सिनेमा…सिनेमा!

-नीलिमा क्षत्रिय

  लहानपणी माझ्या वडिलांची बदली अमरावतीला असताना मी खूप सिनेमे पाहिले. अमरावतीला त्या काळात म्हणजे ७०-७१ साली अकरा थिएटर्स होती. आम्ही तेव्हा पन्नालाल नगर मधे रहायचो. कलोती नावाच्या एका धनाढ्य माणसाची तेव्हा अमरावतीत बरीच घरे होती. ते ती घरे भाड्याने देत. त्यापैकीच एका घरात आम्ही भाड्याने रहायचो. आजूबाजूला ब्राम्हण, गुजराती कुटुंबे होती. गुजराती कुटुंबातल्या मोठ्या मुली बायका पिक्चरच्या खूपच शौकीन होत्या. आठवड्याला एक किंवा कधी दोन.. तीनही पिक्चर्स त्या बघायच्या. आमची आई पण मला घेऊन त्यांच्याबरोबर जायची.. माझी शाळा सकाळची असायची. शाळा सुटल्यावर पटकन सरळ घरी येण्याची प्रथा तेव्हा नसायची. गारूडी, मदारी, डोंबारी.. बोराचं, चिंचेचं झाड, कुत्र्या मांजरांची पिल्लं, कुठंही काही दिसलं की मुलं तिथं रेंगाळत. मीपण अशीच रमत गमत शाळेतून यायची. नेमका कॉलनीत मॅटिनीचा बेत ठरलेला असायचा. सगळ्या रिक्षा भरलेल्या असायच्या. आणि माझी वाट बघणं चालू असायचं. उशिरा आल्याबद्दल गप्पकन एखादा दणका पाठीत बसायचा. पटकन घरात नेऊन आई मला कपडे बदलायला लावायची. जेवण डब्यात घ्यायची. रिक्षात डबा खात आमची वरात थिएटरकडे निघायची.

साडेबाराचा मॅटीनी शो असायचा. मॅटिनीला बहुतेक जुने सिनेमे असायचे. अगदी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे पण तेव्हा पाहिल्याचं आठवतं. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाचा लहान मुलांना कंटाळा येई. तरीही कही और चल, आरती, एक ही रास्ता, यहुदी असे देव आनंद, दिलीपकुमार, प्रदीप कुमार, अशोक कुमारचे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे पण तेव्हा पाहिल्याचं आठवतं. बरोबर बारा वाजता सायकल रिक्षाने आम्ही सात आठ जणी घरून निघत असू. मी तेव्हा सात आठ वर्षांचीच असेन. माझ्या वयाच्या अजून एक दोन मुली असायच्या. तेव्हा थिएटरमधे ‘लेडीज’ नावाचा एक प्रकार असायचा. थिएटरमध्ये सर्वात मागे तीन एक फुटाची भिंत घालून हा विभाग वेगळा केलेला असायचा. इथे खुर्च्या नसायच्या तर बाकडे टाकलेले असायचे. तीन तीन तास पाठ न टेकता कशा सिनेमा पहात असतील बायका, त्याच जाणो. पाठ टेकायला मिळावी म्हणून काही जणी मागच्या  भिंतीच्या पुढच्या जागा धरत. आम्ही लहान कंपनी त्या अर्ध्या भिंतीच्या पार्टीशन ला लटकत पिक्चर पहायचो. तिकीट’ असायचं पासष्ट पैसे. आणि पुरूषांना इथे प्रवेश नसायचा. त्यामुळे पुरूष बरोबर नसताना बायका सहसा लेडीजचंच तिकीट काढत. तिकीट खिडकीवर पण पहिल्या दुस-या दिवशी तुफान गर्दी असायची. अशावेळी तिकीट काढायला काही एक्सपर्ट महिला असतं. भांडणं, रेटारेटी, करून त्या जेव्हा तिकीट काढून तिकीटबारीतून बाहेर येत तेव्हा त्यांचा अवतार रणचंडीसारखा झालेला असायचा. कधी तिकिटं संपून गेलेली असायची आणि तिकीटं ब्लॅकने विकणारे लोक थिएटरच्या आसपास फिरत असायचे.

   ह्या ‘लेडीज’मधे सगळं बायकांचंच राज्य असायचं. लहान मुलांना जमिनीवर दुपटं टाकून झोपवणं, न्हालेल्या बायकांचं केस मोकळे करून फॅनखाली केस वाळवणं ह्या गोष्टी लेडीजमधे अगदी सहज मानल्या जात. रीळ बदलताना दोन तीन मिनिटात पण बायका कचाकच गप्पा मारत. तेव्हा सत्तर एकाहत्तर साली राजेश खन्नाची फार हवा होती. दो रास्ते, हाथी मेरे साथी, यादगार, सच्चाझुटा, कटी पतंग, अंदाज हे पिक्चर्स लेडीज मधेच बसून पाहिले. धर्मेंद्रचा नया जमाना, समाज को बदल डालो, कब क्यू और कहां वगैरे त्याच काळातले…

  इंटरवल मधे बाहेर मिळणारे चणे फुटाणे लेडीजमधे बसल्यावर कधीच मिळायचे नाहीत. ते वडील बरोबर असताना बाल्कनीत बसायचो तेव्हाच मिळायचे.  त्याकाळी थिएटर बाहेर फक्त खारे दाणे, फुटाणे चिक्की आणि लाल किंवा केशरी गारेगार मिळायचं. चिक्कीवाला दोन खोमच्यांवर दोन अॅल्युमिनिअमचे थाळे ठेऊन उभा असायचा. एका थाळ्यात गुळशेंगदाण्याची चिक्की, तर दुस-यात साखर शेंगदाण्याची चिक्की. दोन्ही चिक्क्याचे मोठ्या भाकरीसारखे मोठाले गोल असत. त्यातले तुकडे मोडून वर्तमानपत्राच्या कागदात तो बांधून द्यायचा. पण ती त्या मानाने महाग असायची, त्यामुळे ती क्वचितच वाट्याला यायची. पण तिची चव अजूनही आठवते.

   पिक्चरला गेल्यावर बाहेरच्या काचेच्या शोकेसमधे लावलेले पिक्चरमधले फोटो पहाताना आनंदाच्या गुदगुल्या व्हायच्या. तेव्हा थिएटरवर लावलेलं पिक्चरचं बॅनर पेंटर लोक हाताने रंगवत असत. पेंटरच्या करामतीमुळे ब-याचदा त्याच्यावरचा फिरोज खान धर्मेंद्र सारखा दिसायचा.दिवसभर पिक्चर बघतो म्हणून आम्हाला डोअर कीपरचा फार हेवा वाटायचा. अंधारात टॉर्च मारत तो सगळ्या प्रेक्षकांना त्यांची त्यांची जागा दाखवून द्यायचा. भर दुपारी त्या काळ्याकुट्ट अंधारात बसून पिक्चर पाहिल्यावर पिक्चर सुटल्यावर पुन्हा रणरणत्या उन्हात बाहेर पडलं की सगळं जग वेगळंच वाटायचं, इतकं त्या स्वप्निल दुनियेत हरवायला व्हायचं.

    त्याकाळच्या ब-याच पिक्चर्सची कथानकं एकाच पठडीतली असायची. गुलमर्ग, सिमला, उटी, कुलू मनाली शिवाय पिक्चरमधले पात्र कुठे रहायलाच तयार होत नसावेत. बर्फाच्छादित पर्वतरांगांमधली गाणी , घाटावाटांमधून लांबलचक गाड्यांचा थरारक पाठलाग, मोठ्याशा हॉलमधे फायरप्लेस शेजारी बसून काळजी करणारी हिरॉईनची आई, किंवा चिरूट शिलगावणारा करारी बाण्याचा किंवा अगदीच अगतिक बाप. छान छान स्वेटर्स घातलेले हिरो हिरॉईन्स बघायला मजा यायची. हिरो नेहमी ‘बीए फर्स्ट क्लास फर्स्ट’  पास होऊन ओरडत यायचा.. ‘माँ मै पास हो गया’…आणि हिरोच्या आईला एकच पदार्थ बनवता यायचा.. गाजरका हलवा. काही झालं की तिचं आपलं ठरलेलं,” आज मैने तुम्हारे पसंदका गाजरका हलवा बनाया है”. गुलाबजाम, लाडू वगैरे कधीच नाही. फक्त गाजरका हलवा. गाजरका हलवाचं पेटंट फक्त तिचंच असायचं. हिरॉईन कधी गाजरका हलवा बनवायची नाही.

बऱ्याच पिक्चर्सची  सुरूवातच हिरॉईनची लंबीचौडी ओपन हूड स्टँडर्ड हेराल्ड किंवा इंपाला गाडी बंद पडण्याने व्हायची. मग हिरो नेमका तिथं टपकायचा. हिरॉईन त्याला मवाली समजायची.. ‘ऐ मिस्टर’… असं करून बोट दाखवून  ती त्याला खसकवायची. हिरोबरोबर त्याचा एखादा बावळट मित्र पण असायचा. तो लहान मुलांना आवडतील असे आचरट चाळे करण्याकरता नेमलेला असायचा. मग हिरो हिरॉईनला चिडवत गाणं म्हणायचा, दोन चार माकडउड्या, कोलांटउड्या.. पळापळी.. पकडापकडी.. की गाणं संपेपर्यंत दोघंही जनमजनम के साथी होऊनच परतायचे.

हिरॉईन श्रीमंत असली की हिरो गरीब असणार हे ठरलेलं असायचं. हिरोची आई त्याकाळचा एकमेव महिला गृहोद्योग म्हणजे शिलाई मशिनवर कपडे शिवून चार पोरांचा बाप शोभेल अशा हिरोला पोसत असायची. मशीन पण पायानी चालणारं नाही तर हातानी हँडल मारून चालणारं.  हिरॉईनचा बाप, “खानदानकी इज्जत मिट्टीमे मिला दी” आणि “ये रिश्ता कभी नही हो सकता” हे वाक्य म्हणण्यासाठीच असायचा. पण मग हिरोच्या आईला पाहिल्यावर त्याला तिची कहानी आठवायची जी आईने हिरोपासून लपवून ठेवलेली असायची. त्यात असं निघायचं की हिरो सुद्धा मोठ्या मिलमालकाचा मुलगा असतो पण काही कारणास्तव त्याची करारी आई त्याला घेऊन एकटीच रहात असते. मग हिरोचा बाप पण येतो. मग तो “फीर मै ये रिश्ता पक्का समझू”? हा जगप्रसिद्ध डायलॉग होतो.. मग आनंदी आनंद गडे.

  कधी कधी पटपट हिरो हिरॉईनची भेट, आधी तकरार मग प्यार ह्या फॉर्म्युल्यात घुसळून स्टोरी पुढे खेचली जाते. पहिल्या अर्ध्या तासात हिरो हिरॉईनचं लग्न झालं की समजून जायचं, पिक्चर पोराबाळांवर आधारीत आहे. म्हणजे लवकरात लवकर “बधाई हो, घरमे नया मेहमान आने वाला है”। ह्या डायलॉग साठी नेमलेल्या डॉक्टरची एन्ट्री होते. साधारण पणे हिरॉईनला बारीकशी चक्कर वगैरे आली की लगेच डॉक्टरसाब येतात. आधी तर बाईला तपासायला पांढ-या साडीतली बाई डॉक्टरच असायची. पण नंतर नंतर बाबा डॉक्टरही यायला लागला. हा डॉक्टर नेहमी वयस्कर असायचा. सभ्यपणा आणि विद्वत्ता त्याच्या कोटाच्या खांद्यावरून लटकत असायची. फक्त हातात हात घेऊन हिरॉईन ‘मॉं’ बनणार असल्याचं त्याला कळतं. कुठलीही टेस्ट नाही, ब्लड सॅम्पल नाही काही नाही. सोपा सुटसुटीत प्रकार. नाहीतर आता सर्दी पडशाचं निदान करायला पण डॉक्टर लोक ही टेस्ट करा ती टेस्ट करा करून पेशंटला पिडतात. वैद्यकीय क्षेत्र फारच मागासलंय आता. डॉक्टर तरी हात हातात घ्यायचा, पण गरीब किंवा मध्यमवर्गीय घरात हिरॉईनने उलटी केली की प्रेग्नंसीचं निदान सासूच करून मोकळी व्हायची. ना दवाखाना ना डॉक्टर. पण श्रीमंत घर असलं की मात्र डॉक्टर स्वत: घरी यायचा. डॉक्टरची बॅग सांभाळून गाडी पर्यंत सोडायच्या कामी हरीराम, गोपी असा कोणीतरी नोकर असायचा. तो नेहमी खांद्यावर पंचा टाकून, कमरेत वाकून, आणि लहान मुलांसारखे दुडक्या चालीत का चालायचा देव जाणे.

तर डॉक्टरने बधाई दिली की घरातले एकदम धन्य धन्य होणार, हिरॉईन लाजणार, हिरो बागडणार. आताचे बापाचे रोल करणारे सुद्धा ज्याच्यापुढे तरूण दिसतील असा जरड घोडमा हिरो बाप होणार म्हणून कोलांटी उडी मारायचा तरी प्रेक्षक शांतपणे बघायचे. मग लगेच दुस-या मिनिटात मूल होणार, अर्ध्या सेकंदात चालायला लागणार, एखादं गाणं सुरू असतानाच ते मोठं होणार, आणि काय आश्चर्य ते सेम बापासारखंच दिसत असणार. प्रेक्षकांच्या सोयीसाठी बापहिरोला मिशी चिकटवली जाते आणि डोळ्यावर जाडजूड चष्मा अडकवून दिला जातो मग पूर्ण पिक्चरभर बाप लेकाचा तात्विक संघर्ष, उदात्त जीवनमूल्ये जपणे, मुलाला धडा शिकवण्यासाठी घराबाहेर काढणं, जायदादसे बेदखल, आईची होणारी कुचंबना, आणि होणारं प्रेक्षकांचं मरण!! एखादा दिव्य संदेश देऊन हा पिक्चर संपत असे. पिक्चर संपला की प्रेक्षकांनी घरी येऊन डोक्याची गोळी घेऊन झोपून जायचं.

  डॉक्टरला अजून एक महत्त्वाचा डायलॉग असायचा. “अब इसे दवा की नाही दुवा की जरूरत है.”

हिरोला डोक्यावर मार बसलेला असतो. तो बेशुद्ध असतो. कुठलंच औषध काम करत नसतं. डॉक्टर वरील डायलॉग फेकून पिक्चर सोडून गेलेला असतो. कारण त्याचा तेवढाच रोल असतो. मग हिरोईन किंवा हिरोची मॉ मरता पेशंट सोडून कुठल्यातरी आडबाजूच्या डोंगरावरच्या देवाचे पाय धरायला जायच्या. त्यांचा देव म्हणजे ‘शिवजी’. त्याची भल्ली मोठी मूर्ती असलेलं ते मंदिर असतं. सर्व सामान्य जनतेला अशी शिवजींची मूर्ती असलेलं मंदिर कधी कुठे आढळणार नाही. आपल्यासाठी पिंडच असते. त्या तिथे कशा पोहोचायच्या वगैरे फालतू प्रश्न प्रेक्षकांना पडायचे नाहीत. त्या तिकडे घंटा बडवतात, मोठमोठ्याने गाणी गात त्या देवाला आळवतात की इकडे मरता पेशंट उठून बसायचा. पण कधी त्याची याददाश्त जायची तर कधी दृष्टीच जायची. मग त्याच्यासाठी हिरॉईनचा त्याग, हिरोने हिरॉईनच्या आयुष्याचं वाटोळं होऊ नये म्हणून तिला विसरण्याचा नाटक करणं, आणि अचानक एखादा पहिलेसारखाच हादसा होऊन त्याची दृष्टी किंवा याददाश्त परत येणं. आणि मग पुन्हा आनंदी आनंद गडे..

   दुस-या प्रकारच्या स्टोरीत कोणतं तरी  आजमगढ… टीकमगढ वगैरे नावाचं गाव असतं.. डाकूंची दहशत, टगडक टगडक घोडे.. रायसाबची जुडवी मुलं, त्यातलं एखादं डाकू पळवून नेतो. तो पुढे डाकूच होतो. दुसरा रायसाब कडे शिल्लक असलेला ‘इनिसपेक्टर’ होतो..  शेवटी दोघं एकमेकासमोर येतात. ‘इनिसपेक्टर’ डाकूवर गोळी झाडतो तोच रायसाबची जुनी नोकरानी मधे येते, मग तिला गोळी लागते आणि ती मरता मरता “सालोसे सिनेमे दफन किया हुवा राज” खुला करते की तिनेच रायसाबचं एक पोरगं पळवायला डाकूला मदत केलेली असते… वगैरे वगैरे. आणि मग ती इनिसपेक्टरच्या हातावर प्राण सोडते.

  ब-याचदा खेडेगावात शहरी बाबू येतो.. खेड्यातली माळ्याची मुलगी पटवतो. त्यांचे प्रेम प्रसंग दोन पक्षी चोचीत चोच घातलेले, किंवा फुलावर भुंगा रसपान करताना किंवा दोन फुलांच्या एकमेकांवर आदळण्याने सूचित होतात. एखादा ‘पूनममासी का उत्सव’, मग त्याच्यात सगळ्या आदीवासींबरोबर हिरो हिरॉईन आदीवासींचे फॅशनेबल कपडे घालून डोक्यात पिसं बिसं खोचून नाचतात. मग जोराचा पाऊस. हिरो हिरॉईन एखाद्या खंडहर मधे आडोशाला जातात. हिरॉईन मादक हालचाली, तिरपे कटाक्ष टाकत ओले कपडे, वाकून वाकून अंगावरच पिळते. हिरो शेकोटी पेटवतो. शेकोटी विझली की हिरॉईन तिथून माँ बननेकी तयारी करूनच घरी जाते. ह्या जोडीवर व्हिलन लक्ष ठेवून असतो. मग अचानक शहरी बाबूला गाव सोडून जावं लागतं. मग ती पत्र लिहिते, की “मै तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ”.  हिरोचे दूष्ट वडील ते पत्र लपवून ठेवतात. दोन पाच वर्षांनी ते पत्र हिरोला सापडतं. हिरॉईनचं पत्र हिरॉईनचं स्वत: व्हिडिओ कॉल चालू असावा तसं वाचून दाखवायची. आम्हाला तर किती तरी दिवस असं वाटायचं पत्रं वाचताना माणसं दिसतात त्यात. मग तो भरधाव गाडी चालवत हिरॉइनकडे जातो. पण हिरॉईन मुलाला जन्म देण्यासाठी पाच वर्षापूर्वीच ‘गाँव छोडके’ गेलेली असते.

मग बरीच रिळं खर्चून, हिरो वेशांतर करून हिरॉईनला शोधतो. एखादी मिशी किंवा गालावर मोठा मस लावला की तो कोण आहे ते गाववालेच काय त्याच्या सख्ख्या हिरॉईनला पण तो ओळखू येत नसतं.. मग हिरॉईन  सापडणार.. पण ती नेमकी सुंदर साडी नेसून, हातावर पदर पसरून तरातरा  पहाडावरून उडी मारण्याच्या तयारीत असते. पण अगदी ऐनवेळी येऊन हिरो  तिला हाका मारत सुटतो. तशी ती आणखीच भरभर पळत सुटते. शेवटी कसंबसं अगदी कड्याच्या टोकावर पोहचल्यावर हिरो तिला वाचवतो.  दरम्यान हिरॉईनच्या मुलाला, कशाला काय माहीत पण व्हिलन तिथं घेऊन येतो. त्याच्या खेचाताणीत तो पहाडावरून खाली डोकावणा-या झाडाला लटकतो. मग हिरो दोर टाकून त्याला वाचवायला गेला की व्हिलन अडथळे आणतो. हिरोईन दोर हाताने धरून ठेवते, तिच्या हाताच्या  रक्ताने दोर रंगतो. तोच पोलीसांचा जथा येतो. ‘हमने तुमको चारो ओरसे घेर लिया है’ म्हणत व्हिलनला पकडून नेतात. आणि पुन्हा आनंदी आनंद गडे…

  कधी आदर्शवादी पिक्चर्स पण असत. एखादा डॉक्टर किंवा प्राध्यापक ‘गाँवमे’ येतो. मग गाँववाले आधी त्याला त्रास देतात. पण एखादी गाँवकी छोरी मात्र त्याच्या प्रेमात पडून त्याला मदत करते. आणि गावच्या ठाकूरशी लढत द्यायला त्याला मदत करते. शेवटी ठाकूरचं मतपरिवर्तन होतं.

गावकी गोरी आणि डॉक्टर.. प्राध्यापक जो कोणी असेल त्यांचं लग्न होतं..

पुन्हा आनंदी आनंद गडे.

   अशा साध्यासुध्या इष्टो-या असायच्या पुर्वीच्या पिक्चर्सच्या.

नंतर नंतर ते स्मगलिंग स्मगलिंगचे पिक्चर्स आले. समुद्रात इकडून एक बॅटरी चमकली की तिकडून एक चमकणार. बॅटरी बॅटरी खेळून होत नाही तोच पोलीस येणार. पोलीस म्हणजे अॅक्टर जगदीश हे फिक्सच होतं. आणि कमिशनर म्हणजे इफ्तेखार.

   हिरे पळवापळवीचे प्रकार पण ब-याच पिक्चर्समधे असायचे. अशा पिक्चर मधे हिरो म्हणजे सूपर हिरो असायचा. अगदी चालत्या आगगाडीच्या टपावरची मारामारी म्हणू नका, हेलीकॉप्टरला लटकून जाणं म्हणू नका, बोटीतून पाठलाग म्हणू नका, हिरोला सगळं येतं. दिव्याच्या खांबाला टेकून उभी असलेली बिन स्टँडची सायकल काढून टांग मारावी इतक्या सहजतेने हिरो हेलीकॉप्टर उडवतो. अगदी पेशावर गुंडांची टोळी सुद्धा हिरो एकटाच गारद करत असे.

  राजेंद्रकुमारचे स्वप्नं विकणारे सिनेमे सत्तरच्या दशकात जास्त असायचे. मनोज कुमारचे देशभक्तीपर सिनेमे मुलांमधे देशभक्तीपर संदेश द्यायचा प्रयत्न करायचे.

  तोपर्यंत चित्रपट सृष्टीत अँग्री यंग मॅनच्या रूपात अमिताभ बच्चनचं आगमन झालं. आणि तिथून पुढे मात्र कथानकांचा बाज बदलत गेला.

   नसिरुद्दीन शाह, स्मिता पाटील, ओम पुरी, शबाना आझमी ह्यांनी समांतर चित्रपटांद्वारे चित्रपटसृष्टीला एक वेगळा आयाम दिला.

    पण त्याआधीचे मी पाहिलेले पिक्चर्स म्हणजे आनंदी आनंद गडे!!

(नीलिमा क्षत्रिय या ‘दिवस आलापल्लीचे’‘दिवस अमेरिकेचे’ या गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत .)

8149559091

Previous articleप्राणहिता नदीवरील पुष्कर कुंभमेळा
Next articleअनोखे ‘पुस्तक दोस्ती’ अभियान
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.