अनोखे ‘पुस्तक दोस्ती’ अभियान

जागतिक पुस्तक दिनानिमित्त आज वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे बाल वाचक संमेलन व ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित प्रा . सचिन सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या अनोख्या पुस्तक दोस्ती अभियानाची माहिती देणारा हा लेख – संपादक

……………………………….

-टीम मीडिया वॉच

 ‘वाचाल तर वाचाल’ हे आमच्या वाचन संस्कृतीचे ब्रीद आहे. बदलती नीतिमूल्ये, जागतिकीकरण, करिअर ओरिएंटेड शिक्षण व्यवस्था यामुळे समाज जीवन पार ढवळून निघाले. लहानग्यांपासून तर वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील मंडळी स्मार्टफोनच्या नादी लागली आहे.  हातात प्रत्यक्ष पुस्तके घेऊन वाचणारी पिढी दिसेनाशी झाली. इंटरनेटच्या मायाजालातून विद्यार्थ्यांना एका क्लिक वर पाहिजे ती माहिती मिळते .ज्ञान मात्र मिळत नाही. हे वास्तव आम्ही मात्र स्वीकारत नाही. विद्यार्थ्यांपर्यंत नेमकं ज्ञान पोहोचविण्यासाठी व वाचनाची आवड रुजविण्यासाठी विदर्भातील काही संवेदनशील तरुण मंडळींनी पुस्तक दोस्ती अभियान सुरू केले.

सध्याच्या काळात वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, पुस्तकासोबत नवीन पिढीची मैत्री व्हावी अशी मनात तळमळ असलेला असाधारण व्यक्ती दिसणे म्हणजे रखरखत्या वाळवंटात पाणथळ जागा शोधण्यासारखे कठीण कार्य आहे. पण काही दिवसांपूर्वी वाचन संस्कृतीला जिवंत करण्यासाठी प्रत्यक्ष धडपडणारे पेशाने शिक्षक असणारे वर्ध्याचे सचिन सावरकर यांच्याशी ओळख झाली. मागील दहा वर्षापासून काही समविचारी संवेदनशील मित्रांच्या सहकार्याने प्राध्यापक सचिन सावरकर यांनी विदर्भातील कित्येक गावातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्याची किमया पुस्तक दोस्ती अभियानाने करून दाखवली आहे. या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे आम्ही खरंच मोबाईलमध्ये पुस्तकं वाचू शकतो काय?

जागतिक पुस्तक दिनी प्रत्येक शिक्षित, उच्चशिक्षित व्यक्तीने आपल्या मनाला हा प्रश्न विचारावा. आमच्या आवडी-निवडी आमची जीवनशैली इतकच काय तर आमच्या भावभावना देखील आम्ही युज अँड थ्रो करून टाकले आहे.  मुद्रित पुस्तकांचे महत्त्व कालातीत आहे ते चिरकाल टिकणारे पूर्ण ज्ञानार्जन करणारे आहे. हे आम्हाला समजत असूनही जर आम्ही शहाणे होणार नसलो तर येणाऱ्या अनेक पिढ्या आम्ही उध्वस्त करीत आहोत.आम्ही जगतो आहोत, आमच्या भावभावनासहीत. गुदमरतो आहोत एकलकोंडेपणाच्या धुराच्या लोटात. अशी आमच्या अवतीभवतीची स्थिती असताना घरातील प्रौढ देखील हतबल झालेले दिसतात. इतका अतिरेक वापर आम्ही इंटरनेटचा करतो आहोत. साधारणतः १९७० ते १९९० या कालावधीत बुक स्टॉलवर भरगच्च पुस्तके असायची. वाचक पुस्तके विकत घेऊन वाचायची.

आज चित्र बदलले ज्या वयात हातात पुस्तके पाहिजे त्या वयात आम्ही मुलांच्या हातात मोबाईल दिल्याने पुस्तकांशी मैत्री तुटली आणि वाचन संस्कृती लयाला लागली. ग्रंथालये ओस पडली. मुलांनी खेळण्याच्या मैदानाकडे पाठ फिरवली. एकूणच काय तर वैचारिक अधःपतन सुरु झाले आणि समाज मनाची प्रचंड हानी झाली. हे गत चार दशकांच्या विविध समाज विघातक घटनांमधून दिसून येते. नवीन पिढीला वळण लावण्यात आणि संस्कार देण्यात आम्ही अपयशी ठरलो. आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली शिक्षण भरभराटीस आले आणि संस्कारक्षम शिक्षणाचा पाया दिसेनासा झाला. अर्थार्जनासाठी शिक्षण असा शिक्षणाचा अर्थ आम्ही लावला आणि कित्येक समस्या,  संकटे ओढवून घेतली. पुस्तकांचे वाचन करण्याकडे आई-वडिलांनी लक्ष दिल्यास कुटुंबात वाचन संस्कृती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. पण आम्ही पालकच वाचनाबद्दल उदासीन आहोत. मुलांची ही मोबाईल  वाचन प्रथा वर्तमान पिढीसाठी धोक्याची-घंटा ठरली आहे.

               पुस्तकांचे वाचन माणसाला विचार समृद्धी देते. चांगले व्यक्तिमत्व घडविते.पुस्तके ही मानवाला मनाला आकार देणारी आणि जीवन साकार करणारी असतात.माणसाने विचार शक्ती टिकविण्यासाठी पुस्तकांविषयी आवड ठेवून सर्व काळ ती जोपासणे हिताचेच आहे. विद्यार्थी शिक्षक व सामान्य माणूस अशा सर्वांच्याच आयुष्यात वाचनाचे स्थान प्रेरणा देणारे असते. आयुष्याला अर्थ देणारी वाचनसंस्कृती समाजात रुजविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर केवळ प्रयत्न नव्हे तर प्रत्यक्ष कार्य करणे गरजेचे आहे तरच आपण विवेकी आणि समृद्ध अशा समाजाची निर्मिती करू शकू. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा दिल्यास नवीन पिढीत आपण बालपणापासून वाचन संस्कृतीची बीजे रोवू शकू .

            प्राध्यापक सचिन सावरकर व सामाजिक बांधिलकी जोपासणारे त्यांचे सहकारी संदीप गाजरे, सुनील पोराटे,  वैभव भुरे, महेश यार्दी, अमोल पालेकर, प्रतिक मुंजेवार, विवेक महाजन, चेतन तेलरांधे, शितल सावरकर, क्षितिजा जाधव यासारखी मंडळी मागील दहा वर्षापासून विदर्भात वाचन चळवळ सर्वत्र राबवत आहे. पुस्तक दोस्ती नावाच्या चळवळीने विद्यार्थ्यांना वाचनाच्या गोडी लावणाऱ्या  विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी गावागावात जाऊन वाचन संस्कृतीसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. एखादा उपक्रम सातत्यपूर्वक सुरू राहिल्यास समाज मनावर त्याचा कसा सकारात्मक परिणाम दिसू लागतो हे या चळवळीने सिद्ध करून दाखविले आहे.

        पुस्तक दोस्ती अभियानच्या वतीने शनिवार २३ एप्रिल या जागतिक पुस्तक दिनी वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे ” पुस्तक दोस्ती वाचक संमेलन व ग्रंथोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात आयोजित या आगळ्यावेगळ्या अशा ग्रंथोत्सव व वाचन संमेलनात  विविधांगी उपक्रमांची रेलचेल असणार आहे.

 शेवटी प्रसिद्ध कवी सफदर हाश्मी लिहितात त्याप्रमाणे….

 किताबे कुछ कहना चाहती है

 तुम्हारे पास रहना चाहती है….

हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं

प्रा .सचिन सावरकर यांचा क्रमांक -96654 11734

Previous articleसिनेमा…सिनेमा!
Next articleश्रीलंकेच्या दिवाळखोरीतून मिळणारा धडा 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.