संथ वाहते कृष्णामाई…

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२१

– विजय चोरमारे

शरद पवार यांच्यानंतर समोरच्या माणसांचं मन लावून ऐकून घेणारा दुसरा कुणी नेता महाराष्ट्राच्या राजकारणात असेल तर ते एकमेव जयंत पाटील आहेत. हा नेता आपण जे सांगतोय ते मन लावून ऐकतोय हे समाधान समोरच्या माणसाला मिळत असतं. जयंत पाटील यांच्या अनेक कृतींमधून थेट शरद पवार डोकावत असल्यासारखे वाटतात. पण ते तसं आणि तेवढ्यापुरतं नाही. शरद पवार हे त्यांच्या आयुष्यात खूप उशिरा आले. त्यांच्या घडणीच्या काळात त्यांच्यावर कळत-नकळत संस्कार झाले ते समाजवादी परिवारातल्या नेत्यांचे. राजारामबापू पाटील जनता पक्षात असल्यामुळे चंद्रशेखर, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधू दंडवते, बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या नेत्यांची ऊठबस त्यांच्या घरी असायची.

000000000000000000000

राजारामबापू पाटील यांची 1959 साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याआधी 1957 च्या लोकसभा निवडणुकीत 23 पैकी 21 लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला होता. आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 132पैकी 100 उमेदवार पराभूत झाले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झंझावातापुढे काँग्रेसचा पालापाचोळा झाला होता. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी राजारामबापू यांच्याकडे प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर केलेल्या भाषणात राजारामबापूंनी ‘कठीण आहे, पण अशक्य नाही..’ अशा शब्दांत आत्मविश्वास प्रकट केला होता. 1962 च्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने बहुमत मिळवले, त्यावेळी प्रदेशाध्यक्षपद राजारामबापूंच्याकडे होते. 1962मध्ये राजारामबापू पाटील यांनीही वाळवा मतदार संघातून दिमाखदार विजय मिळवला. त्याचवर्षी जन्मलेल्या मुलाचे नाव त्यांनी ‘जयंत’ ठेवले. जयंत पाटील यांना मी पहिल्यांदा पाहिलं एफवायला असताना. 1987 मध्ये. कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये बीएस्सी करीत होतो. बीएस्सीला असलो तरी आर्ट्सची पोरं करतात तसल्या उपद्व्यापात जास्त असायचो. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं होतं. त्यानिमित्त न्यू कॉलेजचे प्रा.जे.के.पवार, ग्रंथपाल पी.सी.पाटील आणि भोगावती कॉलेजचे प्रा.दिनकर पाटील यांनी कोल्हापूर ते सातारा पदयात्रा काढण्याचं नियोजन केलं होतं. जे.के.पवार सर अर्थशास्त्राचे, पण वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा माझा संपर्क होता. त्यांनी पदयात्रेत सहभागी होण्यासंदर्भात विचारलं. काहीतरी आदर्शवत करण्यासाठी धडपडण्याचं ते रोमँटिक वय होतं. आपण खेड्यातून कोल्हापुरात आलोय आणि आपल्याला कुणीतरी आपले सर अशा थोर उपक्रमात सहभागी करून घेताहेत याचा आनंद होता. त्यामुळं पदयात्रेत सहभागी व्हायची तयारी दर्शवली. तीसेक मुलं आणि दोन मुली होत्या. कोल्हापूरहून निघाल्यानंतर पहिला मुक्काम तांदूळवाडीला आणि दुसरा मुक्काम कासेगावमध्ये होता. कासेगाव हे जयंत पाटील यांचं गाव. कुणाच्यातरी घराच्या सोप्यातच आमचा मुक्काम होता. तिथं रात्री छोट्याशा समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि जयंत पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. त्यावेळी त्यांचं वय चोवीस वर्षे असावं. त्यांनी छोटेखानी भाषणानंही खूप प्रभावीत केलं होतं. आम्ही पदयात्रा करीत आलो होतो, त्यासंदर्भानंच ते थोडावेळ बोलले. चंद्रशेखर यांची पदयात्रा, राजारामबापूंची पदयात्रा यांचे ओझरते संदर्भ आले. आणि पदयात्रेचं महत्त्व सांगताना म्हणाले, ‘जो निजतो त्याच नशीब निजतं, जो बसतो त्यांच नशीब बसत, जो चालतो त्याचं नशीब चालतं…’ वगैरे वगैरे.

राजारामबापू पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर अचानक राजकारणातली महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाचं ते व्यक्तिमत्त्व तेजस्वी म्हणता येईल इतकं प्रभावी होतं. बोलण्यातला गोडवाही मोहवून टाकणारा होता. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आल्यानंतरचं पहिलंच हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं. काँग्रेसवाले विरोधी पक्ष म्हणून सरावले नव्हते आणि शिवसेना-भाजपवालेही सत्ताधारी म्हणून रुळले नव्हते. विरोधात आहे म्हणजे आक्रमक बनायला पाहिजे, हे लक्षात यायला लागल्यावर काँग्रेसची विरोधाची धार वाढू लागली. शोभाताई फडणवीस यांच्या अन्न व नागरी पुरवठा खात्यातील चनाडाळ घोटाळा ऐरणीवर आला होता. विधानसभेत तेव्हा आर. आर. पाटील, दिग्वीजय खानविलकर, राजन पाटील, दिलीप वळसे-पाटील, अशोक धात्रक, माणिकराव ठाकरे,बबनराव पाचपुते वगैरे मंडळी आक्रमक असायची. जयंत पाटील या तरुण तुर्कांच्या गटात असले तरी दंगा करायच्यावेळी ते मागेच असायचे. एकेदिवशी विरोधक टाळ गळ्यात अडकवूनच सभागृहात आले आणि त्यांनी आपल्या मागण्यांचं भजन सुरू केलं. जयंत पाटीलही गळ्यात टाळ अडकवून हौद्यात उतरून भजन करणार्‍यांमध्ये होते. त्याच रात्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडं पत्रकारांसाठी जेवण होतं. तिथं दिवसभरातल्या कामकाजाचा विषय निघाल्यावर वळसे-पाटील म्हणाले, ‘अहो आज आमचे जयंत पाटीलसुद्धा गळ्यात टाळ अडकवून पुढं होते. नाहीतर ते एवढे शांत असतात की आम्ही त्यांना जयंत देशपांडे म्हणतो !’

1995 सालचे जयंत पाटील ते एखाद्याचा ठरवून ‘करेक्ट कार्यक्रम’ करणारे जयंत पाटील हा प्रवास राजशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी नीटपणे अभ्यास करण्यासारखा आहे.

———————–

जयंत पाटील यांच्याशी परिचय असला तरी थेट संवाद नव्हता. ते आपल्याला ओळखतात की नाही, हेसुद्धा माहीत नव्हतं. एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी त्यांना भेटायला जायचं होतं. त्यासाठी पत्रकार मित्राकडून त्यांचा फोन नंबर घेतला. तो सेव्ह करत असताना चुकून रिंग झाली, एखादीच रिंग झाली असेल आणि मी फोन कट् केला. काही सेकंदातच त्यांचा परत फोन आला. ओळख सांगितली. भेटायचं आहे सांगितल्यावर म्हणाले, ‘मी आता औरंगाबादला जाण्यासाठी विमानतळावर आहे. उद्या परत येणार आहे, परवा सकाळी आपण भेटू शकू, वेळ तुम्हाला कळवतो.’ ठीक आहे म्हटलं. असा कुठला मंत्री परत फोन वगैरे करीत नसतो हे मला एवढ्या वर्षांच्या अनुभवानं माहित होतं. दोन दिवसांनी पुन्हा फोन करू असं मनात ठरवलं. पण आश्चर्याची बाब म्हणजे दुसर्‍या दिवशी संध्याकाळी त्यांच्या सहाय्यकांचा फोन आला, की उद्या सकाळी अकरा वाजताची वेळ तुम्हाला दिली आहे. पत्ता आणि गुगल मॅप लोकेशन तुम्हाला पाठवतो.

दुसर्‍या दिवशी तासभर आधी पुन्हा सहाय्यकांचा फोन कुठवर आलाय म्हणून. स्वतः जयंत पाटील यांचाही मेसेज. आणि ही भेट झाली. नव्यानं सत्ता आली असल्यामुळं घरी प्रचंड गर्दी होती. तरीही त्यांनी स्वतंत्रपणे निवांत वेळ दिला. अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त अण्णा भाऊंच्या जन्मगावी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. जयंत पाटलांचं गाव असलेल्या कासेगावला लागून वाटेगाव. त्यामुळं संमेलनाचं उदघाटन त्यांच्या हस्ते व्हावं अशी इच्छा होती. परंतु त्यादिवशी विधिमंडळात त्यांच्या खात्याशी संबंधित विषय असल्यामुळं त्यांना संमेलनाला उपस्थित राहणं शक्य नव्हतं. तसं त्यांनी दिलगिरीपूर्वक सांगितलं. दरम्यान इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न माझ्या अनेक वर्षे डोक्यात होता. तो पुनर्वसन विभागाचा विषय. पण त्यामध्ये जलसंपदा विभागाची काही जबाबदारी येते, असं मला नेहमी वाटायचं. वेळ होता आणि संधीही होती म्हणून मी त्यांच्याकडं विषय काढला. म्हटलं, माणसं घरदार जमीनजुमला सगळं सोडून उठून जातात. उठेपर्यंत तुम्ही लोक त्यांना खूप आश्वासनं देता, पण नंतर त्यांची ससेहोलपट होते. पुनर्वसन विभाग नीट काम करीत नाही. आता तुमच्याकडं जलसंपदा विभाग आहे. खरंतर जलसंपदा विभागानं मानवतेच्या भूमिकेतून प्रकल्पग्रस्तांची काहीएक जबाबदारी घ्यायला पाहिजे. माणसांना विस्थापित करून तुम्ही पुनर्वसन विभागाच्या भरवशावर सोडून देता. वगैरे वगैरे. जयंत पाटील यांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. बोलले काहीच नाहीत. मला माहीत होतं, अशा बोलण्याला काही अर्थ नसतो आणि त्यातून काही साध्य होत नसतं. आपण आपल्या मनातली वेदना कुणातरी मंत्र्याजवळ बोललो एवढंच समाधान.

काही महिन्यांनी जयंत पाटील यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक बातमी वाचली आणि मनातल्या मनात त्यांना सलाम केला. ती बातमी अशी होतीः सांगली जिल्ह्यातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींच्या सोडवणूकीबाबत अपेक्षापूर्ती व फलनिष्पत्ती समारंभ पार पडला. वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे गेल्या 30-35 वर्षातील महत्वाचे प्रलंबित प्रश्न विशेष मोहिमेद्वारे आम्ही सोडवू शकलो याचे मोठे समाधान आम्हा सर्वांना आहे. माझ्या जल संधारण खात्यामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी नोकरीत 10-15 % आरक्षण करण्याचा प्रयत्न आहे, जे सध्या 5% आहे. या मोहिमेदरम्यान एकूण 105 अर्जांचा निपटारा करण्यात आला. 65.86 हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले. 19 हजार 391 चौरस मीटर वसाहतीमधील क्षेत्राची कब्जेपट्टी देण्यात आली. एक हजार 331 भूखंडाचे वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यात आले. तसेच 4 कोटी 19 लाख रुपयांचा निर्वाह भत्ता वाटप करण्यात आला.

इस्लामपूर येथे सांगली जिल्ह्यातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षापूर्ती व फलनिष्पती मेळाव्यात सांगली जिल्ह्यातील 29 वसाहतीमधील प्रकल्पग्रस्तांना जमीन, भूखंड तसेच नागरी सुविधेच्या प्रशासकीय मान्यतेच्या आदेशाचे वाटप करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या उभारणीसाठी मोठा त्याग केला आहे. मोर्चे, आंदोलने करण्यात प्रकल्पग्रस्तांच्या दोन पिढ्या गेल्या. त्यामुळेच जिल्ह्याचा पालकमंत्री होताच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडविणारी मोहीम हाती घेतली. पुढच्या 10-20 वर्षात सुटले नसते, असे साधारण 70-80 टक्के प्रश्न मार्गी लागले आहेत. कोविडमुळे काही काळ विलंब गेला. सध्या जनगणना सुरू आहे. वर्षभरात काम पूर्ण झाल्यानंतर आपले स्वतंत्र ग्रामपंचायतीचे प्रस्ताव मार्गी लावू. ज्या प्रकल्पग्रस्तांना क्षारपड जमीन आली आहे, त्या जमिनीतून जल संधारण खात्याच्या वतीने पाण्याचा निचरा करून दिला जाईल व अधिकाधिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.

मी बोलल्यानंतर त्यांनी हा विषय मनावर घेतला, की आधीपासूनच ते या विषयाकडं गांभीर्यानं पाहात होते याची चर्चा करण्याची मला इथे गरज वाटत नाही. एक मंत्री किती संवेदनशीलतेने काम करतो, तळागाळातल्या माणसांच्या समस्या दूर करण्यासाठी किती तळमळीनं लक्ष घालतो आणि प्रश्न मार्गी लावतो, हे त्यांच्या या कृतीतून मला दिसून आलं. जी संवेदनशीलता सामाजिक प्रश्नांबाबत तीच व्यक्तिगत संबंधांबाबत. आपल्या कार्यकर्त्याला ताकद देणं असो किंवा जगण्याच्या लढाईत त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं असो, जयंत पाटील तिथं कुठं कमी पडताना दिसत नाहीत. एखाद्या नेत्याचं आपल्या कार्यकर्त्यावर किती बारीक लक्ष असावं, याचं उदाहरण म्हणून त्यांच्याकडं पाहता येतं.

इस्लामपूरजवळच्या कामेरीचे प्रा.अनिल पाटील हे पक्षाचे जुने-जाणते कार्यकर्ते. त्यांच्या पत्नी छायाताई पाटील या पक्षाच्या पदाधिकारी. जिल्हा परिषदेच्या सदस्यही होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्ष. त्यांचा मुलगा कुणालला एकदा ते म्हणाले, “आईला एक छान लांबडी गाडी घेऊन दे रे, आयुष्यभर दोघं टू व्हीलर वरून फिरलेत, अजून असं किती दिवस फिरायला लावणार आहेस त्यांना?” बरी आर्थिक परिस्थिती असली तरी अल्टोपर्यंत त्यांची धाव होती. पण अनिल पाटील यांच्या डॉक्टर असलेल्या मुलाच्या साकेतच्या पत्नीनं डॉ. स्मिता यांनी सासूबाईंना छान लांबडी गाडी घेऊन दिली. आपलंच स्वप्नं साकार झाल्याचा आनंद तेव्हा जयंत पाटील यांना झाला. त्यांनी नव्या गाडीपुढं नुसता नारळच वाढवला नाही, तर गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसले. प्रा.अनिल पाटील आणि छायाताई पाटील यांना त्यांच्या गावापर्यंत कामेरीपर्यंत सोडायला आले! कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात एवढा समरस होणारा नेता आजच्या काळात विरळाच म्हणावा लागेल.

जयंत पाटील यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले. कुठल्याही सत्तेच्या ठिकाणी विरोधातले सगळे छोटे मोठे घटक एकत्र येतात, त्याप्रमाणं अनेकदा जयंत पाटील यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडं नोंद असलेल्या सगळ्या पक्षांची आघाडी होते. तरीसुद्धा जयंत पाटील मोठ्या फरकानं सहज निवडून येतात. त्यांच्यापुढं आव्हान उभं राहिल्याचं चित्र काहीवेळा निर्माण करण्यात आलं, पण निवडून येण्यासाठी संघर्ष त्यांना कधीच करावा लागला नाही. राजकीय क्षेत्रात महत्त्वाकांक्षा असलेले अनेक विरोधक त्यांच्या मतदारसंघात आहेत. पण एका गोष्टीची आवर्जून नोंद घ्यावी लागते. राजारामबापू पाटील गेले तेव्हा जयंत पाटील एकवीस वर्षांचे होते. बापूंचे अनेक सहकारी तेव्हा राजकारणात होते. त्यापैकी अनेकजण आजही सक्रीय आहेत. परंतु एकही महत्त्वाचा सहकारी त्यांना सोडून गेलेला नाही.

त्यांची आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्यांनी विकसित केलेले संस्थात्मक जाळे. राजारामबापू पाटील यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला तसाच सहकार क्षेत्राचाही वारसा मिळाला. गेल्या तीस वर्षांत सर्वच क्षेत्रांत परिस्थिती झपाट्याने बदलली, अनेक स्थित्यंतरे आली. बदलत्या काळाची आव्हाने पेलत त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थांचा चौफेर विकास झाला. साखर कारखानदारी, दुग्धव्यवसाय, शिक्षणसंस्था, बँक अशा सर्व क्षेत्रातील त्यांच्या संस्थांनी सर्वांगीण प्रगती केली आहे. राजकीय नेत्यांच्या संस्थांमध्ये काही ठिकाणी अनागोंदी दिसते तसा कुठलाही प्रकार त्यांच्या संस्थांमध्ये दिसत नाही. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड नाही, त्याचमुळे दुधापासून शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रात साखराळे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत अग्रेसर आहे. व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून आणि विकासाचा मानवी चेहरा टिकवून त्यांच्या नेतृत्वाखाली विकास झाला आहे. राजारामबापू यांच्यापासूनची निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यासोबत आहे. जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखत आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ घेत त्यांनी आपले संस्थात्मक जाळे तसेच राजकीय पायाही भक्कम केला आहे. जुन्यांना सोबत घेतानाच नवी फळीही उभी राहील, यासाठी ते प्रयत्नशील असतात.

असंच एक उदाहरण आहे.

राजारामबापू पाटील यांच्यासंदर्भातील ग्रंथाचा प्रकाशन समारंभ पुण्यात करायचा होता. अशा प्रकारची कामं कुणी करायची हे त्यांच्या चौकटीत ठरलेलं आहे. प्रकाशन करणारे वेगळे बाहेरचे लोक होते. तयारी सुरू झाली. प्रकाशन करणारे लोक आणि जयंत पाटील यांच्यामार्फत जबाबदारी असेलले लोक यांचे काही जमेना. प्रकाशन करणा-या लोकांचे जयंत पाटील यांच्याशीही जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या लोकांशी जमेना म्हणून त्यांनी त्यासंदर्भात जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यावर जयंत पाटील यांनी त्यांना सांगितलं, ‘ ते अनेक वर्षांपासून माझ्यासोबत काम करणारे लोक आहेत. माझे विश्वासू लोक आहेत. आमच्या चौकटीत या कामाची जबाबदारी त्यांच्यावर असते आणि ती त्यांच्यावरच राहील. त्यामुळं तुम्हाला त्यांच्याशी जुळवून घेऊनच काम करावं लागेल.’ इतकं स्पष्ट असतं सगळं.

————————-

राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री ग्रामीण भागातले. त्यामुळं बहुतेक सगळे गुंठापाटील असल्यासारखेच वाटतात. जयंत पाटील हेही ग्रामीण भागातले असले तरी त्यांचं व्यक्तिमत्त्व वेगळं वाटतं. इतरांपेक्षा सुशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू वगैरे. जयंत पाटील वरून तसे भासत असले तरी त्यांच्यातही एक अस्सल गावरान माणूस दडला आहे. आता आता परिस्थिती सुधारलेली दिसते. पण अगदी काही वर्षांपूर्वीपर्यतची त्यांची एक सवय भलतीच मजेदार होती. त्यांना रुमाल वापरण्याची सवय नव्हती. त्यामुळं कुठंही जेवण झालं की हात धुतल्यानंतर ते गुपचूप पँटच्या खिशात घालून खिशातल्या खिशात पुसूनच बाहेर काढायचे.

राज्याचे नऊ अर्थसंकल्प सादर करणारे जयंत पाटील खिशात मात्र पैसे ठेवत नसत. उच्चशिक्षित असले तरी ते धार्मिक वृत्तीचे आहेत. त्यामुळं देवदर्शनासाठी देवळात जाणं आलंच. देवळात गेलं की मग सोबत असलेल्या कार्यकर्त्यापुढं हात पसरत आणि त्याच्याकडून पैसे घेऊन दक्षिणा टाकत. त्यांची ही सवय इतकी लोकप्रिय झाली होती, की साहेब देवळात जाणार म्हटल्यावर सोबतचे कार्यकर्ते देवळाच्या पायरीवरूनच मागे पसार व्हायचे. सोबतच्या लोकांची काळजी घेणं हा त्यांचा एक विशेष गुण म्हणावा लागेल, जो फार कमी नेत्यांकडं आढळतो. वेळा पाळण्याच्या बाबतीत ते जरा गहाळ आहेत. भेटी पटापट उरकत नाहीत. त्यामुळं मग भेटायला आलेल्या काही लोकांना गाडीत बसायला सांगतात. जिथं जायचं असेल तिथवर सोबत घेऊन त्यांचं ऐकून घेतात. तिथं कुठल्या समारंभाला जाणार असतील तर सोबतच्या व्यक्तिला सन्मानाने सोबत ठेवतात. संबंधिताची व्यासपीठावर बसण्याची तयारी नसेल तर संयोजकांना सांगून पहिल्या रांगेत व्यवस्था करतात. त्यांना पाणी, चहा देण्याची व्यवस्था वैयक्तिक लक्ष घालून करतात. आणि त्यांचा आवर्जून आदरपूर्वक नामोल्लेखही करतात.

मतदारसंघात दौरा असतो तेव्हासुद्धा त्यांचं हे सुरू असतं. तिथं एका गावातून दुसर्‍या गावात जाईपर्यंत संबंधितांशी मोकळेपणाने चर्चा करतात. पुढच्या गावाकडं जाताना नवे लोक गाडीत असतात. अतिशयोक्ती ठरणार नाही, परंतु शरद पवार यांच्यानंतर समोरच्या माणसांचं मन लावून ऐकून घेणारा दुसरा कुणी नेता महाराष्ट्राच्या राजकारणात असेल तर ते एकमेव जयंत पाटील आहेत. हा नेता आपण जे सांगतोय ते मन लावून ऐकतोय हे समाधान समोरच्या माणसाला मिळत असतं. एखादी व्यक्ती भेटायला आली असेल, त्यांच्यासोबत त्यांचे कुणी नातेवाईक, कुटुंबीय असतील तर त्यांचीही व्यक्तिगत विचारपूस ते करतात. कुणी काही वेगळं करीत असतील तर त्यासंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. कामं मार्गी लावण्याचा विक्रम करण्यापेक्षा समोरच्या माणसांना विश्वास देण्याचं काम करायला ते प्राधान्य देतात.

जयंत पाटील यांच्या अनेक कृतींमधून थेट शरद पवार डोकावत असल्यासारखे वाटतात. पण ते तसं आणि तेवढ्यापुरतं नाही. शरद पवार हे त्यांच्या आयुष्यात खूप उशिरा आले. त्यांच्या घडणीच्या काळात त्यांच्यावर कळत-नकळत संस्कार झाले ते समाजवादी परिवारातल्या नेत्यांचे. राजारामबापू पाटील जनता पक्षात असल्यामुळे चंद्रशेखर, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधू दंडवते, बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या नेत्यांची ऊठबस त्यांच्या घरी असायची. त्याआधी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील वगैरे मंडळींशी घरोबा होता. राजकीय परंपरा असली तरी राजारामबापू पाटील यांनी मुलांना राजकीय वार्‍यापासून दूर ठेवलं होतं. त्यांनी सामान्य मुलांप्रमाणं वागावं असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळं कॉलेजला बस, ट्रेननंच जावं लागायचं. राजारामबापू जयंत पाटील यांना म्हणायचे, ‘शिकून मोठं झाल्याशिवाय आयुष्यात काही मिळणार नाही. शिकला नाहीस, तर कासेगावला म्हशी राखायला जावं लागेल.’

बापूंच्या आग्रहामुळं आणि आईच्या सततच्या पाठपुराव्यामुळं त्यांच्यासह सगळीच भावंडं चांगली शिकली. जयंत पाटील यांनी व्हीजेटीआयमधून सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर स्वतःच्या बळावर नोकरी मिळवायला बापूंनी सांगितलं. त्यानंतर एक हजार रुपये पगारावर एका कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी केली. त्याच दरम्यान परदेशातील काही विद्यापीठांत प्रवेशासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. परदेशातील चार वेगवेगळ्या विद्यापीठांत प्रवेश मिळाला, पण फीचा प्रश्न होता. कंपनीने फी भरण्याची तयारी दर्शवली, पण पुन्हा त्याच कंपनीत येऊन नोकरी करण्याचा बाँड लिहून घेतला. न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एमएस स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळाला. जयंत पाटलांनी परदेशी जावे, अशी बापूंची इच्छा नव्हती, पण मुलाची इच्छा असल्यामुळं त्यांनी विरोधही केला नाही.

जयंत पाटील यांचं विमान पहाटे दोन वाजता होतं. बापूंनी परदेशी जाण्यासाठीची सगळी तयारी आत्मियतेनं करून दिली होती. जयंत पाटील यांना विमानात बसवून घरी परत येत असतानाच बापूंना चक्कर आली. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. तिथं उपचारात काही चुका होत गेल्या, त्यामुळं प्रकृती चिंताजनक बनली. नाईलाजानं जयंत पाटील यांना बातमी कळवावी लागली. मिळेल त्या विमानानं ते परत आले. बापूंना ते भेटले आणि काही वेळातच बापूंनी प्राण सोडले. तो दिवस होता 17 जानेवारी 1984. पाहिलेल्या स्वप्नांसह सगळंच उध्वस्त करणारा हा काळ होता.

बापूंच्या निधनानंतर काही दिवसांनी बापूंचे प्रमुख कार्यकर्ते कुसुमताईंकडे म्हणजे जयंत पाटील यांच्या आईकडे आले आणि म्हणाले, ‘आम्हाला कुणाचंतरी नेतृत्व हवं आहे. भगतसिंग (जयंत पाटील यांचे मोठे बंधू) आता राजकारणासाठी आम्हाला द्या. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू.’ जयंत पाटील अमेरिकेतून अर्धवट शिक्षण सोडून आले होते आणि आईला सोडून परत अमेरिकेला जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. भगतसिंग तेव्हा नोकरी करीत होते. भगतसिंगना राजकारणासाठी दिलं तर घरात कमावतं कुणीच राहणार नाही म्हणून व्यावहारिक विचार करून घरातल्या सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतला की, कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी चार महिने जयंतला राजकारणात जाऊ दे. सहानुभूतीची लाट संपली की तोही परत येईल. अशा रितीनं अगदी अपघातानं म्हणता येईल असा जयंत पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला.

राजकारणात जाण्याचा निर्णय झाल्यावर जयंत पाटील आधी शरद पवार यांना भेटायला गेले. पवारांचा तेव्हा समाजवादी काँग्रेस पक्ष होता. पवार म्हणाले, मी तुला माझ्या पक्षात घेऊ शकतो, परंतु लोक म्हणतील पवारांनी बापूंचं घर फोडलं. मला ते नको आहे. त्यानंतर वसंतदादा पाटील यांनी त्यांना काँग्रेस पक्षात घेतलं. जयंत पाटील यांनी एके ठिकाणी म्हटलंय की, वसंतदादांनी त्यांना खूप प्रेम दिलं, पक्षात चांगली वागणूक दिली. परंतु दादांच्या बरोबरच्या लोकांनी मात्र त्यांच्याशी नेहमी अंतर ठेवलं. पुढं शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि तेव्हापासून त्यांची दमदार राजकीय वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर शरद पवार यांनी त्यांची क्षमता ओळखून त्यांना दुसर्‍या क्रमांकाचं अर्थखातं दिलं. जयंत पाटील एके ठिकाणी म्हणाले होते, राष्ट्रवादीत असल्यामुळं पवार साहेबांमुळं मला दुसर्‍या क्रमांकाचं खातं मिळालं. काँग्रेसमध्ये असतो तर पतंगराव कदम यांचा कार्यकर्ता बनून त्यांच्यामागं फिरावं लागलं असतं.

पक्षानं, नेतृत्वानं सोपवलेली जबाबदारी शांतपणे पार पाडत राहणं हे जयंत पाटील यांचं वैशिष्टय. आजच्या काळात दुर्गुण म्हणता येईल अशी गोष्ट म्हणजे केलेल्या कामाचं मार्केटिंग करण्यासाठी ते आटापिटा सोडा, प्रयत्नही करीत नाहीत. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्लयाची जबाबदारी स्वीकारून आर. आर. पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तेव्हा त्या कठीण परिस्थितीत गृहमंत्रिपदाचा काटेरी मुकुट पवारांनी जयंत पाटील यांच्या डोक्यावर ठेवला. त्या काळात मनोधैर्य खचलेल्या पोलीस दलाचे मनोधैर्य वाढवण्याबरोबरच पोलिस दलाचे आधुनिकीकरण करण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी पार पाडली. परंतु जयंत पाटील यांनी आपल्या या कामाचं मार्केटिंग कधीच केलं नाही. त्यावेळी खरंतर आणखी काही काळ त्यांच्याकडं गृहखातं राहिलं असतं, तर गृहखात्याचं एक वेगळं चित्र बघायला मिळालं असतं.

शरद पवार यांचं प्रेम आणि विश्वास मिळाला तरी जेव्हा जेव्हा कसोटीचा प्रसंग आला, तेव्हा पवारांनी त्यांच्याबाबतीत दुजाभाव केल्याचंच चित्र दिसून आलं. आर. आर. पाटील हे पवारांचे लाडके होते. त्यामुळं त्यांच्यासाठी जयंत पाटील यांच्याकडचं गृहखातं वर्षभरात काढून घेऊन ते परत आर.आर. पाटील यांना देण्यात आलं. दुसरा प्रसंग महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरचा. खरंतर पक्षाच्या कठिण परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष म्हणून दिलेली साथ आणि अजित पवार यांच्या फडणवीसांसोबतच्या शपथविधीनंतरची परिस्थिती हाताळताना बजावलेली भूमिका यामुळं स्वाभाविकपणे उपमुख्यमंत्रिपदाचे दावेदार जयंत पाटील हेच होते. परंतु तिथंही पुन्हा ते पद अजित पवार यांच्याकडं गेलं.

इतरांच्या दृष्टिकोनातून असे अन्यायाचे प्रसंग आले तरी जयंत पाटील यांनी कधी नाराजीचा उसासाही काढला नाही. त्याचं कारण पवारांच्यावर असलेली त्यांची निष्ठा. पवारांना माहीत असतं की पक्षाच्या भवितव्याचा विचार करून आपण निर्णय घेतोय, तो घेताना जयंत पाटील यांच्यावर अन्याय होतोय. पण आताच्या परिस्थितीतली अडचण समजून घेण्याची कुवत, समंजसपणा फक्त जयंत पाटील यांच्याकडं आहे. आणि जयंत पाटलांनाही माहीत असतं, की साहेबांची काहीतरी अडचण असू शकते, त्यामुळं त्यांची पवारांच्यावरची निष्ठा तसूभरही कमी होत नाही. परस्पर विश्वासाचा हा दोन तपांहून अधिक काळचा प्रवास आहे. त्याअर्थानं विचार केला, तर शरद पवार यांना समजून घेणारा जयंत पाटील यांच्यासारखा दुसरा कोणताही नेता त्यांच्या आसपास नाही. ज्या नेत्यावर आपली श्रद्धा आहे त्याचीही काही मजबुरी असू शकेल हे समजून घ्यायला काळीज सुपाएवढे असावे लागते आणि निष्ठा तेवढीच कणखर असावी लागते. जयंत पाटील यांनी आपल्या सुसंस्कृत वर्तनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक उदाहरण घालून दिले आहे.

————————–

मे 2018 मध्ये शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. ऑक्टोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे अनेक नेते, आमदार पक्ष सोडून गेले. अशावेळी प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन मैदानात उतरले. इतिहासाची पुनरावृत्ती कशी होती बघा. राष्ट्रवादी काँग्रेसने सन्मानजनक जागा मिळवल्या आणि सत्तेत मोठा वाटाही मिळवला.

राजारामबापू यांनी यशवंतरावांना साथ दिली तशीच साथ जयंत पाटील यांनी शरद पवार यांना दिली आणि महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलून टाकले. पन्नास वर्षांपूर्वीचे राजकारण काँग्रेस विरोधात बाकीचे सगळे असे होते. अलीकडे ते स्वरुप बदलले. चार प्रमुख पक्षांबरोबरच इतरही छोटे-मोठे वाटेकरी बनले आहेत. दहा वर्षांपूर्वी विधानसभेत एक चतुर्थांश जागा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक सप्तमांश घसरला होता. विरोधी पक्षांचा आवाज क्षीण झाला होता. सत्तेच्या वरवंट्याखाली सगळेच दबून गेले होते. सरकारविरोधात फार आवाज चढवला तर एखाद्या यंत्रणेला छू करून अंगावर सोडण्याची सततची भीती. त्यामुळे हल्लाबोलचा कितीही देखावा केला तरी ते गर्दीत अवसान आणल्यासारखेच होते. कारण पक्षातले निम्मे-अर्धे आतून सतत घाबरलेलेच होते. अशा परिस्थितीत पक्ष वाढणे कठीण बनले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शरद पवार यांनी त्यातून शोधलेला मार्ग म्हणजे जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी केलेली निवड होती ! कोणत्याही महत्त्वाच्या पदावरील निवड गौरवास्पद असते, हे खरे असले तरी जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्याची क्षमता आणि योग्यता याहून खूप अधिक आहे. परंतु यावेळी योग्यतेपेक्षा आव्हान महत्त्वाचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढचे आव्हान खूपच खडतर होते. लोकसभेची निवडणूक एक वर्षावर आणि त्यानंतरच्या सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक असताना पक्षाला सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचे आव्हान होते आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांना त्यात महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार होती. ती त्यांनी चोखपणे पार पाडल्याचे निकालानंतर दिसून आले.

जयंत पाटील हे अभ्यासू आहेत. त्यांची सांस्कृतिक समज अन्य कुणाही नेत्यापेक्षा उत्तम आहे. मुलुखमैदान तोफ नसली, तरी त्यांचे वक्तृत्व प्रभावी आणि प्रवाही आहे. विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना ज्या कौशल्याने शांत केले त्यावरून त्याची झलक दिसून आली. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम अशा पाच नेत्यांची यादी करायची झाली,तर त्यात जयंत पाटील यांचे नाव पहिल्या क्रमांकावर घ्यावे लागेल. अर्थात मुख्यमंत्रिपद हा संख्याबळाचा, योगायोगाचा आणि नशिबाचाही भाग असतोच. यापूर्वी ते अनेकांना अपघाताने मिळाले आणि योग्यतेच्या माणसांना हुलकावणी दिली. जयंत पाटील आता कुठे साठीत येताहेत, त्याअर्थाने त्यांचा राजकारणातला प्रगल्भतेचा काळ सुरू होतोय. भविष्यात राजकारण कशी वळणे घेते त्यावर ब-याच गोष्टी अवलंबून असतील. पण त्यापलीकडे जाऊन मुख्यमंत्रिपदासाठी सर्वार्थाने योग्य व्यक्ती म्हणून आजच्या घडीला जयंत पाटील यांचे नाव घ्यावे लागते, यातून त्यांचे मोठेपण अधोरेखित होते. जयंत पाटील यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रयत्न केले होते. पृथ्वीराज चव्हाण यांना परत दिल्लीला जावे लागले तर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून जी नावे समोर येत होती, त्याबाबत केंद्रीय नेतृत्व समाधानी नव्हते. त्यावेळी जयंत पाटील यांचा पर्याय काँग्रेससमोर होता आणि जयंत पाटील यांच्यासाठीही चांगली संधी होती. अशी संधी असतानाही जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रतारणा केली नाही.

इथे पुन्हा राजारामबापू पाटील यांची आठवण येते. राजारामबापू काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा कधी काँग्रेसचा विचार केला नाही. बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना एकदा त्यांनी बापूंची भेट घेऊन काँग्रेसमध्ये येण्यासंदर्भात दिल्लीचा निरोप असल्याचे सांगितले होते. परंतु बापूंनी ते निमंत्रण नम्रपणे नाकारले. काँग्रेसमध्ये मंत्रिपदे मिळाली, परंतु जनता पक्षात एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते, बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या नेत्यांकडून आणि शेकडो कार्यकर्त्यांकडून प्रेम मिळाले, त्याबद्दल त्यांना कृतज्ञता वाटत होती. जयंत पाटील यांच्याबाबतीतही तेच दिसते. काँग्रेसमध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन होते, परंतु शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा विश्वास त्यांना महत्त्वाचा वाटला.

57 वर्षांपूर्वी राजारामबापू पाटील यांच्यापुढे होती, तशीच परिस्थिती यावेळी जयंत पाटील यांच्यापुढे होती. अशावेळी राजारामबापूंनी जे वाक्य उच्चारले, तेच प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांनी उच्चारले आणि शरद पवार यांनाही विश्वास दिला, ‘कठीण आहे, पण अशक्य नाही !’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आला आणि जयंत पाटील यांचा विश्वास सार्थ ठरला.

चंद्रशेखर यांनी जनता पक्षाचे अध्यक्ष असताना काढलेली पदयात्रा असेल, राजारामबापू पाटील यांचा संपूर्ण महाराष्ट्रात त्या पदयात्रेतील सहभाग असेल किंवा बापूंनी वीस कलमी कार्यक्रमांच्या प्रसारासाठी सांगली जिल्ह्यात काढलेली पदयात्रा असेल. जयंत पाटील यांनी हे सगळं जवळून बघितलंय. राजकारण करायचं तर थेट लोकांच्यात जाण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखलं. म्हणूनच सत्ता आल्यानंतरही त्यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने विदर्भातून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू केली. एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने अशा रितीने लोकसंवाद, लोकसंपर्क वाढवून पक्षबळकटीसाठी प्रयत्न केल्याचे अलीकडच्या काळातील हे दुर्मीळ उदाहरण म्हणावे लागेल. आजच्या काळाच्या गतीशी पदयात्रेचा वेग जुळणार नाही, याचे भान असल्यामुळे त्यांनी पदयात्रा टाळली, पण परिवार संवाद यात्रा हे त्याच्या पुढचे पाऊल आहे. पुढार्‍यांचा, सुभेदारांचा पक्ष म्हटल्या जाणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला तळागाळातल्या लोकांशी जोडून पक्षाचा पाया विस्तारण्याचा हा प्रयोग त्यांच्या पक्षापुरताच नव्हे, तर एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टिनेही वेगळा आहे.

खळखळाट न करता कृष्णामाई ज्या संथ गतीने वाहत असते, तशाच रितीनं चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचण्याचा कृष्णाकाठच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा हा प्रयत्न निश्चितच दखलपात्र आहे!

————————————–

लेखक नामवंत पत्रकार आहेत.

+91 95949 99456

Previous articleकपिल शर्मा- शर्माजींचा ‘परफेक्ट’ नसणारा बेटा!
Next articleमैं जो हूँ ‘जौन-एलिया’हूँ जनाब…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.