रणवीरला कलात्मकता साधली नाही एवढं खरं!

-डॉ. मुकुंद कुळे

समाजमाध्यमावर प्रसिद्ध झालेले नग्न रणवीर सिंगचे फोटो सध्या भलतेच चर्चेचा विषय ठरलेत. त्या फोटोंमुळे तमाम भारतीयांच्या भावना दुखावल्याचं सांगून विविध सामाजिक-सांस्कृतिक संस्थांनी, रणवीर विरोधात न्यायालयात तक्रारीही दाखल केल्या आहेत. खरं तर मलाही रणवीरचे हे फोटो बिल्कूल आवडलेले नाहीत. पण मला हे फोटो न आवडण्यामागचं आणि त्या तथाकथित परंपरावादी संस्थांना रणवीरचे फोटो न आवडण्यामागचं कारण वेगवेगळं आहे. त्या संस्थांचं म्हणणं आहे की नग्न रणवीरच्या फोटोंमुळे भारतीयांची मान खाली गेली आहे. त्याच्या अशा फोटोंमुळे, त्याचा आदर्श समोर ठेवणारे समाजातील इतर तरुणही त्याचं अनुकरण करू शकतात, वगैरे वगैरे… अर्थात त्यांचे हे आरोप अगदीच बिनबुडाचे आहेत.

नागा साधूंची आपल्याकडे मोठी परंपरा आहे आणि कुंभमेळ्यांत तर हे नागा साधू नि त्यांचं चिलीमप्रकरणच अनेकदा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतं. मग त्या वेळी कुणाच्या भावना का बरं दुखावत नाहीत? तसंच नग्न रणवीरचं अनुकरण इतर तरुण करतील अशी भीती जर या संस्कृतिरक्षकांना वाटत असेल, तर मग त्याच रणवीरच्या आजवरच्या चांगल्या भूमिकांचं अनुकरण का बरं कुणी केलेलं नाही? तेव्हा यातली खरी गोम ही आहे की- ‘श्यामची आई’ सिनेमा बघून समाजातील प्रत्येक मुलगा काही श्याम बनत नाही; तसंच पडद्यावरचा खलनायक कितीही प्रभावी असला, तरी त्याचं अनुकरण करीत प्रत्येक जण काही खलनायक बनत नाही. प्रत्येक व्यक्तीला नायक-खलनायक किंवा सद्वर्तनी-दुर्वर्तनी त्या-त्या वेळची परिस्थिती बनवत असते. तेव्हा नग्न रणवीरच्या फोटोंची भीती बाळगण्याचं खरंच काही कारण नाही. तो नागडा झाला म्हणून उर्वरित समाज काही त्याच्या मागे नागडा होऊन धावणार नाही… आणि तसं पाहिलं तर काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिवंगत ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदीही मुंबईच्या मरिन ड्राइव्हवर नग्न होऊन धावल्या होत्या की… तेव्हाही संस्कृतिरक्षकांनी अशीच आरडाओरड केली होती. पण प्रोतिमा यांच्या नंतर तसं कुणी धावल्याचं माझ्या तरी ऐकिवात वा पाहण्यात नाही! तेव्हा नग्न फोटोंवरून रणवीरला ज्यांनी न्यायालयात खेचलंय, त्यांना सोडून देऊ…

मला मात्र नग्न रणवीरचे हे फोटो आवडले नाहीत ते त्या फोटोंत काहीच कलात्मकता, कल्पकता किंवा सूचकता नसल्यामुळे. रणवीर केवळ काही नग्न पोझ देऊन एकतर उभा आहे किंवा जमिनीवर आडवा पसरलेला आहे. परंतु त्या फोटोंत त्याचा केवळ देहच दिसतो, एखाद्या ठोकळ्यासारखा. त्याची सुरेख शरीरयष्टी, त्यातील कमनीयता, त्यातील लय, त्यातला डौल, शरीराचा घाट, अवयवांचा आखीवरेखीवपणा… याचं दूरदूरवर नामोनिशाण या फोटोंमध्ये नाही आणि खरं तर तिथेच नग्न रणवीरच्या फोटोंमधील गंमत संपुष्टात येते. चर्चा करण्यासारखं तिथे काही उरतच नाही. कारण हे निर्जीव फोटो आहेत. ते काही बोलतच नाहीत. वस्तुतः जेव्हा एखाद्या कलावंताच्या हाती (मग तो छायाचित्रकार, शिल्पकार, चित्रकार कुणीही असो) जेव्हा एखादा मनुष्यदेह येतो, तोही नैसर्गिक अवस्थेत, तेव्हा खरं तर त्याच्या प्रतिभाशक्तीला कल्पनांचे-प्रतिमा-प्रतीकांचे असंख्य धुमारे फुटायला हवेत. मानवी आकारातला निराकार शोधण्याची ती अपूर्व संधी असते. पण ज्या कुणी नग्न रणवीरचे हे फोटो काढले असतील, त्याने ती संधी गमावली आहे.

वास्तविक त्याला आमच्या प्राचीन मंदिरावरची यक्ष-यक्षिणी, विविध देव-देवांगनांची उत्तान, तरी आखीवरेखीव शिल्पं दाखवायला हवी किंवा त्याने ती पाहायला हवी. कधी अनावृत, तर कधी अर्धअनावृत अवस्थेतील ही शिल्पं स्त्री-पुरुष देहांची कमनीयता तर दाखवतातच, पण त्याशिवाय बघणाऱ्याच्या मनात तो-तो रसभावही निर्माण करतात. नग्न रणवीरची छायाचित्रं बघून कुणाच्या मनात काही भावना जागृत झाल्या असतील की नाही शंकाच आहे. उलट नग्न रणवीरच्या या छायाचित्रांपेक्षा काही वर्षांपूर्वी एका मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेली नग्न मधु-मिलिंदची (मधू सप्रे आणि मिलिंद सोमण) जाहिरात किती तरी पटीने श्रेष्ठ आणि कलात्मक होती. कुठल्या तरी शूजची ती जाहिरात होती. या जाहिरातीत मधू-मिलिंद एकमेकांना समोरून बिलगलेले दाखवलेले होते. त्या दोघांच्या देहावर एकही कपडा नव्हता (मात्र अजगर होता), फक्त त्यांच्या पायात त्या विशिष्ट कंपनीचे शूज होते. या जाहिरातीत त्या शूजचंच ब्रँडिंग करायचं असल्यामुळे, ही जाहिरात म्हणजे कल्पकतेचा उच्चतम बिंदूच होती. परंतु तेव्हाही त्या जाहिरातीतील नग्नताच आड आली आणि नको तो वादंग माजून ती जाहिरात मागे घ्यावी लागली.

वास्तविक आपल्या प्राचीन मंदिरांवरील कामशिल्पांची उज्ज्वल परंपरा पाहता, भारतीय मन एव्हाना वैषयिक आणि कलात्मक दृष्ट्याही सुदृढ-निरोगी व्हायला हवं होतं. परंतु भारतीय समाज कायमच प्रत्येक बाबतीत द्विधावस्थेत असलेला दिसतो. म्हणजे एकीकडे त्याला मोकळेपणा हवाही असतो आणि दुसरीकडे त्याला स्वतःला बांधून घ्यायलाही आवडतं. हा कदाचित त्या-त्या वेळच्या संस्कृतिरक्षकांनी माजवलेल्या नीतिमत्ता-नैतिकतेच्या अवडंबराचा परिणाम असावा. किंवा ब्रिटिश आमदनीत भारतीय कलापरंपरा नासवल्या गेल्याचाही हा परिणाम असू शकतो. परंतु यामुळे भारतीय समाज एकप्रकारे ढोंगी झाला. आतून एक आणि बाहेरून एक असा तो दुटप्पी वागू लागला. बहुधा यामुळेच भारतीय कला आणि कलाकारांना म्हणावी तशी जागतिक मान्यता मिळालेली नाही.

भारतीय संगीत-नृत्य आज जगभरात नावाजलं जात असलं, तरी त्यामागे पाश्चात्त्य जगात या कलांबद्दल मोठ्या प्रमाणावर असलेली अनभिज्ञताच कारणीभूत आहे असं वाटतं. म्हणजे अमूर्त पातळीवरचं केवळ स्वराकारयुक्त गाणं आणि विविध हस्तमुद्रा व पदन्यासांत बांधलेलं नृत्य समजण्यासाठी, उमजण्यासाठी किंवा अगदी आस्वाद घेण्यासाठी जी भारतीय सांस्कृतिक मानसिकता हवी (ती आपल्याकडेही सहसा नसतेच) ती पाश्चात्त्यांकडे किती असते, याविषयी शंका आहे. याउलट ज्या कलांबद्दल पाश्चात्त्य समाज कायमच जागरूक व अग्रेसर होता, त्या चित्र-शिल्प वा इतर दृश्यकलांमध्ये भारताला अद्याप म्हणावी तशी जगन्मान्यता मिळालेली नाही. ज्या सहजतेनं मायकल एंजेलोसारख्या अनेक नामवंत शिल्प-चित्रकारांनी तिकडे कलात्मक नग्न शिल्प-चित्रं साकारली, तशी आपल्याकडे भारतात फारशी साकारली गेली नाही. उलट राजा रविवर्मासारख्यांनी जेव्हा अर्धअनावृत नायिका आपल्या चित्रांत साकारल्या तेव्हा त्यांनाही टीकेचं धनी व्हावं लागलं. म्हणजे भारतीय समाजात नग्नतेकडे कायमच दूषित नजरेने पाहिलं गेल्यामुळे तिचा एक शुद्ध कलारूप म्हणून भारतीय चित्र-शिल्पकलेत समावेश झाला नाही. परिणामी जागतिक मान्यताही मिळाली नाही.

यातही एक गोम अशी आहे की ज्यात नग्नता आहे ते सारं आपल्या परंपरावाद्यांना अश्लीलही वाटतं. त्यामुळेच नग्न रणवीरच्या छायाचित्रांवरही अश्लीलतेचा ठपका ठेवण्यात आला. परंतु नग्नता आणि अश्लीलता या दोन भिन्न गोष्टी आहेत, ते कुणी तरी यांना नीटच समजावून सांगण्याची गरज आहे. कधीही कुठलंच वस्तुरूप हे अश्लील असत नाही. आशय किंवा अभिव्यक्ती ही श्लील वा अश्लील असू शकते. मात्र तेही सादरकर्त्यावर, त्याच्या हेतूवर अवलंबून असतं. म्हणजे एखाद्या सिनेमात गरज नसताना दिग्दर्शकाने जर उगाच प्रेक्षकांना चाळवण्यासाठी लैंगिक दृश्य टाकली तर ते अश्लील ठरू शकतं. मात्र लावणीपरंपरेत यमुनाबाई वाईकर, रोशन सातारकर अशा कित्येक ख्यातनाम कलावंत होत्या, ज्यांच्या लावणीतला आशय अश्लील असला तरी त्यावरची त्यांची अदाकारी-अभिव्यक्ती ही कायम कलात्मक असायची. परिणामी आशयाऐवजी या कलावंतांच्या सादरीकरणाला-अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळायची. श्लील-अश्लीलतेची सीमारेषा अगदी पुसट असते. तसंच एखादी कलाकृती श्लील वा अश्लील होऊ द्यायची किंवा नाही, याच्या नाड्या पूर्णपणे कलावंताच्या हातात असतात. रणवीर सिंगच्या हातात तर काहीच नव्हतं. त्याने आपली नग्न छायाचित्र कशासाठी काढली, त्याला त्याचे पैसे मिळाले असतील-नसतील, त्याची चर्चा इथे करण्याचं काहीच कारण नाही. परंतु कशाही साठी का होईना तो नग्न झाला, तरी त्याला कलात्मकता साधली नाही एवढं खरं!

(साभार : दैनिक पुण्यनगरी)

(लेखक हे लोककला व लोकपरंपरेचे अभ्यासक आहेत)

9769982424

मुकुंद कुळे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात मुकुंद कुळे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleनिवडणूक चिन्हांबद्दल बोलू काही… 
Next articleपुरोगामी संघटनांनी फुगलेले अहंभाव टाकून द्यायला हवेत!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.