नितीनभाऊ, तुम्ही बोलत रहा…!

-मधुकर भावे

देशातील  प्रमुख विरोधी पक्षांचे नेते गेली अनेक वर्षे, जे बोलायला हवे ते, बोलत नाहीत. २०१४ पासून २०२२ पर्यंत ८ वर्षे झाली. या आठ वर्षांत अपवादात्मक दोन-तीन नेते सोडले तर, केंद्रातील भाजापा सरकारच्या घोषणाबाजीविरुद्ध काँग्रेसमधील किंवा राष्ट्रवादीमधील…. फार थोडे नेते सत्य सांगण्याची हिंमत दाखवतात. कोणाला घाबरतात कळत नाही. पण वस्तुस्थिती ही आहे की, महाराष्ट्रात तरी काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याने आक्रमक भूमिका घेवून लोकांच्या प्रश्नावर सत्य सांगण्याची भूमिका घेतली नाही. शरद पवार अधून-मधून आक्रमक बोलतात. पण, काँग्रेस नेत्यांजवळ हे ही धैर्य नाही. माणिकराव ठाकरे, अशोकराव चव्हाण, त्यावेळचे विरोधी पक्षनेते आणि आताचे भाजपवासीय विखे-पाटील यांनी कधीही भाजपा, केंद्रातील सरकार किंवा त्यावेळचे महाराष्ट्रातील युती सरकार विरोधात बोलण्याची हिंमत कधीच दाखवली नाही. अशोक चव्हाण काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी जिल्हा पातळीवर काही शिबीरे आयोजित केली होती. त्यावेळी विखे-पाटील विरोधी पक्षनेते होते. तेही या शिबीरांमध्ये यायचे, पण अशोक चव्हाण यांनी ना कधी महागाईवर, वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या घोषणेवर, राज्यात निर्माण करण्यात येत असलेल्या धार्मिक उन्मादावर कधीही भाष्य केले नाही. नाही म्हणायला नांदेडला अशोक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला सचिन पायलट यांना बोलावले होते. त्यांनी आक्रमक भूमिका घेतली तेव्हा अशोक चव्हाण अस्वस्थ वाटत होते.

अडीच वर्षे आघाडीच्या सरकारात काढल्यानंतर आता पुन्हा काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो, या नेत्यांना लोकांचे प्रश्न घेवून शांततामय मार्गाने रस्त्यावर लढे लढवायची कोणी बंदी केली आहे? महागाई वाढली आहे की नाही? बेरोजगारी, गॅस, पेट्रोल – डिझेल यांच्या वाढलेल्या किंमती, जी.एस.टी. सर्रास लावल्या गेल्यामुळे महागाईचे सगळेच गणित बदलले आहे. काँग्रेसचे सत्तेबाहेर असलेले नेते, कोणत्याही निमित्ताने काही बोलायला तयार नाहीत. या स्थितीमध्ये लोकांच्या प्रश्नासोबत आज कोण आहे? शिवसेना सत्तेत राहिली नाही. त्यामुळे त्यांचा पक्ष उभा करण्याच्या मागेच त्यांची सगळी शक्ती खर्च पडत आहे. लोकांचे प्रश्न जिथे आहेत त्याच्यापेक्षा आणखी मागे गेले आहेत.  बहुसंख्य वृत्तपत्रे एकतर्फी आहेत आणि ते ही हिंमत दाखवत नाहीत. अपवाद एक-दोन वृत्तपत्र आहेत, त्यात ‘लोकसत्ता’ चा उल्लेख करावा लागेल. वाहिन्यांचा विषय तर सोडूनच द्या. त्या सर्व भाजापाच्या चरणी वाहिलेल्या आहेत. अशा स्थितीत केंद्रात सत्ताधारी बाकावर मंत्री म्हणून बसलेले श्री. नितीन गडकरी निदान लोकशाही, स्वातंत्र्य, समता, शासनातील निर्णयाची दिरंगाई आणि आपल्या पक्षाच्या पूर्वीच्या नेत्यांनी जे कष्ट उपसले त्यातून आज मोदीजींना केंद्रात आणि  अन्य काही राज्यांत भाजपा नेत्यांना मिळालेली सत्ता, याबद्दलचे मत स्पष्टपणे व्यक्त करीत आहेत. ते कोणाला घाबरत नाहीत.

मुळात आजच्या राजकारणात गडकरींएवढा मोकळ्या मनाचा, लोकशाहीवादी आणि सत्तेच्या राजकारणाबाहेर समाजकारण, राजकारण याचे महत्त्व मानणारा एक अनन्य साधरण नेता आहे. विरोधी पक्षाचे महत्व जाणणारा नेता आहे. सत्तेसाठी किती स्पर्धा करायची, याचे भान ठेवणारा नेता आहे. शिवाय, आज भाजपाला जे ‘सत्ता-वैभव’ चे दिवस आले त्याच्या पायाभरणीत गडकरींचाही फार मोठा सहभाग आहे. निदान महाराष्ट्रात तरी. गडकरींप्रमाणेच महाराष्ट्रातील जुना जनसंघ, नंतरचा भाजपा. त्यामधील नेते रामभाऊ म्हाळगी, उत्तमराव पाटील, ग्रामीण भागात अर्जुनराव वानखेडे, शामराव कापगते, महादेव शिवणकर, मुंबईमध्ये राम नाईक, राम कापसे, हशू अडवाणी, वामनराव परब, मधू देवळेकर अशी अनेक मंडळी होती. नागपुरात गडकरी होते. प्रभाकरराव मुंडले, लक्ष्मणराव मानकर होते. भाजपाच्या आजच्या यशाच्या पायाचे दगड ही मंडळी आहेत. लोकशाही, संविधान, स्वातंत्र्य, समता, सर्वधर्म समभाव याचा अधिक्षेप त्यांनी कधी केला नाही. पक्ष नाजूक स्थितीत होता. काही वेळा तर स्थिती अशी होती की, पक्षाची उमेदवारी घ्यायला उमेदवार नव्हते. मग, पडण्यासाठीच जणू उमेदवार शोधून आणायचे.  त्यात मुकुंदराव आगासकर, सुमतीबाई सुकळीकर, जगन्नाथराव जोशी, असे लोकसभा निवडणुकीत ‘पराभूत होण्यासाठी’ उमेदवार शोधले जायचे. विधानसभेच्या निवडणुकीतही तिच अवस्था असायची.

१९५७ च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेत त्यावेळच्या जनसंघाचे एकटे उमेदवार निवडून आले, ते होते अटलबिहारी वाजपेयी. बलरामपूर मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यांच्या निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर झाला. त्यानंतर पाच तासांनी रत्नागिरीतून संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झंझावातामुळे विजयी झालेले प्रेमजीभाई आशर हे जनसंघाचे दुसरे विजयी उमेदवार.. लोकसभेत वाजपेयींच्या शेजारी जाऊन ते बसले. तेव्हा हसत हसत वाजपेयी म्हणाले…, ‘चलो, एक तो साथी हैं….’ अशी त्यावेळची अवस्था.  त्यानंतर हळूहळू पण पद्धतशीरपणे जनता पक्षात शिरून भाजपाने दोन मोठी पदे मिळवली. वाजपेयी- अडवाणी परराष्ट्र मंत्री आणि नभोवाणी मंत्री झाले. त्यालाही आता ४५ वर्षे होतील. या जुन्या मंडळींनी आणि त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांच्या संचाने, पक्षासाठी खूप मेहनत घेतली आहे. मैलाच्या पायाचे दगड खूप जण आहेत. गडकरींनी ही भावना अगदी मोकळेपणाने बोलून दाखवली. त्यामुळेच श्री. नरेंद्र मोदीजी आज जे भाजपाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान आहेत त्या सगळ्या यशात  दिनदयाळ उपाध्याय, वाजपेयी, अडवाणी यांचे श्रम, पक्षनिष्ठा आणि लोकशाहीवरील श्रद्धा याचा फार मोठा वाटा आहे. वाजपेयी तर मनाने एवढे मोकळे होते, ते भाजपाचे कधी वाटलेच नाहीत. सर्व विश्वाचे वाटले.

भाजपाच्या आजच्या देशभराच्या राजकारणात सत्ता, मगरुरी, केंद्रीय यंत्रणांचा पक्षासाठी वापर, दिलेले कोणतेही आश्वासन अंमलात न आणणे, रेटून नेणे, शेतकरी विरोधी कायदे करून नंतर ते अंगाशी येत आहेत हे दिसल्यावर ते मागे घेणे. असे सर्वकाही चालले आहे. मन की बात आहे. दिल की बात आहे…. मात्र काम की बात राहून गेली. गरीब माणसं भिकेला लागायची वेळ आली. रुपयाची पत घसरली. महागाई हाताबाहेर गेली. राजनाथ सिंह अध्यक्ष असताना निवडणूक प्रचारासाठी तयार झालेल्या पोस्टरवर ‘अब की बार-भाजपा सरकार’ असे वाक्य होते…. मोदीजींनी त्यातील ‘भाजपा’ शब्द काढून ‘मोदी सरकार’ हा शब्द टाकला, अशी एक  पोस्ट सध्या फिरते आहे. कदाचित ती लगेच बंद होईल. नंतर निवडणुकीत प्रसिद्ध झालेले पोस्टरही मोदींच्या नावाचेच आहे. त्यांचे सरकार एकदा नाही दोनदा आले. पण, प्रश्न काही सुटले नाहीत. महागाई, बेरोजगारी सगळेच प्रश्न वाढत राहिले. जाती-धर्मात अंतर वाढले. भावनात्मक राजकारण करून मतं मिळवणे, सरकार आणणे, आवश्यक तिथं फोडाफोडी-पाडापाडी करणे हे सगळं सुरू झालं. या स्थितीमध्ये विरोधी पक्षाचे लोक स्वस्थ बसून हे सगळं पहात असताना… बोलत आहेत ते गडकरी.

२३ जुलै २०२२ रोजी नागपूरमध्ये श्री. गिरीश गांधी यांच्या सत्कारात सर्वपक्षाचे लोक होते. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे होते. राष्ट्रवादीचे अरुण गुजराथी होते. भाजपाचे दत्ताभाऊ मेघे होते. समारंभाचे स्वागताध्यक्षच गडकरी साहेब होते. त्याच कार्यक्रमात बोलताना देशातील आजच्या समाजकारण-राजकारण आणि सत्ताकारण यातील नासलेल्या सत्ताकारणाची अगदी बिनधास्त चर्चा नितीनभाऊंनी केली. ‘अशा राजकारणात रहावे की नाही…’, इथपर्यंत त्यांच्या मनातील भावना त्यांनी व्यक्त केल्या. समाजात आज जे दिसत आहे त्याचे ते नेमके दिग्दर्शन होते. लोकांना ते भावले. सत्तेत आणि केंद्रात मंत्री असलेल्या एका नेत्याने अशा स्पष्ट भूमिका घेणे आवश्यकच आहे. गडकरींचे भाषण केंद्रातील सत्ताधाऱ्यांना पटो न पटो, पण त्याचा प्रतिवाद कोणीही करू शकणार नाही, कोणी केलाही नाही. गडकरी खरे तेच बोलले. त्यांचा तो स्वभाव आहे. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते असताना, नंतर महाराष्ट्रात मंत्री असताना, त्या आगोदर त्यांची मते ते मोकळेपणाने मांडत. त्यांच्या कोणत्याही भाषणात, त्यांच्या वागण्यात लोकशाहीचा अनादर नाही. विरोधी पक्षाचा अनादर नाही आणि धार्मिक उन्मादही नाही. ते संघवाले आहेत. दसऱ्याच्या संघ संचलनात ते गणवेशात दिसतातही. पण, मनाने ते लोकशाहीवादी आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात आणि मनाचा तळ नितळपणे पाहता येईल, इतका स्वच्छ आहे. महाराष्ट्रात भाजपामध्ये इतका मोकळा नेता कोणी नाही. जे आहेत ते एक नंबरचे राजकारणी आहेत. मतलब साधणारे आहेत. अाणि आजच्या सत्ताकारणात अगदी ‘फिट्ट’ बसतील असे आहेत. गडकरींना ते जमणार नाही. त्यामुळे ते मोकळे-ढाकळे आहेत.

चार दिवसांपूर्वी बातमी आली की, भाजपाच्या सर्वोच्च अशा संसदीय मंडळातून गडकरींना वगळले. त्यांना त्याचे काहीही सुख-दु:ख नाही. ‘त्या मंडळात मला घ्या,’ असे सांगायला ते पूर्वी गेले नव्हते. आता बाजूला केले म्हणून ‘असे का केले’, असे विचारायलाही ते जाणार नाहीत. सत्ता त्यांनी कधीही अंगाला चिकटून घेतली नाही. सत्ता असेल तेव्हा सपाटून-रपाटून काम करणे एवढेच ते जाणतात. त्यामुळे ८ वर्षातील केंद्रातील भाजपाच्या मंत्रिमंडळात काम करणारे क्रमांक १ चे मंत्री म्हणून त्यांचे नाव कोणत्याही फळ्यावर लिहिले तरी ते कोणालाही पुसता येणार नाही. शिवाय त्यांचे काम दिसते आहे.  त्याची जाहिरात करावी लागत नाही. लोकं त्यांचा अनुभव घेतात. जगात जे नवे आहे ते भारतात आले पाहिजे, हा त्यांचा आग्रह. महाराष्ट्रात ते बांधकाममंत्री (१९९५-९९)होते. जे उड्डाण पूल झालेत त्याच्या खालचे पिलर परदेशात किती सुबक आहेत, ते पहायला त्यांनी टीम पाठवली. त्या रिकाम्या जागेवर काय पेंटींग असावे त्याचा अभ्यास करायला टीम पाठवली. आज मुंबईच्या उड्डाणपुलांचे पिलर पहा…हे एक साध उदाहरण…. कामात गडकरींना मागे लोटून पुढे जाणारा अजून कोणताही मंत्री जन्माला आलेला नाही. पण, राजकारणात याच गुणाची असूया असू शकते. म्हणून गडकरींविरोधात काही अपप्रचार चालला असेल. त्यांनी कधीच कोणाबद्दल द्वेष केला नाही. नागपुरातील कम्युनिस्ट बर्धनही त्यांचे मित्र. काँग्रेसचे हरिभाऊ नाईकही त्यांचे मित्र. दत्ताभाऊ राष्ट्रवादीत होते, तेव्हाही त्यांचे मित्र आणि आताही मित्र.

आज लागोपाठ तिसऱ्यांदा गडकरींची वेगवेगळी भाषणे वाहिन्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने तिखट-मीठ लावून सजवली आहेत. भासवण्यात असे येत आहे की, ते केंद्र सरकार आणि मोदींजींच्या विरोधात काहीतरी बोलतात.  काही मंडळींना त्यांचे केंद्रातील मंत्रीपद खूपत असेल किंवा दुखत असेल. मंत्रीपद असले आणि नसले तरी गडकरींना फार फरक पडत नाही. त्या पदामुळे त्यांची लोकप्रियताही नाही. शिवाय पक्षाच्या नेतृत्त्वाने गडकरींना प्रभावहीन करायचे असे ठरवले तरी त्याचा उलटा परिणाम होईल. गडकरी अधिक लोकप्रिय होतील. आज ते क्रमांक १ चे लोकप्रिय नेते आहेत. अगदी टोकाचा विचार केला आणि उद्या समजा त्यांना भाजपाच्या नेत्यांनी मंत्रीपदापासून दूर करण्याचा निर्णय केला तरी गडकरींना त्याचा काहीही फरक पडणार नाही. शिवाय जर आमच्या काँग्रेसवाल्यांना किंवा अन्य विरोधी पक्षवाल्यांना, गडकरी आता भाजपाच्या, केंद्र सरकारच्या विरोधात जातील, असे मनात कितीही वाटले तरी आजच सांगून ठेवतो, गडकरींची  भूमिका कधीही पक्षविरोधात जाण्याची राहणे शक्य नाही. ते म्हणजे खडसे नव्हेत. सत्तेचा त्यांना अजिबात लोभ नाही.  त्यामुळे एखादं खातं काढून घेतले म्हणून ते अस्वस्थ होत नाहीत. जे खातं राहिलं  आहे, त्यात त्यांचं काम क्रमांक १ चे आहे. उद्या समजा तेही काढून घेतले आणि त्या पलिकडे जावून केंद्रीय नेतृत्त्वाने गडकरींवर रागावून अगदी नागपुरातून लोकसभेचे तिकीट दिले नाही तरीही गडकरींची समवृत्ती अजिबात ढळणार नाही. आमच्या विरोधी मित्रांना वाटेल की, असं काही अनपेक्षित झाले, तर गडकरी अपक्ष उभे राहतील, असेही काही होणार नाही.  ते भाजपावाले आहेत. भाजपावालेच राहतील.कारण ते स्वार्थासाठी…. सत्तेसाठी त्या पक्षात नाहीत. ते म्हणजे विखे- पाटील नव्हेत. मग भाजपावाले आणि   नितीनभाऊ गडकरी यांच्यात फरक काय? एका राजकीय पक्षाचे कायम निष्ठावान स्वयंसेवक असताना त्यांच्यात कट्टरपणा आहे पण,  कडवटपणा नाही. पक्षाबद्दलची आत्मियता आहे.  पण विरोधकांबद्दलचा द्वेष नाही. लोकशाहीबद्दलची आस्था आहे.गरिबांबद्दलची कणव आहे आणि त्यासाठी सत्ता हातात असली पाहिजे, असा त्यांनी कधीच आग्रह केला नाही. सत्ता असेल तर ठीक नसेल तर त्यांनी फार बिघडत नाही. चांगलं काम करायला आणि सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून वागायला, सत्तेची गरज नाही. याचेच नाव नितीन गडकरी आहे.

म्हणून नितीनभाऊ, २३ जुलै च्या कार्यक्रमात सध्याच्या बरबटलेल्या राजकारणातून दूर व्हावे का? अशी भावना तुम्ही  व्यक्त केली होती. त्यावेळीही मी माझ्या याच जागेवर तुमच्यासाठी लिहिले होते…. ‘नितीनभाऊ, तुम्ही  समाजकारणातही हवेत, राजकारणातही हवेत आणि  सत्ताकारणातही  हवेत…. ’ आज पुन्हा लिहितो आहे. तुम्ही या सर्व राजकारणात राहात असताना तुम्हाला जे योग्य वाटेल ते बोलत रहा. तुमची मतं मांडत रहा. लोकशाहीसाठी ते आज फार आवश्यक आहे. तुमच्याच पक्षातील लोकांना ते आज कडू वाटले तरी पाच-दहा वर्षांत तुमच्या आजच्या प्रत्येक शब्दांचा प्रत्यय येईल. म्हणून तुम्ही बोलत रहा…. कारण आज निर्भिड बोलणारे आणि सत्य लिहिणारे कुठे सापडणार आहेत?

(लेखक नामवंत पत्रकार व वक्ते आहेत)

9869239977

Previous articleनितीन गडकरी , बोला की स्पष्टपणे एकदा !
Next articleदररोज मी जाते सती..
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.