समृद्ध हंपी, समृद्ध विजयनगर

_autotone

-मंदार मोरोणे 

डोमिंगो पेस (पायस) हा पोर्तुगीज होता, घोड्यांचा व्यापारी होता. व्यापारासाठी तो विजयनगर साम्राज्यात येई. घोडे विकायला येणारा तो एकटाच नव्हता. अरबी, चिनी, पर्शियन असे अनेक व्यापारी तिथे येत. कारण, त्यांचा माल विकल्या जाण्याची खात्री त्यांना होती. कारण, विजयनगर मोठे आणि समृद्धच तितके होते. डोमिंगो लिहितो, “ मला तर हे शहर रोमइतकेच मोठे आणि श्रीमंत वाटते,”. म्हणजे तत्कालिन जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक. लहानपणी तेनालीरामा बघितले, मोठेपणी ठिकठिकाणी संदर्भ येत गेले आणि विजयनगर साम्राज्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. विजयनगर बघितले पाहिजे, म्हणजे आताचे हंपी बघितले पाहिजे. खूप वर्षांची इच्छा यंदा प्रत्यक्षात आली.

आम्ही चार मित्रांनी हंपी फिरणे सुरु केले आणि त्या शहराच्या भव्यतेची, समृद्धीची आणि सामर्थ्याची प्रचिती येत गेली. चौदाव्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत अस्तित्वात असलेल्या दक्षिण भारतातील या सर्वात मोठ्या हिंदू साम्राज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. राजा कृष्णदेवरायाच्या काळात समृद्धीचा कळस अनुभवलेले हे राज्य म्हणजे भारतीय कर्तबगारीचा सर्वोत्कृष्ट नमुना होते. सुमारे २५० वर्षे टिकलेले आणि चार विविध घराण्यांनी चालवलेले हे साम्राज्य होते. जगभरातील व्यापारी येथे येत. बाजारांमधून सोने, चांदी, हिरे यांसारख्या मौल्यवान गोष्टींपासून अनेक बाबींचा मोठा व्यापार होता. हंपी शहरभर विखुरलेले बाजारांचे मोठाले अवशेष या समृद्धतेची साक्ष देतात. सामरिकदृष्ट्य़ा सक्षम असलेल्या या राज्याने कला, सौंदर्यही तितक्याच असोशीने जपले. युनेस्को जागतिक वारसा असलेल्या हंपीतील प्रत्येक मंदिर केवळ या सौंदर्यदृष्टीचीच नव्हे तर हिंदू कर्तबगारीची, कौशल्याची, विचारांची आणि जीवनमूल्यांची साक्ष देत उभे आहे.

‘धर्म ही अफूची गोळी’ या  विचारातून मंदिरांकडे तुच्छतेने किंवा दुर्लक्षाने बघण्याचाही एक काळ या देशात येऊन गेला. अलीकडच्या इतिहासात ती केवळ पूजाअर्चेची किंवा कर्मकांडाची केंद्रे झाल्यामुळेही असे झाले असेल. पण, नकोशा पुरोहितशाहीच्या पल्याड असलेली मंदिरे हा आपला समृद्ध ठेवा आहे. मंदिरात येताना एकाच वेळी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असा सगळाच संस्कार व्यक्तीवर व्हावा याचा विचार करून ही मंदिरे बांधली गेली आहेत. हंपीतील प्राचीन विरुपाक्ष मंदिरात एकीकडे वैराग्याचे प्रतिक असलेला शंकरही आहे आणि दुसरीकडे नागरिकांना कामशास्त्राची झलक दाखविणारी शिल्पेही आहेत. असे आहे कारण जीवनाचा समग्र विचार हिंदू जीवनपद्धतीत आहे.

विजयनगरात शिल्पकलेचा कोणता नमुना नाही? राण्यांनी उन्हाळ्यात राहावे असा महाल आहे, तो थंड ठेवण्यासाठी वापरलेली जलव्यवस्थापनाचे तंत्र आहे. पाणी साठवण्यासाठीच्या पुष्करणी आहेत. संपूर्ण रामायण मांडणार्‍या तब्बल एक हजार शिल्पांचे हजारी राम मंदिर आहे. अगदी व्यापारांना राहण्यासाठी बांधलेली विश्रामगृहेही कलासंपन्नच आहे. मंदिरे आमची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक केंद्रे होती, ती केवळ कर्मकांडांची स्थाने नव्हती. तो आमचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा आहे याची साक्ष विजयनगरात पदोपदी मिळत राहते. आणि अजून तर अवघ्या जगात प्रसिद्ध झालेले विजय-विठ्ठल मंदिर समजून घ्यायचे बाकी असते.

‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्याच्या सुरांनी मराठी मनाचा एक कोपरा कायमचा आपल्या नावावर केला आहे. पण, महाराष्ट्रातल्या पंढरीला हा कानडा कुठून येऊन चिकटला, हे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात सहज येत नाही. आणि येथेच महाराष्ट्राचा हंपीशी संबंध येतो. हंपीवर आक्रमणे झाली आणि अनेक मंदिरे संकटात सापडली. त्यावेळी, पुंडलिकाने कर्नाटकातील हंपीच्या विजय विठ्ठल मंदिरातून त्या मूर्ती उचलल्या आणि थेट पंढरपूरच्या मंदिरात आणून बसविल्या, अशी आख्यायिका किंवा कथा सांगितली जाते. तेव्हापासून ‘कानडा राजा’ महाराष्ट्राच्या पंढरीचा झाला. अर्थात, या कथेबाबतही दुमत आहे मात्र आपल्यासाठी हंपीशी नाते जुळायला इतका संदर्भ पुरेसा आहे.

विजय-विठ्ठल मंदिरातील रथशिल्प म्हणजे हंपीची जगातील ओळख आहे. बहामनी सुलतानांनी हंपी उध्वस्त करणे सुरू केल्यावर या रथशिल्पाचीही तोडफोड केली. आजही ही तोडफोडीची चिन्हे बघायला मिळताते आणि त्यानंतरही हे अद्भुत रथशिल्प बऱ्याच प्रमाणात शाबूत राहिले आहे. या रथाव्यतिरिक्त इतर अनेक मंदिरे, सभागृह विजय-विठ्ठल मंदिर परिसरात आहेत. ‘रंगमंडप’ हा तर खास द्रवीड स्थापत्यशैलीचा आविष्कार आहे. वाद्यांचे आणि संगीताचे आवाज उत्पन्न करणाऱ्या खांबाची रचना बघण्यासारखी आहे. एकेक खांब उत्तम शिल्पकलेने नटला आहे. या सभागृहात नृत्य किंवा इतर कला सादर केल्या जात असत. यासाठी आवश्यक असणाऱ्या ध्वनिशास्त्राचा अभ्यास येथे केला होता.

तुंगभद्रा नदीच्या काठावर उभारलेला हा प्रचंड शिल्पसमूह म्हणजे भारतीय शिल्पकलेच्या विशेष नमुना आहे. हा सगळाच परिसर प्रचंड विस्तीर्ण असा आहे. याच परिसरात आढळणाऱ्या प्रचंड शिळांना बोलके महान भारतीय कलावंतांनी बोलके केले आहे. विजयनगरचे साम्राज्य कला, संस्कृती आणि एकंदर जीवनातील सुंदरता आणि उदात्त मूल्यांबाबत कसे जागरुक होते याचा प्रत्यय अशा शिल्पांमधून येत राहतो. प्रत्येक भिंत, प्रत्येक कोपरा शिल्पकलेच्या आविष्काराने नटला आहे. कुठे नृत्य, वादन करणारे कलाकार आहेत, तर कुठे रामायण आणि महाभारताची शिल्पे आहेत. संगीतखांब असलेल्या सभागृहाच्या बाहेरच्या भिंतीवर विजयनगर साम्राज्यात व्यापारासाठी येणाऱ्या विविध व्यापाऱ्यांची छोटी शिल्पे तयार करण्यात आली आहेत. या लहानखुऱ्या मूर्तींच्या चेहऱ्यावरून तो व्यापारी चिनी आहे की पर्शियन आहे हे सहज ओळखू यावे, इतक्या खुबीने त्या घडविण्यात आल्या आहेत.

विजय-विठ्ठल मंदिर समजून घ्यायचे असेल तर किमान काही तास लागतात. पण, हे समजून घेणे काही दिवसांपर्यंतही सुरू राहू शकते. मंदिराचा प्रचंड मोठा परिसर बघून आपण बाहेर पडत असतो, तेव्हा त्या शिळांमधील सौंदर्याची छाप आपल्या मनावर कायमची पडली असती. विजयनगरच्या या ठेव्याशी आपण कायमचे जोडले गेलो असतो.

महानवमी डिब्बा

विजयनगरचे साम्राज्य हे दक्षिण भारतातील सामर्थ्यशाली आणि श्रीमंत साम्राज्य होते. हंपीच्या उत्खननात बाहेर आलेल्या अनेक महाप्रचंड वास्तू आपल्याला त्या साम्राज्याच्या वैभवशाली काळाची आठवण करून देतात. तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेल्या या शहराच्या भव्यतेची जाणिव करून देणारे अवशेष जिथे आपल्याला बघायला मिळतात, अशी एक वास्तू म्हणजे महानवमी डिब्बा. भल्या विस्तीर्ण जागेवर उभी असलेली ही वास्तू म्हणजे एका अर्थाने राजदरबारच आहे. महानवमी किंवा दसर्‍याचा उत्सव या ठिकाणी साजरा होत असे. आजच्या काळातील एखादी १०० घरांची कॉलनी सामावली जावी इतका मोठा हा सगळा परिसर आहे.

आयताकृती परिसराच्या एका बाजूला मध्यभागी प्रचंड उंच आणि मोठा मंच उभारण्यात आला आहे. विजयनगरचे राजे या उंच ठिकाणी बसून विजयादशमीचा उत्सव बघत असत. फारसी राजदूत अब्दुर रज्जाक आणि पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पेस यांच्या लेखनात या विशाल मंचाचे उल्लेख आहेत. या बांधकामात एकावर एक तीन थर असून बाजूच्या भिंतीवर शिल्पकाम करण्यात आले आहे. या शिल्पांमधून विजयनगर साम्राज्यातील सांस्कृतिक वैभव आणि समृद्ध जीवनशैलीचे दर्शन घडविले गेले आहे. परदेशातून येणारे व्यापारी आणि राजदूतांची शिल्पेही येथे दिसून येतात. अशा सगळ्या परदेशी लोकांना राजे येथेच भेटत असावेत असा अंदाज बांधता येऊ शकते. मुख्य मंचापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर एक दुसरा मोठा मंच आहे. तेथे राज्याबाहेरून येणारे कलावंत आपल्या कला सादर करीत आणि राजपरिवार त्या मुख्य मंचावरून बघत असे.

राज्यातील मुत्सद्दी आणि हेर यांना गुप्त चर्चा करण्यासाठी तळघरात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या बंदिस्त जागेत हवा खेळती राहावी आणि कक्ष थंड राहावा याचा विचार करून रचना केलेली दिसून येते. हा कक्षदेखील मंदिराच्याच स्वरुपात बांधण्यात आला आहे. मंदिर वास्तुरचनेचा हा आणखी एक उपयोग. शिवाय, उत्तम दगडी बांधकाम केलेली पुष्करणीही याच परिसराचा भाग आहे. आज पडझड झालेले आणि बहामनी सुलतानांनी उध्वस्त केलेले अवशेषही येथे दिसून येतात. राजाला गुप्त संदेश देण्यासाठी केलेली दगडी हत्तींची रचना ही ध्वनी आणि भौतिकशास्त्राचे तत्कालिन भारतीय़ांचे ज्ञान सिद्ध करणारी आहे.

विजयनगर साम्राज्यातील दसरा उत्सव हा महत्वाचा उत्सव होता. या साम्राज्याचे पतन झाल्यानंतर म्हैसूरच्या वडियार घराण्याच्या दसरा उत्सवाने ती जागा घेतली, असे सांगितले जाते. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत दसर्‍यासारखा उत्सव सगळीकडेच साजरा केला जात असे, हे या देशाचे सांस्कृतिक आणि अगदी राजकीयही एकजिनसीपण काही प्रमाणात सिद्ध करणारे आहे. आसेतूहिमाचल आढळणार्‍या रामासारखे. आणि विजयनगराचा तर प्रभू श्रीरामाशी जवळचा संबंध आहेच.

किष्किंधेच्या मनात राम…! 

भारतात कुठेही जा, राम आणि सीता यांचा संदर्भ असलेले काही ना काही मिळूनच जाते. राम या देशाच्या तनामनात वसलेला आहेच. आणि हंपीचा तर रामाशी जीवाभावाचा संबंध आहे. सध्याचे हंपी, मध्ययुगातील विजयनगर आणि रामायणातील किष्किंधा हे सगळे एकच. हीच ती किष्किंधा, वाली आणि सुग्रीवाची. येथेच रामाला परमभक्त हनुमान भेटला. येथूनच सुरु झाली वानरसैन्याची जुळवाजुळव. हीच ती जागा जेथे शबरीची बोरे रामाने खाल्ली. हीच ती किष्किंधा. वाल्मिकी रामायणामध्ये किष्किंधा नगरीत आढळणार्‍या विविध फुलझाडे आणि वनस्पतींचा उल्लेख आहे. आधुनिक काळात हंपीमध्ये याबाबतचा अभ्यास झाला आणि त्या वनस्पती आजही हंपी परिसरात आढळून येत असल्याचे अभ्यासकांना आढळले आहे. त्यामुळे, हीच ती किष्किंधा या निष्कर्षाप्रत अभ्यासक आले आहेत.

भल्या सकाळी, उजाडायच्या आधी आम्ही बाहेर पडलो, कारण आम्हाला सूर्योदय गाठायचा होता. तॊ ही अंजनेय पर्वतावरून. हेच ते महाबली हनुमानाचे ठिकाण. येथूनच तो लालकेशरी सूर्यबिंबाकडे झेपावला होता. त्या हनुमान जन्मस्थलावरून आम्हाला सूर्य़ोदय बघायचा होता. आमचा रिक्षावाला अनिलकुमारच्या मार्गदर्शनात आम्ही अंधारात अंजनेय पर्वताकडे निघालॊ. अनिलकुमारमध्ये दाक्षिणात्य चित्रपटात दिसणारे कित्येक गुण होते. तो रिक्षाही अशाच खास स्टाइलमध्ये चालवायचा. आता अंजनेय पर्वताकडे झेपावताना त्याच्यात मारुतीचेच गुण आले होते. अशा भन्नाट वेगात अंजनेयाच्या पायथ्याशी पोहोचलो, मारुतीचे नाव घेतले आणि पर्वत चढायला सुरुवात केली. साधारण अर्ध्या तासात माथ्यावर पोहोचलॊ. सूर्योदयाला काही मिनिटे उरली होती. तरुण मुलांचा एक गट आमच्या आधी येऊन पोहोचला होता. अंजनेयावरून समोरची पूर्व-पश्चिम वाहणारी लांबलचक तुंगभद्रा दिसत होती आणि तिच्या पार क्षितिजावर होणार होता सूर्योदय. संपूर्ण हंपीचा आसमंत आम्ही डोळ्यात साठवून घेत होता. आमच्यातील एकमेव ट्रेकर अभिषेक टेकडीच्या टोकाशी असलेल्या खडकावर जाऊन बसला होता. टेकडी चढून लागलेली धाप कमी होईपर्यंत पहिली सूर्यकिरणे आकाशात झेपावू लागली. सगळ्यांचे लक्ष सूर्योदयाकडे लागले होते. अर्थातच या सूर्योदयाला हनुमंताचा संदर्भ होता. अवघ्या काही मिनिटात केशरी सूर्यबिंब हळूहळू वर येऊ लागले. अंजनेय पर्वतावर सूर्योदय झाला. आणि पहिल्या किरणांबरोबरच अवतीभवती लहान-मोठी कितीतरी माकडे जमा झाली. हनुमंताचे दूत.

सूर्योदय आणि तेव्हाचे प्रसन्न वातावरण मनात साठवून आणि हनुमानाचे दर्शन घेऊन खाली आलॊ.  मग सुरू झाली किष्किंधेची सफर. शबरीची गुहा आणि रामाचे वानर सेनेसह चर्चा करण्याचे ठिकाण असलेली गुहा बघून झाला. सुग्रीव आणि वालीचे युद्ध झाले ती ही जागा येथे दाखवली जाते. तुंगभद्रेच्या एका बाजूला विजयनगरचे साम्राज्य आहे आणि दुसर्‍या बाजूला हे सुग्रीवाचे राज्य. पंपा सरोवराचे दर्शन घेतले.

पौराणिक राम मग मध्ययुगातही जपला गेला. विजयनगर साम्राज्यातील राजांनी तो ठिकठिकाणी सांभाळून ठेवला. पण, यातही लक्षणीय़ आहे ते हजारी राम मंदिर. खास हंपी शैलीत बांधलेल्या या मंदिरात संपूर्ण रामायण दगडांवर कोरलेले आहे. कलाकुसर केलेल्या खांबांनी तोलून धरलेला सभामंडप आणि इमारतीच्या बाह्य भागावर रामायणातील कथा सांगणारी शिल्पे. किती शिल्पे? तर तब्बल एक हजार. त्यापैकी अनेक अजूनही टिकून आहेत. उत्तरेचा राम दक्षिणेने जपल्याचे आणि भारताच्या या सांस्कृतिक एकसंधतेचा दाखला देत हे हजारी राम मंदिर आजही उभे आहे.

शेवट विरुपाक्षाच्या दाराशी

हंपीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. बहामनी सुलतानांनी खुनशीपणे येथील स्थापत्यशास्त्रीय वैभव नष्ट केले. त्यानंतर, १९८९ च्या दरम्यान येथे उत्खनन झाले आणि अनेक रचना किंवा मंदिरे उजेडात आली. मात्र, या सर्व काळात एक मंदिर विजयनगरात टिकाव धरून होते, आणि ते म्हणजे विरुपाक्ष मंदिर. सातव्या शतकापासून या जागेचे संदर्भ आढळतात. नवव्या किंवा दहाव्या शतकातील शिलालेखही आढळले आहेत. तेव्हापासून आजतागायत या मंदिरात अव्याहतपणे पूजा-अर्चा सुरू आहे. येथे पूजला जाणारा विरुपाक्ष म्हणजे शिवाचेच एक रुप. आधी अगदी लहान स्वरुपात असलेल्या या मंदिराला भव्य रुप प्राप्त झाले ते वैभवशाली विजयनगर साम्राज्याच्या काळात. देव राया दोन च्या काळात लक्कन दंडेशाने या मंदिराचे बांधकाम केले असे सांगितले जाते. एखाद्या विजयानंतर आणि सीमा विस्तारल्यानंतर त्याची खूण म्हणून त्या त्या भागात मंदिरे बांधण्याची प्रथा होती. तो ही संदर्भ येथे सांगितला जातो. राजा कृष्णदेवरायाच्या काळातही या मंदिराच्या वैभवात भर पडली. याशिवाय, चालुक्य आणि होयसला साम्राज्यांनीही या मंदिरात बांधकाम केले होते.

विरुपाक्ष मंदिराच्या आतील भागात, रंग मंडपाच्या छतावर शिव-पार्वतीचा विवाह, शिवाशी संबंधित कथा आणि रामायण व महाभारतातील कथा यांवर आधारित चित्रे रेखाटण्यात आली आहेत. विजयनगर साम्राज्य वैभवाच्या कळसावर असताना सुमारे ५०० वर्षांपूर्वी ही चित्रे रेखाटली गेली आहेत. शैव आणि वैष्णव परंपरांमधील वाद अधोरेखित करून दाखविण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मात्र, हे दोन्ही संप्रदाय एकत्रितपणे नांदण्याचे उदाहरणही ही चित्रे दर्शवितात. बाहेरच्या भागात कृष्णदेवरायाने लावलेला शिलालेख आहे.

मंदिराच्या प्रवेशालाच ५० मीटर उंचीचे आणि नऊ मजली असे त्रिकॊणी आकारातील प्रचंड गोपुर आहे. मंदिराच्या अगदी आतील भागातील एका झरोक्यातील या गोपुराची सावली एका भिंतीवर पडते. ती उलट्या त्रिकोणाच्या रुपात. सूर्य कुठेही असला तरी ही सावली कायम राहते. मात्र, सकाळी ही सावली काळी असते, दुपारी अर्धसोनेरी होते आणि सायंकाळच्या सुमारास भिंतीवरील उमटणारा उलटा त्रिकोण संपूर्णपणे सोनेरी रंगाचा होतो. भौतिकशास्त्राचे हे विलोभनीय रुप विरुपाक्ष मंदिरात अनुभवायला मिळते. एकीकडे वैराग्याचे प्रतिक असलेल्या शिवाची आराधना करणार्‍या या मंदिराच्या भिंतींवर खजुराहॊसारखी शिल्पेही आढळून येतात.

_autotone

या मंदिराच्या बाहेर प्रचंड मोठा बाजार होता. देश विदेशातून अनेक व्यापारी या ठिकाणी व्यापार करायला येत. सोने-हिर्‍यांपासून ते इतर सर्व गोष्टी या बाजारात उपलब्ध असत. प्रत्येक मोठ्या मंदिराच्या बाहेर असा मोठा बाजार हे संपूर्ण विजयनगरचेच वैशिष्ट्य आहे. एका बाजूला तुंगभद्रा, दुसर्‍या बाजूला मोठा पहाड, त्यावरील प्रचंड आकाराच्या शिळा, असंख्य मंदिरे असा हा सगळा भव्य परिसर आहे.या मंदिर परिसराच्या आत पूर्वी लोक राहत असत. पुरातत्त्व खात्याने परिसर ताब्यात घेतल्यानंतर या लोकांना नवीन हंपी परिसरात जागा देण्यात आली आहे. मंदिर आजही उत्तम स्थितीत आहे. हजारो विदेशी पर्यटक येथे भेट देतात आणि स्वाभाविकपणे आपल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे आपलाच इतिहास समजून घेतात. विजय विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेली आमची हंपीची सफर विरुपाक्ष मंदिरापाशी येऊन संपली. या दोन मंदिराच्या प्रवासादरम्यान आपल्या संस्कृतीचा अभिमान पटीपटीने वृद्धिंगत करणारे हंपीचे वैभव आमच्या समोर उलगडत गेले होते. तीन दिवस अपुरे आहेत याची रुखरुख लावणारी पण तरीही खूप चांगले काहीतरी बघितल्याची जाणिव करून देणारी सहल संपली होती.

(लेखक ‘महाराष्ट्र टाइम्स च्या नागपूर आवृत्तीत खास प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत)

77750 95986

 

Previous articleसंशोधन व योगायोगाच्या कक्षेत तळपणारे दोन विज्ञान सूर्य
Next articleचाकोल्या…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.