शरद पवारांनी अजितदादांना इतके सहन का केले?

साभार : साप्ताहिक साधना

-विनोद शिरसाठ

अजित पवार व शरद पवार यांचे संबंध क्रमाक्रमाने ताणले गेले असावेत आणि २०१४  ते १९  या काळात मोठी दरी निर्माण झाली. २०१९ नंतरच्या चार-पाच वर्षांत ते संबंध इतके ताणले गेले की, अजित पवारांनी बंड केले आणि आता तर शरद पवारांच्या हातातील पक्षाची दुसरी दोरीही हिसकावून घेतली. त्यांनी केवळ पक्ष ताब्यात घेतला एवढेच नाही, तर मागील सहा-सात महिन्यांत शरद पवारांचे नको तेवढे अवमूल्यन केले, त्यांचा उपमर्द होईल अशी विधाने केली, अनेक प्रकारचे आरोप केले. हे करताना आपण साडेतीन दशके राजकारणात शरद पवारांच्यासोबत केवळ वावरलोच नाही, तर त्यांच्याच अंगाखांद्यावर खेळत व मोठ्या चुका झाल्या तेव्हा त्यांच्याच पाठीमागे लपत इथपर्यंतचा प्रवास केला; हे अजित पवार विसरले असे नाही, तर ते मान्यही करायलाच तयार नाहीत. हा कृतघ्नपणा कोणाही लहान-थोराला धक्कादायक वाटेल, इतका की चांगुलपणावरील विश्वास उडून जावा असा आहे. सार्वजनिक जीवनात किमान सभ्यता पाळायलाही अजित पवार शरद पवारांच्याकडून शिकलेले दिसत नाहीत, असाही त्याचा अर्थ.

जून २०२३  मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडली आणि 40 आमदारांसह भाजपबरोबर जाऊन राज्य सरकारच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. स्वतःला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्रीपद पदरात पाडून घेतले आणि आणखी सात जणांना मंत्रिपदी बसवले. शरद पवार यांच्यासोबत 15 आमदार राहिले, जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे हे तीन प्रमुख नेते त्यांच्यासोबत राहिले. ‘पक्षात फूट पडलेली नाही’ असे दोन्ही बाजूने सांगितले जात होते, नंतर ‘आमचाच पक्ष खरा’ असे सांगितले गेले आणि अखेर निवडणूक आयोगाकडे सगळे प्रकरण गेले. गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने निर्णय दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या गटाचा आणि घड्याळ हे पक्षाचे चिन्ह त्यांच्यासाठीच असा तो निर्णय आहे. आता शरद पवार यांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ असे नाव मिळाले, पक्षचिन्ह या आठवड्यात मिळेल. 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, मागील 25 वर्षे ते पक्षाचे अध्यक्ष व सर्वेसर्वा राहिले. त्यांच्या हातातून अजित पवार व अन्य नेत्यांनी पक्ष व चिन्ह ज्या कारस्थानी पद्धतीने काढून घेतले, त्यामुळे शरद पवार यांच्याविषयी विशेष सहानुभूती राज्यामध्ये सर्व स्तरांत आहे. मात्र दुसरा वर्ग असा आहे, ज्यांना शरद पवारांविषयी सहानुभूती नाही, पण अजित पवाराचा प्रचंड राग आहे. तिसरा वर्ग आहे ज्यांना या दोहोंची वाताहात होण्यातच आनंद आहे. चौथा वर्ग आहे ज्यांना दोन्ही बाजूंच्याविषयी फारशी सहानुभूती नाही, पण राज्याच्या राजकारणात एका पक्षाची अशी वाताहत क्लेशदायक वाटते. पाचवा वर्ग आहे ज्यांना भाजपने हे सर्व कटकारस्थान ज्या पद्धतीने घडवून आणले याबाबत संताप आहे.

अशा या अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीत अगदी तटस्थपणे शरद पवार यांच्याकडे पाहता येणे अवघड आहे. शरद पवार हे तत्त्व आणि व्यवहार यांच्यातील अंतर कमी करणारे नेते आहेत हे निर्विवाद. त्यांना काळा वा पांढरा रंग लावता येणार नाही, करड्या रंगातच त्यांचे वर्णन करावे लागते. पण आपला एकूण जीवनव्यवहार करड्या रंगाचाच असल्याने, शरद पवार हे सर्वस्तरीय जनतेला अन्य नेत्यांच्या तुलनेत जवळचे वाटत आले आहेत. त्यांच्याकडे राज्याच्या राजकारणाचे भविष्यांकन होते, विकासाची दूरदृष्टी होती. दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून निर्णय घेणे त्यांनी शक्य तेवढे केले. राज्यातील संस्थात्मक संरचना बळकट होण्यासाठी त्यांनी यथाशक्ती प्रयत्न केले. दलित, महिला, भटके-विमुक्त इत्यादी उपेक्षित घटकांना न्याय मिळण्यासाठी निर्णयप्रक्रियेत त्यांनी सहभाग घेतला. मात्र हे सर्व करताना सत्तेचे गणित जुळवण्यासाठी, मतदारांचे नवे वर्ग आकर्षित करण्यासाठी, नेते-कार्यकर्ते हितचिंतक यांना जोडण्यासाठी आणि आपल्या विरोधकांना जरब बसवण्यासाठी आवश्यक ते सर्व त्यांनी सातत्याने केले. आधीचे काम केल्याशिवाय नंतरचे करता येत नाही आणि उलटही, अशीच त्यांची पक्की धारणा असावी. ती दुहेरी रणनीती राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे, यावर त्यांचा पूर्ण विश्वास असावा. म्हणजे सत्ता मिळवणे आणि तिचा उपयोग जनहितासाठी करता येणे हा हेतू साध्य करायचा असेल तर काही अप्रिय घटकांची कमी अधिक साथ संगत लागणार, कार्यकर्त्यांच्या उपद्वयापांकडे दुर्लक्ष करावे लागणार, काहींना सांभाळून घ्यावे लागणार हे त्यांनी मनोमन स्वीकारले होते. मात्र ते सर्व करताना एक किमान पातळी त्यांनी निश्चित केलेली होती, एका मर्यादेपलीकडे ताणायचे नाही असेही त्यांनी ठरवले असावे. त्यासाठी विरोधी पक्षांशी चांगले संबंध ठेवायचे, विरोधी पक्षांचीही कामे करायची आणि एका मर्यादेपलीकडे गुंड प्रवृत्तीला थारा द्यायचा नाही, हे त्यांनी सातत्याने केले. परंतु हे सगळे अपरिहार्यतेचे राजकारण होते. सत्तेचे राजकारण, त्यासाठी अर्थकारण सांभाळणे, कटकारस्थान मर्यादित प्रमाणात आणि सामाजिक न्याय व विकासाची दृष्टी असे हे अजब रसायन होते. आणि हे सर्व चालू असताना, महाराष्ट्रात तरी अशा प्रकारचा अन्य कोणीच नेता नसल्यामुळे मागील तब्बल २५  वर्षे त्यांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवले.

अशा या शरद पवारांना शह देऊ शकेल असा नेता ना राज्यात होता ना केंद्रीय सत्तेत, पण केंद्रीय सत्तेवर नरेंद्र मोदी आल्यावर पवारांना शह देण्यासाठी कसलेच विधिनिषेध न बाळगणारा व अधिक बलाढ्य पर्याय पुढे आला. शरद पवारांनी सुरुवातीची पाच वर्ष २०१४  ते २०१९  मोदी यांच्याशी सौहार्दाचे व सहकार्याचे संबंध ठेवले, नंतरच्या पाच वर्षांत मात्र ते संपुष्टात आले, त्याची जबरदस्त किंमत शरद पवारांना मोजावी लागली. 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर मोदींची आणि एकूण भाजपची पवारांनी खोड काढली त्याची ही किंमत आहे. भाजपसोबत जायचे की नाही असा संभ्रम एका बाजूला ठेवून, शिवसेनेला भाजपपासून तोडून, भाजपच्या तोंडातला सत्तेचा घास पवारांनी काढून घेतला, त्यामुळे चवताळलेल्या मोदींनी पवारांना पुरते नामोहरम करण्याचे ठरवले असावे. वस्तुतः पवारांनी ते कटकारस्थान मोठ्या धूर्तपणे व लोकशाही चौकटीत राहून केले. पण पुढचे काम भाजपने लोकशाही यंत्रणा वाकवून व अतिशय निर्दयपणे केले. हा खरे तर खूपच मोठ्या विवेचनाचा व विश्लेषणाचा विषय आहे. पण या निमित्ताने प्रश्न मनात एकच येतो की, अजित पवार मोदींच्या कारस्थानाला इतके बळी का पडले आणि अशा अजित पवारांना शरद पवारानी इतकी वर्षे नीट ओळखले कसे नाही? आणि ओळखले असेल तर मग इतकी वर्षे सहन का केले? अन्य कोणत्या नेत्यांनी पक्ष फोडला असता तर शरद पवार इतके चकित झाले नसते, आणि त्यांची इतकी नाचक्कीही झाली नसती. तर अजित पवारांनाच इतके स्वैर, शिरजोर व आक्रमक कसे होऊ दिले? कदाचित अन्य कोणत्याही नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याची ताकद नव्हती, अजित पवारांच्या मध्येच ती होती असा याचा अर्थ. अजित पवार हे शरद पवारांची जणू सावलीच होती. अजित पवार यांची ओळख धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी, प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी, कामे फटाफट मार्गी लावण्यासाठी, दिवसभराच्या कार्यक्षमतेसाठी शरद पवारांच्या सारखीच सांगितली जाते. पण ते साम्य इथेच संपुष्टात येते. शरद पवारांची दूरदृष्टी, राज्याचे व समाजाचे हित साधण्याची इच्छाशक्ती अजित दादांच्याकडे कधीच नव्हती. त्यांची वृत्ती फक्त देवाण-घेवाण करण्याची होती. मी जे काही बोलेन करेन त्याला तुम्ही बिनशर्त पाठिंबा द्या, मी तुम्हाला त्या बदल्यात शक्य ते सर्व देतो; मात्र तुम्ही माझे निर्विवाद समर्थन करीत नसाल तर मी तुम्हाला काहीही देणे बांधील नाही, असा तो रोकडा व्यवहार राहिला आहे.

1991 मध्ये लोकसभेवर अजित पवार निवडून आले तेव्हा संपूर्ण राज्याला माहीत झाले, तेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र त्या लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी अचानक केंद्रामध्ये नरसिंहराव मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री व्हायचे ठरवले, तेव्हा त्यांनी अजित पवारांना खासदारकीचा राजीनामा द्यायला लावून, बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आणून राज्य सरकारमध्ये मंत्री केले. त्यानंतर 33 वर्षे अजित पवार राज्याच्या सक्रिय राजकारणात मध्यवर्ती आहेत. त्यातील 1991 ते 99 ही आठ वर्षे ते शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर 25 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. वस्तुतः सुरुवातीच्या चार वर्षांतच अजित पवार यांची आरेरावी उघड झाली होती, भले ती पुणे जिल्ह्यापुरती मर्यादित होती. (त्याची झलक दाखवणारा जानेवारी 1995 चा अरुण टिकेकर यांचा एक लेख प्रस्तुत अंकात घेतला आहे.) तेव्हा काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेते होते. मात्र शरद पवार हे संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री व काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असा तो आठ वर्षांचा कालखंड होता. त्यामुळे अजित पवारांनी त्या आठ वर्षांत शरद पवारांना हवे तेच व हव्या त्याच पद्धतीने राजकारण केले हे उघड आहे. मात्र तेव्हा ते पूर्णतः शरद पवारांच्या नियंत्रणात असणार. शरद पवारांनी तेव्हा ते चालवून घेतले, एवढेच नाही तर त्यांचे कौतुकही केले. त्यानंतरची पंधरा वर्षे 1999 ते 2014 राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळ होते, तेव्हा शरद पवार भाकरी फिरवत राहिले, पण राष्ट्रवादीची एक दोरी अजित पवारांच्या हातात दिली होती. काँग्रेस पक्षालाही पूर्ण बहुमत नसल्याने त्यांनी अजित पवारांना चालवून घेणे साहजिक होते. त्या संपूर्ण काळात अजित पवार व शरद पवार यांचे संबंध क्रमाक्रमाने ताणले गेले असावेत आणि 2014 ते 19 या काळात मोठी दरी निर्माण झाली. 2019 नंतरच्या चार-पाच वर्षांत ते संबंध इतके ताणले गेले की, अजित पवारांनी बंड केले आणि आता तर शरद पवारांच्या हातातील पक्षाची दुसरी दोरीही हिसकावून घेतली. त्यांनी केवळ पक्ष ताब्यात घेतला एवढेच नाही, तर मागील सहा-सात महिन्यांत शरद पवारांचे नको तेवढे अवमूल्यन केले, त्यांचा उपमर्द होईल अशी विधाने केली, अनेक प्रकारचे आरोप केले. हे करताना आपण साडेतीन दशके राजकारणात शरद पवारांच्यासोबत केवळ वावरलोच नाही, तर त्यांच्याच अंगाखांद्यावर खेळत व मोठ्या चुका झाल्या तेव्हा त्यांच्याच पाठीमागे लपत इथपर्यंतचा प्रवास केला; हे अजित पवार विसरले असे नाही, तर ते मान्यही करायलाच तयार नाहीत. हा कृतघ्नपणा कोणाही लहान-थोराला धक्कादायक वाटेल, इतका की चांगुलपणावरील विश्वास उडून जावा असा आहे. सार्वजनिक जीवनात किमान सभ्यता पाळायलाही अजित पवार शरद पवारांच्याकडून शिकलेले दिसत नाहीत, असाही त्याचा अर्थ.

त्यातून असा प्रश्न निर्माण होतो की, हे शरद पवारांना कधीच लक्षात आले नाही का? अजित पवारांना रोखण्याची गरज त्यांना कधीच वाटली नाही का? हे अति होते आहे असे त्यांना कधीच वाटले नाही का, की वाटले होते पण कॅज्युअली घेतले? नंतर गांभीर्य लक्षात आले, पण पुढे हळूहळू रोखू असे वाटले का? त्यानंतर, आता कसे रोखावे हा प्रश्न पडला? आणि मग रोखणे आवाक्याबाहेर गेले? मग भीतीच वाटायला लागली, म्हणून सांभाळून घेतले? आणि शेवटी थोडे का होईना, त्यांच्यामागे फरफटत जाणे भाग पडले? मात्र अगदीच गळ्यापर्यंत आले तेव्हा त्यांनी निकराचा प्रयत्न केला? त्या नादात पक्ष फुटला, पण स्वतःला बुडण्यापासून वाचवले आणि आता पुन्हा सावरण्यासाठी धडपड करत आहेत? स्वतःला व पक्षाला सावरण्याची इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये जबरदस्त आहे, पुन्हा नव्याने पक्ष उभारण्याची उमेदही निश्चितच आहे. पण वय त्यांच्या बाजूला नाही आणि विरोधात असलेली भाजप ही शक्ती बलाढ्य आहे, पाताळयंत्रीही आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, विरोधकांशी लढणे सोपे असते, कारण ते आनंददायक असते. स्वकीयांशी लढणे कितीतरी अवघड असते, कारण ते उमेद खचवणारे असते. तसे लढणे छत्रपती शिवाजी महाराजांना अवघड गेले आणि महात्मा गांधींनाही कठीणच गेले. शरद पवारांसाठी ते महाकठीण आहे, जरी त्यांना जाणता राजा हे संबोधन पूर्वी लावले जात होते तरी!

(लेखक साप्ताहिक ‘साधना‘ चे संपादक आहेत) 

9850257724

Previous articleसॉफ्ट हिंदुत्वाचा लाभ काँग्रेसला होणार नाही!
Next articleकलीयुगातील शापित शकुंतलेचा वनवास संपणार!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.