कपिल शर्मा- शर्माजींचा ‘परफेक्ट’ नसणारा बेटा!

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२१

अमोल उदगीरकर

कपिल छोट्या शहरातून आलेला आहे. इंग्रजी भाषेचीच नव्हे, तर एकूणच बोर्डरूम मॅनर्सशी त्याचा दुरूनही संबंध नव्हता. कपिल एका अशा घरातून आला आहे, जिथं कायम आर्थिक चणचण असायची. आपण मुंबईला सर्वप्रथम हॉटेलमध्ये गेल्यावर जेवण झाल्यावर हात  धुण्यासाठी दिलेलं लिंबूपाणी कसं झटक्यात पिऊन टाकलं होतं, याचा किस्सा कपिलने रंगवून सांगितला आहे. आता कितीही लोकप्रिय असला, तरी अजून जेव्हा अमिताभ बच्चन, शाहरुख खान, कपिलदेव सारखं कुणी त्याच्या शोवर आला की, हातात नवीन खेळणं मिळालेल्या लहान मुलासारखा कपिल हरखून जातो. कपिल त्या अर्थाने अजूनउच्चभ्रू झालेला नाही.

00000000000000000000000

    मित्रवर्य कौशल इनामदारने बोलता-बोलता सांगितलेलं शांता शेळके यांचं एक वाक्य मनात घर करून बसलं होतं. शांताबाई शेळके यांनी त्यांचा एका मुलाखतीत म्हटलं होतं- “प्रतिभा हा शब्द आपण फार सर्रास आणि वर वर वापरतो. इतकी काही प्रतिभा वर आलेली नसते. बर्‍याचदा एक नैसर्गिक क्षमता (Aptitude)असते आणि तिला कारागिरीची (Craftsmanship) जोड क्रमप्राप्त असते.” मला फार आवडलं होतं त्यांचं म्हणणं. आपण प्रतिभावंत नाही, याचा न्यूनगंडही नाहीसा झाला त्यामुळे. पण, मला एक जो ‘प्रतिभावान’ असणं किंवा ‘जीनिअस’ असणं म्हणजे नेमकं काय, याचं उत्तर व्यक्तिपरत्वे बदलतं का, असा उपप्रश्न पडला होता. म्हणजे, ज्याला इंग्रजीत ‘One man’s ceiling is another man’s floor’ म्हणतात तसं! एका माणसाला एखादा कलाकार जीनिअस वाटतो, तो तसा अनेकांना न वाटण्याची जोरदार शक्यता असते. मग कोण जीनिअस आहे आणि कोण नाही, या प्रश्नांची उत्तर व्यक्तिपरत्वे बदलू शकतात का? एखाद्याला व्हॅन गॉग आणि पंडित भीमसेन जोशी जीनिअस वाटतं नसतील, तर अशा माणसांच्या अभिरुचीचं काय करायचं? आणि एखाद्याला हिमेश रेशमिया किंवा गेला बाजार कांती शाह जीनिअस वाटतं असेल, तर त्यांचा काय टकमक टोकावरून कडेलोट करायचा का? एखादा कलाकार जीनिअस असण्यासाठी जास्त आवश्यक काय असतं? काही ठराविक तज्ज्ञ- समीक्षक लोकांची पसंतीची मोहोर का बहुसंख्य जनतेचं प्रेम? ‘जीनिअस’ कोण या प्रश्नाचं उत्तर एखाद्या जीनिअस कलावंताइतकंच किचकट आहे. सुरुवातीलाच एवढी प्रस्तावना आणि प्रश्नांचा भडिमार यासाठी की, मी ज्या माणसावर लिहिणार आहे, त्याला ‘जीनिअस’ या श्रेणीत टाकणं अनेकांना खटकू शकतं. कपिल शर्मा हा कितीही लोकप्रिय असला, तरी चारचौघात ते सांगण्याची सोय नसते. कारण, आपल्या आवडीमुळे लोक आपल्याला हसतील, अशी भीती अनेकांच्या मनात घर करून असते. कपिल शर्माच्या निमित्ताने या ‘अभिरुचीच्या दहशतवादाची’ पण नोंद घेता येते, हे महत्वाचं.

     कपिल शर्मा हा आपल्याकडे एवढा मोठा का झाला, याचा आढावा घेण्यापूर्वी भारतातल्या स्टँडअप कॉमेडीचा आढावा घ्यावा लागेल. हा आढावा मी फार थोडक्यात आणि फारच थोडक्यात घेणार आहे. आपल्या देशात ‘स्टँडअप कॉमेडी’ हा प्रकार फारसा रुजलाच नाही कधी. आपल्याकडे अनेक स्टँडअप कॉमेडियन होऊन जरी गेले असले, तरी स्वतंत्रपणे या क्षेत्राचा विकास झाला नाही. जॉनी लिव्हर, दिनेश हिंगु, बोमन इराणी, जसपाल भट्टी, भरत दाभोळकर या लोकांनी 90 च्या दशकात प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. आपल्या महाराष्ट्रात पण पु. ल. देशपांडे आणि शिरीष कणेकर यांनी उत्तम स्टँडअप कॉमेडी केली. शेखर सुमन पण ‘मुवर्स अँड शेकर्स’ कार्यक्रमातून उत्तम कॉमेडी करायचा. वीर दास, झाकीर, सुनील पाल, राजू श्रीवास्तव हे पण लोकप्रिय होते. पण, लोकसंख्येचा आणि मनोरंजनाच्या मार्केटचा विचार करता, क्षमता असूनही स्टँडअप कॉमेडीची संकल्पना पाहिजे तितक्या प्रमाणात रुजली नाही. याला भारतीय प्रेक्षकांचं सिनेमावर मनोरंजनासाठी अवलंबून असणं, हा घटक महत्त्वाचा ठरत असावा. चित्रपट संगीताने ज्याप्रमाणे भारतीय इंडी पॉप संपवण्यात मोलाचा वाटा उचलला, तसा आपलं स्टँडअप कॉमेडी क्षेत्र न फुलण्यात सिनेमाने मोठा वाटा उचलला. वर उल्लेख केलेल्या बहुतेक कॉमेडियनने चित्रपटांमध्ये हातपाय मारण्याच्या प्रयत्न केला. उत्तम अभिनयक्षमता असून पण सिनेमात दुय्यम भूमिका करणं त्यांनी पसंत केलं. पण, गेल्या काही वर्षात हळूहळू का होईना, परिस्थिती बदलत आहे. हल्ली तरुण मुलं स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन ‘स्टँडअप कॉमेडी’ शोज करत आहे. सोशल मीडियामुळे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि पारंपरिक माध्यमांवर अवलंबून राहण्याची निकड त्यांना राहिलेली नाही. पण ‘रिअ‍ॅलिटी शो’ या टेलिव्हिजनवरील प्रकारातून अनेक कॉमेडियन लोकांना सुगीचे दिवस आले. कपिल शर्मा हा यापैकीच एक.

     कपिल शर्माची भारतीय प्रेक्षकांना सर्वप्रथम ओळख झाली ती ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमातून. या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचा तो विजेता. मग ‘कॉमेडी सर्कस’चे तब्बल सहा सिझन त्याने जिंकले. या कार्यक्रमातला कपिल शर्मा कसा होता? स्थूल शरीरप्रकृतीचा, केस विरळ असणारा, आत्मविश्वास कमी असणारा, पण उत्साही. या कार्यक्रमांमधून कपिलला हळूहळू स्वतःची लय सापडत गेली. मुख्य म्हणजे, त्याचा चाहता वर्ग तयार होत गेला. कपिल खर्‍या अर्थाने अवतरला, तो ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कलर्स टीव्हीवरील कार्यक्रमामुळे. इतके दिवस टीमचा एक भाग म्हणून, इतर विनोदवीरांपैकी एक अशी कपिलची ओळख होती. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा शो कपिलभोवती फिरणारा होता. अर्थातच कमावण्यासारखं आणि गमावण्यासारखं पण जास्त कपिलकडेच होतं. या कार्यक्रमाच्या यशाने ‘ब्रँड कपिल’ तयार झाला. मग कपिलने यशाचे अनेक सोपान चढले. अगदी ‘कॉफी विथ करण’ आणि ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात करण जोहर आणि अमिताभ बच्चनसारख्या लोकांसमोरच्या खुर्चीवर बसला. कपिलच्या कार्यक्रमात पण हे आणि इतर दिग्गज नियमित हजेरी लावू लागले. आपल्या सिनेमाचं प्रमोशन करायचं असेल, तर कपिलचा शो हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे, हे लवकरच बॉलिवूडच्या लक्षात आलं. मग बॉलिवूडचे झाडून सगळे सुपरस्टार कपिलच्या ‘शो’ला हजेरी लावू लागले. कपिलला बॉलीवूडने आपल्या मिठीत घेतलं. अनेक पुरस्कार समारंभाचं सूत्रसंचालन कपिल शर्मा करू लागला.

     कपिलचा विनोद ‘बूमर ह्युमर’ या श्रेणीतला म्हणता येईल. बूमर्स म्हणजे 1946 ते 1964 या कालखंडाच्या दरम्यान जन्मलेली पिढी. आपल्या बाबा -काका -मामाची आणि आई -काकू -मामीची पिढी. थोडक्यात सांगायचं, तर नातेवाईकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये रोज सकाळी न चुकता पानं, फळं, फुलं यांचे चित्र असणारे आणि त्या चित्रासोबत कुठलासा जीवनविषयक संदेश देणारा मेसेज फॉरवर्ड करणारे लोक म्हणजे बूमर्स. या बुमर पिढीच्या गप्पा, फेसबुक टाइमलाईनवर केलेले विनोद, व्हॉट्सअप फॉरवर्डस्मधून आलेले विनोद यांचं निरीक्षण केलं, तर काय आढळतं? हे विनोद लग्नसंस्थेवर विनोद करणारे, लग्नाच्या बायकोवर विनोद करणारे, बहुतांश मध्यमवर्गीय लोकांच्या लैंगिक घुसमटीला वाट मिळवून देणारे असतात. कपिल आपल्या शोमधून जो विनोद करतो, तो याच जातकुळीतला विनोद आहे. चार मित्र एकत्र जमल्यावर ज्या प्रकारचे विनोद केले जातात किंवा मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण ज्याप्रकारचे विनोद करतो, त्या जातकुळीतले विनोद कपिल शर्माचे असतात. भारतीय सिनेमाने ज्या प्रकारच्या रेसिस्ट, खिल्ली उडवणार्‍या विनोदाला लोकप्रियता मिळवून दिली, त्याच प्रकारचे जोक कपिल शर्मा करतो. कपिलचा कॅनडा, अमेरिका, नॉर्थ अमेरिका आणि विदेशात पसरलेला प्रेक्षकवर्ग हा पण ‘ब्रँड कपिल’ला अजून मोठा बनवतो. ज्या ज्या देशात पंजाबी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे, तिथे कपिलचे प्रेक्षक आहेत. म्हणजे, कपिलला ज्याप्रमाणे देशी मार्केटमध्ये उठाव आहे, त्याप्रमाणेच ओव्हरसिस मार्केटमध्ये पण स्थान आहे.

     कपिलची पाळंमुळं मध्यमवर्गीय घरात आहेत. त्याच्या या ‘बुमर विनोदाला’ मध्यमवर्गीय आयुष्यात ना धड श्रीमंत-ना धड गरीब असणार्‍या, त्रिशंकू परिस्थितीमध्ये लोंबकळणार्‍या घरात निर्माण होणार्‍या विनोदाची फोडणी आहे. ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये कपिलच्या एपिसोडसचे विषय काय असतात? मध्यमवर्गीय परिवाराच्या घरी न सांगता पाहुणे येतात तेव्हा काय होतं, घरातलं पाणी एकदम जातं तेव्हा काय होतं, क्वचित हॉटेलात न जाणारा परिवार हॉटेलमध्ये जातो, तेव्हा काय होतं, असे अस्सल मध्यमवर्गीय कल्हई लावलेले विनोद कपिल सातत्याने आपल्या शोमधून करत असतो. देशात जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या मध्यमवर्गीय ‘न्यूक्लियस’ परिवारांना त्यांच्या स्वतःच्या रोजच्या आयुष्यात घडणार्‍या गोष्टींवर केलेले जोक प्रचंड आवडतात. ‘द कपिल शर्मा शो’ची वेळ झाली की, सगळा परिवार टीव्हीसमोर एकत्र येऊन तो शो बघतो. मग तो परिवार पश्चिम उत्तर प्रदेशातला असो, कॅनडातला असो, मराठवाड्यातला असो वा पटण्याचा. कपिलच्या शोमध्ये मोठमोठे कोट्यधीश सेलिब्रिटी येतात, तेव्हा कपिल त्यांना विनोदाचं अस्तर लावून जे प्रश्न विचारतो, ते बघण्यासारखे असतात. म्हणजे, ऐश्वर्या रॉय बच्चन एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये आली होती, तेव्हा त्याने तिला विचारलं होतं की, ‘तुम्ही जेव्हा धोब्याला प्रेस करण्यासाठी कपडे देता तेव्हा आमच्यासारखे मोजूनच देता का?’ एकदा अनुष्का शर्माला त्याने विचारलं होतं की ‘आदल्या रात्रीचं उरलेलं जेवण तुम्ही फेकून देता की, आमच्यासारखं गरम करून खाता?’ आता जुहूमध्ये राहात असला आणि कोट्यधीश असला, तरी कपिल आपलं ‘मध्यमवर्गीय’ असण्याचं बेअरिंग कॅमेर्‍यासमोर सोडतं नाही. एका कार्यक्रमात त्याने एक मध्यमवर्गीय परिवाराचा रेल्वे प्रवास कसा असतो आणि रेल्वेच्या डब्यात कसे वेगवेगळे नमुने असतात, याचं खुसखुशीत वर्णन केलं होतं. रेल्वेत घरून आणलेले डबे खाताना काय गमती जमती होतात, रेल्वेतल्या टॉयलेटमध्ये ‘डिलिव्हर’ करण्यात काय प्रॉब्लेम असतात, रेल्वेत तोंडात मावा घेऊन बसलेला सर्व विषयातला तज्ज्ञ असणारा एक माणूस हमखास कसा असतो, ज्याला रेल्वेचं कुठं क्रॉसिंग लागणार आहे, हे अगोदरच माहीत असतं, या सगळ्या गोष्टींवर कपिल सतत अर्धा तास गुदगुल्या करणारा विनोद करत होता. हे सगळे खास मध्यमवर्गीय जीवनातले ताणेबाणे आहेत. आपलं खरं अपील या मध्यमवर्गात आहे, याची जाणीव कपिलला आहे.  फिल्मफेअर पुरस्कारांच्या कार्यक्रमात करण जोहरसोबत कपिल को-होस्ट होता. त्यात अँकरिंग करताना करण कपिलला म्हणतो ‘मी ‘क्‍लासी’ आहे तर तू ‘मासी’. मी तुझ्यासोबत अँकरिंग करणार नाही.’ यावर कपिल करणला उत्तर देताना म्हणतो, ‘आपण वेगळे कसे? तुम्ही पण ढेकर देताय आणि मी पण. फक्त माझ्या ढेकराला मुळ्याच्या पराठ्यांचा वास आहे आणि तुमच्या ढेकराला पास्त्याचा. मग आपण वेगळे कसे?’ तो पूर्ण कार्यक्रम ‘क्लासी करण’ आणि ‘मासी कपिल’मधल्या जुगलबंदीचा होता. कपिलला स्वतःच्या मध्यमवर्गीय असण्याचं अपील खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. आपल्या बहुसंख्य प्रेक्षकांशी कनेक्ट निर्माण करण्यासाठी तो हे अपील बखुबीने वापरतो.

     कपिल कधीही राजकीय विनोद करताना दिसत नाही किंवा, देशातल्या सामाजिक प्रश्नांवर तो कधी भाष्य करत नाही. तो हे करू शकत नाही का? तर नक्कीच करू शकतो. पण, सत्तेशी वैर घ्यायचं नसतं, हे उपजत शहाणपण मध्यमवर्गातून आलेल्या कपिलकडे आहे. जसपाल भट्टी किंवा कुणालसारखे सत्तेला अंगावर घेणारे कॉमेडियन  आणि कपिल यांच्यात दिसणारा हा ठळक फरक. एकदा कुठल्याशा एका जमिनीच्या व्यवहारात मुंबई महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी कपिल शर्माकडे लाच मागितली. तर, रात्रीची ‘आन्हिकं’ झाल्यावर कपिलने डायरेक्ट पंतप्रधान मोदींना टॅग करून ‘रँटिंग’ करणार ट्विट केलं. सकाळी जाग आल्यावर आपण हे काय केलं, हे नशेत नसणार्‍या चाणाक्ष कपिलला लगेच कळलं असणार. मग लगेच काहीतरी सारवासारव करून कपिलने ट्विट मागं घेतलं. पण, कपिलने मागं घेतलेलं हे शेवटचं ट्विट किंवा विधान नव्हतं. ही तर आगामी वादळाची एक झलक होती.

     कपिल एका अशा घरातून आला आहे, जिथं कायम आर्थिक चणचण असायची. जिथं घरात ढीगभर मुलं असायची. दस्तुरखुद्द कपिलनेच सांगितल्याप्रमाणे जन्म झाल्यावर दोन वर्ष त्याचं नाव पण ठेवण्यात आलं नव्हतं. मग 1983 ला भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकला आणि कर्णधार कपिल देवचं नाव घराघरात पोहोचलं. मग घरातल्या त्या खोडकर, नाव न ठेवलेल्या मुलाला सगळेजण कपिल म्हणून बोलवायला लागले. कपिल शर्मा हे नाव कागदोपत्री आलं. कपिलदेव एकदा कपिल शर्माच्या शोवर पाहुणा म्हणून आला होता. हा किस्सा सांगून दस्तुरखुद्द कपिल देवला कपिल शर्माने विचारलं, ‘कैसा लगता है आपको, जब आपको मेरे नाम से लोग पुकारते है?’ विनयशील कपिलदेव मान खाली घालून हसत म्हणाला, ‘I feel honored.’

     कपिल छोट्या शहरातून आलेला आहे. इंग्रजी भाषेचीच नव्हे, तर एकूणच बोर्डरूम मॅनर्सशी त्याचा दुरूनही संबंध नव्हता. आपण मुंबईला सर्वप्रथम हॉटेलमध्ये गेल्यावर जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी दिलेलं लिंबूपाणी कसं झटक्यात पिऊन टाकलं होतं, याचा किस्सा कपिलने रंगवून सांगितला आहे. आता कितीही लोकप्रिय असला, तरी अजून जेव्हा अमिताभ बच्चन, शाहरुख खान, कपिलदेव सारखं कुणी त्याच्या शोमध्ये आला की, हातात नवीन खेळणं मिळालेल्या लहान मुलासारखा कपिल हरखून जातो. कपिल त्या अर्थाने अजून ‘उच्चभ्रू’ झालेला नाही.

     टीव्हीवरच्या कार्यक्रमांमुळे कपिलचं आयुष्य आमूलाग्र बदललं. प्रचंड यश मिळाल्यावर त्या यशाचं काय करायचं, हे समजून सांगण्यासाठी तुमच्या आजूबाजूला एक ‘सपोर्ट सिस्टम’ आवश्यक असते. बहिणीच्या लग्नासाठी पैसे नाहीत, म्हणून ‘रिऍलिटी शो’ मध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या कपिलला नंतर बेफाम पैसा मिळाला. देशातल्या सर्वोच्च टॅक्स पेयरमध्ये त्याचं नाव यायला लागलं. जिथं तो जाईल, तिथं त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांची झुंबड उडायला लागली. राष्ट्रपती भवनातल्या कार्यक्रमांसाठी त्याला आमंत्रण येऊ लागली. आपल्या सिनेमाचं प्रमोशन कपिल शर्माच्या शोवर व्हावं, यासाठी इंडस्ट्रीमधले दिग्गज धडपडू लागलं. हे कुठल्याही मध्यमवर्गातून आलेल्या माणसासाठी देदिप्यमान होतं. विनोद कसा करायचा, हे आईच्या पोटातूनच शिकून आलेल्या कपिलला हे प्रचंड यश कसं हाताळायचं, हे शिकवणारं त्याच्या आजूबाजूला कुणीच नव्हतं. ‘द डार्क नाईट’ चित्रपटात जोकर या खलपात्राच्या तोंडी एक मार्मिक संवाद आहे, I’m like a dog chasing cars, I wouldn’t know what to do if I caught one, you know, I just do things. कपिलची अवस्था काहीशी या गाडीचा पाठलाग करणार्‍या कुत्र्यांसारखीच झाली होती. या अनपेक्षित प्रसिद्धीचं, पैशाचं काय करायचं, हे कपिलला कळतच नव्हतं.

     हळूहळू प्रसिद्धी माध्यमांमधून बातम्या झिरपू लागल्या की, कपिल आपल्या ‘शो’वर पाहुणे म्हणून आलेल्या लोकांना तासन्तास ताटकळत ठेवतो. सेटवर शूटसाठी नेहमी उशिरा येतो. शोसाठी आलेले प्रेक्षक, कपिलची टीम आणि शोचे पाहुणे ताटकळत हातातल्या घड्याळाकडे पुन्हा पुन्हा बघत कपिलची वाट बघत आहेत, हे नेहमीचं दृश्य बनलं. रात्री खुशमस्कर्‍यांसोबत उशिरापर्यंत ‘पार्टी’ करत बसायचं आणि दुसर्‍या दिवशी जशी जाग येईल, तसं शूटसाठी जायचं, असं कपिलचं रुटीन बनलं. कुठंतरी या स्टार मंडळींना त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आपली गरज आहे, ही भावना मनात मूळ धरू लागली. एकदा तर, दस्तुरखुद्द शाहरुख खानला कपिलने सेटवर काही तास ताटकळत ठेवलं. हे सगळं आपला इगो सुखावण्यासाठी कपिल करायचा का? शक्यता एकदमच नाकारण्यासारखी नाहीये. आपल्या विरुद्ध लिहिणार्‍या पत्रकारांना रात्री दारू पिऊन, फोन करून शिवीगाळ करणे, हा एक नवीन प्रकार सुरु झाला. आजूबाजूचे चमचे दारू पिलेल्या कपिलला भडकवायचे आणि हा त्यांचं ऐकून कुणालाही काहीही बोलायचा. एकूणच वारू नुसतं अनियंत्रित झालं नव्हतं, तर चांगलंच भरकटत चाललं होतं.

     सृजनशील माणसं अनेकदा मानसिकदृष्ट्या असुरक्षित असतात. कपिलमध्ये पण ही असुरक्षितता चिक्कार होती. कपिलच्या प्राईम टाईम शोच्या यशात कपिलसोबत काम  करणार्‍या टीमचा पण मोठा वाटा होता. त्यात पण गुत्थीच्या पात्रामुळे लोकप्रिय झालेल्या सुनील ग्रोव्हर या दुसर्‍या कॉमेडीयनचीही लोकप्रियता प्रचंड वाढली होती. कपिलच्या मनात सुनीलबद्दल असुरक्षितता निर्माण झाली. एव्हाना कपिल आपल्या शो मधल्या सहकारी कलाकारांना पण तुच्छ लेखू लागला. सुनील  ग्रोव्हरच्या  एका सिनेमाचं प्रमोशन आपल्या शोवर करू देण्यास कपिलने नकार दिला, असा प्रवाद सगळीकडे पसरला. त्यातून अजून एक दुर्दैवी प्रसंग घडला. कपिल आणि त्याची टीम विमान प्रवासात होती. न्यूजपेपर रिपोर्टनुसार भांडणाचं कारण फार क्षुल्लक होतं. कपिलचा दारू पिण्याचा कार्यक्रम चालू असताना त्याच्या इतर टीम सदस्यांनी जेवण सुरू केलं. आपल्याला सोडून हे जेवण कसं करतात, म्हणून कपिलने आपल्या टीमला शिवीगाळ सुरू केली. विमानात बसलेल्या इतर सहप्रवाशांसमोर त्याने आपल्या टीमचे वाभाडे काढायला सुरुवात केली.

     मग त्याची गाडी सुनील ग्रोव्हरकडे वळली. मी तुझ्यापेक्षा किती मोठा कॉमेडियन आहे, हे सांगून झाल्यावर पण सुनील आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे, हे बघून कपिलने पायातला बूट काढून सुनीलला फेकून मारला. मग भांडण हाताबाहेर जाऊ नये, म्हणून विमानाचा क्रू आणि टीमचे सदस्य मध्ये पडले. पण, या एका प्रसंगाने कपिलच नुकसान झालं. घडलेला प्रसंग मीठ मसाला लावून माध्यमांनी छापला. कपिलची पब्लिक इमेज बिघडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मुख्य म्हणजे या प्रसंगानंतर कपिलच्या टीममध्ये फूट पडली. सुनील ग्रोव्हर आणि इतर काही साथीदार कपिलने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीनंतर शोमधून बाहेर पडले. या बाहेर पडलेल्या लोकांचा स्वतःचा स्वतंत्र चाहता वर्ग होता. हे कलाकार बाहेर पडल्यामुळे कपिलच्या शोचा टीआरपी कमी होऊ लागला. दरम्यान, कपिलची सगळ्यात जवळची मैत्रीण आणि कपिलच्या कारकीर्दीमध्ये सतत त्याच्यासोबत असणारी प्रीती सॅमोस पण कपिलच्या वागणुकीला कंटाळून कपिलला सोडून गेली.

     कुठल्याही छोट्या पडद्यावरील कलाकाराप्रमाणे कपिलला पण चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर जाण्याची इच्छा होती. पण, कपिलला मध्यवर्ती भूमिकेत घेऊन केलेला ‘फिरंगी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत फ्लॉप झाला. दरम्यान, कपिलच्या छोट्या पडद्यावरच्या शोना पण फारसा प्रतिसाद मिळेना. त्याचा ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा ’ हा शो तर अवघ्या तीन एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिसादाच्या अभावी बंद करावा लागला. कपिलच्या अधःपतनाची टिकटिक जोरात वाजू लागली. दरम्यान, माध्यमांमध्ये कपिलच्या अव्यवसायिक वर्तणुकीच्या, व्यसनाधीनतेच्या, सहकलाकारांना अपमानास्पद वागणूक देण्याच्या पद्धतीबद्दल मजबूत रिपोर्टिंग होऊ लागलं. एकटं पडलेल्या माणसाला सगळं जग आपल्याविरुद्ध कट रचत आहे, असं वाटत असतं. कपिल पण या भयगंडाचा बळी होता. रात्री आठ नंतर ‘आचमनं’ सुरू झाली की, कपिल ट्विटरवरून त्याच्या मते त्याच्या विरुद्ध असणार्‍या पत्रकारांना शिवीगाळ सुरू करायचा. कपिलला सांभाळून घेता घेता त्याच्या पीआर टीमची पुरेवाट व्हायची. मग शुद्धीवर आल्यावर ट्विट पुन्हा डिलीट. सुरुवातीला रात्रीच्या ट्विटनंतर माफी मागणारा कपिल नंतर इतका निर्ढावला की, त्याला माफी मागण्याची पण गरज वाटेना.

     आता यापलीकडे अजून काय अधःपतन होणार, असं वाटत असतानाच कपिलने ते पण करून दाखवलं. एके दिवशी प्रचंड दारू पिऊन त्याने एका वेबपोर्टलच्या संपादकाला फोन करून अश्लाघ्य शिवीगाळ केली. ‘तुझ्या मुलीला माझ्यासोबत झोपायचं आहे,’ ‘तू तुझ्या मुलीला नेऊन बाजारात विकत का नाहीस.’ सारखी कुठल्याही सुसंस्कृत माणसाला मान खाली घालायला लावतील, अशी विधान त्या फोनकॉलवर कपिलने केली. एरवी पण कॅमेर्‍यासमोर स्त्रियांवर विनोद करणार्‍या कपिलच्या मनात स्त्रियांबद्दल काय विष भरलं आहे, हे या निमित्ताने उघडं झालं. त्या संपादकाने तो कॉल रेकॉर्ड केला आणि सगळीकडे पसरवला. शेकडो व्हॉट्सअप ग्रुपमधून कपिलचं ते संभाषण सगळीकडे पसरू लागलं. ज्या सोशल मीडियाने कपिलच्या उत्कर्षात मोठा वाटा उचलला होता, त्याच सोशल मीडियावर आता कपिलची लक्तरं उतरवण्यात येऊ लागली. कपिलविरुद्ध एक पब्लिक आऊटरेज निर्माण झाला. कपिलचा टीव्ही शो बंद झाला. सिनेमा फ्लॉप झाला. त्याचे सहकारी कलाकार आणि जवळचे लोक एकेक करून सोडून गेले. कपिल आता त्याच्या दारूच्या बाटलीसोबत एकटा होता.

     शाहरुख खान -अझीझ मिर्झाच्या सिनेमांमध्ये (राजू बन गया जेंटलमन, येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी) नेहमी एक महत्त्वाकांक्षी नायक असतो. जो यशाच्या शिड्या चढण्यासाठी बेदरकारपणे मिळेल ते मार्ग चोखाळतो. त्या पर्यायांची किंमत चुकवतो. मग एका क्षणी स्वतःच्या अधःपतनाची जाणीव होते. त्याचे डोळे खाड्कन उघडतात. मग तो स्वतःच्या पापाची भरपाई करण्यासाठी धडपडायला लागतो. कपिल शर्माचं या सिनेमातल्या मध्यमवर्गीय नायकाशी साम्य होतं. व्यावसायिक आणि वैयक्तिक आघाडीवर सगळं गमवून बसल्यावर, कपिलला आपण हे काय करून बसलो, याची जाणीव झाली. कपिलला ही जाणीव झाली नसती, तर कदाचित त्याचा राजेश खन्ना झाला असता. कपिलने सर्वप्रथम स्वतःला चिकटलेल्या मुंगळ्यांसारख्या चमच्यांना दूर सारलं. नंतर त्यानं दारू सोडण्यासाठी स्वतःच नाव निर्व्यसनीकरण केंद्रात नोंदवलं. काही काळ कपिल सगळीकडून गायब झाला. त्याचं नाव ऐकू येणं हळूहळू बंद झालं. कपिल शर्मा नावाच्या कॉमेडीयनचा मृत्युलेख लिहून लोक मोकळे झाले. कपिलने व्यसनांवर उपचार घेतले आणि बाहेर आला. ज्यांना ज्यांना त्याने यशाच्या नशेत दुखावलं होतं, त्यांच्यापर्यंत हळूहळू तो पोहोचू लागला. पुन्हा लोक जोडायला सुरुवात केली. दरम्यान, स्वतःच्या बालमैत्रिणीशी लग्न केलं. गोड मुलगा पण झाला. या घटनांनी कपिलच्या आयुष्यात पुन्हा स्थैर्य आणलं. मुख्य म्हणजे एका कलाकाराला आवश्यक असणारं मानसिक स्थैर्य आयुष्यात वापस आलं. कपिलचे पाय जमिनीवर आले. कपिलने पुन्हा आपला शो सुरु करण्यासाठी धडपड सुरू केली. पण, पूर्वानुभवामुळे त्याला कोणतं चॅनल दारापाशी उभं करेना. एकेकाळचा भारतीय टीव्हीचा ‘ब्ल्यू आईड बॉय’ हा कामासाठी दरदर ठोकर खात फिरायला लागला. अनेक सायास केल्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’चा नवीन सीझन टीव्हीवर सुरू झाला. कपिलने ही संधी दवडली नाही. त्याच्या जुन्या टीममधले सहकलाकार पुन्हा त्याच्या भोवती जमले. पुन्हा कपिलला सूर गवसला. आयुष्यात सगळ्यांनाच सेकंड चान्स मिळत नाही. कपिल नशीबवान होता. त्याला तो सेकंड चान्स मिळाला. कपिलचा शो पुन्हा टीआरपी रेटिंग्जमध्ये वर वर जाऊ लागला. कपिलच्या शोवर पुन्हा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सेलिब्रिटीजची मांदियाळी जमायला लागली. कपिल इज बॅक. कपिलचं आयुष्य हे एखाद्या हॉलिवूड सिनेमातल्या परिकथेसारखं आहे. त्यात असंख्य चढउतार आहेतच, पण सगळ्यावर उतारा म्हणून एक सुखांत शेवट पण आहे. कपिलचं आयुष्य म्हणजे आदर्श ‘बायोपिक मटेरियल’ आहे. त्यात कपिलचा रोल करण्यासाठी दुसरा कपिल शर्मा कुठून आणणार, हा एक मोठा प्रश्नच आहे. कपिल शर्मालाच कपिल शर्माचा रोल करण्याशिवाय पर्याय नाही.

     नुकतीच नेटफ्लिक्सने कपिल शर्मासोबत एक शो चालू करण्याची घोषणा केली. हा शो अर्थातच विनोदी असणार आहे. ‘नेटफ्लिक्स’ जगभरात प्रचंड लोकप्रिय असलं, तरी भारतात त्याला अजून पुरेसं बस्तान बसवता आलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे.‘नेटफ्लिक्स’ म्हणजे महानगरात राहाणार्‍या, इंग्रजी बोलणार्‍या, दोन दिवसाचा विकेंड असणार्‍या, सहा आकडी पगार असणार्‍या ‘अर्बन कुल’ लोकांचं ओटीटी माध्यम, अशी त्याची जी इमेज झाली आहे, ती नेटफ्लिक्सला मारक ठरत आहे. एक ‘सॅक्रेड गेम्स’ च्या पहिल्या सीझनचा अपवाद वगळता, अनेक तुकड्यात विभागलेल्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यात त्यांना अपयश आलं आहे. या आपल्याच प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी कपिल शर्मा नावाचं हत्यार आता नेटफ्लिक्स वापरणार आहे. कपिलचा प्रेक्षकवर्ग जगभरात विखुरलेला आहे. पण, नेटफ्लिक्सला रस आहे तो ‘टायर 2’ आणि ‘टायर 3’ मधल्या कपिलच्या असंख्य प्रेक्षकवर्गामध्ये. असा वर्ग, ज्याला कपिलच्या वर्णभेदी, स्त्रियांवर होणार्‍या विनोदावर, लोकांच्या वैगुण्यावर, खिल्ली उडवणार्‍या विनोदांमध्ये काहीही आक्षेपार्ह वाटतं नाही. बारीक बारीक गोष्टींमुळे भावना दुखावणार्‍या आणि कलाकृती नैतिकतेने भरलेल्या असाव्यात, अशा बालिश अपेक्षा बाळगणार्‍या अभिजन वर्गापेक्षा, हा बहुजन वर्ग एक चांगला सर्वसमावेशक प्रेक्षक आहे. अमेझॉन प्राईमने ‘मिर्झापूर’ आणि ‘पाताललोक’ मधून निमशहरी-ग्रामीण भारतात जो मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला आहे, त्याचं उत्तर ‘नेटफ्लिक्स’ कपिल शर्मामध्ये शोधत आहे. म्हटलं तर, कपिल शर्माच्या लोकप्रियतेला मिळालेली ही पावती आहे. या शोचं ट्रेलर पण कपिलच्या प्रेक्षकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून तयार केलेलं आहे. कपिलला कॅमेर्‍यासमोर बोलताना एक अवघड इंग्रजी शब्द बोलायचा आहे. कपिल खूप रिहर्सल करतोय, पण त्याला तो शब्द उच्चारायला जमत नाहीये. अनेक निष्फळ प्रयत्न केल्यावर सेटवर उपस्थित असलेल्या एका माणसाला हसू येतं. मग कपिल त्याच्यावर फिस्कारतो, ‘हँस क्या रहा है तोते. तू कर ले ये.’ मग हसणारा माणूस ओशाळून शांत बसतो. डायरेक्टर कपिलला सुचवतो की, तू इंग्रजी शब्दाच्या ऐवजी पर्यायी हिंदी शब्द वापर. मग ‘तुम्ही आग्रह करतच आहात म्हणून निव्वळ मी हिंदी पर्यायी शब्द वापरतो,’ असा आव आणून कपिल वाक्य बोलायला जातो आणि तो इंग्रजी शब्द बोलण्याच्या भरात योग्य उच्चार करून बोलतो. आणि मग खांदे उचकावून तो म्हणतो, ‘अगर नेटफ्लिक्स खुद ही देसी है, तो मुझे क्या जरूरत है अंग्रेजी में बात करने की!’ नेटफ्लिक्सला द्यायचा तो संदेश कपिलच्या माध्यमातून योग्य त्या ठिकाणी पोहोचतो.

     कपिल शर्माकडे आणि त्याच्या चाहत्या वर्गाकडे तुच्छतेनं बघितलं जाण्यामागे आपल्या समाजातील ‘अभिरुची दुफळी’ कारणीभूत आहे. आपल्याकडे सगळ्या लोकांची आपापली अभिरुची, आवड निवड असते. ते ठीकच. पण, इथं अनेक लोकांच्या डोक्यात आपली अभिरुचीचं फक्त श्रेष्ठ आणि दुसर्‍यांची अभिरुची हिणकस, असा ठाम विचार रुजलेला असतो. त्यातून एखादी गोष्ट स्वतःचा आवाज नसणार्‍या बहुसंख्य जनतेला आवडणारी असली, तर मग विचारूच नका. त्या बहुसंख्य जनतेच्या आवडीनिवडीला हिणकस ठरवणार्‍यांची मांदियाळीच उसळते. मग नदीम श्रवणची गाणी असोत, अल्ताफ राजाची गाणी असोत, ‘मास’ तेलगू /तामिळ सिनेमे असोत, दादा कोंडके असोत, पु. ल. देशपांडे असोत; एखादी गोष्ट बहुसंख्य जनतेला आवडते म्हटलं की, या ‘बुद्धीजीवी’ (काही सन्माननीय अपवाद वगळता ) वर्गाच्या पोटात मुरडा उठतो. मग आपल्या प्रेक्षकांची /श्रोत्यांची / वाचकांची अभिरुचीच हिणकस आहे, असे रडके सूर ऐकू यायला लागतात. कपिल शर्मा हा पण याच बौद्धिक दर्पाचा बळी आहे. एखादा कलाकार /कलाकृती बहुसंख्य जनतेमध्ये जेव्हा लोकप्रिय असते, तेव्हा त्याचं शेरेबाजीच्या पलीकडे जाऊन सखोल विश्लेषण व्हायला पाहिजे. पण, ते तसं होताना दिसत नाही. स्वतःची अभिरुची चांगली आणि इतरांची चांगली नाही, असं वाटणं एका मर्यादेपर्यंत ठीकच आहे. पण, एका मर्यादेनंतर दुसर्‍यांच्या अभिरुचीबद्दलच्या ‘तुच्छतावादाचा’ प्रांत सुरू होतो. खरे प्रश्न तिथून सुरू होतात. बहुसंख्य वर्ग अभिजन वर्गाच्या ‘बौद्धिक तेजाने’ झाकोळून गेलेला असतो. ‘टवाळा आवडे विनोद’ ही आपल्याकडच्या बहुतेक बुद्धिजीवींची भूमिका आहे. विनोदवीरांकडे तुच्छतेने बघण्याची वृत्ती त्यातूनच निर्माण होते. दादा कोंडके, अशोक सराफ, गोविंदा, ब्रह्मनंदन यांचे असंख्य चाहते आहेत, .पण त्यांना जीनिअस म्हणताना अनेकांना त्रास होतो. कारण, हे विनोदी कलाकार आहेत आणि विनोद तर दुय्य्म दर्जाची अभिव्यक्ती आहे, असं अनेकांना वाटतं. विनोद हा निर्विष असावा, तो कोणाच्या भावना दुखावणारा नसावा, असं एक भंपक नॅरेटिव्ह मोठ्या प्रमाणावर पसरत चाललं आहे. त्याचबरोबर कलाकृती या नैतिक असाव्यात आणि त्यात वाईट अनैतिक गोष्टी नसाव्यात,  हा  विचार गेल्या काही वर्षात वेगाने पसरायला लागला आहे. त्यातून कलाकृतींवर नैतिकतेची ओझी लादली जात आहेत. बाबांनो, आयुष्याला गांभीर्याने घ्या, टीव्ही सिनेमाच्या पडद्यावरच्या कृत्रिम वास्तवाला नको, असं ओरडून सांगावस वाटतं. इंग्रजीमधून भावना दुखावणारा विनोद केला की तो ‘कुल’ असतो आणि तोच विनोद हिंदी .मराठी किंवा कुठल्या प्रादेशिक भाषांमधून झाला की, तो ‘गावरान’, ‘बिलो द बेल्ट’, नीच अभिरुची असणारा असतो.  विनोदाला विनोदासारखंच घ्या, हे आपण स्वीकारण्याची गरज आहे.  कपिल शर्माच्या निमित्ताने हे एक रँटिंग.

     मी नेहमी माझ्या लेखनातून एक मुद्दा मांडत आलोय – कलाकार किती महान आहे, याचे प्रत्येकाचे निकष वेगळे आहेत. पण, ज्या कलाकाराचा देशभरातल्या लाखो लोकांवर प्रभाव आहे, त्याच्यावर विश्लेषणात्मक लिखाण व्हायलाच पाहिजे. प्रत्येकाचे ‘जिनियस’पणाचे निकष वेगळे असू शकतात आणि प्रत्येकाचे अभिरुचीचे निकष पण वेगळे असूच शकतात. कपिल शर्माच्या विनोदांमध्ये अनेकांना Substance आढळणार नाही. त्याचे बायकांना, समलैंगिक लोकांना निशाणा बनवून केलेले विनोद अनेकांना खटकू शकतात, नव्हे खटकत असणारच. त्याची कॉमेडी कुठलीही गंभीर राजकीय – सामाजिक भाष्य करत नाही आणि ‘सेफ बेट’ खेळते, हा आक्षेप आहेच. पण, रोज लाखो करोडो लोक कपिलचा शो बघून खळखळून हसतात. काही क्षणांसाठी आपली दुःख विसरतात. त्याच्या कॉमेडी क्लिप्स हिरीरीने एकमेकांना व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करतात. भारतासारख्या देशात जिथं स्टँडअप कॉमेडी प्रकार फारसा कधी रुजलाच नाही, तिथे कपिल शर्मासारखा कॉमेडियन एवढी प्रसिद्धी, पैसा कमावतो, घराघरात पोहोचतो, हीच एक मोठी गोष्ट आहे. असंख्य लोकांना वर्षानुवर्षे हसवत राहाणे, असे लोकं ज्यांना स्वतःचा आवाज नाहीये, असे लोक जे ‘नाही रे’ वर्गातले आहे , असे लोक जे सोशल मीडियावर पण नाहीयेत, असे लोकं ज्यांना वर्षानुवर्षे सांगण्यात आलंय की, ‘तुम्ही गप्प बसा, कारण तुमची अभिरुची निम्न दर्जाची आहे.’ कपिल शर्मा अजून कुणासाठी नसेल, पण या लाखो आवाज नसलेल्या लोकांसाठी ‘जिनियस’ आहे. हे सगळं ‘बाय डिझाईन’ आहे का? तर, शक्यता खूप कमी आहे. एवढं सगळं समजून घेण्याची कुवत कपिल शर्माकडे नसावी. तो त्याला जे उत्तम जमतं, ते करतोय. टीव्हीच्या प्राईम टाईम स्लॉटमध्ये लोकांना हसवायचं काम. लोक तर आपोआप जोडले जात आहेत. आंधळ्याच्या गायी…

————————————————-

(लेखक नामवंत स्तंभलेखक आहेत.)

7448026948

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंकातील (२०२१ ) लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info हे वेब पोर्टल ओपन केल्यावर दिवाळी अंक या category वर क्लिक करा. यावर्षीच्या अंकात प्रसिद्ध झालेले, तसेच जुन्या अंकातील लेखही तिथे वाचता येतील .

Previous articleतब्बू…ज़हर खूबसूरत हैं आप!
Next articleसंथ वाहते कृष्णामाई…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.