TRP! TRP!! TRP!!!

-माणिक बालाजी मुंढे

……………….

जे लोक टीव्हीत काम करतात मग ते न्यूज चॅनल्स असोत की मनोरंजन वाहिन्या, त्यांच्यासाठी टीआरपी एवढा दुसरा आवडीचा शब्द नाही. त्यातल्या त्यात मोठ्या पोस्टवर म्हणजे ज्यांच्यावर कंटेट निर्माण करणे, योग्य कंटेट एअरवर टाकणे, लोकभावनेचा अचूक अंदाज घेणे, धोरण ठरवणे, निर्णय घेणे अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांच्यासाठी तर सगळ्या निर्णयाचा आधारच टीआरपी असतो. ह्या लोकांची नोकरीच टीआरपीवर अवलंबून असते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण सलग दोन ते तीन आठवडे टीआरपीत चॅनल मागे पडत गेलं किंवा घसरलं तर नोकरीवर टांगती तलवार आलीच म्हणून समजा.

पण टीआरपी म्हणजे काय?

टेलिव्हिजन रेटींग पॉईंटस. पुस्तकी व्याख्येत जाण्यात अर्थ नाही. टीआरपीचा साधा सरळ अर्थ म्हणजे टीव्हीवरचा एखादा कार्यक्रम नेमका किती लोकांनी पाहिला ते मोजणारी, सांगणारी व्यवस्था. काही वर्षापुर्वी हे काम टॅम(TAM) नावाची संस्था करायची आता बार्क(BARC) नावाची संस्था करते. ही सरकारी नाही तर जाहीरात देणाऱ्यांची संस्था आहे. म्हणजे उद्योगधंदावाल्यांची म्हटलं तरी चालेल.

टीआरपी मोजला कसा जातो ?

टीआरपी मोजतात कसा हा प्रश्न नेहमी विचारला जातो. आणि त्याचं उत्तर तेवढंच अवघड आहे, ते बऱ्याच जणांना न पटणारं आहे. टीव्हीच्या सेटमध्ये मिटर बसवलेले असतात आणि ते मीटर रकॉर्ड करतात की त्या घरानं, घरातल्या कोणत्या वयाच्या व्यक्तीनं कुठला कार्यक्रम, किती वेळ, किती दिवस, कशा पद्धतीनं बघितला आहे. त्यावरूनच प्रेक्षकांचा ‘ट्रेंड’ही शोधला जातो. टॅमच्या वेळेस बहुतांश मीटर हे शहरी भागात होते, त्यांची संख्याही कमी होती, त्यामुळे शहरी प्रेक्षकांना काय हवं काय नको ते ठरवूनच कार्यक्रमांची आखणी केली जायची. पण बार्कने मीटरही वाढवले म्हणजे सँपल साईजही वाढवली. ती ग्रामीण भागातही तेवढ्याच प्रमाणात नेली. त्यातून चॅनल्समध्ये ग्रामीण भागाच्या चवीचे कार्यक्रम टीव्हीवर आले. शहरी रूचीचे कार्यक्रम मागे पडले. सध्यस्थितीत देशात 44 हजार घरांमध्ये हे पीपल मीटर बसवलेलं आहे, त्यावरून 80 कोटी प्रक्षकांबद्दल भाष्य केलं जातं. एकट्या मुंबईत 2 हजार टीआरपी मीटर आहेत.

टीआरपीबद्दल वाद काय आहे?

टीआरपीबद्दलचा सर्वात मोठा वाद आहे ते मीटर. म्हणजे ज्या मीटरनं टीआरपी मोजला जातो किंवा रेकॉर्ड केला जातो ते मीटर अजून तरी कुणीही पाहिलेलं नाही. बरं ज्यांच्या टीव्हीत असा सेट बसवलेला आहे असा प्रेक्षक किंवा घरवालाही कधी समोर आलेला नाही जे हे सांगू शकेल की आमच्या घरातल्या टीव्हीला टीआरपीचं मीटर आहे. अगदी टीव्हीत तीस एक वर्ष काम केलेल्या संपादकानं किंवा टीव्ही चॅनल्सच्या मालकांनीही असे मीटर पाहिल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळे अनेक संपादक, चॅनल्सवाले टीआरपीला मानतच नाहीत. किंवा त्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करतात. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक वेळेस अनेक चॅनल्सनी प्रत्यक्षात मीटर दाखवण्याची मागणी केली पण ना टॅमनं ती पूर्ण केली ना आता ते बार्क करतंय. काही चॅनल्सनी तर ह्या व्यवस्थेविरोधात आवाज उठवला, काहींना कायदेशीर लढाईची धमकीही दिली पण फक्त सँपल साईज बदलली म्हणजे मीटर्स वाढवले. बाकी स्थिती जैसे थेच. साहजिक आहे काही हजार मीटरवरून काही कोटी प्रेक्षक काय बघतायत हे ठरवणं आणि ते प्रत्यक्षात मान्य करणं आणि त्यावरून एका इंडस्ट्रीतल्या मोठ्या वर्गाच्या जगण्या मरण्याचा प्रश्न दर गुरूवारी उभा रहाणार असेल तर पारदर्शकता यायलाच हवी. आपल्या देशात जाहीरातीचा उद्योग 40 हजार कोटींचा आहे. जो थेट टीआरपीशी संबंधीत आहे.

टीआरपी का महत्वाचा आहे ?

चॅनल्सचे मालक किंवा संपादकाने जरी म्हटलं की आम्ही टीआरपीला जुमानत नाहीत तरी त्याचा काही फायदा होत नाही. कारण चॅनल्सचे सगळे आर्थिक सोर्स हे टीआरपीवरच अवलंबून आहेत. चॅनल्स मग ते न्यूज चॅनल्स असो की मनोरंजन त्यांच्या उत्पादनाचं एकच साधन आहे ते म्हणजे जाहीराती. जाहीरात देणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा जाहीरातदारांची जी संस्था आहे ती मात्र बार्कच्या टीआरपीवर विश्वास ठेवते. एवढच नाही तर कुठल्या कार्यक्रमाला जाहीरात द्यायची किंवा कोणत्या तासात द्यायची हे त्या कार्यक्रमाचा टीआरपी किती आहे यावरूनच उत्पादक ठरवतो. म्हणजे एखाद्या चॅनल्सचं सगळं अर्थकारण हे टीआरपीवरच अवलंबून आहे. म्हणजे एखादा संपादक किंवा सीईओ म्हणाला की टीआरपीला जुमानत नाही तरी पैशाचं सोंग करता येत नाही. चॅनल्सच्या आर्थिक कणाच टीआरपी ठरवतो.

टीआरपीच कंटेट ठरवतो ?

या प्रश्नाचं उत्तर दोन पद्धतीनं द्यायला लागेल. न्यूज चॅनल्ससाठी वेगळं आणि मनोरंजन वाहिन्यांसाठी वेगळं. मनोरंजन वाहिन्यांचा कंटेट ठरवणारा प्रमुख घटक टीआरपीच आहे. म्हणजे एखादी मालिका सुरु करावी का, कोणत्या टाईम स्लॉटमध्ये करावी ह्या सगळ्यांचे निर्णय घेण्यासाठी अगोदर काही पायलट प्रोजेक्ट तयार केले जातात. ते काही मोजक्या प्रेक्षकांना पहायला लावतात. त्यांची मतं वगैरे त्यावर लिखित तसच चर्चेद्वारे जाणून घेतली जातात. त्यावरून त्या मालिकेचा निर्णय घेतला जातो. मालिका ज्यावेळेस प्रत्यक्षात ऑन एअर होते, त्यावेळेस पहिल्या चार ते पाच, जास्तीत जास्त 10 एपिसोडमध्ये नेमका तिचा किती टीआरपी येतो हे पाहिलं जातं. त्यावर तिला अपेक्षीत असलेला प्रतिसाद मिळाला नाही तर ती मालिका गुंडाळली जाते. समजा एखाद्या मालिकेतलं कुठलं पात्र लोकांना आवडतंय, कुठलं आवडत नाही त्यावरून त्यांचा जीव ठरवला जातो म्हणजे एखादं पात्र कथानकात लोकांना फार आवडत नसेल तर त्याचा खात्मा केला जातो. एखादं पात्र फार आवडत असेल किंवा ते पात्र मरून गेलेलं असेल आणि प्रेक्षक त्याच्या फार आठवणीत असेल तर त्याचा पुनर्रजन्मही केला जातो. हे सगळे निर्णय अर्थातच त्या पात्राचा, मालिकेचा, कथानकाचा टीआरपी किती आहे त्यावरच ठरतो. त्यामुळे मनोरंजन वाहिन्यांचा कंटेट ड्राईव्ह टीआरपीच आहे.

न्यूज चॅनल्सचं कंटेटही टीआरपीवरच ठरतं ?

होय आणि नाही सुद्धा. यात दोन विचारप्रणाली आहेत. एक विचार हा एस.पी. सिंग आणि दुसरा विचार हा प्रणय रॉय यांच्या स्कूलचा आहे. एस.पी.सिंग यांनी ‘आज तक’ची पायभरणी केली, पॉप्युलर कंटेटवर भर दिला आणि त्यांच्याच स्कूलमधून बाहेर पडणाऱ्यांनी नंतर आज तक, एबीपी न्यूज, इंडिया टीव्ही, झी न्यूज असे वेगवेगळे चॅनल्सचं नेतृत्व केलं. पॉप्युलर किंवा कमर्शियल कंटेट ह्याचा साधासोपा अर्थ बोजड, फारसं वैचारीक नसलेलं, लोकांना सहज कळेल अशा कंटेटवर ह्यांनी लक्ष केंद्रीत केलं त्यातून हे चॅनल्स अजून तरी टीआरपीत आलटून पालटून टॉपवर आहेत.

दुसरं स्कूल एनडीटीव्ही म्हणजे प्रणय रॉय यांचं आहे. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, रविशकुमार ह्या मंडळींनी जे काही कंटेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते ड्रामालेस, जास्तीत जास्त वास्तवाच्या जवळ जाईल असं, अनेक वेळेस वैचारीक बोजड असं कंटेट दिलं. परिणामी सिनेमा जसा कमर्शियल आणि आर्ट असा मोडतो तसं ह्या चॅनल्सचं पण झालं. म्हणजे रविशकुमारला त्यांच्या शोबद्दल मॅगसेसे पुरस्कार मिळाला पण त्यांचा शो टीआरपीत कुठेच नसतो. याऊलट आज तक, एबीपी, इंडिया टीव्ही, झी मीडिया ह्यांनी लोकांच्या आवडीच्या नावावर हिंदू-मुसलमान दंगे, राम मंदिर, पाकिस्तान, काश्मीर अशा सगळ्या मुद्यावर राष्ट्रवादी भूमिका घेऊन टीव्हीचा पडदा कायम खळबळजनक ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ते कायम टीआरपीचं कारण देतात.

मराठी न्यूज चॅनल्सचं टीआरपी गणित काय ?

प्रादेशिक वाहिन्या ह्या हिंदी वाहिन्यांपेक्षा कंटेंटच्या दृष्टीकोनातून पूर्णपणे वेगळ्या आहेत. मुळातच हिंदी वाहिन्यांवर मराठी कंटेटला फारसा वाव मिळेनासा झाला किंवा पुण्या- मुंबईपलिकडची बातमी दिसेनाशी झाली त्यावेळेस मराठी चॅनल्सला स्पेस असल्याचं लक्षात आलं आणि चॅनल्स सुरु झाले. सध्य स्थितीत 6 मराठी वाहिन्या आहेत, बहुतांश वाहिन्यांचं वय दशकापेक्षा जास्त आहे. एबीपी माझा हे टीआरपीत कायम नंबर वन राहिलेलं आहे. पण गेल्या दोन तीन वर्षात त्यांची मक्तेदारी अगोदर झी चोवीस तासनं मोडीत काढली आणि नंतर टीव्ही 9 मराठीनं. काही वर्षापुर्वी ‘माझा’ला कुणीच टीआरपीत हरवू शकत नाही अशी स्थिती होती जी आता राहिलेली नाही.

एबीपी माझाची टीआरपीत मक्तेदारी का होती ?

एबीपी माझा हे एबीपी न्यूजचं सिस्टर चॅनल आहे. त्यामुळे पॉप्युलर कंटेट कसं मिळवायचं, कसं चालवायचं ह्याचे उत्तम शिक्षण मिळालेली टीम त्यांच्याकडे होती. विशेष म्हणजे माझाचा आत्मा हा मराठी माणूस असा राहिलेला आहे. म्हणजे हे मराठी माणसाची, त्याच्या हक्काची काळजी घेणारं चॅनल आहे अशी प्रतिमा उभी करण्यात आणि ती बऱ्याच वर्षापर्यंत टिकवून ठेवण्यात ते यशस्वी झाले. म्हणजे ज्यावेळेस राज ठाकरेंच्या उत्तर भारतीय आंदोलनाविरोधात सगळे आग ओकत होते त्यावेळेस माझानं राज ठाकरेंची बाजू लावून धरली आणि तिथेच ते घराघरात पोहोचले. विशेषत: ज्या मुंबईत ठाकरे बंधू नावाचं कंटेट हुकमी एक्का आहे ते त्यांनी बरोबर हेरलं आणि अजूनही त्यांची छोट्यातली छोटी गोष्टही त्यांनी सोडली नाही. परिणामी मुंबईत जो नंबर वन तो महाराष्ट्रात नंबर वन. तसंही टॅमच्या काळात सगळे मीटर्स हे शहरी भागात होते. मुंबईचा वरचष्मा होता. परिणामी ते बरीच वर्षे नंबर वन राहिले.

एबीपी माझाची मक्तेदारी मोडीत कशी निघाली?

माझाची मक्तेदारी मोडीत निघायला दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या. पहिली टॅम जाऊन बार्क आलं. बार्कचे मीटर ग्रामीण भागात पोहोचले. माझाच्या कंटेटमध्ये ग्रामीण महाराष्ट्र कमी दिसायचा. त्याच्या उलट झी चोवीस तासनं ग्रामीण बातम्यांचे सुपरफास्ट डोस सुरु केले, त्यात माझा हे पेड चॅनल होतं तर चोवीस तास डीशवर फ्री झालं परिणामी ग्रामीण भागानं झी चोवीस तासला टीआरपीत नंबर वन बनवलं. एवढं की माझा आणि झी चोवीस तास मध्ये जवळपास १० पॉईटसचा फरक दिसायला लागला जो प्रचंड होता.

टीव्ही 9 टीआरपीत मुसंडी कशी ?

झी चोवीस तास जसेही पुन्हा पेड चॅनल झाले तसे त्यांचे प्रेक्षक आटले आणि पुन्हा ते माझाकडे गेले. पण तोपर्यंत महाराष्ट्रात टीव्ही 9 मराठीचं आगमन झालेलं होतं. टीव्ही 9 चं कंटेट पूर्णपणे वेगळं होतं, त्याचे फॉरमॅट माझाच्या तुलनेत नवे होते, त्यातच माझाच्या कंटेट, फॉरमॅटमध्ये तोच तोचपणा आलेला होता, आहे. परिणामी जी जागा माझानं सोडून दिली तिच नेमकी नंतर आलेल्या टीव्ही 9 नं पकडली. उदा. भीमा कोरेगावचं आंदोलन, त्यानंतर मुंबईत उसळलेलं दंगलसदृश्यं वातावरण एबीपी माझानं दाखवलंच नाही आणि ज्यावेळेस दाखवला त्यावेळेस उशीर झालेला होता. परिणामी टीव्ही 9 नं ते पहिल्या क्षणापासून दाखवलं आणि तिथेच चॅनल नंबर वन झालं. माझाचा तोंडवळा शहरी आहे तर टीव्ही ९ नं तो ग्रामीण, सेमी शहरी ठेवला, त्याचा फायदा चॅनलला झाला. शनिवार, रविवारी मराठीत माझानं रिपिट प्रोग्राम टाकायला सुरुवात केली, त्यावेळेस टीव्ही 9 पूर्णपणे नवं कंटेट द्यायला लागलं. परिणामी टीव्हीसाठीचा जो सर्वात मोठा दिवस असतो विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा, त्यादिवशीही माझाला धोबीपछाड देत टीव्ही 9 नंबर वन ठरलं.

काय दाखवलं म्हणजे न्यूज चॅनल नंबर वन होतात?

अमुक एक गोष्ट दाखवली म्हणजेच चॅनल नंबर वन होतं असं काही ठोसपणे सांगता येत नाही. टीव्ही 9 पहिल्यांदा नंबर वन झालं ते जगबुडीच्या दिवसभर बातम्या दाखवल्यानं. पण कायम नंबर वन राहायचं असेल तर राजकीय अजेंड्याशिवाय पर्याय नाही. जगबुडीसारख्या बातम्यांचा स्टेरॉईडसारखा उपयोग होईल, त्यानं थोड्या काळापुरती बॉडी फुगलेलीही दिसेल पण सदृढ शरीर हवं तर मेहनतीला पर्याय नाही. कारण अजूनही तरी आपल्याकडे लोक मनोरंजन म्हणून मराठी चॅनल्सकडे पहात नाहीत. राजकारणाच्या बातम्या मात्र त्यांच्या मनोरंजनाचं साधन आहेत हे खरं. हवं तर गंभीर मनोरंजन म्हणा. एखादा राजकीय पक्ष ज्या कारणांमुळे सत्तेत जातो आणि बाहेर पडतो अगदी तसच काही टीआरपीबद्दल चॅनल्सचं होतं. टीआरपीसाठी कंटेटचं ध्रुवीकरण केलं जातं, खळबळजनक सादरीकरण असतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोग्रॅमिंगवर किंवा रिपिटवर फारसा भर न देता कायम नवं आणि नव्या घडामोडी तुम्ही रिपोर्ट करत राहिलात, त्याचं विश्लेषण करत गेलात तर चॅनल्सचा टीआरपी चढत जातो. हे ऐकायला जेवढं सोप्पं आहे तेवढं प्रत्यक्षात नाही.

मनोरंजन वाहिन्यांचा टीआरपी मॉडेल काय?

मनोरंजन वाहिन्यांवर टीआरपीत अजून तरी सास बहु टाईपचा भरणा अधिक आहे. तीन प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला मनोरंजन वाहिन्यांवर पहाता येतील. एक सासू-सून टाईप, दुसरं तरूण पोरा पोरींच्या मालिका आणि तिसऱ्या नागिन, भुताखेताच्या मालिका. हिंदी-मराठीत ह्यात फारसा फरक नाही. यात पहिल्या आणि तिसऱ्या टाईपच्या कंटेटचा भरणा अधिक असतो किंवा आहे. दुसऱ्या टाईपचा म्हणजे तरूण पोरा पोरींना केंद्रस्थानी ठेऊन तयार केलेल्या मालिकांना फारसा जीव नाही. त्या थोड्याच काळात ढेपाळलेल्या दिसतात किंवा बंदही पडतात. पण माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला टाईप सुपरहिट होतात. ग्रामीण भागात टीआरपी मीटर वाढवल्यानंतर ग्रामीण किंवा सेमी शहरी कंटेट मनोरंजन वाहिन्यांवरही वाढलं. त्यात मग रात्रीस खेळ चाले, नागिन, अग्निहोत्र अशा गुढ मालिका हिट होतात. क्राईम शोजचा भरणाही ग्रामीण भागामुळे जास्त वाढला. काही चॅनल्स तर क्राईमनं खचाखच भरलेले आहेत ते टिकतात, सुपरहिट होतात.

स्ट्रीम सेवांचा टीआरपीवर परिणाम?

नेटफ्लिक्स, पॉटस्टार, अमेझॉन अशा ऑनलाईन स्ट्रीम सेवांचा टीआरपीवर परिणाम झालेला दिसतोय. तो न्यूज चॅनल्सपेक्षा मनोरंजन वाहिन्यांवर अधिक झालेला आहे. एक तर टीव्हीपेक्षा जास्त तगडं, सेन्सॉर नसलेलं गेम ऑफ थ्रोन्स, मार्को पोलो असं मजबुत कंटेट ही चॅनल्स निर्माण करतायत. परिणामी ज्यावेळेस काही तरी मोठी घटना घडते त्याच वेळेस प्रेक्षक न्यूज चॅनल्सकडे येताना दिसतायत. इंग्लंडमध्ये तर एका सर्वेत तरूण पोरांनी न्यूज चॅनल्स जवळपास पहाणंच सोडून दिल्याचं उघड झालंय. तशी स्थिती आपल्याकडेपणे येऊ शकते जर सगळं कंटेट मोदी सेंट्रीक किंवा भारत-पाकपुरतंच घुटमळत राहिलं तर. नवं काही देणार नाही तर नवे प्रेक्षक येतील कुठून ? याच्या उलट नेटवर ‘चांडाळचौकड्यां’सारखे अस्सल मातीचा वास असलेले प्रोग्राम हिट होतायत. मुख्य प्रवाहातल्या वाहिन्यांना ह्या स्ट्रीम सेवा कट्टर स्पर्धा देतायत. मागे पुढे जर मुख्य प्रवाहातल्या वाहिन्यांनी बदल करून घेतला नाही तर नेटवरचं कंटेट त्यांचा गळाही घोटू शकतं.

डिजिटलचा न्यूज चॅनल्सच्या टीआरपीवर परिणाम काय?

सध्या डिजिटल कंटेटची सुनामी आलेली आहे. बातमीसाठी किंवा माहितीसाठी फक्त मुख्य चॅनल्सवरच अवलंबून रहायची गरज राहिलेली नाही. लोकांच्या हातात ट्विटर, फेसबुक, व्हॉटस् अप आणि आता टेलिग्रामसारखे शस्त्र आहेत. त्या उलट मुख्य प्रवाहातले न्यूज चॅनल्स हे सरकारच्या कचाट्यात आहेत. परिणामी जे कंटेट सरकारविरोधी आहे ते दाखवलं जात नाही. त्यातून मग प्रेक्षक टीव्हीऐवजी मोबाईलवर जास्त आहे. त्यातून न्यूज चॅनल्सची प्रेक्षकसंख्या रोडावत गेली तर आश्चर्य वाटू नये. त्यातच न्यूज चॅनल्सनी जे काही दाखवायला किंवा भूमिका घ्यायला सुरुवात केलीय त्यावर नवा तरूण वर्ग प्रचंड नाराज असल्याचं दिसतंय. त्यामुळे तो जोडला जाताना दिसत नाही. डिजिटल प्लॅटफॉर्मवर मग अनेक भिडू निर्माण झालेत. ते स्वत:चं स्थान निर्माण करतायत. सध्य़स्थितीत मराठी किंवा हिदी दोन्ही न्यूज चॅनल्स हे एकीकडून सरकारी दुसरीकडून नेटच्या कंटेटच्या कचाट्यात सापडलेले दिसतायत. पण स्वत:ला कायम नवं ठेवत जाणं एवढाच टीआरपीसाठी मंत्र आहे. आणि तो सुविचार सांगण्याऐवढा सोपं नाही.

-(लेखक ‘टीव्ही ९  मराठी’ चे कार्यकारी संपादक आहेत.)

9833926704

(संतोष गोरे यांच्या ब्रेकिंग न्यूज ह्या पुस्तकासाठी लिहिलेला हा लेख होता. पण परिस्थिती फार काही बदललेली नाही. )

Previous articleअरण्यऋषींचे ‘ स्थलांतर’..!
Next articleम्हणून बच्चन.. ‘बच्चन’ असतो….!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.