तब्बू. एवढा एकच शब्द लिहून पूर्णविराम द्यावा. त्या नावाच्या मागे किंवा पुढे काहीही लिहू नये. शब्दांच्या, भाषेच्या मर्यादेची जाणीव नव्याने होत राहाणार. अर्थात त्याची आता सवय झाली आहे. एखाद्या प्राचीन अद्वितीय शिल्पाच्या बाजूला त्याचं कौतुक करणारा शिलालेख लिहिण्याचा अरसिकपणा कुणी करू नये. मी हा फाटका पताका लावून वेगळं काय करणार? मात्र, तिच्याबद्दल असणार्या आकर्षणाचा अदमास घेत राहाणे, हा माझ्यासाठी अखंड अस्वस्थता शमवण्याचा तात्पुरता उपाय आहे. निरर्थक, तरीही तितकाच गरजेचा. माझं बोलणं होताच वेताळ पुनः खांद्यावरून उडून जाईल अन् वडाच्या पारंबीला जाऊन लटकणार आहे. मी पुन्हा ते प्रेत उचलणार, पाठीवर घेणार आणि स्मशानाकडे चालू लागणार. याला आता शेवट नाहीये, असं तुम्ही म्हणाल. पण, वेताळ आणि तब्बूच्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणूया, माझा ‘केओस थियरी’ मधल्या ‘बटरफ्लाय इफेक्ट’वर विश्वास आहे. जगाच्या एका कोपर्यात एखाद्या फुलपाखराने पंख झटकल्यामुळे पृथ्वीच्या दुसर्या टोकावर प्रलय येऊ शकतो, यावर माझा विश्वास आहे. माझं लिखाण हे काही पंख फडकवणं नाहीये. पण, माझ्या कुठल्यातरी सूक्ष्म कृतीचा अनुनाद एक दिवस तुझ्यापर्यंत पोचेल अन् भविष्यात का असेना, तुझ्या पायाला माझी लाट स्पर्श करेल, याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे. त्या दिवशी तुलाही कळेल, समुद्राचं आणि डोळ्यातलं पाणी खारट असतं, हा योगायोग नाहीये.
किती सार्या गोष्टी सांगायच्या आहेत. की सांगूच नये कुणाला? ‘सिटीजन केन’ मध्ये ‘चार्ल्स फॉस्टर केन’ मरताना एक शब्द उच्चारतो, ‘रोजबड’. केवढी गुपितं असतात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात. पुढचा पूर्ण सिनेमा म्हणजे त्या ‘रोजबड’ शब्दाची उकल आणि त्या प्रवासात गवसलेलं बरंच काही. प्रत्येक व्यक्तीच्या पश्चात असला शोध घेतला जात नाही. कुणालाही सुगावा लागणार नाही, अशा कित्येक खुणा, अवशेष कोण कुठे मागे सोडणार, हे ज्याचं त्यालाच माहीत. आता हेच बघा ना, तब्बू प्रत्यक्षात जवळ नाहीये म्हणून तिच्या नावाचं एक रोपटं मी एके ठिकाणी लावलंय. त्याला खत म्हणून पोस्टकार्ड साईजचा तिचाच फोटो मातीत पुरून ठेवला आहे. त्या पोस्टकार्डच्या मागे काहीतरी खरडलेलं. माझ्या या हक्काच्या तब्बूचे अक्षांश रेखांश फक्त मलाच माहीत. इथेच माझ्या बाजूला असलेल्या हजारो पुस्तकात तिला लिहिलेलं पत्र मी कुठल्यातरी पुस्तकात मूळ पानांच्या बरोबरीने सुम्ममध्ये बाइंडिंग करून ठेवलं आहे. शोधूनही कुणाला सापडणार नाहीये! या घराचा पाया खणताना-बांधताना वास्तुपुरुषाऐवजी तुझी प्रतिमा पुरून ठेवलीये. अजूनही बरंच कायकाय आहे. पण, माझा एक मित्र म्हणतो, ‘सगळीच गाणी गाऊ नये, सगळ्याच गोष्टी सांगू नये.’ माझा ‘रोजबड’ कुणालाही कळणार नाहीये. माझी अनुभूती मी समोरच्याला समजावून सांगू शकत नाही, ही माझी मर्यादा; आणि समजावून सांगणं यावर देखील माझा विश्वास नाही. विश्वास असेल, तर फक्त एकाच गोष्टीवर – बटरफ्लाय इफेक्ट. तुझ्या पायाला इथलं खारट पाणी लागणार आहे राणी. आहेस ना तयार?
रात्रीचे 12 वाजलेत आणि बाहेर पाऊस दारू पिऊन झिंगणार्या माणसासारखा अस्ताव्यस्त होऊन कोसळतोय. कुठे मुक्तपणे कोसळावं, कधी हातच राखून रिपरिप करावी, यातलं त्याला काहीही कळत नसावं. दरवर्षीप्रमाणे गोदावरीला पूर आलाय. देहभर सोन्याचं पाणी घेऊन जाणार्या गोदामाईला बघणे, हा सोहळा असतो. तुझ्या आगामी सिनेमाची झलक आजच प्रदर्शित झाली. – खुफ़ियाँ – ‘तुझा देह त्यात दिसत नाहीये. फक्त आवाज ऐकू येतोय. ओलसर आवाज. स्त्रीला दिलेली नदीची उपमा, ही घासून गुळगुळीत झालेली संज्ञा आहे. मात्र, तुला नदीचं कुठलं रूप बहाल करावं, हा माझ्यासाठी प्रश्न नाहीये. पूर आल्यावर सोन्याचं पाणी घेऊन उसळणारी गोदावरी आणि तब्बू सारखीच. लज्जा, तटस्थता, पुस्तकी शिष्टाचार दूर सारून ‘तब्बू’नामक महाकाव्याचे पापुद्रे उलगडावे वाटतात. अर्थात, तू अजूनही एवढी गूढ आणि अनाकलनीय आहे की, ते करतानाही हाती काही लागतं ते अगदीच सापेक्ष आणि निरर्थक असतं. मी माझ्या बुद्धीप्रमाणे, कुवतीप्रमाणे मला तुझ्याबद्दल असलेल्या आकर्षणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते पूर्णतः वैयक्तिक असतं. स्वतःपुरतं. खोटं मात्र अजिबात नव्हे! तब्बू आवडणार्या दुसर्या व्यक्तीला वेगळंच काहीतरी हातात लागू शकते. त्याचा शोध त्याने घ्यावा… निरर्थक शोध. ‘आँखों देखी’ चे बाबूजी एका अवचित क्षणी ठरवतात की, ‘आजसे मेरा सच मेरे अनुभव का सच होगा.’ त्यांना कळू शकेल कदाचित. एरवी मी गोदामाईचा पूर आणि तब्बू याबद्दल कितीही जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी ते अंध व्यक्तीने कर्णबधीर माणसाला वेरूळच्या कैलास लेणीचं वर्णन करण्यासारखं आहे. गोदेचा पूर, वेरूळ आणि तब्बू समजून घेण्यासाठी मानवी इंद्रिये अपुरी आहेत!
तुझा देह, सौंदर्य, अभिनय आणि आपल्यातलं अनामिक नातं, याबद्दल माझ्या मनात रोज रात्री एक विचारचक्र सुरू असतं. रात्री बेडवर पडल्यापासून ते झोप लागेपर्यंतचा जो काळ असतो, त्यात फक्त आपण दोघेच असतो. थोड्याच वेळात सीलिंगवर स्वप्नांची मालिका सुरू होते. तेव्हा मी झोपेच्या किंबहुना तुझ्या अधीन झालेला असतो. ‘ल्युसिड ड्रीम’ म्हणजे अशी स्वप्ने ज्यात आपण स्वप्न पाहत असतो, ही जाणीव स्वतःला असते. स्वप्नात घडणार्या घटना आपल्याला नियंत्रित सुद्धा करता येतात. अशी स्वप्ने कमीअधिक प्रमाणात बहुतेक लोकांना पडतात. अशा स्वप्नांची सुद्धा एक खासियत अशी की, बर्याच प्रतिमांचा बिलकुल उलगडा लागत नाही. एकदम कसोशीने त्यात अॅक्टिव्ह असूनसुद्धा समोर दिसणार्या घटना अनाकलनीय असतात, तरी आपण प्रयत्न करणे सोडत नाही, हे विशेष! उलट स्वप्नातून परत जाग आल्यावर परत झोपून त्याच ठिकाणी जायला धडपडतो. ‘तब्बू’ माझ्यासाठी असंच एक स्वप्न आहे. बर्याच प्रतिमा गूढ.. मला तिच्याबद्दल असणार्या घनघोर आकर्षणाचा पाठपुरावा करताना हाती लागतं, तेही काहीतरी मोघम.. पण, प्रचंड आकर्षित करणार आहे. प्रत्येकाला या स्वप्नात काहीतरी वेगळं मिळेल. वेरूळच्या त्या गुहेत रात्रभर स्पर्शाने तुला चेतवत राहातो. तुला ढिम्म फरक पडत नाही. पाताळयंत्री बाई! निरागसतेला क्षणभंगुरतेचा शाप असू शकतो, तुला नाहीये. तू पक्की आतल्या गाठीची आहेस. मी शांत होतो आणि नव्या दुःखाला प्रशस्त जागा करून देतो. तुझ्या देहाचा कैफ काही केल्या उतरत नाही. माझे भग्न अवशेष मागे उरतात, ते सांगायत की, नदीने कसल्या लुसलुशीत निर्दयीपणे जीव घेतला असेल! किती रहस्यं असतात नाही नदीच्या पोटात? उसळलेली असताना तुझ्यात सुद्धा बालिश अल्लडपणा उरत नाही. एकाच वेळी अदबशीर आणि बेलगाम असणे, हे फक्त गोदावरीला आणि तुलाच जमू शकतं. पुराचं वर्णन करायचं, तर मला त्यात उडी मारल्याशिवाय पर्याय नाही. आनंदाच्या अत्युच्च क्षणी मृत्यूला कवटाळता येणं, मागे कुठलेही हवेहवेसे पाश न पाहाता – हे सुखाचं परमोच्च टोक. माझं हे नेहमी असं होतं. एखाद्या क्षणी मन इतकं भरून येतं की, तिथेच मरण काय चीज हे अनुभवावं वाटतं. म्हणजे, गोदेला पुर आलेला असताना वर पुलावर उभा असतो आणि तिथेच उडी टाकावी, असं वाटतं. हे ज्या दिवशी प्रत्यक्षात जमेल, तो माझ्या मुक्तीचा सोहळा. तोवर मी तुझ्या पुरात स्वतःला झोकून देत असतो. मी प्रयत्न करूनही तुझा आवेग नियंत्रित करू शकत नाही. तुझ्यात उडी मारल्यावर सर्व काही धूसर, फिकट होत जाते. वस्तुमान नष्ट होऊन एक गुरुत्वहीन बिंदू तुझ्या अंतराळात फिरत राहातो. गोदावरी आणि तू दोन्ही अनभिज्ञ की, कुणीतरी त्यांच्या देहात स्वतःला संपवून टाकलंय. तुझ्या पोस्टकार्ड फोटोत दिसणार्या दंडावर चावा घेऊन त्याचंच खत मी रोपट्याला दिलंय. याहून ऑर्गनिक जगात काही असतं का? इकडे पुरात गंगेवर दुतोंड्या मारुतीच्या गळ्याला पाणी लागलंय. कंठाशी प्राण येणं हेच असावं का? माझ्याही गळ्याशी प्राण आलेय. कारण, मी ते रोपटं मुद्दाम अशा ठिकाणी लावलंय की, ज्या दिवशी पुरात मारुतीच्या डोक्यावरून पाणी वाहणार, अगदी त्याच क्षणी तू सुद्धा पुरात विसर्जित होणार आणि मी प्रत्यक्ष गोदावरीत. तुझ्यात लुप्त होत स्वतःला संपवण्याची इच्छा आणि त्यानंतरचा विध्वंस यांच्यातील सीमारेषा त्यादिवशी नष्ट झालेली असेल!
मला अजूनही कळतंय, आपल्यातीत नात्याला नेमकं उलगडून दाखवण्यास मी असमर्थ आहे. आपल्या वयात काहीएक अंतर आहे, असं लोक म्हणतात. पण, माझं वय काहीही असो, मी जेव्हापासून तुला बघत आलोय, अगदी तेव्हापासूनच तू मला झपाटून टाकण्याइतकी जहर खूबसूरत होती. अभिनय, बुद्धी यासोबतच घनघोर शरीराचं आकर्षण असावं अशी तू एकमेव स्त्री होती; मी आजवर पाहिलेली दुसरी सर्वात सुंदर स्त्री! टीव्हीत बातम्या दाखवणारी स्त्री आपली आई असावी, हे वाटणारं माझं ते वय. ‘हैदर’ सिनेमात हैदर आणि गजालाच्या नात्याला ‘इडिपस कॉम्प्लेक्स’च्या छटा आहेत. एक प्रसंगात तिच्या मानेवर अत्तर लावून तिथे ओठ ठेवत तो म्हणतो, ‘जहर खूबसूरत है आप.’ कलेजा खल्लास! लहानपणी माझे आईवडील इतके मारायचे की, संशय यायचा की, खरोखर हेच माझे आईवडील आहेत का! पण, जेमतेम एक खोलीचं आमचं घर. मार खाल्ल्यावर किंवा त्या मारापासून वाचण्यासाठी घरात लपायला जागा नसे. माझ्या एका श्रीमंत मित्राच्या घरी – घर कसलं? त्यातल्या खोल्या मोजता येणार नाही एवढा मोठा वाडाच. त्यात स्वयंपाकघर आणि बैठकीची खोली या दोघांमध्ये एक अंधारी खोली होती. तिला माजघर म्हणतात, हे मला त्यानेच सांगितलेलं. माजघराची रचना अशी असते की, उन्हाळ्यात थंड, तर हिवाळ्यात उबदार वाटत असे. मित्र सांगायचा की, त्याच्या आईच्या मारापासून वाचण्यासाठी तो बरेचदा या खोलीतल्या अंधार्या कोपर्यात जाऊन लपत असे. माझ्या घराला माजघर नव्हतं, पण तू होतीस. तुझ्या आयुष्यात माझी जागा नव्हती, उलट मीच तुझ्या जागेत होतो. ‘तब्बू’ नावाच्या 150 वर्ष जुन्या वाड्यात. सिनेमाची शपथ, लहानपणी जशी ऊब मला तुझ्या अंधार्या कोपर्यात मिळायची, अजूनही तंतोतंत तशीच मिळते. तू अजूनही डौलदारपणे तशीच उभी आहे. किती सुरक्षित वाटायचं मला तिथे! आता माझ्या सुरक्षेपेक्षा या गूढ अंधाराची ओढ जास्त प्रिय आहे. शैलगृहात हात फिरवतोय, तर तुझा हिरवा स्पर्श सर्वांगात प्रवाह सोडतोय. तुझ्या दंडावर हात फिरवताना जाणवतंय की, हे सौंदर्य सौम्य, दयाळू नसून क्रूर, जीवघेणं आहे. आता मोठे झाल्यावर माझ्या घराच्या खोल्या वाढल्या, तरी त्याला माजघर नाहीच. लिऑन ब्लॉय म्हणतो, “Man has places in his heart which do not yet exist, and into them enters suffering, in order that they may have existence.’ , प्रत्यक्षात ज्या जागा अस्तित्वात नाही, त्यांना अस्तित्व प्राप्त करून देण्यासाठीच तू वेदनेच्या रूपात माझ्या आयुष्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे वेगळं माजघर असलं काय नसलं काय, तू असताना फरक पडणार नाहीये.
कलाकार आपल्या अभिनयाने पडद्यावर ती पात्रं जिवंत करतो. तू मात्र माझ्यासाठी एकमेवाद्वितीय आहेस. तू जिवंत केलेली पात्रं पडद्याबाहेर येऊन माझ्या आयुष्याला पुरत आहेत. त्यामुळे तुला निव्वळ अभिनेत्री म्हणण्यास जीव धजावत नाही. महान समजले जाणारे सुद्धा अनेक कलाकार त्यांच्या प्रतिभेची झेप त्यातल्या मर्यादा आणि वैशिष्ट्यासह सुरुवातीच्या काही वर्षातल्या कलाकृतीतून दाखवून देतात. पुढच्या कारकिर्दीत विस्मयचकित करतील, अशी कामं क्वचित बघायला मिळतात. तू मात्र या अलिखित नियमाला खणखणीत अपवाद आहेस. चित्रकलेत वॉटरकलर म्हणजेच जलरंगात प्रवाहीपणा असतो. चित्र त्या वेळी कागदावर कसे उतरेल, याचा अचूक अंदाज कुणालाही लावता आलेलं नाहीये. एकदा केलेली कलाकृती जशीच्या तशी पुनर्निर्मित करणे अशक्य. एखादा वॉटरकलर आर्टिस्ट त्याच्या शेवटच्या कलाकृतीपर्यंत ती पाहाणार्यांना अचंबित करू शकतो. तुझ्या अभिनयात तसला प्रवाहीपणा आहे. Completely unpredictable! तुझ्या कुंचल्यातून उतरणार्या स्ट्रोक्सचा अंदाज एकवेळ लावला जाऊ शकतो, मात्र त्याचा अंतिम परिणाम कसा असेल, याचा ठाव घेणे केवळ अशक्य. कुणी तसा तोकडा प्रयत्न केला, तरी मागे जे काही अफाट, अतुलनीय असं तोर्यात उभं राहणार आहे, त्याचं नाव म्हणजे तबस्सुम फ़ातिमा हाशमी उर्फ तब्बू! तू पडद्यावर असते, तेव्हा तुझ्या देहाभिनयात अलौकिक लावण्य असतं. तू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटसृष्टी गोर्यागोमट्या रंगाच्या कचकड्यांच्या बाहुल्यात रमलेली होती. शारीरिक सौंदर्याचे मापदंड बॉलिवूडमध्ये पक्के होत चालले होते. मिस इंडिया, मिस वर्ल्ड, मिस एशिया पॅसिफिक यातील विजेत्या मॉडेल्सची चलती होती. तुझा गव्हाळ अन् सावळेपणाकडे झुकत चाललेला, आपलासा वाटणारा चेहरा कलात्मक सिनेमात न रुळता व्यावसायिक आणि समांतर सिनेमात ज्या पद्धतीने मिसळून गेला, या घटनेचे सामाजिक आयाम महत्त्वाचे ठरतात. विशेषतः, तू ज्या पद्धतीच्या परस्परविरोधी भूमिका निभावल्या, त्या सर्व स्त्रियांची विविध रूपं डोळे दिपवून टाकणारी आहेत. क्लासेस आणि मासेस अशी वर्गवारी न करता, दोन्ही ठिकाणी पाय घट्ट रोवून उभं राहाणं ज्यांना जमलं, अशा अभिनेत्री दुर्मिळ. तू त्यापैकी एक!
तुझ्याबद्दल मला पजेसिव्ह व्हायला आवडतं. कागदोपत्री तू या महिन्यात 50 वर्षांची पूर्ण होतेय. मला विचाराल, तर एखाद्या अतिदुर्मीळ दारूला 50 वर्ष पूर्ण झालीये. अनमोल, अप्राप्य आणि तिच्या एका थेंबाने सुद्धा आयुष्यभर उतरणार नाही असा कैफ चढावा. नदीचं वय मात्र सहा लाख वर्षांचं! या वयात सुद्धा तुझं लग्न न करता राहाणं मला चोरटं सुख देतं. तू जोवर सिंगल राहाणार, तोवर ही ‘सेन्स ऑफ पजेशन’ची भावना मी स्वतःपुरती कायम कुरवाळत राहाणार. त्यामुळेच सिनेमापुरतं का असेना, तुझ्या वाट्याला आलेल्या दुःखाची नैतिक जबाबदारी मला घ्यायला आवडतं. ‘चांदणी बार’मध्ये तुला कामाला लावणार्या मामाच्या टपल्या झोडाव्या वाटतात. ‘साथिया’ मध्ये तुझ्या चुकीमुळे कारचा अॅक्सिडेंट होऊन राणी मुखर्जी गंभीर जखमी होते. तू एका सीनमध्ये शाहरुखकडे झालेल्या चुकीची माफी मागून रडायला लागते. तुझं रडणं थांबवून ओरडून सांगावं वाटतं की, ‘जाऊ दे ना राणी, तिचा जीव तुझ्या अश्रूंपेक्षा जास्त मोलाचा आहे का!’ परफेक्ट बायको कशी असावी, याबद्दल माझ्या व्याख्येमध्ये एकेकाळी ‘विरासत’ची ‘गेहना’ होती. काही वर्षांनंतर ‘हम साथ साथ है’ पाहून असं वाटायला लागलेलं की, साला! बायको असावी तर अशी. ‘जय हो’ मध्ये तू सलमानच्या बहिणीच्या भूमिकेत आहे. तुझ्यावर गुंड हात उचलायला बघतात तेव्हा ऐनवेळी सलमान पोचतो अन् सगळ्या गुंडांना एकसाथ लोळवतो. सलमानचे असंख्य टुकार सिनेमे आणि त्याला अभिनय येत नाही, या सगळ्याना मी तेवढ्या सीनसाठी माफ करू शकतो. पडद्यावर का असेना, त्याने तुला वाचवलं आहे. विषय आहे का! ‘दिल का क्या करे साहेब’ म्हणत सनी देओलला तू ‘जीत’मध्ये आवाहन करून देखील तो तुला सोडून करिष्माच्या मागे लागतो. तेव्हा या ढाई किलोचा हात असलेल्या माणसात ढाई ग्राम हृदय तरी आहे का – हा प्रश्न पडद्यात घुसून विचारावा वाटतो. त्या क्षणी मी पडद्यात घुसून शेकडो करिष्मा कपूर तुझ्यावरून ओवाळून टाकलेल्या. ‘दृष्यम’ सिनेमात कडक पोलिस युनिफॉर्ममध्ये असलेल्या तुला शेवटी अजय देवगण रडवतो. कुठून जन्माला येतात अशी दगड काळजाची माणसं! ‘मकबूल’ मध्ये आहे तशी ’निम्मी’ मिळाली, तर शंभर अब्बाजीचे खून करायला तयार होतो मी. तयार आहे. ‘अंधाधून’मधलं तुझं जानलेवा सौंदर्य पाहून थक्क झालेलो. मुळात सिनेमात प्रत्येक फ्रेममध्ये इतकं ठासून सगळ्या गोष्टींचं इंस्टोलेशन केलंय की, पडद्यावरून थोडं जरी लक्ष विचलित झालं, तरी खूप काही महत्त्वाचं मिस होऊ शकतं. असं असून सुद्धा तुला बघावं की, बाकी ठिकाणी लक्ष द्यावं, ही सर्वात मोठी कसरत आहे. तुझा अभिनय वगैरे नंतर. एवढी खतरनाक, भयंकर, जहर सुंदर दिसते की, जगभरचं सगळं सौंदर्य एका पारड्यात आणि तुळशीपत्राइतकी अमूल्य तब्बू दुसर्या पारड्यात. नेहमीच जड. तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल शून्य प्रेम दिसतं. तू एकदम आतल्या गाठीची बाई आहे अन् तुझ्यामागे लागणं, म्हणजे उद्ध्वस्त होण्यासारखं आहे, हे माहीत असूनसुद्धा तुझी जीवघेणी नजर पाहून सगळं स्टेकवर लावावं वाटतं.
भारतीय समाजात एक मोठा वर्ग अस्तित्वात आहे, जो स्त्रीला एकतर देवी मानतो किंवा चरित्रहीन व्यभिचारिणी! एखादी स्त्री व्यभिचारिणी असेल, तर तिचं माणूसपण नाकारत देवपण ते चरित्रहीन यातल्या अत्यंत गुंतागुंतीच्या आलेखात कुठेच बसवू इच्छित नाही. आणि याच मधल्या असंख्य स्त्री पात्रांना बॉलीवूड कुठे दाखवतो हे बघणं रंजक आहे. भारतीय सिनेमाबद्दल बोलायचं ठरल्यास स्त्री कलाकारांना दुहेरी लढाई लढावी लागली आहे. वैयक्तिक आयुष्यात पुरुषप्रधान संस्कृतीत आपलं अस्तित्व जपणे एकीकडे, तर नायककेंद्रित हिंदी सिनेमात स्त्री ही फक्त भोगवस्तू अन् कचकड्याची बाहुली असल्याचं नाकारत, स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणं दुसरीकडे. त्यामुळे 100 वर्षांपूर्वी भारतात कनिष्ठ कला समजलं गेल्याने स्त्रियांनी सिनेमात काम करण्यास दिलेला नकार – ते – पडद्यावर नैतिकतेची बंधनं मोडीस काढत साकारलेली विविधरंगी स्त्री पात्रे – हे स्थित्यंतर अभ्यासणे महत्त्वपूर्ण ठरते. एखाद्या परदेशी प्रेक्षकाने कुठलाही व्यावसायिक हिंदी सिनेमा सहजपणे बघायला घेतला, तर त्याचं आपल्या स्त्रियांबद्दल काय मत तयार होईल, हा विचार केल्यावर मात्र मती गुंग होते. त्यामुळेच मला नेहमी असं वाटत आलंय की, कुठल्याही अनोळखी माणसाला सर्वांगीण भारतीय स्त्रीचं चित्रण दाखवायचं असेल, तर तुझे सिनेमे दाखवावे. पूर्ण स्त्री ही पुरुषाला कधीच झेपत नाही. आपल्याला ज्या स्त्रिया भेटतात, तो त्यांचा तुकड्या-तुकड्यात बघत असलेला एक पैलू असावा. तू साकारलेल्या भूमिका एकसंधपणे प्रत्येक पैलूवर मांडून बघितल्या, तर समोर दिसणारा हिरा मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. या वयात सुद्धा तू जशा भूमिका करतेय, त्या चक्रावून टाकणार्या आहेत. त्या एकेक पैलूवर काय नाही म्हणून विचारता – शीख विद्रोह आणि खलिस्तान चळवळीच्या पार्श्वभूमीवर निरागसपणा हरवून गेलेली माचीसची ‘वीरा’ आहे – नागरिक म्हणून हक्क नाकारणार्या देशाबद्दल उदासीन असलेली हुतुतु मधली ‘पन्ना’ आहे – विचित्र परिस्थितीत बावरलेली विरासतची नववधू ‘गहना’ आहे – विवाहसंस्थेच्या बाहेर जाऊन स्वतःचं ‘अस्तित्व’ शोधणारी ‘अदिती’ आहे – आख्खं आयुष्य डान्सबारमध्ये होरपळून निघाल्यानंतर उतारवयात जेव्हा आपल्या मुलांच्या नशिबात सुद्धा याहून वेगळं जगणं नाहीये, हे लक्षात आल्यावर टाहो फोडणारी ‘चांदणी बार’ची ‘मुमताज’ आहे – ‘एक बार जान कहो’ हे म्हणत आपल्या प्रियकरावर बंदूक उगारणारी ‘मकबुल’ ची ‘निम्मी’ आहे – नेमसेकमध्ये इरफानच्या मृत्यूची बातमी समजल्यावर आभाळाकडे बघत रस्त्यावर अनवाणी धावणारी ‘अशीमा’ आहे – आपला वयोवृद्ध पार्टनर सेक्ससाठी योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी गार्डनमध्ये दूरवर एका झाडापर्यंत बच्चनला धावायला लावणारी ‘चीनी कम’ ची ‘नीना’ आहे – आणि हैदर मधली ‘ग़ज़ाला’ आहे, जी इतकी कमाल सुंदर आहे, तिच्या मुलाला सुद्धा ‘इडीपस कॉम्प्लेक्स’ देऊ शकते. तुझ्या सगळ्या भूमिकांचा चुरा करून Kaleidoscopes मध्ये टाकल्यास जे काही दिसतं, ते केवळ अद्भुत आहे. दरवेळेस तू पत्त्यांचा नवा बंगला उभा करते. मी भारावून तो बघायला जातो आणि तू माझ्याकडे बघून गूढ हसते… मी ज्या पत्त्यांच्या इमल्यावर स्वप्न रचत असतो, त्यावर तू फुंकर मारून ढासळून टाकते. दरवेळेस भोवळ आणणारे अभिनयाचे इमले बांधणं तू सोडत नाही… मी आता तरी तुला समजून घेऊ शकतो, असा समज करून स्वप्न बघणं मीही सोडत नाही… अन् डाव रंगात आलेला असताना फुंकर मारणं तू देखील सोडत नाही! तुझ्याबद्दल माझ्या नशिबात असं झुरणं किती दिवस असेल, याचा विचार करणं मी सोडून दिलंय. सगळेच तुला वास्तववादी अभिनेत्री म्हणून श्रेय देत असतात, प्रत्यक्षात मात्र ग्लिसरीन वापरल्याशिवाय तू कधीही ऑनस्क्रीन रडू शकत नाही. कसलं लुसलुशीत क्रौर्य आहे बाई तुझं! तुझ्यातला निष्ठुरपणा माझा जीव घेतोय, तरी तरल भासतोय. चैतन्याने भारलेलं तुझं शरीर आणि त्या आनंदानुभूतीत न्हाऊन निघणारा मी. एखाद्याने समजून घेतलेच, तर सगळं अशरीरी… नाही समजून घेतलं, तर केवळ देहासक्ती. काहीही असो, दोन्ही बाबतीत मी सारखाच अनअपोलोजेटिक आहे.
शिवकुमार बटालवींचं ‘लुना’ हे पद्यनाटक वाचल्यापासून मला एक स्वप्न वरचेवर पडतं. मूळ आख्यायिका संत पुरण भगत यांच्यावर आधारित आहे. पुरण राजपुत्र असून त्याच्या वडिलांनी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या ‘लुना’ नावाच्या अत्यंत सुंदर मुलीसोबत दुसरे लग्न केलं आहे. अनेक वर्षांनी राजवाड्यात वापस येणार्या पूरणला पाहताच लुना त्याच्या प्रेमात पडते. त्याला गळ घालू पाहते. पूरणने नकार देताच ती सूडाच्या भावनेने पेटून उठते अन राजाला फूस लावून पूरणचा काटा काढते. मूळ आख्यायिकेत लुना खलनायक आहे. मात्र, बटालवींनी लुनाच्या दृष्टीकोनातून त्या पद्यनाटकाची नवनिर्मिती केली आहे, ज्यात लुना नायिका आहे. मला जे स्वप्न हल्ली नेहमी पडतं, त्यात लुनाच्या जागी हैदरमधली तब्बू दिसते. पूरणसारखाच मी सुद्धा अनेक वर्षांनी राजवाड्यात परत आलोय. इथला राजवाडा “rotten state of Kashmir’ मध्ये आहे. मी जहर खूबसूरत लुनाच्या मानेवर अत्तर लावतोय. तू कसली पाताळयंत्री बाई आहेस, हे मला माहीत असताना सुद्धा स्वतःला उद्ध्वस्त करत राजाला मारण्याची दोघे मिळून तयारी करतो. राजाला मारल्यानंतर मी संभ्रमावस्थेत असताना लुना रडत जवळ येते. तिच्या चेहर्याच्या जागी आता ‘मकबूल’ मधली निम्मी दिसतेय. माझ्या गळ्यात पडून म्हणतेय, ‘हमारा इश्क तो पाक था ना मियाँ? पाक था ना हमारा इश्क? बोलो ना मियाँ…’ दचकून माझी झोप मोडते. गजाला-लुना-निम्मी डोळ्यांसमोर अजूनही फिरत राहातात. मी जागेपाणी पुटपुटतो. ‘जहर खूबसूरत है आप.’ हे बोलत असताना माझ्या बाजूला येऊन बसलेले एखादे फुलपाखरू फडफडत आहे. याचे तरंग मोठे होऊन भविष्यात तुझ्या आयुष्यात वादळ निर्माण करणार नाही हे कशावरून? बटरफ्लाय थियरीवर आहे माझा विश्वास. तोपर्यंत हे स्वप्न असंच पडायला हवं आणि असाच जीव जायला हवा. जीव सोडताना मावळत्या क्षणी त्याहून सुंदर भैरवी नसेल माझ्यासाठी. ‘बस इतनी इजाज़त दे. कदमों पे ज़मीं रख दू. फिर सर ना उठे मेरा, ये जाँ भी वही रख दूँ’ मी जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाई येऊन कपाळावर लिहून गेली असेल, ‘हा पोरगा गोदाकाठी, नाहीतर तब्बूच्या डोहात मरणार.’ तसं लिहिणारी सटवाई दुसरी कुणी नसून तब्बूच असेल, हे वेगळं सांगायला हवं का? तब्बू. पूर्णविराम.
——————————————
(लेखकनामवंतब्लॉगरवस्तंभलेखकआहेत)
9689940118
‘मीडिया वॉच’ दिवाळी अंकातील (२०२१ ) लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info हे वेब पोर्टल ओपन केल्यावर दिवाळी अंक या category वर क्लिक करा. यावर्षीच्या अंकात प्रसिद्ध झालेले, तसेच जुन्या अंकातील लेखही तिथे वाचता येतील .