मैं जो हूँ ‘जौन-एलिया’हूँ जनाब…

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२१

सानिया भालेराव

कोण आहे हा जॉन एलीया? 1957  पर्यंत लखनौमधील अमरोहामध्ये राहून मग जॉन पाकिस्तानमध्ये गेले असले तरीही त्यांच्या शायरीममधून अमरोहातील गल्ल्यांमधल्या मातीची महक येते. फार जणांना हे ठाऊक नाहीये पण जॉन यांचे चुलत भाऊ म्हणजे कमाल अमरोही यांनीमहल, ‘मुघले आलम, पाकिजा या चित्रपटांसाठी सहलेखक म्हणून काम केलं होतं. तसं पाहायला गेलं तर जॉनकडे जितकी प्रतिभा होती तिला अनुसरून म्हणावी तितकी प्रसिद्धी ते हयात होते तोवर त्यांना मिळाली नाही. जॉन काळाच्या पुढचे शायर होते. जॉनच्या मृत्यपश्चात जेव्हा जगभर इंटरनेटचं वारं पसरू लागलं तेव्हा जॉनचे मुशायरे तरुण पिढीने अक्षरशः डोक्यावर घेतले. जॉनची शायरी म्हणजे एक कल्ट झालाज्या पद्धतीने जॉन मुशायरे करायचे, शायरी वाचायचे, तो बेदरकारपणा, ‘किसी बात की कोई फिकर नहीं असा ऍटिट्यूड असल्याने जॉन आज तरुण पिढीमध्ये फार लोकप्रिय आहेत.

00000000000000000000

कोई मुझ तक पहुँच नहीं पाता

इतना आसान है पता मेरा….

     हा शेर जेव्हा पहिल्यांदा वाचला, तेव्हा तो कळूनही समजला नाही असं वाटलं. मग कित्येकदा हा शेर वाचत राहिले अध्ये – मध्ये. पण, हा शेर लिहिणारा शायर आणि त्याचा हा शेर रुतून बसला माझ्या मनात. तो शायर म्हणजे जॉन एलिया. आता पुन्हा एकदा या ओळी वाचा बरं… ‘कोई मुझ तक पहुँच नहीं पाता… इतना आसान है पता मेरा…’ काय म्हणायचं आहे या माणसाला? म्हणजे, हा असं म्हणतो आहे की, माझ्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही आणि वर म्हणतो आहे की, माझा पत्ता इतका सोपा आहे. चक्रावून टाकणारं वाक्य आहे नाही? म्हणजे माझा पत्ता जर सोपा असेल, तर माझ्यापर्यंत पोहोचणं पण सोपं हवं नं? मग पत्ता सोपा असूनही पोहोचणं अवघड का असावं? हा जो पेच आहे नं… एकुणातच आपल्या असण्याचा. हा जॉन साहेबांच्या शायरीमधून कधी कधी सोपा होतो, तर कधी कधी अजूनच अवघड होत जातो. म्हणूनच सगळे शायर एकीकडे आणि जॉन साहेब एकीकडे. आता तुम्ही म्हणाल, ‘ग़ालिब, ़फैज़ साहेब , मीर तकी मीर, फ़राज़, निदा साहब, अदा जाफ़री, कैफ़ी साहेब, बशीर बद्र, परवीन शाकिर, साहिर, वसीम बरेलवी वगैरे वगैरे हे सगळे मातब्बर एका बाजूला अणि जॉन एका बाजूला, असं होऊ शकतं का?’ पण, जर जॉन वाचला असेल आणि उमजला असेल, तर मग हे असं का, हा प्रश्न पडूच शकत नाही.

     आता तसं बघायला गेलं, तर जॉन माझ्या आयुष्यात उशिरा आला आणि ते एका अर्थाने चांगलंच झालं. कारण, तोवर इतर शायर आतवर झिरपत गेले होते. पण, जॉन आला तोच मुळी झंझावात घेऊन. जॉनच्या लेखणीची खासियत अशी की, इतर मोठंमोठ्या शायरांना ‘साहब’ किंवा ‘जी’ अशी पदवी आपसूक दिल्या जाते, पण जॉन एलिया यांचा कितीही आदर वाटला, तरीही त्यांना फक्त ‘जॉन’ असं एकेरी संबोधावसं वाटतं. कारण, तो इतका जवळचा वाटतो.

इलाज ये है कि मजबूर कर दिया जाऊँ

वरना यूँ तो किसी की नहीं सुनी मैं ने

     इथे जॉन सांगतो आहे की, मी एरवी कोणाचंच ऐकत नाही, पण यावर उपाय म्हणजे मला असहाय करणं. आता जस्ट विचार करा की, हे किती मॅड आहे. म्हणजे, हा माणूस असं स्वतःच सांगतो आहे की, मला जोवर लाचार  केलं जात नाही, तोवर मी कोणाचंच ऐकत नाही. यात गर्व दिसतो आणि थोडं आत डोकावून पाहिलं, तर दीनता पण दिसते. आणि मग एका कोपर्‍यात खट्टू होऊन बसलेला जॉन दिसतो, जो आपल्यामध्ये सुद्धा असतोच. आपण मग स्वतःच स्वतःला जॉनच्या नजरेतून पाहायला लागतो. परिस्थिती माणसाकडून खूप काही गोष्टी करवून घेते. असहायता ही अत्यंत वाईट आणि ती जशी शारीरिक असते, तशीच मानसिक सुद्धा असते. जॉनला असं म्हणायचं असेल का, की माझी जी काही अकड आहे नं, ती परिस्थितीसमोर गळून पडते आणि ही लाचारी मला सरळ करते. मग…जॉनचं हे असं सगळं विस्कटून सांगणं जीवाला आतवर हेलावून सोडतं. आणि म्हणूनच जॉनची शायरी थोडी फार वाचल्यावर या माणसाबद्दल जाम कुतूहल वाटायला लागतं.

और तो क्या था बेचने के लिए

अपनी आँखों के ख़्वाब बेचे हैं

     उरलं तरी काय होतं माझ्याकडे अजून म्हणून मग मी माझी स्वप्नं विकून टाकली. म्हटलं तर साध्या आणि म्हटलं तर अंगाला भोकं पडणार्‍या ओळी आहेत या. अडचणीत सापडलेल्या माणसाचं आयुष्य या दोन ओळीत सामावलं आहे जणू! आपण पाहिलेली स्वप्न जेव्हा विकावी लागतात, तेव्हा ते दारिद्य्र सर्वात भयंकर असतं. खूपदा पैसे असले, तरीही स्वप्न विकावी लागतात, काही वेळेला पैसे मिळावे म्हणून स्वप्न विकावी लागतात. आयुष्यातला पॅराडॉक्स जॉन त्याच्या लेखणीतून कागदावर असा काही उतरवतो की, मग त्याला अजून माहिती करून घेणं गरजेचं वाटायला लागतं.

तर, होता कोण हा जॉन एलीया? 1957 पर्यंत लखनौमधील अमरोहामध्ये राहून मग जॉन पाकिस्तानमध्ये गेले असले, तरीही त्यांच्या शायरीमधून अमरोहातील गल्ल्यांमधल्या मातीची महक येते. फार जणांना हे ठाऊक नाहीये, पण जॉन यांचे चुलत भाऊ, म्हणजे कमाल अमरोही यांनी ‘महल’, ‘मुघले आलम’, ‘पाकिजा’ या चित्रपटांसाठी सहलेखक म्हणून काम केलं होतं. तसं पाहायला गेलं, तर जॉनकडे जितकी प्रतिभा होती तिला अनुसरून म्हणावी तितकी प्रसिद्धी, ते ह्यात होते तोवर त्यांना मिळाली नाही. जॉन काळाच्या पुढचे शायर होते. जॉनच्या मृत्युपश्चात जेव्हा जगभर इंटरनेटचं वारं पसरू लागलं, तेव्हा जॉनचे मुशायरे तरुण पिढीने अक्षरशः डोक्यावर घेतले. जॉनची शायरी म्हणजे एक कल्ट झाला. ज्या पद्धतीने जॉन मुशायरे करायचे, शायरी वाचायचे, तो बेदरकारपणा, ‘किसी बात की कोई फिकर नहीं’ असा अ‍ॅटिट्यूड असल्याने, जॉन आज तरुण पिढीमध्ये फार लोकप्रिय आहेत.

     सय्यद नखबी हे त्याचं मूळ नाव. लहानपण अभ्यासू, अत्यंत कडक आणि शिस्तीच्या वातावरणात गेलं असल्याने जॉन यांचा शैक्षणिक पाय अतिशय भक्कम असा होता. उर्दू, इंग्रजी, फारसी, हिब्रू, संस्कृत या भाषा जॉन यांना अवगत  होत्या. पाकिस्तानच्या राष्ट्रभाषेचं रंगरूप कसं असावं, यासाठीची जी कमिटी नेमल्या गेली होती, त्याचे चेअरमन जॉन होते. सो, आता यावरून हे लक्षात येईल की, जॉन यांचा भाषेचा अभ्यास हा किती मोठा आणि व्यापक होता. जो पॅराडॉक्स जॉन यांच्या शायरीमध्ये दिसून येतो, तोच त्यांच्या वागण्यात सुद्धा होता. प्रत्येक प्रोफेशनचा एक लहजा असतो. म्हणजे आता हेच बघा नं, शायर म्हटलं की, एक टिपिकल छबी आपल्या डोळ्यासमोर येते. मखमली शब्द, मृदू शायराना अंदाज वगैरे. पण, जॉन मात्र या छबीला तडा देणारा होता. स्वतःमधला नालायकपणा तो उघड उघड जगासमोर मांडायचा. म्हणजे ‘आहे मी हा असा आहे’ हा त्याचा रुबाब त्याकाळी फार पसंद केला गेला नाही. आता गमतीचा भाग हा आहे की, जॉन जरी असं दाखवत असला, तरीही तो प्रचंड संवेदनशील होता, हे वेगळं सांगायला नको. इतका विद्वान माणूस जेव्हा मुशायरे करतो, तेव्हा संवेनशीलता बेदरकारीमध्ये झाकून असं म्हणतो

ज़िंदगी एक फ़न है लम्हों को

अपने अंदाज़ से गँवाने का

     आता याकडे जरा लक्ष देऊन पाहिलं तर कळेल, जॉन काय सांगू पाहतो आहे. आयुष्य जगणं ही सुद्धा एक कला आहे आणि ती म्हणजे क्षणांमध्ये हरवून जाणं. इथे जॉन म्हणतो क्षण वाया घालवणं आणि ते वाचून दचकायला सुद्धा होतं. म्हणजे एकीकडे ‘टाईम इज मनी’ असं सांगणार धावतं जग आणि दुसरीकडे आयुष्यातले क्षण वाया घालवता येणं ही सुद्धा कला आहे आणि यालाच जिंदगी म्हणतात, असं म्हणणारा जॉन. त्याची ही बेफिकिरी… ती भावते खूप.

     जॉनच्या एकूणच वागण्या बोलण्यात बेदरकारी असली, तरीही त्यांचे काही शेर त्यांच्यामधला हळवेपणा बयाँ करतात.

तू मुझे ढूँढ़ मैं तुझे ढूंढ़ूं

कोई हम में से रह गया है कहीं…’

     इतक्या सोप्या शद्बात नात्यावर भाष्य करणारा जॉन… दोन जीव म्हणायला एकत्र आहेत, पण आता एकमेकांना सापडत नाहीयेत ते दोघे. दोघांनी एका ठिकाणी असून नसणं. आजच्या धावत्या जगात हरवून जाणारी माणसं, नाती… यांच्यावर हा शेर किती चपखल बसतो.

इक अजब हाल है कि अब उस को

याद करना भी बेवफ़ाई है…’

     आशिकी याशिवाय वेगळी असू शकेल का? जॉन म्हणतो की, आता झालंय असं की, तुझी आठवण काढणं  म्हणजे विश्वासघात जणू. केवळ तेरा शब्द आहेत आणि ते सुद्धा अगदी साधे, पण त्याचा परिणाम… तो जबरदस्त… प्रेमात इतका आकंठ बुडालो आहे की, आता तुझी साधी आठवण काढणं पण तुला दगा देण्यासारखं झालंय. कारण, तू सतत माझ्या सोबत आहेस. ज्याला इबादत म्हणतात ती हीच. रुहमध्ये सामावणं, एकरूप होऊन जाणं ते हेच आणि जॉन फार सुरेख पद्धतीने शब्दांमधून मांडतो.

जॉन आवडण्याची दोन हजार एकशे सदुसष्ट कारणं असली, तरीही एक खास कारण असं की, जॉन आत्मनिवेदनपर जी शायरी करतो, ती अगदी आत जाऊन भिडते.

जो गुज़ारी जा सकी हम से

हम ने वो ज़िंदगी गुज़ारी है

     आता या दोन ओळींमध्ये, तसं पाहिलं तर संपूर्ण आयुष्य सामावलं आहे. फारसं काही न सांगताही खूप काही सांगून जाण्याची जॉनची हातोटी केवळ अद्भुत! हे इतकं सहज आहे की, याचं भाषांतर करायला गेलं, तर तेच किचकट आणि अवघड वाटावं इतकी सहजता लेखणीत घेऊन फिरणारा जॉन हा अजब वाटतो तो म्हणूनच.

सारे रिश्ते तबाह कर आया

दिलबर्बाद अपने घर आया

 

मैं रहा उम्र भर जुदा ख़ुद से

याद मैं ख़ुद को उम्र भर आया

     काय वाटतं या ओळी वाचल्या की? इरशाद कामिल हे सध्या आघाडीवर असलेल्या गीतकारांपैकी एक. एका गीतामध्ये त्यांनी लिहिलं आहे, ‘सफर का ही था मैं सफर का रहा,’ ते गाणं जेव्हा ऐकलं होतं पहिल्यांदा तेव्हा जॉनच्या या ओळी मनात तरळून गेल्या. मी आयुष्यभर स्वतःपासून इतका दूर राहिलो की, मला माझी आठवण येत राहिली. काय म्हणायचं आहे इथे जॉनला? नात्यांना तोडून, वेळ पडल्यावर स्वतःच ह्रदयाचे तुकडे करून घरी परतलो, ते रिकाम्या हाताने. स्वतःलाच स्वतःपासून इतकं दूर ठेवलं. मला जे हवं होतं ते मी स्वतःला कधी गवसू दिलं नाही. जो मी होतो, तो तसा राहिलो नाही आणि त्या स्वतःची आठवण काढत बसलो. होतं नं असं, आपण मुद्दामून स्वतःला स्वतःपासून दूर ठेवतो. चिक्कार कारणं असू शकतात, पण मोस्टली आपल्याला स्वतःची खरी पेहचान झालेली नसली किंवा झालेली असली, तर असं आपण करतो. आणि मग आपण आठवत बसतो स्वतःलाच. परिस्थितीमुळे बदललेला माणूस, नियतीपुढे झुकलेला माणूस, स्वतःच स्वतःला आठवत बसणारा माणूस. किती किती कंगोरे आहेत या लिखाणाला आणि म्हणून प्रत्येकाला काही ना काही या ओळींमधून गवसेल. कदाचित स्वतःमधला एखादा गळून पडलेला तुकडा.

एक ही फ़न तो हम ने सीखा है

जिस से मिलिए उसे ख़फ़ा कीजे….’

     एकच कला मी आत्मसात केलीय आहे, ती म्हणजे  भेटल्यावर समोरच्याला नाराज करणं. हे असं काहीतरी भलतंच खरं लिहून जाणारा जॉन. स्वतःच्या अस्तित्वाशी सतत झगडत राहणारा. माणूस म्हणून मन अत्यंत जिवंत ठेवणारा आणि त्या जिवंतपणाचा त्रास करून घेणारा आणि हा त्रास शब्दांमध्ये जसाच्या तसा उतरवणारा. खुदरंग असा हा जॉन भावणार नाही तर नवलच!

जॉन असं पण म्हणतो…

मैं भी बहुत अजीब हूँ इतना अजीब हूँ कि बस

ख़ुद को तबाह कर लिया और मलाल भी नहीं

     पण, शायर म्हटलं की, त्याच्या लिखाणात एखादी  दुखती रग आलीच. पण, जॉनची दुखती रग म्हणजे त्याचं स्वतःच आयुष्यचं असावं. अतिउच्च प्रतिभा असली की, माणूस सतत अस्वस्थ असतो. ती अस्वस्थता जॉनच्या लिखाणात, मुशायर्‍यांमध्ये दिसत राहाते. त्याला सतत काहीतरी हवं आहे, जे मिळत नाही आणि जे मिळतंय ते त्याला नको आहे, असं जाणवत राहातं. आणि गमतीचा भाग असा की, जॉनला वाचत असताना आयुष्याच्या कोणत्या तरी वळणावर आपल्यातला हा जॉन सुद्धा आपल्याला दिसून येतो आणि थबकायला होतं. कारण कदाचित आपण त्याच्या लिखाणातून आपल्या आत सुरू असलेल्या वादळाला शांत करण्याचा आणि कधी कधी भडकवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो, हे आपल्यालाच उमजायला लागतं आणि जॉन आयुष्याचा एक भाग बनून जातो.

क्या तकल्लुफ़ करें ये कहने में

जो भी ख़ुश है हम उस से जलते हैं

तुम बनो रंग तुम बनो ख़ुश्बू

हम तो अपने सुख़न में ढलते हैं

     या चार ओळी पारदर्शकता दाखवतात. म्हणजे, दुसरा खुश असेल, तर मला त्याचा हेवा वाटतो, असं सहज बोलून जाणं आणि त्याला दुःखाची एक कमाल नाजूक झालर आहेच. पुढे तो म्हणतो ‘तू तुझं जग रंगव, स्वतःच्या आयुष्याला सुगंधित कर. मी मात्र माझ्या सुखनमध्ये विरघळून जाईन. ज्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल, त्याच्यापर्यंत हे पोहोचेल. इतकं मात्र खरं की, मनातले काळे ढग जसेच्या तसे कागदावर रेखाटणं सोपं नाही आणि ही कला जॉनला उत्तमरीत्या अवगत होती.

     जॉनचा एक अत्यंत अद्भुत गुण असा की, त्याची खुशमिजाजी अत्यंत दिलकश होती. ‘मी आहे हा असा आहे. हवं तर मला स्वीकारा किंवा नका स्वीकारू. पण, मी राहणार मात्र असाच. निडर, निखळ, प्रवाही.’

पूछते हैं वो किग़ालिब कौन है

कोई बतलाओ कि हम बतलाएँ क्या…’

मिर्ज़ा ग़ालिब यांचा हा शेर. ग़ालिबहून किंचितशी अधिक अकड असणारा एकमेव शायर म्हणजे जॉन. तो म्हणतो…

मैं जो हूँजौनएलिया हूँ जनाब

इस का बेहद लिहाज़ कीजिएगा…’

     जौन… जून… जॉन… काहीही म्हणा त्याला… एक बेहतरीन शायर तर होताच, पण आक़ील व्यक्ती देखील होता. त्याच्या शायरीतून समोरच्याला एक दिलचस्प सफर घडते. म्हटलं तर, स्वतःमध्ये डोकावून पाहायची हिंमत मिळते किंवा मग काहीवेळा स्वतःकडे दुर्लक्ष करण्याचं फन सुद्धा अवगत होतं. जॉनची शायरी ही फक्त शायरी राहात नाही, ती म्हणूनच त्याची शायरी नजरिया देते. कसं जगायचं आणि कसं नाही जगायचं याचा सुद्धा. जॉन… तू कायम राहणार आहेस माझ्यासारख्या कित्येक वेड्यांच्या मनात. हृदयाला जागा राहो न राहो, तुला मात्र नेहमीच जागा राहील आमच्या मनात. धडधडत राहशील तू आमच्यात. कायम, सदैव, हमेशा…

————————————

– [email protected]

(लेखिका नाशिक येथे MET’s Institute of Pharmacy येथे कार्यरत आहेत)

सानिया भालेराव यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –सानिया भालेराव – type करा आणि Search वर क्लिक करा.

 

 

 

 

Previous articleसंथ वाहते कृष्णामाई…
Next articleजी.ए.कुलकर्णी : एक अरभाट साहित्यिक!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.