली कॅन हॅव फन?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.