देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे ( दोघंही भाजपचे ! ) उत्पादन शुल्क मंत्री असताना अधिकृतपणे कोणताही निर्णय न घेता ‘घर पोहोच मद्य’ योजनेला चालना देण्यात आली . ( माझ्या हातात पुरावा नाही पण , ही योजना अशा पद्धतीनं राबवण्यास विरोध करणाऱ्या तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क आयुक्ताला केंद्र सरकारमधे प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आलं .) या योजनेच्या संदर्भात तेव्हाही समाज माध्यमावर बऱ्यापैकी चर्चा झाली होती . अपवाद म्हणून त्यापूर्वीच घर पोहोच मद्य योजना राज्यात सुरु असून आता त्या योजनेला सरकार मान्यता मिळाली आणि त्या योजनेचं स्वरुप अधिक व्यापक झालं अशी प्रतिक्रिया तेव्हा एका चर्चेत बोलताना मी व्यक्त केली होती , हे अजूनही आठवतं . राज्यातल्या शहरी आणि निमशहरी भागातील मद्य विक्रीच्या प्रत्येक दुकानात सध्या किमान २ तरी डिलिव्हरी बॉय आहेत ; असोत बिचारे कारण त्यामुळे अनेकांना रोजगार मिळालेला आहे ही वस्तुस्थिती आहे .
सध्याचे पत्रकार मद्याच्या संदर्भात बातम्या देतात पण , या विषयाची मूलभूत माहिती त्यांना नाही , हे एकदा स्पष्टपणे सांगून टाकलं पाहिजे . नीट लक्षात घ्या – विदेशी मद्य ( एफ एल-फॉरेन लिकर ) म्हणजे परदेशात निर्माण झालेलं आणि भारतात विकलं जाणारं मद्य असं आहे . त्याच धर्तीवर भारतातही ज्या मद्याचं उत्पादन केलं जातं त्याला भारतीय बनावटीचं विदेशी मद्य ( आयएमएफएल- इंडियन मेड फॉरेन लिकर ) असं म्हणतात . एफएल-फॉरेन लिकर आणि आयएमएफएल- इंडियन मेड फॉरेन लिकर ही दोन्ही मद्याची भिन्न वर्गवारी आहे . फॉरेन लिकरच्या शिशीच्या झाकणावर राज्य उत्पादन शुल्क खात्याचं अधिकृत सील चिकटवलेलं असतं . मद्याचा तिसरा प्रकार देशी दारु आहे . चौथ्या प्रकारात बिअर ,वाईन आणि अन्य सौम्य मद्य हे प्रकार येतात . बिअरमध्ये शुद्ध मद्यार्काचं प्रमाण ५ ते १५ टक्के इतकं असतं ; वाईनमध्ये ९ ते १५ टक्के शुद्ध मद्यार्क असतं ; याशिवाय ५ टक्क्यांपेक्षा कमी असणारी सुद्धा बिअर आणि वाईन उपलब्ध असते . सर्व पत्रकारांनी मद्यांअंतर्गत असलेला हा भेद लक्षात घेऊन लेखन केलं तर त्यांची विश्वासार्हता वाढेल आणि त्यांनी कोणतंही मद्य प्राशन न करता लेखन केलेलं आहे याबद्दल जाणकारांची खात्री पटेल !
कोरोनापूर्व आकडेवारीनुसार सध्या महाराष्ट्रात विदेशी मद्य आणि विदेशी बनावटीच्या भारतीय मद्याचा राज्यातील एकत्रित वार्षिक खप साधारणपणे १९ ते २० कोटी लिटर्स ; देशी दारुचा वार्षिक खप सुमारे ३५ लाख लिटर , बिअरचा वार्षिक खप ३४ -३५ लाख लिटर एवढा असून याच काळात महाराष्ट्रात वाईनचा खप दरवर्षी ८० लाख लिटर म्हणजे अन्य सर्व मद्यांच्या तुलनेत जेमतेम १ टक्का आहे . माहितीसाठी आणखी एक आकडेवारी – सन २००७ -०८ मध्ये महाराष्ट्रात सुमारे ५० लाख लिटर्स वाईनची विक्री झाली . २०१८-१९ मध्ये ( वर उल्लेख केल्याप्रमाणे कोरोनापूर्व काळात ) हा खप सुमारे ८० लाख लिटर्स इतका झाला आहे .
खुले आम वाईन उपलब्ध असतानाही २००७-०८ ते २०१८ -१९ या १३/१४ वर्षांत महाराष्ट्रात वाईनचा खप जर २० लाख लिटर्सनं वाढत असेल तर मॉल आणि किराणा दुकानात वाईन उपलब्ध झाल्यानं १०-२० कोटींवर जाईल आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस वाईन पिऊन ‘टेर’ झाल्यासारखा वागेल , महाराष्ट्राचा ‘मद्यराष्ट्र’ होईल असं समजणं हे निव्वळ भाबडेपणाचं आहे . हाच आधार लावायचा झाला तर मध्य प्रदेश ‘मद्य प्रदेश’ होईल याकडे भाजप दुर्लक्ष का करत आहे , हा प्रश फिजूल ठरतो , नाही का ?