विधिमंडळ अधिवेशन नव्हे  ,  नुसताच कल्ला !

प्रवीण बर्दापूरकर

आठवण माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आहे . वर्ष १९९२ असावं आणि दिवस असेच थंडीचे होते . तेव्हा अटलबिहारी वाजपेयी लोकसभेतले विरोधी पक्षनेते होते आणि पंतप्रधानपदी पी . व्ही . नरसिंहराव होते . सभागृहात सत्ताधारी काँग्रेस पक्षाचं बहुमत काठावरचं होतं . शिवाय संसदेबाहेरही अनेक प्रश्न आक्राळविक्राळ बनलेले होते . त्यामुळे प्रत्येक प्रश्नावर विरोधी पक्ष सहाजिकच आक्रमक होता . सभागृहाचं नियमित कामकाज होतचं नव्हतं . संसदेत कामकाजाच्या नावाखाली जे काही सुरु होतं त्याचं वर्णन एका शब्दात करायचं तर गोंधळ होतं . सभागृहातल्या त्या कामकाजावर टीका करताना अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘संसदेचा मासळीबाजार’ झालाय अशी टीका केली ; मासळी बाजारात जसा कलकलाट असतो तसंच संसदेत सुरु असल्याचं वाजपेयी यांना त्यावेळी सुचवायचं होतं . पण , विरोधी पक्ष नेत्याने इतकी बोचरी टीका केल्यावरही वाजपेयी यांच्याविरुद्ध सभागृहातल्या कोणत्याही सदस्यानं  हक्कभंगाच हत्यार उपसलं नव्हतं . याचं एकमेव कारण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी तोपर्यंत सभागृहातले सर्वांत बुर्जुग आणि अनुभवी सदस्य होते . ( ही सविस्तर हकिकत माझ्या ‘क्लोज-अप’ या पुस्तकात , प्रकाशक -देशमुख आणि कंपनी , अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील लेखात आहे . )

हे आठवलं , कारण सध्या राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन म्हणून ( ‘शक्ती’ कायद्याचा अपवाद वगळता )  जे काही चाललं आहे त्याचंही वर्णन जर अटलबिहारी वाजपेयी हयात असते तर त्यांनी ‘मासळीबाजार’ याच शब्दात केलं असतं , इतका कल्ला आणि सदस्यांचं अशोभनीय वर्तन पाहायला मिळतं आहे . ‘सदस्यांनी सभागृहात संसदीय लोकशाहीला अनुलक्षून सदवर्तन करावं  अन् सभ्य भाषा वापरावी’ , असं खडसावून सांगणारम समंजस नेतृत्व विधिमंडळात आहे की नाही , असा प्रश्न सहाजिकच पडतो . राज्य  विधिमंडळात कामकाज म्हणून सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंकडून घडतयं किंवा घडवून आणलं जातंय ते लोकशाहीला मुळीच शोभनीय नाही . अर्थात याला बरंचसं  कारणीभूतही सत्ताधारी पक्षाचं वर्तन आहे , हेही स्पष्टपणे सांगायलाच  हवं . कारण काही प्रसंगात सत्ताधारी पक्षानंच विरोधी पक्षाच्या हातात कोलीत दिलेलं आहे . उदाहरणचं द्यायचं झालं  तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचं देता येईल . उद्धव ठाकरे यांना आजारपण काही चुकलेलं नाही , कसं चुकणार कारण ते माणसासारखे हाडामासांचे माणूस आहेत . उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाली , गेल्या जवळजवळ दीड महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचा वावर थांबलेला आहे . राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनाच नव्हे तर जनतेलाही मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी वाटणं अतिशय स्वाभाविक आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या संदर्भात माहिती देणारं अधिकृत निवेदन जारी करुन केवळ विरोधी पक्ष आणि जनतेच्याच नव्हे तर सत्ताधारी पक्षातीलही अनेकांच्या मनातला संभ्रम दूर करता आला असता . एरव्ही अनेक बाबतीत पारदर्शी कारभाराच्या गप्पा ठोकणाऱ्या सत्ताधारी पक्षानं याबाबतीत ( अनाकलनीय ) मौन पाळून मुख्यमंत्र्यांना विनाकारण  संशयाच्या पिंजऱ्यातच  उभं करुन टाकलं नाही तर अनेक नावंही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणून अफवांचं पीक काढायलाही सुरुवात करुन टाकली . त्यात आलेली काही नावं म्हणजे नाहकच भरडले गेलेले जीव म्हणायला हवेत .

या चर्चेत एक नाव संजय राऊत यांचंही आलं ; ते स्वाभाविकचं होतं म्हणा ,  पण ते असो ! तर संजय राऊत म्हणाले , पंतप्रधान मोदी तरी लोकसभेत कुठे हजर असतात ? त्यांचं म्हणणं क्षणभर बिनतोड वाटू शकतं मात्र  , नरेंद्र मोदी भलेही सभागृहात नसोत पण त्यांचा सार्वजनिक वावर थांबलेला नाही . ते दौरे करतात , ( विविध वेशभूषा करुन ) सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतात , प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकांना ते हजर असतात ; उद्धव ठाकरे यांचं  मात्र दर्शनही दुर्लभ झालेलं आहे . पण , संधी मिळाली आणि बोलले नाही तर त्यांना जणू संजय राऊत म्हणताच येणार नाही , असा हा मामला आहे !

सत्ताधारी महायुतीचे भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांच्या भाषणाच्या नकलेची जी काही कथित अदाकारी सभागृहात पेश केली त्याला आवर घालणं सत्ताधारी पक्षातल्या कुणालाही का शक्य झालं नाही , हे उमजण्यापलीकडचं आहे . त्यामुळे विरोधी पक्ष आणि त्यातही वाट्याला फुलटॉस आलेला चेंडू षटकार म्हणून भिरकावण्याची भाजपला संधी मिळाली . ( अर्थात इथे प्रश्न नरेंद्र मोदी यांच्याऐवजी अन्य पक्षाच्या नेत्याची अशी नक्कल झाली असती तर सभागृहातील भाजपच्या सदस्यांना अशाच मिरच्या झोंबल्या असत्या का ? हा आहेच म्हणा .  ) भारतीय रंगभूमीवर अभिजात दर्जाचे अनेक विदूषक होऊन गेले . आपला महाराष्ट्रही त्या बाबतीत मागे नाही . भास्कर जाधव यांची सभागृहातील ती अदाकारी मात्र त्या रांगेत बसणारी मुळीच नव्हती , म्हणूनच समर्थनीय नव्हती हे नक्की . त्यांच्या अदाकारीला चाहते भरपूर लाभण्याची शक्यता आहेच . त्यामुळे एक संच जमवून गावोगाव तंबू टाकून ‘या’ अदाकारीनं जनतेचं मनोरंजन करण्याचा उपक्रम भास्कर जाधव यांनी हाती घेतला तर सभागृहात त्यांच्या जागी जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या अन्य कुणा सदस्याला संधी मिळेल !

विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबतही सत्ताधारी पक्षांनी अति म्हणजे अतिच सावध भूमिका घेतली आहे . विरोधी पक्षातले  आणि त्यातही भाजपचे बारा सदस्य निलंबित असताना गुप्त पद्धतीने मतदान टाळून मतदार फुटण्याच्या शक्यतेवर सत्ताधारी पक्षानं शिक्कामोर्तबचं केलं  . खरं तर भाजपाचे बारा सदस्य निलंबित असतानाच पहिल्या दोन दिवसांत विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेऊन टाकली जायला हवी होती आणि नव्या अध्यक्षाचा पहिला निर्णय म्हणून त्या बारा सदस्यांचं निलंबन रद्द करुन लोकशाहीला अपेक्षित असलेल्या संवादाची प्रक्रिया सुरु करता आली असती पण , तीही खेळी सत्ताधारी पक्षानं टाळली . का टाळली , या प्रश्नाचं उत्तर अर्थातच मिळणार नाही . सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांचं पुनर्वसन हा सरकारचा प्राधान्यक्रम झालेला आहे ; विदर्भ आणि मराठवाड्यासाठी कळीच्या असणाऱ्या वैधानिक विकास मंडळावरील नियुक्त्या सरकारला अजूनही करता आलेल्या नाहीत आणि या संदर्भात विरोधी  पक्षानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणारंही सत्ताधारी पक्षात अजित पवार वगळता कुणी नाही त्यातच  कोरोना संपलेला नसतानाच  ओमायक्रॉनचं संकट महाराष्ट्राच्या दरवाज्यावर उभं टाकलेलं आहे ; एकटे उपमुख्यमंत्री अजित पवार किल्ला लढवताहेत असंच चित्र आहे आणि ते काही सत्ताधारी पक्षाची शान वाढवणारं नाही .

एक ना अनेक , असे अनेक मुद्दे सध्या राज्य सरकारच्या विरोधात आहेत . एसटी संप चिघळतच चालला आहे , कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती  चिंताजनक आहे , त्यात आता परीक्षा घोटाळ्याची भर पडलेली आहे . सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी आदर्श अशी परिस्थिती विरोधी पक्षांसाठी आहे आणि त्या संधीचं सोनं देवेंद्र फडणवीस , सुधीर मुनगंटीवार आदी विरोधी पक्षनेते करुन घेत आहेत . अनेकांना आवडणार नाही पण , हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की , अलीकडच्या २५ वर्षांत कोणत्याही विरोधी पक्ष नेत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी उल्लेखनीय कामगिरी बजावत सत्ताधारी पक्षाला एवढं  कोंडीत पकडलेलं नाही . आक्रमकता , अभ्यास आणि समयसूचकता ही विरोधी पक्षनेत्याची तीन हत्यारं असतात आणि देवेंद्र फडणवीस तसंच सुधीर मुनगंटीवार यांची ही हत्यारं चांगलीच परजलेली आहेत . मात्र , मुळीच आरडाओरडा न करता अतिरेकी वाटेल असा अभिनय न करता देवेंद्र फडणवीस का बोलू शकत नाही , हा पश्न उरतोच . मुख्यमंत्री पदाच्या सुरुवातीच्या काळातही ते ‘वर्गातल्या आक्रस्ताळ्या मॉनिटरसारखे वागतात’ , अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती . त्यानंतर कांही काळ मध्यम लयीत आलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा तो जुना ‘लाऊडनेस’ पुन्हा एकदा उफाळून आलेला दिसतोय .

विरोधी पक्षात सर्वच सदस्य शोभादायक वावरतात असा याचा अर्थ नाही .  ‘भास्कर जाधव नावाची वृत्ती’ विरोधी पक्षातही आहे आणि ती मांजराचे आवाज काढत असते , अशा बातम्या प्रकाशित झाल्या आहेत . कुणी असे आवाज काढल्याने वाघाची मांजर होत नाही आणि मांजरीचा वाघही होत नाही . निर्माण होतो तो नुसताच मासळी बाजारातला कलकलाट . म्हणूनच विधिमंडळाचं पहिल्या आठवड्याचं कामकाज बघताना अटलबिहारी वाजपेयी याच्या त्या बोचऱ्या पण वास्तव  टिकेची  आठवण आली .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here