ख्रिसमस सिझन संपायला आता अवघे काही तास राहिले आहेत आणि त्याधीच यावर्षीचे प्रमुख नाताळ अंक हातात आणि ऑनलाईन अंक मोबाईलवर मिळाले आहेत. हा नाताळ सणाचा वैचारिक फराळ. या नाताळ विशेषांकांची ही जुजबी तोंडओळख.सालाबादप्रमाणे यावेळीही तीन नाताळ विशेषांकात अस्मादिकाचे लेख आहेत. `अलौकिक परिवार’, `शब्द’ आणि `रयत समाचार’ ऑनलाईन ख्रिस्तमस अंक.
‘निरोप्या’ या मराठीतील सव्वाशे वर्षे जुन्या असलेल्या (स्थापना एप्रिल १९०३) मासिकाचा ख्रिसमस अंक डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मिळाला. लेखक आहेत फादर वेन्सी डिमेलो, लॉरेन्स जी. , श्यामसुंदर महाराज सोन्नर आणि सायमन मार्टिन. जेसुईट फादर भाऊसाहेब संसारे `निरोप्या’ मासिकाचे संपादक आणि माधव खरात व्यवस्थापक आहेत.
नगरचे भैरवनाथ वाकळे यांच्या `रयत समाचार’ या ऑनलाईन अंकात रसिका लायल चावला, डॉ. निमिषा बंडेलू, सॉलोमन गायकवाड, सुवर्णा गावकर, डॉ. सुधाकर कऱ्हाडे, सॅम्युअल वाघमारे, विजय शशिकांत मिसाळ, रेव्ह. जे. आर. वाघमारे यांचे लेख आहेत.
त्याशिवाय वसईच्या ख्रिस्तोफर रिबेलो यांच्या `ख्रिस्तायन’ (वर्ष चौदावे) नाताळ- ई- अंकात अनेक मान्यवरांनी लिहिले आहे. जोसेफ तुस्कानो, मुक्ता अशोक टिळक, फादर मायकल जी., सायमन मार्टिन, सॅबी परेरा, डॉ. अनुपमा उजगरे, अक्षय शिंपी, डॅनिअल मस्करणीस, एमेल अल्मेडा वगैरे लेखक आहेत.
दयानंद ठोंबरे यांच्या `अलौकिक परीवार’च्या ख्रिसमस अंकाचे हे पंधरावे वर्ष. प्रवीण सुधाकर भोसले अतिथी संपादक असलेल्या या वार्षिक अंकात प्रशांत केदारी, स्मिता त्रिभुवन, प्रफुल्लचंद्र रणावरे, श्रीरंग गायकवाड, कांतीलाल लोहाडे, मार्या देठे, शामला बेन्जी, संदीप गायकवाड, डॉ. प्रीती साठे, डॉ. जेम्स तिवडे, शिल्पा फिलिप्स आणि अनुपमा डोंगरे-जोशी आदींनी लिहिले आहे.
‘शब्द’ हा नाताळ अंक पिंपरी चिंचवड येथून प्रकाशित झाला आहे, फ्रान्सिस गजभिव हे संपादक आहेत. अंकाचे लेखक आहेत अनिल दहिवाडकर, डॉ. सुभाष पाटील, गिरीष भालतिडक, पौलस वाघमारे, रॉजर महेंदर बेन्जी, विनोद जनार्दन शिंदे आणि अशोक हिवाळे.
पिंपरी चिंचवड येथील गुड समॅरीटन ग्रुप आणि द युनायटेड पास्टर्स अँड लिडर्स ट्रस्टच्या `सत्य’ या ख्रिसमस विशेषांकाचे संपादक डेव्हिड एम. काळे आहेत. या नाताळ अंकाचे लेखक आहेत अजितकुमार फरांदे, विश्वास वळवी, प्रेम व्हिमल, राजन नायर, प्रीती जेम्स, संजय आढाव आणि बन्यामिन काळे.
वसई धर्मप्रांताचे मुखपत्र असलेल्या सुवार्ता नाताळ विशेषांकात इब्राहीम अफगाण, स्टिफन परेरा, सिसिलिया कार्व्हालो, फादर रॉबर्ट डिसोजा यांनी लिहिले आहे.
‘सुवार्ता’ची एक ओळख म्हणजे फादर फ्रान्सिस दिब्रिटो या मासिकाचे पंचवीस वर्षांहून अधिक काळ संपादक होते. फादर अनिल परेरा `सुवार्ता’चे विद्यमान संपादक आहेत.
`ज्ञानोदय’ हे मराठी भाषेतले आजही प्रकाशित होणारे सर्वात जुने नियतकालिक. बाळशास्त्री जांभेकर यांचे ‘ दर्पण ‘ हे मराठीतले पहिले नियतकालिक १८३२ सालचे. `ज्ञानोदय’ १८४२ साली सुरु झाले ते आजतागायत चालू आहे. हल्ली पुण्यातून प्रकाशित होते. बिशप प्रदीप कांबळे हे संपादक आणि कांतिश तेलोरे कार्यकारी संपादक आहेत.
बहात्तर पानांचा आणि अनेक रंगीत जाहिरातीची पाने असलेला हा ‘ज्ञानोदय ‘ चा देखणा अंक आहे. लेखक आहेत डॉ. अमित त्रिभुवन, डॉ. रंजन केळकर, अनुपमा उजगरे, नंदकुमार शेडगे, किशोर हिवाळे, सुधीर चांदेकर, विद्यालक्ष्मी गोठोस्कर, सुधीर चौहान, वगैरे.
मराठी मायबोली असणाऱ्या ख्रिस्ती आणि इतर लोकांनीही या ख्रिसमस अंकांत लिहिले आहे. हाच तो आपला भारत आहे आणि हीच आपली सर्वसमावेशक संस्कृती आहे, यावर हे नाताळ विशेषांक शिक्कामोर्तब करतात.
मेरी ख्रिसमस आणि उंबरठ्यावर असलेल्या नूतन वर्षासाठी सर्वांना शुभेच्छा !!