हिंदुत्ववाद्यांचे तीन प्रवाह

(साभार- साप्ताहिक ‘साधना’)

-हमीद दलवाई

वस्तुस्थिती अशी आहे की, सावरकरांची विज्ञाननिष्ठा ही हिटलरच्या जातीची होती. जीनांची तथाकथित आधुनिकतादेखील याच जातीची होती. दुसऱ्यावर मात करणे, दुसऱ्यांना आपल्या धाकाखाली नमविणे याकरिता त्यांना शास्त्रांचा आणि ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा होता. कोणी तरी प्रबळ असणारच असेल आणि सबळ दुर्बलांवर मात करतात असे असेल; तर आपण सबळ का होऊ नये, असे सावरकरांनी कित्येकदा म्हटले आहे. मोठा मासा छोट्या माशाला गिळतो, हे उदाहरण त्यांनी कित्येक वेळा दिलेले आहे. मोठा मासा छोट्या माशाला गिळतो हे खरे, परंतु माणूस म्हणजे मासा नव्हे. माशांचे नियम माणसाला लावता येत नाहीत, हे सावरकरांना कळलेले नाही. जगात समतेचा-न्यायाचा जो प्रवाह आहे, त्याविरुद्धच हे सावरकरांचे तत्त्वज्ञान होते.

………………………………………………………………………………………………..

मुस्लिम जातीयवादाच्या उग्र स्वरूपाला दंड थोपटून आव्हान देण्याचा प्रयत्न करणारा एक हिंदू वर्ग अस्तित्वात आला आहे. हा वर्ग स्वत:ला हिंदुत्ववादी या नावाने ओळखतो. मुस्लिम समाजाचे सर्वंकष आक्रमण हिंदू समाजावर होत आहे, ते परतवून लावणे, शक्यतो मुस्लिम समाजाचा पाडाव करणे, मुस्लिम आक्रमणाने मलिन झालेली सिंधूपर्यंतची ही भूमी पुन्हा भारतमातेला जोडणे हे आपले परम कर्तव्य आहे- अशी श्रद्धा हिंदुत्ववादी मंडळी बाळगून असतात.

मुस्लिम समाजाच्या संकुचित धर्मवादाला आणि जातीयवादाला विरोध करणे हे काही पाप नाही. पण या विरोधाचे स्वरूप कोणते असावे, हा प्रश्न आहे. धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्थेच्या चौकटीत मुस्लिम समाजाच्या धर्मनिरपेक्षताविरोधी वर्तनाला विरोध करीत राहणे हा एक मार्ग ठरतो. तसे केले तर आपण आपोआपच धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्थेची चौकट बळकट करण्याच्या प्रक्रियेला हातभार लावतो. तेव्हा आपण धर्मनिरपेक्ष असतो, समाजव्यवस्थेचे आपले निकषच धर्मनिरपेक्षतेचे असतात. पण हिंदुत्ववाद्यांचा मुस्लिम धर्मवादाला आणि जातीयवादाला होणारा विरोध या मार्गात बसत नाही. कारण एक तर धर्मनिरपेक्षतेची चौकट त्यांना मान्य नाही. धर्मनिरपेक्षता याचा मुस्लिम अनुनय असा सोइस्कर अर्थ त्यांनी लावून घेतला आहे. आपली एक वेगळी विचारसरणी आहे आणि धर्मनिरपेक्षतेची विचारसरणी ही आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मुळाशी येत आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. थोडक्यात, मुस्लिम जातीयवादाच्या संरक्षणाचा पहिला तट धर्मनिरपेक्षतेची राजवट हा आहे आणि तो जमीनदोस्त केल्याखेरीज मुस्लिमांशी सरळ दोन हात करता येणार नाहीत, असेच ते मानीत आले आहेत.

मुस्लिम समाज इथे अस्तित्वात नसता तर हिंदुत्ववाद्यांनी धर्मनिरपेक्षतेविषयी कोणती भूमिका घेतली असती? पाकिस्तानात हिंदू फारसे अस्तित्वात नाहीत, इतर प्रबळ अल्पसंख्याकही अस्तित्वात नाहीत आणि तरीही तिथे इस्लामी राज्य स्थापन करण्याची आकांक्षा बाळगणारे सामर्थ्यवान मुस्लिम पक्ष अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे भारतात मुस्लिम समाज अस्तित्वात नसता तरी धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था हे या देशाचे ध्येय राहिले असते आणि या ध्येयाला विरोध करणारे हिंदुत्ववादी अस्तित्वात असतेच.

हा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करणे आवश्यक आहे. धर्मनिरपेक्षताविरोधी मुस्लिम प्रवृत्तींशी आमचा झगडा आहे, इतकेच म्हणून हिंदुत्ववादी मंडळी थांबत नाहीत; ‘मुस्लिम परके आहेत’, ही या विरोधामागची भूमिका आहे. बाहेरून ते येथे आले, येथील भूमी त्यांनी जिंकली, येथील हिंदूंना बाटवून मुसलमान केले, येथे अन्यायाने राज्य केले; हा इतिहासाचा क्रम पुन्हा उलटा फिरवायचा आहे, ही ईर्ष्या हिंदुत्ववाद्यांच्या बोलण्यातून व लेखनातून व्यक्त होते, तेव्हा काही प्रश्न सहजच उपस्थित होतात. एक तर मुस्लिम समाजाच्या सध्याच्या वागण्यापुरता त्यांचा आक्षेप मर्यादित नाही. मुस्लिम समाजाच्या अस्तित्वालाच त्यांचा विरोध आहे, ही वृत्ती ते कळत-नकळत व्यक्त करीत असतात. त्यांना धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था मान्य नाही. उलट हिंदू राज्य किंवा हिंदूंचे वर्चस्व असलेले राज्य अस्तित्वात यावे, असे त्यांना वाटते. म्हणजे व्यक्तींची समानता त्यांना अमान्य आहे. बहुधा चातुर्वर्ण्याधिष्ठित समाजव्यवस्था भारतात असावी, या श्रद्धेने ते पछाडलेले आहेत. हिंदूंची राज्यव्यवस्था याचाच अर्थ चातुर्वर्ण्याधिष्ठित राज्यव्यवस्था असा घ्यावयाचा आहे. एरवी हिंदुत्ववाद्यांत उच्चवर्णीयांचा आणि चातुर्वर्ण्यवाद्यांचा भरणा का असावा?

हिंदुत्ववादी म्हणवणारी ही मंडळी पुन्हा वेगवेगळ्या विचारसरणींत विभागली गेली आहेत. वैदिक काळाला आदर्श मानणारे आर्यसमाजी, चातुर्वर्ण्याच्या चौकटीवर श्रद्धा ठेवणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू राष्ट्रवादाच्या प्रेरणा लाभलेले हिंदू महासभावादी अशा तीन वर्गांत स्थूलमानाने हिंदुत्ववादी विभागले गेलेले आहेत. हिंदू राज्याची घोषणा करणारा रामराज्य पक्ष आता संपुष्टात आल्यामुळे त्याचा वेगळा विचार करण्याचे कारण नाही.

हिंदुत्ववाद्यांतील हे तीन प्रवाह तीन व्यक्तींनी घातलेल्या भिन्न वैचारिक पायांवर आधारलेले आहेत. स्वामी दयानंद हे आर्य समाजाचे प्रणेते होते आणि के.ब.हेडगेवार व मा.स.गोळवलकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पाया दृढ केला आहे. हिंदू राष्ट्रवादाच्या, हिंदू महासभेच्या घोषणेचे जनक वि. दा. सावरकर होते. हिंदुत्ववाद्यांच्या ज्या चळवळी होत्या किंवा अस्तित्वात आहेत, त्या प्रामुख्याने या तीन व्यक्तींच्या सिद्धान्तांवर आधारलेल्या आहेत.

त्यातील आर्य समाजाचा प्रभाव पंजाब व उत्तर प्रदेशाचा पूर्व विभाग यात एके काळी खूप होता आणि आजही आहे. गुजरातेत जन्मलेल्या स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाने पंजाबमध्ये मूळ धरावे याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पंजाबमधील त्या वेळच्या सामाजिक स्थितीत याचे उत्तर सापडेल. आपल्या विशिष्ट स्वभाववैशिष्ट्यांमुळे पंजाबात मुसलमान आणि शीख समाज ठसठशीतपणे उठून दिसत होते. पंजाबमधील हिंदू समाजात ह्या वैशिष्ट्यांची उणीव होती, त्या मानसिक अस्वस्थतेमध्ये आर्य समाजाच्या शिकवणीमुळे ही उणीव भरून निघेल, असे त्याला वाटले. आणि आपल्याला आपल्या अस्मितेची एक नवी खूण मिळाली, या हिंदूंमध्ये निर्माण झालेल्या भावनेमुळे पंजाबमधील हिंदू समाजात आर्य समाजाने मूळ धरले.

स्वामी दयानंद यांनी ‘सत्यार्थप्रकाश’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ म्हणजे बायबल, कुराण इत्यादी इतर धर्मग्रंथांची निंदा-नालस्ती आहे. युक्तिवाद त्यात भरपूर आहेत. धार्मिक आवाहन कमी आहे. स्वामीजींनी वेदकाळ हा हिंदूंचा आदर्श किंवा सुवर्णकाळ मानला आहे. त्यामुळे वेदकाळापर्यंत मागे जाणे अपरिहार्य ठरले. वेदकाळात जातिसंस्था नव्हत्या, मूर्तिपूजा नव्हती; यामुळे मूर्तिपूजा आणि जातिव्यवस्था हटविण्याची मोहीम आर्य समाजाने आरंभली. एका परीने आर्य समाजाने हिंदू समाजात अंतर्गत सुधारणा निश्चितपणे घडवून आणल्या, परंतु खिलाफत चळवळीच्या काळात झालेल्या दंगली आणि स्वामी श्रद्धानंदांचा एका मुसलमानाने केलेला खून यामुळे आर्य समाजिस्ट लोक कडवे मुस्लिमविरोधक बनले. असे म्हणता येईल की, या दोन घटना घडल्या नसत्या तरी आर्य समाजिस्ट मुस्लिमविरोधी बनलेच असते. कारण गतेतिहासाच्याही मागे जाऊ पाहणाऱ्या ईर्ष्येचा, मागे जाण्याचा तो अनिवार्य परिपाक होता. आज आर्य समाजिस्ट फारसे प्रभावी राहिले नाहीत. पंजाबमध्ये फाळणी झाल्यानंतर परिस्थितीच बदलली आणि शीख-हिंदू तणाव सुरू झाले. आर्य समाजिस्टांनी शीखविरोधाचे राजकारणही सतत केले आहे. यामुळे पंजाबी सुभ्याच्या मागणीच्या वेळी या मागणीला विरोध करणाऱ्यांत आर्य समाजिस्ट आघाडीवर होते. बहुतेक आर्य समाजिस्ट आता जनसंघात गेले आहेत. काही काँग्रेसमध्येही आहेत. (1972 मध्ये हरियानाच्या आर्य समाजिस्ट असलेल्या शिक्षणमंत्र्यांनी मुला-मुलींनी संयुक्त शिक्षण घेण्याच्या पद्धतीवर बंदी हुकूम घातला. काँग्रेसमधील हे आर्य समाजिस्ट काँग्रेसच्या अधिकृत धोरणाविरुद्ध अधूनमधून अशा प्रकारे वागताना दिसतात.)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली, तेव्हा युरोपात फॅसिझमच्या उदयाचा काळ होता. इटलीत मुसोलिनीने सत्ता काबीज केली होती आणि जर्मनीत हिटलर प्रबळ होत होता. या अतिरेकी राष्ट्रवादी चळवळींचा परिणाम म्हणजे धर्मवादावर आधारलेल्या स्वयंसेवक संघटना होत. हिंदूंत अशी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने उभी राहिली. मुसलमानांत खाकसार या नावाने उदयाला पावली. (डॉ.अल्लामा मश्रिकी हे खाकसार संघटनेचे सूत्रधार होते. ते बर्लिन विद्यापीठाचे पदवीधर होते.) युरोपातील राष्ट्रीय चळवळीचे वेडेवाकडे परिणाम भारतातील धार्मिक चळवळीवर होणे स्वाभाविक होते. कारण येथे प्रादेशिक राष्ट्रभावना पुरेशी बळकट झालेली नव्हती, हिंदू-मुस्लिम तणाव होते. आणि राष्ट्रवादाला धर्मवादाचे अधिष्ठान दिल्याखेरीज त्या संघटना वाढणे मुश्किलीचे होते. डॉ. हेडगेवार यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटनाही या पायावर उभी राहिली आणि वाढली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील इतिहासाकडे मागे नजर लावली होती. पण मुसलमानांकडे बघण्याचा दृष्टिकोन आर्य समाजाशी मिळता-जुळता असला तरी हिंदू समाजाच्या स्वरूपाविषयी या दोन संघटनांत मतभेद होते. चातुर्वर्ण्य हा स्वयंसेवक संघाचे सरसंचालक श्री.गोळवलकर गुरुजी यांनी हिंदू धर्माचा पाया मानला होता. आंतरजातीय विवाहांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीच उत्तेजन दिले नाही. गोळवलकर गुरुजी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने वेदकाळ आदर्श ठरतो. दुर्दैवाने हिंदूंच्या अध:पतनाचा तो काळ होता, तो हिंदूंचा आदर्श काळ समजून ते कवटाळून बसले- अजूनही बसलेले आहेत. मात्र मुस्लिम हे आक्रमक आहेत, परके आहेत, त्यांना घालवून दिले पाहिजे, त्यांचे आणि हिंदूंचे कधीच पटणार नाही- ही गोळवलकरांची मते ठाम होती. आपल्या ‘We or Our Nationhood defined’ या पुस्तकात त्यांनी हिटलरने ज्यूंच्या केलेल्या ससेहोलपटीची स्तुती केली आहे. ते म्हणतात, ‘दोन सांस्कृतिक गटांचे पटत नसेल तर एकाने दुसऱ्याला घालवून देण्यात काहीच गैर नाही. भारताने आपल्यासमोर हे उदाहरण ठेवले पाहिजे.’

खाकसार आणि अहरार इत्यादी मुस्लिम संघटना दंगलींना उघड-उघड उत्तेजन देत आणि दंगली घडवून आणीत, हे मागच्या विवेचनात आलेच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दंगली क्वचितप्रसंगी घडवून आणीत असावा, असे मानण्याइतका पुरावा उपलब्ध आहे. सांगलीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलेले एक मित्र सांगतात, ‘‘सांगलीतल्या किमान दोन दंगली संघवाल्यांनी घडवून आणल्या हे मला माहीत आहे.’’ (हे मित्र आपले अनुभव साहित्यरूपाने प्रकट करणार असल्यामुळे त्यांचे नाव जाहीर करणे मी इष्ट मानीत नाही.)

वि.दा. सावरकर हे हिंदुत्ववाद्यांतील अग्रणी होते. त्यातल्या त्यात तुलनेने ते आपल्या विचारांना शास्त्रीय बैठक देत होते. त्यांना अस्पृश्यता अमान्य होती. चातुर्वर्ण्य मान्य नव्हते. खरे तर ते ईश्वराचे अस्तित्वही मान्य करीत नव्हते. विज्ञानाची कास धरण्यामुळेच समाजाची प्रगती होईल, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यांना हिंदू धर्माचे राज्य अभिप्रेत नव्हते आणि तरीही भारत हे हिंदू राष्ट्र आहे, ही घोषणा त्यांनीच केलेली आहे. सनातान्यांचे विरोधक सावरकर हे अशा तऱ्हेने हिंदू राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. या बाबतीत त्यांची तुलना जीनांशीच होऊ शकते.

आता सावरकर हयात नाहीत आणि त्यांनी जोपासलेला हिंदू महासभा हा पक्ष जवळजवळ संपुष्टात आला आहे, परंतु महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजात सावरकरांच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव आहे. आणि महाराष्ट्रात जनसंघाच्या मागे ब्राह्मण समाज एकमुखाने उभा राहण्याचे कारण सावरकरांचा वैचारिक प्रभाव निश्चितपणे आहे.

सावरकरांच्या विचारांची दिशा स्पष्टपणे समाजवून घेणे येथे आवश्यक ठरेल. ह्यामुळे या देशाचा राष्ट्रवाद, सामाजिक उभारणी, शासकीय स्वरूप यांच्याविषयी हिंदुत्ववाद्यांच्या कल्पना प्रातिनिधिक स्वरूपात लक्षात येतील. या दृष्टीने सावरकरांनी 1937 मध्ये अहमदाबाद येथे हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून केलेले भाषण त्यांच्या विचारसरणीचा ठाव घेण्यास पुरेसे आहे. त्या वेळी मुस्लिम समाजाच्या मागण्या ‘आम्हाला आमच्या संख्येपेक्षा अधिक प्रतिनिधित्व असावे,’ ह्या स्वरूपाच्या असत. सावरकरांनी मुसलमानांना अधिक प्रतिनिधित्व द्यायला या भाषणात विरोध केला आहे. माणशी एक मत या न्यायाने राज्यकारभार चालला पाहिजे, असे ज्या तऱ्हेने आपण म्हणतो; त्या तऱ्हेने (अखंड भारतातील) पंचवीस टक्के मुसलमानांना पंचवीस टक्केच प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे त्यांनी आग्रहाने म्हटलेलेे आहे. भारत सर्व धर्मीयांचे होईल, प्रत्येकाला त्यात समान अधिकार राहील, असेही त्यात म्हटलेले आहे. परंतु पुढे त्यांनी गमतीदार घोटाळे केले आहेत. ते म्हणतात की- हे ‘हिंदू राष्ट्र’ होईल आणि ‘सीमा’ प्रांताच्या (त्या वेळच्या वायव्य सरहद्द प्रांताच्या) अफगाण सीमेवर अफगाणांनी (म्हणजेच मुसलमानांनी) पठाणांनी भारताविरुद्ध उठाव करू नये, म्हणून या हिंदू राष्ट्राचे सामर्थ्यवान हिंदू सैन्य सीमेवर सुसज्ज असेल.

येथे काही प्रश्न मनात उपस्थित होतात. व्यक्तींची समानता असणारे हिंदू राष्ट्र होणार होते, म्हणजे काय होणार होते? सीमेवर हिंदू सैन्य उभे राहणार होते म्हणजे मुसलमानांना सैन्यात प्रवेश नव्हता काय? असे असल्यास ते व्यक्तींच्या समानतेचे राज्य कसे होते? लोकशाही राज्यव्यवस्था होणार की नाही? अखंड भारतात पाच मुस्लिम बहुसंख्याक प्रांत राहिले असते. यामुळे तेथील कारभारात स्वाभाविकपणे मुसलमानांचा वरचष्मा असता. या पाच प्रांतांत लोकमतानुसार कारभार चालणार होता, की मध्यवर्ती प्रबळ हिंदू सरकारचा कारभार राहणार होता? भारताची राज्यव्यवस्था कोणत्या स्वरूपाची असणार होती? या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप कोणते राहणार होते?

सावरकरांनी अनेकदा विज्ञानावर भर दिलेला आहे, परंतु राष्ट्रउभारणीच्या संदर्भात औद्योगिकीकरणाला फार महत्त्व प्राप्त होते आणि त्यांच्या सर्व लिखाणात औद्योगिकीकरणाचा, शेतीविकासाचा व अर्थविषयक बाबींचा उल्लेखही आढळत नाही. तरीही भारताने एक कोटींचे सैन्य उभारले पाहिजे, असे ते म्हणत. आज जगात कोणत्याही राष्ट्राने एवढे प्रचंड सैन्य उभे केलेले नाही. अगदी शीत युद्धाच्या तणातणीच्या काळात रशिया व अमेरिकेचे सैन्य अनुक्रमे चाळीस लाख व सत्तावीस लाख असे होते. आणि औद्योगिक दृष्ट्या ही जगातील दोन बलाढ्य राष्ट्रे आहेत, हे ध्यानात घेतले पाहिजे. चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षा अधिक आहे आणि तरीही चीनचे सैन्य आज चाळीस लाखांच्या आसपास आहे. मग एक कोटी सैन्य भारताने कसे उभे करायचे? त्यांना अन्न कोठून द्यायचे? त्यांना शस्त्रे कोठून आणायची? सावरकरांना या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज कधी भासली नाही, कारण त्यांचे राखीव अनुयायी त्यांच्या विधानांवर टाळ्या पिटीत राहिले. त्यांनी कधी सावरकरांनी मांडलेल्या विचारांच्या शक्याशक्यतेचा विचारच केलेला नाही. या देशाची अर्थव्यवस्थाच अप्रगत अवस्थेत होती आणि आजही ती काही अंशी तशीच आहे. तिला गती आणणे, हाच देशाला सामर्थ्यवान करण्याचा एकमेव मार्ग आहे. अमेरिकेची ताकद अमेरिकेच्या अफाट शेती उत्पादनात आणि औद्योगिक शक्तीत आहे. अमेरिकेचे सैन्य हे त्या औद्योगिक आणि शेतीविषयक ताकदीचे प्रतीक आहे. केवळ सैन्य वाढवून देश सामर्थ्यवान होत नाही; स्वयंभू अर्थव्यवस्था निर्माण केल्यानेच देश सामर्थ्यवान होईल, हे सावरकरांना कधी उमगलेच नाही.

वस्तुत: या देशात समानता असेल आणि हिंदू राष्ट्रही असेल, या परस्परविरोधी विधानांचा विचार केला की, सावरकरांचा वैचारिक दृष्टिकोन स्पष्ट होतो आणि तो म्हणजे मध्ययुगीन प्रेरणांवर आधुनिक विज्ञानाचे केलेले कलम अशी त्याची घडण आहे, असे वाटू लागते.

सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचाही नीट विचार होणे आवश्यक आहे. ते आधुनिक होते, अस्पृश्यतेला विरोध करीत होते, हिंदू जातिव्यवस्थेच्या विरुद्ध होते. पण त्यांना अभिप्रेत असलेला आधुनिकतावाद हिंदू समाज सामर्थ्यशाली व्हावा आणि त्याने इतरांवर मात करावी याकरता आहे. ‘मोठा मासा छोट्या माशाला गिळतो, बलवानच जगात शिल्लक उरतो-’ अशाच प्रकारची वाक्ये त्यांच्या लिखाणात किंवा भाषणात सतत  विखुरलेली आहेत. मोठा मासा छोट्या माशाला गिळतो, ही एक कटू वस्तुस्थिती झाली; परंतु मोठ्या माशाने छोट्या माशाला गिळू नये, छोट्या माशालाही जगता आले पाहिजे, ही भूमिका मांडणे आणि तिचा आग्रह धरणे हा आजच्या जगात समानतेचे युग आणण्याच्या प्रयत्नाचा भाग होतो. या बाबतीत सावरकर कोणत्या पक्षाचे होते?

हिंदूंनी बलिष्ठ व्हावे, असे म्हणायला कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. हिंदूंनी विज्ञाननिष्ठ बनावे म्हणजे त्यांना आधुनिक हत्यारे वापरता येतील व इतरांचा पाडाव करता येईल, असे त्यांचे प्रतिपादन आहे. अस्पृश्यता हटवायची ती हरिजनांना मूलभूत हक्क लाभावेत म्हणून नव्हे, तर हिंदूंनी बलिष्ठ व्हावे म्हणून. या दृष्टमुळे ते जीनांच्या जवळ येतात. जीनांची आधुनिकता आणि सावरकरांची आधुनिकता यात पुष्कळ साम्य आहे. सावरकरांच्या आधुनिकतेला मुस्लिमविरोधाची बैठक लाभलेली आहे. या त्यांच्या आधुनिक विचारांच्या बैठकीचा संदर्भ  ध्यानी घेतला म्हणजे त्यांना मुस्लिम समाजाची भीती वाटत होती, हे लक्षात येते. भारतीय मुस्लिम समाजाच्या तीनपट मोठा असलेला हिंदू समाज कालांतराने नष्ट होणार आहे, मुसलमान समाज त्याला गिळंकृत करणार आहे, अशा भीतीने ते पछाडलेले होते. मग अफगाणितस्तान भारतीय मुसलमानांच्या संगनमताने भारतावर हल्ला करणार आहे, असे त्यांना वाटू लागले आणि ते भारतीय वृत्तपत्रांतून अफगाणिस्तानच्या अमीराला हल्ला न करण्याची ताकीद देत. त्याला असाही इशारा देत की, ‘आम्ही एकटे नाही. नेपाळ हे हिंदू राष्ट्र आमच्या मदतीला धावून येईल.’ राष्ट्रवादाच्या प्रेरणांविषयी कमालीचे अज्ञानी असलेल्या सावरकरांची ही विधाने हास्यास्पद होती. पुढे फाळणी झाल्यानंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान संंबंध दुरावले आणि अफगाणिस्तान भारताच्या जवळ आले; तर नेपाळ-भारत संबंध हळूहळू तुटक-तुटक होत गेले आणि भारत-पाक वादात अधूनमधून ते पाकच्या बाजूने उभे राहू लागले. नेपाळ काय किंवा अफगाणिस्तान काय, ही दोन्ही राष्ट्रे आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांनुसार आपली धोरणे आखीत असतात, परंतु या प्रेरणा सावरकरांना कधी उमगल्या नाहीत. म्हणून ते आपल्या कोशातच राहिले आणि त्यांचे आकर्षण महाराष्ट्रातील ब्राह्मणांभोवती मर्यादित राहिले.

महाराष्ट्रातील ब्राह्मणांना सावरकरांचे आकर्षण वाटणे साहजिकच होते. कारण उत्तर भारतातील मुसलमानांप्रमाणेच सत्ता व ऐश्वर्य भोगलेला हा वर्ग आहे. पेशवाईची स्वप्ने अधूनमधून त्यांना पडतातच. सावरकरांनी या स्वप्नांना वाट करून दिली आणि म्हणून ते त्यांचे नेते बनले. सावरकरांनी पेशव्यांच्या इतिहासावर कधीही टीका केलेली नाही, हे इथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी शिवाजीमहाराजांवर टीका केलेली आहे. महाराजांनी मुसलमानांना बाटवून हिंदू करून का घेतले नाही, असा त्यांचा त्यांच्यावर आक्षेप आहे. खरे म्हणजे पेशव्यांनीही तसे काही केलेले नाही. उलट पानिपतच्या लढाईत पेशवाईला फार हादरा बसला. अब्दालीच्या स्वारीच्या वेळी पेशव्यांनी केलेल्या राजनैतिक आणि लष्करी डावपेचांच्या चुकांविषयी इतिहासकारांनी खूप लिहिले आहे. सावरकरांनी मात्र या सर्व ब्राह्मणी इतिहासाची टिमकी वाजविण्याचा प्रयत्न केला आहे. एरवी सदाशिवभाऊ दिल्ली जिंकल्यानंतर दिल्लीच्या तख्तावर विश्वासरावांना बसविणार होते, अशी मसलत झाली होती- अशा भाकडकथा सावरकरांनीं लिहिल्या नसत्या. ही विधाने करताना त्यांना काही ऐतिहासिक पुरावा देण्याची आवश्यकता भासली नाही. आपल्या अंध ब्राह्मणभक्तीचे असे हास्यास्पद प्रदर्शन सावरकरांनी केलेले आहे. तरीही सावरकर हे सावरकरभक्तांकडून सामाजिक समानतेचे पुरस्कर्ते समजले जातात.

सावरकरांच्या या अंध मुस्लिमविरोधाचे स्वरूप नीट समजावून घेतले पाहिजे. आरंभीच्या सशस्त्र क्रांतीच्या प्रेरणेने भारावलेल्या काळात ते मुस्लिमविरोधक नव्हते. 1857 च्या युद्धावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात मुस्लिमविरोधाचा अंशही आढळत नाही. ‘अभिनव भारत’ या तरुणपणी स्थापन केलेल्या क्रांतिकारकांच्या संघटनेत तर शिकंदर हयातखान हेदेखील होते. पुढे अंदमानला कैद्यांवर मुस्लिम पहारेकरी अत्याचार करताना त्यांनी पाहिले आणि त्यामुळे ते हळूहळू मुस्लिमविरोधी झाले. मुस्लिम समाजासंबंधी त्यांनी आक्षेप घेणे चुकीचे नव्हते. मुस्लिम समाजाचा धर्मवाद, जातिवाद याबाबत सावरकरांशी मतभेद होण्याचे कारण नाही. (प्रस्तुत पुस्तकात त्याचे विवेचन झालेले आहे.) हिंदूंत तशीच समान आंदोलने प्रबळ असतील, तरच मुस्लिम जातिवादाला आळा बसेल, अशी त्यांची चुकीची मते होती. म्हणूनच पाकिस्तानची घोषणा झाल्यानंतर सावरकरांनी हिंदू राष्ट्राची घोषणा केली. देशात पंचवीस टक्के मुसलमान राहतात, त्यांच्या पाकिस्तानच्या मागणीला विरोध करताना त्यांना राष्ट्रवादात सामावून कसे घ्यायचे, या संबंधात सावरकरांनी काहीच म्हटलेले नाही. पाच प्रांतांत बहुसंख्याक असलेले मुसलमान धाकदडपशाहीने नमले असते, अशी त्यांची रम्य कल्पना होती. या मुसलमानांना बदलायचे कसे, यासंबंधीदेखील ते काही सांगत नाहीत. मात्र ते बदलले पाहिजेत, असा ते आग्रह धरतात आणि कौतुकाने केमाल पाशाचे उदाहरण सांगतात. ‘मुसलमान हा एक समाजघटक आहे आणि त्याला सामाजिक स्थित्यंतराचे नियम लागू आहेत,’ हे त्यांनी कधी लक्षात घेतले नाही. बदलत्या इतिहासाची दखलही ते घेताना दिसत नव्हते. आणि हिंदू-मुसलमान समाजाच्या स्थित्यंतराची ते लावीत असलेली मापे दुटप्पी होती.

अस्पृश्यता ही रूढी बदलण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणत असत. म्हणजे समाजबदलाच्या नियमाप्रमाणे हिंदू समाजाला अवधी देण्याची त्यांची मागणी होती. पण मुसलमानांना मात्र हा निकष लागू नव्हता. त्यांची चीड जगात होणाऱ्या कुठल्याही अन्यायाविरुद्ध नव्हती; मुसलमानांनी हिंदूंवर अन्याय करू नये, एवढी ती मर्यादित होती. हिंदूंनी हिंदूंवर सतत अन्यायच केलेले आहेत, परंतु याची पोटतिडीक त्यांच्या लिखाणात वा भाषणात कधी जाणवली नाही. एकदा डॉ.आंबेडकरांनी मुसलमान होण्याची धमकी दिली. तेव्हा सावरकरांनी त्यांना मुसलमान होण्यापासून परावृत्त करण्याविषयी जे पत्र लिहिले, ते मासलेवाईक आहे. त्या पत्रात सावरकरांनी इतिहासातील एका घटनेचा दाखला दिला आहे. कुठल्या तरी मुस्लिम राजाने केलेल्या आक्रमणाच्या वेळी हिंदू धर्मरक्षणार्थ हरिजन कसे बेभान होऊन लढले याचे त्यात रसभरीत वर्णन आहे. वस्तुत: हरिजन हे हिंदूंचे गुलाम होते. या गुलामांनी केलेल्या हिंदू धर्माच्या रक्षणाची फुशारकी सावरकरांनी मारावी, ही गंमत आहे. हरिजनांनी ब्राह्मणांच्या लढाया लढवाव्यात आणि त्यांच्या दास्यमुक्तीसाठी कोणी टाहो फोडला तर त्याला सबुरीचा सल्ला द्यावा, असा हा खास ब्राह्मणी खाक्या होता.

सावरकरांचा प्रभाव आता वैचारिक दृष्ट्या महाराष्ट्रात ब्राह्मणवर्गापुरता मर्यादित राहिला आहे. त्यांनी गोहत्येचे समर्थन केले आहे. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात सामाजिक सुधारणेचे काही लेख त्यांनी लिहिले. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या सामाजिक सुधारणेचे कार्य जरी अंगीकारले, तरी त्यांचे ऋण त्यांनी फेडले असे होईल; परंतु तसे होत नाही. आज त्यांचेच अनुयायी गोहत्याबंदीची चळवळ करताना दिसत आहेत. सावरकरांचे हे खरे अपयश आहे. कारण त्यांच्या मागे येणारी मंडळी तशी विज्ञाननिष्ठ नव्हतीच. सावरकरांच्या मुस्लिमविरोधामुळे ही सनातनी मंडळी सावरकरांकडे आकर्षित झालेली होती. त्यांना सावरकरांच्या इतर कार्याचे काही अगत्य नव्हते. यामुळे जनसंघाला पुढे महाराष्ट्रातील ब्राह्मणांत प्रचंड प्रमाणात रंगरूट मिळावयास सावरकरांचे तत्त्वज्ञान उपयोगी पडले.

वस्तुस्थिती अशी आहे की, सावरकरांची विज्ञाननिष्ठा ही हिटलरच्या जातीची होती. जीनांची तथाकथित आधुनिकतादेखील याच जातीची होती. दुसऱ्यावर मात करणे, दुसऱ्यांना आपल्या धाकाखाली नमविणे याकरिता त्यांना शास्त्रांचा आणि ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा होता. कोणी तरी प्रबळ असणारच असेल आणि सबळ दुर्बलांवर मात करतात असे असेल; तर आपण सबळ का होऊ नये, असे सावरकरांनी कित्येकदा म्हटले आहे. मोठा मासा छोट्या माशाला गिळतो, हे उदाहरण त्यांनी कित्येक वेळा दिलेले आहे. मोठा मासा छोट्या माशाला गिळतो हे खरे, परंतु माणूस म्हणजे मासा नव्हे. माशांचे नियम माणसाला लावता येत नाहीत, हे सावरकरांना कळलेले नाही. जगात समतेचा-न्यायाचा जो प्रवाह आहे, त्याविरुद्धच हे सावरकरांचे तत्त्वज्ञान होते. त्यामुळे पेशवाईच्या इतिहासाचा अहंकार बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने आत्मसात केलेली ही आधुनिकता दुटप्पी आहे. तो मांसाहार करतो- नव्हे, बाहेर क्वचित काही ब्राह्मण गोमांसही भक्षण करतात. जनसंघाच्या सनातन धर्मप्रवृत्तीवर क्वचितच त्याचा विश्वास असेल. कुठलीच व्रतवैकल्ये तो करीत नाही आणि एक ऋचादेखील त्याला म्हणता येत नाही. तरीही महाराष्ट्रात जनसंघाचा तोच अनुयायी आहे. ही दुटप्पी आधुनिकता हा सावरकरांनी महाराष्ट्राला दिलेला वारसा आहे. एका परीने सुशिक्षित मुसलमान नमाज पढत नाहीत, धर्म जाणत नाहीत आणि कमालीचे हिंदुद्वेषी आहेत; त्यांच्याशी महाराष्ट्रातील या ब्राह्मणवर्गाचे साम्य आहे. एक वर्ग जीनांची भलावण करतो, तर दुसऱ्याची सावरकरभक्ती जाणवण्यासारखी आहे.

 (लेखक कथाकार व  मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे.संस्थापक होते)

(1932 ते 77 असे 45 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या हमीद दलवाई यांनी अखेरच्या काळात जे पुस्तक लिहिले त्याचे नाव- ‘राष्ट्रीय एकात्मता व भारतीय मुसलमान’. आजारपणामुळे त्यांना त्यावर शेवटचा हात फिरवता आला नाही आणि काही भर टाकावयाची होती, तीही टाकता आली नाही. त्यामुळे ते पुस्तक त्यांच्या हयातीत प्रकाशित होऊ शकले नाही. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर 25 वर्षांनी म्हणजे 2002 मध्ये मेहरुन्निसा दलवाई यांनी ते हस्तलिखित ग.प्र.प्रधान व भाई वैद्य यांच्या स्वाधीन केले. त्यांनी ते साधना प्रकाशनाकडून आणले, त्याच्या दोन आवृत्त्या साधनाकडून आल्या. तिसरी आवृत्ती सुगावा प्रकाशनाकडून आली. आणि आता चौथी आवृत्ती पुन्हा साधना प्रकाशनाकडून येत्या 3 मे रोजी (दलवाईंचा स्मृतिदिन) प्रकाशित होत आहे. त्या पुस्तकातील ‘हिंदुत्ववाद’ या अखेरच्या लेखातील पूर्वार्ध येथे प्रसिद्ध करीत आहोत. हा भाग येथे घेण्यासाठी एक औचित्य पुस्तकाची नवी आवृत्ती येत आहे हे तर आहेच; पण दुसरे औचित्य अधिक महत्त्वाचे आहे, ते म्हणजे हिंदुत्ववादाच्या नावाखाली पुन्हा एकदा हा देश उन्मादावस्था अनुभवतो आहे.- संपादक, साप्ताहिक ‘साधना’)

Previous articleसिद्दी समाजाचा इतिहास आणि सिद्दींची चळवळ
Next articleआगे आगे चले हम, पीछे पीछे प्रीत मितवा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. हमीद दलवाई यांच्या विचाराची फार गरज मुस्लिम समाजाला आहे.
    खूप छान लेख .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here