जगण्याने छळलेले दोन कवी : सुरेश भट आणि ग्रेस

-प्रा. डॉ. अजय देशपांडे

ग्रेस आणि सुरेश भट हे दोनही कवी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही प्रचंड लोकप्रिय आहेत. दोघांविषयी लोकांना विलक्षण क्रेझ होती. दोघांच्या स्टाईलचीही क्रेझ होती. मराठी समीक्षा व्यवहाराने ग्रेस यांच्या कवितेवर आणि ललितबंध लेखनावर दुर्बोधतेचा शिक्का मारला आणि त्यांचे साहित्य बाजूला सारले. सुरेश भटांच्या काव्य लेखनावर मराठी समीक्षेने असा कुठला शिक्का मारला नसला तरी त्यांच्या कवितेकडे अकारण दुर्लक्ष केले. पण या बाबींचा दोघांच्याही लोकप्रियतेवर तसूभरही फरक पडला नाही. महत्त्वाच्या साहित्यिकाबाबत समीक्षाव्यवहाराने मौन बाळगणे, उदासीनता बाळगणे, बोटे मोडणे, नाक मुरडणे वगैरे या दोन कवींच्या संदर्भात पहिल्यांदाच घडले असे नाही. मराठीत अशी परंपरा आहे आणि या परंपरेने आजवर कितीतरी महत्त्वाच्या साहित्यिकांकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे. पण समीक्षाव्यवहाराने वाळीत टाकले म्हणून हे दोन कवी अडगळीत गेले असे मात्र मुळीच झाले नाही. उलट समीक्षाव्यवहाराला अडगळीत टाकून सर्वसामान्य वाचकांनी या दोघांच्याही कवितेवर भरभरून प्रेम केले. सुरेश भट आणि ग्रेस यांच्या कवितेकडे जाताना सामान्य माणसांनी समीक्षेच्या कुबड्या न वापरणे पसंत केले. परिणामी पुस्तकांच्या नियतकालिकांच्या पानांवरची समीक्षा सामान्य माणसांच्या मनापर्यंत ओठांपर्यंत कधीच पोहोचली नाही. या दोन्ही कर्वीच्या कविता मात्र समाजाच्या मनात आणि ओठांवर अधिराज्य गाजवित राहिल्या.

सुरेश भट आणि ग्रेस यांच्या संदर्भात आणखी एक वेगळा प्रकारही आहे. हे दोन्ही कवी जिवंत असताना काही समीक्षक मंडळींच्या लेखण्या अनेक वर्षे अक्षरशः मौन बाळगून होत्या. पण दोघांच्याही मृत्यूनंतर मात्र काही लोकांनी त्यांच्यावर आवर्जून आणि भरपूर लिहिले. काही लोक अजूनही लिहीतच आहेत. जिवंतपणी उपेक्षा आणि मेल्यावर फुलांचे हार अर्पण करायचे, जिवंतपणी दखल घ्यायचीच नाही आणि मेल्यावर संबंधांचे गोडवे गात गळ्यात बेगडी गहिवर दाखवत खूप लिहायचे अशीही ढोंगी आणि क्रूर परंपरा मराठीत आहे. या परंपरेने सुरेश भट आणि ग्रेस या दोघांनाही जिवंतपणी छळले, हे सत्य नाकारता येत नाही.

सुरेश भट आणि ग्रेस यांच्या व्यक्तिमत्त्वाचा , बोलण्याचा आणि लेखणीचाही एक विलक्षण दरारा होता हे देखील खरे आहे. या दोघांचेही वागणे बरेचदा सर्व सामान्य माणसांसारखे नसायचे. वागण्या-बोलण्या-राहण्याच्या विलक्षण तऱ्हांनी त्यांच्याविषयीच्या खऱ्या खोट्या अनेक किस्स्यांचे पेव फुटले होते. अनेकदा तर या दोघांविषयीचे अनेक खोटे खोटे किस्से रचून सांगण्यात आले. आजही सांगितले जात आहेत. जिवंतपणीच अनेक आख्यायिकांचे धनी झालेले हे कवी जनमनात खोल रुजलेले होते. या आख्यायिका त्याचेच उदाहरण होय.

या दोन्ही कर्वीच्या राहण्या-वागण्या-बोलण्याविषयी लेखनाविषयी सर्व सामान्य माणसांना विलक्षण आदर होता व आकर्षणही होते. परिणामी या कवींच्या रचना आणि त्यांची भाषा यांच्यावर सर्वसामान्य माणसांनी उत्कट प्रेम केले, नुसतेच प्रेम केले नाही तर त्यांची अनुकरणेही केली. बरेचदा ही अनुकरणे आंधळ्या भक्तीभावातूनही घडत गेली. प्रेम, आदर यामुळे त्यांच्या विषयीचे अनेक किस्से ही लोक सांगत राहिले. दोघांच्याही कितीतरी ओळी सर्वसामान्य माणसांच्या बोलीचा भाग झाल्या. या ओळी आता सुरेश भट, ग्रेस यांच्या राहिल्या नाहीत, त्या समाजाच्या झाल्या आहेत, त्या कोणाच्या आहेत. कोणत्या कवितेतल्या आहेत. कवितेतले त्या ओळींचे अर्थ संदर्भ काय आहेत, हे

शोधण्याची तसद्दी सर्वसामान्य माणसे घेतही नाहीत. या ओळी आपल्याच आहेच एवढ्या सहजपणे ते त्या बोलण्यात वापरत असतात. उदाहरणार्थ ‘भय इथले संपत नाही’, ‘ती आई होती म्हणुनि’, ‘चांदणे तुझ्या स्मरणाचे’ या आणि अशा ग्रेस यांच्या कितीतरी ओळी किंवा ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’, ‘आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली’ या आणि अशा सुरेश भटांच्या कितीतरी ओळी समाजाच्या भाषेचा अविभाज्य घटक बनल्या आहेत. कलावंताची भाषा जेव्हा समाजाच्या भाषेचे अंग बनते. समाजभाषेत मिसळून जाते, तेव्हा त्या कलावंताच्या कलाकृती समाजमनात अगदी रुजल्या असतात. समाजाच्या जगण्याशी त्यांचे अनुबंध जुळलेले असतात. सुरेश भट आणि ग्रेस यांचा विचार केला तर दोघांच्याही कविता समाजमनात अगदी रुजल्या होत्या, समाजाच्या ओठांवर त्या वेगवेगळ्या संदर्भात अंकुरत होत्या. अंकुरत आहेत. कवितेचा अर्थ कळला तरी आणि नाही कळला तरी दोघांच्या कविता रसिकांना अक्षरशः पाठ असल्याचेच निदर्शनास येते.

सुरेश भट आणि ग्रेस या दोघांमध्येही आणखी एक साम्य आहे. त्यांचा स्वतःशी आणि जगाशी सतत संघर्ष सुरू होता. यासंदर्भात जेष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी सुरेश भटांविषयी नोंदविलेले एक निरीक्षण ग्रेस यांच्या विषयीही खरे वाटावे, असे आहे. प्रा. सुरेश द्वादशीवार लिहितात, “जो स्वतःशी स्पर्धा करतो, त्याला कुणी हरवू शकत नाही आणि ती स्पर्धाही कधी थांबत नाही, अशा अर्थाचे एक इंग्रजी सुभाषित आहे. ज्याचे भांडण स्वतःशी आहे त्यालाही कुणी हरवू शकत नसावे आणि ते भांडणही त्याच्या एवढेच आयुष्यमान होत असावे. स्वतःशी भांडण करणारी खूप माणसे मी पाहिली आहेत. अशा माणसांपैकी कुण्या एकाला प्रतिभेचे वरदान लाभले असेल तर त्याचे ते भांडण अतिशय देखणे होत असल्याचेही मी पाहिले आहे. त्यातही एखादा जबर आवाक्याचा प्रतिभावंत आपल्या ठायीच सारे जग पाहात असेल तर तशा तंटाव्याला जगाविरुद्धच्या त्याच्या एकाकी झुंजीचे विराट परिमाण लाभते. चक्रव्यूहात शिरून रक्तबंबाळ होणाऱ्या महाकाव्यातल्या एकाकी योद्ध्याची आपल्याला नम्र करणारी ती झुंज होते. त्या झुंजीतत्या विजयाएवढाच त्याचा पराजयही भव्यदिव्य होतो. कधी तो मी म्हणून जिंकतो, कधी जग म्हणून जिंकतो. दोन्ही विजय त्याचे दोन्ही पराजयही त्याचेच. अशावेळी स्वतःला जखमा करून घेत चाललेले त्याचे जगणेही दीप्तिमान आणि क्वचित कधी त्याला येणारी भोवळही साऱ्यांना प्रकाशाचा अनुभव देणारी….” ( सुरेश द्वादशीवार तारांगण’ साधना प्रकाशन, पुणे, पृष्ठ ६७)

या विवेचनातले प्रत्येक वाक्य जसे सुरेश भटांच्या संदर्भात समर्पक आहे. तेवढेच ते ग्रेस यांच्या संदर्भातही समर्पक आहे. कवी म्हणून, माणूस म्हणून, कलावंत म्हणूनही सुरेश भट आणि ग्रेस फार वेगळे होते, कविता, विचार, जगणे वगैरे बाबतीत दोघांमध्ये कुठलेच साम्य नव्हते, उलट कमालीची भिन्नता होती, पण ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग | अंतर्बाहय जग आणि मन ‘ हा अनुभव दोघेही सारख्याच पातळीवर घेत होते. चक्रव्यूहात शिरून रक्तबंबाळ होणाऱ्या नायकाची एकाकी झुंज वेगवेगळ्या पातळ्यांवर या दोघांनीही अनुभवली. त्यामुळे हे दोन्ही प्रतिभावंत त्यांच्या कविता लोक जिव्हेवर अधिराज्य करीत असतानाही एकाकीच राहिले, जगताना निसर्गाने त्यांचेवर अनेक हल्ले केले. कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूने ही माणसे हळहळली, कळवळली पण आपण विरुद्ध जग आणि आपण विरुद्ध निसर्ग असा संघर्ष जगत असताना कुटुंबातील माणसांचे मृत्यू हा या संघर्षाचाच एक भाग समजून तर कधी या मृत्यूंशी आपल्यातल्या कवी कलावंताचा काही संबंधच नाही, अशा तऱ्हेने हे दोन्ही कवी जगत राहिले. आपल्या आयुष्यातील अनेक दुःखांच्या असंख्य सावल्या ग्रेस यांच्या कवितेत आणि ललितबंधांमध्ये सर्वत्र वावरत राहिल्या. आतल्या आणि बाहेरच्या अव्यक्त दुःखांशी ग्रेस निकराने लढत राहिले. पण ही लढाई फार वेगळी होती. गोंदणाच्या कळांनी मोहरण्याची ही लढाई होती. सुरेश भटांनी आपल्या आयुष्यातल्या दुःखांना कधी दुःख मानलेच नाही. त्यांची लढाई सभोवतीच्या साऱ्या अमानुषतेविरुद्ध होती. समाजाच्या दुःखापुढे सुरेश भटांना आपले दुःख कधी दुःख वाटलेच नाही. ‘ओंजळी माजी जनांची आसवे मी साठवीतो’,माझिया गीतांत वेडे दुःख संतांचे भिनावे’, ‘माझ्या दुःखानेच केले मला जिवंत माणूस’ असे म्हणणारा हा कवी दुःखावरही प्रेम करीतच राहिला. दुःख जगण्याची रीत दोन्ही कर्वीची वेगवेगळी होती.

” दुःख सांगितले की हलके होते 

आकर्षक होते जगून दाखविले की 

मरून दाखविल्यावर

दुःख मिटते ? “

असे ग्रेस म्हणतात. दुःखाचे प्रकार आणि प्राकार वेगवेगळे असले दुःख जगण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या असल्या तरी दुःखाशी इमान बाळगण्याचा स्वभाव दोघांचाही होता. हे दोन्ही कवी उत्कटपणे दुःखांशी फक्त सहकंपच पावले नाहीत तर अगदी सरूप झाले. दुःख आणि कविता या दोन्ही बाबी या दोन्ही कवींच्या जगण्याचा आधार होत्या. सुरेश भट एका ठिकाणी तिहितात, “कवीचे जगणे आणि लिहिणे ही कधीही वेगळी व स्वतंत्र खाती नसतात, जगण्यातून कविता आणि कवितेतून जगण्याला वगळता येत नसते. जेव्हा जगणे आणि लिहिणे एकजीव होते. तेव्हाच कबीर व तुकाराम जन्माता येतात” हे खरे आहेत. सुरेश भट आणि ग्रेस यांच्या जीवनापासून कविता वेगळी करता येत नाही आणि कवितेपासून त्यांचे जीवन वेगळे काढता येत नाही. तथापि जाण्याबद्दल, एकूणच मानवी जीवनाबद्दल आणि कवितेबद्दल या दोन्ही कवींची मते फार वेगळी आहे. परस्परांशी त्यांचे साम्य नाही. दोघांच्या कवितांतील दुःखाचा पोत फार वेगळा आहे.

सुरेश भट आणि ग्रेस दोघांचीही कविता परंपरापूजक आहे. पण दोघेही परंपराशरण नाहीत. परंपरागत भावकविता लिहीत असतानाही दोघांनीही आपली पृथगात्मता जपली आणि सिद्धही केली. बहुजनरसिकसापेक्षता हा सुरेश भटांच्या तर अभिजनरसिकसापेक्षता हा ग्रेस यांच्या कवितेचा महत्त्वाचा विशेष आहे. सुरेश भट यांचा ‘रूपगंधा’ हा कवितासंग्रह १९६१ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ‘रंग माझा वेगळा’ ‘एल्गार’, ‘झंझावात’, ‘सप्तरंग’ आदि कवितासंग्रह प्रकाशित झाले. ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता हा संग्रह १९६७ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ‘राजपुत्र आणि डालिंग’, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’, ‘सांध्यपर्वातीत वैष्णवी, सांजभयाच्या साजणी’ आदी कवितासंग्रह प्रकाशित झाले. १९६० च्या दशकापासून प्रकाशित होणारी दोघांचीही कविता रसिकांच्या मनावर कायम राज्य करीत राहिली. भटांच्या ‘रूपगंधा’ची मोहिनी आणि ग्रेस यांच्या ‘संध्याकाळच्या कविता’ ची भुरळ माणसांच्या मनावर कायमच राहिली. आजही आहेच. उणीपुरी पन्नास वर्षे या दोन्ही कवींच्या कवितांची लोकप्रियता कायमच आहे. सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात. “कवीच्या भाग्याचा अंतिम फैसला करणारे सर्वोच्च न्यायालय म्हणजे सामान्य जनताच असते. ही जनता कवीहून मोठी असते. कवीमुळे जनता नव्हे तर जनतेमुळे कवी असतो. ही जनता ज्या कवीचा हृदयापासून स्वीकार करते, तोच कवी अमर व महान होतो” हे अगदी खरे आहे. हे सत्य दोन्ही कवींच्या वाट्याला आले. सुरेश भट आणि ग्रेस यांच्यात शैलीच्या संदर्भातही एक साम्य आहे. भटांची रचना सुबोध तर ग्रेस यांची रचना अनवट आहे. सुबोध नाहीच तरीही शैली दृष्ट्या दोघांतही एक साम्य असे की सुभाषितवजा चरणांवर दोघांचेही प्रभुत्व होते.

सुरेश भट आणि ग्रेस यांच्या संदर्भातील एक अलक्षित साम्य डॉ. अक्षयकुमार काळे यांनी अधोरेखित केले आहे. डॉ. काळे लिहितात, “आपल्या प्रतिभेच्या घाटातूनच मराठी काव्य परंपरेतील आवश्यक घटकांचा स्वीकार ग्रेसने केला आहे. सुभाषितेही त्याला अपवाद नाहीत. मराठी वृत्तांचे पुनरुज्जीवन ग्रेसने याच वृत्तीतून केले. ‘गझल’सारखा काव्यप्रकार मुद्दाम उल्लेख न करता समर्थपणे हाताळला. गझलांमध्ये असणारी प्रत्येक शेराची पृथकता आणि सामर्थ्य ग्रेसच्या कवितांतीत द्विपद्यांना आहे. सुरेश भट यांच्या प्रमाणे उर्दु गझलेचा तिच्या सगळ्या वृत्तिवैशिष्ट्यांसह ग्रेस यांनी स्वीकार केला नाही. दृश्यमान काव्य घटकांचा शरणागत स्वीकार ही ग्रेसची प्रवृतीच नाही.” (अर्वाचीन मराठी काव्य दर्शन, पां.ना बनहट्टी प्रकाशन, नागपूर, पृष्ठ ५९९) हे खरे आहे. सुरेश भटांनी गझल प्राणप्रणाने स्वीकारली आणि गझलला प्राणही दिला. ग्रेस यांनी गझल हा काव्यप्रकार हाताळला येथेही काही प्रमाणात दोघांमध्येही साम्य आहेच.

ग्रेस यांनी अक्षरगणवृत्ते आणि मात्रावृत्ते यांचे पुनरुज्जीवन केले तर सुरेश भटांनी मराठीत गझलचे पुनरुज्जीवन केले. दोघांनीही वेगवेगळ्या प्रकारे भावकवितेला गेयतेचे परिमाण दिले. दोघांचीही कविता नादानुकुल, नादमधुर आहे. दोघांच्याही अनेक कवितांना संगीतसमृद्धता लाभली आहे. दोघांच्याही अनेक रचना गायनानुकुल आणि संगीतानुकुल आहेत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह अनेक दिग्गज संगीतकारांनी दोघांच्याही गीतांना संगीतबद्ध केले. लता मंगेशकर यांच्यासह अनेक गायक गायिकांनी दोघांचीही गीते गायिली. ग्रेस आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमांना आणि सुरेश भटांच्या मैफलींना रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असे. सुरेश भट आणि ग्रेस यांच्या भाषणांना कवितांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

जगणे, स्वभाव, राहणीमान, चाहाता वर्ग, कवितेच्या क्षेत्रातील कर्तृत्व, कौटुंबिक पार्श्वभूमी, विचार, प्रेरणा, प्रवृत्ती, कवितेचा आशयपरिघ अशा कितीतरी बाबतीत सुरेश भट आणि ग्रेस यांच्यात अजिबात साम्य नव्हते. पण एक गोष्ट मात्र दोघांच्याही बाबतीत अगदी खरी आणि सारखी होती. डॉ. द. भि. कुलकर्णी एका ठिकाणी लिहितात, ‘कशिश’ या फारसी शब्दाचे दोन अर्थ आहेत आकर्षण’ आणि ‘वैमनस्य’ भटांचे जीवनसूत्र ‘कशिश’ हेच होते, (सुरेश भट नवे आकलन, आकांक्षा प्रकाशन, नागपूर, पृ. २१) हेच जीवनसूत्र अनेक अर्थाने ग्रेस यांचेही होते.

हे दोन्ही कवी आपल्या मनासारखे जगले, जीवनातल्या उणिवांवर, निसर्गाने लादलेल्या संकटांवर, त्यांनी यशस्वीपणे मात केली. सुरेश भट माणसांत मिसळले, माणसांसाठी त्यांनी एल्गार पुकारला, जनांतले एक झाले, स्वतः लढा पुकारला ‘ गीत माझे माझिया हातातील तलवार आहे असे म्हणत सर्व दृष्ट प्रवृत्तींवर, अमानुषतेविरुद्ध लढाच पुकारला. ‘गझल’ लोकप्रिय केली. आणि गझल ‘लढाऊ’ देखील केली. ग्रेस यांनी माणसात फार न मिसळता अभिजनांशी सलगी ठेवली. त्यांची प्रवृत्ती जरा वेगळी होती, त्यांची कविता, तिच्यातील आशय अभिजनांच्या अभिरुचीचा भाग राहिला. शब्दांची कलाकुसर शब्दांचे सामर्थ्य, आशयभान या बाबींची या दोन्ही कवींना आवड होती. सुरेश भटांचा शब्दकळा आणि शब्दांची कलाकुसर बहुजनसापेक्ष होती, ग्रेस यांनी नव्या प्रतिमा नवी शब्दकळा, नव्या शब्दांची अपूर्व कलाकुसर केली. गूढअर्थप्रतीति त्यात होती. आणि हे सारे अभिजनसापेक्ष होते. दोघांनाही दोघांच्याही क्षेत्रात अनुकरणशील असे असंख्य अनुयायी मिळाले, पण सुरेश भटांच्या ‘कुळा’ची कविता निर्माण झालीच नाही. आणि ग्रेस यांचा वंश निवेशच राहिला.

कौटुंबिक सुखे, मानसन्मान सारे काही या दोघांनाही लाभले. पण दोघांच्याही ठायी एक काम असमाधान होते. हे असमाधान त्या दोघांच्याही ठायी स्वभावतःच असावे. व्यवस्था कुटुंबातली माणसे, सभोवतीची माणसे. सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण या आणि अशा कितीतरी बाबींमुळे हे असमाधान आले असते, तर त्या त्या बाबींवर रोष व्यक्त करून अथवा ती ती परिस्थिती बदल्यानंतर हे असमाधान संपायला हवे होते. निदान काही प्रमाणात कमी तरी व्हायला पाहिजे होते, पण तसे झाले नाही. उलट ते उत्तरोत्तर वाढतच गेले. कारण हे असमाधान अंतर्यामी होते. कलावंतांचे असमाधान, अस्वस्थता निर्मितीची नवी क्षितिजे निर्माण करणारे असते. निर्मितीच्या संदर्भातली घुसमट झाली की हे असमाधान, ही अव्यक्त अस्वस्थता सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणाच्या तीव्र संतापातून व्यक्त होत असते. लोक त्या संतापला कधी कविस्वभाव तर कधी कवीची लहर म्हणायचे, पण हे असमाधान, ही अस्वस्थता अव्यक्त निर्मितिविषयीची असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यातही या दोन्ही कवींच्या वाट्याला आलेले जग हे क्रूर आणि खुज्या माणसांचे होते. निसर्गही क्रूरच होता. या खुज्या माणसांच्या जगाने या दोन्ही कवींना वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे छळले.

कलावंताचे प्रामाणिक कलावंतपण समजून न घेणे हा देखील कलावंताचा एक प्रकारचा छळच असतो. लौकिक जगण्याने केलेला छळ आणि प्रतिभेने केलेला अंतर्यामी छळ अशा छळछावणीतच या दोन्ही कवींचे आयुष्य पार करपून गेले. त्यातून निर्माण झाली एक उद्विग्नता,त्यातून निर्माण झाला एक जळजळीत तिरस्कार सभोवतीच्या खुज्या आणि क्रूर माणसांविषयीचा ! पण या अशा अग्निपथावरही या दोन्ही कर्वीनी कवितेची कोवळीक जपली. उपेक्षांच्या, खुजेपणाच्या क्रूर आगीतही या कर्वीची सजृनशीलता जळून खाक झाली नाही. उलट सोन्यासारखी उजळून निघाली. सुरेश भटांचे शब्द ग्रेस यांच्या संदर्भातही खरेच आहेत. “इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते” पण या कवींच्या कवितेची त्यांच्या मरणाने सुटका केलेली नाही. या दोन्ही कवींचे शब्द वर्तमानाशी आणि भविष्यकाळाशी मनमोकळे बोलत राहणार आहेत, ते काळाच्या पुढे जाणारे आहेत. जगण्याने कवींना छळले. मरणाने या कवींची सुटका केली, पण कविता काळाला कवेत घेत जिवंत राहणारी आहे. ती चिरंजीव आहे. तिच्यातील निर्मितिशील ऊर्जा आणि वेदना देखील चिरंजीव आहे. सुरेश भट, ग्रेस नावाची माणसे गेलीत, पण सुरेश भट, ग्रेस या नावाच्या कविता चिरंतन आहेत, अक्षर आहेत.

(लेखक वणी, जि. यवतमाळ येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात मराठी भाषा आणि साहित्य विभागात अधिव्याख्याता आहेत)

9850593030

 

                              

Comments are closed.