राहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का ?

प्रवीण बर्दापूरकर

शेकडोंची गळाभेट , हजारोंना सोबतीला घेत आणि लाखो लोकांचे लक्ष वेधून घेणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पदयात्रा उद्या , ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करत आहे . १५० दिवस चालणारी ही पदयात्रा बारा राज्यातून जाणार आहे आणि ३५७० किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी पायी करणार आहेत . ७ सप्टेंबरला सुरु झालेली ही ‘भारत जोडो’ पदयात्रा बरोब्बर दोन महिन्यांनी महाराष्ट्रात प्रवेश करेल तेव्हा गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजवले गेलेलं आहे . गेल्या सुमारे ६० दिवसांत राहुल गांधी सुमारे १३०० कि  मी. पायी चालले आहेत आणि हा प्रवास अजून संपलेला नाही . हे सोपं काम नाही . त्यासाठी विलक्षण जिद्द , संयम , राजकीय तळमळ व अव्यभिचारी निष्ठा , शारीरिक क्षमता  लागते आणि ते सर्व या निमित्ताने राहुल गांधी यांनी सिद्ध केलेलं आहे . त्यामुळेच या पदयात्रेनं देशाच्या राजकीय वातावरणात बदलाचे तरंग उठत आहेत त्या  तरंगांच्या लवकरच लाटा होतील .

राहुल गांधी चालत आहेत. टाकलेल्या प्रत्येक पाऊलानंतर राहुल गांधी यांची लोकप्रियता नि:संशय वाढत आहे . समाज माध्यमावर या पदयात्रेच्या अनेक कथा प्रकाशित होत आहेत . मुख्य माध्यमं मात्र त्याबद्दल चोरटेपणानी बातम्या प्रकाशित करत आहेत . नि:ष्पक्ष म्हणवणारी , कायम काँग्रेसच्या वळचणीला पडणारी , प्रस्थापितांच्या विरुद्ध संघर्षाचा आवाज उठवण्याचा दावा करणारी , स्वत:ला विवेकी म्हणवणारी अशा विविध पठडीतली ही मुख्य प्रवाहातील माध्यमं आहेत . यापैकी कुणालाही राहुल गांधी यांच्या पदयात्रेला ठळक बातमीचं स्थान द्यावं  वाटत नाही . ही कुणाची तरी दहशत आहे म्हणायचं का ,  ही माध्यमं कुणाच्या तरी दावणीला बांधली गेली आहे म्हणायचं , हे ज्याचं त्यानं त्याच्या आकलनाप्रमाणं ठरवावं . मात्र , गेल्या सुमारे दोन महिन्यात ही यात्रा एक मोठा कारवा बनलेली आहे हे वास्तव कुणालाच नाकारता येणार नाही . बाय द वे , मी काँग्रेसचा सदस्य नाही , समर्थकही नाही ;  अनेकदा काँग्रेसनं कठोर टीका करणारा एक पत्रकार आहे . Sciatica च्या त्रासाने त्रस्त नसतो तर एक पत्रकार म्हणून वयाच्या सत्तरीच्या उंबरठ्यावर असूनही या यात्रेत मी ( व्यवस्थापनाचा विरोध झुगारुन ) सहभागी झालो असतो  आणि माझ्या वाचकांपर्यंत तो वृतान्त नक्कीच पोहोचवला असता कारण या पदयात्रेला एक वृत्तमूल्यही आहे पण , ते असो .

राहुल गांधी यांच्या पदयात्रेमुळे काँग्रेस पक्षाला संजीवनी प्राप्त झाली असं म्हणणं आजच योग्य ठरणार नाही मात्र , निश्चेष्ट पडलेल्या या पक्षात चेतना जागवली गेल्याचं अनुभवायला मिळत आहे . महत्त्वाचं म्हणजे ही यात्रा ज्या मार्गावरुन आतापर्यंत चालली तिथे तरुणांचा भरभक्कम आणि व्यापक प्रतिसाद मिळाला आहे . अनेकदा शेकडो तर अनेकदा हजारो स्थानिक तरुण या पदयात्रेत सहभागी होतं असल्याचं दृष्टीस पडत आहे . शिवाय काँग्रेसपासून विविध कारणाने दुरावलेले राजकीय पक्ष आणि अराजकीय संस्था-संघटना या पदयात्रेशी जोडल्या गेल्याचं दिसून आलं . याचा एक अर्थ दुरावलेल्यांना जवळ करण्याचं कामही राहुल गांधी यांची पदयात्रा करत आहे . या पदयात्रेला पाठिंबा देणाऱ्या संस्था, संघटना किती जनाधार असलेल्या आहेत , याच्या तपशिलात जाण्याचा वावदूकपणा करण्याचं काहीच कारण नाही . कारण एक एक काडी जोडूनच शेवटी मोळी तयार होत जाते हे विसरता येणार नाही .

या पदयात्रेच्या निमित्तानं राहुल गांधी सरळ मार्गी आहेत . मितभाषीच आहेत , बेरके नाहीत अशा समाज माध्यमात प्रकाशित होणाऱ्या मजकुराकडे फार गंभीरपणे बघण्याची मुळीच गरज नाही . एक राजकारणी म्हणून राहुल गांधी यांना २०१४ पर्यंत पुरेसं गांभीर्य नव्हतं . स्पष्टच सांगायचं तर काहीसा बालीशपणाही असल्याचं तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जाहीररित्या पाणउतारा करुन राहुल गांधी यांनी सिद्धच केलं होतं . तेव्हापासून आतापर्यंत शहजादा , पप्पू , मम्माज् बॉय अशा शेलक्या शब्दांत राहुल गांधी यांच्यावर टीका झालेली आहे . ही पदयात्रा सुरु झाल्यावर राहुल गांधी यांची प्रतिमा एकेकाळी कशी ड्रगिंस्ट व खुशालचेंडू होती याबद्दल व्हॉटसअप विद्यापीठात पोस्टसचा रतीबच घातला गेला . त्या ट्रोलिंग व सर्व समज-गैरसमज आणि प्रतिमांना मूठमाती देत एक नवा आणि धोरणी राजकारणी उदयाला आला आहे , असंच राहुल गांधी यांचं अलीकडची काही वर्ष आणि विशेषत: या पदयात्रेतलं वर्तन आहे . धोरणी आणि बेरकेपणा , आक्रमकता आणि आतातायीपणा यातील सीमारेषा ठाऊक झालेला सुसंस्कृत नेता असंही  त्यांचं हे वर्तन आहे . धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानं राहुल गांधी यांच्यावर ते धार्मिक होत असल्याचीही टीका मधल्या काळात झाली . राजकारण म्हटलं की , मतांसाठीच जात-धर्म येणारच पण , देशात दुही माजवणारी धर्मांधता मात्र त्यांनी मुळीच दाखवलेली नाही , याचीही नोंदड आवर्जून करुन ठेवायलाच हवी   .

राहुल गांधी यांनी राजकारण लहानपणापासूनच पाहिलं . पूर्वजांचा स्वातंत्र्य संग्रामातील त्याग , सहभाग आणि नंतर सत्तेचं फार मोठं संचित त्यांच्याकडे आहे . पंतप्रधान असलेल्या आजी आणि वडिलांना देशासाठी हुतात्मा होण्याची किंमत राहुल गांधी यांनी चुकवलेली आहे . अशी पार्श्वभूमी असली तरी राजकारण काय असतं हे त्यांना ठाऊक नाही अशी टीका विरोधी पक्षीयांकडून कायमच झाली . सलग दोन लोकसभा आणि काही विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला त्यांच्या नेतृत्वाखाली पराभव स्वीकारावा लागला . त्यामुळे तर राजकारण कसं करायचं , हे राहुल गांधींना खरंच कळलेलं नाही आणि त्यांच्यात नेतृत्व गुण नाहीत , असा ठपका ठेवत स्वपक्षातूनही त्यांना विरोध होऊ लागला . मात्र , याच काळात एका वेगळ्या मुशीतला राजकीय नेता घडण्याची प्रक्रिया सुरु झालेली होती आणि आहे हे ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या निमित्तानं समोर आलेलं आहे . आज केंद्रात आणि अनेक राज्यात भाजप सत्तेत आहे . सत्तेत येण्यासाठी त्या पक्षातील नेतेही राजकीय प्रक्रियेच्या अशाच मुशीत घडले . लोकशाहीत सत्ताधाऱ्यासोबतच विरोधी पक्षातही नेत्यांची ‘अशी’ जडणघडण ही एक अत्यंत आवश्यक आणि अपरिहार्य प्रक्रिया असते . ती प्रक्रिया राहुल गांधी यशस्वीपणे पार पाडत आहेत , असाही या या यात्रेचा आणखी  एक अर्थ आहे .

पुन्हा एकदा सांगतो , देशात आज बेरोजगारी , रुपयांचं अवमूल्यन , मातीमोल होणारी कृषी व्यवस्था , वाढती बेरोजगारी अशा अनेक मूलभूत प्रश्नांची चर्चाच होत नाही . हे प्रश्न विचारणारे पत्रकार नाहीत आणि समजा कुणी पत्रकार त्यासाठी सज्ज झाला तर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सत्ताधारी उपलब्ध होत नाहीत अशी स्थिती आहे . मंदिर , काश्मिरचा स्वायत्त दर्जा काढणं , देशातून विरोधी पक्ष संपवणं भाषा ( की धमकी ? ) उघडपणे होणं आणि त्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्नही होणं , यामुळे आपल्या देशातील लोकशाहीचा प्रवास एक पक्षीयत्व आणि बहुमताकडून धार्मिकतेच्या आधारावर बहुसंख्याकवादाकडे होणं , असे धोके उभे राहिलेले आहेत . हे कुणाही संवेदनशील लोकशाहीवादी माणसाला समजतं . या धोक्याच्या विरोधात फार कमी लोक निर्भयपणे बोलतात , त्यात आघाडीवर राहुल गांधी आहेत . अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजप आणि रा. स्व. संघाच्या विरोधात उघडपणे आणि बेडरपणे भूमिका घेणारे राहुल गांधी हे एकमेव राजकीय नेते आहेत .

भारताची सेक्युलर ही प्रतिमा या पुढेही जपली जाण्यासाठी आणि लोकशाहीचं निधर्मीकरण अबाधित राहण्यासाठी खरं तर अनेकांनी संघटित होत पुढे येण्याची नितांत गरज निर्माण झाल्याचा हा काळ आहे . ते काम राहुल गांधी करत आहेत . ‘भारत जोडो’ पदयात्रेमुळे देशाचं राजकारण करायचं म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पक्षाची आणि त्या पक्षाच्या नेत्याची पाळंमुळं घट्ट असावी लागतात . काँग्रेस पक्षाची मुळं देशात घट्ट रुजलेली आहेत पण , काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची आणि त्यातही राहुल गांधी यांची पाळंमुळं तशी घट्ट नाहीत , असं नेहेमीच बोललं जातं . शिवाय गांधी घराण्यातील व्यक्ती तर केवळ ‘गांधी’ नावाच्या करिष्म्यावर स्वत:ला आणि पक्षालाही तारुन नेते , अशी टीका होतच असते . या पदयात्रेमुळे राहुल गांधी यांची पाळंमुळं या देशाच्या मातीत पक्की रुजली जातील आणि भाजपला  समर्थ पर्याय म्हणून काँग्रेस पक्षाला उभं करण्याची कर्तबगारी ते नक्कीच दाखवतील असे संकेत या पदयात्रेतून मिळत आहेत : एक लोकशाहीवादी म्हणून सर्वांनीच या संकेतांचं स्वागत करायला हवं .

जाता जाता राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भारतीय जनता पक्ष हादरला आहे , येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे अशाही चर्चा ऐकायला मिळत आहेत पण , हा एक शुद्ध भाबडेपणा आहे . एका पक्षाच्या एका पदयात्रेनं प्रतिस्पर्धी पक्ष पूर्ण उखडला जात नसतो , याचं भान बाळगलं जायला हवं . भाजपचीही मुळं आता देशभर पसरली आहेत शिवाय या पक्षाची संघटनात्मक वीण घट्ट आहे . ती मुळं आणि ती वीण सैल करण्यासाठीची ‘भारत जोडो’ यात्रा ही एक सुरुवात आहे , हे लक्षात घ्यायला हवं . कॉंग्रेसला पूर्ववैभव प्राप्त करुन देण्यासाठी एकटे राहुल गांधी आणि नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या दोघांनी सक्रिय होऊन भागणार नाही तर , उगाच भ्रमात न राहता काँग्रेसच्या सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना कामाला जुंपून घ्यावं लागणार आहे .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleकशाला हवी असते ती सरोगसी?
Next articleकुळाचार विधीतील नाट्यात्मकता
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here