प्राणहिता नदीवरील पुष्कर कुंभमेळा

-तिरुपती चिटयाला

———————

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे प्राणहिता नदीवर पुष्कर कुंभमेळा सुरू झाला आहे. तो दर १२ वर्षांनी नित्यनेमाने भरतो. यंदा हा पुष्कर मेळावा १३ एप्रिलपासून सुरू झाला असून  २४ एप्रिलपर्यंत तो चालणार आहे. सिरोंचा हे तालुका मुख्यालय आहे. तेलंगणा राज्याच्या सीमेवर कालेश्वरम मंदिराजवळ गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या संगमाजवळ शहर वसलेले आहे. प्राणहिता नदीच्या सिरोंचा येथील नदी घाटावर भरणाऱ्या या कुंभमेळ्यात तेलंगणा, छत्तीसगड,आंध्रप्रदेश, कर्नाटक,तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील लाखो भाविक पवित्र स्नानासाठी येतात. येथून जवळच्या असलेल्या तेलंगणातील कालेश्वरम येथील शिव मंदिरात दर्शन घेण्यासाठीही ते हजेरी लावतात. कालेश्वर येथील मंदिरात दोन पिंड आहेत. त्यामुळे त्या मंदिरात भाविकांची भरपूर गर्दी होते.

गंगा- गोदावरीसह ज्या बारा नद्यांकिनारी  कुंभमेळा भरतो व जिथे कुंभ स्नान केले जाते ,असा उल्लेख पुराणात केला गेला आहे त्यात गडचिरोली जिल्ह्यातून दीडशे किलोमीटरपर्यंत वाहणाऱ्या प्राणहिता नदीचाही समावेश आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा आणि वैनगंगेच्या संगमातून चपराळा  येथे त्रिवेणी संगमातून प्राणहिता नदीचा उगम होतो. चपराळापासून थेट सिरोंचा तालुक्यातून तेलंगणा सीमेवर कालेश्वरमजवळ असलेल्या गोदावरी नदीत प्राणहिता विलीन होते.सिरोंचा शहरालगत प्राणहिता नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी  नदीचे दोन घाट आहेत. एक विठ्ठलेश्वर मंदिराजवळ तर दुसरा नगरमजवळ आहे.

प्राणहिता पुष्कर हा प्राणहिता नदीचा उत्सव आहे. बृहस्पती मीन राशीत प्रवेश केल्यापासून १२ दिवसांच्या कालावधीसाठी पुष्कर पाळला जातो. पुष्कर या शब्दाला धार्मिक, पौराणिक आणि भौगोलिक अधिष्ठान आहे. पुष्कर हा नद्यांच्या पूजेला समर्पित असा भारतीय सण आहे. याला तेलगू भाषेत ‘पुष्करलू’, कन्नडमध्ये ‘पुष्करा’ आणि मराठी व हिंदीमध्ये ‘पुष्कर’ असे म्हणतात. भारतातील १२ प्रमुख पवित्र नद्यांच्या काठावर पुष्कर कुंभमेळा आयोजित केला जातो.  कुंभमेळ्यात  घाटावरील देवस्थानांमध्ये पूर्वजांची पूजा, आध्यात्मिक प्रवचन, भक्ती संगीत, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात .

 अशी आहे आख्यायिका

प्राणहिता नदी ही पुराण काळातील नदी आहे.ब्रह्म पुराणातील गोदा परिक्रमा या भागात प्राणहिता नदीचा उल्लेख आहे. दाट जंगल व  डोंगर आणि दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या या नदीला ब्रह्मदेवाने शाप दिल्याची आख्यायिका आहे. दंडकारण्याचा राजा दंडक याने एकदा गंधर्व स्त्रीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता गंधर्व कन्येने दंडक राजाला शाप दिला.ब्रह्मदेवाच्या कमंडलातून वाहणाऱ्या प्राणहिताने शापास न जुमता वाहत दंडकरण्य हिरवे व प्रफुल्लित केले.यामुळे गोदावरी पाण्यानी भरून गेली. ते पाहून ब्रह्मदेवाने पर्वकाल आणि सणात तुझ्या जलात स्नान करणाऱ्याना मोक्ष मिळणार नाही, असा शाप प्राणहिता नदीला दिला.

त्यादरम्यान भगवान परशुराम यांना क्षत्रिय हत्येमुळे लागलेले पाप सुटत नसल्याने यांनी त्यांची कुऱ्हाड प्राणहिता नदीत धुताच प्राणहिता नदी स्वच्छ झाली. यावेळी त्यांनी प्रसन्न होऊन प्राणहिता नदीस शापातून मुक्त करीत सदा स्वच्छ राहण्याचा आशीर्वाद दिला. गुरू ग्रह हा मीन राशीतून प्रवास करेल तेव्हा सुरुवातीचे १२  दिवस तुझ्यात अमृताचा वास राहील असा आशीर्वाद दिला. गुरू,मीन राशीत प्रवेश करण्यासाठी बारा वर्षाचा कालावधी लागत असल्याने प्राणहिता नदीवर सिहंस्थ यात्रा सुरुवात होताच भाविक या पवित्र नदीत अभ्यंगस्नान करतात.

कसे याल?

स्वित्झर्लंड येथील लॅमव्हीव- तो हैदराबादहून पुष्कर मेळा पाहायला आला

सिरोंचा येथे येण्यासाठी नागपूरहून गडचिरोली मार्गे अथवा चंद्रपूरमार्गे जाता येते.  नागपूरहून गडचिरोली १७१ किलोमीटर आहे तर चंद्रपूर १५३ किलोमीटर आहे. सिरोंचा हे ठिकाण गडचिरोली पासून २०५ किलोमीटरवर आहे तर चंद्रपूरहून गोंडपिंपरीमार्गे २०९ किलोमीटर आहे. सिरोंचासाठी जवळचे रेल्वे स्थानक हे तेलंगाणा राज्यातील मांचेरीयल हे आहे. तिथून सिरोंचा फक्त ७० किलोमीटर आहे. हैदराबादपासून सिरोंचा २७३ किलोमीटरवर आहे.

पुष्कर मेळ्यासाठी तुम्ही येण्याचा विचार करत असाल तर गडचिरोली जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य पर्यटन स्थळांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. आष्टी येथील शेकरू पार्क, आलापल्ली येथील वनवैभव, कमलापूर येथील हत्ती कॅम्प, सिरोंचा तालुक्यातील परसेवाडा धबधबा, पुष्करजवळ असलेले डायनासोर फॉसिल पार्क, सिरोंचायेथून जवळ असलेला सोमनुर त्रिवेणी संगम, भामरागड जवळ  हेमलकसा येथील प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प तुम्ही पाहू शकता. परत जाताना वाटेत चपराळा अभयारण्य लागते.

(लेखक ‘गोदावरी क्रांती’ साप्ताहिकाचे संपादक आहेत) 

9421147890

Previous articleजगण्याने छळलेले दोन कवी : सुरेश भट आणि ग्रेस
Next articleसिनेमा…सिनेमा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.