सोमेश्वर पुसतकर या माणसाला मी कधीही हताश , हतबल , हरलेल्या अवस्थेत पाहिले नाही. प्रसंग, परिस्थिती कितीही बिकट असो , त्यातून हिकमतीने, कौशल्याने अतिशय शांत डोक्याने मार्ग काढणारा आणि हाती घेतलेले काम कोणत्याही परिस्थितीत तडीस नेणारा सोमेश्वर आम्हा मित्रांना परिचित आहे . हा सोमेश्वर कुठलीही भनक न लागू देता एकाएकी जगाचा निरोप घेतो हे अगम्य, अतर्क्य, अविश्वसनीय आहे.
सायंकाळी ६.५९ ला ‘फ्रेंड्स’ या आमच्या केवळ सहा जणांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्याचा मेसेज येतो. नेहमीप्रमाणे खळखळून हसायला लावणारा ‘जोक’ त्या मेसेजमध्ये असतो. त्यानंतर अडीच तासात सोमेश्वर या जगात नाही , असा फोन येतो. विश्वास ठेवायचा तरी कसा? तो गेला… हे मानायला मन आणि मेंदू तयारच नाही. ‘टेन्शन घेवू नका ना भाऊ . मी सगळं व्यवस्थित करतो’ , असे नेहमीच्या दिलखुलास शैलीत सांगत आत्मविश्वासाने रसरसलेला सोमेश्वर कोणत्याही क्षणी समोर उभा ठाकेल , असेच वाटत आहे .
माणसाला मृत्यूची चाहूल लागत असावी काय? मृत्यू दार ठोठावत आहे , हे आतल्या आत जाणवत असावं काय ? माहीत नाही . मात्र कधीही हतोत्साहित न होणारा सोमेश्वर अलीकडच्या दीड –दोन महिन्यात निरवानिरवीची भाषा बोलायला लागला होता .
कोरोनामुळे दोन महिने घरात कोंडून घेतल्यानंतर जूनच्या प्रारंभी त्यानेच पुढाकार घेऊन आपण आता बाहेर पडलं पाहिजे, भेटलं पाहिजे, फिरलं पाहिजे म्हणत मी, बंडूभाऊ खोरगडे , अविनाश असनारे, विजय हरवानी या जुन्या मित्रांना एकत्रित केले. त्यानंतर दर दोन -चार दिवसाआड खोरगडे वकील साहेबांच्या फार्मवर सायंकाळी आमची मैफिल जमायला लागली. आधी हायवेवर फेरफटका मारायचा. नंतर घरून आणलेल्या डब्यांवर ताव मारायचा . विविध विषयांवर गप्पा- हास्यविनोद, नागपूरला असलेला आमचा मित्र रघुनाथ पांडेसोबत व्हिडीओ कॉलवर चकल्लस, कोरोना आटोपला की फिरायला कुठे-कुठे जायचे याचे प्लानिंग , असा आमचा मस्त दिनक्रम होता .
मे महिन्यात कोरोनामुळे देशभरातील मजुरांचे स्थलांतर सुरु होते तेव्हा नागपूर मार्गावर ‘वऱ्हाड’ आणि आणखी काही संस्था सेवाभावाने मजुरांच्या भोजनाची मोफत व्यवस्था करत होत्या . एकदिवस तो आम्हाला तिथे घेऊन गेला. ‘ही माणसं खूप महत्वाचं काम करत आहे . अविनाशभाऊ, तुमच्या कॉलममध्ये यांच्याबद्दल लिहा’, असे त्याने सांगितले . त्या दिवशी खिशात जेवढे पैसे होते ते सगळे पैसे त्याने ‘वऱ्हाड’ च्या पदाधिकाऱ्यांना दिले .
हे सगळं सुरु असतांना ‘मला अलीकडे खूप डिप्रेस वाटत आहे. पहाटे ४-५ वाजेपर्यंत झोप येत नाही . पोरं खूप लहान आहेत. त्यांची चिंता वाटते’, असे अधेमध्ये तो बोलायचा . बंडूभाऊ, रघु, मी आमच्यापरीने त्याला समजवायचो . नियमित शारीरिक व्यायाम कर . प्राणायाम कर . मेडीटेशन कर, असे सांगायचो. मी त्याला श्याम मानवांच्या स्व- संमोहन प्रक्रियेचे ऑडीओही दिले.
बांधकाम व्यवसायात उतरल्यानंतर तो काहीसा ताणात असायचा. पण कोरोना काळात इतर समव्यावसायिकांपेक्षा माझं चांगलं चाललं, असेही सांगायचा. आणि शेवटी सोमेश्वरला समजविणार तरी काय? मनाने तो मजबूत होता . आयुष्यात वाईट दिवस त्याने पाहिले होते . ३०० रुपयांच्या नोकरीपासून सुरूवात करून परिस्थितीसोबत संघर्ष करत , झगडत त्याने लौकिक यश मिळविले होते.
आज तो यशस्वी , प्रभावी माणूस म्हणून ओळखला जात असला तरी संघर्षाचे दिवस तो कधीच विसरला नाही. त्यामुळे कोणी अडचणीत दिसला को तो लगेच त्याला मदत करायचा . कोरोना काळात काही पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या . मी त्याला त्याबद्दल सांगितले . तो म्हणाला , ‘आपण प्रत्येकाला कुठे ना कुठे नोकरी देण्याचा प्रयत्न करू . तोपर्यंत काय मदत लागते सांगा . त्याने स्वतः काही पत्रकारांना फोन करून अजिबात काळजी करू नका, असा दिलासा दिला.
सोमेश्वर हा म्हणायला व्यावसायिक , राजकारणी होता. पण त्याच्यातील ‘माणूसपण’अतिशय लोभस होतं. त्याच्यातील या गुणांमुळेच महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील लहानथोर माणसं त्याच्या प्रेमात होती.
माझं त्याचं मैत्र १५ वर्षाचं. २००५ ला ‘लोकमत’ जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी यवतमाळहून बदलीवर अमरावतीत आलो . येथे आलो तेव्हा अमरावतीतील केवळ दोन – चार माणसं परिचयाचे होते . त्यात हा होता . काम सुरु केल्यानंतर अमरावती आणि येथील माणसं जसजशे कळायला लागले तेव्हा कुठल्याही अडचणीच्या प्रसंगात धावून येणे , मदतीला तत्पर असणे हे त्याचे वैशिट्य मनात ठसले. हा इतरांपेक्षा वेगळा आहे, हे लवकरच लक्षात आले. काही दिवसातच आम्ही उत्तम मित्र झालो . त्यावेळी तो शिवसेनेचा महत्त्वाचा पदाधिकारी होता. तेव्हा मी ‘लोकमत’ मध्ये दर आठवड्याला राजकारण्यांची माप काढत असे .अनेकदा शिवसेना व सोमेश्वर विरोधातही बोचरं लिहित असे . पण त्याचा आमच्या मैत्रीवर कधी परिणाम झाला नाही .
तो माझ्या पत्रकारितेत कधी दखल द्यायचा नाही . मी राजकारणात त्याला कधी सल्ला दिला नाही . एकमेकांच्या कामात हस्तक्षेप नाही, ही आमच्या घट्ट मैत्रीतील चर्चा न करता ठरलेली अलिखित अट होती. त्यामुळेच आम्ही जवळ आलो . खाणे , भटकणे आणि गप्पा हा आमच्या दोघांच्याही आवडीचा विषय .
२००८-०९ मध्ये सोमेश्वर, रघु, बंडूभाऊ खोरगडे , वैभव दलाल,अविनाश असनारे व आणखी काही मित्रमंडळी एक वर्ष सिक्कीम-दार्जीलिंग, दुसऱ्या वर्षी हिमाचल प्रदेशाच्या दुर्गम भागात फिरून आलो . या सहलींमध्ये सोमेश्वरचे ठिकठिकाणी असलेले संबंध आणि नियोजन लक्षात यायचे . कोणत्याच प्रसंगात तो हायपर व्हायचा नाही . एक प्रसंग तर आठवणीत राहणारा आहे. २००९ ला सिक्कीमहून ज्या दिवशी आम्हाला परत यायचं होतं. त्याच्या अगोदरच्या सायंकाळी अचानक गोरखा मुक्ती मोर्चाने रस्ता रोको आंदोलन छेडलं. त्यांची आंदोलनं तेव्हा कमालीची हिंसक असतं. बागडोगराहून आमचं परतीचे विमान सकाळी ११ ला होतो . गंगटोक ते बागडोगरा अंतर चार तासांचे होते . हॉटेल मालक आम्हाला म्हणाला , ‘आंदोलनकर्त्यांनी तुम्हाला अडविले तर तुम्ही विमानतळावर पोहोचणे केवळ अशक्य आहे’ . बागडोगराला वेळेत पोहचलो नाही तर विमान तिकिटाचा खर्च आणि कोलकात्याहून पुढचा सगळा प्रवासच गोत्यात येणार होता.
आम्ही सारे अस्वस्थ झालो . हा मात्र शांत. तो म्हणाला, ‘तुम्ही शांत झोपा . मी बघतो’ . हा बाहेर पडला . काय करामत केली माहीत नाही . दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही बागडोगराकडे निघालो तेव्हा एक लष्करी गाडी आम्हाला एस्कार्ट करत होती . त्या गाडीने थेट आम्हाला विमानतळावर आणून सोडले. अशा करामती सोमेश्वरसाठी सामान्य होत्या . पुढे कित्येकदा त्याची प्रचीती आली .
मी माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत अनेक प्रभावी माणसं फार जवळून पाहिलीत. पण सोमेश्वरएवढा उत्कृष्ट आयोजक , संघटक पाहिला नाही . ‘नाही’ हा शब्दच त्याच्या शब्दकोशात नव्हता . कुठलीही अडचण तो सहज सोडवत असे. खरं तर शिवसेनचा जिल्हा प्रमुख या पदापलीकडे त्याची मजल कधी गेली नाही . पण कुठलाही आमदार , मंत्र्यापेक्षा तो अधिक प्रभावी होता . मी शिवसेना व इतर पक्षांचे अनेक नेते, मंत्री, आमदार पाहिलेत जे वैयक्तिक कामासाठी सोमेश्वरला साकडं घालत असे . केवळ राजकारण नाही तर समाजकारण , सांस्कृतिक , साहित्य , क्रीडा , शिक्षण अशा विविध क्षेत्रात त्याचे व्यापक संबंध होते . प्रभाकरराव वैद्य , बी . टी. देशमुख , गिरीश गांधी, किशोर देशपांडे अशा बाप माणसांनाही सोमेश्वरचा आधार वाटत असे. ही व या प्रकारची माणसं समाजाची बहुमोल ठेव आहे त्यांना जपलं पाहिजे . त्यांना हरेक प्रकारे मदत केली पाहिजे , ही त्याची भावना होती.
मोठ्यांप्रती कृतज्ञ भाव हा त्याच्या व्यक्तिमत्वात ठासून भरला होता. सुरेश भटांच्या स्मृतीदिनी दरवर्षी तो स्वतःला खार लावून कार्यक्रम करत असे. त्यानिमित्ताने अनेक मोठे कलावंत त्याने अमरावतीत आणले. . सांस्कृतिक व उत्सवी कार्यक्रमासोबतच अमरावतीत सोमेश्वरने किती विधायक काम केलीत याची गणतीच नाही. त्याने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. अशाच प्रकारे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्याने भरभरून मदत केली . प्रत्येक दिवाळी, दसऱ्याला शेतकरी कुटुंबांना व अमरावतीनजीकच्या वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना नवीन कपडे , मिठाई, फराळाचे पदार्थ तो पोहचवत असे. शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी गरजू मुलांची फी भरणे, त्यांना पुस्तकं व इतर शैक्षणिक साहित्य पुरविणे हा त्याच्या नियमित कामाचा भाग होता . असे खूप काही तो करत असे . पण मदत करताना या हाताची त्या हाताला खबर लागणार नाही याकडे त्याचा कटाक्ष असायचा. जिल्हा बँकेचा प्रशासक असतांना त्याने अनेक मुलांना एक पैसा न घेता नोकरीला लावले . आपल्या संबंधातून खासगी नोकरी लावून दिलेल्यांची संख्याही मोठी आहे .
गेल्या १५-२० वर्षात अमरावतीत जी काही भव्य –दिव्य आयोजन झालीत त्यात सोमेश्वरचा सिंहाचा वाटा आहे. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्यानंतरचा राज्यातील पहिल्या भव्य सत्कार समारंभाची आखणी सोमेश्वरनेच केली होती. असे अनेक कार्यक्रम आहेत . आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाला महाराष्ट्रभर ख्याती मिळवून देण्यात त्याच्या कल्पकतेचा मोठा वाटा होता . एकापेक्षा एक कलात्मक, देखणे देखावे आणि सोबतीला राज्यातील नामवंत कलावंत, साहित्यिकांच्या कार्यक्रमाची अमरावतीकरांना मेजवानी असे.गणेशोत्सवाचे दहा दिवस सोमेश्वरचा उत्साह पाहण्याजोगा असायचा.
सोमेश्वरच्या या गुणांचा, ताकतीचा दुर्दैवाने त्याच्या पक्षाने शिवसेनेने योग्य वापर करून घेतला नाही . पक्षाने सोमेश्वरला ताकत दिली असती तर विदर्भात आज शिवसेनेचे भक्कम संघटन उभे दिसले असते. उद्धव ठाकरेंपासून शिवसेनचे सारे मोठे नेते त्याला वैयक्तिक ओळखत . पक्ष अडचणीत असला की ते त्याच्याशी सल्ला मसलतही करत. प्रसंगी अनेक अडचणीची कामेही त्याच्याकडून करून घेत . पण त्याला राजकीय ताकत देण्याचा विचार कधी पक्षाने केला नाही. पण तरीही सोमेश्वरची शिवसेनेवर अव्यभिचारी निष्ठा होती. आपल्याला ओळख शिवसेनेने दिली आहे . त्यामुळे आपण काम करत राहायचं , आपली रेष मोठी करत राहायची, हे तो सांगायचा.
नंतरच्या काळात त्याने तसेच केले . सामाजिक व्यापक प्रश्न हाती घेतले. आणि पक्षाच्या पलीकडे आपली ओळख निर्माण केली . २००९ मध्ये अमरावतीत इंडिया बुलचा औष्णिक प्रकल्प आला . त्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी देण्यात आले . त्याविरोधात बी . टी . देशमुख , प्रभाकरराव वैद्य यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याने लढाई लढली. विदर्भाच्या अनुशेषाचा प्रश्नाचाही त्याने उत्तम अभ्यास केला . अलीकडच्या काही वर्षात विविध व्यासपीठांवर त्याने ताकतीने हा विषय लावून धरला . विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असतांना विद्यार्थी हिताचे अनेक निर्णय त्याने करवून घेतले.
काय आणि किती सांगावं… मदत करताना आपलं-परकं असा भाव त्याच्या मनात कधीच नसे . वेगवेगळे राजकीय पक्ष , विविध सामजिक संघटना , त्यांचे पदाधिकारी , कार्यकर्त्यांना तो हरेक प्रकारे मदत करत असे. ‘हे आमच्या बुधवाऱ्याचे संस्कार आहेत . मागील पिढीत अशी खूप माणसं होती . त्यांच्या तुलनेत मी कुठेच नाही’, हे तो प्रत्येक वेळी नम्रपणाने सांगत असे . त्याच्या मनात कोणाहीबद्दल कटुता , आकस कधीच नसे . कोणाबद्दल वाईट बोलताना मी त्याला पाहिले नाही. गॉसिपिंगचा त्याला तिटकाराच होता .
सोमेश्वरच्या आठवणी सरता सरत नाही . तो ‘यारो का यार’ होता. कमालीचा दिलदार होता. आनंदी होता . खुशमिसाज होता. अतिशय उमदा होता. चांगुलपणाची , चांगल्या माणसांची , चांगल्या कामाची त्याला कमालीची ओढ होती.
त्याचं हे असं आकस्मिक जाणे हे कमालीचं धक्कादायक आहे. वेदना देणारं आहे. चटका लावणारं आहे. मरणानंतर माणसाचं काय होते माहीत नाही . पण मला खात्री आहे, हा जिथे कुठे गेला असेल तिथे तो इथल्यासारखीच आबाद दुनिया वसवेल . सोमेश्वर यार , तुम बहोत याद आओगे !
लेखातील रेखाटने -सुनील देशमुख -9422890524
(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)
भावपूर्ण श्रद्धांजली 💐