व्हाय पुरुष ओन्ली कॅन हॅव फन?

-सानिया भालेराव

तर म्हणे मागच्या आठवड्यात रणवीर सिंग ऍक्टरवर एफआयआर दाखल करण्यात आली कारण त्याने त्याच्या अत्यंत सुदृढ, पिळदार, वेल टोन्ड, दिलखेचक शरीराचे ओबसिन फोटो शेअर केले. आता सगळ्यात आधी ज्यांना हे माहित नाही त्या माझ्या समस्त बहिणींनो, हे वाचायचं सोडून ते फोटो इंटरनेटवर कुठे सापडतात का ते बघा. काय आहे की व्हाय पुरुष ओन्ली कॅन हॅव फन नं? आपल्याला पण आवडते की हिरवळ बघायला.. सो एकदा बघून या..

बरं आता गेला आठवडा यावर फारच मजेशीर चर्चा पहिल्या. ऑबसीन म्हणजे काय असतं हा म्हणजे प्रचंड अवघड प्रश्न. बीभत्स किंवा अश्लील ठरवणार कसं बुवा? आता IPC मध्ये आहे सेक्शन २९४ का काय ते.. त्या बिचाऱ्या पट्टी लावलेल्या स्त्रीला काय दिसणार डोंबलं? असं मला वाटून गेलं.

इतकी सुंदर शरीरयष्टी, कसदार बांधा वगैरे जर असेल त्या रणवीरचा आणि टाकला त्याने फोटो तर काय एवढं पोटात दुखावं? समानता वगैरे काही आहे की नाही? कमनीय बांध्याच्या हिरोईन बघायला कसं छान वाटतं पुरुषांना, गार गार वगैरे, मग कसं चवीने तिची मापं काढतात, कधी गप्पांमध्ये, कधी इथे सोशल मीडियावर.. आता देवाने सुंदरता टिपणारे डोळे काय फक्त पुरुषांनाच दिले आहेत का? बायकांना पण आहेतच की हो डोळे.. त्यांच्या डोळ्यांनी बघायचं कोणाकडे सांगा बरं? एकतर आजूबाजूला इतकी गरिबी आहे म्हणून सांगू.. तुम्हाला आम्हा बायकांची व्यथा काय कळणार? वेल मेंटेन, वेल बिल्ट, हँडसम, वेल ड्रेस्ड ,दिलखेचक पुरुष असतात कमीच.. ढेरपोटे, वजन नीट मेंटेन न करणारे, शर्टच्या रंगाचा पॅन्टच्या रंगाशी दूर दूरचा संबंध नाही असे कपडे घालणारे पण तरीही इतर स्त्रिया कशा काकू बाई आहेत असं म्हणत दात विचकवणरे अजागळ पुरुष जास्तं. मग आम्हा बिचाऱ्या गरिबडू बायकांनी कोणा कडे बघून मन रमवायचं? उरतात ते अभिनेते आणि मॉडेल्स.. आता या ‘हिरवण्या’ हे दाखवू का ते दाखवू करत फोटोज, रिल्सचा पाऊस पाडतात तेव्हा नाही होत का ते ऑबसीन? जरा कुठे पुरुषाने अंग दाखवलं की झालाच गाजावाजा.. मागच्या वेळी आमच्या मिलिंदला टार्गेट केलं आता हा रणवीर थोडं फार डोळ्यांना सुकून देत होता तर आले लगेचऑबसीनीटी, ऑबसीनीटी करत.

आता म्हणतात नं की बाई ही बाईची शत्रू असते… सो यात काही बायका पण होत्या म्हणे.. कशाला मोडायचा सिस कोड? जरा पुरुषांकडे बघा म्हणा.. पांचटपणा करतांना कसे सगळे एकजात सारखे होऊन जातात.. नाहीतर आपल्या बायका.. एक दोन असतातच.. अगं बाई कसलं अश्लील आहे वगैरे म्हणणारी.. करून घे बाई डोळे बंद.. तशीही सवय असतेच बायकांना की नाही पटलं कर कां बंद, तोंड बंद, डोळे बंद.. तेच करायचं.. निदान इतर बहिणींना तरी करू द्यायचं एन्जॉय.. जरा निवांत बसून कॉफी पित, बॅकग्राऊंडला पाऊस रिमझिम आणि मोबाईलवर जरा नेत्रसुख घ्यावं म्हटलं तर आले अश्लील आहे हे म्हणत.. बायकांचं सुख काही कोणाला बघवत नाही मरो हेच खरं आहे..

कमी कपड्यातला बायकांच्या तोडीचे जोवर पुरुषांचे फोटो, मिम्स वगैरे फिरत नाहीत तोवर जेंडर एक्वालिटी काही येणार नाहीये हे माझं स्पष्ट मत आहे. सो आता जास्तीत जास्त असे फोटो यायला हवेत. या नेक कामासाठी सुंदर, हँडसम असे बोटावर मोजण्याइतके जरी पुरुष पुढे सरसावले तरी समस्त महिला ब्रिगेड आनंदी होऊन जाईल.. तसंही आम्ही बायका फार ऍडजेस्टेबल असतो.. बिचाऱ्या थोडक्यात सुख मानून घेतो.. असंही आणि तसंही.. सो आम्ही चालवून घेऊ.. फक्त तेवढे फोटो येत राहू द्या राव ऍक्टर/मॉडेल लोकांचे…सो पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखाद्या हॉट स्त्रीचा फोटो पोस्ट कराल, त्यावर फार उच्च प्रतीचा जोक माराल तेव्हा समानता म्हणून एक चिकण्या पुरुषाचा फोटो पण टाका आमच्यासाठी.. कारण भिडू लोक आम्ही पण आहोत इन्सान..आमच्या डोळ्यांचा पण विचार करा.. ही खरी सामानता..

महत्वाची टीप: पोस्ट फनी आहे.. हसू आलं नाही तरी ‘हा हा’ अशीच रिएक्शन देणं कंपल्सरी आहे. जे हसणार नाही त्यांनी भरपाई म्हणून सोमणांच्या मिलिंदचा फोटो इथे कमेंटमध्ये टाकावा. तसं केल्यास श्रावण तुम्हाला पावेल, छत्री असेल तेव्हाच पाऊस तुमच्यावर बरसेल आणि श्रावणात अत्यंत रुचकर चिकन तुम्हाला जेवणात मिळेल घरच्यांच्या नकळत.

[email protected]

(लेखिका नाशिक येथे MET’s Institute of Pharmacy येथे कार्यरत आहेत)

सानिया भालेराव यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –सानिया भालेराव– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleहा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ
Next articleस्वातंत्र्य आणि लोकशाही
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here