-शिवा श्रीकृष्णराव काळे
बहिरम यात्रा सुरू झाली की चर्चा होते थंडी आणि हंडीची. गुलाबी शिशिरातली हुडकी भरवणारी “थंडी” आणि खाऊ ते अंगाला लागणाऱ्या या ऋतूमध्ये चमचमीत “हंडी” यांसाठीच ही बहिरम यात्रा पंचक्रोशीतच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे.आजूबाजूचा यात्रेचा बाजार , उघड्या पटांगणात दोर आवळून ठोकलेल्या राहुट्या आणि या आधुनिक युगात हवसे , नवसे आणि गवसे यांच्या गर्दीत बहिरमातील एकटे हरवलेले एक छोटेसे मंदिर आणि त्या मंदिरातील अत्यंत देखणी असलेली मूर्ती फारशी अशी कोणी बघत नाही.
बहिरमबुवांच्या दर्शनाकरिता दोन रस्ते आहेत एक पारंपारिक पायरी मार्ग व दुसरा नवीन झालेला वाहन मार्ग, गाडी मुख्य रस्त्यापासून मंदिराकडे वळवली की डाव्या हाताला रस्त्यापासून थोडे बाजूला चुना मातीचे एक छोटेसे भग्न मंदिर आहे. मंदिरात देव नसल्यामुळे त्याकडे कोणी लक्ष देत नाही. वर्षभर मंदिराभोवती दाट गवत वाढलेले असते आणि यात्रेच्या वेळी तर चणे फुटाण्यांच्या दुकानांच्या गर्दीत मंदिर दिसतच नाही. याच मंदिरवजा मखरात आहे विलक्षण अशी दगडी मूर्ती. या इतिहासाच्या अबोल साक्षीदाराने प्रत्यक्ष बघितला आहे बहिरम या संस्थांनचा संपूर्ण इतिहास. सुपारीएवढ्या बहिरम बुवा पासून ते आताच्या विक्राळ स्वरूपापर्यंतचा प्रवास, बळीप्रथेच्या अघोरी कृत्याचा रक्ताने माखलेल्या त्या पायऱ्यांवरचा प्रवास, गाडगे बाबांच्या “गोपाला गोपाला” भजनाचे स्वर, तमाशाच्या ढोलकीचा, नाचणाऱ्या नृत्यांगनाच्या पायातील बेधुंद करणारा घुंगरांचा आवाज, आमदार बच्चू भाऊंनी केलेल्या आंदोलनाचा तसेच शंकरपटात धावणाऱ्या खिल्लाऱ्या बैलजोडींचा, टुरिंग टॉकीज आणि यात्रेचा मिळून होणारा कर्णकर्कश आवाज हा सर्व प्रवास त्या मूर्तीने अत्यंत जवळून ऐकला आहे ,बघितला आहे. या यात्रेच्या सुरवातीपासूनची किंबहुना त्याही आधीची कितीतरी रेखाटने आपल्या मानस पटलावर कोरून स्वतः ती मूर्ती तेजस्वी झाली आहे.
कुठल्यातरी भाविकाने सांप्रत तिला ऑइल पेंट फासले आहे परंतु तरी सुद्धा तिच्या सौंदर्यात तिळमात्र बदल झाला नाही, परंतु तिच्या चेहऱ्यावरील मूळ भाव, देहबोली मात्र झाकले गेले आहे. परंतु खरे सौंदर्य कुठल्याही बाह्य अवडंबराने झाकोळले जात नाही हे जणू दाखवून देण्यासाठीच ती ललना उन वारा पाऊस यांची तमा न बाळगता तटस्थ उभी आहे. मी तर तिला भग्नसुरसुंदरी म्हणेल कारण त्या मूर्तीची केश रचना, अलंकार, वस्त्र अलंकार, उभे राहण्याची ढब हे सर्वच निराळे आहे. नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या या किशोरीने गळ्यात माळ, स्तनहार, बाजूबंद, तोडे, पैंजण असे मोजकेच अलंकार कमनीय देहावर परिधान केले आहे. परंतु एखादा पट्टीचा रसिक जरी असेल तर या दागिण्यामुळे तिला शोभा आहे की तिच्यामुळे दागिन्यांना शोभा आहे हे तो ठरवूच शकणार नाही.धनुष्यकृती भुवया, धारदार चाफेकळी नासिका, पातळ नाजूक ओठ यांमुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
प्रमाणबद्ध असलेले बांधेसूद शरीर, हाताच्या वितीने मोजता येईल अशी नाजूक सिंहकटी, उजव्या पायावर सर्व शरीराचा भार तोलून धरल्याने अगदी गोलाईयुक्त नाजूक डावा नितंबंचा चित्ताकर्षक भाग, आणि डावा पाय अलगद अधांतरी ठेवून उभ्या असलेल्या या मदनिकेच्या कमनीय देहाचा प्रत्येक अंगभाग तिच्या तारुण्याला आलेले उधाण दाखवण्यात कलाकार यशस्वी झाला आहे. तिचे मादक आणि कामी पुरुषाला बघता बघता संमोहित करणारे वर्तुळाकार स्तनमंडळ दाखविण्यात कलाकाराचे कसब पणाला लागलेले आहे असे दिसते. अत्यंत रेखीव आणि खरेच अत्यंत लोभस अवयवाची ही सूरसुंदरी नृत्य करीत आहे व तिच्या पाया जवळ तिची सेविका हे सर्व बघत आहे अशा या सुंदर इतिहासाच्या मूक साक्षीदारावर कुणाचीच नजर पडू नये हे आश्चर्यच, या वेळी मला एक श्लोक आठवत आहे,
आलस्य कन्या…
कुचावस्याः कामद्विप-कलभकुम्भाविति परे
वदन्त्यन्ये वक्षः सरसि -कमले काञ्चन-घटौ ।
ममायं सिद्धान्तः स्फुरति मदनेन त्रिजगतीं
विनिर्जित्य न्युब्जीकृतमिव निजं दुन्दुभि-युगम् ॥
या तरुणीचे स्तन मण्डल पाहून कुणी असे म्हणतात की, “मदन रुपी मत्त गंधाने भरलेली ही दोन कुंभ आहेत.”
कुणी यास, “वक्ष:स्थल रुपी सुरम्य सरोवरातील दोन कमल पुष्प आहेत.” असे म्हणतो.
तर कुणी यास ‘पिठाचे गोळे’ समजून दुर्लक्ष करीत आहे.
परंतु माझे तर हेच म्हणणे आहे की,
“ही दोन्ही मदन महीप नगारे आहेत. जी तिन्ही लोकांना पराजित करून कामदेवाने उलटी करून ठेवलेली आहेत.” अहाहा… काय रम्य वर्णन आहे. परंतु हे वर्णन सुद्धा या सौंदर्याचे परिमाण ठरू शकतं नाही. तिच्या मदमस्त तारुण्याची नदी निदान रसिक लोक या पृथ्वीतलावर जिवंत असेपर्यंत तरी आटणार नाही यात संशयचं नाही. ती मदनिका आपल्या तारुण्याची उधळण करीत प्रतीक्षेत आहे…. रसिकांच्या….. जे समक्ष येऊन त्या सौंदर्याचे आस्वादन करतील. अथवा न जाणो परिकथेतील एखाद्या शापित अप्सरे प्रमाणे ती पाषाणाची सुरसुंदरी असेल आणि बघत असेल वाट तुम्हा आम्हा सारख्या एखाद्या रसिकांची..जे तिला मुक्त करतील या पाषाण हृदयाच्या अरसिक लोकांच्या राज्यातून…
टीप:– श्लोक माझा नाही , आंतरजालावर वाचताना मला आवडला म्हणून त्याचा येथे उल्लेख केला,
(लेखक स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत)
8275217180