कलीयुगातील शापित शकुंतलेचा वनवास संपणार!

– अविनाश दुधे 

यवतमाळ, अमरावती, वाशीम ,अकोला या चार जिल्ह्यांत  १९०३ पासून प्रवासी व माल वाहतूक करणारी नॅरोगेज  रेल्वेलाईन ब्रॉडगेज  होणार हे आता निश्चित झाले आहे . राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर ‘शकुंतला रेल्वे‘ ब्रॉडगेज रुपांतरणाचा अर्धा खर्च उचलण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारने २०१७ मध्येच ही रेल्वेलाईन ब्रॉडगेज करण्यासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद केली होती. 

………………………………………….

महाभारताच्या आदिपर्वात  शापित शकुंतलाची कथा आहे. शकुंतला ही विश्वामित्र व मेनका यांची कन्या. पण ती कण्य मुनींच्या आश्रमात वाढली. राजा दुष्यंतासोबत गांधर्व  विवाह झाल्यावर त्याने भेट दिलेली अंगठी पाण्याच्या प्रवाहात वाहून  गेल्याने  दुष्यंताला   तिचं विस्मरण झालं. त्यानंतर कश्यप ऋषीच्या आश्रमात तिता विरहाचे दिवस काढावे लागले. कालांतराने दुर्वास ऋषीच्या उःशापाने एका मच्छीमाराला ती अंगठी माशाच्या पोटात सापडली. ती त्याने दुष्यंताला दाखवताच त्याला शकुंतलेचं स्मरण झालं. त्यानंतर लगेच त्याने शकुंतलेची भेट घेऊन तिचा सन्मानाने स्वीकार केला. त्या दोघांना भारत नावाचा पुत्र झाला. त्याच्याच नावाने आपला देश ओळखला जातोय, अशी हा कथा आहे. 

या शापित  शकुंतलेसारखीच अवस्था विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा,  वाशीम ,अकोला या पाच  जिल्ह्यांत आता काही वर्षापूर्वीपर्यंत  नॅरोगेज लाईनवर धावणाऱ्या ‘शकुंतला’ नावाच्या रेल्वेची आहे. मात्र आता या शकुंतलेला केंद्र व राज्य सरकारच्या  कृपेने उ:शाप मिळालाय. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात २०१७ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शकुंतला रेल्वे  लाईनचं रूपांतर ब्रॉडगेजमध्ये होणार, अशी घोषणा केली होती .मात्र याचा अर्धा खर्च राज्य सरकारने उचलावा, अशी अट घातली होती . महाराष्ट्र सरकारला आता  जवळपास सात वर्षानंतर जाग आली आहे . यावेळच्या अंतरिम अर्थसंकल्पात शकुंतला ब्रॉडगेज रुपांतरणाचा  ५० टक्के खर्च राज्य सरकार उचलणार, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले . त्यामुळे अनेक वर्षानंतर
शकुंतलेचा वनवास संपण्याची आशा निर्माण झाली आहे .

पुराणातील शकुंतलेसारख्या या शकुंतलेच्या भरपूर कथा-दंतकथा आहेत.  २५ डिसेंबर १९०३ रोजी या  शकुंतलेचा  सेवा प्रवास सुरू झालाय क्लिक-निक्सन अँड कंपनी या खासगी कंपनीने या रेल्वेलाईनची उभारणी केली. पुढे हीच कंपनी  सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. या कंपनीने रेल्वे मार्गाचं  काम जेव्हा सुरू केलं, तेव्हा पुढील १०० वर्ष ही रेल्वे आपल्याच मालकीची राहील, असा करार तेव्हाच्या ब्रिटिश सरकारसोबत केला होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही अगदी आतापर्यंत या रेल्वेलाईनची मालकी त्या कंपनीकडेच होती. देशातील इतर रेल्वेलाईनचा ताबा १९५२मध्ये भारतीय रेल्वेकडे आला. पण का कोण जाणे या रेल्वेलाईनची  मालकी मात्र क्लिक-निक्सन अँड  कंपनीकडेच राहिली. परिणामी आतापर्यंत भारतीय रेल्वे दरवर्षी त्या कंपनीला रॉयल्टी देत असे.

वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत पोहोचवण्यासाठी आणि तेथून इंग्लंडमधील मँचेस्टरच्या सूत गिरण्यांना पाठवण्यासाठी या रेल्वेलाईनची उभारणी ब्रिटिशांनी केली होती. त्यांनी त्यांच्या सोयीसाठी ही लाईन उभारली तरी या शकुंतलेने लवकरच यवतमाळ, अमरावती, वाशीम , अकोला ,वर्धा जिल्ह्यांतील नागरिकांना आपलसं केलं.  ती कापसाप्रमाणेच इतर माल- सामानासह प्रवासी वाहतूकही मोठ्या संख्येने करू लागली. ही रेल्वे अतिशय लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे तिचं अतिशय कमी दराचं तिकीट! याविषयी  शकुंतलेतून   अनेकदा प्रवास केलेले पत्रकार ज्ञानेश्वर मुंदे सांगतात ‘अगदी सुरुवातीपासून खेडयापाडयातील नागरिकांची शकुंतला ही पहिली पसंती होती. काही वर्षापूर्वी ही सेवा बंद करण्यात आली तेव्हा यवतमाळ-मूर्तिजापूर या ११४ किलोमीटरच्या प्रवासाचे भाडे केवळ २५ रुपये होते . याच अंतरासाठी एसटी १२० रुपये घेत असे. अत्यंत कमी भाड्यामुळे शकुंतला गरिबांना परवडणारी असली तर तिचा वेग हा कायम थट्टेचा विषय होता. मूर्तिजापूर ते यवतमाळ हे अंतर कापायला शकुंतला सहा ते सात तास घेत असे. गेल्या शतकात  हेच अंतर पार करायला ती दुप्पट वेळ घेत असे. अतिशयोक्ती वाटेल , पण तेव्हा चालत्या गाडीतून उतरुन  रेल्वे रुळालगतच्या  शेतातला हरबरा, शेंगा उपटून पुन्हा गाडी पकडता येत असे. एवढंच काय, लघुशंकेसाठी उतरलं  तरी गाडी फार दूर जायची नाही. त्यामुळे शकुंतला धावत नाही; रांगते, असं लोक गमतीने म्हणत. ते खरंही असे. नंतरच्या  काळात शंकुतलाच्या वेगाल थोडाफार  बदल झाला होता , पण फार नाही. पूर्वी शकुंतलेला तीन डबे होते, नंतर पाच झाले होते . १९९४ पर्यंत ही ट्रेन वाफेच्या इंजिनावर चालत असे. ते इंजिन आता पुणे रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळते.  १५ एप्रिल १९९४ पासून शकुंतला डिझेल इंजिनांवर चालू लागली होती.

भारतात नॅरोगेज , मीटरगेज आणि ब्रॉडगेज असे रेल्वलाईनचे तीन प्रकार आहेत.  ‘नॅरोगेज लाईन’ चं दोन रूळामधील अंतर दोन फूट असते . ही रेल्वे विशेष करून डोंगराळ भागात वापरली जाते. तिचे डबे छोटे असतात माथेरान ते नेरळ या भागांवर नॅरोगेज रेल्वे आहे. तिचा वेग मार्गावरील वळणांमुळे कमी असतो ‘मीटरगेज’च्या दोन रुळातील अंतर एक मीटर म्हणजे तीन फूट दहा इंच असते, तर ब्रॉडगेज लाईनच दोन रुळातील अंतर पाच फूट सहा इंच असते . काही ठिकाणी ‘मीटरगेज’ मध्येच नॅरोगेज आणि ब्रॉडगेजमध्ये मीटरगेजचे रूळही असतात. त्यावरून दोन्ही प्रकारच्या गाड्या धावतात, यवतमाळ, अमरावती, वर्धा व अकोला जिल्ह्यांतील ग्रामीण जनतेची लाईफलाईन अशी शकुंतलालाची पूर्वी ओळख होती. यवतमाळ- मूर्तिजापूर, अचलपूर-मूर्तिजापूर आणि आर्वी -पुलगाव अशा तीन मार्गावर शकुंतला धावत असे. मूर्तिजापूर- यवतमाळ या मार्गावर किनखेड, जिल्हेगाव, भाडशिवणी, पोही, कारंजेटाऊन (कारंजा लाड), दादगाव, सोंगठाणा, सांगवी, वरुडखेड, भांडेगाव, दारव्हा, तपोना, लाडखेड, लिंगा, लासीना अशी १५ स्टेशन होती.

ही सारी स्टेशन २०१२ मध्ये बंद करण्यात आली . असाच प्रकार मूर्तिजापूर-अचलपूर मार्गाबाबत झाला. त्या मार्गावरील लाखपुरी, भुजवाडा, बनोसा( दर्यापूर), लेहगाव, कोकर्डा, नवबाग, अंजनगाव सुर्जी, पथ्रोट या स्टेशनवरील कर्मचारी जवळपास १५  वर्षापूर्वी अन्यत्र हलवण्यात आलेत. आर्थिकदृष्ट्या ही गाडी चालवणे परवडत नाही , असे कारण देऊन शकुंतलेचा प्रवास कायमचा थांबवण्यात आला होता.  शकुंतलेच्या मार्गावर प्रवासी भरपूर असले तरी नाममात्र प्रवासी भाड्यातून त्या  रेल्वेलाईनवर गाडी घालवण्याचा खर्च निघत नाही.  शिवाय त्या  लाईनवरील रेल्वे पूल, स्लीपर आणि संपूर्ण यंत्रानाच अतिशय  जुनी झाली होती.  म्हणून २०१२ पासून पावसाळ्यातील काही दिवस ही गाडी बंद ठेवली जात असे . तेव्हापासून सर्व प्रकारच्या व्यवस्थापन खर्चातही कपात कराण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता . शेवटच्या काही वर्षात स्टेशन बंद करण्यासोबतच कर्मचारी अन्यत्र हलवण्यात आले होते . यवतमाळ- मूर्तिजापूर, अचलपूर- मूर्तिजापूर या मार्गावर टीसी गाडीतच तिकीट देत असे. आर्वी-पुलगाव नॅरोगेज लाईन तर २००८ मध्येच पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

‘शकुंतला’ बरीच  बर्ष दुर्लक्षित राहिली असली तरी तिचं आकर्षण अनेकांना आहे.  इंग्लंडचे रेल्वे अभ्यासक डेव्हिड ब्रेकर हे  शकुंतलाच्या   प्रेमात आहेत.  ही रेल्वे धावत राहिली पाहिजे यासाठी ते अनेक वर्ष प्रयत्न करत होते . त्यासाठी त्यांनी शकुंतलाप्रेमींचा ग्रुपही तयार केला होता. शकुंतला वाचवण्याच्या मोहिमेला बळ मिळवण्यासाठी त्यांनी  www.shakunala8m.com ही वेबसाईटही तयार केली होती. शकुंतला हा भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक ठेवा आहे.  रेल्वेने तो जपला पाहिजे. भारतीय रेल्वेची तशी इच्छा नसेल,  तर शकुंतलाला लीजवर चालवायला द्या , अशी मागणी डेव्हिड  ब्रेकर  यांनी केली होती. रेल्वेने परवानगी दिल्यास त्या मार्गावर रेलबस चालवण्याचा प्रस्तावही त्यांनी   रेल्वे मंत्रालयाला दिला होता. मात्र  रेल्वे मंत्रालयाने त्यांना काहीही प्रतिसाद दिला नव्हता.

या रेल्वेला हेरिटेज रेल्वेचा दर्जा द्यावा, शकुंतला कारंजा, वरुडखेड, तपोना, दारव्हा, अचलपूर, दर्यापूर,अंजनगाव सुर्जी  या मार्गावर धावते , ही सर्व  ठिकाणं धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची आहेत.  या गावांचा इतिहात लोकांसमोर माडून, त्या गावांची सफर घडवणारी गाडी शकुंतलाला हेरिटेज रेल्वेचा दर्जा मिळायला हवाच, अशी मागणी मागील काही वर्षात अनेकांनी रेटून धरली होती. शकुंतला शेवटचे आचके देत आहे, हे लक्षात येताच गेल्या काही वर्षांपासून या  रेल्वेलाईनचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये व्हावं, अशी मागणी यवतमाळ  व अमरावती जिल्ह्यातील सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी व शकुंतलाप्रेमी सातत्याने करत होते . या सर्वांच्या प्रयत्नाना अखेर यश आल आहे.  मात्र हे सगळ काम कधी पूर्ण होणार, ते काही सांगता येत नाही.  पण आता ‘एक होती शकुंतला…’ असं  म्हणण्याची पाळी कधीही येणार नाही, याची खात्री पटल्याने  शकुंतलाप्रेमी  आनंदित आहेत.

  ‘शकुंतला’ नामकरण असे झाले!

मूर्तिजापूर-अचलपूर मार्गावर धावणाऱ्या रेल्वेला ‘शकुंतला’ हे नाव कसं पडलंय, याबाबत आता-आतापर्यंत खात्रीशीर माहिती मिळत नव्हती. अलीकडेच शेतकरी आंदोलक, सामाजिक कार्यकर्ते  विजय विल्हेकर यांनी यामागील कहाणी शोधून काढलीय, ही कहाणी स्वातंत्र्यापूर्वीची आहे. ती अशी-अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात नानासाहेब देशमुख नावाचे एक मोठे जमीनदार होते. त्यांचे चिरंजीव बळवंतराव देशमुख यांचा विवाह चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे रेल्वेत अधिकारी असलेल्या गृहस्थाच्या मुलीशी शकुंतलाबाई यांच्याशी ठरला, लग्नानंतर त्यांची वरात मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाने मूर्तिजापूरपर्यंत आली. तेथून दर्यापूरला येण्यासाठी मूर्तिजापूर-अचलपूर मार्गावरील गाडीत सारी वरात चढली. मात्र एका ब्रिटिश तिकीट कलेक्टरने सर्वाना खाली उतरवलं, सारेच चकित झाले. पण त्या तिकीट कलेक्टरने लगेचच खुलासा केला की, ‘माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुम्हाला फर्स्ट क्लासच्या डब्यातून आणायला सांगितलं आहे. लगेच वरात फर्स्ट क्लासच्या डब्यात चढली, दर्यापूरला आल्यानंतर एका सजवलेल्या है गाडीतून शकुंतलाबाईची वरात दर्यापुरातील देशमुखांच्या वाड्यात पोहोचली.

शकुंतलाबाई देशमुख

कालांतराने शकुंतलाबाई आपल्या संसारात रमल्या. बघता- बघता गावाच्या मालकीणबाई झाल्या, मात्र लग्नानंतरचा पहिला शाही प्रवास त्या कधीच विसरल्या नाहीत, बळवंतराव व  शकुंतलाबाई   हे  जोडपं जमीनदार असलं, तरी त्यांनी सर्वसामान्यांसोबत आपल्या चांगल्या वर्तणुकीतून कायम नाळ जोडून ठेवली होती. त्यामुळे वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय चळवळीतील कार्यकर्ते त्याच्याकडे मुक्कामी असत. शकुंतलाबाईच निधन २०१० मध्ये झालं.

सुदामकाका  देशमुख हे खासदार असताना त्यांनी या रेल्वेलाईनचा प्रश्न हाती घेतला, तेव्हा एकदा त्या लाईनच्या दुर्दशेमुळे व्यथित झालेल्या शकुंतलाबाईंनी सुदामकाकांना आपल्या पहिल्या प्रवासाची हकीगत सांगतांना ही रेल्वे वाचवण्यासाठी काही करा, अशी गळ घातली होती. तेव्हा त्यांच्या लग्नाच्या वरातीची कहाणी ऐकल्यानंतर सुदामकाकांनी अतिशय उत्स्फूर्ततेने ‘या गाडीला मी आता शकुंतला रेल्वे असं म्हणणार,’ असं सांगितलं होतं. त्यानंतर ते प्रत्येक ठिकाणी या गाडीचा उल्लेख ‘शकुंतला’ असा करायला लागले आणि बघता बघता शकुंतला हे नाव सर्वतोमुखी झालं.

 

(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक, पब्लिकेशन व वेब पोर्टलचे संपादक आहेत )

8888744796

………………………………………….

अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleशरद पवारांनी अजितदादांना इतके सहन का केले?
Next articleसंशोधन व योगायोगाच्या कक्षेत तळपणारे दोन विज्ञान सूर्य
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.