पळसाचं चौथं पान !

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०१८)

– बालाजी सुतार

नागराज म्हणतो, “शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून अप्रतिम कविता लिहिल्या. मला कृती महत्वाची वाटते”.

हेही खरंच आहे. कवींनी केवळ ‘स्वान्तसुखाय’ लिहिण्याचा काळ आता राहिलेला नाहीय. किंवा केवळ लिहून मोकळं होण्याचाही. खरं म्हणजे असा काळ कधी अस्तित्वातच नसतो. निदान आपल्यासारख्या लाख प्रकारच्या बजबजपुरीने ग्रस्त असलेल्या समाजात तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी पोकळ शब्दांपलीकडे कृतीप्रवण होणंच अधिक परिणामकारक ठरू शकेल.

आपला एकूणच समाजाच्या सर्वस्तरीय धारणा ही एक व्यापक-विदारक अशी गंमत आहे. इथे कुणालाच कशातलं काही नीटपणे कळत नसतं, पण हजार प्रकारचे माज, हजार प्रकारच्या गंडांनी आपलं समग्र वैयक्तिक-सामाजिक अवकाश ग्रासलेलं असतं. एकट्या माणसाच्या म्हणण्याला आपल्याकडे कुणीच किंमत देत नाही.

“आपल्याला बुद्धाइतकी किंवा आईनस्टाईनइतकी अक्कल नसते, माज करण्यासारखं काहीही आपल्या आयुष्यात नसतं. कदाचित म्हणूनच आपल्याकडे जमावाला महत्व दिलं जातं. झुंडींचे अभिनिवेश आणि त्यातूनच प्रसवलेले माज जोपासले जातात. मला ‘वैयक्तिकता’ अधिक महत्वाची वाटते. नेमक्या याच वैयक्तिकतेला – इंडिव्हिज्युअलिटीला – जपण्याच्या प्रयत्नांचा आपल्या समाजात संपूर्ण अभाव आहे”. नागराज म्हणतो, “प्रत्येक माणसात एक श्वापद असतं. एकट्या माणसात ते लपून, दबून असतं आणि समूहात ते उफाळून येतं.”, त्याचं हे म्हणणं केवळ ‘समाज’ नामक टोळीच्या गतेतिहासाचा नव्हे तर वर्तमानाचाही नागडा आरसा दाखवणारं आहे.

 

१.

कविता लिहिणं एकुणात कितपत परिणामकारक असतं? कवीसाठी किंवा एकूणच समाजासाठी? कवी कविता लिहितो ती नेमकी कुणासाठी, कशासाठी? कसल्या का स्वरुपात असेना; माणसाला बोलावं वाटत असतं, हे खरं आहे. पण नक्की काय घडतं तेव्हा माणसाला वाटतं की आता आपण कागदावर लेखणी झिजवून कविता लिहायला हवी? हा किंवा असलाच काही प्रश्न कवींना विचारला तर प्रत्येकाकडून वेगवेगळी असंख्य कारणं समोर येतील. कुणी स्वत:तल्या आनंदाला वाट करून देण्यासाठी लिहित असतील, कुणी स्वत:त दाटून राहिलेल्या साकळल्या वेदनेचा दुखरा प्रवाह वाहता करण्यासाठी. काहींची तर अशीही समजूत असते की यमके जुळवत जुळवत करायची लेखी गंमत म्हणजेच कविता. जो तो आपापल्या त-हेने आपापल्या कविता कागदावर उतरवत असतो. कुणी-कुणी कविता लिहिणं हाच जीवनभराचा ‘धंदा’ असल्यासारखं कविता लिहित असतात आणि कुणी कुणी जीवनाबद्दल बोलण्यासाठी कवितेचा आधार घेतात. कुणाचं जीवन हीच एक कविता असते. कुणा-कुणाचं मात्र जरासं वेगळं असतं.

ओठांत कुठवर चिरडाव्यात

अंतरीच्या हाका

कवितेच्या सुईने किती

घालावा टाका?      

 

जखम चिघळते

घातलेल्याच टाक्यातून

आकाश कोण ओवतं

सुईच्या नाकातून?    

या कवितेत आलंय तशा अंतरीच्या हाकांना चिरडण्यासाठी कविता लिहिणारा क्वचित एखादा असतो. कवितेच्या सुईने ओठांना टाका घालून शिवून टाकण्याचा प्रयत्न करावा इतकी कसलीतरी खोल खोल व्यथा त्याच्या अंतरात चिघळत्या जखमेसारखी खोलवर चरत गेलेली असते. सुईच्या नाकातून आभाळ ओवण्याचं आव्हान त्याच्यासमोर उभं असतं. प्रत्यक्षात मात्र हाताशी सुईही नसते आणि अपरंपार ओल आणि आश्वासक उब उरात बाळगून असलेलं ते सर्वांवरचं आभाळही त्याच्या वाट्याला कधी आलेलं नसतं.

गावाबाहेरच्याच नव्हे तर समाजाच्या मनाबाहेरच्याही वस्तीत त्याचं बालपण गेलेलं असतं. अभिजनांची सुबक नीटस मुलं वडलांकडे चॉकलेटचा हट्ट धरत असतात तितक्याच कोवळ्या वयात हा बापासाठी आणलेल्या बाटलीतल्या दारूचे कोरे घोट मारून त्यात पाणी ओतून ती बापासमोर सादर करत असतो. साहित्यशारदेच्या अभिजात उपासकांच्या घरातली मुलं चड्डी सावरत शुभंकरोति आळवत असतात त्याच बारातेरा वर्षांच्या वयात तो पोरगा स्वत:त रुजलेलं दारूचं व्यसन सोडवण्याच्या खटपटीत असतो. पांढरपेशा कुटुंबातली मुलं राजपुत्र-राजकन्येच्या, जादूच्या गालिच्यांच्या आणि परीराणीच्या गोष्टी वाचत असतील, त्या वयात त्याने भयानक संभोगदृश्यांनी गजबजलेल्या ब्ल्यू फिल्म्स पाहिलेल्या असतात. आपण कुणी संध्याकाळी आईने देवासमोर लावलेल्या उदबत्तीच्या सुगंधात अभ्यासाला बसत असू, त्या कोवळ्या वयात हे पोर विडी-सिगरेटपासून सगळ्या प्रकारचं जहर पचवून बसलेलं असतं. त्याच्यासमोर कसलंही ध्येय कुणी ठेवलेलं नसतं. त्याच्या अख्ख्या वस्तीचा ध्येय किंवा श्रेयस-प्रेयस असल्या शब्दांशी कुठल्याही जन्मात काही संबंध आलेला नसतो. भोवतीने दारिद्र्य दाटलेलं असतं, व्यसनं दाटलेली असतात, अडाणीपण, रांगडेपण आणि कायम अंधारलेलं, हाणामा-यांत, देवदेवस्कीत गुरफटलेलं आणि सर्वांहून पार दगड फोडण्यातल्या अपरिमित कष्टांच्या दावणीला बांधलेलं, हातांना घट्टे पडलेलं, असं टणक जग असतं त्याच्या चौफेर.

तिथे कवितेला रुजण्यासाठी जागाच कुठे होती?

होती!

त्या भोवतालात नसली तरी त्या पोराच्या मनात होती! त्या सगळ्या कोवळीकीचं निर्बीजीकरण होऊन गेलेल्या वस्तीला त्याच्या मनात उगवलेल्या कवितेचं दमण करणं शक्य झालं नाही. इतकं बळ जन्मजात कवींच्याच अंतरात असतं.

नागराज मंजुळे हा जन्मजात कवी आहे.

कुणीच जवळ नव्हतं त्या अवस्थेत त्याला कवितेने आधार दिला. किंवा कुणीच जिला स्पर्श करू धजलं नसतं त्या वस्तीत त्याने कवितेला आपल्या झोपडीत ठाव दिला..

अगदीच अजाण वयात हजार प्रकारच्या जखमा, हजार प्रकारची आक्रमणं-आक्रंदनं झेलून आणि ती पचवून झाल्यावर नागराजच्या हातात काहीही आलं असतं, तरी त्याची कविताच झाली असती. आत-बाहेरल्या अराजकाला जगाच्या वेशीवर टांगून ठेवणारी कविता.

माझ्या हाती

नसती लेखणी

तर..

तर असती छिन्नी

सतार.. बासरी

अथवा कुंचला

 

मी कशानेही

उपसतच राहिलो असतो

हा अतोनात कोलाहल मनातला

कविता का लिहायची असते? तर हा असा कोलाहल उपसत राहण्यासाठी. मनात साठलेलं अॅसिड उपसलं नाही तर माणूस ‘माणूस’ उरेल का? ते उपसायचं म्हणून कविता लिहायची. जेवढ्या तीव्रतेने आणि जेवढं जास्त जास्त खोलवर जाऊन ते उपसायचा प्रयत्न होईल तेवढा माणूस अधिक निर्विष होईल आणि तेवढीच त्याची कविताही नितळ. चांगली कविता नेहमीच माणसाला अधिकाधिक मानवी करत असते.

नागराज म्हणतो, ‘कविता हे अभिव्यक्तीचे संगीताखालोखाल किंवा संगीताइतकेच शुद्ध माध्यम आहे.’ त्याचं हे म्हणणं निदान त्याच्या स्वत:च्या कवितेच्या संदर्भात आणि त्याच्या संगीताच्या संदर्भातही पुरेपूर वास्तवच आहे. त्याचा स्वत:चा थेट संगीताशी काही संबंध नसेलही कदाचित; पण शुद्ध संगीताची त्याला अस्सल जाण आहे. त्याच्या प्रत्येक अभिव्यक्तीतून संगीताचे नितळ झरे प्रस्फुट होत असतात. त्याचं साधं बोलणं असू दे, लेखी कविता असू दे, अगदी त्याच्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मन:पटलावर कायमचे ठसे उमटवणारं ‘पिस्तुल्या’, ‘फँड्री’ नामक विशुध्द वेदनेचं संगीत असू दे की सुख-दु:खाच्या समसमान लहरींनी ऐकणा-याला सैराटवून टाकणारं ‘सैराट’ संगीत असू दे; नागराज नेहमीच शुद्धतेच्याच शोधात असलेला दिसतो. बालपणापासून तरुणपणापर्यंत प्राशलेल्या जहरातूनही त्याच्या अंतर्मनातलं ‘शुद्ध’ तितकंच नितळ उरलेलं आहे. एरवी –

तो म्हणाला,

‘मंजिल तर एकच

मग वेगळी वाट कशाला?’

ती म्हणाली,

‘फुटेल का पाझर कधी पाषाणाला?’

 

तो म्हणाला,

‘भर दिवसा हातात

तुझ्या मशाल कशाला?’

ती म्हणाली,

‘हतवीर्य सूर्य झाला!’

 

तो म्हणाला,

‘जा कुठेही दु:ख तर

पुजलेलंच पाचवीला’

ती म्हणाली,

‘असेलही चौथं पान पळसाला!’

– एरवी – पळसाचं चौथं पान शोधण्याचा हा अफाट निग्रही अट्टाहास नागराजच्या कवितेत कुठून आला असता? जगरहाटीच्या पळसाला कायमच लगटून असलेली तीनच पानांची परंपरा भेदून चौथं पान उगवलेलं असेलच कुठेतरी, त्या शुद्ध चौथ्या पानाचा निरंतर शोध घेणारा हा कवी.

जगण्यातले अतिशय खडतर प्रहर निश्चयाने पेलून धरताना नागराजने कवितेचा किंवा कवितेने त्याचा आधार घ्यावा, हे अत्यंत साहजिक होतं. कवितेतून मन उकलता येतं, किंबहुना कविता तुमच्यातल्या प्राणांना तेवत ठेवते, नेहमीच. कवितेने ज्याचं बोट धरलेलं असतं, तो सभोवारच्या अनिवार कोलाहलाच्या समुद्रातही तरून जातो.

एकसारख्या प्रकृतीचे

आम्ही दोघे मित्र

एकमेकांचे जीवलग

एकच ध्येय

एकच स्वप्न घेऊन जगणारे

 

पुढे

त्याने आत्महत्या केली

आणि मी कविता लिहिली

 

– कविता अशी प्राण फुंकते, जे कविता जगतात, त्यांच्याआत. नुसती प्राण फुंकते एवढंच नाही; ती विपरीताशी झुंजण्याचं बळही देते. कसल्याही पक्षपाताला चव्हाट्यावर मांडण्याचं सामर्थ्यही देते कविता. फार कोवळ्या, फार साहजिक स्वप्नांना नख लावून, त्या अलवार कोवळीकीला अंगभर लेऊन, लपेटून घेणं दुष्प्राप्य व्हावं एवढी क्रूर व्यवस्था आसमंतात कार्यरत असते, तेव्हा तिला समग्रपणे प्रतिकार करता नाही आला, तरी निदान ते क्रौर्य चव्हाट्यावर मांडण्याचं धैर्यही देते कविता –

या पक्षपाती धर्मसंस्कृतीने

वणव्याची भीती घालून

तुझ्यामाझ्या जिभेवर

सुसह्य केला विस्तव

 

सखी, स्वप्नं स्वप्नं तरी

अशी काय होती तुझीमाझी 

… इथल्या धूर्त व्यवस्थेनं

दुष्प्राप्य केलेलं वास्तव     

धर्मसंस्कृती – जी सदैव माणसांच्या स्वप्नांना लगाम घालून ठेवण्याचंच काम करत आली आहे, जिच्यात दबलेल्या माणसांच्या आकांक्षांना जागाच नसते कुठे, जी मूठभरांच्या स्वार्थासाठी उर्वरितांच्या आभाळाची कोंडी करते कायमच, तिच्यातल्या पाशवीत्वावरही बोट ठेवण्याचं सामर्थ्य कवीत येतं ते त्याच्या आत दाटून राहिलेल्या आणि निकराच्या क्षणी उफाळून येणा-या कवितेच्याच साक्षीने. धूर्त व्यवस्थेने दुष्प्राप्य करून ठेवलेल्या वास्तवाला नागराज मंजुळे कायमच त्याच्या केवळ कवितेतूनच नव्हे; अनेक माध्यमांतल्या त्याच्या समग्र अभिव्यक्तीतून ऐरणीवर घेत आला आहे. आणि हे असं ऐरणीवर घेताना त्याच्या मनात कटुतेचा लवलेशही नसतो. अजिबात आक्रस्ताळेपण न करताही तो जेवढं धगधगीत होऊ शकतो, तेवढीच कोवळीकही तो कागदावर रेखाटू शकतो. कुठलेही भावनावश गहिवर न घालता, न मांडता.

मागे मागे तू फ्रॉकची ओटी करून चालायचीस मी फुले वेचताना

मी धीटपणे पाहू शकलो नुसतेच तुझे गोरे पाय फुले ओटीत टाकताना

बदल्यात तू गजरा मागायचीस फुले मला देऊन

कुठे गेलीस माझ्या आठवणभर फुलांची ओटी उधळून

आता तुझा चेहरा आठवत नाही नुसताच गंध येतो ओटीतल्या फुलांचा

गज-यासाठी पुढे केलेला हात असतो अन् नुसताच किणकिणाट बांगड्यांचा

आता फुलं बरसत असतील नसतील तिथं झाडही असेल नसेल

आता वेचायला कोणीच नसते वा हट्ट करायला गज-याचा

आता नुसता माझ्या स्वप्नभर खच पडतोय फुलांचा

जातीय, सामाजिक, आर्थिक अशा सगळ्या प्रकारच्या जहरी अजगरांनी ज्याच्या भोवतालाला विळखे घातलेले होते, त्या तरुणाने लिहिलेली ही कविता. इतकी गोड, इतकी अलवार, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकी समज असलेली कविता लिहायची तर त्याआधी, किंवा त्या अवस्थेला येताना या तरुणाला केवढी आंतरिक युद्धे लढावी लागली असतील? नागराज ती लढला. सगळ्या विपरीताशी दोन हात करता करताच तो स्वत:शीही दोन हात करत गेला असणार. आतबाहेरच्या आगीत तावून सुलाखून निघताना त्याच्यातलं ‘मानवपण’ अधिक लखलखीत होऊन उजळत गेलं असणार.

आता हे वर त्याच्या कवितेविषयी, खुद्द त्याच्याविषयी लिहिलं आहे तेवढंच त्याच्यासंदर्भात पुरेसं आहे का? बहुधा नसावं. कारण बालवयात आणि तरुण होईपर्यंत नागराज ज्या परिस्थितीतून गेला, ती आपल्यातल्या सुखवस्तूंना हेलावून टाकणारी असली तरी आपल्या देशात ती काही अगदीच अपवादात्मक नाहीय. किंबहुना तळातल्या वर्गातल्या कुणालाही या प्रकारचं भोगणं चुकत नाही. हे ‘तळातलं असणं’ जातीय अंगाने जाणारं असेल तर ते अधिकच विदारक असतं, पण हेही आपल्याकडे दुर्मिळ नाहीय. अशा परिस्थितीत नुसती कविता लिहून काय साध्य होतं मग?

कविता वाचकांच्या मनाला हात घालू शकते, पण कवितेने समाजात थेटपणे काही उलथापालथ घडवून आणल्याची काही उदाहरणे आपल्याकडे आहेत काय? सामान्यपणे एखाद्याने स्वत:ची ओळख ‘कवी’ अशी सांगितली तर ऐकणारे त्याच्याकडे पाहून एकतर कुत्सितपणे हसतात किंवा हा निकामी, निरुद्योगी माणूस आहे अशा नजरेने त्याला अदखलपात्र ठरवून मोकळे होतात. कवी-लेखक-विचारवंतांना आपल्या समाजात, एकूण व्यवस्थेत कितपत जागा आहे या प्रश्नाचं उत्तर भयंकर हताश करणारं असू शकेल. हे असंच जर असेल, तर कसल्या कविता लिहाव्यात माणसाने? कशासाठी कागद आणि लेखणी झिजवावी? अक्षर सुधारण्यासाठी कोणी कविता लिहित नाही, हे कितीही खरं असलं तरी एकूण भौतिक-सामाजिक उपयुक्ततावादाच्या कसोटीवर कवितेची परिणामकारकता कितपत प्रभावी असू शकेल?

नागराज म्हणतो, “कविता हे एका अर्थाने ‘एलिट’ माध्यम आहे. म्हणजे लिहू-वाचू शकणारीच माणसे कविता वाचू शकतात. त्यातही कविता समजणा-यांची संख्या अगदीच कमी. लिहितावाचता येणा-या सगळ्याच लोकांना कवितेत रस असतो असं नाही, साक्षर असलेल्या तरीही बहुसंख्येने वाचन-निरक्षरच असलेल्या आपल्या लोकांना कवितेमुळे फारसा फरक पडत नाही”.

हे अगदीच खरं आहे. कितीही वाईट असलं तरी हे वास्तव आहेच.   

आता या परिस्थितीवर उपाय काय?

नागराज म्हणतो, “शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून अप्रतिम कविता लिहिल्या. मला कृती महत्वाची वाटते”.

हेही खरंच आहे. कवींनी केवळ ‘स्वान्तसुखाय’ लिहिण्याचा काळ आता राहिलेला नाहीय. किंवा केवळ लिहून मोकळं होण्याचाही. खरं म्हणजे असा काळ कधी अस्तित्वातच नसतो. निदान आपल्यासारख्या लाख प्रकारच्या बजबजपुरीने ग्रस्त असलेल्या समाजात तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी पोकळ शब्दांपलीकडे कृतीप्रवण होणंच अधिक परिणामकारक ठरू शकेल.

आपला एकूणच समाजाच्या सर्वस्तरीय धारणा ही एक व्यापक-विदारक अशी गंमत आहे. इथे कुणालाच कशातलं काही नीटपणे कळत नसतं, पण हजार प्रकारचे माज, हजार प्रकारच्या गंडांनी आपलं समग्र वैयक्तिक-सामाजिक अवकाश ग्रासलेलं असतं. एकट्या माणसाच्या म्हणण्याला आपल्याकडे कुणीच किंमत देत नाही.

“आपल्याला बुद्धाइतकी किंवा आईनस्टाईनइतकी अक्कल नसते, माज करण्यासारखं काहीही आपल्या आयुष्यात नसतं. कदाचित म्हणूनच आपल्याकडे जमावाला महत्व दिलं जातं. झुंडींचे अभिनिवेश आणि त्यातूनच प्रसवलेले माज जोपासले जातात. मला ‘वैयक्तिकता’ अधिक महत्वाची वाटते. नेमक्या याच वैयक्तिकतेला – इंडिव्हिज्युअलिटीला – जपण्याच्या प्रयत्नांचा आपल्या समाजात संपूर्ण अभाव आहे”. नागराज म्हणतो, “प्रत्येक माणसात एक श्वापद असतं. एकट्या माणसात ते लपून, दबून असतं आणि समूहात ते उफाळून येतं.”, त्याचं हे म्हणणं केवळ ‘समाज’ नामक टोळीच्या गतेतिहासाचा नव्हे तर वर्तमानाचाही नागडा आरसा दाखवणारं आहे.

रूढ समाजमान्यतांच्या पलीकडेही कुणाचा नैसर्गिक प्रदेश असू शकतो आणि तिथल्या वस्त्यांनाही आपण स्वीकारलं पाहिजे, त्यांच्या अस्तित्वाला आपण निकोप अर्थाने दखलपात्र मानलं पाहिजे, ही गोष्ट सहसा घडताना दिसत नाही, पण निदान कवीने तरी त्यांच्याबाबत बोलणं गरजेचं असतं.    

जनगणनेसाठी

‘स्त्री-पुरुष’ अशा

वर्गवारीचे कागद घेऊन

आम्ही गावभर.

 

आणि गावात एका

अनवट वळणावर

भेटलं चार हिजड्यांचं

एक घर. 

नागराजची ही कविता एका अत्यंत दुर्लक्षित आणि तिरस्कृतही मानवसमूहाच्या अस्तित्वाची दखल घेणारी आहे आणि अर्थातच ‘यांचं काय?’ असा टोकदार प्रश्न विचारणारीही. तृतीयपंथियांच्या वैयक्तिकतेला आपल्याकडे कधीही अगदी साध्या सहानुभूतीच्याही दृष्टीने पाहिले गेलेले नाहीय. किळस किंवा कीव एवढ्याच भावांना कसं सामोरं जात असेल हा समाजघटक?

दूर क्षितिजापर्यंत

नाही हिरवा कण

गुरं चरतात

आपापलं मरण

 

कृश सावलीत

सोडावी शिदोरी

चतकोरीला चरू द्यावे

भुकेचे प्रचंड कुरण

ही कविता वाचतो तेव्हा ‘चतकोरीला चरू द्यावे..’ हे मला मानव्याचं सार वाटतं अनेकदा. भूक – पोटाची, शरीराची किंवा अस्तित्वाला दखलपात्र करू पाहणा-यांची, त्यासाठी झुंजणा-यांची- ती भागवण्यासाठी सर्वांसाठी एका समान प्रकारचं कुरण का नसतं कुठेच? हिजड्यांच्या भुकांचं काय करायचं मग हिजड्यांनी? इतरांच्या प्रदेशातल्या गावठाणात त्यांना काही जागा नसावीच का कुठे कायम? नागराज साधं सरळ बोलतो. साधं सरळ लिहितो. जातीय वास्तवाच्या अंगाने पाहू गेलो तर नागराज ‘दलित’ जातीत जन्माला आला. दलित साहित्याची एक मोठी परंपरा मराठीत आहे. त्या परंपरेत नागराजचं लेखन एक महत्वाचा ‘पुढचा टप्पा’ आहे. सामान्यपणे असं पाहायला मिळतं की, साठ सत्तरच्या दशकात ज्या प्रकारचं दलित साहित्य आत्मकथने आणि कवितांच्या स्वरुपात समोर आलं, त्या चौकटी भेदून नंतरचे कवी-लेखक फारच क्वचित पुढे गेलेले आहेत. अगदी आजही – जेव्हा दलितांचे भाकरीचे प्रश्न संपलेले आहेत, निदान ते पूर्वीइतके तीव्रतर राहिलेले नाहीत, त्या चालू काळात- ‘दलित जातीतल्या’ कवी लेखकांचे लेखन बहुतेकवेळा पन्नास वर्षांआधीच्या दलित लेखनाचं अनुकरण करणारंच दिसत असतं. या पार्श्वभूमीवर नागराजची कविता मुद्दाम वेगळी काढण्यालायक आहे. त्याच्या कवितेत अकारण, अस्थानी शिवीगाळ नाही, आक्रमक, अंगावर येणारा आक्रस्ताळेपणा नाही. त्याच्या कवितेला प्रतिमांचा रूपकांचा अलंकारांचा किंवा हिंसक शिवराळपणाचा कसलाही सोस नाही. त्याला जे सांगायचं आहे ते सजवून किंवा ‘पोझ’ घेऊन सांगण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही. त्याचे शब्द सहज येतात आणि सांगायचं ते सांगून जातात.

पण हे सांगणं ऐकण्याची मुदलात कुणाला गरज असते काय?

नागराज म्हणतो, “फुले किंवा बाबासाहेब आज असते तर लोकांनी कदाचित त्यांचंही ऐकलं नसतं”. कुणाचं ऐकून घ्यावं यापेक्षाही आता लोकांना स्वत:ला बोलायची फार घाई झालेली दिसते सगळीकडे. आणि एखाद्या कवीचं मन:पूर्वक ऐकावं एवढे प्रगल्भ तर आपण कधीच नव्हतो. ज्ञानेश्वरासारख्या कवीला इथे स्वत:च समाधीत जावं लागलं आणि तुकारामाचं नक्की काय झालं ते आजतागायत कुणालाच पक्केपणी माहित नाही. तरीही कवी कविता लिहितात. नागराजही लिहित राहीलच. त्याच्या किंवा त्याच्यासारख्या आणखीही कुणाच्या या लिहिण्याचं पुढे पुस्तक होतं आणि भवतालातल्या हल्लेखोर ओसाडीवर ते तलवारीसारखं परजून एखाद्याला त्या आक्रमणाचा प्रतिकार करता येतो.   

 

मी एकाकी आहे

आणि या निर्घृण जगात

एकट्यादुकट्या माणसानं

स्वरक्षणार्थ काही बाळगावं

म्हणून पुस्तक बाळगतो

 

मी कुठेही असो

पुस्तक सोबत असतंच

 

मी ते वाचत नसलो

तरी पडून असतो

छातीवर घेऊन प्रेयसीसारखं

वेळीअवेळी

मला एकटा पाहून

धावून येणा-या ओसाडावर

मी पुस्तकच परजतो.. तलवारीसारखं

‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ लढण्यासाठी पुस्तकाइतकं, पुस्तकातल्या कवितेइतकं परिणामकारक शस्त्र दुसरं कुठलं असू शकतं?      

नसतंच.

२.

“माणसं खूप एकाकी असतात. त्यांच्या चेह-यावरचं उन्ह मला सतत जाणवत राहतं.” नागराज एकदा बोलताना म्हणाला आणि मला मी पहिल्यांदा पाहिलेला नागराज आठवला. आठेक वर्षे झाली असतील. मित्रासोबत एक कविसंमेलन ऐकायला गेलो होतो. तिथे अन्य चारसहा कवींच्या सोबत एक कवी तो होता. ‘नागराज मंजुळे’ हे नाव मी त्यावेळी पहिल्यांदा ऐकलं. पहिल्यांदा मी त्यावेळी त्याची कविताही ऐकली. तरबेज मंचीय कवींच्या त्या मैफिलीत तो मला तसाच एकाकी दिसला आणि त्याच्या चेह-यावर ते तसं उन्हही दिसलं. टाळ्या, दाद किंवा वन्समोअर मिळवण्याचा कसलाही प्रयत्न न करता त्याने त्याची कविता वाचली आणि तितक्याच शांतपणे तो इतरांच्या कविता ऐकत राहिला. तेव्हा अर्थात तो ‘स्टार’ झालेला नव्हता. त्यामुळे खास कुणाचं त्याच्याकडे लक्षही नव्हतं. ना कार्यक्रमानंतर कुणी त्याच्याभोवती गर्दी केली.

तो आणि त्याच्याआधीचा मोठा काळ नागराजचा ‘एकटा’ असण्याचा काळ होता. त्याच्या भोवतालात तेव्हा माणसांचा अभाव होता.

“मला लोकांशी बोलावसं वाटायचं. माझ्याकडे मोबाईल फोन नव्हता पण मला शे-दीडशे लोकांचे मोबाईल नंबर पाठ होते. मी एकेक रुपया टाकून कॉईनबॉक्सवरून कुणाकुणाला फोन करायचो. कारण काहीच नसे. कुणाशी तरी बोलावं वाटायचं, फक्त म्हणून ते कॉल करायचो. माझ्याशी बोलणारी फार कमी माणसे तेव्हा होती. आता बोलणा-यांची, बोलू पाहणा-यांची संख्या इतकी प्रचंड आहे की त्या सगळ्यांशी बोलत राहिलो तर दुसरं काही काम करण्यासाठी माझ्याकडे वेळच शिल्लक राहणार नाही.” नागराज सांगत असतो तेव्हा आपण त्याच्या चेह-याकडे पाहत राहायचं. आपण अजिबात वेळ नसणारे सेलिब्रिटी झालो आहोत, याचा काहीसा पश्चात्तापच वाटतो आहे की काय असे भाव त्याच्या चेह-यावर असतात. हे भाव अजिबात कृत्रिम नसतात. अजूनही त्याला लोकांशी बोलायला आवडतं. एकदा नागराजच्या घरी बसलेलो होतो. नागराजचं काही महत्वाचं काम चालू होतं. मी गेल्यावर पाच दहा मिनिटात तो आला. नंतर आम्ही बोलत असताना मी त्याला म्हणालो, “असं उगीचच गप्पा मारायला येऊन तुम्हा क्रिएटिव्ह माणसांचा वेळ व्यर्थ घालवू नये खरं म्हणजे आम्ही येरू लोकांनी..”. नागराज मनापासून म्हणाला, “नाही यार. मला खरं तर आवडतं हे. पण आता इतकी कामं मागं लागलेली असतात, की मला समजा शंभर कामं करायची आहेत तर जवळ वेळच नसल्यामुळे त्यातली फारतर दोन तीन कामं करून होतात माझी. त्यामुळे त्यातच जराशी सवड मिळाली तर असं कामाशिवाय इतर विषयांवर बोलायला मिळण्याची मी वाटच बघत असतो.”

 

आम्ही काही वेळ गप्पा मारतो. आमच्या गप्पा म्हणजे नव्या-जुन्या पुस्तकांवर, कुणाकुणाच्या कवितांवर. आम्ही चित्रपटांबद्दल किंवा आमच्या स्वत:च्या कवितांबद्दलही फारच क्वचित बोललेलो आहोत. अनेक संबंधित कार्यक्रमांत त्याच्या चित्रपटांबद्दल त्याला स्वत:ला बोलावं लागतंच. आणि त्याच्याशिवायचं उर्वरित जग तर त्याच्या चित्रपटांबद्दल कायमच बोलत असतं. कदाचित म्हणूनच, खाजगी गप्पांमध्ये नागराज स्वत:हून त्याबद्दल सहसा बोलत नाही. त्याला इतरांशी इतर विषयांवर बोलायचं असतं. त्याच्याकडे अर्थात एकाच वेळी पुरेपूर वेळ नसतो. गप्पा संपवून आपण जायला निघतो तेव्हा तो रस्त्यापर्यंत आपल्याला सोडायला येतो. तुम्ही रिक्षातून किंवा तुमच्याजवळ असेल त्या वाहनातून तुम्हाला जिकडे कुठे जायचं असेल तिकडे परत जायला निघता. हवं तिकडे पोहचता. तेव्हढ्यात नागराजचा फोन येतो. “असं कर, तुझी कामं संपल्यावर इकडे परत ये. रात्रीचं जेवण सोबत करू. काय खाशील? व्हेज, नॉनव्हेज?” तो मनापासून विचारतो. आणि रात्री आपण परत त्याच्याकडे जाईपर्यंत तो त्याची कामं संपवून जरासा निवांत झालेला असतो. टी-शर्ट आणि पाऊण चड्डी घालून त्याच्या घराच्या प्रशस्त गॅलरीतल्या वेताच्या खुर्चीत बसलेला. तसल्याच दुस-या खुर्चीत तो तुम्हाला बसवतो. त्या गॅलरीत प्रकाशासाठी कंदील लावलेले असतात. अर्थात आता रॉकेल मिळणं सहज शक्य नसल्यामुळे हे कंदील विजेवर चालणारे पण कंदिलाइतकाच आणि कंदिलासारखाच अंधुक उजेड सांडणारे असतात. भोवतीचा पूर्वापार गर्द काळोख नाहीसा होऊन आता डोळे दिपवणा-या लख्ख प्रकाशाने आयुष्य भारून गेलेले असतानाही नागराजचं हे कंदिलाच्या उजेडात बसून राहणं मला अनेक अर्थांनी फार प्रतीकात्मक वाटत राहतं. तिथलं त्याचं बोलणंही फार आंतरिक शैलीतलं असतं. नागराजने एवढं पचवलेलं आहे की त्याच्या साध्या बोलण्यातूनही काहीकाही तत्वज्ञानसदृश्य उमटत राहतं. त्याची जगाबद्दलची निरीक्षणं खास त्याची अशी असतात. “लोकांना खरं बोललेलं आवडतं, पण अमर्याद खरं बोललेलं नाही आवडत. त्यामुळे कधी कधी मला मौन हीच सगळ्यात भारी गोष्ट वाटते. कारण त्यावर कुणी आक्षेप घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही.”, “ज्या माध्यमाचा समाजमनावर खूप प्रभाव पडतो, त्यावर व्यवस्था नजर ठेवून राहते. कवितेकडे कुणाचं लक्षच नसतं. त्यामुळे कवितेतून तुम्ही थेट बोलू शकता, मात्र कविता फारशी कुठे पोहचतच नाही.”, “बल्बचा किंवा वॉशिंग मशीनचा किंवा पंख्याचा शोध यासारख्या घटना खरंतर लेखी कवितांहून अधिक मोलाच्या कविता असतात.”, सहज गप्पांत असल्या गोष्टी बोलताना त्याच्या चेह-यावर कुठलाही ‘शहाणपण’ दाखवणारा किंवा शिकवणारा अविर्भाव नसतो.

पिस्तुल्याने नागराज उजेडात आला. फँड्रीने त्याला नाव मिळवून दिलं आणि सैराटने तो स्वत:च एक ब्रँड झाला. कदाचित दादा कोंडकेंच्या नंतर नागराज मंजुळे हा महाराष्ट्रातला पहिला दिग्दर्शक अभिनेता असेल, जो महाराष्ट्रातल्या गावागावात आणि घराघरात पोहचलेला आहे. इथे दादांची आणि नागराजची तुलना करण्याचा प्रयत्न नाही, कारण या दोघांची चित्रपटीय अभिव्यक्ती अतिशयच भिन्न प्रकारची आहे. त्यांच्या केवळ लोकप्रियतेच्या संदर्भाने हा उल्लेख केलेला आहे. इतकी प्रचंड लोकप्रियता की नागराजच्या केवळ दर्शनाने थरारणारी माणसे मी पाहिली आहेत. एकदा औरंगाबादच्या एका हॉटेलात आम्ही गेलो. गाडीतून उतरलो आणि थेट आत गेलो. त्या उंची हॉटेलात फारशी गर्दी नव्हती आणि होती त्यातल्या कुणाचं कुणाकडे लक्ष नव्हतं. आम्ही बसलो वेटर आला. काय हवंय वगैरे विचारता विचारता त्याचं एकदम नागराजकडे लक्ष गेलं आणि तो एकाएकी फ्रीज झाला. काय बोलावं तेच त्याला सुचेना. नंतर बोलायला लागला तर इतका उत्तेजित होऊन की त्याचं कुठलंच वाक्य पुरं होईना. नागराज शांतपणे त्याच्याशी बोलला तेव्हा तो वेटर इतका खुश झाला की तो म्हणाला, ‘काय पाह्यजे ते मागवा, सर. अर्धं बिल मी देईन..” नागराज नुसता हसला. मग सगळ्या वेटर्सनी त्याच्यासोबत फोटो काढून घेतले. आम्ही निघताना अर्थातच बिलाचे पैसे आमचे आम्ही दिले.

त्याच्याच ‘आटपाट’ या संस्थेकडून प्रकाशित केलेल्या डॉ. प्रदीप आवटे यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला मी आणि कवयित्री नीरजा पाहुणे होतो. तिथे कार्यक्रम झाल्यावर केवळ स्टेजपासून  सभागृहाच्या दारापर्यंत पोहचायला नागराजला तब्बल वीस-पंचवीस मिनिटे लागली होती. चहूबाजूंनी तरुण मुला-मुलींची गर्दी त्याच्यावर ओसंडून कोसळत होती. सगळ्या लोकांना त्याच्याशी बोलायचं होतं, त्याच्या हातात हात द्यायचा होता किंवा नुसता त्याच्या सद-याला स्पर्श करायचा होता. माणसांचं त्याच्यावर जडलेलं हे कमालीचं प्रेम पाहता पाहता त्यावेळी मी थक्क होऊन गेलो.

‘सैराट’नंतर त्याचं जग कमालीचं बदललं आहे आणि हे स्थित्यंतर तितक्याच कमालीच्या ताकदीने पेलून, पचवून पुन्हा तो आधीसारखाच ‘नागराज’ उरला आहे, ही खरोखर कमाल गोष्ट आहे. एरवी चिमूटभर यशाने आपले पाय अधांतरी होतात. गर्दीने त्याला भोवंडून टाकण्याचे प्रसंग आता त्याच्या सवयीचे झाले असणार. आपण स्टार असल्याचा तो माज वाटून घेत नाही. त्याचे जमिनीवरचे पाय हवेत जात नाहीत. “पुण्यात सर्वाधिक पायी चाललेली जी माणसे असतील, त्यांच्यात माझा नंबर फार वरचा असेल. काही काम नसायचं. प्रचंड रिकामा वेळ वेळ असायचा आणि खिशात पैसा अजिबात नसायचा. मग मी दिवसच्या दिवस पुण्यात कुठून कुठेही पायी हिंडत राहायचो.” निष्कांचन दिवसांबद्दल बोलताना नागराज एकदा सांगत होता. आता नागराजकडे स्वत:ची मर्सिडीझ किंवा तसलीच कुठलीतरी जबरदस्त आलिशान गाडी आहे. तिच्या छताचा काही भाग पारदर्शक आहे. त्यावर पाऊस आणि उन्ह थेट झेलता येतं. वाटलंच तर सबंध छत बाजूला सरकवून गाडीचं रुपांतर उघड्या जीपमध्ये करता येतं. गाडीत उन्ह आणि पावसासोबत वाराही मुक्तपणे खेळू शकतो. लौकिक यशाच्या अपरंपार उंचीवर गेलेला नागराज कदाचित तिथूनच पंचमहाभूतांशी त्याचं नातं टिकवून ठेवत असेल. मध्येच तो गाडीतून उतरतो आणि मैलभर चालत राहतो. चालण्याची सवय त्याला मातीशी जोडून ठेवते. त्या आलिशान महागड्या गाडीत बसला म्हणून रिकाम्या खिशाने पुण्यात केलेली पायपीट तो विसरून जात नाही. त्या रखरखीत दिवसांनी त्याच्यातल्या कवीला जन्म दिला होता हे तो विसरत नाही.

“पुण्यात लाल महालाच्याजवळ एक बस-स्टॉप आहे. तिथं फारशी गर्दी नसते. मी दिवसचे दिवस तिथं बसून राहायचो. तिथे बसून मी वाचनही करायचो. माझं बरंचसं महत्वाचं वाचन मी तिथेच बसून केलेलं आहे.” नागराजच्या घरातला त्याचा स्वत:चा मजबूत ग्रंथसंग्रह आणि वाचनाची त्याची सुसज्ज खोली पाहत असताना त्याला लाल महालाशेजारच्या त्या बस-स्टॉपची आठवण येते.

तो काहीच विसरलेला नसतो.

तो आपल्याला जेवायला बोलावतो तेव्हा आपल्यासारखाच आपल्यासोबत घरातल्या भुईवर मांडी घालून बसतो. ताटात ज्वारीची भाकरी, शेवग्याच्या शेंगांची रस्सेदार आमटी, कांदा-लिंबू नि शेंगदाण्याची चटणी वाढलेली असते. बदल झालाच तर शेवग्याच्या शेंगांऐवजी चिकन किंवा मटन किंवा अंडाकरी. त्याच्या ताटात पंचतारांकित थाटमाट नसतो. दीर्घकाळ भोगलेल्या दारिद्र्यावर सूड घ्यायचा आहे अशा पद्धतीने वागताना तो कधीच दिसत नाही. तो त्या दारिद्र्याला, त्या दिवसांना आणि त्या दिवसांनी शिकवलेल्या धड्यांना कधी विसरत नाही.

स्टार झाला म्हणून त्याचे मित्र बदलेले नाहीत. आजही अनेकदा त्याच्यासोबत त्याचे गावाकडचे आधीपासूनचे साधेसुधे मित्रच असतात.

आपल्या घरी येतो तेव्हा भुईवर अंथरलेल्या सतरंजीवर भिंतीला टेकून तो सहजपणे बसतो.

त्याला कपडे मळण्याची किंवा चुरगळण्याची भीती वाटत नाही.

नागराज मंजुळे कशानेच मळत नाही, कशानेच चुरगळत नाही. तो अंतर्बाह्य कवी आहे. त्याहून अंतर्बाह्य ‘माणूस’ !

तो पळसाचं चौथं पान आहे.

(लेखक नामवंत कवी व नाटककार आहेत)

9325047883
[email protected]

 

Previous articleसाबरमतीत… सहा डिसेंबरच्या पूर्वसंध्येला…!
Next articleकुक्कू !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

2 COMMENTS

  1. पांडुरंग गुलाबराव सवडदकर चिखली ता.चिखली जि.बुलडाणा

    खूप छान पणे नागराज मंजुळे चे व्यक्तिमत्व शब्दांकित केले आहे.

Comments are closed.